Saturday, October 3, 2020

आपलं विश्व केवढं मोठं आहे ?


#कुतूहल #curiosity 

पृथ्वीवर अंतरे ही किलोमीटरमध्ये मोजतात. सध्या तर गुगल मॅपमुळे आपला विश्वास किलोमीटरवर राहिला नसुन मिनीटे - तासवर राहिला आहे. म्हणजे गुगल मॅपवर किती किलोमीटर अंतर आहे यापेक्षा आपण किती वेळ दाखवलं जात आहे ते बघतो. म्हणजे 10 मिनीटे, अर्था तास.....किती वेळ लागणार यावरून आपण नियोजीत ठिकाणी पोचण्याबाबत अंदाज व्यक्त करतो. म्हणजेच आता आपण अंतर हे काळामध्ये - किती वेळ लागणार यामध्ये मोजायला सुरुवात केली आहे असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही. 

आता अवकाशात अंतरे मोजणाऱ्या अनेक एककांपैकी प्रकाशवर्षे हे एक प्रमुख एकक आहे. प्रकाशाने एका वर्षात केलेला प्रवास हा एक प्रकाशवर्ष एवढा मोजला जातो.  

प्रकाशाचा वेग हा निश्चित आहे, म्हणजे एका सेकंदात प्रकाश हा सुमारे 3 लाख किलोमीटर अंतर कापतो, नक्की सांगायचं झालं तर 2 लाख 99 हजार 792 किलोमीटर एवढे अंतर कापतो. एका प्रकाशवर्षात प्रकाश हा सुमारे 95 वर 11 शून्य एवढे किलोमीटर अंतर कापतो. ब्राम्होस क्षेपणास्त्र जे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र समजलं जातं, ध्वनीच्या 2.8 पट वेगाने प्रवास करते. ते समजा non stop निघाले तर एक प्रकाशवर्षे एवढे अंतर कापायला ब्राम्होस क्षेपणास्त्राला सुद्धा कित्येक हजार वर्षे लागतील. 
 
असो... तर आता प्रकाशवर्ष हे नेमकं काय ते तुम्हाला समजलं असेल. आता या परिमाणचा - एककाचा वापर करत हे विश्व केवढं अजस्त्र आहे हे समजायला थोडी मदत होईल.  

आता पुढे काही उदाहरणे देतो म्हणजे विश्वाच्या पसाऱ्याची व्याप्ती समजण्यास मदत होईल.  

आपल्या सुर्याच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सीमा सेंच्युरी हा 4.22 प्रकाशवर्षं अंतरावर आहे. 

आकाशात रात्री डोळ्यांनी दिसणारा सर्वात प्रखर तारा - व्याध तारा ( Sirius ) हा 8.6 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.  

आपण आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे ज्याला आकाशगंगा म्हणतात त्या आकाशगंगेच्या मध्यापासून सुमारे 26 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहोत. आपल्या आकाशगंगेचा व्यास हा व्यास हा अंदाजे 1 लाख 70 हजार ते 2 लाख प्रकाशवर्षं एवढा समजला जातो.  

आपल्या आकाशगंगेच्या जवळ सर्वात जवळची दीर्घिका ही Andromeda Galaxy जिला देवयानी आकाशगंगा या नावानेही ओळखले जाते ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2 लाख 40 हजार प्रकाशवर्षेपेक्षा जास्त अंतरावर आहे. 

माहीत असलेली सर्वात मोठी दीर्घिका म्हणून IC 1101 या ओळखली जाते जी आपल्यापासून तब्बल एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या दीर्घिकेचा व्यास हा 50 लाख प्रकाशवर्ष एवढा समजला जातो.  

अवकाशात जसे ताऱ्यांचे समूह असतात तसे दीर्घिकांचेही समूह असतात. विविध दीर्घिकांच्या समूहांचे काही गट असतात. असे अनेक गट मिळून दीर्घिकांचा एक मोठा समूह बनतो. अशा अनेक समूहांचे अनेक समूह असतात. तर अनेक समूहांमध्ये मोठ्या अवकाश पोकळी आहेत, म्हणजे तिथे ना दीर्घिका आहे, ना तारे आहेत ना कृष्ण विवर आहे, अशा अवकाश पोकळीला Void म्हणतात. अशा पोकळीही या काही अब्ज प्रकाशवर्ष एवढ्या मोठ्या आहेत.  

अशा अनेक दीर्घिकांच्या समूहांचे, पोकळीचे हे विश्व बनले आहे. 

आपण अवकाशात विविध दिशांकडे जास्तीत जास्त 46.5 अब्ज प्रकाशवर्षे एवढ्या लांब बघू शकतो. म्हणजेच सर्व दिशांचा विचार केला तर आपल्याला दिसणारे विश्व हे 93 अब्ज प्रकाशवर्षे एवढे मोठे आहे.  

आता पुढचा प्रश्न हा की या दिसू शकणाऱ्या विश्वाच्या पुढे काय आहे ? तर उत्तर हे आहे की त्याच्या पुढे आपण बघू शकलेलो नाही. म्हणजे तेवढ्या क्षमतेच्या दुर्बिणी आपल्याकडे नाहीत. जेवढ्या शक्तिशाली अवकाश दुर्बिणी बनवू तेवढे आपण दूर बघू शकणार आहोत. अर्थात त्याच्या पुढे काय आहे, किती विश्व बाकी आहे हे प्रश्न अनुत्तरित आहेत.  

म्हणूनच हे विश्व अनंत आहे असं म्हंटलं जातं.  

विश्वाच्या पसाऱ्याबाबत माहिती सांगणारे विविध लेख, लघुपट - माहितीपट उपलब्ध आहेत. यापैकी पुढील एक व्हिडियो बघा आणि थक्क व्हा. ( अंतरांच्या बाबतील काही माहिती जरा वेगळी असेल पण अनंत विश्वाच्या व्याप्तीचा अंदाज लावता येईल ) 
 
https://www.youtube.com/watch?v=q1mkjkTqg0Y
 
https://www.youtube.com/watch?v=i93Z7zljQ7I 

https://www.youtube.com/watch?v=gIbfYsQfNWs

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...