पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Saturday, June 30, 2012

" आनंदवारी"तील काही सुखद अनुभव.....


माझे मनीची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी
पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधिले

पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडालेल्या ज्ञानदेवांना वारीचे कसे वेध लागायचे असे त्यांच्या या अभंगातून दिसून येते. ज्ञानदेवांप्रमाणे पायी वारी करणा-या लाखो वारक-यांच्या मनाची स्थिती अशीच काहीशी असते.
वारकरी म्हणजे वारी करणारा. वारीचा अर्थ फे-या घालणारा किंवा त्यापेक्षा ठराविक मार्गाने ये-जा करणारा. तेव्हा जो असा फे-या घालतो तो वारकरी होतो. तुळशीची माळ गळ्यात घातली की वारी करायचीच असे काहीसे बंधन त्या व्यक्तिवर असते. वर्षात वारी केली नाही तर चैन पडत नाही, वारी ही केलीच पाहिजे, चालत जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतलेच पाहिजे अशी पक्की मनात धारणा असलेला लाखो लोकांचा वर्ग आज या महाराष्ट्रात आहे.
म्हणुनच ज्येष्ठ महिना लागण्याच्या आधीच लाखो लोकांची वारीला जाण्याची लगबग सुरु होते. आजही बहुतांश वारकरी हे शेतकरी आहेत. त्यामुळे शेतीच्या पेरणीची सुरुवातीची कामे उरकून वारकरी वारीसाठी सज्ज होतो. तर इतर वारकरी आपल्या कामधंद्याच्या एका महिन्याचं नियोजन करत वारीची तयारी करतात. देहू आणि आळंदीला लाखो वारक-यांचे जथ्थे धडकायला सुरुवात होते. एरवी काही हजार वस्तींची लोकसंख्या असलेली ही गावे माणसांच्या लगबगीने , गर्दीने भरुन जातात. गेल्या ५० वर्षात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखी सोहळ्याबरोबर विविध संतांच्या पालख्यांचीही भर पडली आहे. त्यामुळे पंढरपूरपर्यंत या संतांच्या पालख्या पोहचेपर्यंत,
वारी जशी पुढे सरकते तसतसे वारक-यांची संख्या वाढत जाते, पंढरपूरपर्यंत पोहचेपर्यंत ही संख्या १० लाखांच्या घरात जाते. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल आणि उभे रिंगण बघण्यासाठी मोठी गर्दी होते. रिंगणामध्ये धावणारा अश्व, मानाचे घोडे, रिंगण घालणारे पताकाधारी, महिला हे सुद्धा गर्दी खेचतात. माऊलींच्या पालखीचा दिवे घाटाचा टप्पा, तुकाराम महाराजांच्या पालखीचा रोटी घाटातील प्रवास बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत असते. एवढंच नाही तर इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमुळे ही वारी आता घराघरांत पोहचली आहे. वारी माहित नसलेले, चतुर्थीप्रमाणे फक्त आषाढी एकादशी निमित्त उपास करणा-यांनाही वारीचे आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे एक दिवस का होईना वारीत सहभागी होणा-यांची संख्या वाढायला लागली आहे,  पुणे ते सासवड असा एक दिवस प्रवास करणारा मोठा वर्ग पुणे आणि पुणे परिसरात आहे.

अशी ही आनंदवारी २१-२२ दिवसांची एक छोटेखानी शाळा आहे. जीवनात कसे वागायचे , जीवनाचे तत्वज्ञान म्हणजे काय, सेवा करतांना सुख मिळते म्हणजे नक्की काय होते, राग – मत्सर कसा विसरायचा, त्यासाठी काय करायचे हे सगळे वारी शिकवते, वारीमध्ये शिकायला मिळते. लोकं भोळी भाबडी कशी असतात, दुस-याला मदत करण्यास कशी तत्पर असतात, आपल्या ताटातील घास दुस-याला काढून कशी देतात याचा पुरेपुर अनुभव वारीमध्ये घेता आला, या लोकांना जवळुन बघण्याचे जणु भाग्यच लाभले. २००९ ला वारी कव्हर करण्याची संधी मिळाली आणि या वर्षी पुन्हा वारीला जाण्याचा योग आला. वारीमध्ये आलेले विविध अनुभव बघितले तर वारी पुन्हा पुन्हा, दर वर्षी करायची असेच ठरवले आहे. 
या दोन्ही कव्हरेजच्या दरम्यान आलेले काही सुखद अनुभव सर्वांना सांगावासे वाटतात.
१३ जून, २०१२ ला ज्ञानेश्वर पाऊंलीच्या पालखीने संगमवाडी रोडमार्गे मुख्य पुणे शहरांत प्रवेश केला. संगमवाडी रोड हा अगदी मोठा, प्रशस्त अगदी सहा पदरी रस्ता आहे. रस्ताच्या दोन्ही बांजूना काही भाग वगळता रुंद असे फुटपाथ आहेत. सकाळपासून वारकरी मोठ्या संख्येने या रस्त्याने पुण्यात दाखल होत होते. मी पण कव्हरेजसाठी त्या भागांत फिरत होतो. वारकरी दाखल होणार असल्याच्या निमित्ताने रस्ते , फुटपाथ अगदी चकाचक होते. असेच काही वारकरी चालत होते, त्यापैकी एका महिलेला फुटपाथवर एका बाटलीचा काचेचा एक मोठा तुकडा दिसला. तो तुकडा असल्याचं तिच्या लक्षात येईपर्यंत ती काही पावले पुढे गेली होती. ती थांबली परत मागे फिरली, तो काचेचा तुकडा उचलला आणि फुटपाथच्या बाजूला असलेल्या भितींवर तो पडणार नाही या बेताने ठेवला आणि ती पुढे निघुन गेली. खरं तर तो तुकडा फुटपाथवर भिंतीच्या बाजूला होता. बहुतेक सर्व वारकरी हे रस्त्यावरुन चालत होते. कोणाच्या पायाला लागण्याची शक्यताही नव्हती. तरीही आपल्यामागे येणा-या कोणाच्या पायाला इजा होऊ नये यासाठी तीने ही काळजी घेतली. कदाचीत इतर दिवशी एखाद्या नागरीकाला तो तुकडा दिसला असता तर त्याने लक्ष दिले नसते, तो पुढे निघुन गेला असता. मात्र या निमित्ताने आपल्याबरोबर दुस-याच्याही जीवाला जपण्याची वारक-यांची वृत्ती दिसून आली.

ज्येष्ठ अष्टमीला आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवते. आळंदीच्या घाटावरुन थेट प्रक्षेपणाच्या तयारी करण्यासाठी आम्ही आमच्या ओबी व्हॅन्स आदल्या दिवशी रात्री घाटावर पार्क करण्यासाठी निघालो. घाटवर घेऊन बघतो तर धडकीच भरली. हजारो वारकरी आपल्या सामानासह हजर आहेत, कोणी जेवत आहेत, कोणी भजनं करत आहेत तर कोणी झोपले आहेत. गाडी दुस-या टोकाला न्यायची असल्याने वारक-यांना जागेवरुन उठवल्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. तेव्हा प्रत्येक वारक-यासमोर हात जोडून माऊली , जरा दोन मिनीटाकरता उठता का ? “  अशी विनंती करायला सुरुवात केली. तेव्हा चेह-यावर कुठलाही आडकाठी न आणता वारक-यांनी उठत गेले आणि चक्क 400-450 लोकांना उठवत आम्ही अवघ्या काही मिनिटांच गाडी घाटाच्या दुस-या टोकाला नेऊन उभी केली. हे सगळे शक्य झाले ते हात जोडून विनंती केल्यामुळे नाही तर आम्ही त्यांच्यासाठी उच्चारलेल्या माऊली या शब्दाने. माऊली हा वारीमधील एक परावलीचा शब्द आहे. तुम्ही कोणालाही माऊली नावाने हाक मारलीत की समोरचा तत्पर तुमच्याकडे लक्ष देतो, तुमचे म्हणणे ऐकतो, तुम्हाला शक्य असेल तेवढी मदतही करतो. याचं कारण आपण माऊली शब्द उच्चारतांना जणू देवाचे नाव घेतो, पांडुरंगाचे नाव घतो, संत ज्ञानेश्वरांचे नाव घेतो अशी वारक-यांचा श्रद्धा आहे. त्यामुळे वारीत माऊली या शब्दाची जादू प्रत्येक ठिकाणी, प्रत्येत पावलावर अनुभवायला मिळते.            

वारीमध्ये सर्व वयोगटातील लोकं सहभागी होत असतात. विशेषतः ५० पेक्षा जास्त वयाच्या वारक-यांचा भरणा जास्त असतो. जीवनात सर्व जवाबदा-या पार पडलेले आणि नेहमीच्या आयुष्यातून निवृत्तीकडे झुकणारे, विश्रांतीकडे घेऊ पहाणार-या लोकांची संख्या लक्षणीय असते. मात्र माऊलींच्या दिवे घाटातील प्रवासाच्या कव्हरेजमध्ये भेटलेल्या इस्लामपूरच्या लक्ष्मीबाई वाडेकर आजीचा पायी प्रवास बघुन चक्करच यायची वेळ आली. इस्लामपूरच्या या लक्ष्मीबाई आजींचे वय होते १०० आणि त्याची वारी करण्याची वेळ होती ५० वी. त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर ५० वर्षापूर्वी मालक म्हणजे नवरा गेल्यावर इतरांचे बघुन वारीला सुरुवात केली. अजुनही या आजी दर वर्षी वारीचा प्रवास पायी करत आहेत आणि हे शक्य झाले ते पांडुरंगाच्या कृपेने असे ते नमस्कार करत सांगतात. वारीला आल्याशिवाय करमत नसल्याचे त्या सांगतात. लक्ष्मीबाई आजी दिवे घाट चक्क पायी चढल्या. घाट चढल्यावर थकवा वगैरे काही आला नाही असे ते आवर्जुन सांगतात. इतरांबरोबर गवळण, भजन अगदी खणखणीत आवाजात म्हणतात. चालतांना त्यांना आधारीसाठी कोणाला धरावे लागत नाही. चालण्याचा वेगही इतर वारक-यांना लाजवेल असा होता. धन्य त्या लक्ष्मीबाई आजी आणि त्यांची भक्ती.

असाच एक वेगळा अनुभव बारामती जवळ असलेल्या काटेवाडी गावात आला. निर्मल ग्रामपंचायतचा आदर्श ठरलेले काटेवाडी गाव तसे छोटे. तुकाराम महाराजांची पालखी दुपारच्या विसाव्याला थांबली. त्यामुळे साधारण एक लाखभर वारकरी तरी त्या गावात आणि त्या परिसरात जेवायला गेले. कव्हरेज करतांना चांगलीच धावपळ झाल्याने मी घाम पुसत पाणी पित चालत होतो. एका तासाने त्याच गावातील रस्त्यावर आगळेवेगळे असे मेंढ्यांचे गोल रिंगण होणार असल्याने त्याच्या कव्हरेजच्या तयारीची जुळवाजुळव मनातल्या मनात सुरु होती. तेव्हा अचानक एका माणासाने अहो चॅनेलवाले अशी हाक मारली. मी थांबलो, ती व्यक्ती गावातील एक रहिवासी होती, ती माझ्याकडे आली आणि जेवायला चला असा आग्रह करु लागली. खरे तर जाम भूक लागली होती, पण वेळ नव्हता आणि गाव छोटे असल्याने गावात असलेली सर्व टपरीवजा दुकाने तसेच पालखीबरोबर आलेली फिरती दुकाने वारक-यांनी भरली होती. त्यामुळे जेवायला उशीर होणार होता. म्हणतात ना देव धावून आला अगदी तसेच झाले. मी नकार दिला आणि पुढे खूप काम असल्याचे सांगितले. अहो माऊली, दोन घास खाऊन घ्या. खायला किती वेळ लागतो , असे आग्रहाने सांगत ती व्यक्ती काही माझा हात सोडायला तयार नव्हती. त्याच्या घरी आलो तर बघतो तर काय त्याच्या छोटेखानी घरात ५०-६० वारकरी जेवत होते. तेव्हा त्यांना म्हटले की अहो, तुम्ही त्रास कशाला घेत आहात . आधीच तुमच्याकडे माणसे खूप आहेत. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली   अहो तुमची धावपळ पालखी येत असतांना बघत होतो. असे उपाशीपोटी राहू नका . लगेचच माझ्यापुढे ताट आणून ठेवले. मी सुद्धा खूप भूक लागली असल्याने पटापट जेवलो, त्यानंतर त्यांचे आभार मानायला गेलो तर आकाशाकडे बघत विट्ठलाची कृपा असे म्हणत हात जोडले. तुम्ही उपाशी राहू नये यासाठी धडपडणा-या अशा व्यक्ती अनपेक्षितपणे तुम्हाला वारीमध्ये भेटत रहातात.
नाशिक जिल्ह्यातल्या कुठल्याशा गावातून आलेल्या एका व्यक्तीचा वारीचा प्रवास बघुन मनातून हेलावून गेलो. त्या वक्तीचे नाव आठवत नाही, ती व्यक्ती म्हणजे साधारण ४५ वर्षाचा धडधाकट पुरुष होता. तो आपल्या ७०-७५ वयाच्या आईला खांद्यावर बसवून नेत होता. खांद्यावर बसवून नेण्याचं कारण म्हणजे आईला वारी ही गाडीतून नव्हे तर पायीच करायची होती. मात्र वय झाल्याने दृष्टी अधू झाली होती, शरीर पुरेसे साथ देत नव्हते. मात्र वारी करायची इच्छा आहे. तेव्हा आईची इच्छा आधुनिक जगातला हा श्रावण बाळ असा पूर्ण करत होता.

वारीमध्ये समोरच्या व्यक्तिचा आदर राखण्यासाठी नमस्कार – चमत्कार किंवा धन्यवाद म्हणण्याऐवजी त्याच्या पाया पडण्याची प्रथा आहे. अगदी तुम्ही देवाचे दर्शन घेऊन आला असाल तर वारकरी तुमच्या हमखास पाया पडतात. कारण तुमच्या पाया पडलो म्हणजे नमस्कार देवाला पोहचला असे वारकरी मानतात. २००९ ला आषाढी एकादशीला पांडुरगाचा पहाटेचा अभ्यंग स्नानाचा कार्यक्रम कव्हर करुन मी मंदिराबाहेर पडलो. अर्थात विठ्ठलाचे दर्शन आम्हाला सहज मिळाले होते. मंदिराबाहेर प्रचंड गर्दी होती. तेथे असलेल्या काही महिलांच्या लक्षात आले की आम्ही म्हणजे चॅनेलवाले विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले आहेत. मी फोनवर बोलत असल्याने काहीसा मागे राहिलो होतो. तेव्हा झटकन एक महिला पुढे आली आणि काही कळायच्या आत माझ्या पाया पडली. हे बघून दोन-चार महिला पुढे आल्या आणि माझ्या पाया पडल्या. हे बघुन गर्दीत असलेल्या माहिला, पुरुष वारकरी यांची माझ्या पाया पडणण्याची एकच धावपळ सुरु झाली. किमान ५०-६० वारकरी माझ्या पाय पडण्यासाठी धडपडत होते. एवढ्या लोकांना बघून मी पूरता गोंधळून गेलो. या लोकांना कसे थांबवावे हेच मला समजेना. त्यांच्या नमस्काराचा कसाबसा स्वीकार करत मी तेथून अशरक्षः पळ काढला. वारकरी भोळे भाबडे कसे असतात याचा पुरेपुर अनुभव मी तिथे घेतला.

अशी ही वारी.. अनुभवसंपन्न करणारी, दुस-यांसाठी जगायला शिकवणारी, भोबड्या वागणुकीचा अनुभव, भक्तीचे एक अनोखे रुप दाखवणारी....वारी...सर्वांनी किमान एकदा तरी जरुर करावी.