पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, October 2, 2016

धुमकेतूवरची स्वारी..........30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणा-या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही. या दिवशी 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतु भोवती, कुठलाही अडथळा न येता दोन वर्ष फिरणा-या युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा Rosetta आणि या उपग्रहाने एकुण 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता करतांना धुमकेतूला धडक देत पुर्णविराम घेतला. या घटनेच्या दोन महिने आधीच या धुमकेतूवर उतरलेल्या  Philae या छोटेखाली रोबोटने आपल्या सर्व यंत्रणा बंद करत निरोप घेतला होता. 

ही मोहिम म्हणजे चंद्रावर मानवाने ठेवलेल्या पहिल्या पाऊल इतकीच महत्त्वाची ठरली कारण एका धुमकेतू भोवती एक कृत्रिम उपग्रह फिरत धुमकेतूचा अभ्यास करत रहाणे, एवढंच नाही तर धुमकेतूवर छोटेखानी रोबोट उतरवणे आणि या दोन्ही गोष्टींमुळे धुमकेतूची आंतबार्ह्य माहिती समजण्यास मदत होणे ही गोष्टी मानवी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशीच झाली आहे.


निमित्त हॅलेच्या धमकेतुचे...

 1986 पर्यंत अमेरिका, तेव्हाची सेव्हिएत रशिया अवकाश
संशोधन आणि विविध प्रकारचे उपग्रह पाठवण्यात तरबेज झाले होते. य़ुरोपियन अवकाश संस्था आणि जपान  नुकतेच डोके वर काढु लागल्या होत्या.

आणि असं असतांना दर 76 वर्षांनी नियमित पृथ्वीजवळ येणारा हॅलेचा धुमकेतू ही सर्वांसाठी पर्वणीच ठरली. धुमकेतुच्या जगांत अगदी सर्वांना शाळेपासून माहिती असलेल्या हॅलेच्या धुमकेतूचे नाव घ्यावे लागेल, 1986 च्या सुमारास सुमारे 7 कोटी किलोमीटर अंतरावरुन दर्शन देत हॅले धुमकेतू त्याच्या मार्गाने निघुन गेला खरा पण यामुळे धुमकेतुच्या अभ्यासाची दालने धडाधड उघडी झाली.

1986 ची हॅले धमुकेतूची घटना ही अवकाश संशोधन करणा-यांसाठी एक सुवर्णसंधी ठरली होती. म्हणुनच की काय अमेरिका, सोव्हिएत रशिया, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी या चारही संस्थांनी 1984 - 85 या कालावधीमध्ये हॅले धुमकेतूचा अभ्यास कऱण्यासाठी विविध उपग्रह सोडले. त्यामुळे जेव्हा हॅले धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जात होता तेव्हा रशियाच्या दोन, जपानच्या दोन , युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक आणि नासा - युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तरित्या तयार केलेला एक उपग्रह अशा एकुण सहा उपग्रहाच्या उड्याच या धुमकेतूच्या दिशेने पडल्या आणि इतर वेळी दुर्बिणीतून दिसणा-या हॅलेबद्दल अतिशय जवळने जाणा-या त्या सहा उपग्रहांनी अभुतपुर्व अशी माहिती जमा केली.

यामध्ये 1986 ला  युरोपियन स्पेस एजन्सिच्या Giotto  या उपग्रहाने हॅले धुमकेतुपासून फक्त 596 किमी अंतरावरुन जात पहिल्यांदाच धुमकेतुची अतिशय जवळून छायाचित्रे घेतली.

त्यानंतर धुमकेतुच्या अभ्यासाचा जो सिलसिला सुरु झाला तो कायमच राहिला आहे.

नासाने 1999  महत्वकांक्षी अशी Stardust  मोहिम आखली. यामध्ये Stardust उपग्रहाने चार वर्षे प्रवास करत 81P/Wild  या धुमकेतुच्या 237 किमी अंतरावरुन प्रवास करत धुमकेतुपासून निघालेली धुळ ही अचुक टिपली आणि 2006 ला ती पृथ्वीवर सुखरुप पाठवली. अर्थात अतिशय सुक्ष्म कणांचा अभ्यास करत शास्त्रज्ञांना बहुमुल्य अशी माहिती मिळाली.

तर 2005 च्या नासाच्या मोहिमे कमालच केली. Deep Impact या उपग्रहाने Tempel 1 या धुमकेतूजवळ जात 230 किलो वजनाचा एक impactor किंवा एक वस्तु धुमकेतुवर आपटवली- आदळवली. दरम्यान या वस्तुवर कॅमेरा लावले होते. तेव्हा जस जशी ही वस्तु धुमकेतू जवळ पोहचली धुमकेतूची उत्कृष्ठ छायाचित्रे मिळाली. वस्तु अतिशय वेगाने आदळल्यावर मोठा खड्डा धुमकेतूमध्ये तयार झाला आणि अर्थात मोठ्या प्रमाणात धुलीकण हे बाहेर फेकले गेले. यानिमित्ताने धुमकेतुचा आंतरबार्ह्य अभ्यास करता आला.


रोसेटा - Rosetta

रोसेटा या उपग्रहाने तर कमालच केली, चांद्र विजयाएवढे भव्य काम करुन ठेवले.

2 मार्च 2004 ला युरोपियन स्पेस एजन्सीने
2900 किलो वजनाच्या रोसेटा नावाच्या उपग्रहाला 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतुचा अभ्यास कऱण्यासाठी धाडले. 67P/Churyumov–Gerasimenk  हा धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघामध्येच सुर्याभोवती प्रदक्षणा घालत असतो. या धुमकेतुच्या गाभ्याचा आकार काहीसा वेडावाकडा आहे, सुमारे 4 किमी त्याची जास्तीत जास्त जाडी असून 1.8 किमी ही रुंदी आहे.

67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतू 38 किमी प्रति सेकंद या वेगाने सुर्या भोवती लंबवुर्तळाकार प्रदक्षणा घालत असतो. तेव्हा या वेगापर्यंत जाण्यासाठी आणि धुमकेतू जवळ अचुक पोहचण्यासाठी रोसेटाने विविध ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा आधार घेत वेग वाढवला. यासाठी रोसेटाने सर्वात आधी मार्च 2005 ला पृथ्वी, फेब्रुवारी 2007 ला मंगळ ग्रह, नोव्हेंबर 2007 ला पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत वेग वाढवला, दरम्यान वाटेत येणा-या दोन लघुग्रहांची छायाचित्रे घेतली, एवढंच नव्हे तर  Deep Impact मोहिमेतील  Tempel 1  धुमकेतुवर आदळवलेल्या वस्तुच्या टक्करीची घटनाही छायाचित्रबद्ध केली.

असा 10 वर्ष अथक प्रवास करत अखेर रोसेटा उपग्रहाने 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतूला ऑगस्ट 2014 ला गाठले. तोपर्यंत रोसेटा आणि धुमकेतू हे पृथ्वीपासून 50 कोटी किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर होते. या मोहिमेची सुत्रे जर्मनीतून हलवली जात होती. विविध प्रकारे संदेश पाठवत रोसेटाचे अंतर कमी करत धुमकेतुच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत रोसेटाने प्रवेश केला आणि 100 बाय 50 किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत धुमकेतु भोवती घिरट्या मारायला सुरुवात केली आणि धुमकेतुची छायाचित्र - माहिती पाठवायला सुरुवात केली. असा पराक्रम करणारे रोसेटा पहिला उपग्रह आणि युरोपियन स्पेस एजन्सी पहिली संस्था ठरली.

त्यानंनतर टप्प्याटप्प्याने उंची कमी करत रोसेटा आणखी धुमकेतुच्या जवळ गेले आणि अखेर 12 नोव्हेंबर 2014 ला या रोसेटावरील 100 किलो वजनाच्या Philae नावाचा रोबोट हा धुमकेतूवर अलगद अवरला ज्याला इंग्रजीत soft landing असे म्हणतात. रोबोट धुमकेतुवर उतरला खरा पण दोन गोलांट्या उड्या मारल्या आणि हा रोबोट सावली असलेल्या भागात पोहचला. बॅटरी असेपर्यंत या रोबोटने मानवी इतिहासात पहिल्यांदाच धुमकेतुच्या पृष्ठभागावरुन धुमकेतुची छायाचित्रे पाठवली. अखेर बॅटरी कमी झाल्यावर या रोबोटने संदेश देणे बंद केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनतर रोबोटकडुनचे संदेश पुन्हा प्रस्थापित कऱण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

तेव्हा अशा रितीने रोसेटा आणि त्या रोबोटचा धुमकेतुबद्दलचा अभ्यास जुलै 2016 पर्यंत सुरु होता. त्यानंतर रोबोटची बॅटरीची क्षमता कमी होत गेली आणि रोबोटची सिग्नल यंत्रणा शास्त्रज्ञांनी जड अंत;करणाने बंद केली. तोपर्यंत धुमकेतुबद्दल आवश्यक माहिती ही रोसेटा आणि रोबोटवरील संवेदकांच्या सहाय्याने आणि कॅमेराच्या सहाय्याने मिळाली होती.

रोबोट नंतर रोसेटा उपग्रहाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि 30 सप्टेंबरपर्यंत रोसेटा उपग्रहाची उंची टप्प्याटप्प्याने कमी करत ते 67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतूवर आदळवण्यात आले आणि 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता झाली. यामागे शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न, श्रम कारणीभूत होते जे 100 टक्के यशस्वी झाले.


हे सर्व कशासाठी ?...

पुरातन काळापासून ते अगदी आजही आकाशात अचानक अवतरत किमान काही दिवस दर्शन देणा-या धुमकेतूबद्दल भारतातच काय परदेशातही अंधश्रध्दा अजुनही मनांत कायमच्या ठाण मांडून आहेत. या अंधश्रद्धा अजुनही पुसल्या जात नाहीत हे विशेष.

मात्र धुमकेतूचा अभ्यास करणे म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे तसंच विश्वात असलेल्या विविध मुलद्रव्यांचे अस्तित्व समजुन घेण्यासारखे आहे असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या जीवसृष्टीला धुमकेतू कारणीभूत आहे का, धुमकेतूमध्ये कोणते मुलद्रव्य आहेत, पाणी मग ते बर्फाच्या स्वरुपात आहे का अशा अनेक प्रश्नांचा शोध गेली अनेक वर्ष सुरु आहे. म्हणनुच गेल्या काही वर्षांपासून चंद्र, मंगळ , सुर्य किंवा इतर ग्रहांचा, लघुग्रहांचा अभ्यास करतांना धुमकेतुचाही अभ्यास करण्यावरही भर दिला जात आहे. कारण हे धुमकेतू कित्येक वर्ष अस्तित्वात आहेत, अनेक धुमकेतू हे सुर्यमालेबाहेरुन येतात आणि भेट देऊन कायमचे निघुन जातात. तर काही धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघातच फिरत आहेत. तेव्हा मानवी उत्क्रांतीच्याच नव्हे तर विश्व निर्मितीच्या खाणाखूणा या धुमकेतूवर, धुमकेतूच्या निमित्ताने सापडतात का याचा शोध मानव घेत आहे.

आता तर जपान आणि अमेरिका - नासाने लघुग्रहावरील माती पृथ्वीवर परत आणणा-या मोहिमा आखल्या आहेत, तसे उपग्रह रवानाही केले आहेत. आता 2030 -35 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत कऱण्याच्या हालचाली नासाच्या सुरु झाल्या आहेत. तर मंगळावर पोहचण्यासाठी नासाने जोरदार मोर्चाबांधणी सुरु केलीये. थोडक्यात आता पृथ्वीबाहेर पाऊल ठेवण्यासाठी नव्हे तर वसाहत कऱण्यासाठी माणसाने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

आजही लाखो वर्षे पृथ्वीवर संचार असुनही पृथ्वीवरील अनेक गोष्टींची माहिती अजुन मानवाला झालेली नाही त्याचा अविरत शोध - प्रयत्न अजुनही सुरुच आहेत. तेव्हा अवकाशाच्या अनंत अशा पोकळीत, या पोकळीतील ग्रहांवर पाऊल टाकतांना मानवाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा धुमकेतुचा अभ्यास, धुमकेतुवर रोबोट उतरवणे ही यामध्ये महत्त्वाची हनुमान उडी ठरणार आहे. म्हणनुच रोसेटा - Rosetta मोहिमेचे महत्व अनन्य साधारण आहे.