कळसुबाईच्या शिखरावर
24 तास, 12 महिने, 365 दिवस, सर्व ऋतूत थंड हवेचा, वा-याचा आस्वाद घ्यायचा असेल, निळंभोर-स्वच्छ आकाश पहायचं असेल, मे महिन्याच्या कडक उन्हातही भर दूपारी थंडी आजमावयाची असेल, एकाच ठिकाणी उभं राहून अनेक किल्ल्यांचं नुसतं दर्शन घ्यायचं असेल तर एकच उत्तर, महाराष्ट्रातील सर्वाच्च माथा " कळसुबाईचं शिखरं " . शिखरावर उभं राहून ही मजा अनुभवता येते. उंची 5400 फुट म्हणजेच 1646 मीटर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. एक दिवसांत चांगली तीन तासाची तंगडतोड करुन करता येण्याजोगा हा ट्रेक आहे.
ट्रेकची सुरुवात
दोन दिवस शुक्रवार-शनिवार सुट्टी होती. शुक्रवार सुट्टी घरगूती कामांमुळे, नातेवाईकांकडे जाण्याच्या निमित्तानं " वाया " गेली. त्यामुळं शनिवारी काही करुन कुठेतरी जायचेच असं ठरवलं. अखेर कळसुबाई असं मनात नक्की केलं. तीन वर्षांपूर्वी गेलो होतो तेही भर पावसात ऑगस्ट महिन्यात. पावसामुळं कॅमेरा फक्त तीन फोटो काढण्यापूरता काढला होता, एवढा पाऊस होता. शिखरावर तर मंदिरपण धड दिसत नव्हतं एवढे ढग होते.
असो.........फोना फोनी केली......अखेर ऑफिसचा मित्र कल्याण तयार झाला. दोघे तर दोघे, पण जायचंच. शुक्रवारी रात्री 12 वाजता कल्याणला कुशीनगर एक्सप्रेस पक़डली. दोन जनरल डबे आतूनच बंद केले होते. अखेर एका डब्यात आपली ताकद लावत कसातरी घुसलो आणि दरवाज्यात उभं रहात इगतपूरीकडे प्रवास सुरु झाला. उत्तर भारतात जाणारी कुठलाही लांब पल्ल्याची गाडी ही कसारा-इगतपूरीला थांबते. कारण घाट चढ उतार करण्यासाठी जादा इंजिन जोडावे लागते. त्यामुळं उत्तर भारतात जाणारी कुठलाही गाडी पकडावी आणि इगतपूरीला पोहचावे. किंवा पूणे-नाशिकहूनसुद्धा एसटीच्या इगतपूरीपर्यंत सेवा उपलब्ध आहे. असा प्रवास करत भल्या पहाटे अडीच वाजता इगतपूरीला पोहचलो आणि 15 मिनिटांवर असलेलं एस.टी स्टॅड गाठला आणि झोपी गेलो.
कळसूबाई शिखराचा पायथा " बारी" गाव
कळसूबाई शिखरावर चढाई
पायथ्यापासून शिखर माथ्यावर पोहचायला साधाऱण तीन तास पुरतात. सुरुवातीलाच दोन पाण्याच्या बॉटल दोघांनीही भरुन घेतल्या होत्या. कारण वाटेत पाणी कुठेही मिळणार नव्हतं. थेट शेवटच्या टप्प्यात विहिर आहे तिथेच पाणी मिळणार होत. वाट अवघड अशी नव्हती. चांगली मळलेली पायवाट पकडून चालत राहिलो आणि ख-या अर्थाने डोंगराला भिडलो, दगडांमधून वाड काढत हाश-हूश करत चढाई सुरु राहीली. मध्येच मागे वळुन बघितलं तर धुक्याबरोबर लपाछपी करत असलेलं बारी गाव दिसलं. त्याचे फोटो काढत पहिल्या शिडीपाशी येऊन पोहचलो.
ही शिडी किंवा शिखरावर असलेल्या एकूण चार शिड्या साधारण 20 वर्षापूर्वी लावल्या आहेत. त्याच्याही आधी अनेक लोक ट्रेकच्या निमित्तानं किंवा कळसूबाई देवीच्या दर्शनाच्या निमित्तानं शिखरावर जायचे. तो प्रवास किती कठीण होता , किती कसरत करावी लागत असेल असा विचार करत आम्ही पहिली शिडी पार केली. आता या मार्गावर अवघड ठिकाणी किंवा वळणावर चक्क रेलिंग, तर काही ठिकाणी पाय़-या तयार करण्यात आल्याचं लक्षात आले. यामुळं चढाई अधिक सोपी आणि जलद होण्यास मदत झाली आहे.
गावांतील काही लोकांकडून असं ऐकलं की दोन वर्षापूर्वी शिखरापर्यंत जाण्यासाठी कच्चा छोटा रस्ता तयार करण्याचा प्रयत्न सुरु झाला होता. त्यासाठी काही निधीही जिल्हा प्रशासनानं मंजूर करण्यात आला होता. मात्र शिखरापर्यंत कच्चा छोटा रस्ता तयार करणं अवघड असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याची गरज आहे असं लक्षात येताच काम सोडून देण्यात आलं. मात्र मंजूर निधीचा वापर कड्याच्या ठिकाणी रेलिंग लावणे आणि पाय-या तयार करण्यासाठी करण्यात आला. अशी चांगली फॅसिलिटी असल्यानं आमचाही चालण्याचा वेग वाढला.
अखेर तीन शिड्या आणि अनेक अवघड वळणं पार केल्यावर आम्हाला शिखराचं दर्शन झालं. गंमत म्हणजे जेव्हा बारी गाव सोडल्यावर तुम्हाला शिखराचं दर्शन होत नाही. त्यामुळं अजुन किती चालायचं असा प्रश्न पडत रहातो. अगदी शेवटच्या टप्प्यात तुम्हाला माथा दिसतो. माथा दिसल्यानं आमचाही चालण्याचा वेग वाढला आणि आम्ही अचानक थबकलो. कारण चक्क खमंग भज्यांचा वास येत होता. विहिरीच्या समोर एक छप्पर असलेल्या आडोशामध्ये एक म्हातारा भजी तळत होता. सकाळपासून काहीही खाल्ल नसल्यानं तिथेच बसकण मारली आणि चांगल्या दोन प्लेट गरमागरम भजी हाणल्या. फ्रीजमधील पाण्याचा थंडावा कमी वाटेल एवढं थंड असलेल्या विहिरीतील पाणी प्यायलो. फ्रेश झालो म्हणजे बॅटिंगला जाऊन आलो. आणि भराभर शिखराच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली.
सह्य़ाद्रीच्या सर्वोच्च माथ्यावर
दोघांनी डोळे भरुन आजुबाजुचा परिसर बघुन घेतला. फोटो काढले, कळसुबाईचं दर्शन घेतलं आणि निवांतपणे एवढा वेळ कोकलणा-या पोटातील कावळ्यांना शांत करायला बसलो. एवढी भूक लागूनसुद्धा थोडसंच खाल्लं आणि माथ्यावर चारीबाजूंनी फेरफटका मारायला सुरुवात केली. प्रवेशाची बाजू सोडता आता सर्व बाजूंनी रेलिंग टाकण्यात आलेत. एवढ्या उंचावर हे काम करणा-या मनातून सलाम ठोकला. शांतपणे मंदिराच्या त्या छोट्या सावलीत जरा डुलकी काढायला आम्ही पडलो. वारा वाहत होता, त्यामध्ये थंडावा असल्यानं लगेच थंडी वाजायला लागली. लगेचच आम्ही आमचा डेरा उन्हात टाकला आणि अर्धा तास छानपैकी पडून राहिलो. आकाश एवढं निळंभोर दिसत होतं की त्याचं वर्णन करायला शब्दच अपुरे पडतील. स्वच्छ वातावरण असल्यानं निळ्या रंगाची एवढी गडद छटा दिसत होती.
एव्हाना दीड वाजला होता, चला आता निघुया म्हणत तेव्हा उठलो आणि तिथं दोन चक्क म्हाता-यांना बघुन घेरीच यायची वेळ आली. संगमनेरजवळच्या
जवळच्या कुठल्याशा गावातून त्या आपल्या दोन नातवंडांसह आल्या होत्या. का तर देवीच्या दर्शनाला तेही पायात चप्पल न घालता. किती वेळ लागला तर म्हणाल्या अकराच्या एस.टी.नं आलो म्हणजे 11-12-1 आणि दीड फक्त अडीच तासांत त्या वर पोहचल्या. बरोबर फक्त पाण्याची बाटली. मनातल्या मनात त्यांना साष्टांग नमस्कार घातला. पाठोपाठ काही तमीळ भाषा बोलणारी लोक सहकुटुंब सहपरिवार वरती आली. त्यांना विचारले तर त्यांनी तेलंगणातील असल्याचं सांगितलं.( ह्याला म्हणतात अभिमान त्यांना त्यांच्या राज्यापेक्षा त्याच्या प्रदेशाचं नाव महत्त्वाचं वाटतं. ). देवीच्या दर्शनासाठी आल्याचं त्यांनी सांगितंल. मी त्यांना हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्याचं सांगितलं तर ठिक ठिक आहे असं उत्तर दिलं. म्हणजे देवासाठी कुठेही जाण्याची तयारी पाहिजे. असं शिखरावरील वेगवेगळ्या लोकांचे अनुभव मनात ठेवत, परिसराची दृश्ये डोळ्यात साठवत उतरायला सुरुवात केली आणि दोन तासांत पायथा गाठला.
पावसाळ्यात आलो, थंडीत आलो, आता भर उन्हाळ्यात येईल आणि शिखरावरुन दिसणारा सूर्योदय-सूर्यास्त बघीन असं मनात ठरवत इगतपूरीला जाणार ट्रक पकडला.