Tuesday, December 29, 2020

कार्यकाल संपलेल्या / निकामी झालेल्या कृत्रिम उपग्रहांचे पुढे नेमकं काय होतं ?




#कुतूहल #curiosity #satellite

1957 पासून पृथ्वीच्या कक्षेबाहेर विविध कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा सपाटा माणसाने लावला आहे. बहुतांश कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती पाठवण्यात आले तर काही पृथ्वीपासून लांब इतर ग्रह - सूर्याच्या दिशेने पाठवण्यात आले. 1971 पासून तर विविध स्पेस स्टेशन - अवकाश स्थानके सुद्धा पाठवायला सुरुवात झाली आहे. या स्पेस स्टेशन्सकडे सामानांची ने आण करण्यासाठी आता कार्गो व्हेहीकलची सुद्धा भर पडली आहे. पृथ्वीभोवती पाठवण्यात आलेल्या कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा विविध महिन्यांचा - वर्षांचा होता /असतो. त्यानंतर कार्यकाल संपलेल्या - बिघाड झालेल्या उपग्रहांची जागा नवे उपग्रह घेतात. तेव्हा या राहिलेल्या उपग्रहांचे, अवकाश स्थानकांचे, कार्गो व्हेहीकलचे पुढे नेमके काय होते ?

उपग्रहांच्या साधारण 3 प्रकारच्या कक्षा असतात. 

1..Low Earth Orbit -  पृथ्वीपासून साधारण 500 किलोमीटर उंचीपासून ते 2000 किमी उंचीपर्यंत. या कक्षेत पृथ्वीवरील विविध भूभागाची छायाचित्रे काढणारे उपग्रह असतात. लष्कर उपयोगी उपग्रहसुद्धा याच उंचीवर असतात. 

2.. Medium Earth Orbit - 2000 किमी ते 35 हजार किमी 700 किमी. या कक्षेमध्ये 22 हजार किमी उंचीवर अमेरिकेची GPS सेवा देणारे उपग्रह आहेत.

3..High Earth Orbit - या कक्षेतील उपग्रह हे पृथ्वीपासून 35,700 किमी उंचीवर असतात. या कक्षेत कमी अधिक उंचीवर भुस्थिर उपग्रह असतात. आपल्या सर्व टीव्ही यंत्रणा चालवणारे, संदेशवहन करणारे, हवामानाची 24 तास स्थिती सांगणारे, भारताची दिशा दर्शक प्रणाली ( 'नाविक' )असलेले कृत्रिम उपग्रह या उंचीवर असतात.

काही उपग्रह हे आणखी वेगळ्या कक्षेत असतात. पृथ्वीपासून खूप दूर पण पृथ्वीच्या कक्षेत सुर्याला प्रदक्षणा घालणारे असतात. तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे 410 ते 420 किमी उंचीवरून फिरत असते. 

आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त देशांचे विविध 8,500 पेक्षा जास्त उपग्रह पृथ्वीभोवती पाठवण्यात आले आहेत. यापैकी आत्ता सुमारे 2000 उपग्रह हे कार्यरत आहेत. यापैकी Low Earth Orbit मध्ये 63 टक्के, Medium Earth Orbit मध्ये 6 टक्के आणि High Earth Orbit मध्ये 30 टक्के उपग्रह आहेत असा अंदाज आहे.
 
आता एवढ्या विविध उंचीवर असलेल्या उपग्रहांचे पुढे काय होते ? कार्यकाल संपलेल्या, निकामी झालेल्या उपग्रहांचे होतं काय ?

तर असे उपग्रह हे त्याच कक्षेत राहिले तर ते इतर उपग्रहांना अडचणीचे ठरू शकतात. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे उपग्रहांची उंची ही काही किलोमीटरनी कमी होत असते. जोपर्यंत उपग्रह कार्यरत आहे तोपर्यंत ठराविक काळानंतर उपग्रह हे पूर्वस्थितीत नेले जातात. मात्र एकदा कार्यकाल संपल्यावर  उपग्रहाला सुरक्षित कक्षेत वर खाली नेले नाही तर ते इतर उपग्रहांना अडणीचे ठरू शकतात. विशेषतः Low Earth Orbit मध्ये जिथे उपग्रहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तिथे हा धोका आहे. खास करून दोन उपग्रहांची किंवा अन्य अवकाशीय कचऱ्याची - Space Debris शी टक्कर उपग्रहाशी झाली तर निर्माण झालेले - वेगवेगळ्या दिशेने गेलेले तुकडे हे इतर उपग्रहांना आणखी धोकादायक ठरू शकतात.

उपग्रह कोणताही असू दे जर कोणताही अडथळा आला नाही तर तो उपग्रह एखाद्या कक्षेत अनेक वर्षे, अगदी हजारो वर्षे पृथ्वीभोवती फिरू शकतो. जोपर्यंत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याची पृथ्वीपासूनची उंची कमी होत पृथ्वीच्या वातावरणात येत नाही तोपर्यंत उपग्रह पृथ्वीभोवती फिरत रहाणार.

वस्तुस्थिती ही आहे की निकामी झालेल्या - कार्यकाल संपलेल्या कृत्रिम उपग्रहांची विल्हेवाट लावण्याचा कुठलाही नियम - कायदा - सक्ती जगामध्ये नाहीये ही एक मोठी दुर्देवाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते देश किंवा संबंधित कंपनी हे उपग्रहाचा कालावधी संपल्यावर ठराविक पद्धतीने उंची कमी करत उपग्रहाला पृथ्वीच्या वातावरणाच्या दिशेने आणतात आणि त्यानंतर संबंधित उपग्रह वातावरणात जळून नष्ट होतो. किंवा एक सुरक्षित पण कमी उंचीवर आणल्यावर काही ठराविक काळानंतर गुरुत्वाकर्षणामुळे उंची कमी होत उपग्रहवातावरणात जळून नष्ट होतो. 

अर्थात अशी सक्ती  किंवा नियम नसला तरी अमेरिकासारख्या देशांनी किंवा या देशातील कंपन्यांनी उपग्रहांची विल्हेवाट लावण्याचा मान्य केलं आहे. 

इतर देश त्यांच्या उपग्रहांचे काय करतात ? तर माहीत नाही. स्वयंस्फूर्तीने असं कोणी करत असेलही पण अशी नेमक्या किती उपग्रहांची विल्हेवाट लावली आहे याची कोणतीही माहिती - आकडेवारी उपलब्ध नाही. 

आता आपली इस्रो काय करते ? तर माहीत नाही. इस्रोने असं काही जाहीर केल्याचं तरी ऐकिवात नाही.

अर्थात Low Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांबाबत वर उल्लेख केलेली प्रक्रिया करणे हे लगेच शक्य आहे, काहीसं सोपं आहे. पण मग Medium / High Earth Orbit - भुस्थिर कक्षेत असलेल्या उपग्रहांबद्दल काय ? एक तर त्याच उंचीवर उपग्रहाला त्याच्या नशिबावर सोडून देतात किंवा मग त्या उपग्रहांना आणखी वरच्या कक्षेत नेतात आणि त्या कक्षेत सोडून देतात. या कक्षेला graveyard orbit  म्हणतात. तर काही वेळेला त्या उंचीवर काही काळ ठेवल्यावर उपग्रहाची उंची कमी करत पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट करतात, अर्थात याला बऱ्याच महिन्यांचा / वर्षांचा कालावधी लागतो.

Medium /High Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांची संख्या ही Low Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांपेक्षा खूपच - कितीतरी कमी आहे. त्यामुळे Medium / High Earth Orbit मध्ये उपग्रहांची गर्दी नसते. या कक्षेत खूपच मोकळी जागा - space असते. 

तेव्हा Low Earth Orbit मध्ये वापर नसलेल्या उपग्रहांची जेवढी समस्या आहे तेवढी वरच्या उंचीमध्ये 

अजिबात नाही किमान सध्या तरी नाही. 
आता हे झालं उपग्रहांबाबत, ज्यांचे सरासरी 3 टन वजन असते आणि बांधणीत भरभक्कम नसतात.

तर अवकाश स्थानके, अवकाश स्थानकांपर्यन्त वाहतूक करणारे -  सामानांची ने आन करणारे कार्गो व्हेहीकल हे 3 टन वजनापेक्षा जास्त वजनाचे असतात, बांधणीच्या बाबतीत अतिशय भरभक्कम असतात. या सर्व गोष्टींचा वावर हा 400  किमी उंचीपर्यंत असतो. ह्या सर्व गोष्टी कार्यकाल संपल्यावर - निकामी झाल्यावर पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी समुद्राच्या परिसरात नेऊन कोसळतात. कोसळतांना काही भाग पृथ्वीच्या वातावरणात नष्ट होतो, तर उर्वरित भाग समुद्रात पडतो. या भागाला Satellite Graveyard म्हणतात. हा भाग न्युझीलंडच्या पुर्वेला Point Nemo च्या परिसरात आहे. हाच का परिसर ? तर समुद्राच्या या भागात जलवाहतूक नाही, प्रवासी विमानांची वाहतूक नाही. मानवरहित असा हा समुद्राचा परिसर आहे. आत्तापर्यंत या भागात सोव्हिएत रशियाची 6 Salyut अवकाश स्थानके ( सर्व 18 टनापेक्षा जास्त वजनाची), मीर अवकाश स्थानक ( वजन 129 टन वजन ) कोसळवण्यात आली आहेत. एवढंच नाही तर सध्या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीरांसाठी आवश्यक सामान घेऊन जाणारे जपान, युरोपियन स्पेस एजन्सीची कार्गो व्हेहीकलसुद्धा याच भागात कोसळवण्यात येतात. 

थोडक्यात वर उल्लेख केल्या प्रकारे कृत्रिम उपग्रह, अवकाश स्थानके, कार्गो व्हेहीकल यांची विल्हेवाट लावली जाते. असं असलं तरी हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. आत्तापर्यंत किती उपग्रहांची विल्हेवाट लावली गेली आहे - जाणार आहे याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. 

एवढंच नाही तर उपग्रह प्रक्षेपणा दरम्यान रॉकेट - प्रक्षेपक याचे अवशेष पृथ्वी भोवती फिरत रहातात ते वेगळे. असे निकामी उपग्रह आणि रॉकेटचे अवशेष यांना अवकाशीय कचरा - space debris म्हणहन ओळखलं जातं. हा एक वेगळा असा स्वतंत्र विषय आहे. ( यावर याआधी ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक.....https://bit.ly/3rFxVzW )

थोडक्यात कृत्रिम उपग्रहांचा वापर झाल्यावर त्यांचे भविष्यात काय करायचे याची कोणतीही ठोस योजना नाही. तेव्हा कृत्रिम उपग्रहांमुळे अवकाशात कचऱ्याचा प्रश्न भविष्यात निर्माण झाला, भविष्यातील अवकाश मोहिमा धोक्यात आल्या, इतर कार्यरत उपग्रहांना धोका निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको……

Thursday, December 24, 2020

तारे केवढे मोठे असतात ?

#कुतूहल #curiosity #star #sun 



तारे केवढे मोठे असतात ?

अनंत अशा विश्वात भव्यता या शब्दाला तोड नाही. एका पेक्षा एक भव्य गोष्टी विश्वात पहायला मिळतात. आपल्या सुर्याचेच उदाहरण घ्या ना. सुर्याच्या आकारासमोर आपली पृथ्वी ठिपक्याएवढी वाटेल एवढा सुर्य मोठा आहे. पण हा सुर्य एका ठिपक्याएवढा वाटेल असे मोठ्ठाले सुर्यासारखे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. तर काही तारे हे आपल्या आकाशगंगेच्या बाहेर पण जवळ असलेल्या तारकासमुहात आढळले आहेत, तर काही तारे सर्वात जवळची दिर्घिका असलेल्या एंड्रोमेडा दिर्घिकेत - Andromeda galaxy आढळले आहेत. 

आपली दिर्घिका जी आकाशगंगा या नावाने ओळखली जाते, या आकाशंगंगेचा व्यास हा सुमारे एक लाख ७० हजार ते २ लाख प्रकाशवर्ष एवढा आहे. खगोल अभ्यासकांचा - शास्त्रज्ञांना असा अंदाज आहे की आपल्या आकाशगंगेत १०० ते ४०० अब्ज तारे असावेत. थोडक्यात आपली आकाशगंगा असंख्य अशा ताऱ्यांनी खचाखच भरली आहे. यापैकी एका अंदाजानुसार जेमतेम ५ लाख तारे हे आपल्याला माहिती झाले आहेत.

ताऱ्यांचे काही प्रकार आहेत. विद्युत चुंबकीय वर्णपटनुसार ताऱ्यांचे ढोबळपणे सात प्रकारात O, B, A,F, G, K, M अशी विभागणी करण्यात आली आहे. ( आपला सूर्य हा G या प्रकारात मोडतो ) ताऱ्याच्या पृष्ठभागावरील तापमानानुसार हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. अर्थात जेवढा ताऱ्याचे तापमान जास्त तेवढा तारा मोठा किंवा लहान अशीही परिस्थिती नाहीये. ताऱ्याचे वस्तुमानही ही ताऱ्याची एक स्वतंत्र ओळख आहे. ताऱ्याच्या वस्तुमानानुसार ताऱ्याचे आणखी काही वेगळे प्रकार करता येतात. कारण वस्तुमान जास्त असलेल्या ताऱ्याचे प्रभावक्षेत्र हे मोठे असते. ताऱ्यांची प्रखरता हाही एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. Red Giants, Super Giants अशाही व्याख्या या ताऱ्यांच्या अभ्यासादरम्यान वाचायला मिळतील.

थोडक्यात ताऱ्यांचे वर्गीकरण हा एक स्वतंत्र आणि किचकट विषय आहे. तेव्हा एवढ्या खोलात न जाता आपण आकारमानानुसार काही माहित असलेल्या ताऱ्यांची तुलना आपल्या सुर्याशी - आपल्या ताऱ्याशी करुया.....

आपल्या सूर्याचा व्यास हा सुमारे 13 लाख 92 हजार 700 किलोमीटर एवढा आहे. 

सुर्य वगळता आकाशातील सध्याचा सर्वात तेजस्वी तारा म्हणजे व्याध - Sirius तारा. ( द्वैती तारे - binary stars ) हा तारा आपल्यापासून सुमारे ८.६ प्रकाशवर्षे दूर असून आपल्या सुर्यापेक्षा दुप्पट आकाराचा असून २५ पट तेजस्वी आहे.

आपल्या सुर्याला - सुर्यमालेला सर्वात जवळचा तरा म्हणजे प्राक्झिमा सेंचूरी. हा सुमारे ४.२२ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सुर्यापेक्षा सुमारे ७ पट आकाराने लहान आहे. 

आपल्या सर्वांना दिशा दाखवणारा प्रसिद्ध ध्रुव तारा - Polaris Star हा आपल्यापासून सुमारे ४३३ प्रकाशवर्षे अंतरावर असून हा सुर्यापेक्षा ५० पट मोठा आहे आणि तब्बल ४००० पट तेजस्वी आहे.

खगोलप्रेमींमध्ये - अभ्यासकांमध्ये सर्वात जास्त अभ्यास- निरिक्षण झालेल्या ताऱ्यांपैकी एक म्हणजे अभिजीत तारा - Vega Star. उत्तर गोलार्धातून सहजरित्या दिसणारा हा तारा आपल्यापासून २५ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सुर्यापेक्षा तिप्पट मोठा आणि ६० पट तेजस्वी आहे.

रोहिणी तारा - Aldebaran star. आकाशातील आणखी एक तेजस्वी तारा. आपल्यापासून ६५ प्रकाशवर्षे अंतरावर असून ४४ पट मोठा असून सुर्यापेक्षा कितीतरी तेजस्वी आहे.

ज्येष्ठा तारा.( द्वैती तारे - binary stars ) - Antares star. हा तारा आपल्या सुर्या पेक्षा 850 पट मोठा असून कित्येक हजार पट तेजस्वी आहे. 

सर्वात मोठा ताऱ्याेपैकी एक अशी ओळख असलेला UY Scuti हा सुर्यमालेपासून ९५०० प्रकाशवर्षे दुर आहे. हा तारा सुर्यापेक्षा तब्बल १७०० पट मोठा आहे.

तर Stephenson 2-18 हा तारा आकाशगंगेच्या मध्याच्या दिशेला आपल्यापासून २० हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा तारा १९९० च्या सुमारास माहित जरी झाला असला तरी त्याच्या भव्यतेबाबत नुकतेच कुठे शिक्कामोर्तब झाले आहे. Stephenson 2-18 या ताऱ्याचा आकार आपल्या सुर्यापेक्षा तब्बल २१५० पट मोठा आहे. म्हणजेच सध्या माहित असलेल्या ताऱ्यांपैकी सर्वात मोठा तारा म्हणून  Stephenson 2-18 ची ओळख झाली आहे. समजा हा तारा आपल्या सुर्यमालेत आपल्या सुर्याच्या जागी ठेवला तर तो गुरु आणि शनी ग्रहादरम्यान असलेल्या भागापर्यंतची जागा आरामात व्यापेल. एवढंच नाही तर सुर्यावर जशा सौरज्वाला असतात या  Stephenson 2-18 मुळे या ज्वालांचा पसारा हा प्लुटो ग्रहाच्या पलिकडे पोहचेल. यावरुन Stephenson 2-18 या ताऱ्याची भव्यता लक्षात येईल. 

आत्तापर्यंतच्या निरिक्षणांमुळे माहित झालेल्या काही मोजक्या ताऱ्यांच्या आकारांची ही तुलना आहे. आपल्या आकाशगंगेत आणखी कोट्यावधी तारे आहेत जे अजुन माहित व्हायचे आहेत, त्यांचा अभ्यास तर खुप दूरची गोष्ट. तेव्हा कदाचित आत्तापर्यंत माहित असलेल्या ताऱ्यांपेक्षा आणखी मोठे तारे, वेगवेगळ्या प्रकारचे तारे असू शकतात.  

ताऱ्यांचा एवढा अभ्यास का केला जातो तर यामुळे ताऱ्यांची जडणघडण कळण्यास मदत होते, विविध ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांची माहितीही मिळते. एकंदरितच ताऱ्यांचा जन्म-मृत्यु वगेैरे याचा अभ्यास होत सृष्टीच्या निर्मितीचे ठोकताळे बांधता येतात. 

ताऱ्यांबद्दल माहिती देणारी असंख्य पुस्तके, इंटरनेटवर ढिगभर माहिती उपल्बध आहे. यापैकी काही फोटो आणि व्हिडियो शेयर करत आहे. यामुळे आपला सुर्य या विश्वात नेमका कसा आहे याचा अंदाज लावण्यात मदत होईल.    

https://www.youtube.com/watch?v=NjdtTZTJaeo

https://www.youtube.com/watch?v=i93Z7zljQ7I 

Saturday, December 12, 2020

चंद्रावर मुक्काम करणारी लोकं......


#NASA #artemis #कुतूहल #curiosity

चंद्रावर मुक्काम करणारी लोकं......

जगात विविध घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना विविध आयाम आहेत. यापैकी एका घडामोडीच्या बोलायचं झालं तर या घडामोडीमागे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पावले टाकली जात आहेत ते म्हणजे चंद्रावर मुक्काम करण्याची मोहिम.

अमेरिकेची अवकाश क्षेत्रातील सरकारी संस्था ' नासा '  2024 पासून चंद्रावर मुक्काम करण्याच्या दिशेने, चंद्रावर नियमित मानवी मोहिमा सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाल करत आहे. यासाठी आर्टेमिस - Artemis नावाच्या कार्यक्रमाची घोषणा याआधीच केली आहे. आर्टेमिस म्हणजे ग्रीक पौराणिक कथेतील चंद्राशी संबंधित देवता.

विविध टप्प्यांवर विविध उपकरणे, अवकाश याने चंद्राजवळ नेली जाणार आहेत, काही चंद्रावर उतरवली जाणार आहेत, याची तयारी जोरात सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून नासाने 18 भावी चांद्रवीरांची घोषणा नुकतीच केली आहे. 2017 पासून विविध चाचण्यांतून,अगदी घासुन पुसुन, तावून सुलाखून निघालेले 18 अंतराळवीर निवडले आहेत. यामध्ये 9 महिला, 9 पुरुष ( यापैकी एक भारतीय वंशाचा आहे ) आहेत.

हे अंतराळवीर चंद्रावर नुसते जाणार नसून 4 ते 6 दिवस मुक्काम करणार आहेत. चंद्रावर भविष्यात कायम स्वरुपी वसाहत करण्याच्या दृष्टीने नासाचे हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. यामध्ये चंद्रावर पहिलं उतरण्याचा मान हा एका महिला अंतराळवीरला दिला जाणार असल्याचं नासाने याआधीच जाहीर करुन टाकलं आहे. 

तेव्हा चंद्रावर पाऊल टाकणाऱ्या, चंद्रावर मुक्काम करणाऱ्या, चांद्र मोहिममेमुळे भविष्यातील मंगळस्वारीचे स्वप्न दाखवणाऱ्या भावी चांद्रवीरांची माहिती पुढील लिंकवर......      

https://www.nasa.gov/press-release/nasa-names-artemis-team-of-astronauts-eligible-for-early-moon-missions

https://www.youtube.com/watch?v=BC5khqpKovU&feature=emb_logo

Saturday, November 7, 2020

जगातले सर्वात मोठे विमान An - 225 Mriya

#कुतूहल #curiosity 

जगातले सर्वात मोठे विमान An - 225 Mriya


An -225 Mriya मध्ये Mriya चा अर्थ आहे स्वप्न - dream

अबब, अजस्त्र....सध्याच्या भाषेत आरारारारारा खतरनाक असे शब्द कमी पडतील एवढं हे मोठं विमान आहे. 1980 च्या दशकांत सोव्हिएत तंत्रज्ञानाची ही कमाल आहे. तेव्हाच्या अंटोंनोव्ह कंपनीने हे विमान बनवले. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सध्या ही कंपनी युक्रेनमध्ये आहे. सोव्हिएत रशियाचे शक्तिशाली रॉकेट Energia चे बुस्टर्स पोटातून तर स्पेस शटल ( Buran) हे डोक्यावर घेऊन नेता यावे यासाठी हे विमान बनवलं होतं. सोव्हिएत महासत्ता कोसळल्यानंतर रशियाने रॉकेट Energia आणि स्पेस शटल कार्यक्रम खर्च परवडत नसल्याने बंद केला. तसंच एवढे विमान आणखी बनवणे हे सुद्धा आवाक्याबाहेरचे ठरले होते. तेव्हा An-225 हे एकच विमान बनवले गेले तर दुसऱ्याची फक्त बॉडी तयार केली आणि काम थांबण्यात आले. 

हे विमान केवढं मोठं आहे ?

सुमारे 84 मीटर लांब, 88 मीटर पंखाचा पसारा आणि 18 मीटर उंच एवढे हे विमान मोठं आहे. तर एवढ्या अवाढव्य आकारामुळे आतमध्ये सुमारे 43 मीटर लांब, 6.4 मीटर रुंद आणि 4.4 मीटर उंच एवढ्या मोठ्या आकारामध्ये विविध सामान /वस्तू / payload ठेवता येतात. 250 टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता आहे. 

आता आकडेवारीवरुन विमानाच्या आकारमानाचा कदाचित अंदाज येणार नाही. म्हणून काही उदाहरणे देतो. 

1..रस्त्यावर धावणार एखादा मोठा ट्रेलर हा 10 एक गाड्या ( LMV ) वाहून नेऊ शकतो. तर An - 225 विमान हे अशा 50 ( LMV ) गाड्या सहज घेऊन शकते. 

2..जून 2010मध्ये 42 मीटर लांबीची पवनचक्कीची दोन पाती या विमानातून चीन हुन डेन्मार्कला नेण्यात आली होती. 

3..ऑगस्ट 2009 ला वीज निर्मितीचा तब्बल 189 टन वजनाचा जनरेटर या विमानाने वाहुन नेला.  

4.. सप्टेंबर 2001 मध्ये 4 रणगाडे घेऊन या An -225 ने आकाशात झेप घेतली होती. यांचे एकूण वजन होते तब्बल 253.82 टन. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आत्तापर्यंतचा जागतिक रेकॉर्ड आहे. 

तर एवढं मोठं विमान कशासाठी ? अर्थात सामरिक वापराकरता - संरक्षण बाबींसाठी या अजस्त्र विमानाची निर्मिती करण्यात आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर याची उपयुक्तताच संपली. त्यापेक्षा युक्रेनसारख्या देशात अंटोनोव्ह कंपनीला हे विमान सांभाळणे आर्थिक दृषट्या जिकरीचे झाले होते. त्यामुळे काही काळ हे विमान पार्किंगमध्ये धुळ खात पडण्याच्या मार्गावर होते. आता या विमानाचा पुर्णपणे व्यावसायिक वापर सुरु केला गेला आहे. जगात कोणताही देश आकाराने अजस्त्र असं सामान वाहुन नेण्यासाठी या विमानाकडे नोंदणी करु शकते. अर्थात हे विमान अवाढव्य असल्याने 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या मोठ्या धावपट्टीवरच उतरु शकते. विमान आवाढव्य असल्याने याच्या लँडिंग गियरला तब्बल 32 चाके आहेत. पुढे चार तर मागे 7 चाकांच्या 4 जोड्या. सर्वसाधारण विमानाला दोन जेट इंजिन असतात. बोईंग 747 किंवा एयरबस - 380 ला सुद्धा चार जेट इंजिन आहेत. तर या An -225 ला तब्बल 6 शक्तीशाली जेट इंजिन आहेत.   

सध्या हे विमान जगभरात भ्रमंती करत असून विविध प्रकारचे payload - सामान वाहुन नेण्याचा एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड या विमानाने कायम ठेवला आहे. 

अधिक काही लिहिण्यापेक्षा पुढील व्हिडियो लिंक बघा, पण त्यापेक्षा नुसते फोटो बघा म्हणजे या An -225 Mriya विमानाची अवाढव्यता लक्षात येईल. 

https://www.youtube.com/watch?v=KhyzSSAwBos 

Monday, November 2, 2020

सूर्यमालेत बुध ग्रहाच्या आकाराशी स्पर्धा करणारे 3 चंद्र / उपग्रह

#कुतूहल #curiosity 

सूर्यमालेत बुध ग्रहाच्या आकाराशी स्पर्धा करणारे 3 चंद्र / उपग्रह

आपली सूर्यमाला ही विविध वैशिष्ट्ये, आश्चर्यकारक गोष्टींनी ठासून भरलेली आहे. आजही अशी अनेक गुपितं -रहस्य ही अजून माहीत व्हायची आहेत. तर आज बघणार आहोत ग्रहांच्या आकारमानाच्या बाबतीत असलेली एक छोटीशी गंमत.

आपल्या सुर्यमालेत असे काही चंद्र ( एखाद्या ग्रहाचे उपग्रह ) आहेत की जे बुध ग्रहाच्या आकारापेक्षा माेठे आहेत, तर काही बुध ग्रहाच्या आकारापेक्षा जरासे लहान आहेत. मात्र हे चंद्र सुर्यमालेत स्वतंत्रपणे सुर्याभोवती फिरत नसून ते एखाद्या ग्रहाभोवती भ्रमण करत असल्याने त्यांना ग्रह म्हणून स्वतंत्र दर्जा मिळालेला नाही तर त्यांना उपग्रह - चंद्र म्हणून ओळखले जाते. 

आपल्या सुर्यमालेत 8 ग्रह आहेत. यापैकी सर्वात छोटा ग्रह हा अर्थातच बुध आहे. बुध हा सुर्यमालेत सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह - पहिला ग्रह आहे. बुध ग्रहाचा परिघ हा सुमारे 4,879 किलोमीटर आहे, तर पृथ्वीचा परिघ हा सुमारे 12,742 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या उपग्रहाचा म्हणजेच आपल्या चंद्राचा परिघ हा सुमारे 3,474 किलोमीटर आहे. 

सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरू ग्रहाला ज्ञात असे एकुण 79 उपग्रह / चंद्र आहेत. त्यापैकी Ganymede हा गुरुचा सर्वात मोठा उपग्रह आहे. गॅलिलिओ यांनी 1610 ला जेव्हा पहिल्यांदा गुरु ग्रहाचे निरिक्षण केले तेव्हा त्यांना जे चार उपग्रह आढळले त्यापैकी एक म्हणजे हा Ganymede उपग्रह. Ganymede हा गुरु ग्रहाभोवती सुमारे दहा लाख 70 हजार किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करतो. या Ganymede चा परिघ सुमारे 5,268 किलोमीटर आहे. म्हणजेच या उपग्रहाचे आकारमान हे बुध ग्रहाच्या थोडेसे जास्तच आहे.

शनि ग्रहाला ज्ञात 82 उपग्रह असून यापैकी Titan हा सर्वात मोठा उपग्रह आहे. डच खगोलशास्त्रज्ञ Christiaan Huygens या खगोलशास्त्रज्ञाने या उपग्रहाचा शोध 1655 ला लावला. Titan हा शनि ग्रहाभोवती सुमारे 12 लाख किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करतो. या उपग्रहाचा परिघ हा 5,129 किलोमीटर असून हे आकारमान बुध ग्रहापेक्षा थोडेसे मोठे आहे. 

तर Callisto नावाचा उपग्रह हा गुरु ग्रहाचा आकाराने दुसऱ्या क्रमांकाच्या उपग्रह आहे, चंद्र आहे. याचाही शोध गॅलिलिओ यांनी 1610 ला लावला. हा उपग्रह गुरु ग्रहाभोवती सुमारे 19 लाख किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करत असतो. या उपग्रहाचा परिघ हा 4,820 किलोमीटर एवढा असून हा उपग्रह हा बुध उपग्रहापेक्षा आकाराने थोडासा लहान आहे. 

या तीनही चंद्राची छायाचित्रे पुढे दिली आहेत.

Sunday, November 1, 2020

विमानवाहु युद्धनौका


#कुतुहल  #curiosity 

विमानवाहु युद्धनौका

ज्या देशाच्या सीमेवर अथांग समुद्र आहे आणि ज्या देशाला राजकीय महत्वकांक्षा या संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्या देशाला विमानवाहु युद्धनौकांशिवाय पर्याय नाही. किंबहूना अशा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ताकदीचे जे अनेक मापदंड त्यापैकी एक म्हणजे त्या देशाच्या नौदलाकडे किती विमानवाहु युद्धनौका आहेत ते.

विमानवाहु युद्दनौकांवरील लढाऊ विमानांच्या सहाय्याने विस्तृत समुद्राच्या भागावर वर्चस्व ठेवता येते. म्हणजे समजा विमानवाहु युद्दनौकेवरील लढाऊ विमानाचा युद्ध क्षमतेचा पल्ला - 'लढाऊ पल्ला ' हा जास्तीत जास्त 1000 किमी आहे, ( म्हणजे 500 किमी अंतर कापत, हल्लाच्या ठिकाणी जात कसरती करत, हल्ला करत विमानवाहु युद्धनौकेवर परतायचे ). तेव्हा विमानवाहु युद्धनौकेच्या 500 किमी परिघात असलेल्या समुद्रात किंवा किनाऱ्यापासून आत जमिनीवर खोलवरच्या भागापर्यंत वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे विमानवाहु युद्धनौकांना अनन्य साधारण महत्व आहे.

ज्या देशांकडे अनेक विमानवाहु युद्दनौका आहेत त्या देशांना ' ब्लु वॉटर नेव्ही ' म्हणुन ओळखले जाते. म्हणजेच स्वतःच्या देशापासून कित्येक हजार किलोमीटर दूरवर मुक्तपणे संचार करत दबदबा ठेवणे, वर्चस्व गाजवणे हे विमानवाहु युद्धनोकांमुळे शक्य होते. म्हणुनच अमेरिका ही सध्याच्या काळांत खऱ्या अर्थाने  ' ब्लु वॉटर नेव्ही ' ओळखली जाते. अर्थात अणु पाणबुड्यांची साथही आवश्यक ठरते.

दुसऱ्या महायुद्धात जपानला नमवण्यात जेवढे अणु बॉम्बचे महत्व आहे तेवढेच विमानवाहु युद्धनौकांचेही. विमानवाहु युद्धनौकांमुळे जपानच्या नौदलाचे कंबरडे अमेरिकेने मोडले होते. 1982 च्या फॉकलंड बेटांच्या युद्धात इग्लंडकडे असलेल्या विमानवाहु युद्धनौकांमुळे हजारो किलोमीटर दूरवर जात अर्जेटिनाला नमवण्यात इंग्लडला यश आले होते. 1991 पर्यंत रशिया - अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात विमानवाहू युद्धनौकांमुळेच अमेरिकेचा रशियासमोर दबदबा कायम राहिला होता. एवढंच काय 1971 च्या भारत पाक युद्धात तेव्हाच्या पुर्व पाकिस्तानच्या बंदरांची - चितगांवच्या नाकेबंदीमध्ये आयएनएस विक्रांतने महत्त्वाची भुमिका बजावली होती हे कसं विसरुन चालेल. म्हणून विमानवाहु युद्धनौकांना नौदलात अनन्य साधारण महत्व आहे.

सध्या कोणत्या देशांकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत आणि किती बांधल्या जात आहेत ( ही माहिती कंसामध्ये ) हे बघुया

अमेरिका - 11 (2),चीन - 2 (1), इटली - 2 (1), इंग्लंड- 2, फ्रान्स - 1, भारत - 1 (1), रशिया -1, स्पेन -1, थायलंड -1, जपान - 0 (2)

ढोबळपणे विमानवाहु युद्धनौकांचे 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. हलक्या वजनाच्या, मध्यम आकाराच्या आणि मोठ्या ( Super carrier ).

आपल्याकडे असलेली विक्रांत - विराट या हलक्या वजनातील विमानवाहु युद्धनौका होत्या, ज्याचे वजन अनुक्रमे 22,000 टन आणि 27 हजार टन एवढे होते. साधारण 30 हजार टन वजनापर्यंतच्या विमानवाहु युद्धनौका या हलक्या वजनाच्या समजल्या जातात. तर मध्यम आकाराच्या विमानवाहु युद्धनौका या ढोबळपणे या ३० हजार ते ७० हजार टन वजनांत मोडतात. सध्या आपल्याकडे असलेली विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे वजन हे सुमारे ४५ हजार टन एवढे आहे. अमेरिकेकडे असलेल्या सर्व विमानवाहु युद्धनौका या तब्बल 90 हजार ते एक लाख टन वजनाच्या आहेत.

जेवढा वजनाचा आकडा साधारण तेवढी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हे त्या विमानवाहू युद्धनौकांवर असतात. म्हणजे 45 हजार टन वजनाच्या विक्रमादित्यवर सुमारे 40 - 45 पर्यंत लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवता येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे विमानवाहु युद्धनौका या अत्यंत उच्च दर्जाच्या डिझेल इंजीनावर किंवा तत्सम इंधनावर चालतात. फक्त अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या विमानवाहु युद्धनौका या अणु ऊर्जेवर चालतात. म्हणजेच या दोेन देशांच्या विमानवाहु युद्धनौकांमध्ये असलेल्या अणु भट्टीत एकदा इंधन भरले की पुढील काही वर्षे इंधन भरण्याची आवशक्यता नाही.

विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक छोटेसे स्मार्ट शहरंच. जे स्मार्ट शहरांत असतं ते सर्व या विमानवाहू युद्धनौकांवर बघायला मिळतं. बाजारपेठ सोडली तर अनेक सुविधा उपलब्ध असतात. शुद्ध पिण्याचे पाणी, ATM, जीम, सिनेमागृह, इंटरनेट, सांडपाण्याचा पुर्नवापर, वीजेची बचत होईल अशी उपकरणे....अगदी काही ठिकाणी तरणतलाव सुद्धा उपलब्ध आहे. अर्थात ही युद्धनौका असल्यानं चैनीच्या गोष्टींना मर्यादीत स्थान ठेवले जाते.

विक्रमादित्यवर एका वेळी 1600 जण कार्यरत असतात, तर अमेरिकेच्या निमिट्झ वर्गातील विमानवाहु युद्धनौकांवर तर तब्बल 6000 जण कार्यरत असतात, एवढा राबता या युद्धनौकांवर असतो.

दिशादर्शन विभाग, हवामान विभाग, संदेश देवाणघेवाण विभाग, हेलिकॉप्टर - लढाऊ विमानांशी संबंधित यंत्रणा, अन्नधान्य प्रक्रियेसंदर्भातला विभाग, logistic संदर्भातला विभाग, इलेक्ट्रिक - इंजिनाशी संबधित अभियांत्रिकी विभाग असे विविध विभाग हे विमानवाहु युद्धनौकेवर कार्यरत असतात.

विमानवाहु युद्धनौकांचा आकार मोठा असल्यानं रडारने सहज त्यांना शोधता येते. त्यामुळे संरक्षणासाठी विमानवाहु युद्धनौका ही इतर युद्धनौका, पाणबुड्या यांच्या संरक्षणात संचार करते.

विमानवाहु युद्धनौका बांधणे, बाळगणे हे अत्यंत खार्चिक आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे जगात नौदल असलेल्या सर्वच देशांना या विमानवाहू युद्धनौका बाळगणे परवडत नाहीत.

विमानवाहु युद्धनौकांच्या बाबतीत निर्विवादपणे सध्या अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे. तर अमेरिकेबरोबर रशिया, फ्रान्स, इंग्लंड देशांच्या विमानवाहु युद्धनौकांचेही तंत्रज्ञान हे पुढारलेले आहे. भारतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. तर विमानावहु युद्धनौका बांधणीचा सपाटा सुरु केलेला चीन हा भविष्यात अमेरिकेपुढे आव्हान निर्माण करणार यात शंका नाही.

विमानवाहु युद्धनौका आतुन बाहेरुन बघता येणे, त्यावर एक दिवस का होईना रहायला मिळणे हे संरक्षण विषयक रुची असणाऱ्यांचे स्वप्न नक्कीच असेल. माझे स्वप्न, bucket list मधील ही गोष्ट माझी केव्हाच पुर्ण झाली आहे. 2012 च्या फेब्रुवारीत मला आयएनएस विराटवर मुक्काम करण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर साधारण गोवा ते मुंबई असा स्वप्नवत प्रवासही करायला मिळाला.

विमानवाहु युद्दनौकांवर खुप सुंदर, माहितीपुर्ण असे माहितीपट यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची लिंक पुढे देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=LhqLn1wKJAw&t=1605s

https://youtu.be/c0pS3Zx7Fc8

Monday, October 26, 2020

पाणबुडीमध्ये लढाऊ विमाने ? Submarine Aircraft Carrier ?

पाणबुडीमध्ये लढाऊ विमाने ? Submarine Airctaft Carrier ?

असं वाचल्यावरच तुम्हाला धक्का बसला असेल. अरे, हे काय आहे ? असं शक्य आहे का ? असं कोणता देश करेल का ? लढाऊ विमाने पाणबुडीमध्ये ठेवणे व्यवहार्य आहे का ?

उत्तर आहे हो. 

असं झालं आहे. अचाट कल्पनेतलं अशक्य ते शक्य जपानने करून दाखवलं आहे, आता आहे असं म्हणणार नाही तर जपानने हे करुन दाखवलं होतं असं म्हणेन.

दुसऱ्या महायुद्धात जपानने ही करामत करून दाखवली होती. तेव्हाच्या जपानच्या नौदलात लढाऊ विमानांना आपल्या कवेत - खरं तर पोटात घेणाऱ्या 3 पाणबुड्या जपानने युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात युद्धात उतरवल्या होत्या. मात्र या दरम्यान जपानची कोंडी अमेरिकेने केली, अण्वस्त्र टाकत जपानचा पराभव केला, नाहीतर जपानने एकूण 18 पाणबुड्या बांधण्याची तयारी ठेवली होती.

पार्श्वभूमी.... दुसरे महायुद्ध हे अनेक तंत्रज्ञान - संकल्पनांना जन्म देऊन गेले. जपानचा पराभव करण्यासाठी समुद्राचा मोठा टप्पा पार करण्यासाठी युद्ध ऐन भरात असतांना अमेरिकेने विमानवाहू युद्धनौका बांधणीचा सपाटा लावला होता. एवढंच नव्हे तर विविध युद्धनौका, पाणबुड्या बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. तर जर्मनी आणि जपानचा भर हा पाणबुड्यांवर जास्ती होता. जर्मनीच्या पाणबुड्यांनी तर दीर्घकाळ इंग्लंड आणि परिसराची कोंडी केली होती. जपानच्या पाणबुड्यांनीही काही काळ अमेरिकेच्या युद्धनौकांना हैराण करून सोडलं होतं. 

1941 च्या शेवटी जपनानं पर्ल हार्बरवर हल्ला करत अमेरिकेच्या पॅसिफिकमधल्या अमेरिकेच्या नौदल ताफ्याला मोठा तडाखा दिला होता. यामागचे सुत्रधार होते जपानच्या नौदल ताफ्याचे प्रमुख ऍडमिरल यामामोटो. तेव्हा आता अमेरिकेच्या भुमिवर थेट बॉम्बहल्ला कसा करता येईल या महत्वकांक्षेने ऍडमिरल यामामोटो यांनी पाणबुडीतून विमाने नेत हल्ला कऱण्याची योजना मांडली. विमानवाहू युद्धनौकांना टिपणे हे सहज शक्य असल्याने जपानने लढाऊ विमाने वाहुन नेणाऱ्या पाणबुड्यांच्या निर्मितीवर काम करायला सुरुवात केली. या पाणबुड्यांना I-400 ( आय -400 ) असे सांकेतिक नाव देण्यात आले. 

त्या काळांत डिझेलवर चालणाऱ्या पाणबुड्या या जास्तीत जास्त 2000 टन वजनाच्या होत्या. मात्र जपानने तंत्रज्ञान - अभियंत्रिकी कौैशल्याची कमाल करत तब्बल 6500 टन वजनाच्या 120 मीटर लांबीच्या  I-400 पाणबुड्या बांधल्या. इंधन ( डिझेल ) पुर्ण भरल्यावर एका दमात पृथ्वीची एक प्रदक्षिणा मारण्याची या पाणबुडीची क्षमता होती. तर पाणबुडीवरुन विशिष्ट धक्काने हवेत झेप घेण्याची क्षमता असलेले M6A1 नावाचे खास विमान हे I-400 साठी विकसित करण्यात आले होते. 500 किमी पेक्षा अंतर कापत टॉर्पेडो डागत किंवा बॉम्ब फेकत परतण्याची या विमानांची क्षमता होती. समुद्रात उतरल्यावर एका क्रेनच्या सहाय्याने परत पाणबुडीमध्ये ठेवण्याची सोयही करण्यात आली होती. एका वेळी तीन M6A1 विमाने सामावून घेण्याची क्षमता I-400 पाणबुडीमध्ये होती.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात जपानची आर्थिक कोंडी झाल्याने जपान  I-400 वर्गातील फक्त 3 पाणबुड्या बनवू शकली, तर एकाची अर्धवट निर्मिती केली.  I-400  वर्गातील 3 पाणबुड्या महायुद्धाच्या अगदी शेवट्या टप्प्यात युद्धात उतरवल्या गेल्या, त्यांना प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळालीच नाही. 

शरणागती पत्करल्यावर या अजस्त्र  I-400 वर्गातील पाणबुड्या बघुन अमेरिकेला आश्चर्याचा धक्काच बसला. महायुद्ध संपल्याने सोव्हिएत रशियाकडून या पाणबुड्याच्या पहाणीची मागणी लक्षात घेता या पाणबुडीच्या तंत्रज्ञनाची कागदपत्रे जपुन ठेवत अमेरिकेने या पाणबुड्यांना जलसमाधी दिली. आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागणाऱ्या अणु पाणबुड्यांची निर्मिती होईपर्यंत I-400 ने सर्वात मोठ्या पाणबुडीचा मान मिरवला. 

आजही विमानांना सामावून घेणाऱ्या I-400 सारख्या पाणबुड्या बांधणे हे आव्हानात्मक असतांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत उपलब्ध तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवघ्या चार वर्षात अजस्त्र I-400 पाणबुड्यांची निर्मिती करत जगाला जपानने धक्का दिला होता. 

जपानच्या I-400 या पाणबुडीवर आधारीत काही माहितीपट हे यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्याची लिंक देत आहे. Enjoy......




Sunday, October 25, 2020

उघड्या डोळ्यांनी रात्री आकाशात आकाशगंगेचा केवढा भाग बघु शकतो ? 

#कुतुहल #curiosity 

उघड्या डोळ्यांनी रात्री आकाशात आकाशगंगेचा केवढा भाग बघु शकतो ? 

तर उत्तर आहे एक टक्क्यांपेक्षा कमीच. 

शहरापासून किंवा कृत्रिम प्रकाशाच्या झगमटापासून दूर एखाद्या ठिकाणाहून रात्री जेव्हा आपण आकाशाचे निरीक्षण करतो तेव्हा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक ताऱ्यांचा सलग पट्टा आढळतो. या दुधाळ पट्ट्यानरुनच आपल्या दिर्घिकेला आकाशगंगा - milky way असं यथार्थ नाव देण्यात आलं आहे. 

या आकाशात उघड्या डोळ्यांनी म्हणजेच दुर्बिणीशिवाय 2 हजार ते 5 हजार तारे सहज बघता येतात. अर्थात चंद्राच्या प्रकाशाचे अस्तित्व, हवेचे प्रदुषण, कृत्रिम प्रकाशाचा अडथळा यामुळे आकाशाचे निरीक्षण करणे ही एक कसरत आहे. 

आपण म्हणजे भारत देश हा उत्तर गोलार्धात विषुववृत्ताच्या थोडं वर आहोत. जसं पृथ्वीवरील आपलं ठिकाण बदलेल तसं ताऱ्यांची जागा थोडीशी बदलेल,  डोळ्यांनी दिसणाऱ्या ताऱ्यांच्या संख्येत थोडा फार फरकही पडेल. 

त्यात एखादा तारा हा 20 प्रकाशवर्ष दूर आहे मात्र प्रखर असल्याने अंधुकसा का होईना सहज दिसतो. तर तेवढ्याच अंतरावर आकाशाच्या वेगळ्या दिशेला असलेला एखादा तारा प्रखर नसल्याने दिसतही नाही. 

थोडक्यात ( रात्रीचे ) आकाश हे ताऱ्यांनी खचाखच भरलेले आहे. यापैकी फक्त काहीच तारे आपल्याला डोळ्यांनी दिसतात.  

अर्थात आकाशाचे निरीक्षण करता येणाऱ्या विविध प्रकारच्या दुर्बिणींनी कित्येक हजार प्रकाशवर्षे दुरवरचे तारे, ढग बघता येतात. ( अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ) 3 लाखापेक्षा जास्त तारे आत्तापर्यंत माहित झाले आहेत.  

या माहितीमध्ये पहिलं  छायाचित्र हे आपल्या आकाशगंगेचे आहे, त्यामध्ये खाली एक वर्तुळ आहे. त्या वर्तुळाच्या मध्यभागी पृथ्वी - सुर्यमाला आहे, म्हणजे आकाशगंगेत आपले नेमके स्थान तुमच्या लक्षात आलं येईल. 

असो.....तर ते वर्तुळ म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारे आकाश. थोडक्यात आपल्या आकाशंगगेचा वर्तुळात दिसणार भाग हे आपलं आकाश आहे, ज्यामध्ये प्रखर तारे, इतरांच्या तुलनेत कमीप्रखर असल्याने अंधुक दिसणारे किंवा प्रखर नसल्याने न दिसणारे तारे, दुरवरचे तारे हे या वर्तुळात आहेत.  

तर पृथ्वीवरुन ताऱ्यांचा जो पट्टा दिसतो ज्याची असंख्य छायाचित्रे उपलब्ध आहेत त्यापैकी दुसऱ्या छायाचित्र पुढे देत आहे. 
 
तिसऱ्या छायाचित्रात आकाशगेगेचं ( अभ्यासकांनी - संशोधकांनी ) तयार केलेलं एक काल्पनिक चित्र देत आहे. यावरुन आकाशगंगेचे भाग, सुर्यनमालेचे स्थान, ताऱ्यांची दाटी, ढगांचा पसारा, पोकळी हे सर्व लक्षात येईल. 

( टीप - आपल्या आकाशगंगेत 100 ते 400 अब्ज तारे असावेत असा अंदाज आहे. म्हणजे बघा आपण केवढे तारे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघु शकतो, दुर्बिणीतून बघितले आहेत - अभ्यासले आहेत आणि अभ्यास करण्याचे सोडा नुसते दुर्बिणीनी बघायचे बाकी राहिले आहेत ते. )

 

Saturday, October 3, 2020

आपलं विश्व केवढं मोठं आहे ?


#कुतूहल #curiosity 

पृथ्वीवर अंतरे ही किलोमीटरमध्ये मोजतात. सध्या तर गुगल मॅपमुळे आपला विश्वास किलोमीटरवर राहिला नसुन मिनीटे - तासवर राहिला आहे. म्हणजे गुगल मॅपवर किती किलोमीटर अंतर आहे यापेक्षा आपण किती वेळ दाखवलं जात आहे ते बघतो. म्हणजे 10 मिनीटे, अर्था तास.....किती वेळ लागणार यावरून आपण नियोजीत ठिकाणी पोचण्याबाबत अंदाज व्यक्त करतो. म्हणजेच आता आपण अंतर हे काळामध्ये - किती वेळ लागणार यामध्ये मोजायला सुरुवात केली आहे असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही. 

आता अवकाशात अंतरे मोजणाऱ्या अनेक एककांपैकी प्रकाशवर्षे हे एक प्रमुख एकक आहे. प्रकाशाने एका वर्षात केलेला प्रवास हा एक प्रकाशवर्ष एवढा मोजला जातो.  

प्रकाशाचा वेग हा निश्चित आहे, म्हणजे एका सेकंदात प्रकाश हा सुमारे 3 लाख किलोमीटर अंतर कापतो, नक्की सांगायचं झालं तर 2 लाख 99 हजार 792 किलोमीटर एवढे अंतर कापतो. एका प्रकाशवर्षात प्रकाश हा सुमारे 95 वर 11 शून्य एवढे किलोमीटर अंतर कापतो. ब्राम्होस क्षेपणास्त्र जे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र समजलं जातं, ध्वनीच्या 2.8 पट वेगाने प्रवास करते. ते समजा non stop निघाले तर एक प्रकाशवर्षे एवढे अंतर कापायला ब्राम्होस क्षेपणास्त्राला सुद्धा कित्येक हजार वर्षे लागतील. 
 
असो... तर आता प्रकाशवर्ष हे नेमकं काय ते तुम्हाला समजलं असेल. आता या परिमाणचा - एककाचा वापर करत हे विश्व केवढं अजस्त्र आहे हे समजायला थोडी मदत होईल.  

आता पुढे काही उदाहरणे देतो म्हणजे विश्वाच्या पसाऱ्याची व्याप्ती समजण्यास मदत होईल.  

आपल्या सुर्याच्या सर्वात जवळचा तारा प्रॉक्सीमा सेंच्युरी हा 4.22 प्रकाशवर्षं अंतरावर आहे. 

आकाशात रात्री डोळ्यांनी दिसणारा सर्वात प्रखर तारा - व्याध तारा ( Sirius ) हा 8.6 प्रकाशवर्ष अंतरावर आहे.  

आपण आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे ज्याला आकाशगंगा म्हणतात त्या आकाशगंगेच्या मध्यापासून सुमारे 26 हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहोत. आपल्या आकाशगंगेचा व्यास हा व्यास हा अंदाजे 1 लाख 70 हजार ते 2 लाख प्रकाशवर्षं एवढा समजला जातो.  

आपल्या आकाशगंगेच्या जवळ सर्वात जवळची दीर्घिका ही Andromeda Galaxy जिला देवयानी आकाशगंगा या नावानेही ओळखले जाते ती आपल्या आकाशगंगेपासून सुमारे 2 लाख 40 हजार प्रकाशवर्षेपेक्षा जास्त अंतरावर आहे. 

माहीत असलेली सर्वात मोठी दीर्घिका म्हणून IC 1101 या ओळखली जाते जी आपल्यापासून तब्बल एक अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर आहे. या दीर्घिकेचा व्यास हा 50 लाख प्रकाशवर्ष एवढा समजला जातो.  

अवकाशात जसे ताऱ्यांचे समूह असतात तसे दीर्घिकांचेही समूह असतात. विविध दीर्घिकांच्या समूहांचे काही गट असतात. असे अनेक गट मिळून दीर्घिकांचा एक मोठा समूह बनतो. अशा अनेक समूहांचे अनेक समूह असतात. तर अनेक समूहांमध्ये मोठ्या अवकाश पोकळी आहेत, म्हणजे तिथे ना दीर्घिका आहे, ना तारे आहेत ना कृष्ण विवर आहे, अशा अवकाश पोकळीला Void म्हणतात. अशा पोकळीही या काही अब्ज प्रकाशवर्ष एवढ्या मोठ्या आहेत.  

अशा अनेक दीर्घिकांच्या समूहांचे, पोकळीचे हे विश्व बनले आहे. 

आपण अवकाशात विविध दिशांकडे जास्तीत जास्त 46.5 अब्ज प्रकाशवर्षे एवढ्या लांब बघू शकतो. म्हणजेच सर्व दिशांचा विचार केला तर आपल्याला दिसणारे विश्व हे 93 अब्ज प्रकाशवर्षे एवढे मोठे आहे.  

आता पुढचा प्रश्न हा की या दिसू शकणाऱ्या विश्वाच्या पुढे काय आहे ? तर उत्तर हे आहे की त्याच्या पुढे आपण बघू शकलेलो नाही. म्हणजे तेवढ्या क्षमतेच्या दुर्बिणी आपल्याकडे नाहीत. जेवढ्या शक्तिशाली अवकाश दुर्बिणी बनवू तेवढे आपण दूर बघू शकणार आहोत. अर्थात त्याच्या पुढे काय आहे, किती विश्व बाकी आहे हे प्रश्न अनुत्तरित आहेत.  

म्हणूनच हे विश्व अनंत आहे असं म्हंटलं जातं.  

विश्वाच्या पसाऱ्याबाबत माहिती सांगणारे विविध लेख, लघुपट - माहितीपट उपलब्ध आहेत. यापैकी पुढील एक व्हिडियो बघा आणि थक्क व्हा. ( अंतरांच्या बाबतील काही माहिती जरा वेगळी असेल पण अनंत विश्वाच्या व्याप्तीचा अंदाज लावता येईल ) 
 
https://www.youtube.com/watch?v=q1mkjkTqg0Y
 
https://www.youtube.com/watch?v=i93Z7zljQ7I 

https://www.youtube.com/watch?v=gIbfYsQfNWs

Sunday, September 20, 2020

पृथ्वीपासून सर्वात दूरवर मानवाने पाठवलेल्या वस्तु कोणत्या ?


#कुतूहल #curiosity 

सर्वात आधी यामागची पाश्वर्भुमी.  

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्ध ऐन भरांत असतांना याचाच एक भाग म्हणून दोन्ही देशांमध्ये अवकाश स्पर्धाही( 1957 -1975 ) जोरात सुरु होती. यापैकी एक स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांजवळ कृत्रिम उपग्रह - यान पाठवण्याची स्पर्धा. यानिमित्ताने दोन महत्त्वकांक्षी मोहिमा नासाकडून आखल्या गेल्या, Pioneer आणि Voyager मोहिमा. 

Pioneer म्हणजे मुहुर्तमेढ रोवणारे. तर Voyager म्हणजे दुरचा प्रवास. 

Pioneer मोहिमा 1958 पासून चंद्रावर उपग्रह पाठवण्याच्या निमित्ताने सुरु झाल्या. या दरम्यान Pioneer - 10 ( मार्च 1972 ) आणि Pioneer - 11 ( एप्रिल 1973 ) ही दोन जुळी यानं ठराविक कालवाधीच्या अंतराने गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवली गेली. गुरु ग्रहाजवळून पहिल्यांदा जाण्याचा मान जाणारा Pioneer - 10 ला मिळाला. तर Pioneer - 11 ने गुरु ग्रहाजवळ जात गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत शनि ग्रहाच्या दिशेने झेप घेतली आणि शनी ग्रहाच्या जवळ जाणारा पहिले यान म्हणून मान पटकावला. नंतर हे दोन्ही यानं हीअवकाशाच्या अनंत अशा पोकळीत मार्गस्थ झाली. आता या प्रकरणावर इथेच थांबतो कारण यावर लिहिणे हा एक स्वतंत्र असा व्याप आहे. 

याच वेळी विविध ग्रहांजवळ जाणारा नासाचा Mariner कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाद्वारे शुक्र आणि मंगळ ग्रहाजवळ पोहचण्याचा प्रयत्न नासा करत होती. या दरम्यान गुरु आणि शनी ग्रहाला भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच कार्यक्रमा दरम्यान 1980-90 दरम्यान कधीही भेट ने दिलेले युरेनस आणि नेपच्युन हे दोन ग्रहांजवळ जाणे शक्य असल्याचं नासाच्या लक्षात आलं आणि Marinerया कार्यक्रमाचे नासाने Voyager Program असं नामांतर केलं.  

Voyager -1 ( सप्टेंबर 1977 ) तर Voyager -2 ( ऑगस्ट 1977 ) गुरु ग्रहाच्या दिशेने रवाना झाले. या दोन्ही यानांनी गुरु आणि मग शनी ग्रहाची जवळून अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढली. दरम्यान शनि ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत ( जसे गोफणीने दगड गोल फिरवून जोराने - वेगाने फेकला जातो ) Voyager -1 ने आणखी वेग पकडला आणि विश्नाच्या अनंत पोकळीत रवाना झाला. तर Voyager - 2 ने युरेनस, नेपच्युन या ग्रहाजवळून जात विश्वाच्या पसाऱ्यात रवाना झाले. आजही युरेनस, नेपच्युन या ग्रहांजवळून जाणारे Voyager - 2 हे एकमेव यान ठरले आहे हे विशेष.  

सुर्यमालेतील सर्वात दुरवरचा ग्रह - प्लुटो ग्रह याचा अभ्यास करण्यासाठी नासाने जानेवारी 2006 ला New Horizons ( नवी क्षितीजे ) नावाचा उपग्रह पाठवला. गंमत म्हणजे अर्धे अंतर पार केले असतांना प्लुटो ग्रहाची ग्रह म्हणून मान्यताच रद्द करण्यात आली होती. अर्थात यामुळे मोहिमेवर थोडीच फरक पडणार होता. तर जुलै 2015 ला प्लुटो ग्रहाजवळून जात त्याची उत्तम छायाचित्रे घेतली आणि New Horizons हे अनंत अवकाशाच्या पोकळीत मार्गस्थ झाले. 

तर Pioneer -10 आणि 11 , Voyager - 1 आणि 2, New Horizons ही मानवाने पाठवेली सर्वात दूरवरची यानं ठरली आहेत. तर यापैकी दुरवरचे यान कोणते. तुम्हाला वाटेल Pioneer याने, कारण ती सर्वात आधी रवाना झाली होती. तर याचे उत्त्र आहे Voyager - 1. कारण ग्रहांजवळून जातांना संबंधित ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा जास्तीत जास्त फायदा Voyager - 1 घेतला.  

तेव्हा सध्या वर उल्लेख केलेली यानं कोणत्या वेगाने अवकाशात प्रवास करत आहेत ते पुढीलप्रमाणे.......

Voyager - 1    17 किमी प्रति सेकंद  ( वेग अंदाजे  ) 
New Horizons 16 किमी प्रति सेकंद 
Voyager - 2     15 किमी प्रति सेकंद 
Pioneer -10     12 किमी प्रति सेकंद 
Pioneer -11      11 किमी प्रति सेकंद 

यापैकी किती यानं संपर्कात आहेत ? तर संपर्कात म्हणजे यानावर असलेल्या विविध उपकरणांद्वारे मिळणारे संदेश. तर सध्या फक्त Voyager - 2 आणि New Horizons ही दोन यानं संपर्कात आहे. बाकी सर्व यांनांचा संपर्क हा मोहिमेची सुरुवात झाल्यावर अगदी 20 -25 वर्षांपर्यंत किवा त्याअधिक काळ कायम होता, म्हणजेच मोहिमांचे उद्दीष्ट्य पुर्ण झाल्यानंतर सुद्धा होता. त्यामुळे या यानांची यापुढची वााटचाल कोणत्या दिशेने असेल हे खात्रीलायक सांगता येतं.  

अवकाशात ज्या दिशेने या यानांचा प्रवास सुरु आहे त्या मार्गावर लघुग्रह किंवा अन्य अडथळा येण्याची शक्यता नसल्याने यानांच्या वेगानुसार ते आपल्यापासून किती दूर असतील याचा अंदाज लावता येतो. तेव्हा वर उल्लेख केलेल्या पाच यानांपैकी सर्वात दुरवरचे कोणते किंवा ही यानं आपल्यापासून किती अंतरावर आहेत ? याची माहिती पुढीलप्रमाणे.... 

Voyager - 1     148 AU ( अंदाजे )  
Pioneer -10     125 AU 
Voyager - 2     123 AU 
Pioneer - 11     103 AU 
New Horizons   46 AU 

आता AU म्हणजे काय तर astronomical unit. अवकाशातील अंतरे मोजण्याची हे एकक आहे. सुर्य आणि पृथ्वी मधील अंतर हे एक astronomical unit ( 1AU ) समजलं जातं. किलोमीटरच्या भाषेत हे अंतर - 1 AU = सरासरी 14 कोटी 95 लाख 97 हजार 870 किलोमीटर, एवढे भरते. आता याची तुलना वर उल्लेख केलेल्या यानाच्या अंतराशी करा. तेव्हा करत बसा आकडेमोड.

तर सर्वात दुर अंतरावर पोहचलेल्या यानाचा मान हा Voyager - 1 कडे जातो. वर उल्लेख केलेल्या इतर चार यानांचा वेग लक्षात घेतला तर अंतराच्या बाबातीत Voyager - 1 ला मागे टाकणे हे शक्य नाही.  

आता या सर्वांचा फायदा काय ? तर New Horizons वगळता सर्व यानं ही सुर्यमालेच्या बाहेर, सुर्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर गेलेली आहेत. यामुळे सुर्यमालेच्या बाहेर क्षेत्र नेमकं कसं असतं ? सुर्य आणि जवळचा तारा यामधला अवकाश नेमका कसा असतो ? कोणते भाररहित कण असतात वगैरे.....अशी अवकाश संधोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची माहिती मिळाली आहे.  

अर्थात माणुस जसा आणखी प्रगती करेल यापेक्षाही वेगाने आणि अधिकचे अंतर अत्यंत वेगाने कापणारी यानं तयार होतील आणि वर उल्लेख केलेल्या यानानं सहज मागे टाकतील यात शंका नाही.  
 
जाता जाता........प्रकाशाचा वेग हा सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर आहे. सुर्यापासून निघालेला प्रकाश हा पृथ्वीवर साधारण 499 सेकंद म्हणजेच साधारण 8 मिनीटे 31 सेकंदात पोहचतो. तेव्हा सर्वात दूरवर असलेल्या Voyager - 1 यानाकडे आपल्या सुर्याचा प्रकाश पोहचायला जेमतेम 16 तास लागतात. सुर्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे यान जेव्हा तयार होईल तेव्हा कुठे माणसाचा खऱ्या अर्थाने विश्वात संचार सुरु होईल. तरीही विश्व एवढं मोठं आहे की प्रकाशाचा वेगसुद्धा कमीच पडेल. यावर नंतर कधीतरी......

तोपर्यंत Voyager, Pioneer, New Horizons वावात अधिकच्या माहितीसाठी पुढील माहितीपट बघा....  

Voyager मोहिमेला 40 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 2017 ला बनवलेला माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=US_byEAbXP0 

Pioneer 10-11 मोहिमेवर एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xpzTw0_hz7U 

New Horizons वर आधारीत एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xKBi2NhmO_4

Saturday, September 19, 2020

Ultra Deep Field Image या एका छायाचित्राने अवकाशाकडे बघण्याचा बदलला दृष्टीकोन


#कुतूहल #curiosity 

या एका छायाचित्राने अवकाश संधोधन क्षेत्रातील अभ्यासाची - संशोधनाची दिशाच बदलून टाकली. 

प्रसिद्ध अवकाश दुर्बिण 'हबल टेलिस्कोप'ने काढलेले छायाचित्र हे Ultra Deep Field Image या नावाने प्रसिद्ध आहे. हबल अवकाश दुर्बिण ही मे 1990 पासून पृथ्वीपासून सुमारे 540 किमी उंचीवरुन पृथ्वीभोवती फिरत आहे. या दुर्बिणीत विविध प्रकारचे, क्षमतेचे अत्यंत शक्तीशाली कॅमेरे बसवलेले आहेत. याद्वारे अवकाशाची वेगवेगळ्या तरंगलाबीद्वारे छायाचित्र काढून अभ्यास केला जातो. सप्टेंबर 2003 ते जानेवारी 2004 या काळात आपल्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या अश्मंत - Fornax नावाच्या तारकासमुहातील एका भागाचे छायाचित्र हे हबलमधल्या Wide Field Camera ने काढले. खरं तर अभ्यास करायचा होता तारकासमुहाचा, तिथे ताऱ्यांची गर्दी एवढी का आहे यावर संशोधन करायचे होते. यासाठी तर 800 exposures एवढे ठेवण्यात आले. exposures चा कालावधी केवढा होता तर एकुण - तब्बल 11 दिवस 3 तास एवढा ठेवण्यात आला होता. या विशिष्ट दिशेने - कोनाने बघतांना हबलच्या 400 प्रदक्षिणा पृथ्वीभोवती झाल्या होत्या. म्हणजे संबंधित प्रतिमा - फोटो केवढा स्पष्ट असेल याची आपण कल्पना करु शकता. 

तेव्हा या फोटोचा अभ्यास करायला सुरुवात केल्यावर शास्त्रज्ञ - संशोधन हे जणू ह्रदय विकाराच्या धक्क्याने मरायचेच बाकी होते. कारण या फोटोमध्ये हजारो दिर्घिका सापडल्या. नेमक्या किती तर 10 हजार पेक्षा जास्तच. याबाबत अभ्यास केल्यावर लक्षात आलं की काही दिर्घिका या 5 अब्ज तर काही या चक्क 13 अब्ज वर्ष वयाच्या होत्या. म्हणजेच 13 अब्ज प्रकाश वर्षांनंतर संबंधित दिर्घिकेचा प्रकाश हा आपल्यापर्यंत पोहचत होता म्हणजे त्या दिर्घिका दिसत होत्या. असं समजलं जातं की विश्वाची निर्मिती ही 13.5 अब्ज वर्षांपूर्वी एका महास्फोटामुळे झाली. थोडक्यात या 13 अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेल्या या दिर्घिकांकडे बघतांना आपण भुतकाळांत बघत असल्याचं स्पष्ट झालं. आता आज ती दिर्घिका अस्तित्वातसुद्धा नसेल किंवा आज तिथे जे काही उरलं आहे त्या भागातून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोहचेपर्यंत पृथ्वीच काय आपली दिर्घिका - आकाशगंगाच अस्तित्वात नसेल. 

नेमक्या त्याच भागाची नंतर काही वर्षांनी आणखी छाायाचित्रे काढण्यात आली आणि सखोल अभ्यास करण्यात आला आहे. आता अवकाशाच्या या एका भागाच्या दिशेने एवढ्या दिर्घिका असू शकतात मग संपुर्ण अवकाशात काय असेल याची आपण कल्पना करु शकता.....लाखो दिर्घिका या विश्वात आहेत. 

आपल्या दिर्घिकेला ज्याला आकाशगंगा या नावाने ओळखलं जातं यामध्ये अब्जावधी तारे आहेत असा अंदाज आहे. यापैकी काही लाख ताऱ्यांच्या भोवती पृथ्वीसदृश्य ग्रह असावेत असा अंदाज आहे. ( आत्ताशी आपल्याला सुमारे 3000 पृथ्वीसदृश्य ग्रह माहीत झाले आहेत ). म्हणजेच सजीवसृष्टी ही आपल्या आकाशंगगेत लाखो ठिकाणी आहे ज्याचा आपण शोध घेत आहोत. मग आपल्याला छोटसं दिसणाऱ्या Ultra Deep Field Image मधल्या दिर्घिकांमध्ये किती खर्व तारे असतील, किती ठिकाणी सजीवसृष्टी असू शकेल, मग संपुर्ण विश्वात किती दिर्घिका - तारे असतील, अब्जावधी ठिकाणी सजीवसृष्टी किती ठिकाणी असेल याचा अंदाज लावणेही पण कठिण आहे. 

हबलने सर्वात खोलवर - लांबवरच्या काढलेल्या Ultra Deep Field Image या एका छायाचित्राने विश्वाकडे बघण्याची दृष्टी आणखी व्यापक झाली. 

या Ultra Deep Field Image बद्दल थोडक्यात, सोप्या भाषेत माहिती ही पुढील लिंकवर मिळेल.

https://www.youtube.com/watch?v=WRHIGuoH6ic
 
https://www.youtube.com/watch?v=gu_VhzhlqGw

Saturday, August 8, 2020

बैरुतच्या स्फोटाच्या निमित्ताने.......

स्फोट या विषयावर ब्लॉग लिहिण्याचं निमित्त दोन कारणांनी आहे. एक बैरुत इथे झालेला, जगाने पाहिलेला शक्तीशाली स्फोट आणि 6 ऑगस्ट - 9 ऑगस्टला अनुक्रमे हिरोशिमा आणि नागसाकी इथे अणुबॉम्बच्या स्फोटाला 75 वर्षे झाल्याचं निमित्त. 

संरक्षण, अवकाश विज्ञान, अणु ऊर्जा हे माझे आवडते विषय. याबाबत वाचन करत असतांना या क्षेत्रातील विविध स्फोटांबद्दल माहिती वाचायला मिळाली. कारण या विषयांत स्फोट हा एक अनिर्वाय भाग आहे. म्हणूनच स्फोटाबद्दलची अशीच काही उत्कंठावर्धक माहिती लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.

तीव्रता आणि संहारकता यामुळे स्फोटाची ताकद समजून येते. स्फोटकामधील रसायन, स्फोट कुठे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये झाला आहे यावरही त्याचे परिणाम अवलंबून असतात. 

सगळ्यात आधी बैरुतच्या स्फोटाबद्दल. सुमारे 2700 टन पेक्षा जास्त साठा असलेल्या अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाल्याचं आता समोर आलं आहे. या स्फोटाचा आवाज 200 किमीपेक्षा जास्त अंतरापर्यंत जाणवला, एवढंच नव्हे तर या स्फोटामुळे ३.३. एवढी भुकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर नोंदली गेली. या स्फोटची क्षमता ही 2.9 kt ( Kilotonne ) एवढी समजली जात आहे. 

स्फोटाची तीव्रता ही TNT या स्फोटकाच्या ज्वलनाच्या क्षमतेमध्ये मोजली जातात. जसं आरडीएक्स हे एक शक्तीशाली स्फोटक ( संयुक्त रसायन ) समजलं जातं तसं TNT - trinitrotoluene  हे एक अत्यंत शक्तीशाली स्फोटक आहे. एक ग्रॅम TNT च्या ज्वलनाने जेवढी ऊर्जा फेकली जाते त्यानुसार स्फोटाचे मुल्यांकन केले जाते. तेव्हा  2.9 kt क्षमते एवढा स्फोट झाला म्हणजे 2900 टन वजनाच्या TNT च्या ज्वलनामुळे निर्माण झालेली ऊर्जा ही बैरुतमधल्या स्फोटामुळे बाहेर फेकली गेली. ही उर्जा ध्वनी लहरी, उष्णता ( आगीचा लोळ ) अशा स्वरुपात बाहेर पडली. उष्णता ही स्फोटाच्या जागेपुरती मर्यादीत राहीली असली तरी ध्वनी लहरींमुळे मोठं नुकसान झालं. 



तर हिरोशिमा इथे झालेल्य अणु स्फोटाची तीव्रता ही सुमारे 15 kt एवढी होती तर नागासाकी इथल्या अणु बॉम्बची क्षमता ही सुमारे 21 kt होती. या दोन्ही अणु स्फोटामुळे निर्माण झालेली उष्णता आणि ध्वनी लहरींच्या लाटांमुळे तात्काळ अनेक इमारती, बांधकामे नष्ट झाली, हजारो जण तात्काळ मृत्युमुखी पडले. या स्फोटामुळे या परिसरांत पसरलेल्या किरणोत्सारामुळे कालांतराने अनेक जण मृत्युमुखी पडले, अपंग झाले, कॅन्सरसारखे आजार अनेकांना झाले. 

स्फोट हे मानवनिर्मित असतात, अपघातामुळे झालेले असतात तर निसर्गनिर्मितही असतात. तेव्हा प्रमुख स्फोटांचा ओझरता हा आढावा....

1..अणुस्फोट - अण्वस्त्र स्पर्धा ही 1945 पासून जगांत सुरु झाली. काही देश स्वतःकडे शक्तीशाली अण्वस्त्र - अणु बॉम्ब बाळगायला लागले, त्याच्या चाचण्या करु लागले, थोडक्यात अणु स्फोट घडवू लागले. आत्तापर्यंत जगांत 8 देशांनी 2000 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. यापैकी अमेरिकेने तब्बल एक हजार पेक्षा जास्त तर रशियाने 700 पेक्षा जास्त, फ्रान्सने 200 पेक्षा जास्त, इंग्लंड आणि चीनने 40 पेक्षा जास्त अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांनीही अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या आहेत. तर इस्त्राईल आणि दक्षिण आफ्रिका हे दोन असे आहेत की ज्यांनी अणु बॉम्बच्या चाचण्या केल्या नाहीत पण त्यांच्याकडे अणु बॉम्ब आहेत.

अणु बॉम्बच्या चाचण्या या हवेत, पाण्यात, जमिनीखाली घेतल्या गेल्या. हे सर्व अणु स्फोट वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळे किरणोत्सारी मुलद्रव्य वापरुन केले होते. यामध्ये तीन स्फोट हे अत्यंत शक्तीशाली होते ज्याची नोंद घेतलीच पाहिजे. 

अमेरिकेने १ मार्च १९५४ ला castle bravo नावाने एक अणु बॉम्ब फोडला. या चाचणीची क्षमता होती 15 MT ( Mega Tonne ). म्हणजेच हिरोशिमावर पडलेल्या अणु बॉम्ब पेक्षा castle bravo हा बॉम्ब तब्बल एक हजार पटीने शक्तीशाली होता. हा स्फोटामुळे निर्माण झालेला प्रकाश हा तब्बल 400 किमी अंतरावरुन बघता आला. तर या स्फोटामुळे तयार झालेला ढग ज्याला mushroom cloud ( अळंबीच्या आकारचा ढग ) म्हणतात, त्याने 40 किमी पर्यंत उंची गाठली होती. 

अमेरिकेच्या अणु बॉम्बच्या चाचण्यांना सोव्हिएत रशियाही उत्तर देत होता.  
रशियाने ३० ऑक्टोबर १९६१ ला Tsar bomb या अणु बॉम्बची चाचणी घेतली. ही आत्तापर्यंत सर्वात शक्तीशाली अणु बॉम्बची चाचणी समजली जाते. या अणु बॉम्बची क्षमता होती तब्बल 50 MT. म्हणजेच हिरोशिमाच्या तब्ब्ल 3 हजार 300 पट जास्त. या शक्तीशाली अणु स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा एक हजार किलोमीटर अंतरावरुन सहज बघता आला. 270 किमी अंतरावरुन या स्फोटाचे निरिक्षण करणाऱ्या लोकांच्या डोळ्यापुढे गॉगल असतांनाही काही सेकंद अंधारी आली होती म्हणे. या स्फोटाच्या ध्वनी लहरी या 700 किमीपर्यंत जाणवल्या. एवढंच नाही या स्फोटामुळे तयार झालेल्या ढगाने तब्बल 62 किमी एवढी उंची गाठली होती. हा ढगच विविध ठिकाणी 40 ते 95 किमी एवढा रुंद होता. या अणु स्फोटाच्या हादऱ्यामुळे 5 रिश्टर स्केल एवढ्या भुकंपाची नोंद झाली. 

तर 24 डिसेंबर 1962 ला रशियाने Test 219 या सांकेतिक नावाने 24.2 MT क्षमतेच्या अणु बॉम्बची चाचणी घेतली.

थोडक्यात काय अणु बॉम्ब हे एक भयानक अस्त्र आहे. अणु बॉम्बवरचे संशोधन, त्याच्या चाचण्या, या चाचण्या घेण्यासाठी घेतलेले श्रम, चाचण्यांनतर आलेले अनुभव, अणु बॉम्ब तयार करणे, त्याची निगा राखणे, सेवेतून बाद करणे, अणु बॉम्ब टाकण्यासाठी वेगवेगळी माध्यमे, या सर्वांवर झालेला - होत असलेला खर्च अफाट आहे....... अणु बॉम्ब हा एक स्वतंत्र, कुतुहल चाळवणारा, मन सुन्न करणारा, चिड आणणारा विषय आहे. 

अणु बॉम्ब या विषयांवर पुर्णविराम देतांना एक माहिती.....असं समजलं जातं की दुसऱ्या महायुद्धात जेवढी एकुण एक स्फोटकं वापरली गेली ( अणु बॉम्ब सकट ) त्यांची एकुण क्षमता होती 5 MT. सध्या तर एका क्षेपणास्त्रात एकाच वेळी ( लहान आकाराचे ) 4-5 अणु बॉम्ब टाकण्याची क्षमता असते. ( multiple independent reentry vehicles - MIRV ) ज्याची क्षमता ही 5 MT पेक्षा जास्त आहे. काही अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या अशा आहेत की ज्यामध्ये २४ एक क्षेपणास्त्र सामावु शकतात. तेव्हा एका अण्वस्त्रधारी पाणबुडीमध्ये जग नष्ट करण्याची क्षमता आहे. असो...

२..अपघाताने, युद्धामध्ये, खाणकामानिमित्ताने, दारुगोळा साठवण्याच्या निमित्ताने, इतर रसायने साठवण्याच्या निमित्ताने ( अणु स्फोटा व्यतिरिक्त ) मोठे विस्फोट झाल्याच्या घटना अनेक आहेत. यापैकी काही प्रमुख घटना पुढीलप्रमाणे...

Wanggongchang चा स्फोट - 30 मे 1626 ला बिजिंग शहारागत असलेल्या लष्करी दारुगोळ्याच्या साठ्याला आग लागून हा स्फोट झाला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की तत्कालिन नोंदीनुसार 20 हजार पेक्षा जास्त नागरिक या स्फोटात मृत्युमुखी पडले. अभ्यासकांच्या मतानुसार हा स्फोटाची तीव्रता 10 kT एवढी होती, म्हणजेच हिरोशिमा इथल्या अणु बॉम्बपेक्षा जरा कमी. यामुळे झालेल्या उलथापालथीमध्ये तत्कालिन चीनवर राज्य करणारी मिंग घराण्याची सत्ता संपुष्टात आली हे विशेष. 

पहिल्या महायुद्धात इंग्लंड आणि जर्मनी यांच्यामध्ये झालेल्याा नाविक युद्धात ( Battle of Jutland ) जर्मनीच्या युद्धनौकेने केलेल्या हल्ल्यात इंग्लंडच्या एका युद्धनौकेवरील दारुगोळ्याचा स्फोट झाला, यामुळे आणखी दोन युद्धनौकांनामध्ये स्फोट झाले. यामध्ये एका तासात तब्बल 3000 पेक्षा जास्त नौसैनिक मारले गेले. 

पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये Messsines या खाण परिसरांत इंग्लड आणि जर्मन फौजा आमनेसामने तळ ठोकून लढत होत्या. 7 जुन 1917 ला या खाणीमध्ये 19 स्फोट घडवून आणत इंग्लडने जर्मनीचे कंबरडे मोडले होते. या स्फोटात जर्मनीचे तब्बल 10 हजार पेक्षा जास्त सैनिक मृत्युमुखी पडले होते. 

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीच्या अंमलाखाली असलेल्या सर्बियातील Smederevo शहरातील किल्ल्यात स्फोटकांचा साठा केला जात असे. 5 जुन 1941 ला या ठिकाणी  झालेल्या स्फोटामुळे अर्धे शहर उध्वस्त झाले होते आणि 2000 पेक्षा जास्त सैनिक - नागरीक मृत्युमुखी पडले होते. 

कॅनडात 6 डिसेंबर 1917 ला झालेल्या स्फोटाची तीव्रता ही 2.9 kT -  बैरुत स्फोटाएवढी होती. Halifax नावाच्या बंदरात फ्रान्स देशाच्या मालवाहू जहाजाची नॉर्वे देशाच्या प्रवासी बोटीशी टक्कर झाली. मालवाहू जहाजात असलेल्या ज्वलनशिल रसायनांचा स्फोट झाला. यामुळे झालेल्या स्फोटात 1900 पेक्षा जास्त लोकं मृत्युमुखी पडले होते तर 9000 पेक्षा जास्त जखमी झाले होते. 

मुंबई व्हीक्टोरीया डॉकमधील स्फोट. ( नौदल गोदीमधील स्फोट ) - 14 एप्रिल 1944 ला इंग्लंड नौदलाच्या SS Fort Stikine या मालवाहू जहाजात असलेल्या 1400 टन दारुगोळ्याचा स्फोट झाला. या स्फोटात एक हजार पेक्षा नौसेनिक, कामगार, सर्वसामान्य नागरीक ठार झाले, कित्येक हजार जखमी झाले. कित्येक हजार घरांचे नुकसान झाले. मुंबई बंदर हे जवळपास नव्याने उभारावं लागलं. या स्फोटाचा आवाज म्हणे 80 किमी दुरपर्यंत ऐकायला गेला होता. 

सोव्हिएत रशियाची अमेरिकेशी चांद्रस्पर्धा 1960 च्या दशकांत सुरु होती. 3 जुलै 1969 ला म्हणजे अपोलो 11 मोहिम सुरु होण्याच्या काही दिवस आधी रशिया N 1 या अत्यंत शक्तीशाली रॉकेटद्वारे चंद्राकडे अपोलो सारखे यान पाठवण्याच्या प्रयत्नात होती. रात्री 11.18 मिनीटांनी N 1 रॉकेटने उड्डाण करताच त्याचा स्फोट झाला. 2300 टन वजन असलेले इंधन या रॉकेटमध्ये होते. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की 35 किमी दूर अंतरापर्यंत याचा प्रकाश सहज बघता आला. यामुळे प्रक्षेपण स्थळ पुर्णपणे नष्ट झालं. 

गेल्या 70 एक वर्षात आधुनिक तंत्रज्ञानामुळे जलवाहतुकीकरता समुद्रात, नदीत तसंच खाण कामाकरता, विविध प्रकल्पांकरता कितीतरी मोठे असे नियंत्रीत स्फोट जगभरात आत्तापर्यंत करण्यात आले आहेत. अर्थात हे सर्व स्फोट नियंत्रित असल्यानं त्याने मनुष्यहानी किंवा आर्थिक नुकसान झाले नाही. 

3.. नैसर्गिक स्फोट - 

ज्वालामुखीचे स्फोट हे पृथ्वीवर झालेले सर्वाधिक क्षमेतेचे स्फोट म्हणायला हवेत. अख्खे खंड - प्रदेश - भुभाग तयार होण्यास किंवा नष्ट होण्यास ज्वालामुखीचे स्फोट कारणीभूत ठरले आहेत. अणु बॉम्ब क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त पट क्षमता - ताकद ही या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये होती. 

भूकंपामध्येही अणु बॉम्बच्या स्फोटाच्या कितीतरी पट ताकद आहे, विध्वंसक क्षमता आहे. भुकंपामुळे नवीन प्रदेश तयार होण्यास, नष्ट होण्यास हातभार लागला आहे. भुकंपामुळे प्रस्तर रचना वरखाली होत असल्याने ज्वालामुखी, त्सुनामी तयार झाले आहेत. 

भुकंप, ज्वालामुखी या नैसर्गिक घटना गेली लाखो - कोट्यावधी वर्षे सातत्याने पृथ्वीवर सुरु आहेत. 

अशनी आघात - अशनी आघातामुळे सुद्धा प्रचंड, संहारक स्फोट पृथ्वीवर झाले आहेत. सहा कोटी वर्षापूर्वी अशनी आघातमुळेच डायनॉसोरचे साम्राज्य संपुष्टात आले आहे. पृथ्वी 4.5 अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली असावी असा अंदाज आहे. आत्तापर्यंत पृथ्वीने कितीतरी विविध क्षमतेचे अशनीचे आघात झेलले आहेत. अनेकांची संहारक क्षमता भयंकर होती. आपल्याा सर्वांच्या परिचयाचे लोणार सरोवर अशाच एका अशनी आघातामधून सुमारे 47 हजार ते 5 लाख 70 हजार वर्षा दरम्यान तयार झाले असावे असा अंदाज आहेत. या आघातामुळे निर्माण झालेल्या स्फोटाची क्षमता ही काही kT होती असा अंदाज आहे. जून 1908 ला रशियातील Tunguska इथे उल्कापात झाला. म्हणजे 100 मीटर परिघ असलेली महाकाय उल्का Tunguska च्या आकाशात जमिनीपासून 5 ते 10 किमी उंचीवर नष्ट झाली. पण यामुळे निर्माण झालेल्या उष्णता आणि ध्वनी लहरीमुळे 2150 चौरस किमी आकाराचे जंगल नष्ट झाले. या स्फोटाची तीव्रता ही 20 MT असल्याची मानली जाते. हा स्फोट 200 किमी अंतरापर्यंत स्पष्ट ऐकायला गेला. एवढंच नव्हे तर या परिसरांत 5 रिश्टर स्केल भुकंपाची नोंद झाली. 

असे अनेक नैसर्गिक स्फोट आपण पृथ्वीवरचे अनुभवले, बघितले, भूतकाळाचा अभ्यास केल्यावर माहित झाले आहेत. यामुळे जीवसृष्टी नष्ट होण्यास, नव्याने जीव तयार होण्यास मदत झाली आहे. 

पण या पेक्षा शक्तीशाली स्फोट या अनंत विश्वात सातत्याने सुरु असतात. आपल्या सुर्यावरच महाकाय स्फोट हे सातत्याने सुरु असतात. अगदी दोन-चार पृथ्वी सहज मावेल एवढ्या आकाराचे स्फोट सुर्यावर सातत्याने सुरु आहेत. याचे परिणाम आपल्या पृथ्वीच्या वातावरण कमी जास्त प्रमाणात होत असतात.

जुलै 1994 मध्ये शुमेकर लेवी नावाचा धुमकेतू तुकड्यांच्या स्वरुपात गुरु ग्रहावर धडकला. यामुळे गुरु ग्रहावर मोठाले स्फोट झाले, अर्थात हे स्फोट हे महाकाय गुरु ग्रहाने सहज पचवले असले तरी या स्फोटाची क्षमता ही तब्बल 60 लाख MT एवढी समजली गेली.  

विश्वात ताऱ्यांची निर्मिती, आंतर बदलाने तारे नष्ट होणे, ताऱ्यांचे स्फोट, ताऱ्यांची टक्कर, कृष्ण विवर एकमेकांच्या प्रभावाखाली येणे यांमुळे महाकाय ऊर्जा प्रक्षेपित केली जात असते, फेकली जात असते. 

साधारण एक हजार वर्षापूर्वी म्हणजे साधारण 1054 या वर्षी एका ताऱ्याच्या 
स्फोटाची नोंद जगभरातील खगोल अभ्यासकांनी करुन ठेवली आहे. या ताऱ्याचा स्फोट एवढा मोठा होता त्याचा प्रकाश पौर्णिमेच्या चंद्रापेक्षा काहीसा कमी होता पण हा  प्रखर प्रकाश सुमारे 2 वर्षे दिसत होता. हा तारा आता SN1054 या नावाने ओळखला जातो आणि त्याचे राहिलेला अवशेष हे आता Crab Nebula या नावाने प्रसिद्ध आहेत. आकाशात खगोलप्रेमींनी सर्वात जास्त अभ्यासलेली गोष्ट म्हणूनही Crab Nebula प्रसिद्ध आहे. सांगायचा हेतू हा की Crab Nebula हा पृथ्वीपासून तब्बल 6,500 प्रकाशवर्ष दुर आहे. थोडक्यात स्फोटामुळे तयार झालेला प्रकाश हा 6500 वर्षांनंतर 1054 ला पृथ्वीपर्यंत पोहचला आणि हा प्रकाश दिसला तोही स्पष्टपणे. म्हणजे बघा किती शक्तीशाली स्फोट होता तो. 

अनेक स्फोट हे फक्त दुर्बिणीतून बघितल्यावर जाणवतात, कळतात, झाल्याचं समजून आलं आहे. 

तेव्हा हजारो आकाशगंगा, अब्जावधी शब्द कमी पडेल एवढे तारे - धुमकेतू, कृष्णविविर असलेलं हे अनंत असं विश्व अशा महाप्रचंड स्फोटांनी खचाखच भरलेलं आहे. बैरुत, हिरोशिमा, नागासाकिचा स्फोट हे त्यापुढे काहीच नाही.

Wednesday, July 29, 2020

'राफेल' ने किती फरक पडेल ?





सध्या राफेलचा गाजावजा सुरु आहे. 'राफेल' ने किती फरक पडेल ? याबाबतील लिहिण्यापूर्वी काही गोष्टींवर मत व्यक्त करतो. मग मुळ मुद्द्याकडे जाऊ.

1997 ला सुखोई -30 हे लढाऊ विमान भारतीय वायु दलांत दाखल झाले. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनतर राफेल च्या रुपाने परदेशातील तंत्रज्ञान असलेले नवे लढाऊ विमान दाखल झाले हे विशेष. खरं तर 2006 पासून देशाची गरज लक्षात घेता 126 लढाऊ विमानांची आवश्यकता होती. मात्र निविदा - चाचण्या - निवड करण्यात गेलेला वेळ यामुळे खर्च वाढला आणि शेवटी 126 नाही तर 36 लढाऊ विमानांवर प्रकरण थांबलं तेही राफेलची निवड केल्यावर. अखेर 2016ला करार झाला आणि पहिली पाच लढाऊ विमाने वायू दलाला मिळाली, 2021 च्या अखेरीपर्यंत सर्व 36 लढाऊ विमाने मिळणर आहेत. 

या राफेलबाबत तंत्रज्ञान हस्तांतराचा करार करत बसलो असतो तर प्रचंड वेळ लागला असता. कारण देशांत सध्या HAL या सरकारी कंपनीकडेच लढाऊ विमाने बनण्याचा अनुभव आहे, पण याचा वेगाने उत्पादन करण्याचा रेकॉर्ड खराब आहे. तेव्हा नव्या कंपनीला पायावर उभं रहायला मोठा वेळ लागला असता. म्हणुन ही लढाऊ विमाने तयार करुन भारताला सोपवली जाणार आहेत, यामुळे ही लढाऊ विमाने लगेच वापरायला मिळणार आहेत हे विशेष. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असं तंत्रज्ञान एवढ्या सहजासहजी कोणताही देश दुसऱ्या देशाला ( कितीही मित्रत्वाचे संबंध असले तरी ) द्यायला तयार होत नाही.   

2014 पर्यंत विमानांचा करार करण्याच धाडस युपीए सरकारने केलं नाही ते पंतप्रधान मोदी यांनी केलं. पण त्यापेक्षा एवढे आरोप होऊनही करार रद्द केला नाही हे अधोरेखित करण्यासारखे आहे. यामध्ये कोण खरं, कोण खोटं वगैरे हे स्वतंत्र विषय आहेत, प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात, त्याबद्दल आदर आहे. पण असेच आरोप जर 2014च्या आधी झाले असते तर करार अर्धवटच राहिला असता कारण अंगावर डाग लागू न देण्याची तशी मनोवृत्ती होती. 

हे सर्व लिहायचे कारण देशाची संरक्षण निकड लक्षात घेता अनेकदा संरक्षण करार होणे अत्यंत आवश्यक असतात, मात्र वादामुळे - आरोपांमुळे, भ्रष्टाचारामुळे अनेक करार मागे पडले आहेत, हे अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे आपलं संरक्षण दल काही बाबतीत शत्रु पक्षाच्या तुलनेत काहीसं कमकूवत असलेलं दिसून येतं. 

आता या 'राफेल' ने किती फरक पडेल ? या बाबतीत दोन पातळीवर विचार करावा असं माझं मत आहे. पहिली गुणवत्ता पातळी तर दुसरी संख्यात्मक.

गुणवत्ता - राफेल हे सध्या भारतीय वायू दलातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे यात शंकाच नाही.  याच्या तोडीस तोड लढाऊ विमान पाकिस्तानकडे नाही. तर चीनकडे Chengdu J -20 हे 5th Generation वर्गातील ( जगातील लढाऊ विमानांची सध्याची सर्वोत्तम श्रेणी ) स्टेल्थ लढाऊ विमान आहे जे राफेलच्या कितीतरी पावले पुढे आहे. 

राफेल हे एक multi-role combat aircraft आहे. म्हणजे हवाई क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची, दुसऱ्या लढाऊ विमानाशी लढण्याची, जमिनीवर हल्ला करण्याची, टेहळणी करण्याची, इतर विमानांना संरक्षण देण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. थोडक्यात राफेल हे सुखोई -30 एमकेआय प्रमाणे विविध भुमिका बजावू शकते. तुलनेत काहीशा मोठ्या आकाराच्या सुखोईला राफेलच्या रुपाने नवा साथीदार मिळाला आहे. 

संख्या -  आता राफेल समावेशामुळे संख्यात्मक पातळीवर किती फरक पडणार आहे तर त्याचे उत्तर आहे ' काहीच नाही '. कारण देशाची लढाऊ विमाने निवृत्त होण्याचा - बाद होण्याचा वेग हा नव्याने दाखल होणाऱ्या लढाऊ विमानांपेक्षा कितीतरी जास्त आहे. 

देशाची सामरिक गरज लक्षात घेता भारतीय वायु दलाकडे किमान 42 लढाऊ विमानांचे ताफे - Squadron असणे आवश्यक आहे, असं संरक्षण तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तानने एकाच वेळी आगळीक केली, त्यांच्याशी एकाच वेळी युद्ध करण्याची वेळ आली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी - दोन्ही बाजूंवर  लढण्यासाठी तेवढा लढाऊ विमानांचा ताफा असणे आवश्यक आहे. 

पण वस्तुस्थिती ही आहे की वायु दलाकडे तेवढा ताफा उपलब्ध नाहीये. मग सध्या किती लढाऊ विमानांचे ताफे उपलब्ध आहेत तर हा आकडा 30 ते 32 असावा असा अंदाज आहे. 36 राफेल विमाने दाखल झाल्यावर राफेलचे एकुण 2 Squadron तयार होतील. 

एका Squadron मध्ये साधारण 16 - 20 लढाऊ विमाने असतात. लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेनुसार ही संख्या कमी जास्त  असते.      

सध्या भारतीय वायु दलाकडे 272 सुखोई 30 ( एम के आय), 100 पेक्षा जास्त जग्वार, 60 पेक्षा जास्त मिग -29, 50 पेक्ष जास्त मिग -21 ( Bison ) , 40 पेक्षा जास्त मिराज -2000 , अंदाजे 16 तेजस अशी एकुण 550 च्या घरांत लढाऊ विमाने आहेत. ( खरा आकडा कधीच सांगितला जात नाही ).

यापैकी पुढील 6 एक वर्षात मिग-21 तर पुढील 10-12 वर्षात जग्वार ही लढाऊ विमाने टप्प्या टप्प्याने सेवेतून निवृत्त केली जाणार आहेत. म्हणजेच तब्बल 150 लढाऊ विमाने ही 2032-34 पर्यंत कमी होणार हे नक्की.  

सध्या स्वदेशी बनावटीचं तेजस लढाऊ विमानाचे उत्पादन जोरात सुरु आहे. त्याच्या नव्या आवृत्तीचे उत्पादनही लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अशी एकुण 120 तेजस भारतीय वायु दलाला हवी आहेत. Hindustan Aeronautics Limited हे तेजसचे उत्पादन करते. वर्षाला 12 पेक्षा जास्त तेजस लढाऊ विमाने तयार करण्याची HAL ची क्षमता आहे. उत्पादनाचा वेग जरी HAL ने वाढवला तरी HAL चा आत्तापर्यंत इतिहास लक्षात घेता तेजसची मागणी पुर्ण करायला 8 ते 10 वर्षे सहज लागू शकतात.  

संरक्षण विभागाने नुकतंच 12 सुखोई - 30 MKI आणि 21 मिग -29 विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष करार होत हे पुर्णत्वास जाण्यास  4 ते 6 वर्षे सहज लागतील असा अंदाज आहे. 

5th Generation ची दोन लढाऊ विमाने बनवण्याचे भारताचे प्रयत्न सध्या कागदावर आहेत. म्हणजेच HAL मार्फत स्वबळावर Advanced Medium Combat Aircraft चा आराखडा बनण्याचे काम सध्या सुरु आहे. तर रशियाच्या मदतीने Fifth Generation Fighter Aircraft बनवण्याबाबत कागदावर चर्चा सुरु आहे. आता या दोन विमानांचा आराखडा नक्की होणं, त्याला मान्यता मिळणं, याबाबात करार होणं, प्रत्यक्ष लढाऊ विमान तयार होणं आणि मग चाचण्यांचे सोपस्कार पुर्ण होत उत्पादन व्हायला सुरुवात होणं यामध्ये कितीही वेग घेतला तरी 10 वर्षे सहज निघून जाणार आहेत. आणि त्यापुढे अशा विमानांची मागणी पुर्ण करेपर्यंत आणखी 8 वर्ष लागतील, 10 लागतील 15 लागतील का नेमकी किती लागतील हे आत्ता सांगणे मुर्खपणाचे ठरेल. 

थोडक्यात वरील सर्व बेरीज - वजाबाकी लक्षात घेतली तर पुढील 10 -15 वर्षात भारतीय वायु दलांच्या लढाऊ विमानांच्या संख्येत फारसा फरक पडणार नाहीये. 

त्यामुळे राफेलच्या तातडीच्या समावेशाने भारतीय वायु दलाची सामरिक गरज पुर्णत्वास जात नाहीये हे नक्की. 

ताज्या दमाचे, जगातील एक अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' दाखल झाल्यानं वायु दलाला एक उभारी मिळाली आहे एवढंच समाधान सध्या मानायला पाहिजे असं मला वाटतं. 

जाता जाता शेवटचं. लढाऊ विमान कोणतंही असो पायलट हा संबंधित लढाऊ विमान हाताळण्यास किती सक्षम आहे त्यावर लढाऊ विमानाचे यश अवलंबून असते. बघा ना तंत्रज्ञानाच्या बाबातीत कितीतरी वरचढ असलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 ला तुलनेत काहीसे जुने तंत्रज्ञान असलेल्या आपल्या मिग-21 ने धडा शिकवलाचा ना. 

तेव्हा आपले राफेल हे चीनवर भारी पडू शकते, आपले पायलट तेवढे सक्षम आहेत यात शंका नाही. 





















  

Sunday, July 26, 2020

26 जुलै 2005 च्या पावसाच्या आठवणी......


26 जुलै म्हटलं की सर्वांना मुंबईतील ढगफुटी, मुंबई उपनगर ते पालघर - डहाणू - कसारा -कर्जत -पनवेल पट्ट्यात ढगफुटीने झालेला मुसळधार पाऊस हे सर्व आठवतं. पण त्याच्या दोन दिवस आधी कोकणात बक्कळ पाऊस झाला होता. 24-25 जुलैला. यामुळे कोकणात विशेषतः रायगड -रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, पूराचा फटका बसला होता. तेव्हा मुंबई आणि परिसराएवढे कोकणाचेही नुकसान झाले होते.

2005 ला मी ई टीव्ही मध्ये होतो. 26 जुलैला तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी एका टर्मिनलचे उद्धाटन होणार होते , साधारण दुपारी एक किंवा दोन चा कार्यक्रम होता. मी दहा वाजता डोंबिवली रेल्वे स्टेशन वर आलो. अर्थात पाऊस बऱ्यापैकी त्यावेळी पडत होता. जवळपास पाऊण तासानंतर दादर सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मात्र पावसाचे स्वरूप बघता अनेकांनी परत घरी जाणे पसंत केलं, त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी फारशी नव्हती.

लोकल कशीबशी तब्बल पाऊण तासाने ठाण्याला पोचली आणि तेथे ऐकलेली अनाउन्समेंट ऐकून धक्काच बसला. ठाण्याच्या पुढे एकही लोकल कल्याणच्या दिशेने जाणार नसल्याचं रेल्वेने जाहीर केलं म्हणजेच ठाण्याला पोचता पोचता मागे केवढा पाऊस झाला असावा याची आपण कल्पना करू शकता.

तोपर्यंत आमच्या लोकलने वेग घेतला होता आणि मी मी साधारण तासाभरात दादरला पोचलो. माझी टीम ही भेट मला अंधेरीला भेटणार होती म्हणून मी पश्चिम रेल्वेची लोकल पकडली अंधेरीच्या दिशेने रवाना झालो. तोपर्यंत पाऊस दणादण कोसळत होता, भर दुपारी दाट अंधार झाला होता. तेवढ्यात आमचे बॉस सर राजेंद्र साठे सरांचा फोन आला " अमित कुठे आहेस  ? ", म्हटलं बांद्राला पोहोचत आहे,  ते म्हणाले की बांद्र्याला थांब, तुला फोन करतो. 

मी ताबडतोब बांद्राला उतरलो आणि सरांच्या फोनची वाट बघत होतो. 

तेवढ्यात सरांचा फोन आला, सर म्हणाले ताबडतोब ऑफिसला परत ये, तुला कोकणात जायचे आहे. ई टीव्हीचे ऑफिस नरिमन पॉइंटला होते. तेव्हा ताबडतोब मी चर्चगेट कडे जाणारी जलद लोकल पकडली.

माहिमची खाडी पार करताना आजूबाजूला असलेले पाण्याचे रौद्र रूप बघता रेल्वे सेवा कधीही बंद पडणार अशी परिस्थिती होती. आणि चर्चगेटला उतरतांना लोकल सेवा बंद करत असल्याची घोषणा झालीच.

साधारण अडीच पर्यंत मी ऑफिसला पोहोचलो , तोपर्यंत माझा सहकारी श्रीरंग खरे तिथे हजर होता. आम्हाला साठे सरांनी बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या की दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याने तिकडे जाऊन कवरेज करायचे आहे, लगेच निघा, लवकरात लवकर पोहचा. वाटेतल्या मुंबईतल्या कव्हरेजमध्ये वेळ दवडू नका, बाकीच्या टीम आहेत.

तेव्हाचे आमचे ऑफिस ॲडमिन शंकरन जे आता टीव्ही नाईन ला आहेत त्यांनी प्रत्येकी पाच पाच हजार रुपये दिले आणि आम्ही दोघे जण टीम घेते दोन ओम्नी गाडीने दादर मार्गे निघालो.

मग माटुंगा सर्कलच्या इथे येऊन नाईलाजाने थांबावं लागलं कारण माटुंगा सायन दरम्यान प्रचंड पाणी रस्त्यावर भरलं होतं. खरंतर रस्त्यावरून पाण्याचे वेगवान असे अक्षरशः लोट वाहत होते. अवघ्या काही मिनिटात सायन दिशेला ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या अनेक गाड्या पाण्याखाली जात असताना स्पष्टपणे आम्ही बघत होतो. अर्थात हा नेहमी सारखा पाऊस नाही जरा जास्तच पाऊस पडतोय याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हा ढगफुटी हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता किंवा असं काही असेल याचा काहीच अंदाज आला नाही. मग आम्ही वडाळा मार्गे जाण्याचा निर्णय घेतला तिकडे आम्ही गाड्या वळवल्या तिथेही पुढे कमरेभर पाणी होतं. मग आम्ही पुन्हा आमच्या गाड्या फिरवल्या आणि पुन्हा आम्ही माटुंगासर्कलपाशी आलो. 

संध्याकाळी साधारण सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही तिकडेच होतो. पावसाचा जोर हा 6 नंतर खूप कमी झाला होता. हजारो लोक चालत आपल्या घरी निघाले होते. मोजके व्हिज्युअल्स घेतले कारण कॅमेरा बॅटरी पण वाचवायच्या होत्या.

आता पुढे काय करायचं असा आम्हाला प्रश्न पडला होता. मोबाईल नेटवर्क तर दुपारनंतर ठप्प झालं होतं. लँडलाईन फोन च्या ठिकाणी तोबा गर्दी होती. शेवटी रात्री माटुंगा - सायन परिसरात साचलेलं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याचं जाणवल्यावर आम्ही गुडघाभर पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

अर्थात तेव्हा आत्ताचा माटुंगा फ्लायओव्हर , सायन हॉस्पिटल समोरील फ्लायओव्हर काही झाले नव्हते. या सर्व मार्गावरून गाडी रेटत आम्ही कसेबसे सायन फ्लायओव्हरवर पोहचलो आणि आमची गाडी ट्राफिक जाम मध्ये अडकली. ब्रीजच्या खाली सुद्धा ट्रॅफिक जॅम होते, रस्त्यावर भरपूर पाणी होते.

एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते, आजूबाजूला अंधार होता, आम्ही तशाच ओल्याचिंब अंगाने रात्र ही गाडीमध्ये काढली आणि सकाळी सहाच्या सुमारास उजाडल्यावर आम्ही गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरला पाच पन्नास रुपये दिले आणि सांगितले की जेव्हा मार्ग मोकळा होईल तेव्हा तुम्ही ऑफिसला जावा. आता फोनही लागायला सुरुवात झाली होती.आम्ही कॅमेरा युनिट घेऊन पुढे निघालो आणि सायनचा ब्रीज असा उतरायला सुरुवात केली आणि समोरचे दृश्य बघून धक्काच बसला.

समोर अथांग समुद्र पसरला होता. 

सायन ब्रिज उतरल्यावर दोन्ही बाजू असलेला मैदानी परिसर पाण्याने भरला होता गाड्या - रिक्षा तरंगत होत्या. रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर वरून हजारो लोक ये-जा करत होती, तीसुद्धा कमरेपेक्षा जास्त पाण्यातून. कित्येक ट्रक या रस्त्यावर उभे होते आणि या ट्रकवर हजारो लोकांनी रात्र कशीबशी काढली होती. आम्ही तिथून चालायला सुरुवात केली ते थेट गोवंडी पर्यंत. रात्रभर झोप नाही, पाय तुटायची वेळ आली होती. आम्ही चालत आमचा सहकारी कॅमेरामन मणी पिल्ले यांच्या घरी साधारण 11 च्या सुमारास पोहचलो. त्याच्या घरी गरमागरम पोहे - चहा नाश्ता केला. अर्थात आम्हाला अचानक कोकण दौऱ्यावर पाठवलं असल्याने आम्ही एक्स्ट्रॉ कपडेसुद्धा बरोबर घेतले नव्हते. मणिने त्याच्या घरी असलेले टी शर्ट आणि हाफ पॅन्ट आमच्यासमोर टाकले, ज्याला जसं होतं तसे त्याने ते कपडे पटापट घातले आणि आम्ही श्रीरंग वगैरे सर्वजण नवी गाडी शोधायला बाहेर पडलो, कारण कोकणात पोहचायचे होते. 

पावसाच्या दणक्यामुळे बहुतेक सर्व दुकाने बंद होती, अखेर आम्हाला एक कॉलिस चालक भेटला, आमच्या बरोबर यायला तयार झाला. हे सर्व सोपस्कार करता करता तीन वाजले होते.

चारच्या सुमारास आम्ही पनवेल पार करत होतो आणि पावसाच्या धुमाकूळ मुळे उध्वस्त झालेला परिसर बघून आम्ही अक्षरशः हादरून गेलो होतो.

पनवेल पार केल्यावर वाटेत नदीवर असलेल्या ब्रिजच्या कठड्यांवर तर अक्षरशः हजारो झाडे अडकून पडली होती. असं वाटत होतं की आम्ही जंगलातून प्रवास करत आहोत.

पळस्पे फाट्याला पोहोचलो, तेथे असलेल्या वाहतुक चौकीतल्या पोलिसाला विचारले की कोकणातला रस्ता मोकळा आहे का ? तो म्हणाला रस्ता मोकळा आहे, काही अडचण नाही. पळस्पे फाट्याच्या परिसरात पाणी ओसरल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. आम्ही पोलिसाला विचारले की किती पाणी होते ? तर तो आम्हाला पोलिस चौकीत घेऊन गेला आणि लोखंडी कपाटाच्या वर त्याने पाण्याची रेषा दाखवली. तेवढं पाणी होतं आणि तो म्हणाला मी त्या कपाटावर बसून रात्र काढली.

पळस्पे फाटा सोडला आणि आम्ही महाडच्या दिशेने वेगाने निघालो. महामार्गावर फारशी अडचण आली नाही, कुठेही क्षणभर देखील थांबलो नाही. साधारण सातच्या सुमारास दासगाव गावाजवळ आलो. तीथे रस्त्याच्या उजव्या हाताला अनेक लोक काहीतरी जाळत असल्याचं आम्हाला दिसलं. जवळ जाऊन बघतो तर काय चक्क रस्त्याच्या बाजूला अंत्यसंस्कार सुरू होते आणि मागे वळून गावाकडे बघितलं तर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दासगावावर दरड कोसळली होती. हिरव्यागार डोंगराचा एक भाग खरवडून खाली आला होता आणि गावातील काही घरांना कवेत घेऊनच थांबला होता.

अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी कॅमेरा काढण्याचे धाडस झाले नाही, लोकांचा आक्रोश - दुःख बघून पुढे पाऊल टाकता आले नाही. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर गावात काय असेल ? त्यामुळे दासगावचे दृश्य दुरूनच कॅमेऱ्यात टिपत पुढे महाडच्या दिशेने रवाना झालो. 

आम्ही महाड गावात संध्याकाळी साधारण साडेसात आठच्या सुमारास पोचलो. महाड गांव जवळपास तीन दिवस पाण्याखाली होते. आम्ही पोचलो ( 27 जुलै ) तेव्हा काही तास आधी पुराचे पाणी ओसरले होते, गावातील लोक घरातून - दुकानातून चिखलगाळ बाहेर काढत होते. 

अख्खा गाव अंधारात होता. मग आम्ही महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जुलैला श्रीरंग खरे ने महाड गाव आणि परिसरात कव्हरेज करायचे ठेवले, तर मी दरड कोसळलेल्या जुई गावाकडे जायचे ठरवले.

छोटेखानी जुई गाव हे अर्धेअधिक दरडीखाली गेले होते. एव्हाना दरड कोसळून चार दिवस झाले होते,  एक पोकलँड मशीन गावात दरड दूर करण्याकरता पोहचलं होतं. 

गावाच्या सुरुवातीला एक शाळा होती. तिथे गावकऱ्यांनी आश्रय घेतला होता. शाळेतून हंबरडा फोडण्याचा आवाज येत होते. माझी शाळेत पाऊल टाकण्याची हिम्मतच झाली नाही. कॅमेरामनला म्हणालो तूच जा आणि शक्य तेवढे दुरून व्हिज्युअल्स घे.

त्यानंतर आम्ही गावात पोहोचलो. खरं तर गाव असं काही दिसतच नव्हतं. दगड - माती - चिखल याचे ढिगारे सगळीकडे दिसत होते. प्रचंड दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. 

रिमझिम पावसात शक्य होईल तसा आमचं कव्हरेज सुरू होतं. गावकऱ्यांकडून माहिती घेत होतो. पोकलँड मशीन एक ढिगारा अलगदपणे बाजूला काढत होतं, तेव्हा मृतदेहाचा अर्धा भाग या ढिगार्‍यातून बाहेर मशीनच्या त्या फावड्याबरोबर आला आणि ते दृश्य बघून आम्ही अक्षरशः तिथून धूम ठोकली.

तिथे उभे राहून आणखी कवरेज करणे निव्वळ अशक्य झालं होतं, तरीही कामाचा भाग म्हणून शक्य होईल तेवढ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया - शासकीय कर्मचारी किंवा पोलीस यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि पुन्हा वेगाने महाडला पोचलो. 

आमच्याकडे फीड अपलिंक करण्यासाठी कोणतेही साधन अर्थात नव्हते. मोबाईल तर अर्थात प्राथमिक अवस्थेत ला होता ज्यात फोटो काढण्याची पण सोय नव्हती.

तेव्हा आम्ही कव्हरेजची टेप घेऊन भोरला पोहचलो. तिथून टेप ही भोर हून पुण्याला जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हर कडे दिली आणि कंट्रोल रूम मध्ये त्याला द्यायला सांगितली. तिथून टेप मग पुणे ऑफिसला नेली जाणार होती.

अशा रीतीने पुढील तीन दिवस कव्हरेजची टेप पुण्याला पाठवत होतो. महाड, पोलादपूर आणि त्या परिसरातील पुराचं पावसाने केलेल्या नुकसानीचा कव्हरेज करत होतो. दरम्यान श्रीरंग खरे रत्नागिरीला रवाना झाला होता. तर पुण्याहून अभिजित कांबळे, तर कोल्हापूरहून दीपक शिंदे हे सहकारी महाडमध्ये भेटले.

अखेर महाड - पोलादपूर मधील काही कपड्यांची दुकाने सुरू झाल्यावर आम्ही आमच्या मापाचे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट विकत घेतल्या आणि उरलेले दोन दिवस तेथे काढले.

साधारण सहाव्या दिवशी मी , माझी टीम आणि श्रीरंग खरे आम्ही मुंबईला परतलो. येताना श्रीरंगने पनवेलला थांबून तिथली दुर्दशा कव्हर केली. 

या सर्व ठिकाणी फिरतांना पहिल्यापासून घरच्यांना वेळोवेळी कुठे जात असल्याची कल्पना देत होतो.  त्यामुळे घरच्यांचा जीव टांगणीला लावला नाही.

तोपर्यंत मुंबई कशी तीन दिवस पाण्यात बुडालेली होती , वाहतूक सर्व ठप्प होती हे सर्व टीव्हीवरून बघत होतो. मुंबई आणि परिसराला मदत करणे आवश्यक असले तरी ग्रामीण भागाकडे त्यातही कोकणातील गावांकडे खूपच दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे अनुभवायला मिळाले होते.

अर्थात मुंबईत ठिकठिकाणी भरलेलं पाणी, यामधून लोकांची होणारी पळापळ, सायन ते कुर्ला पाण्याखाली गेलेले रस्ता, परिसराला आलेले समुद्राचे स्वरूप, सायन पुलावर काढलेली रात्र, दरड कोसळलेल्या जुई गावाची अवस्था, लोकांचे भेदरलेले चेहरे, शाळांमधला अक्रोश, रस्त्याच्या बाजूला पाहिलेले अंत्यसंस्कार...... ही सगळी दृश्य याच काय पण पुढील जन्मीदेखील आठवतील एवढी मनावर कोरली गेली आहेत.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...