पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Thursday, November 11, 2010

ठाणे जिल्ह्यातील " बेकार " लोकप्रतिनिधी


" बेकार " म्हणजे काय ?

या ठिकाणी बेकार शब्दाची व्याख्या काय ?...  नोकरी नसलेला - नाही...    ,  सुशिक्षित पण नोकरी नाही -  तसंही नाही. ..  ,   तर कामे भरपूर असलेला पण काम करायची इच्छाच नसलेला किंवा काहीही काम करायचे नाही असं ठरवलेला, अशी ' बेकार ' या शब्दाची व्याख्या या लेखासाठी मला करायची आहे.  ठाणे जिल्यातील लोकप्रतिनिधींना कामे करायची इच्छाच नाही, थोडंस काम केल्यासारखं दाखवतात, कुठेतरी थोडंसं आंदोलनं करतात, त्याची प्रसिद्धीही चांगली करतात.  मात्र नंतर नागरिकांच्या समस्यांकडे चक्क पाठ फिरवतांना दिसतात. समस्या मात्र काही सोडवल्या जात नाहीत. 


मुंबईनंतर सर्वात जास्त लोकप्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात
2007 मध्ये राज्यातच नव्हे तर देशातील सर्व मतदारसंघांची लोकसंख्येच्या दृष्टीने पुर्नबांधणी करण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला तब्बल 24 आमदार आणि 4 खासदार लाभले. एवढया जास्त संख्येने लोकप्रतिनिधी असलेला ठाणे जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली, कुळगांव-बदलापूर-, अंबरनाथ, भिवंडी, वसई-विरार, उल्हासनगर, मीरा-भाईंदर काही भाग अशा मोठ्या  महानगरपालिका आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं ठाणे जिल्ह्यावर बारीक लक्ष असून ठाणे जिल्हा राज्यात सत्ता स्थापनेत महत्त्वाची भुमिका बजावू शकतो याचं चांगलं भान राजकारण्यांना आहे.  महानगरपालिका आणि नगरपरिषदा ताब्यात ठेवण्यासाठीही सर्व राजकीय फक्ष प्रयत्नशील असतात.

लोकप्रतिनिधींचा उपयोग काय ? प्रश्न अजुनही प्रलंबित       
सध्याची ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 81 लाखांपेक्षा जास्त आहे.  मात्र ठाणे जिल्ह्यातील समस्यांकडे एकही लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघतांना दिसत नाहीये. रेल्वे, रस्ते वाहतूक, बेकायदेशीर बांधकामे, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या, मोठ्या शैक्षणिक संस्थांचा अभाव आणि मुख्य म्हणजे लोडशेडिंग असे कुठलेकुठले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आधी बघू.

1.....रस्ते वाहतूक -  ठाणे जिल्ह्यातील नागरीकांचं आयुष्य हे ऑक्सीजनपेक्षा रेल्वेवर त्यापेक्षा लोकल सेवेवर सर्वात जास्त अवलंबून आहे असं म्हंटलं तर चुकीचे ठरणार नाही.  ठाणे-कल्याण-आसनगावं-बदलापूर तसंच बोरिवली- वसई-विरार ते डहाणूपर्यंत  यामार्गावरील लोकलची जरा तब्येच बिघडली( ओव्हरहेड वायर तूटली वगैरे....) तर त्याच फटका लाखो नागरिकांना बसतो. कारण मुंबई गाठण्यासाठी लोकलशिवाय दुसरा पर्यायचं नागरिकांकडे नाहीये.  तेव्हा बदलापूर-कल्याण-डोंबिवली-ठाणे असा काहीसा समांतर आवश्यक आहे. तर  विरारपासून बोरिवलीपर्यंत रस्ता असला तरी चांगली वेगवान बसवाहतूक किंवा चांगली सार्वजनिक सेवा  उपलब्ध नाहीये.  एकंदरितच मुंबई गाठण्यासाठी वेगवान सार्वजनिक बस वाहतूक सेवा ( बीआरटीएस सारखा प्रकल्प ) अत्यंत आवश्यक आहे. तसंच अत्यंत भिकार अशा रस्त्यांच्या अवस्थेचा मोठा फटका वाहतूकीला बसत असून पावसाळ्यात वाहतूक कोंडीला सर्वच ठिकाणी समोरे जावे लागते.

2.....जीवघेणा लोकल प्रवास -  कारगीलच्या युद्धात 527 जवान, अधिकारी शहिद झाले तर 1300 पेक्षा जास्त जखमी झाले. हा आकडा मुद्दाम सांगत आहे कारण दरवर्षी मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात 3000 पेक्षा जास्त जण ठार, मृत्युमखी पडत असतात, जखमी होत असतात.  एका माहितीच्या आधारे हा आकडा गेल्या 10 वर्षात तब्बल 20 हजार एवढा आहे.  ठाणे-कल्याण,  बोरीवली-विरार मार्गावर लोकलच्या गर्दीचा एकदा तरी अनुभव लोकप्रतिनिधींनी घेतला आहे  का ?

3.....पिण्याच्या पाण्याची समस्या -  मुंबईनंतर फक्त नवी मुंबईकडे स्वतःच्या मालकीचं धरण आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात भरपूर महानगरपालिका, नगरपरिषदा असल्या तरी एकाकडेही स्वतंत्र पाणी पूरवठ्याची व्यवस्था नाही.  वेगाने लोकसंख्या वाढत असलेल्या या जिल्ह्यात भविष्यात पाण्याची समस्या किती भीषण असणार आहे याची कल्पना लोकप्रतिनिधींना आहे का ?.

4.....बेकायदेशीर बांधकामे - 5 लाखांपेक्षा जास्त बेकायदेशीर तसंच अतिक्रमण केलेली बांधकामे ठाणे जिल्ह्यात आहेत अशी माहिती स्वतः राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दिली आहे. शहर बांधणीचं कुठलंही नियोजन ( ठाणे शहर वगळता ) ठाणे जिल्ह्यात दिसत नाही.  त्यामुळं जिल्ह्यातील शहरांना बकालपणा आलेला आहे, नागरी समस्यांमध्ये अशा बांधकामांमुळे भर पडत चालली आहे.

5.....प्रदुषण -  डोंबिवली प्रदुषणात नंबर दोनवर आहे, तर कल्याण, भिवंडी, मिरा-भाईंदर अशा शहरांमध्ये वाहनांच्या प्रदुषणाने कहर केला आहे. जरा  गाडीची काच खाली करुन लोकप्रतिनिधीने गर्दीतून प्रवास केला आहे का ? ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील प्रदुषणाने भयानक पातळी ओलांडली आहे. शिवडीसारखी वायू गळती दुर्घटना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहज होऊ शकते याची तपासणी कोणी केली आहे का ?

6.....सार्वजनिक रुग्णालय   -  ठाणे जिल्ह्यात एकही मोठं सार्वजनिक रुग्णालय नाहीये. खाजगी रुग्णालये अमाप आहेत पण ती सर्वसामान्यांच्या खर्चाच्या पलिकडे आहेत. कुठल्याही मोठ्या उपचारासाठी मग तो भीषण अपघात असो किंवा ह्रदय रोगावरील उपचार असोत  मुंबईतली केईएम, सायन, जेजे सारखी सार्वजनिक रुग्णालये गाठावी लागतात.  कल्याण, वसई, भिवंडी, बदलापूर, पालघरसारख्या मध्यवर्ती शहर , गावांत मोठं सुसज्ज सार्वजनिक रुग्णालय उभारलं गेलं तर त्याचा मोठा फायदा ठाणे जिल्ह्यातील सर्व कानाकोप-यातील नागरिकांना होईल. याचा विचार कधी कोणी केला आहे का ?  

7.....मेट्रो-मोनो रेल्वे प्रकल्प -  मुंबईमध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो तर चेंबूर-वडाळा-जेकब सर्कलवर मोनो रेल्वे उभारण्याचं काम सुरु आहे. तसंच मुंबईला उभ्या आडव्या जोडणा-या मेट्रो-मोनोचे मार्ग प्रस्तावित आहेत. मुंबईला वाढायला जागा नसल्याने सर्व लोंढा ठाणे जिल्ह्यामध्ये सरकत आहे. तेव्हा भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन आत्तापासून ठाणे जिल्ह्यात मेट्रो-मोनोचं काम का सुरु केलं जात नाही. लोकप्रतिनिधी यासाठी काय करत आहेत.


समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी कधी एकत्र आले आहेत का ?

प्रशासकीय यंत्रणेसमोर ( आएएस अधिकारी वगैरे...) , लोकसभा,विधानसभा-विधानपरिषदेत,  मंत्र्यांसमोर लोकप्रतिनिधी समस्या कशी मांडतात, दबाव गट कसा तयार करतात यावर समस्या सुटण्याचे यश अवलंबून असते. आता लोकसभेला दीड वर्ष तर विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं.  गेल्या दीड वर्षात ठाणे जिल्ह्यातील किती खासदारांनी, आमदारांनी लोकसभेत,विधानमंडळात समस्येसंदर्भात तोंड उघडलं, किती वेळा अधिका-यांबरोबर बैठका घेतल्या, ठाणे जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याची क्षमता असलेल्या एमएमआरडीएच्या किती बैठकांना हजेरी लावल्या? . ठाणे जिल्ह्यातील किंवा स्वतःच्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी किती आमदार पक्षभेद बाजूला सारुन एकत्र आले ?

असं सगळं प्रगतीपुस्तक बघितलं तर सन्माननीय एक दोन आमदार, खासदार  वगळता बाकी सर्वांची पाटी कोरी असल्याचं स्पष्ट होतं.  नको त्या प्रश्नांना, भलत्याचं गोष्टांनी मात्र हात घालण्याची वृत्ती लोकप्रतिनिधींची दिसून येते. कल्याणमध्ये विमानतळ व्हावं यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीन खासदार कधी नव्हे तर एकत्र आले आणि  दिल्लीत मंत्र्यांची भेट घेतली. एवढ्या समस्या असतांना त्या बाजूला सारुन विमानतळाचा प्रश्न मांडणं महत्त्वाचा आहे का, त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे का?  


वर लिहिलेल्या सर्व समस्या काही भागापूरत्या किंवा काही मतदारसंघापूरत्य़ा मार्यादित नाहीयेत. तर त्या सगळीकडे आहेत.  निदान परिसरातील आमदार, खासदार एकत्र आले, दबाव गट तयार केला, चांगला पाठपूरवठा केला, वेळप्रसंगी पक्षभेद विसरुन आंदोलने केली तरीही या समस्या सुटू शकतात.


प्रश्न एवढाच आहे की हे सगळं कधी होणार, आपल्या समस्या कधी सुटणार?