पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Thursday, April 9, 2015

निमित्त Scorpene पाणबुडीचे.....तब्बल चार वर्षाच्या विलंबाने 6 एप्रिलला फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेली scorpene वर्गातील पहिली पाणबुडी माझगावच्या गोदीतून बाहेर पडली. यासाठी संरक्षणमंत्री , नौदलप्रमुख, नौदल अधिकारी, माझगावचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पाणबुडीचे जलावतरण सप्टेंबर महिन्यात होत चाचण्या सुरु होणार असून पुढील वर्षी ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे. 

खरं तर गोदीतून एखादी युद्धनौका किंवा पाणबुडी बाहेर काढणे याचा कधीच सोहळा केला जात नाही. त्या क्षणाचे महत्व एवढेच असते की युद्धनौका किंवा पाणबुडी बांधण्याची जागा ही पुढच्या बांधकामासाठी उपलब्ध होते. मात्र मुद्दाम या कार्यक्रमाचा एक मोठा सोहळा करत एक संदेश देण्याचा प्रयत्न संरक्षण दलाने केला.

1..गेले अनेक दिवस पाणबुडीबद्दल विविध अपघातांच्या मालिकेमुळे एक नकारात्मक वातावरण तयार झाले होते ते निवळण्याचा प्रयत्न संरक्षण दलाने - नौदलाने केला.

2..Standard Operation Procedure म्हणजेच SOPकड़े झालेले दुर्लक्ष हेच नौदलातील अपघातांचे मुख्य कारण होते हे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता हे SOP अतिशय कटाक्षाने पाळण्यावर भर असेल हे ठासुन सांगितले.

3..सरकारी मालकीच्या युद्धनौकांची बांधणी करणा-या गोदींना पुढील 3 वर्षात उत्पादन दुप्पट करण्यास सांगितले. म्हणजेच आता भारतात युद्धनौका बांधणीचा कार्यक्रम वेगाने जाईल असा संदेश जगामध्ये दिला. 

4..हा वेग गाठण्यासाठी प्रशिक्षित कर्मचा-यांचा मोठा ताफा गोदीला लागणार आहे. या पाणबुडीच्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विद्यापीठात तसा सुसंगत कोर्स सुरु करण्याच्या सुचना केल्या.

5..या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय नौदलाची ताकद , क्षमता 2022 पर्यन्त पूर्ण वाढली असेल असेही जाहिर केले. Blue Water Navy म्हणजेच समुद्रात जास्तीत जास्त वेळ रहाण्याची, कुठेही मोहीम पार पाडण्याची क्षमता 2022 ला प्राप्त झाली असेल.

6..सर्वात महत्वाचे म्हणजे 1994 ला याच गोदीतून HWD वर्गातील शेवटची पाणबुडी तयार झाली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी पहिली पाणबुडी ती सुद्धा याच गोदीत तयार झाली आहे. त्यामुळे माझगाव गोदीत काम करणा-या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ही एक अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. म्हणूनच या सोहळ्याला गोदीत तर एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

भारतीय उपखंडाच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र. जगातील फार मोठी तेलाची आणि इतर मालवाहतुक याच भागातून होते. आणि याच तीन महासागरच्या किना-यावर चीनने आपले बस्तान बसावायला सुरुवात केली आहे.

या अतिप्रचंड महासागरात वर्चस्व रहावे म्हणून
भारताने विमानवाहु युद्धनौका बांधायला सुरुवात केली आहे, विविध युद्धनौकांची बांधणी वेगाने सुरु आहे, अणु पाणबुडीचे बांधकाम जोरात सुरु आहे. मात्र पारंपारिक ऊर्जेवर चालणा-या Scorpene सारख्या पाणबुड्या किमान 18 ते 22 या संख्येने आवश्यक आहेत. सध्या भारताकडे डिझेलवर चालणा-या पाणबुड्या 13 असून त्यापैकी जेमतेम 6 ते 8 प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यामुळेच पहिली Scorpene पाणबुडी तयार होणे ही नौदलाला दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यातच आणखी सहा पाणबुड्या बांधण्याची order लवकरच दिली जाणार आहे.

तेव्हा पाण्याखालील अमोघ अस्त्र - शस्त्र असलेल्या या पाणबुडीच्या बळकटीकरणाकडे उशीरा का होईना
आपण पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आहे हे नक्की.