शिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर
तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात, माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड, डोळ्याचे पारणे फिटवणारे आहे. तापोळा कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे. एखाद्या महासागराएवढी व्याप्ती, निळं पाणी, प्रदुषण मुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचं वर्णन करता येईल.
तापोळ्याला जाणार रस्ता.....
गर्द झाडीमुळे महाबळेश्वरच्या उंचीपासून खाली उतरत असतांनाही थंडी वाजत रहाते. साधारण सात किलोमीटरनंतर गर्द झाडी संपते आणि खोल द-या-डोंगर ह्यांचे दर्शन होते. तिथं एक चहाची टपरी आहे. थंड वातावरणात चहा पिण्यासाठी थांबायचे, हे मात्र निमित्त. कारण तिथून दिसणा-या हिरव्या रंगाच्या छटा बघण्याची संधी सोडायची नाही. फक्त महाबळेश्वरच नाही तर आजुबाजुचा परिसर कसा हिरवागार आहे याचा प्रत्यय इथे येतो. मनोसोक्त फोटो काढायचे आणि पुढे निघायचे. एव्हाना गुळगुळीत असलेला रस्त्याची तब्येत बिघडलेली असते. खाचखळग्यांमधुन कसरत करत, मध्येच स्ट्रॉबेरीची शेतं बघत पुढे जात असतांना कोयनेचे बॅकवॉटर -शिवसागर जलाशय दिसायला लागतो. शिवसागर जलाशयाच्या सुंदर दृश्यामुळे पुन्हा एकदा गाडी थांबवत फोटो काढण्याचा मोह टाळता येत नाही. वाटेत लागणारी छोटी गावे पार करत तापोळ्यात कधी पोहचतो ते कळतंही नाही.
अथांग जलाशयाच्या काठावरचे तापोळा
अफाट जलाशय आणि पर्यंटन स्थळे
तापोळ्यात दोन बोट क्लब आहेत. दोन्ही क्लबकडे सारख्याच सुविधा असुन दरही सारखेच आहेत. कुठल्याही एका बोट क्लबकडे जायचे आणि जलाशयाच्या तीरावरचे पर्यंटन स्थळ ठरवून, आपल्या ग्रुपमधील सदस्य संख्या लक्षात घेत आणि मुख्य म्हणजे टूरचे दर बघत प्रवास निश्चित करायचा. मोटर बोट ( 12 जण प्रवास करु शकतात - वेग चांगला ), स्पीड बोट ( चार प्रवासी - वेग अधिक ), स्कुटर बोट( एक प्रवासी- वेग सर्वात जास्त ) .
शिवसागर दर्शन - कुठलीही बोट घेतली तरी ह्याची फेरी 45 मिनीटांत संपते. साधारण सहा किलोमीटरच्या फेरीमध्ये तापोळ्यासह काठाने जाता जाता जलाशयाच्या मध्यभागी नेत अथांग जलाशयाचे दर्शन घडवले जाते.
दत्त मंदिर - 20 किलोमीटरची ही सफर अडीच तासांत संपते. या ठिकाणी जातांना त्रिवेणी संगम पार करत काठावरच्या विनायक नगर नावाच्या एका गावाच्या ठिकाणी आपण पोहचतो. या ठिकाणी कोण्या एका भक्ताने छोटेखानी दत्त मंदिराची स्थापना केलीये. भक्तांसाठी मठंही उभारला असल्याने दत्त भक्तांची इथे गर्दी असते. मात्र हे मंदिर प्रत्यक्षात जलाशयाच्या काठापासून थोडे आत आहे. या स्पॉटवर उतरल्यावर आधी दिसते ते शिवमंदिर. थोडसे भूयारात असलेल्या मंदिराची वेगळीच अनोखी रचना आहे. पोटपुजेसाठी वडापावची टपरीही आहे. शांत परिसर आणि अफाट जलाशयाचं दृश्य बघतांना वेळ कसा जातो ते कळत नाही. सातारा- कास पठार- बामणोली ते विनायक नगर असा रस्ता आहे. त्यामुळे इथुन साताराही गाठता येते. विनायक नगर गावापासून धरणाच्या भिंतीपर्यंत कच्चा रस्ता जातो. कोयना धरणाच्या निरिक्षणासाठी हा बांधण्यात आला आहे. या मार्गावरही काही गावे आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटतो तो याच गावांचा.
कोयना अभयारण्य - 40 किलोमीटर वर असलेल्या कोयना अभयारण्याची सफर पाच तासांत पूर्ण होते. त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, वासोटा स्पॉट पार करत उजवीकडे असलेल्या सह्याद्रीच्या जंगलातील ही सफर म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. हाच परिसर आता राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्य्र प्रकल्प या नावाने जाहिर झाला आहे.
कास पठार -
तापोळ्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर जलाशयाच्या डावीकडे असलेला डोंगर म्हणजे महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर - प्रसिद्ध कास पठार. त्याच्या पायथ्याशी आणि जलाशयाच्या काठावर बामणोली गावातून त्या ठिकाणी जाता येईल. पण तिथे जाण्याचे दिवस म्हणजे गौरी-गणपती आणि ऑक्टोबर हिट सुरु होण्याचा मधला काळ . कारण याच दिवसांत या पठारावर अप्रतिम असा फुलोरा फुलतो. तसंच साता-याहून कास पठार पार करत बामणोलीमधून लाँच करत वासोटा किल्ल्याकडे गिर्यारोहक जातात.
मात्र यापैकी काहीही न बघणारेही महाभाग असतात. ते फक्त वेगवान स्कुटर बोटने जलाशयामध्ये मनोसोक्त चक्कर मारत बसतात. पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठीही इथे चांगली सोय असल्यानं फिरुन दमल्यावर मनोसोक्त जेवणाचा आनंद मिळतो.
शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरावर अनेक गावं वसलेली आहेत. गावक-यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे प्रवासी बोट. या गावांतील लोकांसाठी ही सेवा नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध आहे. मात्र पर्यटकांकडुन चांगले पैसे वसुल केले जातात. विशेष म्हणजे पर्यटकांसाठीच्या बोटी आणि तिथल्या व्यवसायात स्थानिक लोकांनीच पैसे गुंतवले आहेत. म्हणजे परक्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक लोकांनीच निकाली लावला आहे. तापोळ्याचा सिझन म्हणजे उन्हाळा कारण खो-याने इथं पर्यंटक येतात आणि स्थानिकांचा चांगला व्यवसाय होतो. तरीही पावसाळा वगळता इतर महिन्यात शनिवार-रविवारी, सुटीच्या दिवशी चांगली गर्दी असते. इथे येण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी. असं दल लेकपेक्षा उत्कृष्ठ पर्यंटन स्थळ असलेले तापोळा मनात कायमची आठण करुन रहाते.
डोळ्याचे पारणे फिटवणारे हा उल्लेख डोळ्यांचे पारणे फेडणारे असा केला तर अधिक उत्तम... बाकी प्रवासवर्णन लिहिण्यात तुझा हातखंडा आहेच... शुभेच्छा...
ReplyDeletegood amit chanach...
ReplyDeleteawesome,..... tuza lekh vachana ek anand aahe...
ReplyDelete"Rastyachi tabyet bighadaleli aset" too good... :)
खुप सुंदर अमित तुझ्या सगळ्याच लेखाप्रमाणे अप्रतिम आणि कॅमेरा का घेतलात ते कळत भघतांना भघताच जावस वाटतय महाराष्ट्रातल्या नव-नवीन पर्यटन स्थळांची सफर घडवल्याबद्दल खुप-खुप धन्यवाद शुभेच्छा
ReplyDeletehi Amit,
ReplyDeleteIhave visited Tapola several times, but ur artical opened special and different "PAILU" of Tapola, photos are also nice. Very good
I must thank you for sharing most useful information. This info temped me to visit this place
ReplyDeleteअप्रतिम सर वर्णान प्रत्यक्ष दर्शन घडविले.
ReplyDeleteअप्रतिम सर वर्णान प्रत्यक्ष दर्शन घडविले.
ReplyDelete