Sunday, January 10, 2010

असावा सुंदर " कोरीगड "सारखा किल्ला


कोरीगड

किल्ले,  देशातील विविध ठिकाणानूसार किल्ल्यांच्या रचनेत विविधता आढळते.   मात्र महाराष्ट्रातील किल्ले लक्षात घेतले तर काही ठराविक गोष्टी, रचना प्रत्येक किल्ल्यांमध्ये आढळतात.  सभोवताली किंवा दूरपर्यंत नजर ठेवता यावी यासाठी डोंगराच्या माथ्यावर किल्ल्याचे स्थान,  चौफेर तटबंदी ( बेलाग-उंच कडा असेल तर तटबंदी नाही ), सहज न दिसणारं प्रवेशद्वार,  तटंबंदी किंवा दरवाजे ह्यांची एकामागोमाग उभारणी,  किल्ल्यावर शे-पाचशे लोकांना वर्षभर पूरेल इतका पाण्याचा साठा ( तलाव-विहिर किंवा टाकं) ,  धान्याचा साठा करण्याची सोय,  भक्कम- भव्य असे बुरुज, किल्ल्यावर एखाद्या देवतेचं मंदिर, मुख्य म्हणजे चोरवाटांचं अस्तित्व,  दूर अंतरापर्यंत मारा करणा-या तोफा.... इत्यादी.    राज्यात स्वराज्यासाठी धडपड ही मुख्यतः सह्याद्री प्रांतात झाल्यानं 250 पेक्षा जास्त किल्ले या भागात आढळतात आणि वर वर्णन  केलली वैशिष्टये बहूतेक सर्व या किल्ल्यांमध्ये आढळून येतात. 

मात्र आज देखभाल न ठेवल्यानं, ऊन-वारा-पाऊस ह्यांच्या मा-यानं आणि माणसाच्या हस्तक्षेपानं अनेक किल्ले नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.  असं असलं तरी काही किल्ल्यांवर इतिहासाची साक्ष असलेलं पूर्वीचं वैभव आजही टिकून आहे.  असाच बहुरंगी-बहुरचना असलेला कोरीगरड किल्ला त्यापैकी एक.   नवख्या ट्रेकरला ट्रेकींगची सुरुवात म्हणुन या किल्ल्याच्या भ्रमंतीनं सुरुवात करायला हरकत नाही.  एवढंच नव्हे तर सहकुटुंब एक दिवसाची सहल जर सत्कारणी लावायची असेल तर कोरीगड हा एक उत्तम ठिकाण ठरू शकले एवढा सोपा कोरीगडचा ट्रेक आहे.


किल्ले कोरीगडचा मार्ग 

लोणावळापासून सुमारे 22 किलोमीटरवर असलेल्या कोरीगडची सफर सक्काळी सक्काळी सुरु करायची.  लोणवळ्याला कुठल्याही मार्गानं रेल्वे- एसटीद्वारे पोहचायचे. एस.टीस्टॅडला जात भांबूर्डे किंवा आंबवणे गावात जाणारी एस.टी. पकडायची. किंवा सहाराची प्रसिद्ध अम्बी-वॅली च्या पूढे जाणारी बस पकडायची. स्वतःचं वाहन असल्यास प्रश्नच नाही.

प्रवासाला सुरुवात झाल्यावर साधारण  दहा किलोमीटर अंतर कापत भुशी डॅम दूर ठेवत,  नौदलाचं प्रशिक्षण केंद्र  आय.एन.एस.शिवाजी ला वळसा घालत रस्ता एक छोटा घाट चढायला सुरुवात करतो. अचानक लोणावळ्याचा नेहमीचा थंडावा बाजूला पडत आणखी गार वाटायला लागते.  मग परदेशात आल्यासारखा एक शानदार रस्ता सुरु होतो.  सहाराच्या कृपेने इतके वर्ष दगडानं भरलेला रस्ता आज अगदी गुळगुळीत झालाय. आजुबाजुला एवढी दाट झाडं की ऊन जमिनीला स्पर्श करणार नाही. मनोसोक्त फोटो काढायचे आणि ठोकून द्यायचे की हे पोटो स्वित्झर्लडमधील आहे, एवढा सुंदर रस्ता आहे.  घाट चढल्यावर पुन्हा आपण सपाटीवर येतो आणि दुरवर सहज नजरते दिसतो एक डोंगर तोच कोरीगड.  कोरीगडपर्यंतचा रस्ता एवढा चांगला आहे की अनेक जाहिरात, चित्रपटांचे शुटिंग इथेच झाले आहे. ऋतिक रोशनची चिखल उडवणारी " करिष्मा " बाईकची  ची जाहिरातही याच रस्त्यावरची.  आजुबाजुचं निसर्गसौंदर्यं  आपल्यावर भुरळ टाकत रहातं.


असो... असा निसर्ग सौदर्यचा आंनद घेत
आपण पेठ शहापूर या गावात उतरायचं.( आंबवणे गाव एक किलोमीटर पुढे आहे.)  उतरल्यावर रस्त्याच्या डावीकडे कोरीगड उभा ठाकलेला असतो.  आता कोरीगड उजवीकडे ठेवत चांगली मळलेली पायवाट तुडवायला सुरुवात करायची आणि आपण 15 मिनीटांतच किल्ल्याच्या खाली येऊन पोहतचो. नजरेनं  किल्ल्यावर जाणारी वाट  हेरायची आणि चालायला सुरुवात करायची. किंवा पायवाट न सोडता चालत राहिलं की आपण किल्ला चढायला लागतो.  इथे मात्र एक गोम आहे. हा परिसर सहारानं टेकओव्हर केलाय.  आपला मार्ग खरा तर सहाराच्या हद्दीतून जात असतो. कोणीतरी रखवालदार ( खरं तर भैय्या ) आपल्याला हटकतो, परमिशन लिया है क्या ?  असं विचारतो.  चांगल्या दोन शिव्या हासडत, त्याच्याकडे दुर्लक्ष करत किल्ला चढायला सुरुवात करायची.


कोरीगडची चढाई

 दहा मिनिटांतच उजवीकडे काही गुहा आणि पाण्याच्या टाकी लागतात. गुहेत डोकावत, टाक्यातील ( पाणी असल्यास ) पाण्याच्या चवीचा आस्वाद घेत, फोटो काढत  आपण वरती चढायला सुरुवात करायची. रस्त्यापासून किल्ल्यावर किंवा किल्याच्या पायथ्यापासून किल्ल्यावर यायला अनुक्रमे 30 आणि 15 मिनिटे पुरतात.  किल्ल्याचं सुस्थितीत असलेलं प्रवेशद्वार आणि तटबंदी बघितल्यावर  किल्ल्यावर पोहचण्याची उत्सुकता वाढायला लागते.  फोटो काढायचे, प्रवेश दरवाज्याच्या दगडांना हात लावत आणि  शिवाजी महाराजांचा जयजयकारकरत , घोषणा देत किल्ल्यात प्रवेश करायचा.


किल्ले दर्शन 

कोरीगड किल्ल्याचा माथा म्हणजे एक विस्तृत पठार. तुलना करायची म्हंटलं तर शिवाजी पार्कपेक्षा जरा मोठं.  मात्र  चौफेर तटबंदी.  प्रवेश केल्यावर उजवीकडून सुरुवात करायची. तटबंदी आणि बुरुज बघत चालत रहायचं.  इतक्या वर्षानंतरही टिकून राहिलेल्या या तटबंदीकडे बघुन आश्चर्यचकित व्हायला होतं. साधारण दहा मिनिटात आपण किल्याच्या उजवीक़डच्या कोपर-यात येऊन पोहचतो. ( पहिला फोटो ). इथून साधारण किल्ल्याचा घेर लक्षात येतो आणि किल्ल्यावरील ठिकाणंही स्पष्ट दिसतात. साधारण शंकराच्या पिंडीसारखा किल्ल्याचा आकार असल्याचं लक्षात येतं. या टोकाकडुन थोडी लोकवस्ती असलेलं पेठ-शहापूर गाव दिसतं आणि लोणवळाहून वर आलेला रस्ताही दिसतो.

भ्रमंती अशीच पूढे सुरु ठवेली असता आपण दोन तलावांपाशी येऊन पोहचतो. उन्हाळ्यात गेलात तर तलाव आटलेले दिसतील. तलावाच्या एका बाजूला  इतर घरांचे अवशेषही बघायला मिळातात. तलाव बघत आपण येऊन पोहचतो ते कोराई देवीच्या मंदिराजवळ. या देवीच्या नावावरुन या किल्ल्याला कोराईगड  असंही म्हणतात.  पाच माणसांना आत बसता येईल एवढं छोटं मंदिर आहे. मंदिरात जरा विश्रांती घ्यायची, भूक-लाडू पोटात ढकलायचे आणि पुन्हा फिरायला सुरुवात करायची. मंदिराच्या मागे साधारण पाच - सहा तोफा हघायला मिळातात.
त्यातील एक तोफ  छानपैकी आधारावर उभी आहे. तिथूनच खाली अम्बी-वॅली मधील विविध बांधकामं दिसायला लागतात. अम्बी-वॅलीतील छोटा तलाव, त्यावर असलेला प्रेक्षणीय पूल, विविध गार्डन, विविध रंगा-ढंगाची, आकाराची घरं( खरं तर बंगले ) दिसतात. त्यापलिकडे छोटा विमानतळही दिसतो. चार्टर प्लेन उतरवता येईल एवढं ते विमानतळ आहे.  गंमत म्हणजे गडावरील तोफा या भागाकडे तोंड करुन उभ्या आहेत. परिसराचं ( निसर्गाचं) सौंदर्य बिघडवायला कारणीभूत असलेल्यांना उडवून टाकू असा धमकी-वजा इशारा जणू या तोफा देत आहेत.   तलावाच्या पुढे दोन गुहा आढळतात. विशेष म्हणजे चक्क शंख-गदा-चक्र धारण केलेली विष्णुची मुर्ती आढळते. सहजा गडावर शिवमंदिर, देवीचं मंदिर फारफार तर गणेश मंदिरं आढळतात. मात्र इथल्या विष्णु मूर्तीचं अस्तित्व कुतुहल निर्णाण करतं.

 मंदिर आणि तोफांच्या पूढे एक मोठा बुरुज लागतो , त्या बुरुजाच्या बाजूने आंबवणे गावात जायला वाट आहे. साधारण अर्ध्या तासात आपण गावात पोहतचो, मात्र या वाटेवर उतार जरा जास्त असल्यानं ही वाट नेहमीच्या ट्रेकर्स लोकांनीच पार करावी. अजुन गड बघायचा बाकी असल्यानं आपण वाट लक्षात घेऊन पूढे निघायचं.  तिथं एक पाच-सात वर्षांपूर्वीचं एक बांधकाम केलेली खोली आढळते. गडाच्या पाय-यांवर व काही ठिकाणी रात्री लाय़टिंग करण्याची सोय आहे, त्याचं पॉवर हाऊस बहुधा इथं केलेलं असावं. इथुनंही अँम्बी-वॅलीचं सुंदर दर्शन होतं. पुढेही गडाची फेरी पूर्ण करत प्रवेश दरवाज्याच्या ठिकाणी येईपर्यंत सलग तटबंदी आहे. मधेच एखादी तोफही आढळेल.

अशी गडाची फेरी पूर्ण होते. चाल चांगली असेल तर लोणावळ्यापासून निघुन गड बघेपर्यंत पाच तास सहज उलटून गेलेले असतात.  संपुर्ण गडावर सावलीयोग्य एकंही झाड नाही. त्यामुळं सूर्य सतत आपली पाठराखण करत असतो.  मात्र किल्ला उंचावर असल्यानं वातावरणात एक प्रकारचा थंडावा असतो.  तेव्हा भर मे महिन्यात आलात तरी घाम मात्र येणार नाही असं वातावरण आहे.  कोरीगडवरुन आंबवणे गावाच्या पूढे रस्ता जातो तो तेलबैला आणि घनगड किल्ल्याकडे.  मात्र मध्ये डोंगररांग असल्यानं ते दिसत नाहीत.  मात्र वातावरण स्वच्छ असेल तर माथेरान, प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड तसंच ड्यूक्सनोज( नागफणी)  आणि पवना धरणाजवळचे तुंग- तिकोना किल्ले दिसतात. कोरीगडावरुन आजुबाजूचा कित्येक किलोमीटरचा प्रदेश सहज नजरेत भरतो.


कोरीगडचा इतिहास

कोरीगड किल्ला कधी बांधला ह्याची नोंद सापडत नाही.  इथं  इतिहास मुका आहे.  मात्र 1657 मध्ये शिवाजी महाराजांच्या चढाईत लोहगड, विसापूरसह कोरीगडही स्वराज्यात दाखल झाला. त्यानंतर कोरीगडचा उल्लेख आढळतो तो थेट 1818 या वर्षी.  कोण्या कर्नल प्राथस्ने या ब्रिटीश अधिका-यानं 11 मार्च 1818 ला कोरीगडावर हल्ला केला. मात्र मराठ्यांच्या चिवट झुंजीमुळे त्याला यश काही येत नव्हते. अखेर  14 मार्च ला एक तोफेचा गोळा किल्ल्यावरील दारूसाठ्यावर पडत मोठा स्फोट झाला आणि किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.  तेव्हा मिळालेले कोराई देवीचे दागिने इंग्रजांनी मुंबईतील मुंबादेवीला दिल्याचाही उल्लेख इतिहासात आडळतो. या पलिकडे कोरीगडचा इतिहासात उल्लेख नाही. 

असा इतिहास वाचेपर्यंत दुपार झालेली असते. जेवण झाल्यावर जरा डुलकी काढायला हरकत नाही. गडावरील अशा थंड हवेत झोप काढण्याची मजा काही औरच.  परत निघायला  अर्थात दोन रस्ते आहेत उतरायला. ज्या रस्त्यानं आलो त्यानं पेठ-शहापूरला परत जायचं किंवा मगाचच्या जरा अवघड वाटेनं आंबवणे गावात उतरायचं आणि कोरीगडची आठवण मनात ठेवत आपापल्या घरी परतायचं.

अशा कोरीगडच्या ट्रेकची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपुर्ण.  

नौदल आणि हवामानाचा अंदाज

आपण परदेशातील हवामानाच्या विशेषतः पावसाच्या अंदाजाबाबत ऐकून असतो. अमुक वेळेला पाऊस पडणार आहे असं तिथे काही तास आधीच हवामान विभागातर्फ...