पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, January 1, 2012

भविष्यातील प्रगतीचा मानबिंदू " अवकाश स्थानक "


२९ सप्टेंबर २०११ हा दिवस  कदाचित जगातील सर्वसामान्यांसाठी एक सामान्य दिवस ठरला असेल, मात्र जगातील अवकाश शास्त्रज्ञांसाठी, जगाचे भवितव्य ठरवू पहाणा-या बड्या देशांच्या नेत्यांसाठी एक वेगळा दिवस होता. महाबलाढ्य चीनने Tiangong - 1 हे मानवरहीत अवकाश स्थानक अवकाशात सोडत जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले. तब्बल 8 टन वजनाचे मिनी बसच्या आकाराचे अवकाश स्थानक 360 किलोमीटर अंतरावर यशस्वीरित्या पोहचवले. 2013 पर्यंत ते  पृथ्वीभोवती फिरत कार्यरत राहणार आहे. जगातील धुरिणांनी चीनचे हे पाऊल गांभीर्याने घेतले आहे.

चीनच्या या मोहिमेकडे एवढे बारकाईने पहाण्याचे कारण म्हणजे आत्तापर्यंत फक्त सोव्हिएत रशिया आणि अमेरिका या दोन देशांनाच स्वबळावर अवकाश स्थानक अवकाशात यशस्विरित्या पोहचवणे आणि ते कार्यरत करणे शक्य झाले आहे. फ्रान्स्, इंग्लड, जर्मनी, जपानसारख्या विकसित  देशांनाही ते शक्य झाले नाही. कारण नुसता देश विकसित असून चालणार नाही तर साथीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीची जोडही हवी. त्यामुळेच चीनच्या या हनुमान उडीला अनन्य साधारण महत्व आहे. अवकाश स्थानक हे भविष्यातील प्रगतीचा मानबिंदू ठरणार आहे, त्या देशाच्या प्रगतीचा आलेख सांगणार आहे. मात्र हे जाणून घेण्याआधी अवकाश स्थानक, त्याचे महत्व  आणि त्याच्या निर्मितीचा इतिहास पाहूयात........


अवकाश स्थानक

पहिला कृत्रिम उपग्रह सोडण्याच्या आधीपासून म्हणजे 1957च्या कितीतरी वर्षे आधी अवकाश स्थानकाची कल्पना काही मासिक, कादंबरीतून मांडण्यात आली होती.  १८६९ ला अमेरिकेच्या 'इवेरेट हाले' नावाच्या इतिहासकार, लेखकाने 'ब्रीक मून' नावाचा एक लेख अटलांटीक नावाच्या मासिकामध्ये लिहीला. यामध्ये पहिल्यांदाच पृथ्वीबाहेरच्या मानवी वस्तीबद्दल, अवकाश स्थानकाबद्दल लिहिण्यात आले होते.

तर 1929 ला हर्मन पोटोसनिक या अस्ट्रो-हंगेरियन रॉकेट अभियंताने 'The Problem Of Space Travel' नावाचे पुस्तक लिहीले. यामध्ये प्रथमच पृथ्वीभोवती घिरट्या घालत फिरणा-या अवकाश स्थानकाची कल्पना मांडण्यात आली होती. विशेष म्हणजे हे पुस्तक तब्बल 30 वर्षे एक लोकप्रिय पुस्तक म्हणून ओळखले गेले.

दुस-या महायुद्धात जर्मनीच्या शास्त्रज्ञांनी अवकाश स्थानक सदृश्य कल्पना नुसती मांडली नव्हती तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कागदोपत्री कामालाही सुरुवात केली होती. " Sun Gun " असे या प्रकल्पाचे किंवा नव्या विध्वंसक हत्याराचे नाव होते. शास्त्रज्ञांच्या कल्पनेनुसार 3.5 चौरस किलोमीटर व्याप्ती असलेला विशिष्ट धातूयुक्त पत्रासदृश्य भाग हा पृथ्वीभोवती जमिनीपासून 8000 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरून भ्रमण करत रहाणार. हा पत्रा सूर्याची ऊर्जा गोळा करत ती शत्रू प्रदेशाच्या शहरावर किंवा एखद्या ठिकाणीवर केंद्रीत करून तो भाग नष्ट करणार अशी ती संकल्पना होती. अर्थात ही संकल्पना संकल्पनाच राहिली. असो.....


पहिले अवकाश स्थानक सोव्हिएत रशियाचे

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांमध्ये 1957 ला सुरु झालेली अवकाश स्पर्धा 1969 ला अमेरिकेने जिंकली. 1957 ला रशियाने पहिला कृत्रिम उपग्रह पाठवला तर अवघ्या 12 वर्षात अमेरिकेने चंद्रावर अवकाशवीर उतरवला. त्यामुळे हादरलेल्या रशियाने पुन्हा एकदा दुसरी आघाडी उघडली आणि त्याची परिणीती पहिल्या अवकाश निर्मितीमध्ये झाली. 1969 पर्यंत दोन्ही देशांनी उपग्रह सोडण्यात कौशल्य मिळवले होते. मानवसहित अवकाश याने सोडण्यात आली होती. मात्र दिर्घकाळ मोहिमांसाठी, विविध प्रयोगांसाठी मानवाचे अवकाशातील वास्तव्य जास्त असणे आवश्यक होते. त्यातुनच अवकाश स्थानकाच्या संक्लपना प्रत्यक्षात आली.

Salyut - 1 हे मानवरहित अवकाशस्थानक १९ एप्रिल १९७१ ला सोव्हिएत रशियाने यशस्वीरित्या अवकाशात सोडले आणि पुन्हा एकदा अवकाश स्पर्धेत अमेरिकेवर कुरघोडी केली. तब्बल १८ टन वजनाचे बसच्या आकाराएवढे हे अवकाश स्थानक २०० किलोमीटर उंचीवरुन सहा महिने पृथ्वीभोवती फिरत राहिले आणि त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करत नष्ट झाले. या काळात या मानवरहित अवकाश स्थानकाला भेट देण्यासाठी रशियाच्या एकुण दोन मोहिमा पार पडल्या. पहिल्या प्रयत्नात तीन अवकाशवीरांचे अवकाश यान हे Salyut  अवकाश स्थानकाला काही कारणांने जोडू शकले नाही. तर दोन महिन्यांनतर तीन अवकाशवीरांनी या स्थानकाला भेट दिली, ते तिथे 23 दिवसही राहिले. अवकाशवीर पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर एवढ्या जास्त विक्रमी दिवस राहिले. दुर्देवाने पृथ्वीवर परत येतांना या अवकाशवीरांचा मृत्यु झाला.

असं असलं तरी Salyut - 1 ला पहिल्या अवकाश स्थानकाचा मान मिळाला. त्यानंतर आत्तापर्यंत रशियाने एकुण 10 अवकाश स्थानके सोडली आहेत. मात्र आज रशियाचे स्वतःचे एकही अवकाश स्थानक कार्यरत नाही.

या पैकी  Salyut - 7 हे अवकाश स्थानक 19 एप्रिल 1982 ला  सोडण्यात आले. 3000 पेक्षा जास्त दिवस ते पृथ्वीभोवती  भ्रमण करत राहिले. या काळात 12 मानवसहित मोहिमांमध्ये 30 पेक्षा जास्त अवकाशवीरांनी या अवकाश स्थानकाला भेटी दिल्या, तिथे निरनिराळे प्रयोग करण्यात आले. तसंच 15 मानवरहित अवकाश यानांनी या अवकाश स्थानकाला भेटी दिल्या. Salyut- 7 मिळालेल्या अनुभवाचा फायदा महत्वकांक्षी " मीर " अवकाश स्थानकाच्या उभारणीला झाला.

" मीर "  अवकाश स्थानक

 एक लाख टन वजनापेक्षा जास्त वजनाचे मीर अवकाश स्थानक हे सोव्हिएत रशिया आणि त्यानंतरच्या रशियाची शान होते. एक लाख 29 हजार किलो वजनाच्या या अवकाश स्थानकाचा पसारा हा अर्ध्या चौरस किलोमीटर एवढा होता. साधारण सात भागांमध्ये या अवकाश स्थानाकाची निर्मिती करण्यात आली. त्यातील पहिला 20 टन वजनाचा " मिर कोर मॉड्युल " हा भाग 20 फेब्रवारी 1986 ला रशियाने अवकाशात सोडला. तर शेवटचा भाग हा एप्रिल  1996 ला सोडण्यात आला. रशियासह विविध देशांच्या 50 पेक्षा जास्त अवकाश वीरांनी मीर ला भेट दिली.स्वच्छतागृह, व्यामशाळा,छोटीशी बाग, विविध प्रयोगशाळा अशी हजारो गोष्टींची उपयुक्तता, त्याचा वापर, त्यामध्ये येणा-या अडचणी यानिमित्ताने तपासल्या गेल्या. यामध्ये आलेल्या अनुभवाचा वापर हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या निर्मितीमध्ये करण्यात आला. 2001 पर्यंत हे अवकाश स्थानक कार्यरत होते.मात्र त्यानंतर अवकाश स्थानकाची निगा राखण्याचा खर्च परवडत नसल्यानेव रशियाने हे अवकाश स्थानक समुद्रात कोसळवले.


अमेरिकेचे Skylab

रशियाच्या यशानंतर दोन वर्षानंतर 14 मे 1973 ला अमेरिकेने स्वतःचे पहिले अवकाश स्थानक Skylab-१ यशस्वीरित्या सोडले . एवढेच नाही त्या वर्षात आणखी तीन अवकाश स्थानके सोडत एक विक्रमच केला. त्यापैकी पहिले अवकाश स्थानक सहा वर्ष टिकले.


1945 ते 1991 या काळात अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील शीतयुद्ध जोरात होते. प्रत्येक क्षेत्रात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे देश करत होते. यामध्ये क्रीडा स्पर्धासुद्धा आणल्या गेल्या. एका देशात झालेल्या ऑलंपिक स्पर्धेवर दुस-या देशाने बहिष्कार टाकण्यापर्यंत या देशांची मजल गेली होती. असं असतांना 1991 ला शीतयुद्ध संपण्याआधी या दोन्ही देशांनी अवकाशात आपली तलवार मात्र म्यान केली. कारण विविध उपग्रह,
अवकाश स्थानके याचा वापर हमखास लष्करी वापरासाठी केला जात होता. तेव्हा जमिनीवरील शत्रुत्व हे किमान अवकाशात असू नये असे दोन्ही देशांनी ठरवले आणि अवकाशात १७ जुलै १९७५ ला अमेरिकचे अपोलो अवकाश यान आणि सोव्हिएत रशियाचे सोयुझ-१९ हे एकमेकांना जोडण्यात आले. यावेळी १९५७ ला सुरू झालेली अवकाश स्पर्धा समाप्त झाल्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले. यानंतर ज्या काही अवकाश मोहिमा झाल्या त्यामध्ये स्पर्धा नव्हती. उलट यानंतर अवकाशातील तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढले आणि याची परिणीती आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या निर्मितीमध्ये झाली.


आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक

साधारण 375 किलोमीटर उंचीवरुन भ्रमण करणा-या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची निर्मिती 24 देशांनी केली आहे. अर्थात मुख्य तंत्रज्ञान हे अमेरिका आणि रशियाचे आहे. त्याबरोबर फ्रान्स, इंग्लड, जर्मनी, जपान या देशांचाही वाटा आहे. तब्बल 4 लाख 50 हजार किलो वजनाचे हे अवकाश स्थानक म्हणजे आंतरराष्ट्रीय देशांच्या समन्वयाचे उत्तम उदाहरण आहे. एका फुटबॉलच्या आकारापेक्षा जास्त पसारा असलेल्या या स्थानकाच्या निर्मितीला 20 नोव्हेंबर 1998 ला सुरुवात झाली. विविध 27 भाग जोडत या अवकाश स्थानकाची निर्मिती करण्यात आली. आत्तापर्यंत विविध मोहिमांमध्ये अमेरिका, रशियाच्या प्रक्षेपकाद्वारे 200 पेक्षा जास्त अवकाशवीरांनी भेट दिली आहे. हजारो विविध प्रयोग या अवकाश स्थानकात केले गेले आहेत. काही अवकाशवीर तर या अवकाश स्थानकात एक वर्षांपेक्षा जास्त वेळ राहिले आहेत. सुनिता विल्यम्सही यापैकी एक.

युरोपियन स्पेस एजन्सीनेही अवकाश स्थानक बांधण्याच्या मोहिमेला सुरुवात केली होती. मात्र यासाठी लागणार प्रचंड खर्च लक्षात घेता तंत्रज्ञान असुनही ही एजन्सी पुढे मजल मारु शकली नाही.

अवकाश स्थानकाचे महत्व

आता एवढा सगळं अवकाश स्थानकाबद्दल सांगायचे कारण की सध्या जे महत्व सुपर कॉम्पुटरला आहे, तेल संपत्तीला आहे, लष्करी सामर्थ्याला आहे तेच महत्व भविष्यात अवकाश स्थानकाला प्राप्त होणार आहे. कारण भविष्यातील चांद्र मोहिमा , मंगळ मोहिमांसाठी याच अवकाश स्थानकांचा पुरेपुर वापर केला जाणार आहे.

सध्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरील भाग व्यापण्याची छुपी स्पर्धा बड्या राष्ट्रांमध्ये लागली आहे. एखादी मोहिम काढायची, संशोधनाचं कारण सांगत तळ स्थापन करायचा आणि त्या जागेवर वडिलोपर्जित जागा असल्यासारखा हक्क सांगायचा असं सध्या सुरु आहे. तसंच काहीसं चंद्राच्या बाबतीत होणार आहे. कारण तेथील खनिज संपत्तीवर आत्तापासून काही राष्ट्रांचा डोळा आहे. चंद्रावर वस्ती उभारण्यात अवकाश स्थानक अत्यंत महत्त्वाची , समन्वयाची भुमिका बजावू शकणार आहे.

ज्याप्रमाणे अमेरिकेने चंद्रावर मानव वस्ती उभारण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे, त्याचबरोबर मंगळापर्यंत मानवसहित मोहिम कशी काढता येईल यासाठी डोकेफोड करायला सुरुवात केली आहे. चंद्राव्यतिरिक्त दूरच्या ग्रहांवर पोहचण्यासाठी अवकाश स्थानके हाच एकमेव मोठा पर्याय ठरणार आहे, आधार ठरणार आहे.

थोडक्यात काय चंद्र काय किंवा मंगळ काय परग्रहांवर वस्ती करण्याची पुर्वतयारी ही अवकाश स्थानकांमधे वस्ती करण्याच्या अनुभवावरुन केली जाणार आहे.  विशेषतः मंगळाकडे जातांना लागणार दिर्घकाळ ( एक वर्षापेक्षा जास्त दिवस ) लक्षात घेता अवकाश स्थानकाचे मोलाचे सहाय्य होणार आहे.

त्याही पलिकडे सांगायची गोष्ट म्हणजे पृथ्वीवरील वाढती मानवी वस्ती, वाढते प्रदुषण , नैसर्गिक साधनांवर पडणारा ताण लक्षात घेता कित्येक लाख वर्षांनी कदाचीत पृथ्वी रहाण्याजोगी होणार नाही. तेव्हा पृथ्वीचा त्याग करुन मानवाला नवीन पृथ्वी किंवा नवीन जागा  शोधावीच लागणार आहे. तेव्हा याच अवकाश स्थानकांच्या माध्यमातून हे साध्य होणार आहे.

भविष्यातील मानवाच्या अवकाश संचारास अवकाश स्थानके महत्त्वाची भुमिका पार पाडणार आहेत.


पुढील २० वर्षात काय होणार ?

चीनने २०१६ पर्यंत Tiangong -2 आणि 3 अशी आणखी दोन अवकाश स्थानके सोडण्याचा निर्धार केला आहे. तोपर्यंत चीन अवकाशातील  Space Walk  लाही चांगलाच सरसावला असेल. एवढंच नाही २०२२ पर्यंत ६० टन वजनाचे अवकाश स्थानक स्थापन चीनने निश्चित केल्याचं म्हंटलं जात आहे. ड्रॅगनच्या प्रगतीचा वेग असाच राहिला तर चीन काही वर्षात अवकाश तंत्रज्ञानात रशियाच्या तोडीस तो़ड ठरेल. 2030-40  पर्यंत चंद्रावर मानवी वसहात उभारण्याच्या दृष्टीने अमेरिकेने आत्ताच हालचाल सुरु केलीये. त्यामुळे भविष्यात अमेरिकेचा स्पर्धक रशिया नाही तर चीन असणार आहे.

भारत 2014-15 ला  पहिली समानवी अवकाश मोहिम म्हणजे स्वबळावर  अवकाशवीराला पाठवण्याची तयारी करणार आहे. असा काही मोहिम यशस्वी झाल्यावरंतरच अवकाश स्थानकाचा भारत विचार करेल. ( तोपर्यंत चीन कितीतरी पुढे गेलेला असेल.  ).

19 व्या  शतकात वाफेने क्रांती केली आणि औद्योगिकरणाला सुरुवात झाली. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला वीजेने क्रांती केली. त्यानंतर  तेलाने जग गतिमान केले.  20 वे शतक संपतांना संगणकाने जगाचा चेहरामोहरा बदलला. यापुढील काळ हा आता अवकाश मोहिमांचा असणार आहे. कारण फक्त देश नाही तर एखादी बलाढ्य कंपनीसुद्धा  स्वबळावर आता अवकाश यान  पाठवण्याच्या तयारीत आहे. पुन्हा चांद्रस्वारी करण्याकडे जगातील बड्या राष्ट्रांमध्ये ( भारतसुद्धा त्यामध्ये आहे ) स्पर्धा सुरु आहे. यामध्ये अवकाश स्थानकांना अनन्य साधारण महत्व असणार आहे.