Wednesday, June 9, 2010

नक्षलग्रस्त भागातील सायकल मोहिमेचा अनुभवचर्चेतील हालेवारा गांव

सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या  अपहराणांमुळे.  आठवडाभरात नलक्षलवाद्यांनी हे उद्योग केल्याने तिथले लोक चांगलेच धास्तावले आहेत.  खऱं तर तिथे विकास कामावरुन सुरु असलेला राजकीय वाद ह्या घटनांना कारणीभूत आहे  हा भाग वेगळा. पण या निमित्तानं 2002च्य़ा डिसेंबर महिन्यात गडचिरोली भागातल्या या हालेवारा गावांत केलेल्या सायकल मोहिमेची आठवण ताजी झाली.

पूर्व महाराष्ट्र सायकल मोहिम

2000 ला डोंबिवलीच्या आमच्या पेंढरकर महाविद्यालयाने दिल्ली  ते डोंबिवली सायकल मोहिमेचे आयोजन केलं.  मी तेव्हा एस. वाय.बीएस्ससी  ला होतो आणि मुख्य म्हणजे एनसीसीला होतो. कॉलेजमधील आम्ही 20 जणांनी मोहिम 16 दिवसांत फत्ते केली. त्यामुळं सायकलवरुन फिरण्याचं भूत डोक्यात शिरले. ( आजही आहे पण वेळेमुळे शक्य होत नाही ). लगेचच पुढच्या वर्षी 2001 ला  ( बीएस्ससीच्या शेवटच्या वर्षाला असतांना सुद्धा ) अष्टविनायक मोहिम सायकल वरुन 15 जणांसह पूर्ण केली.  त्या मोहिमेचं लिडिंग मी केलं असल्यानं सायकल भ्रमंतीने जणू वेड लावलं होतं.

तेव्हा या वर्षी ( 2002)  कुठे जायचं याचा विचार सुरु केला आणि वेगवेगळ्या सायकल मोहिमांचे प्लॅन सुरु झाले.  साथीला माझे ट्रेकमधील भटके संजय करंदीकर, प्रथमेश मेहेंदळे आणि अमेय आपटे होतेच.  कोकण मोहिम,  दक्षिण भारत, मुख्य किल्ल्यांना भेटी देण्याची मोहिम असे प्लॅनिगं करता करता संपुर्ण महाराष्ट्रच सायकलने का पालथा घालू नये असा विचार सर्वांनी केला. डोंबिवलीतील एका संस्थेच्या सहाय्याने 30 दिवसांत संपुर्ण महाराष्ट्र मोहिम निश्चित केली. पण एक महिन्याचा वेळ कोणाकडेच नव्हता, फार तर 10 दिवस काढता येणं शक्य होते. ( कारण सगळेच जण नोकरीच्या शोधात होते किंवा पुढचं शिक्षण घेत होते.)

मग आम्ही पाचचे मग 10- 15 झालो आणि मग चक्क  40 जणांची यामध्ये भर पडली, एवढ्या लोकांनी सायकल मोहिमांत उत्साह दाखवला.  मग असं ठरलं की प्रत्येकी सहा जणांचे सहा गट करायचे आणि प्रत्येक गटाने राज्यातील एक भाग पालथा घालत डोंबिवलीत एकाच वेळी पोहचाचयेच.  मग कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड-परभणी-जालना-औरंगाबाद-नाशिक-डोंबिवली, नांदेड-उस्मानाबाद-सोलापूर-पूणे-डोंबिवली,  नागपूर- अमरावती-धूळे-नाशिक-डोंबिवली असे पाच गट आणि दिशा नक्की झाल्या. मात्र पूर्व महाराष्ट्र कोणी घेतला नसल्यानं ते आव्हान आम्ही स्वीकारायचे ठरवलं.  नागपूर-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर-नागपूर असा आमचा मार्ग निश्चित झाला.


पूर्व महाराष्ट्राला सायकल मोहिमेला सुरुवात

मोहिमेची नक्की तारिख आठवत नाहीये पण डिसेंबरच्या भर थंडीत नागपूरहून आमच्या दोन सायकलल टीमला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवला. एक टीम अर्थात
नागपूर-अमरावती मार्गे निघाली आणि आम्ही पाच जण ( संजय करंदीकर, प्रथमेश मेहेंदळे, अमेय आपटे, मंगेश कोयंडे आणि मी ) गोंदियाच्या दिशेने निघालो. मुख्यालयातील प्रमुखानं आम्हाला पत्र दिलं होतं ते पत्र दाखवताच मुक्कामाच्या गावांत तिथल्या संघाच्या शाखेतर्फे आमची रहाण्याची सोय होणार होती.  नागपुर सोडल्यावर  सडक अर्जूनी,  गोंदिया, पुन्हा सडक अर्जुनी, गडचिरोली असे चार दिवसांत चार मुक्काम आमचे झाले.


हालेवाराच्या दिशेने.....

पाचव्या दिवशी गडचिरोली शहरातल्या वनवासी कल्याण आश्रममधील कार्यकर्त्याचं घरं सकाळी सोडलं आणि थेट 20 किलोमीटरवर असलेले चातगांव गाठलं. अभय बंग आणि राणी बंग ह्याचा सर्च प्रकल्पाचं मुख्य कार्यालय इथेच आहे. प्रकल्प बघितला, राणी बंग भेटल्या भरपूर गप्पा झाल्या, त्यांचे अनुभव मनात ठेवत चातगांव सोडलं. त्या दिवशी आम्हाला साधारण 100 किलोमीटरवर असलेला एटापल्ली गाठायचे होते. चातगांवमधून निघायला दुपारचे 12 वाजले होते. तेव्हा थोडसं अडमतडम खात सायकलवर टांग मारली आणि पैड्रीकडे कूच केले.  पैड्री-कसुर-हालेवारा-एटापल्ली असे अंतर कापायचे होते.


दुपारी साडेतीन वाजता पैड्री गावांत पोहचलो. जाम भूक
लागली होती, तेव्हा गावांत शिरल्यावर दिसेल त्या हॉटेलमध्ये ( खरं तर टपरीमध्ये )  शिरलो. गंमत म्हणजे जेवण असं काहीही नव्हते, फरसाण-मिठाई यांवर ताव मारला. जेवता जेवता हॉटेलवाल्याला विचारले की एटापल्ली किती आहे. त्याने दिलेल्या उत्तराने आमची भूक कुठल्या कुठे पळाली आणि फटाफट पोट भरत सायकल चालवण्यासाठी सज्ज झालो.


एटापल्ली अजून 64  किलोमीटर दूर होते. आत्तापर्यंतच प्रवासात  म्हणजे गडचिरोलीपर्यंत फारसं जंगल लागलं नव्हतं, वाहनांची वर्दळ होती आणि काही किलोमीटरवर वस्ती लागायचीच. मात्र पैड्रीपासूनच्या प्रवासात घनदाट जंगल आणि रस्त्यावरची वर्दळ बहुतेक नसणार असल्याची कल्पना आम्हाला गडचिरोलीतच मिळाली होती.  यापुढचा भाग हा नक्षलग्रस्त असल्याची माहितीही आम्हाला  सांगण्यात आली होती.

त्यामुळे आता सायकल दामटल्याशिवाय आमच्यापूढे पर्याय नव्हता. चार वाजता सायकलवर बसलो ते थेट साडेपाच वाजता हालेवारा गावात आल्यावरच उतरलो.  दीड तासात विश्वास बसणार नाही 46 किलोमीटर अंतर कापले होते. साधारण सायकल प्रवासात तासात सरासरी 16-18 कि.मी. अंतर कापले जाते.  सायकल जास्त हाणली तर फार-फार 22 कि.मी..   म्हणजे आम्ही चक्क 32-34 किलोमीटर अंतर एका तासांत आणि दीड तासापर्यंत 46 किलोमीटर हाणले होते.

ख-या अर्थाने हा पल्ला आम्ही चांगलाच एन्जॉय केला होता. एक तर सपाट किंवा गुळगुळीत म्हणा खड्डे नसलेला रस्ता, दोन्ही बाजूला दाट जंगल आणि संपुर्ण मार्गात पास झालेल्या जेमतेम दहा गाड्या. रस्त्याच्या मधोमध उभं राहूनसुद्धा आकाश क्वचितच दिसेल एवढी  झाडे उंच वाढली होती आणि पसरली होती. संपूर्ण मार्गात जेमतेम चार-पाच  वस्त्या लागल्या. चिटपाखरू नसणं हा शब्दप्रयोग आम्ही या पल्ल्यात चांगलात अनुभवला.  त्यामुळे वेगात सायकल टामटवणं सुरु होतं.

सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे डिसेंबर महिना असल्याने  सूर्य लवकर मावळत असल्याने हालेवारा गावात पोहचेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. अजून एटापल्ली 18 किलोमीटर बाकी होते. हालेवारा गावात पोहचतांना आमची चांगलीच दमछाक झाली होती, तेव्हा कटींग मारुन निघु असा विचार केला आणि गावातील एका टपरीजवळ सायकली थांबवल्या.

कपडे मळलेले, घामाने आंघोळ झालेल्या पाच सायकलींवरचा आमचा अवतार बघून हळूहळू पन्नास एक लोकं आमच्या भोवती गोळा झाली.  अर्थात लगेचच विचारपूस करु लागली कुठुन आलात, कोठे चाललात. इथे एवढे थकलो होतो की चहा-बिस्कीट खायची की ह्यांना उत्तर द्यायची ?  असा प्रश्न पडला होता. आमचे  लिडर माननीय संजय लोकांच्या प्रश्नांना उत्रर देण्यात बिझी झाले आणि आम्ही चहा पोटात रिचूव लागलो.

10 मिनीटे हा ओळखपरेडीचा कार्यक्रम सुरु असतांना आमच्या लक्षात आलं की आम्हाला आणखी कोणीतरी घेरलं आहे.  लष्करी वेषातील लोकांना नीट बघितल्यावर लक्षात आलं की  सीआरपीएफच्या तुकडीनं आम्हाला घेरलं आहे.  कोण तुम्ही,इथे काय करत आहात, कोठे चालला आहात असं जरा वरच्या आवाजात त्यांनी आमची "विचारपूस "  केली.

ताबडतोब आम्ही संघाचं पत्र आणि सायकल मोहिमेची माहिती सांगायला सुरुवात केली. सुरुवातीच्या जबरी आवाजाची जागा आता हास्याने घेतली आणि सीआरपीएफ ती 15 जणांची तुकडी आमच्याबरोबर गप्पा मारू लागली.  मुंबईवरून आलात तेही इथे सायकल चालवण्याकरता ह्याचे त्यांना भारी आश्चर्य वाटंत होतं.


बोलता बोलता सहा वाजले, ठार अंधार पडला होता. आता काय करायचे? कारण गावांत रहाण्याची फारशी सोय नसल्याचं दिसत होतं. गरीब लोकं, रोजची पोटभर खायची मारामार ते आम्हाला कुठे वाढणार, मुक्काम करता येईल असं मंदिर नव्हतं. तेव्हा  एटापल्लीलाच जायचा निर्णय घेतला. पण अंधारात जायचं कसं? ( अंधारात किंवा रात्री उशीरापर्यंत सायकल चालवण्याचा अनुभव नवा नव्हता. कारण मोहिमेच पहिले चारही दिवस आम्ही रात्री उशीरापर्यत - 10 वाजेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो ) . भिती होती ती नक्क्षलवाद्यांची आणि चूकुन भेटले तर वन्य प्राण्यांची.

आमची भिती सीआरपीएफच्या मोरक्याने लगेचच  निकालात काढली. तो म्हणाला हा तुमचा मार्ग म्हणजे पैड्री ते थेट चंद्रपूरपर्यंतचा भाग नक्षलग्रस्त आहे हे खरं. विशेषतः एटापल्ली रात्री जाण्यात धोका आहे आहे हेही खरं. पण नक्षलवादी सर्वसामान्यांना कधीच हात लावत नाहीत  ते फक्त सरकारी लोकांना, पोलिसांना त्रास देतात,हल्ला करतात. तेव्हा तुम्ही बेधडक जावा असा सल्ला मोरक्याने दिला. तसंच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या आता कमी झालीये, तेव्हा रात्री ससा दिसला तरी आनंद माना असंही त्याने आवर्जून सांगितलं.

सीआरपीएफचा निरोप घेत आम्ही सायकलवर टांग मारली, बॅट-या सायकलच्या हॅन्डलच्या मधोमध बांधल्या आणि एटापल्लीच्या दिशेने निघालो.  दोन्ही बाजूला दाट अंधार म्हणजे ते जंगल आणि मध्ये अंधार नसलेली जागा म्हणजे रस्ता असं आमचं अंदाजपंजे सायकलींग सुरु होतं.  अंधारात एकमेकांच्या सायकलींचा अंदाज घेता यावा यासाठी पांढरा टी-शर्ट, टॉवेल अंगावर घेतले. अधुनमधून मागचा किंवा पुढचा आहे की नाही किंवा जवळ आहे ना! याची खात्री करण्याकरता हाका मारत होतो, एवढा दाट अंधार होता, बॅटरीच्या प्रकाशात काहीही दिसत नव्हतं तरी त्या उगाच चालू ठेवल्या होत्या. असं असलं तरी सायकलींग आम्ही जाम एन्जॉय करत होतो.


एटापल्लीचा दूत

साधारण तासभर झाला असेल एक प्रचंड झोत असलेली एक गाडी आमच्या पूढे गेली.  पूढे एक वस्ती पार करतांना ती गाडी बाजूला उभी असलेली दिसली. परत थोड्या वेळाने ती आमच्या पूढे गेली. आम्ही अंधारात रस्ता शोधत सायकल चालवत असल्याने आम्ही गाडीकडे दुर्लक्ष केलं. एटापल्ली पासून साधारण 8 किलोमीटरवर असतांना तीच गाडी समोरून आली आमच्या पूढे थांबली,  लाईट तर अप्पर ठेवले होते,  त्यामुळे त्या प्रखर प्रकाशात आम्हाला काहीही दिसत नव्हते.  पण यामुळे  आम्ही घाबरलो, खरं तर आमची फाटलीच. चला आता भेट नक्षलवाद्यांशी, गाडी बहूधा आमच्या हालचालीवर नजर ठेवत असावी, नक्षलवाद्यांचा खबरी असावा, दरोडेखोर आहेत की काय़ या गाडीतील लोकं, आम्हाला लुटायला आलेत,  असा अनेक प्रश्न त्या अर्ध्या मिनीटांत आमच्या मनात येऊन गेले.


ती गाडी म्हणजे एक ओम्नी गाडी होती. एक व्यक्ति खाली उतरली आणि पूढे येऊन आमची विचारपूस करु लागली. आमच्या टाळक्यात काही शिरेना हा काय प्रकार आहे. ती व्यक्ति म्हणजे एटापल्लीतील एक वकील होता. आमच्या सायकली बघुन तो वकील थांबला आणि मदतीसाठी पूढे आला होता.   गाडीच्या लाईटमध्ये चला म्हणजे लवकर पोहचाल, मी तिथेच रहात असल्याने शेवटपर्यंत येतो असे त्याने सांगितले.

एव्हाना आमचा जीव भांड्यात पडला होता.  आम्हाच्या डोक्यात तोपर्यंत काय-काय विचार आले ते त्याला सांगितल्यावर तो चांगलाच हसला. घाबरू नका इथे नागरीकांना त्रास होत नसल्याचे त्यांनेही सांगितलं. त्या वकीलाने एटापल्लीपर्यंत आमची साथ केली आणि मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला मार्गी लावून दिलं आणि जाता जाता दुस-या दिवशी नाश्त्याचं आमंत्रणंही दिलं. ( त्याचं नाव सुद्धा विचित्र आहे, आता काही  आठवत नाही. )

एटापल्ली नंतर आलापल्ली, अहेरी असा सायकलने तर ( प्रकाश आमटेंचं ) हेमलकसा, भामरागड  जीपने फिरलो, बघितलं. तिथून चंद्रपूरपर्यंतही असंच जंगलातून सायकल दामटवत पोहचलो. पूढे दोन दिवसानंतर आनंदवनला बाबा आमटेंना भेटलो, एवढ्या मोठ्या देव माणसाबरोबर अर्धा तास गप्पा मारल्या, भारावून गेलो होतो. साधनाताई तसंच   विकास आमटेंशी बोलायला मिळाले, आनंदवन बघितले आणि नागपूराला मोहिमेची यशस्वी सांगता केली. 

ही संपूर्ण म्हणजे नक्की सांगायची तर 799 किलोमीटरची मोहिम आजही चांगली कालपरवा केल्यासारखी मनात घर करुन आहे. पण त्यापेक्षा पैड्री-हालेवारा-एटापल्लीचा सायकल प्रवास अविस्मरणीय, अदभृत, काहीसा घाबरवून सोडणारा,जोरदार सायकल हाणण्याची झींग पुन्हा पुन्हा अनूभवावी असा वाटणार ठरला.  हालेवाराच्या अपहरण प्रकरणावरून या प्रवासाची आठवण पुन्हा ताजी झाली एवढेच.....म्हणुन हा लिहिण्याचा नसता खटाटोप.                         

नौदल आणि हवामानाचा अंदाज

आपण परदेशातील हवामानाच्या विशेषतः पावसाच्या अंदाजाबाबत ऐकून असतो. अमुक वेळेला पाऊस पडणार आहे असं तिथे काही तास आधीच हवामान विभागातर्फ...