पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Monday, December 28, 2009

" साल्हेर " महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला" साल्हेर किल्ला " माझा सर्वात आवडता किल्ला.  विविध वैशिष्ट्ये मग ती भौगोलिक असो किंवा ऐतिहासिक असो, महाराष्ट्रीतील सर्वात उंच किल्ल्याचा मानकरी "साल्हेरं"   असल्यानं माझ्या भटकंतीमध्ये याचं स्थान सर्वात पहिलं आहे.

साल्हेर किल्ला नाशिक जिल्ह्यात बागलाण भागात गुजरात सीमेवरच्या डांग जिल्ह्याला खेटून   भक्कमपणे उभा आहे.  साल्हेरची उंची 1567 मीटर( 5141 फूट ) एवढी आहे.  कळसूबाईनंतर ( उंची 1646 मीटर- 5400 फूट ) धाकट्या भावाचा मान साल्हेरकडे जातो.  साल्हेर सर करण्यासाठी मुख्य चार मार्ग आहेत.

1....साल्हेरगावातून चढाई --  नाशिकहून सटाणामार्गे ताहराबाद गाठावयचे. तिथून ताहराबाद-मुल्हेर-साल्हेरवाडी असा एसटीने एक तास प्रवास करत पायथ्याशी असलेल्या साल्हेरवाडी गावांत पोहचता येते.  तिथूनच साल्हेरच्या पश्चिमेकडून ( फोटोमधील बाजू) तीन तासात चढाई करता येते.

2....वाघांबेमार्ग  --  ताहराबाद साल्हेरवाडी मार्गावर साल्हेरवाडीच्या अलिकडे तीन किलोमीटरवर वाघांबे गाव आहे. या गावातून साल्हेर आणि बाजूला असलेल्या सालोटा किल्ल्याच्या खिंडीतून अडीच तासांमध्ये चढाई करता येते.

3....माळदर मार्गे -- सटाणाहून माळदरला जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. मात्र हा मार्ग फारसा वापरात नाही. अर्थात घुमकड्डांना कुठलीही वाट चालते.( फोटोच्या मागील बाजूकडून चढाईचा मार्ग ).

4....बिलिमोरा मार्गे  --  मुंबईपासून साडेचार तासाच्या प्रवासावर पश्चिम रेल्वे मार्गावर गुजरातमध्ये बिलिमोरा हे छोटेसं जंक्शन आहे. बहुतेक सर्व पॅसेंजर गाड्या इथं थांबतात. या ठिकाण उतरून  32 किलोमीटरवर असलेले वाघाई गाव गाठत साल्हेरवाडीपर्यंत पोहचता येते.

साल्हेर किल्ल्याचे फक्त फोटो अनेक वर्ष पुस्तकात बघत आलो होतो आणि साल्हेरच्या इतिहासाबद्दल वाचत आलो होतो. मात्र साल्हेरचा ट्रेक करायचा योग काही येत नव्हता.  मात्र 2006 च्या डिसेंबरमध्ये असा योग आला. फक्त साल्हेर नाही तर एका दमात आजुबाजुचे किल्ले पालथे घालण्याचा  बेत नक्की झाला.  साल्हेरबरोबर त्याला खेटून उभा असलेला " सालोट ", महाभारतापासून उल्लेख असलेला बागुल राजाची( सन 1300 ते 1600 )   राजधानी असलेला आणि मुख्य म्हणजे तलवारीच्या मुल्हेरी मुठेसाठी प्रसिद्ध असलेला " मुल्हेर" किल्ला, मुल्हेरचा साथीदार " हरगड " किल्ला तसंच जैन धर्मीयांचं तिर्थक्षेत्र मांगी-तूंगी सुळके ह्यांची भटकंती घालण्याचा बेत आखला. माझ्याबरोबर माझे दोन तरूण सहकारी वामन कदम काका ( वय 65) आणि रमेश राणे ( 48) सहभागी झाले.

31 डिसेंबरला नाशिकला रात्री एक वाजता ठाणे-नंदूरबार एसटी पकडली आणि कडाक्याच्या थंडीत पहाटे पाच वाजता ताहराबादला उतरलो. एसटी स्टॅडच्या बाहेर असलेला चहावाल्याकडे चहा पित थंडीवर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला. डोंबिवलीतील थंडी किती किरकोळ आहे याचा चांगलाच अनुभव ट्रेकच्या पहिल्याच दिवशी आला. सकाळी आठ वाजता ताहराबादहून साल्हेरवाडीला जाणारी एसटी पकडली आणि साडेनऊ वाजता साल्हेरवाडीत उतरलो. हॉर्न सोडून सर्व काही वाजणा-या एसटीच्या प्रवासाचा अनुभव म्हणजे धमालच होती.


पाणी, बिस्किटे भरत सॅक पॅक केली आणि चढाईला सुरुवात केली. साल्हेरचा अजस्त्र कडा अक्षरशः अंगावर चाल करुन येत असल्यासारखा वाटत होता.  वेडेवाकडी वळणं घेत दगडात कोरलेले तीन दरवाजे आणि सुंदर कोरीव पाय-या चढत तीन तासांत अखेर साल्हेर किल्ल्यावर पोहचलो.गेली अनेक वर्ष ऊन-वारा सोसूनसुद्धा हे  दरवाजे, या पाय-या अजुनही सुस्थितीत आहेत , टिकाव धरुन आहेत.   हे सर्व पार केल्यावर किल्याच्या पठारावर पोहचलो. एका बाजूला पठार आणि दुस-या बाजूला आणखी साल्हेरचा उंच भाग नजरेस पडला. पठारावर एक तलाव दिसतो त्याला " गंगासागर " नावानं ओळखतात.  या तलावाचं पाणी काही महिने चक्क दुधाळ रंगाचं असतं म्हणुन ह्या तलावाला दुधी तलावंही म्हणतात. काही अज्ञात नैसर्गिक कारणामुळं या तलावाचं पाणी काही महिने दुधाळ रंगाचं असतं. पठारावर तलावाच्या बाजूला रेणूका मातेचं मंदिर आणि भग्नावस्थेत असलेलं गणेश मंदिरही लक्ष वेधुन घेतं होतं. तलाव, मंदिर मनोसोक्त, चारही बाजूंनी बघितल्यावर घड्याळ्यात सहज बघितले तेव्हा एक 12 वाजल्याचं लक्षात आलं.  तेव्हा मुक्काची व्यवस्था करण्यासाठी आम्ही गुहांमध्ये शिरलो आणि चपापलो.  सर्व गुहा शेणानं भरली होती, किल्ला चढून चांगलीच दमछाक झाली होती. थकवा जाणवत असतांना कामाला लागलो ती गुहा साफ करायला. रहाण्यापूरती जागा साफ केली पाठीवरचं सॅकचं ओझं काढलं आणि जेवण करायला घेतलं,  भूक भागवली आणि थोडा आराम केला.


त्यानंतर तीन वाजता उठलो, आवरा आवर करत आम्ही तडक निघालो ते किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर जायला. अर्ध्या तासातच किल्लाचा माथा गाठला तर लक्षात आलं की अरे इथंही एक पठार आहे. पठाराच्या पूर्व बाजूला परशूरामाचं मंदिर आणखी एका छोट्या टेकडीवर तग धरुन उभं आहे. पुन्हा एकदा  भराभर पावलं चालत अखेर सह्याद्रीतल्या या सर्वोच्च किल्ल्याचा माथा गाठला. सूर्य मावळायला अजुन बराच वेळ होता. तेव्हा पुस्तकं चाळत किल्ल्याच्या इतिहासात  डोकवायला सुरुवात केली.

साल्हेर किल्ला ओळखला जातो तो परशूरामाची तपोभूमी म्हणून.  जिंकलेल्या पृथ्वीचे दान करून स्वतःसाठी भूमी  मिळवण्यासाठी सागराला मागे हटवण्यासाठी परशूरामांनी बाण मारला तो याच भूमीवरुन असा संदर्भ मिळतो.

पण त्यापेक्षा  साल्हेर किल्ला लक्षात रहातो या भागात झालेल्या मराठ्यांच्या पहिल्यावाहिल्या मैदानी लढाईमुळे. 1671 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी बागलाण भागात मोहिम उघडली आणि या भागातील सर्व किल्ले जिंकून घेतले. यामुळं खवळलेल्या दिल्लीतील औरंगजेबानं 20 हजार घोडेस्वारांसह एक लाखापेक्षा जास्त फौजफाटा पाठवला. प्रतारराव सरनौबतांच्या  नेतृत्वाखाली मराठ्यांची एका लाख 20 हजारांची सेना मुघलांना भिडली. मराठ्यांच्या इतिहासात पहिल्यांदाचा गमिनी कावा सोडून मैदानावर तुंबळ लढाई झाली. मराठ्यांनी 10 हजार मावळे गमावले मात्र मुगलांची अर्ध्यापैक्षा जास्त फौज कापून काढली आणि मोगलांना सळो की पळो करुन सोडलं. सहा हजार पेक्षा जास्त घोडे, उंट, सव्वाशे हत्ती आणि मोठा खजिना मराठ्यांच्या हाती लागला. या मैदानी लढाईतील विजयानं शिवाजी महाराजांच्या कारकिरर्दीत एक सोनेरी पान लिहिलं गेले. सुरतच्या मार्गावर साल्हेरचा बागलण परिसर येत असल्यानं महाराजांनी हा भाग जिंकत सुरतवर आपली दहशत ठेवली.


इतिहास वाचता वाचता संध्याकाळ कधी झाली ते समजलंच नाही. सूर्य नारायण झपाझप अस्ताला जात होता. माणसांची गर्दी, लोकवस्ती जवळपाससुद्धा नसल्यानं एक भयाण शांतता होती. मात्र सोसाट्याचा वारा अधुनमधुन आवाज करत शांतता भंग करु पाहत होता. सूर्य अस्ताला जात असतांना भगव्या रंगाची छटा दर मिनिटाला रंग बदलं होती.  ती रंगाची अनोखी उधळण आजही मनात कायम घर ठेवून आहे. गंमत म्हणजे हे सर्व बघत असतांना फोटो काढयचा राहून गेला एवढं मी भान विसरलो होतो. सूर्य अस्ताला गेल्यावर एक वेगळीच शांतता भरून राहिली. अंधार पडायच्या आत खाली उतरून गुहेत आलो आणि रात्रीच्या जेवणाच्या कामाला लागलो.


दुस-या दिवशी सालोटा गाठायचा होता, तेव्हा साल्हेरच्या पूर्वकडे निघालो. काही पाण्याच्या छोट्या टाक्या, घरांच्या अवशेषांची पहाणी करत साल्हेरच्या पूर्व टोकाला पोहचलो. आता सालोटा व्यवस्थीत नजरेस दिसत होता. मात्र  या वाटेवर  डाव्या बाजूला तीव्र उतार, तर उजव्या हाताला अनेक गुहांची रांगच सुरु झाली होती. त्यानंतर कोरीव दरवाज्यांची कोरीव पाय-यांची मालिका सुरु झाली. 

अवघड उतार पाय-या कोरत सोपा केला होता. झपाझप उतरायला सुरुवात केली पण पाय-या काही संपता संपेना.   साल्हेरच्या विविधतेचं ते रुप डोळ्यात साठवत समोरंच असलेल्या सालोटा किल्ल्याकडे निघालो. अर्ध्या तासातंच सालोटा गाठला आणि सालोटा चढाईला सुरुवात केली. अर्धा किल्ला चढून जात असतांना सहज मागे बघितलं आणि साल्हेरचा एक वेगळं रुप बघुन धडकीच भरली.  किल्लाच्या या वाटेनं कसं काय आम्ही उतरलो असा विचार करु लागलो कारण उतार प्रचंड तीव्र दिसत होता.
मात्र पाय-या आणि दरवाज्यांच्या सुंदर आखणीनं, बांधणीनं ही वाट सोपी करुन टाकली होती. साल्हेर आता अजुनच अवाढव्य, अजस्त्र असा दिसत होता. परशुरामाचं मंदिर तर अगदी सुईच्या टोकासारखं दिसत होतं. किल्ल्याच्या या पूर्व बाजूवर दोन्ही बाजूंनी तीव्र उतार आणि या उतारावर अत्यंत कौशल्यानं बांधलेली आडवी वाट स्पष्ट दिसत होती. एकंदरितच साल्हेरचं हे वेगळं रुपडं आणखीनच मनात घर करुन बसलं.  पुन्हा पुन्हा साल्हेरचं रुप डोळ्यात साठवंत सालोटा बघण्यासाठी तंगडतोड करायला सुरुवात केली.

सालोटा किल्ला झाला, दोन दिवसांत मुल्हेर झाला, बाजुचा हरगड झाला, वेळेअभावी मांगीतूंगी बाजूला ठेवत पुन्हा येईन तुला बघायला असं सांगत ताहाराबादला परतलो.  आता या ट्रेकला तीन वर्ष उलटली पण अजुनही साल्हेर काही मनातून हटत नाहीये. पुन्हा कोणी साल्हेरला येतो का असं विचारलं तर एका पायावर तयार होईल एवढा तो माझा आवडता किल्ला झाला आहे.