पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Saturday, January 8, 2011

मुंबईच्या लोकल प्रवासाची,प्रवाशाची गुण वैशिष्ट्ये


सर्वधर्म - जात - व्यक्ति समभावाचे उदाहरण म्हणजे मुंबई लोकल
देशाची आर्थिक राजधानी, चित्रपट व्यवसायाचे केंद्र, नोकरी धंदा मिळवून देणारे, कोणाला उपाशी न ठेवणारे शहर म्हणून मुंबईची देशात नव्हे तर जगात ओळख आहे.  तर मुंबईची जीवनरेखा, स्वस्त आणि जलद प्रवासी वाहतूकीचे साधन असलेली लोकल ही मुंबईत सर्वांच्या परिचयाची आहे, ओळखीची  आहे. मुंबईत मोठा झालेला किंवा मुंबईने मोठा केलेला, मुंबईत काम करणारा, रहाणारा, येणारा-जाणारा  प्रत्येक जण मुंबईच्या लोकलचा प्रवासी कधी ना कधी झालेला आहे. मग तो सचिन तेंडुलकर असो किंवा अमिताभ बच्चन.

भारतात रेल्वे प्रवाशांची संख्या दीड कोटींच्या घरात आहे. त्यापैकी जवळजवळ निम्मे प्रवासी म्हणजे 65 लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे एकट्या मुंबईत तेही लोकलने प्रवास करणारे आहेत. सीएसटी ते कसारा ( 120 किमी ), खोपोली ( 115 किमी ) , पनवेल ( 49 किमी ) तर चर्चगेट ते  विरार ( 60 किमी ) , यापूढे लवकरच डहाणू ( 124 किमी ) असा मुंबई लोकल रेल्वेचा पसारा वाढलेला आहे.  मुंबई लोकलने ठाणे जिल्ह्यातील ही शहरे जवळ आणली असून जणू काही ती मुंबईतच आहेत अशी सहजता लोकलच्या अस्तित्वाने आली आहे. असो.......

मुंबईमध्ये, उपनगरांत आलेली व्यक्ती जेव्हा सहजपणे लोकलने प्रवास करते तेव्हा ती ख-या अर्थाने मुंबईकर झालेली असते , तसे गुण  त्या व्यक्तीमध्ये आलेले असतात.  कुठकुठले गुणवैशिष्ट्ये ते बघूयात. 


वक्तशिरपणा
लोकलचे समीकरण हे मिनीटावर ठरलेले असते. म्हणजे 8.47 ची सीएसटी फास्ट, 7.47 ची बोरिवली स्लो.., वगैरे. त्यामुळे लोकल प्रवाशाच्या आयुष्यात मिनीटाला महत्व प्राप्त झालेले असते.  त्यामुळे लोकलने प्रवास करणारा प्रवासी आयुष्यातही प्रचंड व्यक्तशीर झालेला असतो.

चपळता
लोकल प्रवासी मग तो म्हातारा असो, तरुण असो किंवा स्वभावाने आळशी असो तो अत्यंत चपळ बनतो. तरुण माफ करा तरुणींमध्येही असणारा उत्साह लोकल प्रवाशांमध्ये असतो.  लोकल पकडण्यासाठी घर सोडतांना, रिक्क्षा किंवा बस पकडेपर्यंत, त्यानंतर स्टेशनच्या  पाय-या पळत चढून उतरेपर्यंत आणि मुख्य म्हणजे धावत लोकल पकडेपर्यंत अचाट असा वेगवानपणा-चपळता लोकल प्रवाशांत आलेली असते. 

अचाट शक्ती
गर्दी आणि लोकल असं समिकरण ठरून गेलं आहे.  सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ असो किंवा रविवारचा सुटीचा दिवस असो लोकलमध्ये गर्दी नाही असा एकही दिवस सहज जात नाही. लोकलच्या डब्यात सहज असा कधी प्रवेश मिळत नाही. तेव्हा " ताकद लावून, वेळप्रसंगी " असे शब्द कशाला , नेहमीच धक्काबूक्की करत आत शिरावे लागते. तेव्हा कुठल्याही वयोगटाच्या लोकल प्रवाशाला एका पायावर जास्तीत जास्त वेळ उभं रहाण्याची, ढकलण्याची, वेळप्रसंगी हॅडलला पकडून पूढेच स्टेशन येईपर्यंत गर्दीला सांभाळत दरवाजात लटकण्याची शक्ती आपोआप प्राप्त होते. 

भांडखोरपणा
स्वभावाने शांत व्यक्तीसुद्धा लोकल प्रवासात वेळ आल्यावर जगदम्नीचे रुप धारण करते. लोकलमध्ये पायावर पाय पडला, जागा मिळाली नाही, कोणाचा धक्का लागला अशी कुठलेही कारणे व्यक्तीला राग येण्यास पुरेशी ठरतात. फक्त राग येऊन चालत नाही, तर समोरच्या आवाजाच्या वरच्या पट्टीत आवाजही चढवता येतो किंवा तसे कौशल्य आपोआप प्राप्त होते.   

सहनशीलता
स्वभावाने अत्यंत भडक असो, शांत,प्रेमळ, हूशार, चिकित्सक वगैरे असे कुठलेहे गुणधर्म असलेला लोकल प्रवासी अत्यंत सहनशील असतो. लोकल उशीरा आली तरी वाट बघत बसणे, ऑफिसमधला दिवस वाईट गेलेला असूनही अत्यंत शांतपणे लोकल पकडणे, सीएसटीला लोकल पकडून जागा मिळाली नसतांनाही डोंबिवलीपर्यंत कटकट न करता उभ्याने प्रवास करणे अशा विविध प्रसंगातून सहनशीलतेचे सुंदर दर्शन होते.
    
एवढंच नाही तर गर्दीत विविध सुगंध झेलण्याची ताकद कम सहनशीलता लोकल प्रवाशात असते. गर्दीमध्ये शेजारच्या माणसाचा गुटखा किंवा घामाचा दुर्गंध नाक मुरडत-नाकावर रुमाल दाबत कितीतरी वेळ सहन करण्याचा सहशीलपणा येतो. दुस-यांचे भांडण सुरु असतांना धक्का लागत असतांना, आवाजाची कटकट होत असतांना, भजनी मंडळांचा भोंगा त्यांचा मुक्काम येईपर्यंत ऐकण्याचा सहनशीलपणा आपोआप येतो.   

मिळून मिसळून वागण्याची वृत्ती
लोकल पकडतांना एखादी ठराविक वेळेची लोकल त्यातही ठराविक लोकलचा डबा पकडण्याकडे  कल असतो. त्यामुळे लांबवर रहाणा-या प्रवाशाचा अनोळखी चेहराही परिचित होतो.  कदाचीत त्या व्यक्ती कित्येक वर्षात एकमेकांशी बोलतंही नाहीत, मात्र जागा देतांना एक प्रकारचा आपलेपणा आलेला असतो, त्या ओळखीच्या व्यक्तीला आपोआप प्राधान्य दिले जाते.

एकाच स्टेशनवर  एकच लोकल गाडी, एकच डबा  पकडणा-या व्यक्तींमध्ये एक प्रकारची एकी निर्माण होते. मग तो मराठी असो, गुजराती असो किंवा दक्षिण भारतीय असो.  या व्यक्ती कोण कोणत्या ठिकाणी जॉब करत आहेत, कुठल्या पदावर आहे, किती पगार आहे या सर्व गोष्टी गौण ठरतात. किंबहूना याबद्दल माहिती करुन घ्यावीशी कोणाला वाटतही नाही आणि कोण तसदीही घेत नाही.  एवढंच नाही अनेकांना एकमेकांची नावेही माहिती नसतात.

दसरा, दिवाळीचा फराळ, एखाद्याचा वाढदिवस, लग्नाची पार्टी असे विविध आनंदोत्सव या  ग्रुपमध्ये साजरे होतात. संध्याकाळी घरी परतांना गप्पा मारतांना पेटपूजा होण्यासाठी एखाद्या ठराविक स्टेशनवरून समोसा, पाण्याची बाटली विकत घेतली जाते. आलटून पालटून प्रत्येकाने पैसे शेअर करायचे असतात हा अलिखित नियम असतो.

एवढंच नाही तर एखाद्या अनोळख्या व्यक्तीला चक्कर आली, लोकल पकडतांना व्यक्ती पडणार आहे तेव्हा अनामिक हात मदतीसाठी पूढे सरसावले जातात.  अशी मिळून मिसळून वागण्याची, मदत करण्याची वृत्ती लोकल प्रवाशांच्या अंगात भिनली जाते.

निगरगट्टपणा
कदाचित हा गूण बघून कदाचित आश्चर्यं वाटेल. कारण या आधीच्या गुणवैशिष्ट्यापेक्षा अतिशय विरुद्ध असा हा गुण आहे. पण मुंबईच्या लोकल प्रवासातील हे एक वास्तव आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म -रेल्वे ट्रॅकवर पडलेली व्यक्ति असो  नसती झंझट म्हणून मदतीचा हात अनेकदा पूढे येत नाही.  आपण बरा, आपली फॅमिली बरी, पोलिस स्टेशन फे-या कोणाला हव्या आहेत, ऑफिस गाठायचे आहे वगैरे अशा विचारांनी माणूसकीही तेवढीच लोकलच्या गर्दीत हरवत चालली आहे.

अशा गुणवैशिष्ट्यांसह मुंबई लोकल धावत आहे, प्रवासी प्रवास करत आहेत. लोकलमधील प्रवाशांची गर्दी वाढत आहे आणि लोकल गाड्यांची संख्या वाढत आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या गुणवैशिष्ट्यांमध्ये काहीही फरक पडणार नाहीत. " व्यक्ति तितक्या प्रवृती " प्रमाणे हे सर्व गुण कुठल्या ना कुठल्या प्रवाशांमध्ये आहेत आणि या सर्वांना जलद-स्वस्त प्रवासाचा आनंद देत लोकल धावत आहे, धावत रहाणार आहे.......