Monday, March 8, 2010

तापोळा - महाराष्ट्राचे दल लेक

शिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर
तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात,  माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड,  डोळ्याचे पारणे फिटवणारे आहे.  तापोळा  कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे.  एखाद्या महासागराएवढी व्याप्ती, निळं पाणी, प्रदुषण मुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचं वर्णन करता येईल.

तापोळ्याला जाणार रस्ता.....
महाबळेश्वरच्या बाजारपेठेतून पलिकडे जाणारा रस्ता पकडायचा. दिशादर्शक बोर्ड वगैरे बघण्याच्या भानगडीत पडायचे नाही कारण दुकाने आणि माणसांच्या गर्दीत तो दिसत नाही, सापडत नाही. महाबळेश्वरपासून 27 किलोमीटरवर तापोळा हे पर्यंटन ठिकाण आहे.  स्वतःची गाडी, त्यात बाईक असेल तर उत्तम, नाहीतर एस.टी. महामंडळाची सेवा आहेच,  कुठल्याही वाहनाने निघायचे.  गजबजलेले महाबळेश्वर मागे सोडले की दाट झाडीतून जाणा-या रस्ताने किलोमीटरचा दगड बघत जात पूढे जात रहायचे.
  
  
गर्द झाडीमुळे महाबळेश्वरच्या उंचीपासून खाली उतरत  असतांनाही थंडी वाजत रहाते. साधारण  सात किलोमीटरनंतर गर्द झाडी संपते आणि खोल    द-या-डोंगर ह्यांचे दर्शन होते. तिथं एक चहाची टपरी आहे. थंड  वातावरणात चहा पिण्यासाठी थांबायचे, हे मात्र निमित्त.  कारण तिथून दिसणा-या हिरव्या रंगाच्या छटा बघण्याची संधी सोडायची नाही.   फक्त महाबळेश्वरच नाही तर आजुबाजुचा परिसर कसा हिरवागार आहे याचा प्रत्यय इथे येतो. मनोसोक्त फोटो काढायचे आणि पुढे निघायचे.  एव्हाना गुळगुळीत असलेला रस्त्याची तब्येत बिघडलेली असते.  खाचखळग्यांमधुन कसरत करत, मध्येच स्ट्रॉबेरीची शेतं बघत पुढे जात असतांना कोयनेचे बॅकवॉटर -शिवसागर जलाशय दिसायला लागतो.  शिवसागर जलाशयाच्या सुंदर दृश्यामुळे पुन्हा एकदा गाडी थांबवत  फोटो काढण्याचा मोह टाळता येत नाही. वाटेत लागणारी छोटी गावे पार करत तापोळ्यात कधी पोहचतो ते कळतंही नाही.अथांग जलाशयाच्या काठावरचे तापोळा


 1956 ला कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1962 ला धरणात पाणी भरायला लागले. त्यामुळे कोयना नदीच्या काठावरची अनेक गावे विस्थापित झाली. त्यातील अनेक गावांपैकी एक तापोळा गाव.  आत्ताच्या जलाशयाच्या खाली असलेली गावे पाण्याचा फुगवठा बघुन काठावर वसवण्यात आली.  महाबळेश्वरपासून इथे येण्यासाठी रस्ता ( काही वर्षापूर्वी डांबरी रस्ता करण्यात आला ) , तसंच  जलाशयाच्या काठावरचे गाव म्हणुन गेल्या 15 वर्षात तापोळा गाव पर्यटनासाठी विकसित व्हायला सुरुवात झाली.  इन-मीन पाच-पन्नास घरांचे हे गांव पर्यंटनाचा वाढता लोंढा झेलण्यासाठी सज्ज होत आहे.


अफाट जलाशय आणि पर्यंटन स्थळे

तापोळ्यात दोन बोट क्लब आहेत. दोन्ही क्लबकडे सारख्याच सुविधा असुन दरही सारखेच आहेत. कुठल्याही एका बोट क्लबकडे जायचे आणि जलाशयाच्या तीरावरचे पर्यंटन स्थळ ठरवून, आपल्या ग्रुपमधील सदस्य संख्या लक्षात घेत  आणि मुख्य म्हणजे  टूरचे दर बघत प्रवास निश्चित करायचा.  मोटर बोट  ( 12 जण प्रवास करु शकतात - वेग चांगला ),  स्पीड बोट (  चार प्रवासी - वेग अधिक ),  स्कुटर बोट( एक प्रवासी- वेग सर्वात जास्त ) .
  
शिवसागर दर्शन - कुठलीही बोट घेतली तरी ह्याची फेरी 45 मिनीटांत संपते. साधारण सहा किलोमीटरच्या फेरीमध्ये  तापोळ्यासह  काठाने जाता जाता जलाशयाच्या मध्यभागी नेत अथांग जलाशयाचे दर्शन घडवले जाते.


त्रिवेणी संगम   -  साधारण 12 किलोमीटरच्या फेरीसाठी दीड तास लागतो. कोयना, कंडकी, चोळशी अशा तीन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी जाऊन ही टूर संपते. संगमाच्या ठिकाणी नेल्यावर बोट थांबवल्यावर बोट चालक जे सांगतो त्यामुळे काही काळ धडकी भरते. संगमाच्या ठिकाणी काय किंवा जलाशयाच्या दोन्ही काठाच्या मधे पाण्याची खोली 400 ते 450 फुट असल्याचे बोट चालक सांगतो आणि या अफाट जलाशयाचे खरं रुप कळते.

दत्त मंदिर -  20 किलोमीटरची ही सफर अडीच तासांत संपते.  या ठिकाणी जातांना त्रिवेणी संगम पार करत काठावरच्या विनायक नगर नावाच्या एका गावाच्या ठिकाणी आपण पोहचतो.  या ठिकाणी कोण्या एका भक्ताने छोटेखानी दत्त मंदिराची स्थापना केलीये. भक्तांसाठी मठंही उभारला असल्याने  दत्त भक्तांची इथे गर्दी असते. मात्र हे मंदिर प्रत्यक्षात जलाशयाच्या काठापासून थोडे आत आहे.  या स्पॉटवर उतरल्यावर आधी दिसते ते शिवमंदिर.  थोडसे भूयारात असलेल्या मंदिराची वेगळीच अनोखी रचना आहे.  पोटपुजेसाठी वडापावची टपरीही आहे. शांत परिसर आणि अफाट जलाशयाचं दृश्य बघतांना  वेळ कसा जातो ते कळत नाही. सातारा- कास पठार- बामणोली ते विनायक नगर असा रस्ता आहे.  त्यामुळे इथुन साताराही गाठता येते.  विनायक नगर गावापासून धरणाच्या भिंतीपर्यंत कच्चा रस्ता जातो.  कोयना धरणाच्या निरिक्षणासाठी हा बांधण्यात आला आहे.  या मार्गावरही काही गावे आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटतो तो याच गावांचा.    

वासोटा किल्ला -  जलाशय आणि कोकणातील खेड ह्यांच्या बरोबरमध्ये सह्याद्रीच्या डोंगरावर जंगलात लपलेल्या वासोटा किल्ल्याची सफर चार तासांत पूर्ण होते. साधारण तापोळ्यापासून 30 किलोमीटरवर असलेल्या काठावरुन वासोट्याकडे मार्ग जातो. खरं तर  दुरुन फक्त दर्शन घडवलं जातं. वासोटा किल्ला पालथा घालायला दोन दिवस तरी हवेत.  

कोयना अभयारण्य -  40  किलोमीटर वर असलेल्या कोयना अभयारण्याची सफर पाच तासांत पूर्ण होते. त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, वासोटा स्पॉट पार करत उजवीकडे असलेल्या सह्याद्रीच्या जंगलातील ही सफर म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. हाच परिसर आता राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्य्र प्रकल्प या नावाने जाहिर झाला आहे.

कोयना धरण  -  तापोळ्यापासून कोयना धरणाची भिंत तब्बल 85 किलोमीटर आहे.   एवढ्या लांब पल्ल्यासाठी मोटर बोटंच योग्य. तिथे जाऊन परत येण्यासाठी तब्बल 10 तास लागतात.  अर्थात या फेरीचा  दर पाच  हजार रुपयांच्या घरात आहे.  तेव्हा  ग्रुप असेल आणि मुख्य म्हणजे वेळ असेल तर ही सफर करता येईल.  मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणुन धरणाच्या भिंतीजवळ जायला परवानगी नाही. तेव्हा भिंत जवळ आल्यावर जलाशयाच्या डावीकडच्या काठाने भिंतीपासून  फक्त काही किलोमीटर अंतरावर  थांबत  सफर पूर्ण केली जाते.  


कास पठार - तापोळ्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर जलाशयाच्या डावीकडे असलेला डोंगर म्हणजे महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर - प्रसिद्ध कास पठार. त्याच्या पायथ्याशी आणि जलाशयाच्या काठावर बामणोली गावातून त्या ठिकाणी जाता येईल. पण तिथे जाण्याचे दिवस  म्हणजे गौरी-गणपती आणि ऑक्टोबर हिट सुरु होण्याचा मधला काळ . कारण याच दिवसांत या पठारावर अप्रतिम असा फुलोरा फुलतो.  तसंच साता-याहून कास पठार पार करत बामणोलीमधून  लाँच करत वासोटा किल्ल्याकडे गिर्यारोहक जातात. 

मात्र यापैकी काहीही न बघणारेही महाभाग असतात. ते फक्त वेगवान स्कुटर बोटने जलाशयामध्ये मनोसोक्त चक्कर मारत बसतात. पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठीही इथे चांगली सोय असल्यानं फिरुन दमल्यावर मनोसोक्त जेवणाचा आनंद मिळतो. 


शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरावर अनेक गावं वसलेली आहेत. गावक-यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे प्रवासी बोट. या गावांतील लोकांसाठी ही सेवा नाममात्र  शुल्कामध्ये उपलब्ध आहे.  मात्र पर्यटकांकडुन चांगले पैसे वसुल केले जातात. विशेष म्हणजे पर्यटकांसाठीच्या बोटी आणि तिथल्या व्यवसायात  स्थानिक लोकांनीच पैसे गुंतवले आहेत. म्हणजे परक्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक लोकांनीच निकाली लावला आहे.  तापोळ्याचा सिझन म्हणजे उन्हाळा कारण खो-याने इथं पर्यंटक येतात आणि स्थानिकांचा चांगला व्यवसाय होतो. तरीही पावसाळा वगळता इतर महिन्यात शनिवार-रविवारी, सुटीच्या दिवशी चांगली गर्दी असते. इथे येण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी.  असं दल लेकपेक्षा उत्कृष्ठ पर्यंटन स्थळ असलेले तापोळा मनात कायमची आठण करुन रहाते.

'मंगल मिशन' चित्रपट, एक Disaster.....

चित्रपटात लिबर्टी घेत आहोत असं एकदा सुरुवातीला स्पष्ट केल्यावर काहीही करता येतं, काहीही दाखवायला चित्रपट निर्माते मोकळे. हे एका अर्थ...