पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, August 22, 2010

देवांचे हरामखोर भक्त


असं वेडवाकडं हेडिंग बघून आणि त्यात साईबाबांचा फोटो बघुन तुम्हाला राग सुद्धा आला असेल. पण कोणा देवाबद्दल हे नाहीये. ( खरं तर देव मी मानत नाही ) आणि कोणा भक्तांच्या भावनेला धक्का लावायचा नाहीये.  पण शिर्डीला गेल्यावर, आंनदाच्या वारीची यात्रा केल्यावर असे काही वाईट अनुभव आल्यानं लिहायचे वाटले. म्हणून पुन्हा एकदा ब्लॉग लिहित,  कि-बोर्ड बडवायला सुरुवात केली आहे.

ठिकाण - शिर्डीचे साईबाबांचे मंदिर

 दोन वर्षांपूर्वी रामवनमी निमित्त झी 24 ताससाठी कव्हरेजसाठी गेलो होतो. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता पोहचूनसुद्धा पहाटे सव्वा चार वाजता काकड आरतीला  कॅमे-याच्या चंबूगबाळ्यासह हजेरी लावली. आरती झाली सकाळी  दोन चार वेळा लाईव्ह ( थेट प्रक्षेपण ) झालं.  मंदिरातील वाढत्या गर्दीचा आढावा ( Walkthrough ) घेण्यासाठी मंदिरामध्ये झालेल्या गर्दीत मिसळलो. गर्दी कशी आहे, वाढत आहे, पालख्या कशा वाजत गाजत दाखल होत आहेत याबद्दल कव्हरेज करत होतो.

अचानक मला धक्काबुक्की करायला तिथे आलेल्या पालखीतल्या काही लोकांनी सुरुवात केली. मंदिरात पालखीसह येऊनसुद्धा साईंचं दर्शन लवकर मिळत नसल्यानं त्यांनी  राग असा  माझ्यावर  काढला. प्रकरण एवढंच थांबलं नाही तर गर्दीचा फायदा घेत काहींनी मला चिमटे काढायला सुरुवात केली.  काही लोकं चक्क दारुचा चांगला एक डोस घेऊनंच आली होती. माझा कव्हरेज होईपर्यंत मी काही मिनिटे संयम बाळगला. मग मात्र मला राहवेना, मी पटकन वळत एकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तो निसटला खरा पण आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात सगळे चेहरे करुन मला बघत होते. म्हंटलं अरे मंदिरात तरी अशी गुंडगिरी करु नका. उलट माझ्य़ावर ते हसायला लागले.  मी एकटा होता आणि ते पाचपन्नास तरी होते. मुख्य म्हणजे मी कव्हरेजला होतो त्यामुळे काहीही करु शकलो नाही.  शेवटी पालखीला काही प्रवेश मिळाला नाहीच.
ठिकाण  - माळशिरस -  माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाची जागा- वेळ रात्रीचे 10 वा.

अवघ्या चार  दिवसानंतर आषाढी एकादशी आली असतांना वारक-यांच्या " पुढा-यां " च्या बैठकीत जाहिर करण्यात आलं की मागण्या मान्य केल्याशिवाय एकही पालखी पंढरपूरात प्रवेश करणार नाही.  मागण्या काय तर संतांबद्दल आक्षेपार्ह लिहाणा-या मराठा समाजाच्या लेखकांबद्दल कारवाई करावी,  वारक-यांना न जुमानणा-या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी बदलावेत.  मी Interview  घेतांना प्रश्न विचारला की तुम्ही इतके महिने हे विषय माहिती नव्हते का, आजचं का तुम्हाला मागण्या सरकारकडे कराव्याशा वाटल्या. त्यांच्याकडे ह्याचं उत्तर नव्हतं, म्हणून त्यांनी कसं संताबद्दल कसं वाईट लिहिलं आहे ते सांगायला सुरुवात केली.

पुढचा प्रश्न विचारला की सर्वसामान्य  वारक-याला याबद्दल काहीही माहिती नाहीये,  तो फक्त पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने वारीत सहभागी होत असतो , तुम्ही त्यांची मतं तरी लक्षात घेतली का? .  याचंही त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.  पण जोराने बोलणे, ( फालतू, निरर्थक ) मुद्दा तावातावाने मांडणे  हे चालुच होते. शेवटी एकही मागण्या मान्य झाल्या तर नाहीच  आणि  त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर मात्र जाण्याची हिंमत त्यांची काही झाली नाही.


ठिकाण महाबळेश्वर- मराठी साहित्य संमेलन

संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव ह्यांनी अध्यक्षपद भूषवू नये नाहीतर संमलेन उधळून लावू.  एखाद्या " लष्कर ए तोय्यबा "  संघटनेसारखी धमकी दिली होती वारक-यांच्या संघटनेनं.  आनंद यादवांनी त्यांच्या " संतसूर्य तुकाराम "  कादंबरीमध्य़े लिहिलेल्या लिखाणाबद्दल ( नाईलाजाने ) वारक-यांची माफी मागितली, तुकाराम मंदिरात ते पायाही पडले. एवढ्यानं वारक-यांचे समाधान काही झाले नव्हते. त्यांचा निषेधाचा जोर काही कमी होत नव्हता. शेवटी आनंद यादवांनी साहित्य संमेलनाला येणं टाळलंच. सर्वात कहर म्हणजे लिखाणाचं स्वातंत्र्याचं ज्यांचा आत्मा अशा साहित्यीकांनी                वारक-यांविरोधात निषेधाचा सूरही काढला नाही.     


ठिकाण- जेजुरीचा खंडोबा .

अष्टविनायक  सायकल मोहिमेत जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी तीन तास आम्ही काढले. मंदिराच्या गाभा-यात पोहचलो. नमस्कार करत होतो, खरं तर किती देवाच्या मुर्त्या, कोणकोणत्या आहेत,  कशा सजवल्या आहेत. ते बघत होतो. अचानक देवाचा पुजारीने माझा हात पकडला, डोकं ठेवा, पटापट काही श्लोक म्हणायला सुरुवात केली, भंडारा लावला  आणि सांगितले की दक्षिणा ठेवा.          मी सांगितलं की मला दक्षिणा द्यायची नाहीये.  त्यावर तो चक्क भडकला,  मीही त्याला उलट उत्तर दिले. सहज माझे लक्ष देवाच्या समोर ठेवलेल्या पैशांकडे गेले. तिथे चक्क 500 आणि 1000 रुपयांच्या कित्येक नोटा ठेवल्या होत्या.

प्रश्न असा की  किती नोटा (  दक्षिणा )  या पुजा-यांनी भोळ्या-भाबड्या लोकांकडुन घेतल्या असतील, किती खिशात, घातल्या असतील याची कल्पनाच करवत नाही.


असे अनेक चांगले-वाईट खरं तर वाईटच  अनुभन देवांच्या भाऊगर्दीत आले. त्यामुळं अनेक देवस्थानांना एकप्रकारे बाजारु स्वरुप आले आहे. म्हणूनच मी देव दर्शनाच्या उद्देशाने कधीच जात नाही, तिथले वैविध्यपण, नवेपणा अनुभवण्यासाठी बघण्यासाठी जातो.  निसर्ग, काहीतरी नवीन माहिती तिकडच्या ठिकाणाबद्दल मिळेल या उद्देशाने जातो. कारण देवांच्या या हरामखोर भक्तांनी तिर्थस्थळे विकृत केली आहेत, भक्तीचा बाजार केला आहे, भक्तांना लुटलं आहे.