पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Saturday, May 27, 2017

इस्रोच्या हनुमान उडीची नांदी ५ जूनला.....
जूनचा पहिला आठवडा ( पाच जून ) हा दिवस भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी जीएसएलव्ही मार्क - ३ ( GSLV MK 3 ) हे प्रक्षेपक म्हणजेच रॉकेट GSAT -19 हा ३.२ टन वजनाचा उपग्रह अवकाशात भुस्थिर कक्षेसाठी प्रक्षेपित करणार आहे. या उड्डाणाचे काय वैशिष्ट्य आहे ते बघुया.

देशात वाहिन्यांची - चॅनेलची, इंटरनेट सेवेची, टेलिमेडिसीन, हवामानाबद्द्लच्या अपडेटची, संरक्षणदृष्ट्या संदेशवहनासाठी, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी भुस्थिर उपग्रहांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हे भुस्थिर उपग्रह पृथ्वीपासून सुमारे ३६ हजार किमी एवढ्या उंचीवरुन पृथ्वीभोवती भ्रमण करत असतात. या उंचीवरुन फिरणारा उपग्रह जेव्हा पृथ्वीच्या परिवलन गतीबरोबर म्हणजेच पृथ्वी स्वत:भोवती फिरतांना ज्या वेगाने फिरते त्या वेगाशी समांतर फिरतो तेव्हा तो उपग्रह सतत त्याच जागी भासतो. 

अशा उपग्रहांवर जेवढी कामगिरी जास्त तेवढे ते अधिक वजनाचे, आकाराने मोठे असतात. साधारण जास्त कार्यकाल आणि जास्त कामगिरी सोपवलेल्या उपग्रहांचे वजन हे सध्याच्या काळात ३ टनापेक्षा जास्त आहे. 
भारताकडे सध्या दोन प्रकारचे प्रक्षेपक - रॉकेट आहेत जे उपग्रह प्रक्षेपित करत आहेत. 

भारताचा ज्या प्रक्षेपकावर सर्वात जास्त भरवसा आहे आणि ज्या प्रक्षेपकाने सलग 37 मोहिमा यशस्वी केल्या आहेत त्याचे नाव आहे पीएसएलव्ही - PSLV. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाचा कमी उंचीपर्यंत म्हणजे 900 किमी उंचीपर्यंत कमी वजनाचे उपग्रह सोडण्यात हातखंडा आहे. तर भुस्थिर कक्षेपर्यंत पीएसएलव्ही जास्तीत जास्त ( फक्त ) १४०० किलो म्हणजेच १.४ टन वजनाचे उपग्रह वाहून नेऊ शकते.

जीएसएलव्ही मार्क - १,  जे आकाराने आणि वजनाने पीएसएलव्ही पेक्षा मोठे आहे, ज्यामध्ये रशियाचे क्रायोजेनिक इंजिन आपण वापरले , ते प्रक्षेपक भुस्थिर कक्षेपर्यंत १९०० किलो वजनाचा उपग्रह वाहून नेऊ शकत होते.

जीएसएलव्ही मार्क - २ प्रक्षेपक, ज्यामध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरले गेले आणि नुकतंच या प्रक्षेपकाने दक्षिण आशियाई उपग्रह यशस्वरित्या सोडत सलग ४ मोहिमा य़शस्वी केल्या, ते प्रक्षेपक भुस्थिर कक्षेपर्यंत २२०० किलो वजनाचा उपग्रह वाहून नेऊ शकते.

म्हणजेच २.२ टन वजनापेक्षा जास्त उपग्रह जर भारताला अवकाशात पाठवायचा असेल तर विदेशी अवकाश संस्थांची मदत घ्यावी लागते. सध्या आपण युरोपियन स्पेस एजन्सीच्या सहाय्याने २.२ टन वजनापेक्षा जास्त वजनाचे उपग्रह अवकाशात धाडतो.

जेव्हा जेव्हा विदेशातील प्रक्षेपकाच्या सहाय्याने आपला उपग्रह पाठवला जातो त्या प्रक्षेपणासाठी ४५० कोटींपेक्षा कितीतरी जास्त रुपये मोजावे लागतात. हेच जर स्वदेशी प्रक्षेपण असेल तर पीएसएलव्हीच्या सहाय्याने अंदाजे १५० कोटी तर जीएसएलव्ही मार्क २ च्या सहाय्याने अंदाजे २२० कोटी रुपये एवढा खर्च येतो. 

थोडक्यात स्वदेशी प्रक्षेपण हे आपल्यासाठी अत्यंत स्वस्तात ठरते. आपले बहुमूल्य विदेशी चलन वाचते. 

म्हणूनच जीएसएलव्ही मार्क - ३ चे उड्डाण महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यामुळे भारत थेट ४ टन म्हणजेच ४००० किलो वजनाचे उपग्रह भुस्थिर कक्षेत पाठवू शकणार आहे. यामुळे विदेशातून होणारा उपग्रह प्रक्षेपणाचा खर्च वाचेलच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे वजनदार उपग्रह विशेषतः संरक्षणासाठी आवश्यक असलेले बहुउपयोगी उपग्रह पाठवतांना दुस-या देशांवर अवलंबून रहावे लागणार नाही. 

या जीएसएलव्ही मार्क - ३ प्रक्षेपकामध्ये - रॉकेटमध्ये स्वदेशी बनावटीचे ( जीएसएलव्ही मार्क - २ मध्ये वापरलेल्या क्रायोजेनिक इंजिनपेक्षा ) अधिक शक्तिशाली असे २७ टन वजनाचे क्रायोजेनिक इंजिन वापरले जाणार आहे हे विशेष. या जीएसएलव्ही मार्क -३ चे पहिले प्रायोगिक उड्डाण पाच जूनला आहे. त्यामुळे ५ जून हा दिवस भारतासाठी - इस्त्रोसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. 

हे उड्डाण यशस्वी झाल्यास भविष्यात कोणत्याही उपग्रह प्रक्षेपणासाठी भारताला दुस-या देशांवर अवलंबून रहावे लागणार नाही. जड / वजनदार उपग्रह वाहून नेण्याची क्षमता इस्रो मिळणार आहे. 

जगात अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सी, जपान, चीन आणि अर्थात भारत या देशांकडे उपग्रह प्रक्षेपणाची, अवकाशात उपग्रह पाठवण्याची क्षमता आहे. या सर्व देशांच्या तुलनेत भारताच्या प्रक्षेपक - रॉकेटच्या सहाय्याने अत्यंत स्वस्तात उपग्रह पाठवता येतात, दुस-या शब्दात भारतामार्फत उपग्रह पाठवणे इतर देशांना स्वस्तात पडते. आत्तापर्यत भारताने स्वःताचे सुमारे 75 उपग्रह तर इतर देशांचे तब्बल 170 हुन अधिक उपग्रह अवकाशात पाठवले आहेत. यावरून भारताने अवकाश क्षेत्रात कसा विश्वास कमावला आहे, नाव कमावले आहे हे लक्षात येते. 

फक्त आत्तापर्यंत कमी वजनाचे उपग्रह पाठवण्यासाठी इतर देश भारताकडे येत होते. जीएसएलव्ही मार्क 3 मोहिम यशस्वी झाली तर भविष्यात वजनदार उपग्रह पाठवण्यासाठीसुद्धा इतर देश भारताकडे वळतील.
तसंच भविष्यात क्रायोजेनिक इंजिनची क्षमता वाढवत, प्रक्षेपकात गुणात्मक बदल करत ४ टन पेक्षाही जास्त वजनाचे उपग्रह भुस्थिर कक्षेत पाठवता येणार आहेत. 

भविष्यात भारतीय अतंराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क -३ सारख्या भरभक्कम प्रक्षेपकाची गरज भासणार आहेच. 

१८ डिसेंबर २०१४ ला जीएसएलव्ही मार्क ३ चे उड्डाण झाले होते मात्र त्यामध्ये क्रायोजेनिक इंजिन वापरण्यात आले नव्हते. जीएसएलव्ही मार्क २ पेक्षा कितीतरी वेगळ्या आकाराच्या, अवाढव्य अशा जीएसएलव्ही मार्क -३ या  रॉकेटच्या उभारणीचा, हाताळण्याचा अनुभव यावा यासाठी हे उड्डाण झाले. ( तुलना करण्यासाठी शेवटचा फोटो बघावा ). या उड्डाणात अतंराळवीरांना वाहून नेऊ शकणा-या अतंराळ कुपिचाही वापर करण्यात आला होता.

तेव्हा ५ जूनला जीएसएलव्ही मार्क - ३ चे पहिले परिपुर्ण असे पहिले प्रायोगिक उड्डाण होणार आहे.
ही मोहिम यशस्वी झाल्यास आणखी अशा दोन प्रायोगिक मोहिमा होतील. यांमध्ये यश मिळाले तर जीएसएलव्ही मार्क 3 चा व्यावसायिक वापर सुरू होईल. 

या GSLV MK 3 ने भारताचे अवकाश क्षेत्रातील भवितव्य बदलण्यास मदत होणार आहे, कृत्रिम उपग्रहांच्या जगांत इस्त्रो हनुमान उडी मारणार आहे, ज्याची सुरुवात जूनच्या मोहिमेने होणार आहे.  

तेव्हा इस्रोला नव्या मोहिमेसाठी शुभेच्छा.