पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Friday, February 3, 2017

विनाशापासून फक्त 2.30 मिनिट जवळ...Bulletin Of Atomic Scientist या अमेरिकेतील प्रसिद्ध मासिकने नुकतीच Dooomsday Clock या घडाळ्यातील वेळ अर्ध्या मिनिटाने घटवत 2.30 मिनिट पर्यंत नेली, म्हणजेच 12 ला 2.30 मिनिटे बाकी - इथपर्यंत मिनिट काटा आणून ठेवला. गेल्या 63 वर्षातील सर्वात निचांकी वेळ - स्थिती ठरली आहे. जगात राष्ट्रवादाबद्दल वाढत चाललेली अतिरेकी विचारसरणी, डोनाल्ड ट्रम्प यांनी अणू बॉम्बच्या शस्त्रसाठ्याबद्दल व्यक्त केलेले विचार आणि वातावरणातील बदल यावर शास्त्रज्ञांनी मांडलेल्या विचारांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासकीय विभागांनी दाखवलेली असमर्थता... यामुळे doomsday clock हे आणखी अर्ध्या मिनिटाने कमी करत 12 च्या जवळ 2.30 मिनिट पर्यंत सरकवण्यात आले. हा एक जगाला मोठा धोका देणारा जणू भोंगाच या घडाळ्याने वाजवला असे म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

काय आहे doomsday clock ?
1945 ला अणुबॉम्बचा वापर प्रत्यक्ष युद्धात झाल्यावर आपण जगापूढे नेमके काय पान वाढून ठेवले आहे याचा साक्षात्कार - कल्पना - भान हे अणुबॉम्ब बनवणा-या Manhattan प्रकल्पामध्ये काम करणा-या काही शास्त्रज्ञांना आले. अणुऊर्जा नियंत्रणाबाहेर गेली तर काय होऊ शकते, या सुप्त ताकदीचे धोके काय आहेत हे प्रत्यक्ष लक्षात आल्यावर शास्त्रज्ञांना धक्काच बसला. एवढंच नाही तर अणुबॉम्ब तयार होण्याची अत्यंत खार्चीक प्रक्रिया, लागणारे उच्च प्रशिक्षित मनुष्यबळ, कालावधी यांमुळे एका शस्त्राबरोबरच तयार झालेल्या एका पांढरा अजस्त्र हत्तीच्या व्यापाची कल्पनाही आली.

तेव्हा या प्रकल्पातील काही शास्त्रज्ञ एकत्र आले आणि अणुऊर्जेबद्दल ( नव्या राक्षसाबद्दल ) ची माहिती समाजापूढे सोप्या वैज्ञानिक भाषेत ठेवावी असा निर्णय त्यांनी घेतला. यासाठी bulletin of atomic scientist हे मासिक काढण्याचा निर्णय घेतला. 1947 च्या पहिल्याच अंकात या मासिकाच्या पृष्ठभागावर एक घड्याळ दाखवले ज्यामध्ये 12 च्या जवळ मिनिट काटा सात मिनिट अंतरावर दाखवण्यात आला.

याचा अर्थ हा की 12 वाजता सर्वनाश ( doomsday ) होणार आहे आणि यापासून जग हे 7 मिनिटे हे दूर आहे. त्यावेळी 1947 ला सुरु झालेले शीतयुद्ध,  तेव्हा अमेरिके सारख्या एकमेव देशाकडे असणारे जगातील सर्वात महाभयानक अणुबॉम्बचे अस्त्र, यांमुळे आक्रमक झालेली अमेरिका, अस्वस्थ सोव्हिएत रशिया...तेव्हा या सर्वांमुळे जग विनाशापासून 7 मिनिटे दूर असल्याचा सांकेतिक संदेश शास्त्रज्ञ या घडाळ्याच्या माध्यमातून देत होते, त्यांनी तो दिला.

खरं तर doomsday clock हे एक जागतिक संकटाची माहिती देणारे, जागतिक शांततेची / अशांततेची स्थिती दर्शवणारे एक प्रतिकात्मक घड्याळ आहे. या घड्याळ्यात 12 वाजता सर्वनाश होणार असे प्रतिकात्मक संगितले आहे. तर घडाळ्यातील मिनिट काटा 12 च्या म्हणजेच सर्वनाशाच्या किती जवळ येऊन ठेपला आहे, सर्वनाशाला किती वेळ बाकी आहे याची माहिती देतो.

bulletin of atomic scientist चे वैज्ञानीक वर्षातून दोनदा भेटतात आणि जागतिक परिस्थितीचा आढावा घेत मिनिट काट्याची स्थिती बदलवण्याबाबत निर्णय घेतात. किंवा एखादी घटना म्हणजे छोट्या युद्धासारखी घटना, 9/11 सारखा अतिरेकी हल्ला, जगावर प्रभाव टाकणा-या व्यक्तीचा मृत्यू.... अशा प्रमुख घटना लक्षात घेऊन मिनिट काट्याबाबत निर्णय घेतला जातो.


Doomsday Clock ची स्थित्यंतरे
1947 ला मिनिट काटा हा 12 या वळेपासून 7 मिनिट  
दूर होता म्हणजेच 12 ला 7 कमी होते. 1949 ला सोव्हिएत रशियाने घेतलेल्या पहिल्या अणूबॉम्ब चाचणीनंतर हा मिनिट काटा चार मिनिटांनी कमी करत 12 पासून 3 मिनिट अंतरापर्यंत आणून ठेवला. कारण जगात ख-या अर्थाने जगात शीतयुद्धाने जोर पकडला होता.

सूर्यामध्ये जी अणूस्पंदने होत अणूस्फोट होत असतात, तीच प्रक्रिया अमेरिकेने अणू बॉम्बच्या चाचणीद्वारे 1952 ला करून दाखवली . एवढेच नाही तर विविध क्षमतांच्या अणूबॉम्बच्या चाचण्यांची मालिका यशस्वी केली.  त्यामुळे पुन्हा एकदा doomsday clock एका मिनिटाने घटवत 2 मिनिट पर्यंत आणले गेले.  जग विनाशापासून 2 मिनिट वर येऊन ठेपले असा त्याचा अर्थ होता. या घड्याळानुसार जग धोक्याच्या पातळीवर सर्वात जवळ आले होते.

1962 चा क्युबाचा क्षेपणास्त्र पेचप्रसंग हा फक्त काही दिवसांत खरं तर तासांत संपला. जगाने सुटकेचा निश्वास टाकला.त्यामुळे घड्याळ बदवण्याची वेळच आली नाही.

अशी स्थित्यंतरे 1991 पर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरु होती. 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्याने शीत युद्ध संपले आणि doomsday clock ने निश्वास टाकला आणि मिनिट काटा तब्बल 17 मिनिटवर येऊन स्थिरावला.  म्हणजेच 12 ला 17 मिनिटे कमी.

खरं तर शीत युद्ध संपल्याने अणू बॉम्ब / हल्ल्याची शक्यता संपल्यातच जमा होती. मात्र एव्हाना पर्यावरण बदलाचा नवा राक्षस जगासमोर येऊन ठेपला होता.

जागतिक पर्यावरण परिषदा, सत्ता गाजवू पहाणा-या राष्ट्रांच्या भूमिका, इंधनाचा वाढता वापर, बदलते हवामान, वारंवार येणारा दुष्काळ - पूर, या सर्वांमुळे प्रभावित होणारी अर्थव्यवस्था...यांमुळे bulletin of atomic scientist च्या शास्त्रज्ञांनी पर्यावरण हा विषय गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आणि मग पुन्हा मिनिट काटा हा 12 च्या दिशेने सरकायला सुरुवात झाली.


सध्या घड्याळाचा मिनिट काटा कोठे आहे ??
जानेवारी 2017 ला अमेरिकेत सत्तांतर झाल्यावर bulletin of atomic scientist च्या वैज्ञानिकांनी घड्याळाची स्थिती ठरवण्याबाबत बैठक घेतली आणि मिनिट काटा हा आधीच्या वेळेने अर्धा मिनिट कमी करत 12 ला 2.30 मिनिट बाकी असतांना येऊन ठेवला.

1947 पासूनची ही दुस-या क्रमांकाची, 12 या वेळेपासून सर्वाधिक कमी वेळ असलेली स्थिती ठरली आहे.
याचा स्पष्ट अर्थ हा आहे की वाचाळ अशा डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ताग्रहण केल्यावर जग अधिकच संकटाच्या खाईत लोटले गेले आहे. हा संदेश तोही दस्तुरखुद्द अमेरिकेमधल्याच bulletin of atomic scientist या मासिकाने दिला आहे हे विशेष.


आता पूढे काय ??
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यावर पण शपध घेण्याच्या आधी डोनाल्ड महाशयांनी नौदलाची आणि अणू बॉम्ब साठ्याची संख्या वाढवणार असल्याचे जाहीरच करून टाकले. अमेरिकेच्या अवाढव्य नौदलाचा ताफा 250 वरून दुप्पट नेण्याचा मानस डोनाल्ड यांनी बोलून दाखवला. थोडक्यात त्यांची युद्धपिपासू भूमिकाच यावरून स्पष्ट झाली.

यामुळे जगात विचारवंत, बुद्धिजीव वर्गाच्या जवाबदारीमध्ये वाढ झाली आहे. जागतिक शांतता धोक्यात येणार अशी पावले - निर्णय डोनाल्ड आणि त्यांच्या टीमकडून उचलण्याआधी यांना रोखण्याचे आव्हान या लोकांसमोर असेल.

अतिरेकी राष्ट्रवाद तर अनेक ठिकाणी वाढत चालला आहे, मग भारतही यामध्ये मागे नाही. तेव्हा अशा राष्ट्रवादाला लगाम घालण्याची जवाबदारी त्या देशांतील नागरीकांचीही आहे.

पर्यावरणाचे भान राखतांना प्रगत राष्ट्रांकडून मागास राष्ट्रांवर थोपवले जाणारे अतिरेकी निर्णय ही सुद्धा एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, त्यालाही पायबंद घालणे आवश्यक आहे.

तेव्हा 2.30 मिनिटांवर आलेला विनाश थोपवण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. धोंक्याची घंटा वाजवली गेली आहे....