Thursday, April 25, 2019

आता चांद्रयान - २ मोहिम जुलैमध्ये होणार.....




इस्त्रोची महत्वकांक्षी चांद्रयान -२  मोहिम पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही मोहिम जुलै महिन्यात होईल अशी अपेक्षा आहे. 

याआधी ही मोहिम गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र त्यानंतर जानेवारी २०१९ ही नवी वेळ जाहिर करण्यात आली. त्यानतंर पुन्हा एकदा तांत्रिक समस्यांचे कारण सांगत एप्रिल महिन्यात चांद्रयान -२ मोहिम होणार असल्याचं जाहिर करण्यात आलं. मात्र आता पुन्हा एकदा ही मोहिम पुढे ढकलण्यात आली असून आता जुलै महिन्यात चांद्रयान -२ हे अवकाशात झेपावेल अशी अपेक्षा आहे.
चांद्रयान -२ चे संपुर्ण वजन हे सुमारे 3,887 किलो एवढे आहे. यामध्ये चंद्राभोवती फिरणा-या यानाचे वजन हे २,२७९ किलो एवढं आहे. चंद्रावर उतरणा-या लॅडरचे वजन हे १,४७१ किलो एवढं आहे. ( लॅडरचे नाव देशाच्या अवकाश मोहिमेचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरुन 'विक्रम' असं ठेवण्यात आलं आहे. )  तर या लॅडरच्या पोटातून बाहेर पडत चांद्र भुमीवर संचार करणा-या रोव्हरचे वजन सुमारे ३० किलो आहे. ( या रोव्हरचे नाव 'प्रज्ञान' असं ठेवण्यात आलं आहे. )

आता उशीर होण्यास नेमकं काय झालं ?  

इस्राईलमधील एका खाजगी कंपनीचे चांद्रयान हे नुकतेच चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले होते. त्या यानातील लॅडर हा चांद्र भुमिवर अलगद उतरणार ( Soft landing ) होता. ११ एप्रिलला नियोजन केल्याप्रमाणे हा लॅडर मुख्य यानापासून वेगळा झाला खरा मात्र तो चंद्रावर अलगद उतरण्याएवजी चंद्राच्या भुमिवर आदळला, थोडक्यात मोहिम अपयशी झाली. जर ही मोहिम यशस्वी झाली असती तर रशिया, अमेरिका आणि चीन या ३ देशांनंतर चंद्रावर अलगद यान उतरवण्याचा मान इस्राईलला मिळाला असता, ते सुद्धा त्या देशाच्या खाजगी कंपनीला, म्हणजेच चंद्रावर उतरणारी जगातील पहिली खाजगी कंपनीची ती मोहिम ठरली असती. असो.......

तर या अपयशामुळे म्हणे इस्त्रोने चांद्रयान -२ च्या लॅडरची पुन्हा तांत्रिक तपासणी केली असता त्यामध्ये आणखी काही सुधारणा करणे आवश्यक असल्याचं लक्षात आलं. म्हणून ही चांद्रयान - २ मोहिम पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नेमक्या तांत्रिक कारणाबाबात अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही..सर्व काही... गुप्त गुप्त...

गंमत म्हणजे चांद्रयान -२ मोहिम समोर उभी ठाकली असतांना सर्वसामान्यांना या मोहिमेबद्दल फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. या मोहिमेची, उपकरणांची, यानाची अधिकृत छायाचित्रे देखील उपलब्ध नाहीत, चांद्रयामन - २ मोहिमेचे साधे एनिमेशन देखील नाही. याउलट अवकाश विज्ञान हे सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय करणा-या नासाकडे बघा. एखादी मोहिम सुरु होण्याच्या दोन वर्षे आधीपासून नासा एवढी माहिती पुरवतात की प्रत्यक्ष मोहिम सुरु होतांना लोकांचा सहभाग हा लक्षणीय असतो, जनजागृती मोठ्या प्रमाणात असते.

तेव्हा सध्याची चांद्रयान -२ मोहिम जी इस्रोची आहे, सर्वसमान्यांची नाही, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तता बाळगण्यात आली आहे, ती मोहिम आता आणखी पुढे ढकलण्यात आली आहे.  



इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...