Saturday, January 16, 2021

गुरु आणि शनी ग्रहांचे आपल्यावर उपकार आहेत ?

#कुतूहल #curiosity

गुरु आणि शनी ग्रहांचे आपल्यावर उपकार आहेत ?

काही खगोल अभ्यासकांमध्ये असा एक मतप्रवाह आहे की गुरु आणि शनी ग्रहांमुळे ( जीवसृष्टी असलेल्या ) पृथ्वीचे अस्तित्व निर्माण होण्यास - टीकण्यास मदत झाली आहे.

सुर्यमाला जेव्हा निर्माण होत होती तेव्हा अनेक छोटे ग्रह - लघुग्रह हे खोऱ्याने निर्माण झाले होते किंवा होत होते. सुर्यमालेच्या निर्मितीदरम्यान विविध कारणांमुळे अवाढव्य गुरु आणि शनी ग्रह ( ज्यांना Gas Giants म्हणूनही ओळखले जाते ) हे ग्रह निर्माण झाले. या ग्रहांच्या प्रचंड अशा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे अनेक लघुग्रह, तुकडे हे या ग्रहांकडे आकर्षित झाले. एकतर ते या दोन ग्रहांवर आदळले किंवा त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या भोवती फिरु लागले.

एवढंच नाही तर सुर्यमालेत भटकणारे लघुग्रह - धुमकेतू हे जर या दोन ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावाखाली आले तर काहीशी दिशाही बदलतात.
तसंच मंगळ आणि गुरु ग्रहांच्यामध्ये लघुग्रहांच्या मोठा पट्टा आहे. यामध्ये अनेक लघुग्रह हे आकाराने काही किलोमीटर लांबी रुंदीचे आहेत. सुर्याच्या शक्तीशाली गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सुर्याच्या भोवती भ्रमण करतांना हे लघुग्रह सुर्याच्या दिशेने हळुहळु सरकू शकतात. पण गुरु ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती लघुग्रहांना पुढे सरकू देत नाही.

वर उल्लेख केलेल्या गोष्टींमुळे पृथ्वी लघुग्रहांच्या तडाख्यांपासून सुरक्षित राहीली आहे. नाहीतर मोठ्या लघुग्रहांचे आघात पृथ्वीला सातत्याने सहन करावे लागले असते. म्हणूनच काही लाखो वर्षांत एखादाच मोठ्ठाला लघुग्रह हा पृथ्वीवर आदळतो.

थोडक्यात गुरु आणि शनी ग्रहांमुळे आपण सुरक्षित आहोत.

अर्थात या तर्काला ठोस असा आधार नाही किंवा तसं सिद्ध करता येईल अशी शास्त्रिय मांडणी करण्यात आलेली नाही किंवा अशा मांडणीला सर्वसमान्यताही मिळालेली नाही.

तेव्हा हा तर्क आपल्याला पटो वा नको…..गुरु आणि शनी या दोन सुंदर ग्रहांकडे बघतांना त्यांचे मनातल्या मनात आभार मानले तर थोडीच आपली संपत्ती कमी होणार आहे. 

#Jupiter #Saturn

Tuesday, December 29, 2020

कार्यकाल संपलेल्या / निकामी झालेल्या कृत्रिम उपग्रहांचे पुढे नेमकं काय होतं ?
#कुतूहल #curiosity #satellite

1957 पासून पृथ्वीच्या कक्षेबाहेर विविध कृत्रिम उपग्रह पाठवण्याचा सपाटा माणसाने लावला आहे. बहुतांश कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती पाठवण्यात आले तर काही पृथ्वीपासून लांब इतर ग्रह - सूर्याच्या दिशेने पाठवण्यात आले. 1971 पासून तर विविध स्पेस स्टेशन - अवकाश स्थानके सुद्धा पाठवायला सुरुवात झाली आहे. या स्पेस स्टेशन्सकडे सामानांची ने आण करण्यासाठी आता कार्गो व्हेहीकलची सुद्धा भर पडली आहे. पृथ्वीभोवती पाठवण्यात आलेल्या कृत्रिम उपग्रहांचा कार्यकाल हा विविध महिन्यांचा - वर्षांचा होता /असतो. त्यानंतर कार्यकाल संपलेल्या - बिघाड झालेल्या उपग्रहांची जागा नवे उपग्रह घेतात. तेव्हा या राहिलेल्या उपग्रहांचे, अवकाश स्थानकांचे, कार्गो व्हेहीकलचे पुढे नेमके काय होते ?

उपग्रहांच्या साधारण 3 प्रकारच्या कक्षा असतात. 

1..Low Earth Orbit -  पृथ्वीपासून साधारण 500 किलोमीटर उंचीपासून ते 2000 किमी उंचीपर्यंत. या कक्षेत पृथ्वीवरील विविध भूभागाची छायाचित्रे काढणारे उपग्रह असतात. लष्कर उपयोगी उपग्रहसुद्धा याच उंचीवर असतात. 

2.. Medium Earth Orbit - 2000 किमी ते 35 हजार किमी 700 किमी. या कक्षेमध्ये 22 हजार किमी उंचीवर अमेरिकेची GPS सेवा देणारे उपग्रह आहेत.

3..High Earth Orbit - या कक्षेतील उपग्रह हे पृथ्वीपासून 35,700 किमी उंचीवर असतात. या कक्षेत कमी अधिक उंचीवर भुस्थिर उपग्रह असतात. आपल्या सर्व टीव्ही यंत्रणा चालवणारे, संदेशवहन करणारे, हवामानाची 24 तास स्थिती सांगणारे, भारताची दिशा दर्शक प्रणाली ( 'नाविक' )असलेले कृत्रिम उपग्रह या उंचीवर असतात.

काही उपग्रह हे आणखी वेगळ्या कक्षेत असतात. पृथ्वीपासून खूप दूर पण पृथ्वीच्या कक्षेत सुर्याला प्रदक्षणा घालणारे असतात. तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक हे 410 ते 420 किमी उंचीवरून फिरत असते. 

आत्तापर्यंत 40 पेक्षा जास्त देशांचे विविध 8,500 पेक्षा जास्त उपग्रह पृथ्वीभोवती पाठवण्यात आले आहेत. यापैकी आत्ता सुमारे 2000 उपग्रह हे कार्यरत आहेत. यापैकी Low Earth Orbit मध्ये 63 टक्के, Medium Earth Orbit मध्ये 6 टक्के आणि High Earth Orbit मध्ये 30 टक्के उपग्रह आहेत असा अंदाज आहे.
 
आता एवढ्या विविध उंचीवर असलेल्या उपग्रहांचे पुढे काय होते ? कार्यकाल संपलेल्या, निकामी झालेल्या उपग्रहांचे होतं काय ?

तर असे उपग्रह हे त्याच कक्षेत राहिले तर ते इतर उपग्रहांना अडचणीचे ठरू शकतात. कारण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे उपग्रहांची उंची ही काही किलोमीटरनी कमी होत असते. जोपर्यंत उपग्रह कार्यरत आहे तोपर्यंत ठराविक काळानंतर उपग्रह हे पूर्वस्थितीत नेले जातात. मात्र एकदा कार्यकाल संपल्यावर  उपग्रहाला सुरक्षित कक्षेत वर खाली नेले नाही तर ते इतर उपग्रहांना अडणीचे ठरू शकतात. विशेषतः Low Earth Orbit मध्ये जिथे उपग्रहांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे तिथे हा धोका आहे. खास करून दोन उपग्रहांची किंवा अन्य अवकाशीय कचऱ्याची - Space Debris शी टक्कर उपग्रहाशी झाली तर निर्माण झालेले - वेगवेगळ्या दिशेने गेलेले तुकडे हे इतर उपग्रहांना आणखी धोकादायक ठरू शकतात.

उपग्रह कोणताही असू दे जर कोणताही अडथळा आला नाही तर तो उपग्रह एखाद्या कक्षेत अनेक वर्षे, अगदी हजारो वर्षे पृथ्वीभोवती फिरू शकतो. जोपर्यंत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्याची पृथ्वीपासूनची उंची कमी होत पृथ्वीच्या वातावरणात येत नाही तोपर्यंत उपग्रह पृथ्वीभोवती फिरत रहाणार.

वस्तुस्थिती ही आहे की निकामी झालेल्या - कार्यकाल संपलेल्या कृत्रिम उपग्रहांची विल्हेवाट लावण्याचा कुठलाही नियम - कायदा - सक्ती जगामध्ये नाहीये ही एक मोठी दुर्देवाची गोष्ट आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे ते देश किंवा संबंधित कंपनी हे उपग्रहाचा कालावधी संपल्यावर ठराविक पद्धतीने उंची कमी करत उपग्रहाला पृथ्वीच्या वातावरणाच्या दिशेने आणतात आणि त्यानंतर संबंधित उपग्रह वातावरणात जळून नष्ट होतो. किंवा एक सुरक्षित पण कमी उंचीवर आणल्यावर काही ठराविक काळानंतर गुरुत्वाकर्षणामुळे उंची कमी होत उपग्रहवातावरणात जळून नष्ट होतो. 

अर्थात अशी सक्ती  किंवा नियम नसला तरी अमेरिकासारख्या देशांनी किंवा या देशातील कंपन्यांनी उपग्रहांची विल्हेवाट लावण्याचा मान्य केलं आहे. 

इतर देश त्यांच्या उपग्रहांचे काय करतात ? तर माहीत नाही. स्वयंस्फूर्तीने असं कोणी करत असेलही पण अशी नेमक्या किती उपग्रहांची विल्हेवाट लावली आहे याची कोणतीही माहिती - आकडेवारी उपलब्ध नाही. 

आता आपली इस्रो काय करते ? तर माहीत नाही. इस्रोने असं काही जाहीर केल्याचं तरी ऐकिवात नाही.

अर्थात Low Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांबाबत वर उल्लेख केलेली प्रक्रिया करणे हे लगेच शक्य आहे, काहीसं सोपं आहे. पण मग Medium / High Earth Orbit - भुस्थिर कक्षेत असलेल्या उपग्रहांबद्दल काय ? एक तर त्याच उंचीवर उपग्रहाला त्याच्या नशिबावर सोडून देतात किंवा मग त्या उपग्रहांना आणखी वरच्या कक्षेत नेतात आणि त्या कक्षेत सोडून देतात. या कक्षेला graveyard orbit  म्हणतात. तर काही वेळेला त्या उंचीवर काही काळ ठेवल्यावर उपग्रहाची उंची कमी करत पृथ्वीच्या वातावरणात आणून नष्ट करतात, अर्थात याला बऱ्याच महिन्यांचा / वर्षांचा कालावधी लागतो.

Medium /High Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांची संख्या ही Low Earth Orbit मध्ये असलेल्या उपग्रहांपेक्षा खूपच - कितीतरी कमी आहे. त्यामुळे Medium / High Earth Orbit मध्ये उपग्रहांची गर्दी नसते. या कक्षेत खूपच मोकळी जागा - space असते. 

तेव्हा Low Earth Orbit मध्ये वापर नसलेल्या उपग्रहांची जेवढी समस्या आहे तेवढी वरच्या उंचीमध्ये 

अजिबात नाही किमान सध्या तरी नाही. 
आता हे झालं उपग्रहांबाबत, ज्यांचे सरासरी 3 टन वजन असते आणि बांधणीत भरभक्कम नसतात.

तर अवकाश स्थानके, अवकाश स्थानकांपर्यन्त वाहतूक करणारे -  सामानांची ने आन करणारे कार्गो व्हेहीकल हे 3 टन वजनापेक्षा जास्त वजनाचे असतात, बांधणीच्या बाबतीत अतिशय भरभक्कम असतात. या सर्व गोष्टींचा वावर हा 400  किमी उंचीपर्यंत असतो. ह्या सर्व गोष्टी कार्यकाल संपल्यावर - निकामी झाल्यावर पृथ्वीवर एका विशिष्ट ठिकाणी समुद्राच्या परिसरात नेऊन कोसळतात. कोसळतांना काही भाग पृथ्वीच्या वातावरणात नष्ट होतो, तर उर्वरित भाग समुद्रात पडतो. या भागाला Satellite Graveyard म्हणतात. हा भाग न्युझीलंडच्या पुर्वेला Point Nemo च्या परिसरात आहे. हाच का परिसर ? तर समुद्राच्या या भागात जलवाहतूक नाही, प्रवासी विमानांची वाहतूक नाही. मानवरहित असा हा समुद्राचा परिसर आहे. आत्तापर्यंत या भागात सोव्हिएत रशियाची 6 Salyut अवकाश स्थानके ( सर्व 18 टनापेक्षा जास्त वजनाची), मीर अवकाश स्थानक ( वजन 129 टन वजन ) कोसळवण्यात आली आहेत. एवढंच नाही तर सध्या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीरांसाठी आवश्यक सामान घेऊन जाणारे जपान, युरोपियन स्पेस एजन्सीची कार्गो व्हेहीकलसुद्धा याच भागात कोसळवण्यात येतात. 

थोडक्यात वर उल्लेख केल्या प्रकारे कृत्रिम उपग्रह, अवकाश स्थानके, कार्गो व्हेहीकल यांची विल्हेवाट लावली जाते. असं असलं तरी हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. आत्तापर्यंत किती उपग्रहांची विल्हेवाट लावली गेली आहे - जाणार आहे याबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. 

एवढंच नाही तर उपग्रह प्रक्षेपणा दरम्यान रॉकेट - प्रक्षेपक याचे अवशेष पृथ्वी भोवती फिरत रहातात ते वेगळे. असे निकामी उपग्रह आणि रॉकेटचे अवशेष यांना अवकाशीय कचरा - space debris म्हणहन ओळखलं जातं. हा एक वेगळा असा स्वतंत्र विषय आहे. ( यावर याआधी ब्लॉग लिहिला आहे त्याची लिंक.....https://bit.ly/3rFxVzW )

थोडक्यात कृत्रिम उपग्रहांचा वापर झाल्यावर त्यांचे भविष्यात काय करायचे याची कोणतीही ठोस योजना नाही. तेव्हा कृत्रिम उपग्रहांमुळे अवकाशात कचऱ्याचा प्रश्न भविष्यात निर्माण झाला, भविष्यातील अवकाश मोहिमा धोक्यात आल्या, इतर कार्यरत उपग्रहांना धोका निर्माण झाला तर आश्चर्य वाटायला नको……

Thursday, December 24, 2020

तारे केवढे मोठे असतात ?

#कुतूहल #curiosity #star #sun तारे केवढे मोठे असतात ?

अनंत अशा विश्वात भव्यता या शब्दाला तोड नाही. एका पेक्षा एक भव्य गोष्टी विश्वात पहायला मिळतात. आपल्या सुर्याचेच उदाहरण घ्या ना. सुर्याच्या आकारासमोर आपली पृथ्वी ठिपक्याएवढी वाटेल एवढा सुर्य मोठा आहे. पण हा सुर्य एका ठिपक्याएवढा वाटेल असे मोठ्ठाले सुर्यासारखे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. तर काही तारे हे आपल्या आकाशगंगेच्या बाहेर पण जवळ असलेल्या तारकासमुहात आढळले आहेत, तर काही तारे सर्वात जवळची दिर्घिका असलेल्या एंड्रोमेडा दिर्घिकेत - Andromeda galaxy आढळले आहेत. 

आपली दिर्घिका जी आकाशगंगा या नावाने ओळखली जाते, या आकाशंगंगेचा व्यास हा सुमारे एक लाख ७० हजार ते २ लाख प्रकाशवर्ष एवढा आहे. खगोल अभ्यासकांचा - शास्त्रज्ञांना असा अंदाज आहे की आपल्या आकाशगंगेत १०० ते ४०० अब्ज तारे असावेत. थोडक्यात आपली आकाशगंगा असंख्य अशा ताऱ्यांनी खचाखच भरली आहे. यापैकी एका अंदाजानुसार जेमतेम ५ लाख तारे हे आपल्याला माहिती झाले आहेत.

ताऱ्यांचे काही प्रकार आहेत. विद्युत चुंबकीय वर्णपटनुसार ताऱ्यांचे ढोबळपणे सात प्रकारात O, B, A,F, G, K, M अशी विभागणी करण्यात आली आहे. ( आपला सूर्य हा G या प्रकारात मोडतो ) ताऱ्याच्या पृष्ठभागावरील तापमानानुसार हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. अर्थात जेवढा ताऱ्याचे तापमान जास्त तेवढा तारा मोठा किंवा लहान अशीही परिस्थिती नाहीये. ताऱ्याचे वस्तुमानही ही ताऱ्याची एक स्वतंत्र ओळख आहे. ताऱ्याच्या वस्तुमानानुसार ताऱ्याचे आणखी काही वेगळे प्रकार करता येतात. कारण वस्तुमान जास्त असलेल्या ताऱ्याचे प्रभावक्षेत्र हे मोठे असते. ताऱ्यांची प्रखरता हाही एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. Red Giants, Super Giants अशाही व्याख्या या ताऱ्यांच्या अभ्यासादरम्यान वाचायला मिळतील.

थोडक्यात ताऱ्यांचे वर्गीकरण हा एक स्वतंत्र आणि किचकट विषय आहे. तेव्हा एवढ्या खोलात न जाता आपण आकारमानानुसार काही माहित असलेल्या ताऱ्यांची तुलना आपल्या सुर्याशी - आपल्या ताऱ्याशी करुया.....

आपल्या सूर्याचा व्यास हा सुमारे 13 लाख 92 हजार 700 किलोमीटर एवढा आहे. 

सुर्य वगळता आकाशातील सध्याचा सर्वात तेजस्वी तारा म्हणजे व्याध - Sirius तारा. ( द्वैती तारे - binary stars ) हा तारा आपल्यापासून सुमारे ८.६ प्रकाशवर्षे दूर असून आपल्या सुर्यापेक्षा दुप्पट आकाराचा असून २५ पट तेजस्वी आहे.

आपल्या सुर्याला - सुर्यमालेला सर्वात जवळचा तरा म्हणजे प्राक्झिमा सेंचूरी. हा सुमारे ४.२२ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सुर्यापेक्षा सुमारे ७ पट आकाराने लहान आहे. 

आपल्या सर्वांना दिशा दाखवणारा प्रसिद्ध ध्रुव तारा - Polaris Star हा आपल्यापासून सुमारे ४३३ प्रकाशवर्षे अंतरावर असून हा सुर्यापेक्षा ५० पट मोठा आहे आणि तब्बल ४००० पट तेजस्वी आहे.

खगोलप्रेमींमध्ये - अभ्यासकांमध्ये सर्वात जास्त अभ्यास- निरिक्षण झालेल्या ताऱ्यांपैकी एक म्हणजे अभिजीत तारा - Vega Star. उत्तर गोलार्धातून सहजरित्या दिसणारा हा तारा आपल्यापासून २५ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सुर्यापेक्षा तिप्पट मोठा आणि ६० पट तेजस्वी आहे.

रोहिणी तारा - Aldebaran star. आकाशातील आणखी एक तेजस्वी तारा. आपल्यापासून ६५ प्रकाशवर्षे अंतरावर असून ४४ पट मोठा असून सुर्यापेक्षा कितीतरी तेजस्वी आहे.

ज्येष्ठा तारा.( द्वैती तारे - binary stars ) - Antares star. हा तारा आपल्या सुर्या पेक्षा 850 पट मोठा असून कित्येक हजार पट तेजस्वी आहे. 

सर्वात मोठा ताऱ्याेपैकी एक अशी ओळख असलेला UY Scuti हा सुर्यमालेपासून ९५०० प्रकाशवर्षे दुर आहे. हा तारा सुर्यापेक्षा तब्बल १७०० पट मोठा आहे.

तर Stephenson 2-18 हा तारा आकाशगंगेच्या मध्याच्या दिशेला आपल्यापासून २० हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा तारा १९९० च्या सुमारास माहित जरी झाला असला तरी त्याच्या भव्यतेबाबत नुकतेच कुठे शिक्कामोर्तब झाले आहे. Stephenson 2-18 या ताऱ्याचा आकार आपल्या सुर्यापेक्षा तब्बल २१५० पट मोठा आहे. म्हणजेच सध्या माहित असलेल्या ताऱ्यांपैकी सर्वात मोठा तारा म्हणून  Stephenson 2-18 ची ओळख झाली आहे. समजा हा तारा आपल्या सुर्यमालेत आपल्या सुर्याच्या जागी ठेवला तर तो गुरु आणि शनी ग्रहादरम्यान असलेल्या भागापर्यंतची जागा आरामात व्यापेल. एवढंच नाही तर सुर्यावर जशा सौरज्वाला असतात या  Stephenson 2-18 मुळे या ज्वालांचा पसारा हा प्लुटो ग्रहाच्या पलिकडे पोहचेल. यावरुन Stephenson 2-18 या ताऱ्याची भव्यता लक्षात येईल. 

आत्तापर्यंतच्या निरिक्षणांमुळे माहित झालेल्या काही मोजक्या ताऱ्यांच्या आकारांची ही तुलना आहे. आपल्या आकाशगंगेत आणखी कोट्यावधी तारे आहेत जे अजुन माहित व्हायचे आहेत, त्यांचा अभ्यास तर खुप दूरची गोष्ट. तेव्हा कदाचित आत्तापर्यंत माहित असलेल्या ताऱ्यांपेक्षा आणखी मोठे तारे, वेगवेगळ्या प्रकारचे तारे असू शकतात.  

ताऱ्यांचा एवढा अभ्यास का केला जातो तर यामुळे ताऱ्यांची जडणघडण कळण्यास मदत होते, विविध ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांची माहितीही मिळते. एकंदरितच ताऱ्यांचा जन्म-मृत्यु वगेैरे याचा अभ्यास होत सृष्टीच्या निर्मितीचे ठोकताळे बांधता येतात. 

ताऱ्यांबद्दल माहिती देणारी असंख्य पुस्तके, इंटरनेटवर ढिगभर माहिती उपल्बध आहे. यापैकी काही फोटो आणि व्हिडियो शेयर करत आहे. यामुळे आपला सुर्य या विश्वात नेमका कसा आहे याचा अंदाज लावण्यात मदत होईल.    

https://www.youtube.com/watch?v=NjdtTZTJaeo

https://www.youtube.com/watch?v=i93Z7zljQ7I 

Saturday, December 12, 2020

चंद्रावर मुक्काम करणारी लोकं......


#NASA #artemis #कुतूहल #curiosity

चंद्रावर मुक्काम करणारी लोकं......

जगात विविध घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना विविध आयाम आहेत. यापैकी एका घडामोडीच्या बोलायचं झालं तर या घडामोडीमागे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पावले टाकली जात आहेत ते म्हणजे चंद्रावर मुक्काम करण्याची मोहिम.

अमेरिकेची अवकाश क्षेत्रातील सरकारी संस्था ' नासा '  2024 पासून चंद्रावर मुक्काम करण्याच्या दिशेने, चंद्रावर नियमित मानवी मोहिमा सुरु करण्याच्या दृष्टीने हालचाल करत आहे. यासाठी आर्टेमिस - Artemis नावाच्या कार्यक्रमाची घोषणा याआधीच केली आहे. आर्टेमिस म्हणजे ग्रीक पौराणिक कथेतील चंद्राशी संबंधित देवता.

विविध टप्प्यांवर विविध उपकरणे, अवकाश याने चंद्राजवळ नेली जाणार आहेत, काही चंद्रावर उतरवली जाणार आहेत, याची तयारी जोरात सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून नासाने 18 भावी चांद्रवीरांची घोषणा नुकतीच केली आहे. 2017 पासून विविध चाचण्यांतून,अगदी घासुन पुसुन, तावून सुलाखून निघालेले 18 अंतराळवीर निवडले आहेत. यामध्ये 9 महिला, 9 पुरुष ( यापैकी एक भारतीय वंशाचा आहे ) आहेत.

हे अंतराळवीर चंद्रावर नुसते जाणार नसून 4 ते 6 दिवस मुक्काम करणार आहेत. चंद्रावर भविष्यात कायम स्वरुपी वसाहत करण्याच्या दृष्टीने नासाचे हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. यामध्ये चंद्रावर पहिलं उतरण्याचा मान हा एका महिला अंतराळवीरला दिला जाणार असल्याचं नासाने याआधीच जाहीर करुन टाकलं आहे. 

तेव्हा चंद्रावर पाऊल टाकणाऱ्या, चंद्रावर मुक्काम करणाऱ्या, चांद्र मोहिममेमुळे भविष्यातील मंगळस्वारीचे स्वप्न दाखवणाऱ्या भावी चांद्रवीरांची माहिती पुढील लिंकवर......      

https://www.nasa.gov/press-release/nasa-names-artemis-team-of-astronauts-eligible-for-early-moon-missions

https://www.youtube.com/watch?v=BC5khqpKovU&feature=emb_logo

Saturday, November 7, 2020

जगातले सर्वात मोठे विमान An - 225 Mriya

#कुतूहल #curiosity 

जगातले सर्वात मोठे विमान An - 225 Mriya


An -225 Mriya मध्ये Mriya चा अर्थ आहे स्वप्न - dream

अबब, अजस्त्र....सध्याच्या भाषेत आरारारारारा खतरनाक असे शब्द कमी पडतील एवढं हे मोठं विमान आहे. 1980 च्या दशकांत सोव्हिएत तंत्रज्ञानाची ही कमाल आहे. तेव्हाच्या अंटोंनोव्ह कंपनीने हे विमान बनवले. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर सध्या ही कंपनी युक्रेनमध्ये आहे. सोव्हिएत रशियाचे शक्तिशाली रॉकेट Energia चे बुस्टर्स पोटातून तर स्पेस शटल ( Buran) हे डोक्यावर घेऊन नेता यावे यासाठी हे विमान बनवलं होतं. सोव्हिएत महासत्ता कोसळल्यानंतर रशियाने रॉकेट Energia आणि स्पेस शटल कार्यक्रम खर्च परवडत नसल्याने बंद केला. तसंच एवढे विमान आणखी बनवणे हे सुद्धा आवाक्याबाहेरचे ठरले होते. तेव्हा An-225 हे एकच विमान बनवले गेले तर दुसऱ्याची फक्त बॉडी तयार केली आणि काम थांबण्यात आले. 

हे विमान केवढं मोठं आहे ?

सुमारे 84 मीटर लांब, 88 मीटर पंखाचा पसारा आणि 18 मीटर उंच एवढे हे विमान मोठं आहे. तर एवढ्या अवाढव्य आकारामुळे आतमध्ये सुमारे 43 मीटर लांब, 6.4 मीटर रुंद आणि 4.4 मीटर उंच एवढ्या मोठ्या आकारामध्ये विविध सामान /वस्तू / payload ठेवता येतात. 250 टन एवढे वजन वाहून नेण्याची या विमानाची आश्चर्यकारक अशी क्षमता आहे. 

आता आकडेवारीवरुन विमानाच्या आकारमानाचा कदाचित अंदाज येणार नाही. म्हणून काही उदाहरणे देतो. 

1..रस्त्यावर धावणार एखादा मोठा ट्रेलर हा 10 एक गाड्या ( LMV ) वाहून नेऊ शकतो. तर An - 225 विमान हे अशा 50 ( LMV ) गाड्या सहज घेऊन शकते. 

2..जून 2010मध्ये 42 मीटर लांबीची पवनचक्कीची दोन पाती या विमानातून चीन हुन डेन्मार्कला नेण्यात आली होती. 

3..ऑगस्ट 2009 ला वीज निर्मितीचा तब्बल 189 टन वजनाचा जनरेटर या विमानाने वाहुन नेला.  

4.. सप्टेंबर 2001 मध्ये 4 रणगाडे घेऊन या An -225 ने आकाशात झेप घेतली होती. यांचे एकूण वजन होते तब्बल 253.82 टन. एखाद्या विमानाने सर्वाधिक वजन वाहून नेण्याचा हा आत्तापर्यंतचा जागतिक रेकॉर्ड आहे. 

तर एवढं मोठं विमान कशासाठी ? अर्थात सामरिक वापराकरता - संरक्षण बाबींसाठी या अजस्त्र विमानाची निर्मिती करण्यात आली. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर याची उपयुक्तताच संपली. त्यापेक्षा युक्रेनसारख्या देशात अंटोनोव्ह कंपनीला हे विमान सांभाळणे आर्थिक दृषट्या जिकरीचे झाले होते. त्यामुळे काही काळ हे विमान पार्किंगमध्ये धुळ खात पडण्याच्या मार्गावर होते. आता या विमानाचा पुर्णपणे व्यावसायिक वापर सुरु केला गेला आहे. जगात कोणताही देश आकाराने अजस्त्र असं सामान वाहुन नेण्यासाठी या विमानाकडे नोंदणी करु शकते. अर्थात हे विमान अवाढव्य असल्याने 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या मोठ्या धावपट्टीवरच उतरु शकते. विमान आवाढव्य असल्याने याच्या लँडिंग गियरला तब्बल 32 चाके आहेत. पुढे चार तर मागे 7 चाकांच्या 4 जोड्या. सर्वसाधारण विमानाला दोन जेट इंजिन असतात. बोईंग 747 किंवा एयरबस - 380 ला सुद्धा चार जेट इंजिन आहेत. तर या An -225 ला तब्बल 6 शक्तीशाली जेट इंजिन आहेत.   

सध्या हे विमान जगभरात भ्रमंती करत असून विविध प्रकारचे payload - सामान वाहुन नेण्याचा एक चांगला ट्रॅक रेकॉर्ड या विमानाने कायम ठेवला आहे. 

अधिक काही लिहिण्यापेक्षा पुढील व्हिडियो लिंक बघा, पण त्यापेक्षा नुसते फोटो बघा म्हणजे या An -225 Mriya विमानाची अवाढव्यता लक्षात येईल. 

https://www.youtube.com/watch?v=KhyzSSAwBos 

Monday, November 2, 2020

सूर्यमालेत बुध ग्रहाच्या आकाराशी स्पर्धा करणारे 3 चंद्र / उपग्रह

#कुतूहल #curiosity 

सूर्यमालेत बुध ग्रहाच्या आकाराशी स्पर्धा करणारे 3 चंद्र / उपग्रह

आपली सूर्यमाला ही विविध वैशिष्ट्ये, आश्चर्यकारक गोष्टींनी ठासून भरलेली आहे. आजही अशी अनेक गुपितं -रहस्य ही अजून माहीत व्हायची आहेत. तर आज बघणार आहोत ग्रहांच्या आकारमानाच्या बाबतीत असलेली एक छोटीशी गंमत.

आपल्या सुर्यमालेत असे काही चंद्र ( एखाद्या ग्रहाचे उपग्रह ) आहेत की जे बुध ग्रहाच्या आकारापेक्षा माेठे आहेत, तर काही बुध ग्रहाच्या आकारापेक्षा जरासे लहान आहेत. मात्र हे चंद्र सुर्यमालेत स्वतंत्रपणे सुर्याभोवती फिरत नसून ते एखाद्या ग्रहाभोवती भ्रमण करत असल्याने त्यांना ग्रह म्हणून स्वतंत्र दर्जा मिळालेला नाही तर त्यांना उपग्रह - चंद्र म्हणून ओळखले जाते. 

आपल्या सुर्यमालेत 8 ग्रह आहेत. यापैकी सर्वात छोटा ग्रह हा अर्थातच बुध आहे. बुध हा सुर्यमालेत सुर्याच्या सर्वात जवळचा ग्रह - पहिला ग्रह आहे. बुध ग्रहाचा परिघ हा सुमारे 4,879 किलोमीटर आहे, तर पृथ्वीचा परिघ हा सुमारे 12,742 किलोमीटर आहे. पृथ्वीच्या उपग्रहाचा म्हणजेच आपल्या चंद्राचा परिघ हा सुमारे 3,474 किलोमीटर आहे. 

सूर्यमालेत सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरू ग्रहाला ज्ञात असे एकुण 79 उपग्रह / चंद्र आहेत. त्यापैकी Ganymede हा गुरुचा सर्वात मोठा उपग्रह आहे. गॅलिलिओ यांनी 1610 ला जेव्हा पहिल्यांदा गुरु ग्रहाचे निरिक्षण केले तेव्हा त्यांना जे चार उपग्रह आढळले त्यापैकी एक म्हणजे हा Ganymede उपग्रह. Ganymede हा गुरु ग्रहाभोवती सुमारे दहा लाख 70 हजार किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करतो. या Ganymede चा परिघ सुमारे 5,268 किलोमीटर आहे. म्हणजेच या उपग्रहाचे आकारमान हे बुध ग्रहाच्या थोडेसे जास्तच आहे.

शनि ग्रहाला ज्ञात 82 उपग्रह असून यापैकी Titan हा सर्वात मोठा उपग्रह आहे. डच खगोलशास्त्रज्ञ Christiaan Huygens या खगोलशास्त्रज्ञाने या उपग्रहाचा शोध 1655 ला लावला. Titan हा शनि ग्रहाभोवती सुमारे 12 लाख किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करतो. या उपग्रहाचा परिघ हा 5,129 किलोमीटर असून हे आकारमान बुध ग्रहापेक्षा थोडेसे मोठे आहे. 

तर Callisto नावाचा उपग्रह हा गुरु ग्रहाचा आकाराने दुसऱ्या क्रमांकाच्या उपग्रह आहे, चंद्र आहे. याचाही शोध गॅलिलिओ यांनी 1610 ला लावला. हा उपग्रह गुरु ग्रहाभोवती सुमारे 19 लाख किलोमीटर अंतरावरुन भ्रमण करत असतो. या उपग्रहाचा परिघ हा 4,820 किलोमीटर एवढा असून हा उपग्रह हा बुध उपग्रहापेक्षा आकाराने थोडासा लहान आहे. 

या तीनही चंद्राची छायाचित्रे पुढे दिली आहेत.

Sunday, November 1, 2020

विमानवाहु युद्धनौका


#कुतुहल  #curiosity 

विमानवाहु युद्धनौका

ज्या देशाच्या सीमेवर अथांग समुद्र आहे आणि ज्या देशाला राजकीय महत्वकांक्षा या संरक्षण क्षेत्राच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्या देशाला विमानवाहु युद्धनौकांशिवाय पर्याय नाही. किंबहूना अशा देशाच्या संरक्षण क्षेत्रातील ताकदीचे जे अनेक मापदंड त्यापैकी एक म्हणजे त्या देशाच्या नौदलाकडे किती विमानवाहु युद्धनौका आहेत ते.

विमानवाहु युद्दनौकांवरील लढाऊ विमानांच्या सहाय्याने विस्तृत समुद्राच्या भागावर वर्चस्व ठेवता येते. म्हणजे समजा विमानवाहु युद्दनौकेवरील लढाऊ विमानाचा युद्ध क्षमतेचा पल्ला - 'लढाऊ पल्ला ' हा जास्तीत जास्त 1000 किमी आहे, ( म्हणजे 500 किमी अंतर कापत, हल्लाच्या ठिकाणी जात कसरती करत, हल्ला करत विमानवाहु युद्धनौकेवर परतायचे ). तेव्हा विमानवाहु युद्धनौकेच्या 500 किमी परिघात असलेल्या समुद्रात किंवा किनाऱ्यापासून आत जमिनीवर खोलवरच्या भागापर्यंत वर्चस्व ठेवता येते. त्यामुळे विमानवाहु युद्धनौकांना अनन्य साधारण महत्व आहे.

ज्या देशांकडे अनेक विमानवाहु युद्दनौका आहेत त्या देशांना ' ब्लु वॉटर नेव्ही ' म्हणुन ओळखले जाते. म्हणजेच स्वतःच्या देशापासून कित्येक हजार किलोमीटर दूरवर मुक्तपणे संचार करत दबदबा ठेवणे, वर्चस्व गाजवणे हे विमानवाहु युद्धनोकांमुळे शक्य होते. म्हणुनच अमेरिका ही सध्याच्या काळांत खऱ्या अर्थाने  ' ब्लु वॉटर नेव्ही ' ओळखली जाते. अर्थात अणु पाणबुड्यांची साथही आवश्यक ठरते.

दुसऱ्या महायुद्धात जपानला नमवण्यात जेवढे अणु बॉम्बचे महत्व आहे तेवढेच विमानवाहु युद्धनौकांचेही. विमानवाहु युद्धनौकांमुळे जपानच्या नौदलाचे कंबरडे अमेरिकेने मोडले होते. 1982 च्या फॉकलंड बेटांच्या युद्धात इग्लंडकडे असलेल्या विमानवाहु युद्धनौकांमुळे हजारो किलोमीटर दूरवर जात अर्जेटिनाला नमवण्यात इंग्लडला यश आले होते. 1991 पर्यंत रशिया - अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात विमानवाहू युद्धनौकांमुळेच अमेरिकेचा रशियासमोर दबदबा कायम राहिला होता. एवढंच काय 1971 च्या भारत पाक युद्धात तेव्हाच्या पुर्व पाकिस्तानच्या बंदरांची - चितगांवच्या नाकेबंदीमध्ये आयएनएस विक्रांतने महत्त्वाची भुमिका बजावली होती हे कसं विसरुन चालेल. म्हणून विमानवाहु युद्धनौकांना नौदलात अनन्य साधारण महत्व आहे.

सध्या कोणत्या देशांकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत आणि किती बांधल्या जात आहेत ( ही माहिती कंसामध्ये ) हे बघुया

अमेरिका - 11 (2),चीन - 2 (1), इटली - 2 (1), इंग्लंड- 2, फ्रान्स - 1, भारत - 1 (1), रशिया -1, स्पेन -1, थायलंड -1, जपान - 0 (2)

ढोबळपणे विमानवाहु युद्धनौकांचे 3 प्रकारात वर्गीकरण केलं जातं. हलक्या वजनाच्या, मध्यम आकाराच्या आणि मोठ्या ( Super carrier ).

आपल्याकडे असलेली विक्रांत - विराट या हलक्या वजनातील विमानवाहु युद्धनौका होत्या, ज्याचे वजन अनुक्रमे 22,000 टन आणि 27 हजार टन एवढे होते. साधारण 30 हजार टन वजनापर्यंतच्या विमानवाहु युद्धनौका या हलक्या वजनाच्या समजल्या जातात. तर मध्यम आकाराच्या विमानवाहु युद्धनौका या ढोबळपणे या ३० हजार ते ७० हजार टन वजनांत मोडतात. सध्या आपल्याकडे असलेली विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यचे वजन हे सुमारे ४५ हजार टन एवढे आहे. अमेरिकेकडे असलेल्या सर्व विमानवाहु युद्धनौका या तब्बल 90 हजार ते एक लाख टन वजनाच्या आहेत.

जेवढा वजनाचा आकडा साधारण तेवढी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हे त्या विमानवाहू युद्धनौकांवर असतात. म्हणजे 45 हजार टन वजनाच्या विक्रमादित्यवर सुमारे 40 - 45 पर्यंत लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ठेवता येऊ शकतात.

सर्वसाधारणपणे विमानवाहु युद्धनौका या अत्यंत उच्च दर्जाच्या डिझेल इंजीनावर किंवा तत्सम इंधनावर चालतात. फक्त अमेरिका आणि फ्रान्स या देशांच्या विमानवाहु युद्धनौका या अणु ऊर्जेवर चालतात. म्हणजेच या दोेन देशांच्या विमानवाहु युद्धनौकांमध्ये असलेल्या अणु भट्टीत एकदा इंधन भरले की पुढील काही वर्षे इंधन भरण्याची आवशक्यता नाही.

विमानवाहू युद्धनौका म्हणजे एक छोटेसे स्मार्ट शहरंच. जे स्मार्ट शहरांत असतं ते सर्व या विमानवाहू युद्धनौकांवर बघायला मिळतं. बाजारपेठ सोडली तर अनेक सुविधा उपलब्ध असतात. शुद्ध पिण्याचे पाणी, ATM, जीम, सिनेमागृह, इंटरनेट, सांडपाण्याचा पुर्नवापर, वीजेची बचत होईल अशी उपकरणे....अगदी काही ठिकाणी तरणतलाव सुद्धा उपलब्ध आहे. अर्थात ही युद्धनौका असल्यानं चैनीच्या गोष्टींना मर्यादीत स्थान ठेवले जाते.

विक्रमादित्यवर एका वेळी 1600 जण कार्यरत असतात, तर अमेरिकेच्या निमिट्झ वर्गातील विमानवाहु युद्धनौकांवर तर तब्बल 6000 जण कार्यरत असतात, एवढा राबता या युद्धनौकांवर असतो.

दिशादर्शन विभाग, हवामान विभाग, संदेश देवाणघेवाण विभाग, हेलिकॉप्टर - लढाऊ विमानांशी संबंधित यंत्रणा, अन्नधान्य प्रक्रियेसंदर्भातला विभाग, logistic संदर्भातला विभाग, इलेक्ट्रिक - इंजिनाशी संबधित अभियांत्रिकी विभाग असे विविध विभाग हे विमानवाहु युद्धनौकेवर कार्यरत असतात.

विमानवाहु युद्धनौकांचा आकार मोठा असल्यानं रडारने सहज त्यांना शोधता येते. त्यामुळे संरक्षणासाठी विमानवाहु युद्धनौका ही इतर युद्धनौका, पाणबुड्या यांच्या संरक्षणात संचार करते.

विमानवाहु युद्धनौका बांधणे, बाळगणे हे अत्यंत खार्चिक आणि आव्हानात्मक असते. त्यामुळे जगात नौदल असलेल्या सर्वच देशांना या विमानवाहू युद्धनौका बाळगणे परवडत नाहीत.

विमानवाहु युद्धनौकांच्या बाबतीत निर्विवादपणे सध्या अमेरिकेचे वैशिष्ट्य आहे. तर अमेरिकेबरोबर रशिया, फ्रान्स, इंग्लंड देशांच्या विमानवाहु युद्धनौकांचेही तंत्रज्ञान हे पुढारलेले आहे. भारतही आपले स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे. तर विमानावहु युद्धनौका बांधणीचा सपाटा सुरु केलेला चीन हा भविष्यात अमेरिकेपुढे आव्हान निर्माण करणार यात शंका नाही.

विमानवाहु युद्धनौका आतुन बाहेरुन बघता येणे, त्यावर एक दिवस का होईना रहायला मिळणे हे संरक्षण विषयक रुची असणाऱ्यांचे स्वप्न नक्कीच असेल. माझे स्वप्न, bucket list मधील ही गोष्ट माझी केव्हाच पुर्ण झाली आहे. 2012 च्या फेब्रुवारीत मला आयएनएस विराटवर मुक्काम करण्याची संधी मिळाली. एवढंच नाही तर साधारण गोवा ते मुंबई असा स्वप्नवत प्रवासही करायला मिळाला.

विमानवाहु युद्दनौकांवर खुप सुंदर, माहितीपुर्ण असे माहितीपट यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्यापैकी काहींची लिंक पुढे देत आहे.

https://www.youtube.com/watch?v=LhqLn1wKJAw&t=1605s

https://youtu.be/c0pS3Zx7Fc8

गुरु आणि शनी ग्रहांचे आपल्यावर उपकार आहेत ?

#कुतूहल #curiosity गुरु आणि शनी ग्रहांचे आपल्यावर उपकार आहेत ? काही खगोल अभ्यासकांमध्ये असा एक मतप्रवाह आहे की गुरु ...