Sunday, September 20, 2020

पृथ्वीपासून सर्वात दूरवर मानवाने पाठवलेल्या वस्तु कोणत्या ?


#कुतूहल #curiosity 

सर्वात आधी यामागची पाश्वर्भुमी.  

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्या शीतयुद्ध ऐन भरांत असतांना याचाच एक भाग म्हणून दोन्ही देशांमध्ये अवकाश स्पर्धाही( 1957 -1975 ) जोरात सुरु होती. यापैकी एक स्पर्धा म्हणजे वेगवेगळ्या ग्रहांजवळ कृत्रिम उपग्रह - यान पाठवण्याची स्पर्धा. यानिमित्ताने दोन महत्त्वकांक्षी मोहिमा नासाकडून आखल्या गेल्या, Pioneer आणि Voyager मोहिमा. 

Pioneer म्हणजे मुहुर्तमेढ रोवणारे. तर Voyager म्हणजे दुरचा प्रवास. 

Pioneer मोहिमा 1958 पासून चंद्रावर उपग्रह पाठवण्याच्या निमित्ताने सुरु झाल्या. या दरम्यान Pioneer - 10 ( मार्च 1972 ) आणि Pioneer - 11 ( एप्रिल 1973 ) ही दोन जुळी यानं ठराविक कालवाधीच्या अंतराने गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवली गेली. गुरु ग्रहाजवळून पहिल्यांदा जाण्याचा मान जाणारा Pioneer - 10 ला मिळाला. तर Pioneer - 11 ने गुरु ग्रहाजवळ जात गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत शनि ग्रहाच्या दिशेने झेप घेतली आणि शनी ग्रहाच्या जवळ जाणारा पहिले यान म्हणून मान पटकावला. नंतर हे दोन्ही यानं हीअवकाशाच्या अनंत अशा पोकळीत मार्गस्थ झाली. आता या प्रकरणावर इथेच थांबतो कारण यावर लिहिणे हा एक स्वतंत्र असा व्याप आहे. 

याच वेळी विविध ग्रहांजवळ जाणारा नासाचा Mariner कार्यक्रम सुरु होता. या कार्यक्रमाद्वारे शुक्र आणि मंगळ ग्रहाजवळ पोहचण्याचा प्रयत्न नासा करत होती. या दरम्यान गुरु आणि शनी ग्रहाला भेटी देण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. याच कार्यक्रमा दरम्यान 1980-90 दरम्यान कधीही भेट ने दिलेले युरेनस आणि नेपच्युन हे दोन ग्रहांजवळ जाणे शक्य असल्याचं नासाच्या लक्षात आलं आणि Marinerया कार्यक्रमाचे नासाने Voyager Program असं नामांतर केलं.  

Voyager -1 ( सप्टेंबर 1977 ) तर Voyager -2 ( ऑगस्ट 1977 ) गुरु ग्रहाच्या दिशेने रवाना झाले. या दोन्ही यानांनी गुरु आणि मग शनी ग्रहाची जवळून अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढली. दरम्यान शनि ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत ( जसे गोफणीने दगड गोल फिरवून जोराने - वेगाने फेकला जातो ) Voyager -1 ने आणखी वेग पकडला आणि विश्नाच्या अनंत पोकळीत रवाना झाला. तर Voyager - 2 ने युरेनस, नेपच्युन या ग्रहाजवळून जात विश्वाच्या पसाऱ्यात रवाना झाले. आजही युरेनस, नेपच्युन या ग्रहांजवळून जाणारे Voyager - 2 हे एकमेव यान ठरले आहे हे विशेष.  

सुर्यमालेतील सर्वात दुरवरचा ग्रह - प्लुटो ग्रह याचा अभ्यास करण्यासाठी नासाने जानेवारी 2006 ला New Horizons ( नवी क्षितीजे ) नावाचा उपग्रह पाठवला. गंमत म्हणजे अर्धे अंतर पार केले असतांना प्लुटो ग्रहाची ग्रह म्हणून मान्यताच रद्द करण्यात आली होती. अर्थात यामुळे मोहिमेवर थोडीच फरक पडणार होता. तर जुलै 2015 ला प्लुटो ग्रहाजवळून जात त्याची उत्तम छायाचित्रे घेतली आणि New Horizons हे अनंत अवकाशाच्या पोकळीत मार्गस्थ झाले. 

तर Pioneer -10 आणि 11 , Voyager - 1 आणि 2, New Horizons ही मानवाने पाठवेली सर्वात दूरवरची यानं ठरली आहेत. तर यापैकी दुरवरचे यान कोणते. तुम्हाला वाटेल Pioneer याने, कारण ती सर्वात आधी रवाना झाली होती. तर याचे उत्त्र आहे Voyager - 1. कारण ग्रहांजवळून जातांना संबंधित ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा जास्तीत जास्त फायदा Voyager - 1 घेतला.  

तेव्हा सध्या वर उल्लेख केलेली यानं कोणत्या वेगाने अवकाशात प्रवास करत आहेत ते पुढीलप्रमाणे.......

Voyager - 1    17 किमी प्रति सेकंद  ( वेग अंदाजे  ) 
New Horizons 16 किमी प्रति सेकंद 
Voyager - 2     15 किमी प्रति सेकंद 
Pioneer -10     12 किमी प्रति सेकंद 
Pioneer -11      11 किमी प्रति सेकंद 

यापैकी किती यानं संपर्कात आहेत ? तर संपर्कात म्हणजे यानावर असलेल्या विविध उपकरणांद्वारे मिळणारे संदेश. तर सध्या फक्त Voyager - 2 आणि New Horizons ही दोन यानं संपर्कात आहे. बाकी सर्व यांनांचा संपर्क हा मोहिमेची सुरुवात झाल्यावर अगदी 20 -25 वर्षांपर्यंत किवा त्याअधिक काळ कायम होता, म्हणजेच मोहिमांचे उद्दीष्ट्य पुर्ण झाल्यानंतर सुद्धा होता. त्यामुळे या यानांची यापुढची वााटचाल कोणत्या दिशेने असेल हे खात्रीलायक सांगता येतं.  

अवकाशात ज्या दिशेने या यानांचा प्रवास सुरु आहे त्या मार्गावर लघुग्रह किंवा अन्य अडथळा येण्याची शक्यता नसल्याने यानांच्या वेगानुसार ते आपल्यापासून किती दूर असतील याचा अंदाज लावता येतो. तेव्हा वर उल्लेख केलेल्या पाच यानांपैकी सर्वात दुरवरचे कोणते किंवा ही यानं आपल्यापासून किती अंतरावर आहेत ? याची माहिती पुढीलप्रमाणे.... 

Voyager - 1     148 AU ( अंदाजे )  
Pioneer -10     125 AU 
Voyager - 2     123 AU 
Pioneer - 11     103 AU 
New Horizons   46 AU 

आता AU म्हणजे काय तर astronomical unit. अवकाशातील अंतरे मोजण्याची हे एकक आहे. सुर्य आणि पृथ्वी मधील अंतर हे एक astronomical unit ( 1AU ) समजलं जातं. किलोमीटरच्या भाषेत हे अंतर - 1 AU = सरासरी 14 कोटी 95 लाख 97 हजार 870 किलोमीटर, एवढे भरते. आता याची तुलना वर उल्लेख केलेल्या यानाच्या अंतराशी करा. तेव्हा करत बसा आकडेमोड.

तर सर्वात दुर अंतरावर पोहचलेल्या यानाचा मान हा Voyager - 1 कडे जातो. वर उल्लेख केलेल्या इतर चार यानांचा वेग लक्षात घेतला तर अंतराच्या बाबातीत Voyager - 1 ला मागे टाकणे हे शक्य नाही.  

आता या सर्वांचा फायदा काय ? तर New Horizons वगळता सर्व यानं ही सुर्यमालेच्या बाहेर, सुर्याच्या प्रभाव क्षेत्राबाहेर गेलेली आहेत. यामुळे सुर्यमालेच्या बाहेर क्षेत्र नेमकं कसं असतं ? सुर्य आणि जवळचा तारा यामधला अवकाश नेमका कसा असतो ? कोणते भाररहित कण असतात वगैरे.....अशी अवकाश संधोधनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची माहिती मिळाली आहे.  

अर्थात माणुस जसा आणखी प्रगती करेल यापेक्षाही वेगाने आणि अधिकचे अंतर अत्यंत वेगाने कापणारी यानं तयार होतील आणि वर उल्लेख केलेल्या यानानं सहज मागे टाकतील यात शंका नाही.  
 
जाता जाता........प्रकाशाचा वेग हा सेकंदाला सुमारे 3 लाख किलोमीटर आहे. सुर्यापासून निघालेला प्रकाश हा पृथ्वीवर साधारण 499 सेकंद म्हणजेच साधारण 8 मिनीटे 31 सेकंदात पोहचतो. तेव्हा सर्वात दूरवर असलेल्या Voyager - 1 यानाकडे आपल्या सुर्याचा प्रकाश पोहचायला जेमतेम 16 तास लागतात. सुर्य प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारे यान जेव्हा तयार होईल तेव्हा कुठे माणसाचा खऱ्या अर्थाने विश्वात संचार सुरु होईल. तरीही विश्व एवढं मोठं आहे की प्रकाशाचा वेगसुद्धा कमीच पडेल. यावर नंतर कधीतरी......

तोपर्यंत Voyager, Pioneer, New Horizons वावात अधिकच्या माहितीसाठी पुढील माहितीपट बघा....  

Voyager मोहिमेला 40 वर्ष झाल्याच्या निमित्ताने 2017 ला बनवलेला माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=US_byEAbXP0 

Pioneer 10-11 मोहिमेवर एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xpzTw0_hz7U 

New Horizons वर आधारीत एक माहितीपट - https://www.youtube.com/watch?v=xKBi2NhmO_4

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...