Wednesday, July 10, 2019

नौदल आणि हवामानाचा अंदाज



आपण परदेशातील हवामानाच्या विशेषतः पावसाच्या अंदाजाबाबत ऐकून असतो. अमुक वेळेला पाऊस पडणार आहे असं तिथे काही तास आधीच हवामान विभागातर्फे सांगितलं जातं आणि तिथली लोकं त्यावर विश्वास ठेवतात आणि पाऊस खरोखर पडतोही.

मला आपल्या देशात, आपल्या नौदलाबद्दल आलेला अनुभव सांगतो आणि मग प्रश्न पडतो की सर्वसामान्याला नौदलासारखी अचूक माहिती का मिळत नाही, का दिली जात नाही.

निमित्त होतं नौदलाच्या पाणबुडीच्या शाखेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत असल्याचं. काही मोजक्या पत्रकारांना - वृत्त वाहिन्यांना मुंबईत नौदलाच्या तळावर पार्क केलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पाणबुड्यांमध्ये जायची संधी मिळाली होती. ऑगस्टचा शेवटचा आठवडा होता, नेमका दिवस आठवत नाही, 29 जुलै 2017 असावा.

साधारण 10 वाजता आम्हाला नौदल तळावरील पाणबुडीचे मुख्यालय असलेल्या ठिकाणी नेण्यात आले. बाहेर जोरात पाऊस पडत होता. सुरुवातीला पाणबुडी ताफ्याचे कमांडर यांच्याशी पाणबुडीच्या ठिकाणी वार्तालाप ( वेळ 11 ते 12.30 ),  त्यानंतर जेवण ( 2 वाजेपर्यंत ) मग प्रत्यक्ष पाणबुडीला भेट ( 2 ते 4 )  असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. 

दिल्लीतील नौदल मुख्यालयाकडून मोठ्या मुश्किलीने परवानगी काढत या सर्व भेटीचे नियोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे संबंधित नौदल जनसंपर्क अधिकारी भलतेच खुश होते आणि अर्थात प्रत्येक कोनातून पाणबुडी बघायला मिळणार असल्याने आम्हीही भलतेच खुश होतो.असो....

10.45 झाले तरी पाऊस अजिबात थांबण्याची चिन्हे दिसत नव्हती. सर्व जण म्हणत होते आता वेळ वाया जाणार. तेवढ्यात एक नौदल अधिकारी म्हणाला पाऊस थांबेल 11 नंतर. आणि खरंच 11. 10 च्या सुमारास पाऊस कमी झाला आणि त्यानंतर पूर्णपणे थांबला. 

आम्ही सुरक्षेचे सोपस्कार पार पाडत 11.30 च्या सुमारास पाणबुड्यांच्या ठिकाणी पोहचलो. रशियन बनावटीच्या सिंधुघोष आणि जर्मन बनावटीच्या शिशुमार वर्गातील पाणबुड्या नौदल तळावर पार्क केलेल्या होत्या. खरं तर अनेकदा नौदल तळावर विविध कार्यक्रमांसाठी गेलो असतांना या पाणबुड्या अनेकदा बघितल्या होत्या, मात्र त्या दिवशी प्रत्यक्ष पाणबुडीवर जायची संधी मिळणार होती.

आम्ही पोहचल्यावर काही मिनिटात तेथे पाणबुडी ताफ्याचे कमांडर दाखल झाले. पाणबुड्यांवर वार्तालापाचा सोपस्कार पार पडला. तो सुरू असतांना एक हलका पाऊस आला, एक मिनिटाकरता...कमीच. तिथे कुठेच आसरा घ्यायची सोय नसल्याने आणि सोबत कॅमेरा वगैरे उपकरणे असल्याने जरा पळापळ झाली खरी. एक अधिकारी म्हणाला जाईल पाऊस लगेच...पाऊस थांबलाही. 

तोपर्यंत एक वाजत आला होता, आम्ही मुख्यालयात परतलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

पाणबुडीवर जायचे असल्याने सर्वांनी जेवण दीडच्या आतच उरकले होते, सर्वजण जाण्यासाठी तयार होते. मात्र पाऊस काही थांबला नव्हता. 1.45 झाले तरी पाऊस थांबवण्याची चिन्हे नव्हती. आम्हा सर्वांचीच अस्वस्थता वाढत होती. नौदल जनसंपर्क अधिकारी किंवा इतर अधिकारी मात्र शांत होते. 

नंतर जणू 'चमत्कार' झाला 1.50 नंतर पावसाचा जोर कमी झाला आणि काही मिनिटात पाऊस थांबला देखील. लगेच आम्ही मुख्यालयाच्या इमारतीमधून बाहेर पडलो आणि बसने पाणबुड्यांच्या ठिकाणी पोहचलो आणि आपापल्या कव्हरेज मध्ये व्यस्त झालो.

दोन्ही पाणबुड्यांच्या आतबाहेर आमची धावपळ सुरू होती. बाहेर उभा असतांना अचानक माझे लक्ष BSE इमारतीच्या परिसराकडे गेले. BSE इमारत आणि RBI इमारतीच्या परिसरात आकाशात मोठ्या प्रमाणात काळे ढग जमा झाले होते. म्हंटलं आता पाऊस येणार आता. तर नौदल अधिकाऱ्याने क्षणार्धात सांगितले नाही येणार. म्हंटलं कसं काय ?. तर अधिकारी म्हणाला जोरदार वाऱ्याची दिशा ही नौदल तळाच्या समुद्राकडून जमिनीच्या दिशेने आहे. हे वारे ढगांना पुढे घेऊन जातील, त्या भागातही पाऊस पडणार नाही. आणि खरंच तसं झालं, त्या भागातील अंधार किंवा मोठाले ढग हे पुढे सरकले. उलट दूरवर ढग पांगल्याचेच बघायला मिळाले. 

संध्याकाळचे 4 चे पाच वाजले. आम्ही काही पाणबुडी सोडायला तयार नव्हतो. शेवटी नौदल अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघून आम्हीच आटोपते घेतले.

पाणबुड्यांवर एवढा वेळ घालवता आल्याने, पाणबुडीला आतून बाहेरून बघता आल्याने आम्ही सर्व भलतेच खुश होतो. 

पावसाने उघडीप दिल्याने हे सर्व करता आले असल्याचं मत सर्वांचेच झालं होतं. एकजण म्हणाला पावसाने चांगलीच साथ दिली आपल्याला.

तेवढ्यात हे सर्व नियोजन करणारा अधिकारी म्हणाला की पावसाचे दिवस, पावसाची वेळ बघूनच हे सर्व नियोजन केलं होतं. त्यावरूनच आजचा दिवस आणि वेळ ठरवण्यात आलं होतं. ज्या वेळेत पाऊस पडणार नव्हता त्याच वेळेतच ही visit ठेवण्यात आली होती.

थोडक्यात नौदल हे हवामान विभागाच्या माहितीचे विश्लेषण करुन कसा उपयोग करते हे पटकन कळून आले, प्रत्यक्ष अनुभवता आले. खरं तर नौदलात हवामान विभागा संदर्भात एक कक्ष असतो, प्रत्येक युद्धनौकेवर - प्रत्येक नौदल तळावर स्वतंत्र अधिकाऱ्यांची यंत्रणा यासाठी कार्यरत असेत. हवामान विभागाकडून येणारी माहिती, त्याचे विश्लेषण करणारी एक स्वतंत्र यंत्रणा नौदलकडे असते. शस्त्रास्त्र विभागाएवढाच या हवामान विभागाबद्दल नौदल हे गंभीर असते. 

म्हणूनच दुसऱ्या महायुद्धातील दोस्त राष्ट्रांची D Day मोहीम नॉर्मेंडी लँडिंग मोहिम यशस्वी झाली. यामध्ये हवामानाचा अचूक अंदाज हा महत्त्वाचा ठरला. 

पुढील प्रत्येक तासाच्या हवामानाच्या बदलाच्या माहितीवरच युद्धनौकांची आगेकूच अवलंबून असते. मग हे नौदल करू शकतं मग अशी माहिती विश्लेषणात्मक माहिती सर्वसामान्यांना का उपलब्ध होत नाही ? 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट सामन्यात पाऊस पडणार आहे की नाही याबद्दलचा अंदाज 100 टक्के अचूक ठरतो. मग आपल्याकडे हवामानाच्या अंदाजाबद्दल का बरे अशी माती खाल्ली जाते. यावर एक टिपिकल उत्तर हवामान विभागाचे आहे, आपला मान्सुनचा पाऊस बेभवशाचा असतो, लहरी असतो वगैरे....अशी उत्तर कितीपत पचवायची, किती सहन करायची याला मर्यादा आहेत. 

भरगच्च पगार घेणाऱ्या, अत्याधुनिक उपग्रह दिमतीला असलेल्या, चांगल्या सोई सुविधा असलेला हवामान विभागात 'अंदाज' या शब्दाला काहीच अर्थ राहिलेला नाही असं म्हणायची वेळ का येते हा खरा प्रश्न आहे.

९ जुलैचा मुसळधार पावसाचा अंदाज आदल्या दिवशी ऐकल्यावर आणि त्या दिवशी घामाच्या धारा सहन केल्यावर हे लिहायचा नुसता खटाटोप केला आहे. 

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...