![]() |
महाराणा प्रताप |
तुम्हाला तुमच्या महापुरुषाबद्दल किंवा मनात आदरणीय स्थान असलेल्या इतिहास पुरुषाबद्दल-स्त्रीबद्दल प्रेम आहे का, अभिमान आहे का ?
या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वजण बहुतेक पुढीलप्रमाणे देतील.
का नाही..
आहे की अभिमान..
हे काय सांगायची गोष्ट आहे..
सिद्ध करण्यासाठी काय करुन दाखवू..
पुण्यतिथी / जन्मदिन / जयंती / वाढदिवस दरवर्षी धुमधडाक्यात साजरा करतो की..
त्यांची आठवण म्हणुन समाजपयोगी कामे करतो की...सोशल वर्क करतो की....
घरात त्यांचा फोटो-तसवीर आहे ना..
कोणी त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोललं तर कानफटात मारु..
त्याची बदनामी कोणी केली तर आमच्या स्टाईलने धडा शिकवू...
मग हे महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावरकर किंवा कुठल्याही विशिष्ट जातीचे, धर्माचे, विशिष्ट विचारांचे महापुरुष असतील. पण खरंच त्यांच्याबद्दल आपल्या मनात, अगदी मानाचे स्थान असलेल्या आदरणीय व्यक्तिबद्दल जाज्वल्य अभिमान, स्वाभिमान, प्रेम मनात आहे का, त्यांचे विचार आपल्या रक्तांत भिनले आहे का. त्यासाठी दोन उदाहरणे देतो.
2000 व्या वर्षी डोंबिवलीतील आमच्या के.व्ही.पेंढारकर महाविद्यालयाने दिल्ली ते डोंबिवली अशी सायकल मोहिम आयोजित केली होती. फिरण्याची आवड असलेले, उत्साही असे आम्ही 20 विद्यार्थी, साथीला आमचे मार्गदर्शक कवठेकर सर, त्यांचे तीन सहकारी असे यामध्ये सहभागी झालो होतो. दिल्लीला तेव्हाचे केंद्रीय पेट्रोलियन मंत्री राम नाईक ह्यांनी मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. दलमजल करत दिल्ली, नोएडा, हरियाणामार्गे राष्ट्रीय महामार्ग NH -8 ने राजस्थानमध्ये दाखल झालो. नोव्हेंबर महिना असला तरी रात्री थंडी आणि दिवसा ऊन याचा मारा सहन करत राजस्थानमधून आमचा प्रवास सुरु होता.
प्रसंग पहिला
राजस्थानमध्ये चित्रगड ( चित्तोड / चित्तोर ) जिल्ह्यात प्रवेश करतांना महामार्गावरच मोठी कमान असलेला “ महाराणा प्रताप की चित्तोड नगरी में आपका स्वागत है “.... असा बोर्ड वाचत आम्ही चित्रगडमध्ये प्रवेश केला. राजस्थान म्हटले की राजपूत, शूरांची भुमि, जौहार ( शत्रुच्या हाती पडू नये यासाठी अग्निकुंडात स्त्रीयांनी केलेले बलिदान ), किल्ल्यांची अत्यंत आपूलकीने घेतलेली काळजी वगैरे आठवते. मात्र त्यापेक्षा बाहेरुन येणा-या नागरिकाला त्या ठिकाणचे महत्व कळण्यासाठी, त्यांच्या इतिहासपुरुषाची ओळख करुन देण्यासाठी रस्त्यापासून अशा कमानी उभारुन केलेली धडपड चटकन नजरेत भरते.
जेव्हा सायकलवरुन प्रवास करत पुढे जेव्हा गुजरातमधून महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा महामार्गावर महाराष्ट्रात स्वागत, महाराष्ट्र राज्य सुरु, महाराष्ट्र हद्द सुरु, महाराष्ट्रात प्रवेश या व्यतिरिक्त कुठलीही ओळ दिसली नाही, वेगळी कमान दिसली नाही.
उलट संताच्या भूमीत स्वागत, ( संपुर्ण महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ) छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या राज्यात स्वागत, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या महाराष्ट्र राज्यात स्वागत अशी खास महाराष्ट्राची ओळख करुन देणारी कुठलीही कमान दिसली नाही.
ते तर सोडाच, जेव्हा आपण रायगड जिल्हात प्रवेश करतो किंवा छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याकडे जातो तेव्हा “ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत स्वागत ” वगैरे असा कुठलाही मोठा बोर्ड किंवा कमान दिसुन येत नाही.
प्रसंग दुसरा
मोघल बादशहा अकबर आणि महाराणा प्रताप ह्यांच्यातील हळदी / हल्दी घाटातील लढाई सर्वांनाच माहित आहे. या लढाईत महाराणा प्रताप ह्यांना वीर मरण आले. मात्र ह्या आधी एक लढाई दोन राजांमध्ये झाली होती आणि त्यात महाराणा प्रताप ह्यांचा विजय झाला होता. कदाचित ही गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल. तर ज्या ठिकाणी ही लढाई झाली त्या भागातून आमची सायकल मोहिम सुरु होती. ( त्या भागाचे नाव आता काही आठवत नाही ). रस्ताच्या बाजूला तशा आशयचा एक बोर्ड दिसल्याने आम्ही सर्वजण थांबलो. त्या विजयाच्या आठवणी निमित्त तिथे एका विजयस्तंभाचे काम सुरु असल्याचेही तिथे लिहिण्यात आले होते.
काही मित्र चटकन सायकल बाजूला लावत विजयस्तंभाचे काम सुरु असल्याच्या ठिकाणी गेले. तर आम्ही काही जण पूढे गेलेले मित्र आल्यानंतर जाऊ असा विचार करत रस्ताच्या बाजूला असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. चहावाला एकदम बडबड्या होता. आम्ही महाराष्ट्रातले आहोत, सायकलने दिल्लीवरुन आलो आहोत वगैरे माहिती बोलत त्याला सांगितली, अवघ्या दोन मिनिटांत जणू त्याच्याशी आमची चांगली ओळख झाली.
चहा पितांना चटकन एकाने महाराणा प्रताप ऐवजी प्रताप आणि तोही एकेरी उच्चार केला. तेव्हा ताबडतोब चहावाल्याने जी प्रतिक्रिया दिली त्यावर आम्ही थक्क झालो, त्यापेक्षा आमच्या कानफटात मारल्यासारखे आम्हांला झाले. तो चहावाला म्हणाला “ हम आपके शिवाजी महाराज को छत्रपती शिवाजी महाराज कहेके पुकारते है, आप भी महाराणा प्रताप कहीये ”. अर्थात आम्ही त्यावर मान डोलवली आणि चूक मान्य केली.
एक साधा ( साधा कशाला स्वाभिमानी-अभिमानी ) चहावाल्याने आम्हाला असा सणसणीत अभिमानाचा धडा दिला. महापुरुषाबद्दलचा स्वाभिमान कसा असावा, अभिमान रक्तात असावा म्हणजे काय, फक्त आपल्याच नाही तर दुस-या ( राज्याच्या, प्रांताच्या, देशाच्या ) महापुरुषांबद्दलचा किंवा व्यक्तिंबद्दल आदर कसा राखावा हे तो चहावाला आम्हाला शिकवून गेला.
असा अभिमान आहे का आपल्यामध्ये, एवढा अभिमान आहे का आपल्याला आपल्या आवडत्या महापुरुषाबद्दल, आदरणीय व्यक्तिबद्दल. तो कसा असावा, कशा प्रकारे दिसुन आला पाहिजे यासाठी राजस्थानमधील हे दोन प्रसंग बहुदा पुरेसे होतील. हे दोन प्रसंग गेले काही दिवस पुन्हा पुन्हा आठवत होते. कारण दादोजी कोंडदेव वादापासून छत्रपती वड्यापर्यंत अनेक घटना मनाला अस्वस्थ करत होत्या.
राज्यातील अनेक ऐतिहासिक ठिकाणे मग ते किल्ले असो, मंदिरे, स्मारक, शिलालेख, लेणी , वास्तू, जुनी हस्तलिखिते, वस्तू यापासून ते महापुरुषांच्या विचारांबद्दल, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, वाद निर्माण केले जात आहेत, त्यांची हेळसांड होत आहे, अनेक गोष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
महाराष्ट्रातील अनेक महापुरुषांचा मान तर नाहीच पण विविध प्रकारे अपमान करण्याची एकही संधी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था , जातीवर आधारीत संस्थांनी सोडली नाहीये. एखाद्या महापुरुषाबद्दल आम्हाला किती अभिमान आहे हे दाखवण्याची जणु स्पर्धाच सर्वांमध्ये लागली आहे. तो अभिमान दाखवतांना कुठल्याही थराला ही लोकं पोहचत आहेत. अशा अतिउत्साही लोकांच्या कृत्यातून महापुरुषांचा अपमान जेवढा महापुरुषांच्या काळात ( त्यांच्या शत्रूंकडून ) झाला नसेल तेवढा आत्ता ह्या लोकांकडून केला जात आहे. मात्र याची जाणीव कोणाला नाहीये, किवा माहित असून सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळे सुरुच ठेवले जात आहे. विविध पुस्तके, उत्सव, कार्यक्रमांद्वारे या वादात भर टाकली जात आहे.
महापुरुषांच्या नावाने वाद थांबत नाहीयेत. तेव्हा किमान त्यांचा मान तरी सर्वांनी राखावा, त्यांच्याबद्दल आदर कृतीतून दिसून यावा असे वर उल्लेख केलेल्या दोन प्रसंगावरुन मनापासून सांगावसे वाटते.