चीन आणि भारत यांच्यामध्ये युद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर थोडसं गोंधळायला होईल, चटकन लक्षात येणार नाही. अर्थात हे विधान साफ चुकीचे आहे. पण दोन्ही देशांमध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे असं म्हंटलं तर ते चुकीचे होणार नाही. कारण ह्याला सबळ पुरावा देणा-या काही घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. अर्थात प्रसारमाध्यमांमध्ये काही निवडक इंग्रजी वर्तमानपत्रे आणि इंग्रजी टीव्ही चॅनल्स ह्यांनी ही बातमी उचलून धरली तेसुद्धा काही काळ. त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य सर्वसमान्यांपर्यंत पोहचणे अवघड आहे.
गेले काही दिवस भारतीय सीमाक्षेत्रात मग ती जमिनीवरील सीमा असो किंवा सागरी सीमा असो, चीन घुसखोरी करत आहे, किंवा सीमेरेषेच्या आत येत आपल्या अस्तित्वाच्या खूणा सोडत आहे. हे सर्व सांगण्याचे कारण की 1962 चे चीनबरोबरचे युद्ध होण्यापूर्वी 1959 पासून अशीच घुसखोरी करायला चीनने सुरुवात केली होती. ऑगस्ट 1959 ला घुसखोरी करत चीनने सीमेवर गस्त घालणा-या 9 पोलिसांना ठार मारले होते. अखेर 1962 ला मोठी घुसखोरी करत, युद्ध करत 37,000 चौरस किमीपेक्षा जास्त भाग चीनने गिळंकृत केला, त्याला आज " अक्साई चीन " या नावाने ओळखतात.
अर्थात घुसखोरीचे टोक गाठत चीन पुन्हा काही भारताशी युद्ध छेडण्याची शक्यता कमी आहे. कारण आशियातील या दोन " सिंघम " मध्ये होणारे युद्ध कोणालाच परवडणारे नसेल. आज जगातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था ह्या एकमेंकांशी संबंधित असतात. एका देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम दुस-या देशाला खड्ड्यात घालू शकतात. सध्या युरोपीय देशातील ग्रीसच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेने सर्वांची पार झोप उडाली आहे. असो.....तेव्हा आशियातील आपले वर्चस्व सिद्ध करत अमेरिकेला मागे टाकण्यासाठी आसुसलेला चीन काहीही करु शकतो, कुठल्याही मार्गाचा अवलंब करु शकतो. त्यामुळेच भारतही चीनचे हे छुपे आक्रमण गंभीरपणे घेत आहे.
चीनचे सैनिक भारताच्या हद्दीत
14 सप्टेंबर 2011 ला चीनचे डझनभर सैनिकांनी लडाखपासून ३०० किलोमीटरवर असलेल्या " च्युमार " भागात घुसखोरी केली. सुमारे २०० मीटरपेक्षा जास्त अंतर भारतीय हद्दीत चालत येत तिथे असलेले खंदक उद्धवस्त केले.

ही दोन ठळक उदाहरणे आहेत. अर्थात अनेक घुसखोरी केलेल्या घटांनांची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचत देखील नाही. आता प्रश्न असा पडतो की एवढी घुसखोरी होतांना भारताचे सैनिक किंवा " इंडो तिबेट बॉर्डर पोलिस " या सुरक्षा दलाचे सैनिक काय करत होते. खरं तर लडाख, तिबेटजवळचा भाग निर्जन, अत्यंत दुर्गम, डोंगराळ आणि रहदारीसाठी अत्यंत अवघड असा भाग आहे. प्रत्येक किलोमीटरवर सैनिक ठेवणेसुद्धा अत्यंत अवघड आहे, अशक्य आहे. त्यातच या भागाची सरासरी ८,००० फुटापेक्षा जास्त उंची, आठ महिने कडाक्याची थंडी यामुळे इथे खडा पहारा देणेसुद्धा आव्हानात्मक आहे. त्यातच भारत-चीनची सीमा काही कुंपणाने आखली गेलेली नाहीये. एखाद्या टेकडीच्या पलिकडचा भाग चीनचा आणि अलिकडचा भारताचा अशी सीमारेषेची मांडणी करण्यात आली आहे. त्यामुळे सतत गस्त घालत सीमेवर लक्ष ठेवणे हाच एकमेव आणि सर्वात चांगला पर्याय आहे. त्यामुळे घुसखोरीला अटकाव करणे अशक्य गोष्ट झाली आहे.
अंदमान बेटांजवळ चीनची संशोधन नौका

" व्हीलर आयलँड " बेट ओरिसा राज्याच्या किना-यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे. विविध लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांच्या चाचणीसाठी या बेटाचा वापर करण्यात येतो. या बेटावरुन केल्या जाणा-या क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांचे निरिक्षण करण्याचे काम कित्येक किलोमीटर दूर असलेली ही चीनची संशोधन नौका करत असल्याची माहिती समोर येत आहे.
२०१५-१६ पर्यंत चीनची पहिली विमानवाहू युद्धनौका कार्यरत होणार आहे. तसंच येत्या काही वर्षात चीनकडे सुमारे १५ पेक्षा जास्त अणुऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या असणार आहे. या सर्वांसाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे समुद्राची खडानखडा माहिती. समुद्राचा तळ किती खोल आहे, समुद्रात कुठला प्रवाह कुठल्या दिशेने किती वेगाने जात आहे, कुठे समुद्र खवळलेला असतो, पाण्याचे तापमान किती वगैरे गोष्टींच्या माहितीशिवाय पाणबुड्या चांगली कामगिरी करुच शकणार नाही. तेव्हा बंगलाच्या उपसागरातील समुद्राची, बेटांजवळच्या भागाची आवश्यक ती माहिती घेण्याचे काम ही संशोधन युद्धनौका करत असल्याचा संशय आहे. भारतीय नौदलाने जेव्हा या संशोधन नौकेला नौदलाच्या अस्तित्वाची जाणीव करुन दिल्यावर या नौकेने आपला गाशा गुंडाळला आणि कोलंबोकडे प्रयाण केले.
चीनच्या अशा घुसखोरीला आपण प्रत्युतर देत नाही अशीच सर्वसाधारण कल्पना असते. मात्र भारतही विविध माध्यमांमार्फत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत असतो.
भारतीय युद्धनौका चीनच्या सागरी सीमेजवळ
चीनच्या दक्षिण भागात सागरी आणि जमिनीवरील
सीमेला लागून असलेल्या व्हिएतनामबरोबर विविध प्रकारे सलोख्याचे संबंध साधण्याचा भारत प्रयत्न करत आहे. एकप्रकारे चीनला शह देण्यासाठी भारताची ही बुद्धीबळाच्या पटावरील जणु चाल आहे. २२ जुलै २०११ ला व्हिएतनामला तीन दिवसांची भेट देत " आयएनएस ऐरावत " ही युद्धनौका परत निघाली होती. साधारण व्हितनाम किना-य़ापासून ८४ किलोमीटर दूर आलेल्या ऐरावतच्या संदेशवहन केंद्राकडे एक अनामिक संदेश आला. " तु्म्ही चीनच्या सागरी हद्दीत प्रवेश करत आहात. ". चीनच्या एका अज्ञात युद्धनौकेवरुन हा संदेश पाठवण्यात आला होता, तिचे अस्तित्व ऐरावतच्या रडारवर दिसत नव्हते. अर्थात आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत असलेल्या भारतीय युद्धनौकेने अनामिक संदेशाला कुठलाही प्रतिसाद न देता ठरलेल्या मार्गाने भारताकडे प्रवास सुरुच ठेवला.

थोडक्यात भारताच्या सीमेवर चीनच्या नौका त्यांची उपस्थिती दाखवत आहेत. मात्र स्वतःच्या सागरी सीमेजवळ आलेल्या दुस-या युद्धनौकेचे अस्तित्व चीनला सहन होत नाहीये.
( कारण चीनने संपूर्ण दक्षिणेकडील समुद्रावर ,ज्याला " साऊथ चायना सी " नावाने ओळखतात , त्यावर स्वतःचा हक्क सांगितला आहे. विशेष म्हणजे या भागात तैवान, फिलीपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्रुनेई या देशांच्या सागरी सीमासुद्धा आहेत. मात्र प्रबळ अर्थव्यवस्था , बलाढ्य नौदल असल्याच्या बळावर चीनची दादगिरी सुरु आहे. या भागात तेलाचे, नैसर्गिक वायूचे मोठे साठे असल्याचा अंदाज आहे. त्यामुळेच या भागावर वर्चस्व राहवं यासाठी चीनची धडपड सुरु आहे. गंमत म्हणजे ओएनजीसी या भारताच्या सरकारी कंपनीने व्हितनामशी त्यांच्या सागरी हद्दीत तेल आणि नैसर्गिक साठे यांच्या संशोधन आणि उत्खनन या संदर्भात करार केला आहे. त्यामुळेच चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. )
समस्या फक्त इथेच थांबत नाही तर मॅकमोहन रेषा ज्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि चीनची सीमारेषा निश्चित केली आहे, ती चीन कधीच मान्य करत नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे ही गोष्ट चीनने मान्य करायला तयार नाहीये. या भागावरचा दावा अजुन चीनने कधीच मागे घेतलेला नाही. या भागातही चीनची घुसखोरी अधुनमधुन सुरुच असते.
शीतयुद्ध.....
थोडक्यात भारत आणि चीनमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे अशा चकमकी सुरु झाल्या आहेत. याचे प्रमाण गेल्या काही महिन्यांत वाढले आहे. चीनवर विश्वास ठेवायला भारत काय फक्त अमेरिका नाही तर कुठलाच देश तयार नाहीये. त्यामुळे आता फक्त रात्र वै-याची नसून दिवसही वै-याचा झाला आहे. १९६२ चा अनुभव लक्षात घेता भारताने आत्तापासून सावधगिरी बाळगायला सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या घटना भारत चीनमधल्या शीतयुद्ध सुरु होण्यासंदर्भात दुजोरा देत आहेत.