Sunday, October 2, 2016

धुमकेतूवरची स्वारी..........



30 सप्टेंबर 2016 हा सर्वसामान्यांसाठी नेहमीचा दिवस ठरला असेल मात्र अवकाश संशोधन करणा-या आणि या विषयात स्वारस्य असलेल्यांसाठी नक्कीच नाही. या दिवशी 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतु भोवती, कुठलाही अडथळा न येता दोन वर्ष फिरणा-या युरोपियन स्पेस एजन्सीच्या रोसेटा Rosetta आणि या उपग्रहाने एकुण 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता करतांना धुमकेतूला धडक देत पुर्णविराम घेतला. या घटनेच्या दोन महिने आधीच या धुमकेतूवर उतरलेल्या  Philae या छोटेखाली रोबोटने आपल्या सर्व यंत्रणा बंद करत निरोप घेतला होता. 

ही मोहिम म्हणजे चंद्रावर मानवाने ठेवलेल्या पहिल्या पाऊल इतकीच महत्त्वाची ठरली कारण एका धुमकेतू भोवती एक कृत्रिम उपग्रह फिरत धुमकेतूचा अभ्यास करत रहाणे, एवढंच नाही तर धुमकेतूवर छोटेखानी रोबोट उतरवणे आणि या दोन्ही गोष्टींमुळे धुमकेतूची आंतबार्ह्य माहिती समजण्यास मदत होणे ही गोष्टी मानवी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशीच झाली आहे.


निमित्त हॅलेच्या धमकेतुचे...

 1986 पर्यंत अमेरिका, तेव्हाची सेव्हिएत रशिया अवकाश
संशोधन आणि विविध प्रकारचे उपग्रह पाठवण्यात तरबेज झाले होते. य़ुरोपियन अवकाश संस्था आणि जपान  नुकतेच डोके वर काढु लागल्या होत्या.

आणि असं असतांना दर 76 वर्षांनी नियमित पृथ्वीजवळ येणारा हॅलेचा धुमकेतू ही सर्वांसाठी पर्वणीच ठरली. धुमकेतुच्या जगांत अगदी सर्वांना शाळेपासून माहिती असलेल्या हॅलेच्या धुमकेतूचे नाव घ्यावे लागेल, 1986 च्या सुमारास सुमारे 7 कोटी किलोमीटर अंतरावरुन दर्शन देत हॅले धुमकेतू त्याच्या मार्गाने निघुन गेला खरा पण यामुळे धुमकेतुच्या अभ्यासाची दालने धडाधड उघडी झाली.

1986 ची हॅले धमुकेतूची घटना ही अवकाश संशोधन करणा-यांसाठी एक सुवर्णसंधी ठरली होती. म्हणुनच की काय अमेरिका, सोव्हिएत रशिया, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सी या चारही संस्थांनी 1984 - 85 या कालावधीमध्ये हॅले धुमकेतूचा अभ्यास कऱण्यासाठी विविध उपग्रह सोडले. त्यामुळे जेव्हा हॅले धुमकेतू पृथ्वीच्या जवळून जात होता तेव्हा रशियाच्या दोन, जपानच्या दोन , युरोपियन स्पेस एजन्सीच्या एक आणि नासा - युरोपियन स्पेस एजन्सीने संयुक्तरित्या तयार केलेला एक उपग्रह अशा एकुण सहा उपग्रहाच्या उड्याच या धुमकेतूच्या दिशेने पडल्या आणि इतर वेळी दुर्बिणीतून दिसणा-या हॅलेबद्दल अतिशय जवळने जाणा-या त्या सहा उपग्रहांनी अभुतपुर्व अशी माहिती जमा केली.

यामध्ये 1986 ला  युरोपियन स्पेस एजन्सिच्या Giotto  या उपग्रहाने हॅले धुमकेतुपासून फक्त 596 किमी अंतरावरुन जात पहिल्यांदाच धुमकेतुची अतिशय जवळून छायाचित्रे घेतली.

त्यानंतर धुमकेतुच्या अभ्यासाचा जो सिलसिला सुरु झाला तो कायमच राहिला आहे.

नासाने 1999  महत्वकांक्षी अशी Stardust  मोहिम आखली. यामध्ये Stardust उपग्रहाने चार वर्षे प्रवास करत 81P/Wild  या धुमकेतुच्या 237 किमी अंतरावरुन प्रवास करत धुमकेतुपासून निघालेली धुळ ही अचुक टिपली आणि 2006 ला ती पृथ्वीवर सुखरुप पाठवली. अर्थात अतिशय सुक्ष्म कणांचा अभ्यास करत शास्त्रज्ञांना बहुमुल्य अशी माहिती मिळाली.

तर 2005 च्या नासाच्या मोहिमे कमालच केली. Deep Impact या उपग्रहाने Tempel 1 या धुमकेतूजवळ जात 230 किलो वजनाचा एक impactor किंवा एक वस्तु धुमकेतुवर आपटवली- आदळवली. दरम्यान या वस्तुवर कॅमेरा लावले होते. तेव्हा जस जशी ही वस्तु धुमकेतू जवळ पोहचली धुमकेतूची उत्कृष्ठ छायाचित्रे मिळाली. वस्तु अतिशय वेगाने आदळल्यावर मोठा खड्डा धुमकेतूमध्ये तयार झाला आणि अर्थात मोठ्या प्रमाणात धुलीकण हे बाहेर फेकले गेले. यानिमित्ताने धुमकेतुचा आंतरबार्ह्य अभ्यास करता आला.


रोसेटा - Rosetta

रोसेटा या उपग्रहाने तर कमालच केली, चांद्र विजयाएवढे भव्य काम करुन ठेवले.

2 मार्च 2004 ला युरोपियन स्पेस एजन्सीने
2900 किलो वजनाच्या रोसेटा नावाच्या उपग्रहाला 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतुचा अभ्यास कऱण्यासाठी धाडले. 67P/Churyumov–Gerasimenk  हा धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघामध्येच सुर्याभोवती प्रदक्षणा घालत असतो. या धुमकेतुच्या गाभ्याचा आकार काहीसा वेडावाकडा आहे, सुमारे 4 किमी त्याची जास्तीत जास्त जाडी असून 1.8 किमी ही रुंदी आहे.

67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतू 38 किमी प्रति सेकंद या वेगाने सुर्या भोवती लंबवुर्तळाकार प्रदक्षणा घालत असतो. तेव्हा या वेगापर्यंत जाण्यासाठी आणि धुमकेतू जवळ अचुक पोहचण्यासाठी रोसेटाने विविध ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा आधार घेत वेग वाढवला. यासाठी रोसेटाने सर्वात आधी मार्च 2005 ला पृथ्वी, फेब्रुवारी 2007 ला मंगळ ग्रह, नोव्हेंबर 2007 ला पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणचा फायदा घेत वेग वाढवला, दरम्यान वाटेत येणा-या दोन लघुग्रहांची छायाचित्रे घेतली, एवढंच नव्हे तर  Deep Impact मोहिमेतील  Tempel 1  धुमकेतुवर आदळवलेल्या वस्तुच्या टक्करीची घटनाही छायाचित्रबद्ध केली.

असा 10 वर्ष अथक प्रवास करत अखेर रोसेटा उपग्रहाने 67P/Churyumov–Gerasimenk या धुमकेतूला ऑगस्ट 2014 ला गाठले. तोपर्यंत रोसेटा आणि धुमकेतू हे पृथ्वीपासून 50 कोटी किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर होते. या मोहिमेची सुत्रे जर्मनीतून हलवली जात होती. विविध प्रकारे संदेश पाठवत रोसेटाचे अंतर कमी करत धुमकेतुच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत रोसेटाने प्रवेश केला आणि 100 बाय 50 किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत धुमकेतु भोवती घिरट्या मारायला सुरुवात केली आणि धुमकेतुची छायाचित्र - माहिती पाठवायला सुरुवात केली. असा पराक्रम करणारे रोसेटा पहिला उपग्रह आणि युरोपियन स्पेस एजन्सी पहिली संस्था ठरली.

त्यानंनतर टप्प्याटप्प्याने उंची कमी करत रोसेटा आणखी धुमकेतुच्या जवळ गेले आणि अखेर 12 नोव्हेंबर 2014 ला या रोसेटावरील 100 किलो वजनाच्या Philae नावाचा रोबोट हा धुमकेतूवर अलगद अवरला ज्याला इंग्रजीत soft landing असे म्हणतात. रोबोट धुमकेतुवर उतरला खरा पण दोन गोलांट्या उड्या मारल्या आणि हा रोबोट सावली असलेल्या भागात पोहचला. बॅटरी असेपर्यंत या रोबोटने मानवी इतिहासात पहिल्यांदाच धुमकेतुच्या पृष्ठभागावरुन धुमकेतुची छायाचित्रे पाठवली. अखेर बॅटरी कमी झाल्यावर या रोबोटने संदेश देणे बंद केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनतर रोबोटकडुनचे संदेश पुन्हा प्रस्थापित कऱण्यात शास्त्रज्ञांना यश आले.

तेव्हा अशा रितीने रोसेटा आणि त्या रोबोटचा धुमकेतुबद्दलचा अभ्यास जुलै 2016 पर्यंत सुरु होता. त्यानंतर रोबोटची बॅटरीची क्षमता कमी होत गेली आणि रोबोटची सिग्नल यंत्रणा शास्त्रज्ञांनी जड अंत;करणाने बंद केली. तोपर्यंत धुमकेतुबद्दल आवश्यक माहिती ही रोसेटा आणि रोबोटवरील संवेदकांच्या सहाय्याने आणि कॅमेराच्या सहाय्याने मिळाली होती.

रोबोट नंतर रोसेटा उपग्रहाला निरोप देण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि 30 सप्टेंबरपर्यंत रोसेटा उपग्रहाची उंची टप्प्याटप्प्याने कमी करत ते 67P/Churyumov–Gerasimenk  धुमकेतूवर आदळवण्यात आले आणि 12 वर्षाच्या मोहिमेची सांगता झाली. यामागे शास्त्रज्ञांचे अथक प्रयत्न, श्रम कारणीभूत होते जे 100 टक्के यशस्वी झाले.


हे सर्व कशासाठी ?...

पुरातन काळापासून ते अगदी आजही आकाशात अचानक अवतरत किमान काही दिवस दर्शन देणा-या धुमकेतूबद्दल भारतातच काय परदेशातही अंधश्रध्दा अजुनही मनांत कायमच्या ठाण मांडून आहेत. या अंधश्रद्धा अजुनही पुसल्या जात नाहीत हे विशेष.

मात्र धुमकेतूचा अभ्यास करणे म्हणजे विश्वाच्या निर्मितीचे तसंच विश्वात असलेल्या विविध मुलद्रव्यांचे अस्तित्व समजुन घेण्यासारखे आहे असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. पृथ्वीवर जन्मलेल्या जीवसृष्टीला धुमकेतू कारणीभूत आहे का, धुमकेतूमध्ये कोणते मुलद्रव्य आहेत, पाणी मग ते बर्फाच्या स्वरुपात आहे का अशा अनेक प्रश्नांचा शोध गेली अनेक वर्ष सुरु आहे. म्हणनुच गेल्या काही वर्षांपासून चंद्र, मंगळ , सुर्य किंवा इतर ग्रहांचा, लघुग्रहांचा अभ्यास करतांना धुमकेतुचाही अभ्यास करण्यावरही भर दिला जात आहे. कारण हे धुमकेतू कित्येक वर्ष अस्तित्वात आहेत, अनेक धुमकेतू हे सुर्यमालेबाहेरुन येतात आणि भेट देऊन कायमचे निघुन जातात. तर काही धुमकेतू आपल्या सुर्यमालेच्या परिघातच फिरत आहेत. तेव्हा मानवी उत्क्रांतीच्याच नव्हे तर विश्व निर्मितीच्या खाणाखूणा या धुमकेतूवर, धुमकेतूच्या निमित्ताने सापडतात का याचा शोध मानव घेत आहे.

आता तर जपान आणि अमेरिका - नासाने लघुग्रहावरील माती पृथ्वीवर परत आणणा-या मोहिमा आखल्या आहेत, तसे उपग्रह रवानाही केले आहेत. आता 2030 -35 पर्यंत चंद्रावर मानवी वसाहत कऱण्याच्या हालचाली नासाच्या सुरु झाल्या आहेत. तर मंगळावर पोहचण्यासाठी नासाने जोरदार मोर्चाबांधणी सुरु केलीये. थोडक्यात आता पृथ्वीबाहेर पाऊल ठेवण्यासाठी नव्हे तर वसाहत कऱण्यासाठी माणसाने पावले टाकायला सुरुवात केली आहे.

आजही लाखो वर्षे पृथ्वीवर संचार असुनही पृथ्वीवरील अनेक गोष्टींची माहिती अजुन मानवाला झालेली नाही त्याचा अविरत शोध - प्रयत्न अजुनही सुरुच आहेत. तेव्हा अवकाशाच्या अनंत अशा पोकळीत, या पोकळीतील ग्रहांवर पाऊल टाकतांना मानवाला अनेक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. तेव्हा धुमकेतुचा अभ्यास, धुमकेतुवर रोबोट उतरवणे ही यामध्ये महत्त्वाची हनुमान उडी ठरणार आहे. म्हणनुच रोसेटा - Rosetta मोहिमेचे महत्व अनन्य साधारण आहे.

Friday, May 13, 2016

एका पर्वाची अखेर - सी हैरियर




लढाऊ विमान म्हंटले की मोठी धावपट्टी आणि धावपट्टीवरुन गगनभेदी आवाज करत उड्डाण घेणारे लढाऊ विमान अनेकांनी बघितले असेलच. मात्र एक असे एक लढाऊ विमान आहे खऱं तर होते असे म्हणावे लागले की ते जागेवरुनच हवेत झेप घेऊ शकत होते, तसंच जमिनीवर उतरू शकत होते. या विमानाला धावपट्टीची आवश्यकता नव्हती. 

हो असे विमान म्हणजे सी हॅरियर. अमेरिका -इंग्लंड यांनी संयुक्तरित्या विकसित केलेले लढाऊ विमान नुकतेच भारतीय नौदलाच्या ताफ्यातून निवृत्त झाले. आयएनएस हंसा या गोव्यातील विमानतळावर सी हॅरियर विमानांचा तळ होता. INAS 300 असा या सी हॅरियरच्या ताफ्याचा ओळख क्रमांक होता. सी हॅरियर लढाऊ विमनांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला. त्याची जागा आता जगात अतिशय ताकदीच्या समजल्या जाणा-या Mig -29 K या लढाऊ विमानाने घेतली आहे. सी हैरियरच्या निमित्ताने भारतात एका लढाऊ विमानाचे एक पर्व संपले असे म्हणायला हरकत नाही. 

आपण इंग्लडकडुन सेकंड हॅन्ड म्हणजेच इंग्लंडच्या नौदलाने वापरलेली 23,000 टन वजनाची एचएमएस हर्मिस ही विमानवाहू युद्धनौका 1983 ला विकत घेतली. तिचे नामकरण आपण आयएनएस विराट असे केले. या युद्धनौकांवर नवे तंत्रज्ञान असलेली लढाऊ विमाने ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आणि अत्यंत वैशिष्ट्युपुर्ण रचना असलेली सी हॅरियर लढाऊ विमाने आपण विकत घेतली.  





सी हॅरियर - 1960 च्या दशकांत काम लढाऊ विमानाचे पण उड्डाण हेलिकॉप्टरसारखे असे विमान तयार करण्याचे प्रयत्न काही देशांमध्ये सुरु होते. काही देशांनी अशा पद्धतीचे प्रायोगिक विमान बनवलेही.मात्र त्याचे स्वरुप हे प्रायोगित विमानांपुरतेच राहीले. मात्र अमेरिका आणि इंग्लंड यांनी संयुक्तिकरित्या सी हॅरियर हे लढाऊ विमान नुसते बनवले नाही तर त्याचे तंत्रज्ञान यशस्वी करुन दाखवले. दोन्ही देशांच्या संरक्षण दलात ते मोठ्या संख्येने दाखलही झाले. यामुळे भारतासारख्या काही देशांनी अशी लढाऊ विमाने विकतच घेतली.

सी हॅरियर ज्या पद्दतीने काम करु शकते ते बघणे -माहित करुन घेणे  
काहीसे मनोरंजक आहे. लढाऊ विमानाच्या ज्या भागातून इंधनाद्वारे वापरलेली ऊर्जा बाहेर फेकली जाते तो विमानाचा भाग हव्या त्या दिशेला वळवता येईल असे तंत्रज्ञान या लढाऊ विमानात आहे. त्यामुळे सी हॅरियर ज्या ठिकाणी उभे असते त्याच ठिकाणाहून सी हॅरियर त्याचे इंजिन पुर्ण ताकदीने सुरु करत हवेत वर उचलेले जाते आणि मग उर्जा बाहेर पडणारा इंजिनाचा मागचा भाग हव्या त्या दिशेला वळवून सी हॅरियर हवेत सुर मारत संचाराला सुरुवात करते. तसंच जेव्हा जमिनीवर उतरायचे असेल तेव्हा याच पद्धीतीने सी हॅरियर जमिनीवर उतरु शकते. अर्थात या दोन्ही प्रक्रियेमध्ये सी हॅरियरचे इंधन मात्र जरा जास्त वापरले जाते.

विशेष म्हणजे विमानवाहू युद्धनौका ज्या ठिकाणी लढाऊ विमानांसाठी धावपट्टी ही काही मीटर म्हणजे जेमतेम 100 मीटर लांबीची असते अशा ठिकाणी सी हॅरियर हा एक उत्तम पर्याय ठरला आहे. म्हणूनच इंग्लंड, भारत, स्पेन, थायलंड आणि अमेरिका यांच्या नौदलांनी हे वैशिष्टयपुर्ण असे लढाऊ विमान वापरले. 

लढाऊ विमान हे ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने प्रवास करु शकते. मात्र सी हॅरियरचा हा तेवढा वेग गाठू शकत नसले तरी एका दमात 2500 किमीपर्यंत अंतर कापण्याची सी हॅरियरची क्षमता होती. इतर लढाऊ विमानांपेक्षा सी हॅरियरचा वेग काहीसा कमी असल्यानं समुद्रात टेहेळणी, नौदलाच्या ताफ्यांचे संरक्षण, बॉम्बफेक कऱण्यासाठी अशा मोहिमांसाठी सी हॅरियरचा हमखास वापर केला गेला. 
इंग्लंडचे अर्जेंटिना विरुद्धची फॉकलंड बेटची लढाई, दोन्ही आखाती युद्धांमध्ये, युगोस्लावियाच्या युद्धात या सी हॅरियरचा चांगलाच वापर केला गेला, सी हॅरियरने चांगली कामगिरी बजावली.
अर्थात काळाच्या ओघात सी हॅरियरचे तंत्रज्ञान जुनाट झाले होते. आपल्याकडे 26 सी हॅरियर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. यापैकी तब्बल डझनभर सी हॅरियरना अपघातांना सामोरे जावे लागले. तसंच नौदलाच्या गरजा बदलल्या, नवे तंत्रज्ञान असलेल्या विमानवाहू युद्धनौका आल्या, पुढच्या काळात येणार आहेत. त्यामुळे सी हॅरियरना निरोप देण्यात आला आहे.
सध्या फक्त अमेरिकेच्या मरिन कॉर्प्समध्ये सी हॅरियर सेवेत आहेत. तेही काही महिन्यांत बाद होणार आहेत. या सी हॅरियरची जागा आता तशाच पद्धतीचे काम करणाारे अत्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचें, स्टेल्थ रचना असलेले F-35 हे लढाऊ विमान घेत आहे.   

असं असलं तरी वैशिष्ट्यपुर्ण क्षमतेमुळे, त्या पद्धतीचे पहिले ठरलेले लढाऊ विमान सी हैरियर काहीसे वेगळे ठरते आणि म्हणुनच यापुढच्या काळातही ते लक्षात राहिलं. 

जाता जाता सी हैरियरच्या करामती दाखवणारे हे दोन विडीयो... https://goo.gl/mGXxJ5 आणि https://goo.gl/6paeJD



Thursday, March 24, 2016

व्याघ्र प्रकल्प....एक फार्स ???



व्याघ्र प्रकल्प एक फार्स......म्हणजे व्याघ्र प्रकल्प नकोत का असा त्याचा अर्थ नव्हे.  तर एखादे वन किंवा अभायरण्य अट्टहासाने व्याघ्र प्रकल्प म्हणुन जाहिर करायचे आणि जंगल नव्हे तर वाघ बघायला येणा-या पर्यटकांचा लोंढा वाढवायचा आणि सर्व व्यवस्थेने मिळुन बक्कळ पैसा कमवायचा याला विरोध आहे. म्हणुनच काही मुद्दे मांडावयासे वाटतात.


व्याघ्र प्रकल्प का आवश्यक आहेत, किंवा व्याघ्र प्रकल्पांमुळे काय साध्य होते....

सर्वात महत्वाचे म्हणजे व्याघ्र प्रकल्प जाहिर झाल्यावर वन विभागाचे नियम अधिक कडक होतात आणि त्या वनाचेच नाही तर त्या वनाबाहेरील भागालाही संरक्षण मिळते.

केंद्राकडुन बक्कळ पैसा येतो. व्याघ्र प्रकल्पामुळे संरक्षित वनक्षेत्र वाढते, या भागांतील गावांचे पुर्नवसन, व्याघ्र प्रकल्पामधील विकास कामे लवकर पूर्ण होतात.

वनाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मग वनअधिकारी, वनसंरक्षक, आवश्यक शस्त्र - वाहने यांची संख्या वाढते.

आणि अर्थात जंगलामधील वाघांबरोबर इतर वन्यप्राण्यांनाही संरक्षण मिळते.


व्याघ्र प्रकल्पासाठी आवश्यक घटक कोणता तर अर्थात वाघ
आणि वाघांची संख्या. राज्यात ताडोबा - अंधारी, पेंच, मेळघाट, सह्याद्री, नवेगाव - नागझिरा, बोर असे एकूण सहा  व्याघ्र प्रकल्प आहेत आणि यामध्ये एकूण वाघांची संख्या 190 च्या घरात आहे.  यापैकी ताडोबाचे क्षेत्रफळ 1757 चौरस किमी, महाराष्ट्रातील पेंच 741 चौरस किमी , मेळघाट 2768, सह्याद्री 1165, नवेगाव - नागझिरा 656 तर बोर या नव्यानेच स्थापन झालेल्या व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे 138 चौरस किमी आहे. यापैकी नवेगांव राष्ट्रीय उद्यान हे 133 चौरस किमी आणि नागझिरा वन्यक्षेत्र हे 152 चौरस किमी आणि आजुबाजुचा भाग मिळून नवेगांव - नागझिरा व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

यापैकी पेंच, ताडोबा, सह्याद्री, मेळघाट व्याघ्र प्रकल्प सोडले तर नागझिरा, बोर हे दोन व्याघ्र प्रकल्प ओढूनताणुन केलेले वाटतात किंवा तसा निर्णय घेतलेला वाटतो. राज्यातही यापुढेही काही वन किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग एकत्र करत व्याघ्र प्रकल्प करण्याचा विचार सुरू आहे. हा प्रयत्न काही गैर नाही. पण एखाद्या भागात काही वाघ आढळले तर थेट व्याघ्र प्रकल्प जाहिर करायचा याला काय म्हणायचे.

व्याघ्र प्रकल्पाचा फायदा कोणाला ?

अशा प्रकल्पांचा महत्वाचा फायदा हा ह़ॉटेल व्यावसायिकांना होतो. व्याघ्र प्रकल्प किंवा जवळच्या शहरांत हा व्यवसाय वाढतो. विशेषतः सुट्टीच्या काळात, सिझनच्या काळात हॉटेलचे भाव चढे ठेवले जातात.

पर्यटकांना ने-आण करणारा  वाहतूक गाड्यांचा व्यवसाय जोमाने वाढतो. अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात.

हे सगळे करतांना पर्यटक खिसा सहज खाली करतो. कारण त्याला जंगल नाही, जंगलातील इतर प्राणी नाही तर वाघ बघायचा असतो. त्यासाठी तो वाट्टेल ते करायला तयार असतो.

साधारण 20 चौरस किमी एवढे एका वाघाचे क्षेत्रफळ असले तरी त्याचा संचार हा त्यापेेक्षा कितीतरी जास्त भागामध्ये असता.  मात्र ज्या व्याघ्र प्रकल्पांचे कमी क्षेत्रफळ आहे असे नागझिरा - बोर हे ते किती वाघांना सामावून घेऊ शकणार हा प्रश्न आहे. छोट्या क्षेत्रफळामुळे त्या भागांत वाघ दिसणे ही निव्वळ अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण अशा छोट्या व्याघ्र प्रकल्पातून पर्यटकांना फिरण्यासाठी वाटा अत्यंत मर्यादित असतात. अशा ठिकाणी वाघ दिसणे हा एक योगायोग म्हणावा लागेल. त्यामुळे नागझिरा, बोर आणि हो पेंचमध्येही, अशा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी गेलेल्यांच्या हाती अनेकदा निराशा येते. मात्र या निमित्ताने वाघ बघण्याच्या नादात ( जंगलातील इतर वन्य प्राणी नाही ) पर्यटकाकडुन भरपूर पैसे खर्च झालेले असतात.

तेव्हा असे माझे मत झाले आहे की छोट्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये या व्याघ्र प्रकल्प या गोंडस नावाच्या खाली सुरू असलेली पर्यटकांची लुबाडणूक थांबवली पाहिजे. व्याघ्र प्रकल्प कशाला साध्या राष्ट्रीय उद्यानात, अभयारण्यात, वनामध्ये जंगल सफारी होऊ शकत नाही का, पर्यटकांना चांगली रहाण्याची सोय उपलब्ध होऊ शकत नाही का, जंगल बघण्याचा आनंद मिळु शकत नाही का.. असे प्रश्न मला पडतात. अर्थात यामध्ये पर्यटकांची मानसिकता बदण्याची गरज आहे. पर्यटकांना वाघ बघायला हवा असतो, मात्र व्याघ्र पर्यटन करताना जंगल सौंदर्याकडे दुर्लक्ष कऱणारी पर्यटकांची मानसिकता तेवढीच घातक आहे.

एवढंच नाही तर व्याघ्र प्रकल्पात खास करुन सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या, गाड्यांची संख्या अचानक वाढलेली असते, प्रमाणाबाहेर गेलेली असती, त्यामुळे जंगलाची शांतता भंग होते, वन्य प्राण्यांना त्रास होतो तो वेगळाच. पर्यटकांच्या संख्येबाबत, गाड्यांबाबत कसलेही तारतम्य बाळगले जात नाहीत. हा सगळा खटाटोप सुरु असतो तो फक्त वाघ बघण्यासाठी, जंगल नाही.

म्हणूनच आपल्या राज्यात पेंच, नागझिरा, बोर हे व्याघ्र प्रकल्प अट्टाहासाखाली सुरु झाले आहेत असे वाटते. त्यापेका साध्या वनांत, अभयारण्यात जंगल सफारी विकसित करणे आणि पर्यटकांची वाघ नाही तर जंगल बघण्याची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे. अशा वेळी अनपेक्षितपणे वाघ दिसला तर त्याचा आनंद कदाचित जास्त असेल. 

Tuesday, March 8, 2016

" लोणार विवर " दुर्लक्षाचा शाप मिळालेले एक जागतिक पर्य़टन स्थळ



महाराष्ट्रात पर्यटनाला आवश्यक असे काय नाही आहे. घनदाट जंगल आहे, विविध प्रकराच्या जंगलांचे प्रकार आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, सुंदर असा समुद्र किनारा आहे, वाळवंट -ओसाड असा भाग आहेत, थंड हवेची ठिकाणे आहेत, नद्या आहेत, सुंदर अशी धऱणे, तलाव, पाणथळी आणि त्यापरिसरांत वसलेली पक्षी संपदा आहे,  इतिहास सांगणारे किल्ले, मंदिरे, राजवाडे, बांधकामे आणि लेणी -शिल्पे आहेत. थो़ड़क्यात बर्फ - बर्फाच्छिदित भाग सोडला तर पर्यटनाला आवश्यक असलेली सर्व मानवनिर्मित, नैसर्गिक ठिकाणे - गोष्टी महाराष्ट्रात आहेत, असं निसर्ग सौदर्य देशातल्या बहुदा कोणत्याच राज्याकडे नसावे. अर्थात हे असल्यामुळे महाराष्ट्र राज्य पर्यंटनाच्या बाबतीत हे भारतात अग्रेसर आहे असं मात्र अजिबात नाहीये. हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या काही मोजक्या पर्यंटन स्थळांचा विकास झाला आहे तर बहुतेक सर्व पर्यटन स्थळांकडे दुर्लक्ष झाले आहे किंवा त्याचा पुरेसा विकास झालेला नाही.

यामध्ये आणखी एका अतिदुर्लक्षित पर्यटन स्थळाचे नाव
घ्यावे लागेल ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील, अशऩीच्या आघातामुळे तयार झालेले आणि जगात अस्तित्वात असलेल्या चारपैकी एक असे निसर्ग निर्मित " लोणार विवर ".

हेच विवर जर मध्यप्रदेश, कर्नाटक किंवा केरळ ,राजस्थानमध्ये असते तर त्या विवराचे आणि परिसराचे सोने केले असते असे दुर्देवाने म्हणावे लागेल, इतके दुर्लक्ष आपण या विवराकडे केले आहे.

बुलढाणा जिल्हयात दक्षिण बाजुला साधारण लोणार गावाला खेटून हे विवर आहे. खऱं तर विवराला खेटून आता छोटेखानी शहर वसले आहे असं म्हंटले पाहिजे. औरंगाबादपासून सुमारे 160 किमी, अकोलापासून 130 आणि बुलढाणापासून 100 किमी अंतरावर हे विवर आहे. साधारण 50 हजार वर्षापुर्वी ( किंवा त्याच्याही आधी ) साधारण 170 ते 200 फुट व्यास असलेली, तब्बल 2 कोटी टन वजनाची अशनी 20 किमी प्रति सेकंद या वेगाने आदळून हे विवर तयार झाल्याचा अंदाज आहे.

ब्रिटीश अधिकारी जे ई अलेक्झांडर या इंग्रजी - लष्करी अधिका-याने 1823 मध्ये हजारो वर्षापुर्वी तयार झालेल्या या विवराचा शोध लावला. प्रत्यक्ष लोणार विवराचा परिघ हा सुमारे आठ किलोमीटर आहे तर सर्व बाजुंनी 60 ते 70 अंश उतार असलेल्या विवरामध्ये 100 मीटर उतल्यावर साधारण चार किलोमीटरचा परिघ असलेले आणि समुद्राच्या पाण्यापेक्षा काही पट खारे असलेले खा-या पाण्याचे सरोवर आहे. या विवराची खोली सुमारे 150 मीटर आहे तर प्रत्यक्ष सरोवराची खोली काही मीटर म्हणजे 5-6 मीटर आहे. 

या विवरामध्ये सरोवरच्या परिसरांत चांगले वन- जंगल असून या सान्निध्यात 12 पुरातन म्हणजे किमान हजार वर्षापुर्वी बांधलेली 12 अप्रतिम शिल्पाकृती मंदिरे भले मोडकळीला आलेली का असेना पण ऊन वारा खात अजूनही तग धरून आहेत.    

अग्निजन्य खड़कातील या विवरामध्ये विविध प्रकारच्या क्षारची अगदी रेलचेल आहे. या भागातील क्षार, या भागात असणारे जीवाणु, झाडे, प्राणी संपत्ती हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल एवढी संपन्नता या विवरामध्ये आहे.

लोणार विवर, यामधील सरोवर आणि विवरामध्ये सरोवराच्या काठावर असलेली मंदिरे या व्यतिरिक्त लोणार गावांमध्ये काही ठिकाणे ही न चुकता भेट द्यायला पाहिजेत अशी आहेत.

लोणार विवराकड़े येणारा पाण्याचा एकमेव धावता स्त्रोत म्हणजे " धार " नावाचे ठिकाण जे गावाच्या वेशिवर लोणार विवराच्या एका बाजूला आहे. हे धार ठिकाण अप्रतिम मंदिर आणि शिल्पांनी बांधून टाकले गेले आहे.

आवर्जून पहावे असे लोणार गावांतील दैत्यसूदन मंदिर. चालुक्य काळात 12 व्या शतकांत हे मंदिर बांधले गेले असावे असा अंदाज आहे. मंदिरात प्रखर अशा नजरेची विष्णुची मूर्ति असून संपूर्ण मंदिर हे शिल्पांनी सजलेले आहे. विशेष म्हणजे मैथुन शिल्पेही या ठिकाणी पहायला मिळतात. या मंदिराचे वर्णन , अभ्यास हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल इतके हे मंदिर अप्रतिम आहे.

मोठा मारोती. गावाच्या बाहेर साधारण 9 फुट लांबीच्या झोपलेल्या म्हणजे आडवा असलेल्या हनुमान मंदिराचे ठिकाण आहे. खरं तर या ठिकाणाला धार्मिक स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले असले तरी हनुमान मूर्तिचा दगड किंवा तो परिसर विशेष चुंबकीय क्षेत्र दाखवतो. लोणार विवराच्या आघाताच्या वेळी चुंबकीय गुणधर्म असलेल्या अशनीचा काही भाग हा सध्या हे मंदिर असलेल्या ठिकाणी जाऊन पडला असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

हिंदू, जैन, मोगल, मराठा आणि इंग्रज अशा विविध शासकांचे राज्य या लोणारमध्ये गेल्या हजार शतकांपासून होते. त्यामुळे त्या त्या राज्यकर्त्यांच्या खुणा या शिल्पे, मंदिरे आणि बांधकामांच्या स्वरुपात लोणार कमी अधिक प्रमाणात अस्तित्वात आहेत.

मग एवढ़या सगळ्या गोष्टि असतांना लोणारमध्ये पर्यटक खो-याने येत असतील आणि त्यांच्यासाठी सोयीसुविधा असतील असे आपल्याला वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे.



लोणार विवराच्या बाबतीत पर्यटकांच्या दृष्टिने काय कमतरता आहेत...

1... सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोणार विवर हे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर आहे का असा प्रश्न पडतो, त्याची प्रसिद्धि झाली आहे का अशी शंका घ्यायला जागा आहे, कारण याची माहितीच नाही अशी परिस्थिति आहे. किंवा अशनी अघातामुळे तयार झालेले विवर यापलीकडे याची तोंड ओळख देखील कोणाला नाही.

2...लोणारकड़े येणारे रस्ते कमी अधिक प्रमाण म्हणजे साधारण असा दर्जा राखून आहेत.

3...लोणार गावांत विवराबद्दल माहिती कुठे मिळेल, गाईड कुठे मिळेल याची चौकशी करावी लागते.

4...विवराबद्दल शास्त्रोक्त आणि परिसरातील इतिहासाबद्दल माहिती देणारी पुस्तिका मिळत नाही. MTDC त्यांच्या हॉटेलमध्ये रंगीत अशी थ्री फोल्ड मिळते. त्यामध्ये तर लोणार विवर आणि परिसराबद्दल अत्यंत त्रोटक अशी माहिती आहे.

5... प्रत्यक्ष लोणार विवर बाहेरून बघण्यासाठी,लोणार view साठी 
काही भाग - जागा मुद्दामुन विकसित करायला पाहिजेत. त्याचा अभाव आहे.

6...लोणार विवरामध्ये उतरण्यासाठी एकमेव वाट - मार्ग आहे. तो दगडांनी बांधलेला होता पण आता नसल्यातच जमा आहे. तेव्हा balance चे कौशल्य आजमावत खाली उतरावे लागते.

7...प्रत्यक्ष विवराच्या ठिकाणी जातांना माहिती देणा-या फलकांचा अभाव आहे.

8....विवरामध्ये वाटेचा शेवटचा टप्पा तर भूस्खलन झाल्याने गायब आहे. म्हणजे मातीच्या ढिगा-यावरुनच आपण खाली उतरतो.

9...विवरामधील सरोवराच्या काठावर मोडकळीस आलेल्या पण अप्रतिम शिल्पाकृति असलेल्या 12 मंदिराची माहिती कुठेही नाही.

10...लोणार गावांतील मंदिर - शिल्पाकृति बघण्यासाठी माहिती फलक आणि दिशादर्शक फलकांचा अभाव आहे.

11....लोणार गावांमध्ये किंवा किमान लोणार विवराच्या बाजूला असलेल्या लोकवस्तीमध्ये हागणदारी मुक्त, स्वच्छ अभियान वगैरे राबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

12.... अगदी महत्त्वाचे म्हणजे लोणार विवराबद्दल गावातील लोकांना आस्था आहे का असा प्रश्न हा सर्व परिसर फिरल्यावर पडतो. जर आस्था असती तर हा परिसर शासनाच्या मदतीशिवाय कधीच सुशोभित आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी सुविधांसह केव्हाच विकसित झाला असता.

तेव्हा लोणारच्या बाबतीत महाराष्ट्राने कर्मदरिद्रीपणा दाखवला आहे असं म्हंटले तर ते चुकीचे ठरणार नाही. म्हणूनच जागतिक पर्यटन स्थळ होईल अशी क्षमता असतांनाही लोणार विवर दुर्लक्षित राहिले आहे असेच म्हणावे लागेल.





इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...