Sunday, December 24, 2017

इस्रोचे नवे वर्ष आणखी दमदार...

इस्रोचे नवे वर्ष आणखी दमदार...

ऑगस्टमध्ये भरवशाच्या PSLV या प्रक्षेपकाच्या मोहिमेत अनपेक्षितपणे आलेल्या अपयशानंतर, चार महिन्यांच्या खंडानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पून्हा एकदा नव्या मोहिमांसाठी सज्ज झाली आहे. येत्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी - मार्च दरम्यान चार अवकाश मोहिमा इस्रोसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 

जानेवारीच्या सुरुवातीला Catrosat - 2 सिरीजमधील आणखी एक उपग्रह PSLV या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात पाठवला जाणार आहे. Catrosat - 2 सिरीजमधील उपग्रहामुळे जमिनीवरील अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील ज्याचा नागरी वापराबरोबर सामरिक वापराकरताही - संरक्षण क्षेत्राकरताही उपयोग केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मुख्य उपग्रहाबरोबर इतर देशांचे तब्बल 28 छोटे उपग्रह पाठवले जाणार आहेत. यापैकी 25 नॅनो आणि 3 मायक्रो सेटलाईट्स - उपग्रह असतील. यामध्ये फिनलँड देश हा भारताचा नवा ग्राहक असणार आहे.

त्यानंतर पुन्हा एकदा PSLV प्रक्षेपकाच्या सहाय्याने IRNSS - 1I हा दिशादर्शक उपग्रह पाठवला जाणार आहे.  हा उपग्रह स्वदेशी मिनी GPS 'नाविक' प्रणालीतील पहिला निकामी झालेल्या IRNSS 1A उपग्रहाची जागा घेणार आहे. त्यामुळे नाविक प्रणाली अधिक परिपूर्ण होणार आहे.

तर त्यानंतर वाढती चॅनेल्सची आणि इंटरनेटची मागणी लक्षात घेता अत्यंत महत्त्वाचा GSAT-6A उपग्रह GSLV - Mk 2 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने पाठवला जाणार आहे. या उपग्रहामुळे इंटरनेटचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

या तीनही मोहिमा जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीला पूर्ण होणे अपेक्षित आहे.

त्यानंतरची मार्चमधील आणखी एक मोहीम ही फक्त इस्रोच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरणारी असेल, जगाचे लक्ष वेधून घेणार आहे ती म्हणजे..चांद्रयान - 2 मोहीम.

या मोहिमेत आपण 2008 प्रमाणे चंद्राभोवती एक यान - उपग्रह पाठवणार आहोत. पण त्यापुढे जात त्या यानातून आपण एक रोबोट चंद्रावर उतरवणार आहोत. एवढचं नाही तर या रोबोटमधून एक छोटा रोव्हर - यांत्रिक गाडी प्रत्यक्ष चंद्रभूमीवर धावणार आहे. याद्वारे चंद्राच्या मातीवर काही प्रयोग करत चंद्राचा अभ्यास करणार आहोत.

अशा मोहिमेमुळे चंद्रावर रोव्हर उतरवणार भारत हा रशिया - अमेरिका - चीन या नंतरचा जगातील चौथा देश ठरणार आहे. 

त्यामुळे नव्या वर्षातील पहिले 3 महिने इस्रोसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 

मंगळयान - 2 मोहिमेच्या तयारीलाही याच 2018 या वर्षात सुरुवात होणार आहे. 

छोटे म्हणजे नॅनो - मायक्रो सॅटेलाईट - उपग्रह ज्याचे वजन एक किलो पासून 50 किलोपर्यंत असते. तेव्हा हे छोटे उपग्रह सोडण्यासाठी काही दिवसांत म्हणजे 7-8 दिवसांत सज्ज होणारा प्रक्षेपक - रॉकेट आपण विकसित करत आहोत ज्याचा खर्चही खूप कमी आहे. हे रॉकेट - प्रक्षेपक 2018मध्ये अवकाशात झेप घेतांना बघायला मिळणार आहे. 

असं असलं तरी नव्या 2018 या वर्षातील मार्च महिना सर्वात जास्त चर्चेत असेल, त्यावेळी फक्त आणि फक्त चांद्रयान - 2 मोहिमेची चर्चा असणार आहे.

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...