Saturday, June 24, 2017

इस्रोचा एक उपग्रह निकामी, नाविक प्रणाली अडचणीत

इस्रोच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत हे पहिल्यांदाच घडत आहे. उपग्रह प्रक्षेपित झाल्यावर अपेक्षित कालावधी आधी उपग्रह निकामी झाल्याची इस्रोमध्ये उदाहरणे आहेत. मात्र उपग्रह निकामी झाल्यावर बदली उपग्रह पाठवण्याची वेळ पहिल्यांदाच इस्रोवर आली आहे. 

स्वदेशी मिनी GPS प्रणाली ज्याचे नाव नाविक ( NAVIC - NAVigation with Indian Constellation ) असे ठेवण्यात आले आहे, ज्यामध्ये सात उपग्रह ( IRNSS - 1 A ते G ) भुस्थिर कक्षेत भ्रमण करत आहेत. या सातपैकी पहिला उपग्रह IRNSS - 1A हा तांत्रिक कारणांमुळे निकामी झाला आहे.

एकेकाळी GPS द्वारे माहिती देण्यास अमेरिकेने नकार दिल्यावर भारताने स्वबळावर नाविक प्रणाली विकसित केली आहे. नाविक प्रणाली ही भारतीय उपखंडात म्हणजे भारताच्या सीमेपासून सुमारे 1500 किमी अंतरापर्यंत दिशादर्शक प्रणालीचे काम करते. म्हणजेच या भागातील लष्करी वाहनांना, लढाऊ विमानांना , युद्धनौकांना दिशादर्शनास मदत करते. 

या प्रणाली / व्यवस्थेचा अजून GPS प्रमाणे नागरी वापर सुरू झालेला नाही. येत्या 2018 च्या सुरुवातीपासून या व्यवस्थेचा मोबाईल, सार्वजनिक - खाजगी वाहने, सरकारी - खाजगी विभागांमध्ये वापर सुरू होणार आहे. 

तर नाविक प्रणालीतील पहिला उपग्रह IRNSS 1A जुलै 2013 मध्ये पाठवला होता, या उपग्रहातील तीन पैकी 3 म्हणजे सर्व atomic clock ( अणूमधील कणांची स्पंदने या तत्वावर आधारित घडयाळ ) ज्यामुळे दिशादर्शनास मदत होते, ते एका मागोमाग निकामी झाले आहेत. शब्दशः निकामी म्हणजे त्यापासून मिळणा-या संदेशापासून दिशादर्शन करण्यात अचूकता मिळत नाहीये. उपग्रह मात्र ठणठणीत आहे.

तेव्हा या निकामी झालेल्या IRNSS 1A उपग्रहासाठी बदली उपग्रह  IRNSS 1H हा पाठवला जाणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून येत्या जुलै - ऑगस्ट महिन्यात PSLV C 39 मोहिमेद्वारे हा बदली उपग्रह अवकाशात धाडला जाणार आहे.

नाविकच्या प्रत्येक उपग्रहात प्रत्येकी 3 atomic clock आहेत. यापैकी पहिल्यातले तीनही निकामी झाले आहेत. पण त्यात आता आणखी दोन उपग्रहातील प्रत्येकी एक atomic clock मध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र दोन atomic clock वर उपग्रह दिशादर्शनाचे काम करू शकतो त्यामुळे इतर दोन उपग्रह सोपवलेली कामगिरी पार पाडत आहेत. मात्र या धड्यामुळे इस्रो आता आणखी 2 उपग्रह ( ज्याला राखीव - stand by म्हणूयात ) येत्या काळात अवकाशात पाठवणार आहेत.

यामुळे येत्या काही महिन्यात नाविक प्रणालीतील ( सर्व उपग्रह गृहीत धरले तर ) उपग्रहांची संख्या 11 होणार आहे. 

दिशादर्शन प्रणालीसारख्या उपग्रहांच्या शृंखलेमध्ये राखीव उपग्रह दिमतीला ठेवले जातात. रशियाच्या गॅलिलियो ( GPS च्या ताकदीची प्रणाली ) सारख्या उपग्रहांच्या शृंखलेत अशीच समस्या निर्माण झाली होती. त्यावर राखीव उपग्रहांच्या सहाय्याने तोडगा काढला गेला. 

महत्त्वाचे म्हणजे इस्रोची स्वदेशी मिनी GPS प्रणालीतील पहिला उपग्रह जुलै 2013 ला अवकाशात धाडला तर सातवा एप्रिल 2016 मध्ये. आता या उपग्रहांच्या पूर्ण व्यवस्थेला एक वर्ष झाले असतांना नाविक अजून चाचण्यांच्याच पातळीवर आहे. भले त्याचा लष्करी वापर सुरू झाला असला तरी नाविकमध्ये तांत्रिक समस्यां येणे हे लष्करासाठी धोकादायकच आहे. या प्रणालीचा प्रत्यक्ष नागरी वापर सुरू व्हायला 2018 उजाडणार आहे. 

एकीकडे उपग्रह प्रक्षेपणामध्ये यशाची चढती कमान गाठणा-या इस्रोला ' नाविक ' मधील निकामी उपग्रहांमुळे एक वेगळीच डोकेदुखी निर्माण झाली आहे. बहुमूल्य अशा एका उपग्रहाची किंमत ही 120 कोटींच्या घरांत आहे. तसंच असा उपग्रह पाठवण्यासाठी पुन्हा उपग्रहाच्या किंमतीपेक्षा जास्त असा सुमारे 150 कोटी खर्च येतो.

तेव्हा ही तांत्रिक समस्या लवकरात लवकर दूर करत नाविक प्रणाली दोषमुक्त कशी होते, ही सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात कधी आणली जाते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे, ते इस्रोच्या प्रतिष्ठेचेही ठरणार आहे. 

1 comment:

  1. Amit Sir ! सोप्या समजेल अश्या भाषेत सांगितले आपण समजावून .....

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...