Wednesday, April 18, 2018

अंतराळातील इस्त्रोचा कचरा...

निमित्त चीनचे....

काही दिवसांपूर्वी चीनची अवकाशातील
पहिली प्रयोगशाळा ( spacelab ) टीयॉगोंग - 1 पृथ्वीवर कोसळली. अवकाशातून पृथ्वीवर धडकतांना वातावरणात जळून नष्ट झाली. एक प्रकारे वापरून झालेली, कार्यकाल समाप्त झालेली प्रयोगशाळा अवकाशातील एक प्रकारे कचराच ठरली होती. कारण अशी वस्तू अवकाशातील इतर उपग्रहांना धोकादायक ठरू शकते. इतर उपग्रहांच्या मार्गात आल्यास त्यावर धडकून दोन्ही वस्तूंचे आणखी अगणित तुकडे तयार होण्याची भीती असते. हे तुकडे, असा कचरा वेगाने पृथ्वीभोवती फिरत रहातो. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या वातावरणात असे तुकडे परतायला काही वर्षे लागू शकतात.

सध्या भारताच्या -इस्त्रोच्या दोन वस्तू खरं तर कचरा म्हणूया पृथ्वीभोवती भ्रमण करत आहेत. एक म्हणजे उष्णतारोधी कवचात अडकलेला IRNSS - 1H उपग्रह तर गेल्या महिन्यात प्रक्षेपित करून अवकाशात संपर्क तुटलेला GSAT - 6A उपग्रह.

रॉकेटच्या - प्रक्षेपकाच्या टोकावर उपग्रह असतो आणि त्याच्या भोवती उष्णतारोधी कवच असते. जेव्हा रॉकेटचा वरचा भाग पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पोहचतो ( 70 किमी उंचीच्या वर ) तेव्हा निर्वात पोकळी सुरू होते. अशा वेळी वजनदार ( एक टन ) असे उपग्रहाचे संरक्षण करणारे उष्णतारोधी कवच बाजूला होते. मग आणखी उंची गाठल्यावर उपग्रह वेगळा होतो. इस्रोच्या ऑगस्टमधील IRNSS - 1H उपग्रहाच्या मोहिमेत उष्णतारोधी कवच वेगळे झालेच नाही. त्यामुळे अपेक्षित उंची न गाठता उपग्रह हा या कवचातच अडकून पडला. असा उपग्रह आणि कवच असा भाग सध्या पृथ्वीभोवती फिरत आहे. त्यावर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत, यापासून अजून तरी कोणाला ( दुसऱ्या उपग्रहांना ) धोका नाही. असं असलं तरी हा भाग अंतराळातील कच-याचाच एक भाग बनला आहे.

तर गेल्या महिन्यातील 29 मार्चच्या मोहिमेत GSAT - 6A हा उपग्रह यशस्वीरीत्या 170 किमी उंचीवर प्रक्षेपित केला गेला. दोन वेळा उपग्रहाचे इंजिन सुरू करत कक्षा साधारण 25,000 ते 35,000 किमी अशी लंबवर्तुळाकार वाढवण्यात आली. मात्र तिस-यांदा कक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला असता उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. सुरुवातीला उपग्रहाचे नेमके स्थान शास्त्रज्ञांना मिळत नव्हते. मात्र उपग्रहाचे नेमके स्थान समजले असून पुन्हा उपग्रहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर हे शक्य झाले नाही तर GSAT - 6A उपग्रह अंतराळात पुढील अनेक वर्षे असाच फिरत राहील आणि अंतराळ कच-याचा एक भाग बनेल.

2017 च्या सुरुवातीला इस्रोने एका दमात 104 उपग्रह ( यापैकी 103 हे नॅनो - मायक्रो सॅटेलाईट्स होते, ज्यांचे वजन एक किलोपासून ते 100 किलोपर्यंत होते. एवढे उपग्रह एका दमात सोडण्याचा विश्वविक्रम इस्रोच्या नावावर जमा झाला. एवढेच काय गेली काही वर्षे इस्रो स्वदेशातील असे नॅनो - मायक्रो विविध शैक्षणिक संस्थांचे उपग्रह अवकाशात धाडत आहे. 

हे सर्व उपग्रह छोटे असून कार्यकाल संपल्यावर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता नाही. कारण तशी सोय या उपग्रहांमध्ये नाहिये. काही उपग्रहांमध्ये शेवटपर्यंत इंधन ठेवले जाते, कार्यकाल संपल्यावर असे उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट केले जातात. मात्र सर्वच उपग्रहांच्याबाबतीत अशी सोय केल्याचे कोण जाहीर करत नाही.

त्यामुळे पुढील कित्येक वर्षे असे हे मायक्रो, नॅनो तसंच मोठे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत रहाणार आहेत. 

तेव्हा इस्रोने असा कचरा तयार करण्यात एकप्रकारे हातभार लावत आहे. थोडक्यात अंतराळ कच-यामध्ये इस्रो भर घालत आहे असं म्हंटले तर चुकीचे होणार नाही.

याच विषयावर 2012 मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आणखी माहिती... http://amitjoshitrekker.blogspot.in/2011/07/space-debris.html?m=1


No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...