पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Friday, February 3, 2012

आता अखेरचा राम राम " मिग-२१ " ला

उडत्या शवपेट्या किंवा Flying Coffins अशी कुप्रसिद्धी मिळवलेले, मिग -२१ हे लढाऊ विमान, अखेर भारतीय वायू दलाच्या सेवेतून बाद होणार आहे. खरे तर २००६ च्या सुमारास मिग-२१ बायसन ( Bison )  ही मिग-२१ ची शेवटची आणि आधुनिक आवृत्ती २०१७ ला बाद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय वायू दलाचा कणा असलेल्या या लढाऊ विमानाची जागा कोण घेणार याचा निर्णय मात्र काल परवापर्यंत झाला नव्हता.

अखेर ३१ जानेवारी २०१२ ला या संदर्भातली बातमी दिल्लीहून वायू दलाच्या मुख्यालयातून आली. फ्रान्स देशातील Dassault Aviation या कंपनीने बनवलेले राफेल / Rafale हे अत्याधुनिक लढाऊ विमान मिग-२१ ची जागा घेणार आहे. या निमित्ताने भारत संरक्षण दलातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा खरेदी करण्यासाठी सज्ज झाला आहे. खरं तर ही एक मोठी बातमी होती, मात्र काही निवडक इंग्रजी वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या वगळता फारशी याची कोणी दखल घेतली नाही. या संदर्भातील विस्तृत माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

मिग-२१ एक चमत्कार

शीतयुद्ध सुरु झाल्यावर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांनी संरक्षण दलात पूर्ण ताकद लावत अचाट क्षमतेची शस्त्रात्रे जन्माला घातली, मिग-२१ हे लढाऊ विमान हे त्यामधील रशियाचे एक अपत्य. १९५५ पहिल्या मिग-२१ ने अकाशात झेप घेतली. विशेष म्हणजे ५५ वर्षे उलटली तरी आजही अनेक देशांमध्ये हे लढाऊ  विमान त्या देशातील संरक्षणाची जवाबदारी पार पाडत आहे. ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाण्याची थक्क करणारी क्षमता , शत्रू प्रदेशात घुसत अचूक बॉम्बफेक करण्याची क्षमता ,गरज पडल्यास हवेतच शत्रू पक्षाच्या लढाऊ विमानांशी लढण्याची क्षमता यामुळे मिग-२१ हे १९५५ ते १९८० पर्यंत जगातील सर्वात धोकादायक, आक्रमक लढाऊ विमान म्हणुन ओळखले जात होते. त्या काळात मिग-२१ ने आकाशात अक्षरशः राज्य केले असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. छोट्याशा आकाराच्या या लढाऊ विमानाचा पल्ला १००० किलोमीटरपर्यंत मर्यादीत होता, मात्र ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणारे आणि सर्वात जास्त प्रमाणात निर्माण केलेले लढाऊ विमान म्हणून मिग-२१ ओळखले जाते. आत्तापर्यंत तब्बल ११,००० पेक्षा जास्त मिग-२१ विमानांची निर्मिती करण्यात आलेली आहे. चीनने मिग-२१ ची कॉपी करत Chengdu J-7 हे लढाऊ विमान तयार केले. या विमानानेसुद्धा निर्मितीमध्ये २००० चा आकडा पार केला. तब्बल ५० पेक्षा जास्त देशांनी मिग-२१ ला आपल्या वायू दलात सहभागी करुन घेतले. छोटेखानी विमान, त्या काळातील उत्कृष्ठ विमानातील रडार , चालवण्यास अत्यंत सोपी अशी लढाऊ विमानांची यंत्रणा आणि रचना, ध्वनीपेक्षा दुप्पट वेग यामुळे मिग-२१ लढाऊ विमान विविध देशांच्या हवाई दलामध्ये लोकप्रिय ठरले. यावरुन मिग-२१ चे महत्व लक्षात येते.

भारताच्या हवाई दलाचा कणा मिग -२१ 

 १९५९ ला सोव्हिएत रशियाच्या हवाई दलामध्ये मिग-२१ चा समावेश झाला. १९६२ ला झालेल्या भारत - चीन युद्धात भारताचा मानहानीकारक पराभव झाला. संरक्षण दलाच्या आधुनुकिकरणाकडे झालेले अक्षम्य दुर्लक्ष हे या पराभवाचे एक प्रमुख कारण होते. म्हणनूच लष्कराचे आधुनुकिकरण करतांना भारताने रशियाकडे मदत मागितली. तो काळ अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्धाचा होता. भारत तेव्हा अलिप्त राष्ट्रांचा मोरक्या होता. भारतासारखा एक मोठा लोकशाही देश आपल्याकडे काही मदत मागत आहे हे बघताच रशियाने धडाधड मदतीची दारे खुली केली. तेव्हापासून भारताच्या संरक्षण दलावर रशियाचा प्रभाव पडला तो आजतागायत कायम आहे. आजही भारतीय संरक्षण दलातील ७० टक्के शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत, यावरुन त्या काळापासून किती मोठ्या प्रमाणात रशियाने मदत करायला सुरुवात केली असेल याचा अंदाज येतो.

अखेर १९६३ ला  पहिल्या मिग-२१  चा भारताच्या वायू दलात समावेश झाला. पहिल्या पाच वर्षातच ६० पेक्षा जास्त मिग-२१ F या प्रकारची लढाऊ विमाने रशियाने भारताला दिली. रशियाने त्यानंतर आणखी एक पाऊल पुढे टाकत भारताला मिग-२१ लढाऊ विमान बनवण्याचे तंत्रज्ञान हस्तांतरीत केले. यानंतर भारतामध्ये नाशिक जवळच्या ओझर इथल्या कारखान्यातून हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने मिग-२१ च्या निर्मितीला धडाक्यात सुरुवात केली. मिग-२१ चा समावेशाचा खरा फायदा झाला तो १९७१ च्या पाकिस्तान युद्धात. मिग-२१ ने पाकिस्तानच्या वायू दलाची १० पेक्षा जास्त लढाऊ विमाने पाडली, एवढंच नाही तर पूर्व पाकिस्तान ( बांगलादेश ) आणि पश्चिम पाकिस्तान ( पाकिस्तान ) च्या हवाई क्षेत्रात पूर्णपणे वर्चस्व ठेवण्याची कामगिरी मिग-२१ ने अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

यामुळेच मिग-२१ हे लढाऊ विमान भारतीय वायू दलाचा कणा बनले. बदलत्या काळानुसार ओझर इथे मिग-२१ विमानाच्या विविध आधुनिक आवृत्या बाहेर पडल्या. मिग- २१ ती कामगिरी इथेच थांबत नाही. १९९९ च्या कारगील युद्धात द्रास, कारगील भागात घुसखोरी करत मोक्याच्या शिखरांवर दबा धरुन बसलेल्या पाकिस्तानच्या लष्कराच्या खंदकांवर बॉम्बफेक करण्याची कामगिरी मिग-२७ बरोबर मिग-२१ वर सोपवली गेली होती हे विशेष. एवंढच नाही तर त्याचवेळी ऑगस्ट मध्ये गुजरातच्या कच्छमध्ये टेहळणीसाठी घुसलेले पाकिस्तानच्या नौदलाचे Atlantique हे टेहळणी विमान भारतीय वायू दलाच्या मिग-२१ FL या लढाऊ विमानाने क्षेपणास्त्र डागत पाडले. यामध्ये 16 पाकिस्तानचे नौसैनिक आणि अधिकारी ठार झाले.

भारताचा विस्तार, शेजारील शत्रू लक्षात घेता विविध प्रकारची लढाऊ विमाने भारतीय वायू दल बाळगतो. मिग- २१ हे वजनाने हलके (  साधारण ७ टन वजनाचे ) , आकाराने लहान, ध्वनीच्या दुप्पट वेगाने जाणारे, हवेत लढू शकणारे- जमिनीवर हल्ला करु शकणारे बहुउपयोगी विमान आहे. विमानाचा पल्ला हा १००० कि.मी पर्यंत मर्यादीत असल्याने पाकिस्तानच्या सीमेजवळच्या हवाई तळांवर ही विमाने भारत तैनात करतो. या गुणवैशिष्ट्यांमुळे मिग-२१ हे भारतीय वायू दलाचा कणा बनून राहिले आहे.

उडत्या शवपेट्या

मिग-२१ ची वर उल्लेख केलेली गुणवैशिष्ट्ये असली तरी एक काळी बाजूही या मिग-२१ च्या इतिहासात नोंदवली गेली आहे. भारताने आत्तापर्यंत तब्बल ९४६ मिग-२१ विमाने १९६३ पासून वापरली आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त विमाने ही अपघातामध्ये नष्ट झाली आहेत. ही गोष्ट एवढी धक्कादायक आहे की जगात कुठल्या वायुदलात एखाद्या विमानाचा एवढा अपघात झाला नसावा.या अपघांतामध्ये कोट्यावधी रुपयांचे मिग नष्ट तर झालेच पण अत्यंत मौल्यवान अशा २०० पेक्षा कितीतरी जास्त पायलटचा जीव आपण गमावला आहे. याची अनेक कारणे आहेत.

तंत्रज्ञान आणि वेग 
मिग-२१ चा वेग हा त्या काळात लढाऊ विमानांमध्ये सर्वात जास्त होता. त्या काळाला अनुसरुन तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले. मात्र अनेकदा वेग आणि तंत्रज्ञान यांचा ताळमेळ ठेवता आला नाही. या दोन दगडांवर पाय ठेवत विमान चालवण्याची कसरत पायलटला पार पाडावी लागत असे. यामुळे अपघात होत राहिले. विमानाचा आकार छोटा, उडण्याचा वेग जास्त यामुळेही मिग-२१च्या हवाई विज्ञानात काही समस्यांना सामोरे जावे लागले. हे सुद्धा अपघाताचे निमित्त ठरले.

सुट्या भागांची समस्या
१९५५ च्या काळातील तंत्रज्ञानानेयुक्त लढाऊ विमान १९९० नंतरही वापरत होता. त्यामुळे सुट्या भागांच्या समस्येला नेहमीच तोंड द्यावे लागले. तसंच लढाऊ विमानाला लागणारे सुटे भाग जसेच्या तसे  निर्माण  करण्यास अपयश आले. यामुळे १९९० च्या काळात मिग-२१ ला मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागले. मिग-२१ च्या प्रत्येक दशकातील इतिहास बघितला तर सर्वात जास्त अपघात १९९० च्या दशकांत झाला.

प्रशिक्षण विमानांची कमतरता
लढाऊ वैमानिकाला विविध वेग असलेल्या विमानातून प्रशिक्षण द्यावे लागते. भारतीय वायू दलाकडे  HPT-32 Deepak आणि  HPT-16 Kiran ही प्रशिक्षण देणारी विमाने आहेत. मात्र यांचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी कमी आहे. लढाऊ वैमानिक बनतांना प्रत्येक वैमानिकाला मिग- २१ चे सारथ्य करावे लागते. तेव्हा कमी वेगाच्या प्रशिक्षण देणा-या विमानातून अचानक वेगवान आणि तुलनेत काहीसे किल्ष्ट तंत्रज्ञान असलेले मिग-२१ सांभाळावे लागते. यामुळेच मिग-२१ च्या अपघातामध्ये नवशिक्यांचे प्रमाण लक्षणीय आहे हे विशेष.

मानवी चूका
काळाच्या तुलनेत जुनाट तंत्रज्ञान असलेले लढाऊ विमान चालवतांना चुका होणारच. त्यामुळे अनेकदा मिग-२१ च्या अपघातामध्ये पायलटच्या चुकांमुळे अपघात होत असतात. अर्थात पायलटही काटेकोरपणे, लढाऊ विमान चालवण्याची समीकरणे पक्की डोक्यात ठेवून स्वार झालेला असतो. तरीही जुनाट तंत्रज्ञाद्व सांभाळत लढाऊ विमान हाकतांना नाईलाजाने चूका होतातच. पायलटच्या चुकांमुळे झालेल्या मिग-२१ च्या अपघाताचे प्रमाणही नजरेत भरण्याएवढे आहे.


मिग -२१ बाद होणार २०१७ ला


अशा रितीने चर्चेत राहिलेले मिग-२१ ची मिग-२१ Bison ही अत्याधुनिक आवृत्ती 2000 च्या सुमारास बाहेर काढण्यात आली. मिग-21 Bison हे विमान इतके प्रभावशाली ठरले की अमेरिकेनेही तोंडात बोटे घातली. अमेरिकेबरोबरच्या हवाई दलाच्या अभ्यासात मिग-21 Bison ने F-16  या अमेरिकेच्या लढाऊ विमानाला चितपट केले. आता हे मिग-२१ Bison टप्प्याटप्प्याने 2017 पर्यंत बाद करणार आहोत.

मिग-२१ ची जागा नव्या ताज्या दमाच्या लढाऊ विमानाने 1990 च्या दशकात घ्यावी यासाठी भारताने १९८३ ला Light Combat Aircraft ( LCA ) तयार करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. 15 वर्षात मिग-21 ची जागा घेणारे विमान भारतीय वायू दलात दाखल होईल आणि 2005 - 10 पर्यंत सर्व मिग-21 विमाने बाद करु असा भारताचा आराखडा होता. मात्र  LCA म्हणजेच तेजस असे ज्याचे नामकरण करण्यात आले ते  अजुनही पुर्णपणे तयार झालेले नाही. 2013 ला ते वायु दलात दाखल होईल. त्याचे पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरु होण्यासाठी आणखी काही वर्षे जाणार आहेत.

भारतीय वायू दलाने ही गोची वेळेआधीच ओळखून 2000 पासून प्रयत्न करायला सुरुवात केली. यासाठी एखाद्या देशाकडून विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव वायू दलाने तयार केला. मात्र बोफोर्स सारखा घोटाळा होऊ नये यासाठी भारत सरकारने जागतिक निविदा काढण्याच निर्णय घेतला.

संरक्षण दलातील सर्वात मोठा खरेदी-करार


2006 ला अखेर भारतीय वायू दलाने मिग-21 ची जागा घेण्यासाठी हलक्या वजनाची, बहुउपयोगी विमानांसाठी जागतिक निविदा काढल्या. या निविदेत 126 लढाऊ विमाने खरेदी करण्याच प्रस्ताव होता. त्या काळी या कराराची किंमत होती 42,000 कोटी रुपये म्हणजेच 4,20,00,00,00,000 म्हणजे 11 अब्ज डॉलर्स एवढी होती. एवढा मोठा करार असल्याने जगातील सहा बलाढ्य संरक्षण दलातील कंपन्या गुडघ्याला बाशिंग लावून भारताकडे धावल्या.

या निमित्ताने बोईंग कंपनीचे F-18 Super Hornet, लॉकहिड मार्टिनचे F-16, रशियातील मिग चे Mig-35, स्वीडनच्या साबचे Gripan, युरोपियन युनियनच्या EADS चे Eurofighter Typhoon आणि फ्रान्सच्या Dassault Aviation या कंपनीचे राफेल / Rafale हे विमान शर्यतीत उतरले. तब्बल ६०० पेक्षा जास्त भारताला आवश्यक असलेल्या लढाऊ विमानांच्या गोष्टींची पूर्तता होणे गरजेचे होते. या सर्व लढाऊ विमानांच्या चाचण्या २००८ पासून सुरु होत्या. वाळवंटाचा उष्ण प्रदेश , लेह-लडाखचा अति उंचावरचा थंड परिसर, दक्षिणेकडचा दमट भाग अशा विविध ठिकाणी या सर्व लढाऊ विमानांच्या चाचण्या घेण्यात आल्या. अखेर या शर्यतीत अखेर Dassault Aviation या कंपनीने बनवलेल्या राफेल / Rafale ने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या सिरीया युद्धातही या विमानाने चांगली कामगिरी केली. म्हणनूच राफेल विमानाला भारतीय वायू दलाने आणि मुख्य म्हणजे आंतरराष्ट्रीय हितसंबंध जपण्यासाठी भारत सरकारने फ्रान्समधील या लढाऊ विमानाची निवड केली.

आता निविदा काढल्यानंतर ६ वर्ष उलटत असताना या कराराची किंमत ७०,००० कोटी रुपये म्हणजे १७ अब्ज डॉलर्सच्या घरात पोहचली आहे. भारताच्या संरक्षण दलाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा खरेदी करार ठरणार आहे. जगात आर्थिक मंदी आली असतांना या खरेदी कराराने  Dassault Aviation ला एक प्रकारे जीवदानही मिळाले आहे हे विशेष. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राफेल हे लढाऊ विमान गेली १० वर्षे फ्रान्सबाहेर विविध देशांमध्ये विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र एकही देश हे विमान खरेदी करण्यासाठी पुढे आला नाही. भारताबरोबर होणा-या करारामुळे या विमानाचे आंतरराष्ट्रीय स्थान टिकून रहाण्यास मदत होणार आहे.

पुढील सहा महिन्यात या संदर्भात करारावर स्वाक्ष-या होतील. २०१३-१४ च्या सुमारास पहिली १८ विमाने फ्रान्स भारताकडे सोपवेल. त्यानंतर करारातील तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या अटीनुसार भारत बाकीची विमाने भारतातच बनवेल. आणखी ६६ विमाने विकत घेण्याची तरतूदही या करारामध्ये आहे. या करारामुळे मिग-२१ सेवेतून बाद करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असून त्याची जागा अत्याधुनिक राफेल विमान घेईल आणि मिग-२१ भारतामध्ये इतिहास जमा होईल.


1 comment:

  1. Ashich navin mahiti post karat raha.
    kup mahiti milali.
    Thanks.

    ReplyDelete