पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, March 11, 2012

सह्याद्रीतल्या वाकड्या वाटाहल्ली ट्रेक सगळेच जण करतात. असं लिहायचं कारण पुस्तकांच्या रुपात ज्ञात-अज्ञात किल्ले, लेणी, निसर्गात लपलेल्या सौंदर्याच्या माहितीचा खजिनाच आता उपलब्ध झाला आहे. त्यातच एस.टी.सह आता स्वतःच्या गाड्या घेऊन या ठिकाणी सहज पोहचता येते. सर्वात म्हणजे रोजच्या कामाच्या गडबडीतून थोडंसं फ्रेश होण्यासाठी लोकं फिरण्यासाठी त्यापेक्षा ट्रेकसाठी वेळ काढणे जास्त पसंत करत आहेत.त्यामुळे ट्रेकचे प्रमाणे कितीतरी पटीने वाढले आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे.

पण किल्ले, लेणी किंवा निसर्गातील लपलेली सौंदर्यस्थळे विशेषतः सह्याद्रीच्या बाबतीत बोलयाचे झाले तर दुर्गम भाग असे काही आता फारसे राहिलेले नाही. यामुळे सर्वच ठिकाणी आता शनिवार-रविवारी गर्दी दिसून येते, त्या ठिकाणी बाजार भरल्यासराखं वाटतं. याचा अर्थ फक्त ट्रेकर्स लोकांनी या ठिकाणी जावे आणि आनंद लुटावा असा नाही. सांगायचा उद्देश हा की त्या ठिकाणचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण जाणून घेण्याच्या फंदात फारसे कोणी पडतांना दिसत नाही.

उदा.सर्वपरिचित कर्नाळा किल्ला. एक दिवसाच्या ट्रेकसाठी, नवख्यांसाठी, सर्व गटातील लोकांसाठी, मन फ्रेश करणारा एकदम सोपा आणि उत्तम असा ट्रेक. लोकं अभयारण्यात जातात, आरडाओरडा, गोंधळ करत त्यांची पिकनिक एन्जॉय करतात. कर्नाळा किल्ल्यावर जातात, थंड टाक्यातील पाणी पितात, क्वचित एखाद्यामुळे मधमाश्यांची पोळी डिस्टर्ब होतात, तेव्हा होणारी पळापळही अनुभवतात. मात्र हा  सुमारे १५० उंचीचा कर्नाळा सुळका निसर्गाने बनवला तरी कसा याचा कोण विचार करत नाही. कर्नाळा हे राज्यात पक्षीअभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे, मात्र सध्या तेथे पक्षी शोधायला कष्ट पडतात एवढी त्यांची संख्या कमी झालेली आहे याकडे कोणी लक्ष देत नाही. कर्नाळा किल्ल्यावर येण्यासाठी आणखी किती वाटा आहेत याची कोणी चौकशी करत नाहीत.

थोडक्यात आज ट्रेक भरपूर होत आहे, ट्रेकर्सची संख्या वाढली आहे. मात्र  ट्रेकला जातांना वाकड्या वाटेचा, वाकड्या विचारांचा कोणी विचारच करतांना दिसत नाही. अर्थात खरा ट्रेक करणारा ह्याला अपवाद आहे. तो भटकंती करतांना नेहमीच वेगळ्या वाटा धुंडाळत असतो. प्रत्येक ट्रेकमध्ये नवीन काहीतरी मग ते स्वतःमधले ,भेट देणा-या ठिकाणामध्ये शोधत असतो. तो आनंद खरा ट्रेकर, गिर्यारोहक घेत असतो. असा वेगळा मार्ग निवडणा-या ट्रेकर्समध्ये एक वेगळी गोष्ट असते. ट्रेकर्सच्या भाषेत त्याला कंड किंवा खाज म्हणतात. तेव्हा या अशी कंड किंवा खाज असणा-या ट्रेकर्सना मनोमन सलाम ठोकत सह्याद्रीतील काही वेगळे ट्रेक किंवा वेगळ्या वाटा, त्याची वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. यापैकी काही ट्रेक मी केलेले आहेत, बरेचसे करायचे आहेत. तुम्ही काही वेगळ्या वाटा लिहिल्यात तर त्या मलाही माहित होतील.

बोरिवलीचे नॅशनल पार्क
नॅशनल पार्कला प्रत्येकजण एकदा का होईना गेला असेल.जाणा-यांपैकी अर्ध लोकं कान्हेरी लेण्यांपर्यंत जातात.  व्याघ्र-सिंह सफारी झाली, नौका विहार झाला, कान्हेरी लेणी बघितल्या की संपली आपली नॅशनल पार्कची सफर. मात्र  नॅशनल पार्कच्या विरुद्ध बाजूने म्हणजे मुलूंडच्या दिशेने कान्हेरी लेणीपर्यंत येण्यात वेगळी मजा आहे. साधारण तीन तासांची तंगडतोड एका चांगल्या मळलेल्या पायवाटेने करावी लागते. वाटेवर इंग्रजांनी एका टेकडीवर 1930 च्या सुमारास बांधलेला बंगला दिसतो. आजही बाथटप तिथे अस्तित्वात आहे. छप्पर उडालं असलं तरी भिंती आजही मजबूत आहेत. ह्याला भूताचा बंगला असेही म्हणतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंगल्यासमोर तुळशी तलाव, विहार तलाव, पवई तलाव आणि दूरवर हिरानंदानीच्या इमारती वातावरण स्वच्छ असेल तर सहज दिसतात. कान्हेरी लेणी इथून दीड तासाच्या चालीवर आहेत. थोडी खाज जास्त असेल तर वाट वाकडी करुन घोडबंदर रस्त्यावरसुद्धा उतरता येईल. अर्थात या भागातील वाटा माहीत असाव्यात, खूप चालायची मानसिक तयारी पाहिजे.

आंबोली घाट ( जुन्नर )
जुन्नर जवळच्या दुर्ग-ढाकोबा करतांना जुन्नर किंवा कुकडेश्वर मंदिरामार्गे सगळेजण जातात. मात्र ढाकोबा जवळचा आंबोली घाटाचा मार्ग फारसा कोणाला माहित नाही. विशेषतः पावसाळ्यानंतर या मार्गाने ट्रेक करतांना निसर्गसौदर्य पाहून वेड लागते.


हरिश्चंद्र गड
गिर्यारोहकांची पंढरी म्हणुन ओळखला जाणारा अहमगनगर,ठाणे आणि पुणे ह्यांच्या सीमेवरचा हा किल्ला. खरं तर किल्ल्यापेक्षा हा निसर्ग सौंदर्याने ओळखला जातो. माळशेज घाटावर असलेल्या खुफी फाट्यावरुन अनेक गिर्यारोहक जातात. काहीशी अवघड अशा नळीची वाटही हल्ली बरेच लोकं करतात. मात्र साधले घाटाची वाट, पाचनईची वाट फार कमी गिर्यारोहक  आजमावतात.


ताम्हिणी घाट ते लोणावळा
पावसाळ्यात धबधबे अंगावर घेणारा ताम्हिणी घाट बघतांना वेड लावतो. तेव्हा इथपर्यंत आलात तर आणखी पूढचा , थोडासा आडवळणाचा प्रवास करायचा. घाट चढल्यावर साधारण पाच किमीनंतर एक वाट डावीकडे फुटते. तांबडा भाग दिसणारा भाग म्हणजे कच्चा रस्ता. त्या व्यतिरिक्त हिरवा रंग, याशिवाय दुसरे काहीही दिसणार नाही. धुके या प्रवासाची मजा वाढवतात. 20-25 किमीनंतर ही वाट पक्की बनत अम्बी व्हॅली, कोरीगड, आयएनएस शिवाजी करत लोणावळ्यात उतरते.

राजमाची ते भिमांशकर
राजमाची किल्ला, कुंडलेश्वर मंदिरमार्गे ढाक बहिरी, त्यानंतर कसुर पठार,कुसुर गाव, आंध्र तलाव, वांद्रे खिंड अशी दलमजल करत भिमाशंकरला पोहचता येतं. वाटेत पेठ किल्ल्याचे वेगळ्या कोनातून सुंदर दर्शन होते.

तोरणा ते रायगड किल्ला
रायगड किल्ला गाठायला अनेक वाटा आहेत. मात्र तोरणा ते रायगड किल्ला करण्याची मजा काही औरच.
तोरणा गड , भट्टी गाव आणि त्यानंतर सिंगापूरची नाळ किंवा बोराट्याची नाळ अशा वाटेने रायगडकडे कूच करता येते.

कावळा किल्ला 
वंरधा घाटाच्या माथ्यावर सभोवतालचे रक्षण करण्यासाठी कावळ्यासारखी नजर चोहोकडे ठेवणारा किल्ला म्हणजे कावळा किल्ला. किल्लाकडे गाठतांना वरंधा घाटापेक्षा जवळच असलेल्या शिवथर घळ कडून किल्ला गाठण्याची मजा काही औरच आहे. पारमाची गाव आणि  नाव्हीणी सुळका समोर ठेवत कावळा किल्ला गाठता येतो. शेवटच्या टप्प्यात खडा चढ असणारी वाट दमछाक करते.

सवाष्णीचा घाट 
वैशिष्टपूर्ण अशा डाईक रचनेचा तेलबैला किल्लावरुन प्रसिद्ध सुधागड गाठण्यासाठी सवाष्णीचा घाट हा चागलं घामटं काढणारा मार्ग आहे. गच्च झाडी असलेल्या या वेगळ्या मार्गाने सुधागड गाठण्याची मजा काही औरच.

चांदोली अभयारण्य
मनुष्य वस्ती लांबवर असलेले निसर्गाने भरभरून दिलेले, जंगलसंपत्तीने अत्यंत संपन्न असे हे चांदोली अभयारण्य.  देवरुख किंवा सगमेश्वर मार्गे चांदोली अभयारण्य गाठण्यात मजा काही वेगळीच आहे. प्रचितगड, भैरवगड किल्ले या अभयारण्याच्या काठावर वसलेले आहेत. वारण नदीचा उगम असलेला कंधार धबधबा निव्वल अप्रतिम, तोही याच अभयारण्यात होतो. वन्य प्राण्यांची अगदी रेलचेल आहे. ज्वालामुखीच्या वेळी तयार झालेले लाव्हारसाचे गोळे नंतर थंड झाले . ते या भागात कित्येक  चौरस किलोमीटर पसरलेले आहेत. तो भाग सडा या नावाने ओळखला जातो. चांदोली अभयारण्यात मुक्काम करत घाटमाथा ओलांडत पाटण गाठतांना जी तंगडतोड करावी लागते त्यामुळे ट्रेकिंगची खरी झिंग अनुभवता येते.

माहूली किल्ला
ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच , शिवपदस्पर्शाने पावन झालेला,  जंगलाने वेढलेला , आसनगांव-शहापूरजवळचा माहूली किल्ला. किल्ल्यावर जायला सध्या एकच प्रचलित मार्ग आहे तो म्हणजे शिडीची वाट. पण त्यापेक्षा किल्ल्यावर असलेल्या महादरवाज्याची वाट काळाच्या ओघात पुसली गेलेली आहे. त्या वाटेने गड सर करण्याची मजा वेगळीच आहे. त्याचबरोबर कल्याण दरवाजाची वाटही आता नष्ट झालेली आहे. प्रस्तरारोहण करणारे भिडू बरोबर असेल तरच या वाटेला जावे.

 सिद्धगड ते भिमाशंकर
सिद्धगड किल्ल्यावर प्रवेश करतांना लागणा-या प्रवेश द्वारपासून सिध्दाची लिंगीच्या बाजूला असलेल्या खिंडीतून कोंडवळ गावाच्या पूढे तंगडतोड करत घोडेगावकडून येणा-या डांबरी रस्त्यावर पोहचायचे आणि भिमाशंकर गाठायचे.प्रचंड तंगडतोड करायला लावणारी ही वाट भिमाशंकरला जातांना आजमावायला हरकत नाही.

अहूपे घाट
पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्याची पूरेपूर अनुभूती देणारा अहुपे घाट. मुरबाडच्या पुढे गोरखगड किल्ल्याच्या जवळ असलेला घाट पावसाळ्यात फक्त चढायचा आणि परत उतरायचा. बस्स. पण या द्रविडी प्राणायाम करतांना पाऊस ,धुके ह्यांच्या अनुभूती ही वेड लावणारी, थकवा घालवणारी ठरते.

राजमाची किल्ला
पावसाळ्यातील लोणवळाजवळ असलेला राजमाची किल्ल्याचा ट्रेक तर आता प्रसिद्ध झाला आहे. धो धो पाऊस, धुक्याच्या लपाछपीचा खेळ या भागात ट्रेक करतांना तर स्वर्गीय आंनद देतो. मात्र या किल्ल्याच्या जवळ किंवा मनरंजन बालेकिल्ल्यच्या अगदी समोर असलेल्या उल्हास व्हॅलीचा ट्रेक जरुर करावा. खंडाळा घाटातील रेल्वेच्या प्रवासात एका विशिष्ट ठिकाणी उतरावे आणि समोरची दरी शब्दशः उतरावी आणि उल्हास नदीचा उगमापर्यंत पोहचावे.

अशा सह्याद्रीत कितीतरी माहित असलेल्या, माहित असुनसुद्धा नाव नसलेल्या वेगळ्या वाटा आहेत. सह्याद्रीतील एखाद्या कोप-यात किंवा किल्ल्यावर पोहचतांना या वाकड्या वाटांचा वापर करावा. म्हणजे  लोकांची गर्दी टाळता येते. नवी वाटेने जांताना, नवी वाट शोधतांना संपूर्ण कसब पणाला लागते. दरवेळी अशी वेगळी वाट वेगळा अनुभन देऊन जाते. आपल्या नेहमीच्या किल्ल्याचे, निसर्गस्थळाचे आपण न पहिलेले वेगळे दर्शन घडवते. प्रत्येक किल्ल्यावर, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ऋतुमध्ये जाण्यात वेगळीच मजा आहे. तशीच मजा वेगळ्या, नवीन वाटेने वेगवेगळ्या दिवसांत जाण्यात आहे. मी माझ्या मित्रांबरोबर सायकलने हे किल्ले, लेणी पालथे घातले आहेत.हा सह्याद्री जन्मभर फिरत राहिलो तरीसमाधान होणार नाही इतका समृद्ध आहे. अशा या सह्याद्रीतील आनंदवारीत भटकतांना  " वाकड्या " वाटेने जाण्यात खरे समाधान आहे.  


1 comment:

  1. Hey amit ll arragne the veglya vata trek for all.. hip hip

    ReplyDelete