पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

पाठीमागे किल्ले जीवधन, नाणेघाट

Sunday, January 29, 2012

स्वागत " आयएनएस चक्र " चे
  

                                आयएनएस चक्र 

सरंक्षण दलात कुठलेही एखादे मोठे नवीन शस्त्र म्हणजे लढाऊ किंवा मालवाहू विमान, रणगाडा किंवा युद्धनौका दाखल करुन घेतले जाते तेव्हा अगदी वाजत गाजत, समारंभाद्वारे सेवेत दाखल करुन घेण्याचा कार्यक्रम पार पाडला जातो. विशेषतः तो रणगाडा, लढाऊ विमान किंवा युद्धनौका पहिल्यांदाच दाखल होणार असेल तर संरक्षण मंत्र्यांपासून संरक्षण दलाचे सर्वोच्च अधिकारी कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहातात. मात्र 23 जानेवारीला 2012 ला रशियाच्या दक्षिण-पूर्व भागातील व्लदिवोस्तोक या शहरातील नौदल तळावर झालेला कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडला. भारताचे रशियातील राजदूत याच्यांसह भारत आणि रशियाच्या नौदालातील काही मोजके वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचा सोपस्कार मुद्दामहून साध्या पद्धधतीने पार पाडला गेला कारण या कार्यक्रमाचा फार गाजावजा भारताला करायचा नव्हता. मात्र या कार्यक्रमाचे भारताच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे. कुठलीही प्रसिद्धी न करता आयएनएस चक्र-२नावाची अणु ऊर्जेवर चालणारी पाणबूडी सेवेत दाखल करुन घेत भारतीय नौदलाने आपल्या सामर्थ्यात अत्यंत मोलाची भर टाकली. अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुड्या असलेल्या जगातील अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन या बलाढ्य देशांच्या पंक्तीत आता भारताने मानाचे स्थान मिळवले आहे.

आयएनएस चक्र चे महत्व जाणून घेण्याआधी या पाणबुडीची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.

आयएनएस चक्र-2 ची वैशिष्ट्ये
1993 ला रशियाने  ‘ K-152 Nepra ‘  नावाची अकूला-2 जातीमधील अणु पाणबुडी बांधायला घेतली. मात्र त्या काळात अडचणीत असलेल्या आर्थिक
परिस्थितीमुळे रशियाने हे काम अर्थवट सोडून दिले. त्यानंतर 2004 ला भारताने रशियाशी लेल्या कराराने अर्धवट राहिलेले बांधकाम पुन्हा सुरु झाले. अखेर 2009 ला K-152 Nepra ‘  रशियाच्या नौदलात दाखल झाली. आणखी काही चाचण्या घेत भारतीय नौदलाने ही अणु ऊर्जेवर चालाणारी पाणबुडी भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल करुन घेतली. आयएनएस चक्र - 2 असे या पाणबुडीचे नामकरण करण्यात आले असून यापुढील 10 वर्षे भाडेतत्वावर ही पाणबुडी भारत वापरणार आहे.   

या संपूर्ण व्यवहारासाठी तब्बल 5,000 कोटी रुपये भारताने मोजले आहेत. 8,000 टन वजनाची ही पाणबुडी समुद्रात जास्तीत जास्त 600 मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते. एवढेच नाही तर पाण्याखाली ताशी 60 किलोमीटर वेगाने जाण्याची क्षमता आहे. 300 किलोमीटर पर्यंत मारा करु शकणारी Klub-S  ही क्रुझ क्षेपणास्त्रे या पाणबुडीवर आहेत. म्हणून कमी अंतरावर हल्ला करणा-या वर्गातील ही पाणबुडी जगामध्ये सर्वात वेगवान आणि अत्यंत धोकादायक म्हणून ओळखली जाते. विविध अधिका-यांह एकुण 73 नोसैनिक या पाणबुडीवर असतील. पाण्याच्या पृष्ठभागावर न येता सलग 100 दिवस पाण्याखाली संचार करण्याची क्षमता हे या पाणबुडी सर्वात मोठे वैशिष्टये.

या आधी 1988-91 दरम्यान भारताने चार्ली जातीमधील अणु पाणबुडी तीन वर्षासाठी सोव्हिएत रशियाकडून भाड्याने घेतली होती. तेव्हा त्या पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र असे ठेवण्यात आले होते. म्हणून आता दाखल केलेल्या नव्या अणु पाणबुडीचे नाव आयएनएस चक्र - 2 असे ठेवण्यात आले आहे. 


आयएनएस चक्र-2 चे महत्व
भारताचा नंबर एक शत्रू बलाढ्य चीनकडे एक नाही दोन नाही तर तब्बल 10 अणु र्जेवर चालणा-या                                       पाणबुड्या आहेत. तर विविध जातीच्या डिझेलवर चालणा-या तब्बल 52 पाणबुड्या आहेत.     
                          
पाकिस्तानकडे एकही अणु पाणबुडी नसली तरी Air Independent Propulsion  म्हणजेच डिझेल यंत्रणेपेक्षा अधिक चांगल्या क्षमतेने कार्यरत असणा-या 3 पाणबुड्या आहेत. त्या तुलनेत भारताकडे डिझेलवर चालणा-या फक्त 14 पाणबुड्या आहेत. त्यामध्ये सुद्धा फक्त निम्म्या पाणबुड्या या पूर्ण क्षमतेने सुरु असल्याचे म्हंटले जात आहे. चीनची ताकद आणि त्याने उभारलेले आव्हान लक्षात घेता भारतीय नौदल पाणबुड्यांच्या ताकदीमध्ये चीनच्या कितीतरी  पिछाडीवर आहे. भारताच्या तीनही बाजूला असलेला समुद्र लक्षात घेता आपल्याला 30 पाणबुड्यांची नितांत आवशक्यता असल्याचे सरंक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. नियोजीत कार्यक्रमानूसार 2015 ते 2020 दरम्यान भारतीय नौदलात 12 नवीन डिझेलवर चालणा-या पाणबुड्या दाखल होणार आहेत. मात्र तोपर्यंत 14 पैकी निम्म्या पाणबुड्या सेवेतून बाद होणार आहेत. थोडक्यात 2020 मध्येसुद्धा भारतीय नौदलाच्या डिझेलवर चालणा-या पाणबुड्यांच्या संख्येमध्ये आणि ताकदीत फारसा फरक पडणार नाही.

आयएनएस चक्र -2 च्या समावेशामुळे नौदलाची पाणबुड्यांच्या प्रहार क्षमतेत दुपटीने वाढ झाली आहे. चक्रमुळे तीनही बाजूला असलेल्या अथांग समुद्रात नुसत्या अस्तित्वाने वचक ठेवण्याची क्षमता आता भारताला मिळाली आहे. दीर्घकाळ पाण्याखाली राहत अचूक, वेगवान आणि दूरपर्यंत हल्ला करण्याचे सामर्थ्य भारतीय नौदलाला प्राप्त झाले आहे. चीनच्या हिंदी महासागरातील मुक्त संचाराला थोडा का होईना अटकाव करण्याचे सामर्थ्य चक्रच्या सामवेशामुळे भारताला मिळाले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदलात भविष्यात 
दाखल होणा-या अणु पाणबुड्यांना हाताळण्याचे कौशल्य प्राप्त करण्याची संधी, क्षमता चक्रमुळे उपलब्ध होणार आहे. सध्या भारत स्वबळावर बांधण्यात आलेलल्या आयएनएस अरिहंत  या पहिल्या अणु ऊर्जेवर चालणा-या पाणबुडीच्या चाचण्या घेत आहे. 6,000 टन वजनाच्या अरिंहतसारख्या आणखी तीन पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत. तर अरिहंतपेक्षा काहीशा मोठ्या आकाराच्या म्हणजे 8,000 टन वजनाच्या चार पाणबुड्या बांधणार असल्याची जोरात चर्चा आहे. तेव्हा या अणु पाणबुड्यांना चालवण्याचा अनुभव हा आयएनएस चक्रमुळे आपल्याला मिळणार आहे. कारण अणु ऊर्जेवर असलेल्या पाणबुड्या पूर्ण क्षमतेने चालवणे हे अत्यंत किल्ष्ट, आव्हानात्मक, अत्यंत अवघड आणि तितकेच धोकादायक काम असते. सर्व काही सुरळीत झाले तर 2020 पर्यंत स्वबळावर बांधलेल्या किमान 8 अणु पाणबडुया भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील असा अंदाज आहे.   

अरिहंत आणि अरिहंतपेक्षा जास्त वजनाच्या पाणबुड्यांवर 750 किलोमीटर पासून ते 6,000 किलोमीटर मारा करणारी लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत. अरिहंत जातीच्या पाणबुड्यांच्या समावेशामुळे भारताला तिस-या ठिकाणाहून हल्ला करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. भारताकडे जमिनीवर 150 किलोमीटरपासून ते 3,500 किलोमीटपर्यंत मारा करणारी विविध पल्ल्याची पृथ्वी आणि अग्नी क्षेपणास्त्रे आहेत. लवकरच 6,000 कि.मीपर्यंत हल्ला करु शकणा-या अग्नी-५ ची चाचणी केली जाणार आहे. तर सुखोई आणि मिराज-2000 या लढाऊ विमानांकडे अणुबॉम्ब वाहून नेत तो शत्रू प्रदेशात टाकण्याची क्षमता आहे. थोडक्यात जमीन आणि हवेतून हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली असतांना अरिंहत पाणबुड्यांच्या समावेशामुळे पाण्याखालून शेवटचा पण निर्णायक मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

शीतयुद्धाच्या काळात तर सोव्हिएत रशियाने संरक्षणासाठी सर्वात जास्त विश्वास हा तर अणु  पाणबुड्यांवर टाकला होता. तब्बल 100 पेक्षा जास्त विविध प्रकारच्या अणु पाणबुड्या सोव्हिएत रशियाकडे होत्या. अमेरिका आणि सोव्हिएत रशियाच्या अणु पाणबुड्या परस्परदेशांभोवती सतत गस्त घालत असायच्या 24 तास हाय अलर्टवर असयाच्या. सध्या रशियाकडे साधारण 29 विविध प्रकराच्या अणु पाणबुड्या, अमेरिकाकडे तब्बल 75, चीनकडे 10, फ्रान्सकडे 10, इंग्लडकडे 11  अणु पाणबुड्या आहेत. यावरुन संबधित देशांचा संरक्षणासाठी अणु पाणबुड्यांवर असलेला विश्वास दिसून येतो.  

भारताच्या पश्चिमेकडे होमुर्झ आणि एडनचे आखात आहे, तर पूर्वेकडे मलाक्काचे आखात आहे. जगातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त तेलाची आणि इतर मालाची वाहतूक या सागरी भागातून होते. या भागावर वर्चस्व ठेवत अमेरिका भारतासह जगातील बलाढ्य देशांना शह देण्यासाठी महाबलाढ्य चीन त्याच्या नौदलाची ताकद वेगाने वाढवत आहे. यासाठी अणु पाणबुडी हे चीनचे एक मोठे हत्यार असणार आहे. त्यामुळे भारतानेही चीनला उत्तर देण्यासाठी अणु पाणबुड्या बांधण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. म्हणुनच आयएनएस चक्र - 2 चा भारतीय नौदलातील समावेश हा या मार्गातील पहिली पायरी ठरली आहे.

1 comment: