Thursday, November 26, 2015

पत्रकारीतेमधील " भटकंती "......






" जे न देखे रवी ते देखे कवि " असे म्हणतात, यामध्ये थोडीशी सुधारणा करत एक पत्रकार म्हणून म्हणावे लागेल " जे न देखे जनी ते देखे आम्ही ". खरं तर सर्वसामान्यांना जेथे शिरकाव करता येणार नाही, जाता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही तेथे जाण्याची, अनुभव घेण्याची संधी पत्रकारांना मिळते. कारण हे क्षेत्रच असे आहे की बातमीच्या निमित्ताने असा विनासाय प्रवेश सहज पदरांत पडतो. त्यातच न्यूज़ चैनलमध्ये काम करत असल्याने फील्ड वर्क हे अनिवार्य ठरते. कारण कैमेरामनसह घटनेच्या ठिकाणी पोहचणे, घडलेल्या घडामोडींचा वृत्तांत दृश्यांसह चैनेलच्या माध्यमातून लोकांपर्यन्त पोहचवणे किंवा विशेष कार्यक्रम करत ती घटना, बातमीचा गर्भितार्थ दाखवणे हे आलंच. न्यूज़ चैनेल हे दृकश्राव्य माध्यम आसल्याने त्याची ताकद, प्रभाव अर्थात मोठा आहे. त्यामुळे वृत्तपत्र, मासिक या माध्यमांपेक्षा न्यूज़ चैनलमधून पत्रकारीता करतांना “ भ्रमंती “ ही काहीशी जास्तच ठरलेली आहे, मग पत्रकारांच्या भाषेत कोणतेही बीट ( विषय ) का असेना.

संरक्षण हा विषय आधीपासून आवडता असल्याने आणि वरिष्ठांनी विश्वास टाकल्याने संरक्षण विषय बातम्या कव्हर करायची संधी पत्रकारीता सुरु केल्यापासूनच मिळाली. संरक्षण क्षेत्रातील घडामोडी कव्हर करण्यासाठी खरं तर दिल्ली हे सर्वात उत्तम ठिकाण. पण मुंबईमध्ये काम करत असल्याने पश्चिम नौदलाचे मुख्यालय असलेल्या मुंबई आणि परिसरातील नौदलाच्या घडामोडी अनेकदा कव्हर करण्याची संधी मिळाली.

या निमित्ताने 2007 च्या जानेवारीमधील INS Viraat मध्ये रहाण्याची आणि प्रवास करण्याची मिळालेली संधी स्वप्नवत् अशीच होती.

प्रणव मुखर्जी यांच्याकडून ए के ऍंथोनी यांनी संरक्षण मंत्रीपदाचा भार स्वीकारुन काही आठवडे झाले होते. जानेवारी 2007मध्ये ऍंथोनी नौदल सामर्थ्याचा आढावा घेणार होते. आम्ही पत्रकार गोव्यात पोहचलो. दुस-या दिवशी कारवारच्या भव्य नौदल तळावर पोहचलो. ( भविष्यात आशियातील सर्वात मोठा नौदल तळ ). या ठिकाणी पोटात काही रणगाडे आणि सैनिक वाहून नेण्याची क्षमता असलेल्या INS Shardul या landing warship ( किना-यावर सैन्य उतरवण्याची क्षमता असलेली युद्धनौका ) चा नौदलात दाखल करण्याचा कार्यक्रम संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.

त्यानंतरचा प्रवास , घड़ामोडी या स्वप्नवत अशाच होत्या. या नौदलाच्या तळावरच्या " सी किंग " या नौदलाच्या हेलीकॉप्टमध्ये बसलो आणि तब्बल 40 मिनिटे प्रवास करत भर समुद्रात INS Viraat वर उतरलो. तेव्हा गोव्यासमोरच्या खोल समुद्रात कोठेतरी होतो. दुपार झाली होती.

जमिनीवर हेलिकॉप्टरने उतरणे आणि समुद्रात युद्धनौकेवर उतरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. कारण काहीसा वेग पकडलेली युद्धनौका समुद्रात काही प्रमाणात का होईना हेलकावे खात असते. म्हणजेच जिथे हेलिकॉप्टरला उतरावयाचे आहे तो प्लेटफॉर्म अस्थिर असतो. त्यातच वारा हा हेलिकॉप्टरचे गणित चुकवु शकतो. तेव्हा हेलिकॉप्टर पायलटची चांगलीच कसोटी लागत असते.

आणि काहीसे तसेच झाले. जेव्हा हेलिकॉप्टर विराटवर उतरणार होते तेव्हा वा-याची दिशा आणि वेग बदलला आणि त्यामुळे पायलटने काही मीटर उंचीवरुन उतरण्याची जागा बदलवत सुरक्षित लैंडिंग केले.  हा सर्व थरार प्रत्यक्ष अनुभवत देशाच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका विराटमध्ये दाखल झालो. या ठिकाणी आमची चक्क रहाण्याची व्यवस्था केली होती. अगदी प्रत्येकाला वेगळी रुम, रुममध्ये गरजेच्या सर्व सुविधा. फ्रेश झालो सकाळपासूनच्या कार्यक्रमांमुळे काहीसा थकवा आला होता. अर्धा तास झोपही काढली आणि त्यानंतर जेवण झाल्यावर 4च्या सुमारास डेकवर आलो.

ऍंथोनी यांना नौदलाच्या सामर्थ्याची झलक दाखवण्यात आली. नौदलाची महत्त्वाच्या युद्धनौका, विमाने, हेलिकॉप्टर हे संरक्षण मंत्र्यांना सलामी देत ‘ विराट ‘ च्या जवळने गेल्या. नौदलाच्या या महत्त्वाच्या हा शस्त्रसांभाराचे याची देही याची डोळा अगदी मनोसोक्त दर्शन झाले. 

त्यानंतर संध्याकाळ झाली असतांना पुन्हा विराटच्या पोटात गेलो, नौदल अधिकारी यांच्यांशी मनोसोक्त गप्पा मारल्या. रात्री जेवण झाल्यावर १० च्या सुमारास पुन्हा डेकवर आलो आणि वातावरणाने थक्क झालो.
भर समुद्रात जोरदार थंड वारा, साक्षीला पौर्णिमेचा चंद्र आणि आम्ही विराटच्या डेकवर. काय वातावरण असेल तुम्हीच कल्पना करा. अशा वातावरणात शत्रुपक्षच्या क्षेपणास्त्राला हवेतच भेदता येईल अशा " बराक " क्षेपणास्त्राची चाचणी, यशस्वी चाचणी आम्ही बघितली.

असा स्वप्नवत प्रवास सुरु असतांना रात्रीची झोपही छान लागली आणि दुस-या दिवशी सकाळी थेट १० वाजता डेकवर य़ेत सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. तोपर्यंत आम्ही उरणच्या समोर भर समुद्रात पोहचलो होतो. पुन्हा सी किंग हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि कुलाबा इथल्या नौदलाच्या हेलीकॉप्टर तळावर उतरलो. जवळच ऑफिसला पोहचलो बातमी फ़ाइल केली.

तर असा हा स्वप्नवत असा प्रवास होता. मात्र या निमित्ताने १५०० अधिकारी-नौसेनिक कार्यरत असलेल्या विराटला खूप जवळुन बघता आले, तिची कार्यपद्धती माहिती झाली. नौदलाचे बलस्थान विराटला का म्हणतात ते समजले.

अशीच भटकंती २००६ ला “ Defense Correspondent Course “ करण्याच्या निमित्ताने झाली. संरक्षण बीट कव्हर कऱणा-यांसाठी हा कोर्स म्हणजे संरक्षण दलाबदद्लचा दृष्टीकोन अधिक डोळस कऱणारा असतो. कोर्सची सुरुवात नौदलाचे दक्षिण मुख्यालय कोची पासून झाली. त्यानंतर देशाच्या पुर्वोत्तर राज्यांच्या वाटेवर असलेला भारतीय वायू दलाचा महत्त्वाचा हवाई तळ “ बागडोग्रा ” आणि लष्कराचे एक मुख्य ठिकाण जम्मु या ठिकाणी आमच्या कोर्समधील शिकवण्या पार पडल्यावर शेवटचे चार दिवस Forward Areas मध्ये घालवण्यासाठी आम्ही पुंछ-राजौरी या ठिकाणी निघालो.

२००६ चा काळ हा काश्मिरमधील दहशतवादाला ओहोटी  
लागण्यास सुरुवात होण्याचा होता. असं असलं तरी आम्हा कोर्सच्या पत्रकारांसाठी असलेल्या सुरक्षेमध्ये तसुभरही फरक पडला नव्हता. या संरक्षणातच भारत पाक सीमेवरचे पुंछ बघितले आणि गावांत फेरफटका मारत अनुभवले. त्यानंतर राजौरीच्या छोट्या वायू दलाच्या तळावर पोहचलो. रामा राघोबा राणे असे त्या छोट्या विमानतळाचे नाव. १९४७ च्या भारत पाक युद्धात राजौरी पाकच्या ताब्यात गेले होते. राजौरीपर्यंतचा भुसुरुंगाच्या अडथळ्याचा बनलेला रस्ता खुला कऱण्यात आणि राजौरी पुन्हा जिंकण्यात राणे यांनी अद्वीतीय कामगिरी बजावली होती. या कामगिरीमुळे त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सम्नानाने गौरविण्यात आले. तर हा सर्व इतिहास माहित झाला, या परिसराला जाण्याची संधी मिळाली.


या प्रवासातला थरारक अनुभव पुढे आला. PoK म्हणेजच पाक व्याप्त काश्मिरच्या सीमेवर असलेल्या वीर भद्रेश्वर या लष्करी ठाण्याला जाण्याची संधी मिळाली. हे सुद्धा ठिकाण १९४७ भारत पाक युद्धात पाकिस्तानने जिंकले होते जे आपण परत मिळवले. या ठिकाणी जातांना आम्हाला आमचे मोबाईल फोन, कॅमेरे सुरक्षेच्या कारणांमुळे जमा कऱण्यात आले. त्यानंतर एक टेकाड चढत प्रत्यक्ष लष्करी बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचलो आणि समोर बघताच थक्क झालो. खाली, टेकाडपासून काही किमी अंतरावर पाकव्याप्त काश्मिरमधील गाव वसलेले होते. समोरच्या टेकाडावर PoK मध्ये पाकिस्तानी लष्कराचे अस्तित्व स्पष्टपणे दिसत होते. तेथे चक्क मोबाईल टॉवर होते. म्हटले पाक लष्करातील जवान थेट घरच्यांशी मोबाईलवर बोलत असतील. तर एक जवान म्हणाला ते आहेच पण भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कातही रहाता येते. आता बोला..... 
दोन टेकाड्यांच्या मध्ये साधारण 5 किमीचे अंतर होते. या मधून भारत पाकची LoC गेली होती. तर जवानांना विचारले नक्की कोठुन.... तर जवानाने खाली एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवले, ती आहे आपली LoC. त्या झाडाच्या अलीकडे म्हणजे काही बांधकाम दिसत आहे का असे एका जवानाने आम्हाला विचारले तेव्हा बराच वेळ निरखून बघितल्यावर जमिनीवर बांधकाम दिसले. जवान म्हणाला ते आपले बंकर. तर झाडाच्या पलिकडे म्हणजेच PoK च्या हद्दीत जमिनीवर पुन्हा नीट निरखल्यावर बांधकाम दिसले, तो पाकिस्तानचा बंकर. दोन बंकरमधील अतंर जेमतेम २०० मीटर . म्हणजे प्रत्यक्ष गोळीबाराच्या वेळी काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी.  जवान म्हणाले आत्ता तुम्ही डोके वर काढून या भागांत किमान फिरु शकतात मात्र आधी शक्य नव्हते. कारण रोज गोळीबार, मोर्टरचा हल्ला होत दिवाळी साजरी व्हायची. या ठिकाणी. २००३ पासून शस्त्रबंदी लागू केल्यावर अर्थात या घटना घडत नाहीत. तर असे हे पाकव्याप्त काश्मिरचे, सीमावर्ती भागाचे, दहशतवादाची भिती घेत जगणा-या नागरीकांचे, सतत दडपणाखाली राहत आपले कर्तव्य चोख बजावणा-या जवानांचे दर्शन या कोर्सच्या दरम्यान झाले.  


 विज्ञान हा एक माझा आवडता विषय. यानिमित्ताने कितीतरी वेळा भाभा अणु संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला. तिथेही विविध विभागांत बातम्यांच्या निमित्ताने भ्रमंती झाली. या केंद्रात काम कारणा-या लोकांनाही आपला विभाग सोडून दुस-या विभागात किंवा जागेत जायची परवानगी नाही. मात्र पत्रकार असल्याच्या निमित्ताने या सवलतीचा मी फायदा घेत बहुतेक सर्व भागांत मनोसोक्त बातमीनिमित्त फेरफटका मारला. 

भाभा अणु संशोधन केंद्र म्हंटल्यावर डोम आकाराची एक वास्तू पटकन आठवते. भारत-कॅनडा यांनी संयुक्तरित्या उभारलेला हीच ती CIRUS नावाची अणु भट्टी. १९७४  आणि ९८ च्या अणु चाचण्यासाठी आवश्यक ते संशोधन याच ठिकाणी करण्यात आलं , काही प्रमाणत अणुइंधन येथुनच मिळवण्यात आलं. तर ही अतिभव्य अशी ही CIRUS अणु भट्टी आतमधून बाहेरुन बघता आली. 

मंगळयान मोहिमेच्या कव्हरेजच्या निमित्ताने श्रीहरीकोटाला जाण्याचा योग आला. इस्त्रो ज्या ठिकाणाहून उपग्रह अवकाशात धाडते ती जागा,ते ठिकाण बघता आले. श्रीहरीकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये असले तरी चैन्नईहून जाणे सोईस्कर पडते. चैन्न्ईपासुन १२० किमी अंतर. रस्ता चांगला असल्याने प्रवासही चांगला होतो. श्रीहरीकोटा हे एक बेट असुन त्यावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा कार्यक्रम पार पडला जातो. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली ही ठिकाणे बघता आली, अनुभवता आली.

तेव्हा बातीमदारी करतांना अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली. 
 पंढरीची वारी चक्क दोनदा कव्हर करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. 26 जुलैच्या पावसानंतर रायगडमधील पुर परिस्थिति आणि पावसाने केलेला आघात कव्हर करता आला.  भारताने २००७ ला २०-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर विमानतळ ते वानखेडे मैदान असा धोनी ब्रिगेडची जल्लोष यात्रा अगदी जवळून कव्हर करायाचा अनुभव मिळाला. सर्वसामान्यांनी न बघितलेली कोकण रेल्वेचे सिद्ध तंत्रज्ञान असलेली स्काय बसची सफऱ कऱण्याची संधी मिळाली.
माझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांच्या विविध विषयांमुळे, एखाद्या विषयावरील प्रभुत्वामुळे, वेेगवेगळ्या भागात भ्रमंती करुन आले आहेत आणि करत आहेत. कोणी कोयना धरण आतून बघितले, कोणी नक्षलवाद्यांची मुलाखत घेतली, कोणी मुख्यमंत्र्यांबरोबर दिवसभर दौरा केला, कोणी कोकण रेल्वेचा अभ्यास केला, कोणी केदारनाथवर आलेले निसर्ग संकट कव्हर केले, कोणी बोईंगच्या विमाननिर्मितीच्या अवाढव्य कारखान्याला भेट दिली तर कोणी दुष्काळी भागांचे वृत्तांकन दुष्काळ खरा अनुभवला.

अर्थात बातमीदारीनिमित्त आपसुक झालेली ही भ्रमंती ज्ञानात भर टाकणारी ठरलीच पण समाजातील वास्तव समजण्यास, वास्तवाचे भान आणण्यास, शहाणे होण्यात आणि अर्थात पत्रकारिता डोळस करण्यात मदतीची ठरली.

Tuesday, October 6, 2015

जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक

जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक

दर वेळी शहरांतील बकालपणा, अस्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा नसणे, वाहतूक समस्या, यासाठी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि ( नेहमीच स्वत: ची कातडी वाचवणारे ) प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र कडोमपातील सध्याच्या अधोगतीला स्वत: ला सुशिक्षित, सुसंस्कृत , मध्यमवर्गीय ( आता काही प्रमाणात उच्च मध्यमवर्ग ) समजले जाणारे नागरीकच जबाबदार आहेत असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. कारण धाक ठेवू शकणारा नागरीकांचा दबाव गट नावाचा प्रकारच सध्या कडोमपामध्ये अस्तित्वात नाहीत. किमान वडीलधा-यांनी डोळे वटारावेत आणि धाकामुळे सत्ताधा-यांनी ऐकावे अशीही आता परिस्थिती नाहीये.

मुंबई-पुणे, नाशिक किंवा काही मोजक्या ठिकाणी त्या भागांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांना धारेवर धरणारे नागरिकांचे गट - संस्था अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी एखादा मुद्दा नागरिकच रेटून थेट अंमलात आणायला लावतात. प्रशासन, सत्ताधारी यांनी काही चुका केल्या तर त्यावर रान उठवत निर्णय बदलायला किंवा निर्णय मागे घ्यायला भाग पाडतात. या सर्वांचा पूर्णपणे अभाव कडोमपामध्ये दिसत आहे.. नव्हे तो आहे.

युवा गट, माहिती अधिकाराचा वापर करणार गट ( ब्लैकमेलिंग वाला नाही ), ThinkTank चा गट, बैंकिंग -उद्योग- शिक्षण यामधील विचारवंत - अभ्यासु लोकं, वरिष्ठ नागरिकांचा गट, महिलांचे विविध गट..... असे गट पाहिजेत जे सत्ताधारी, प्रशासन यांच्या संपर्कात राहून पालिकेच्या भागातील निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवतील, चुका सांगतील, चांगल्या निर्णयांचे खुल्या मनाने स्वागतही करतील. असे लोक, अशा संस्था कडोंमपा जरूर आहेत, पण पालिकेला हलवतील, कामाची दखल घ्यायला भाग पाड़तील अशी त्यांची मजल अजिबात नाही. किंबहुना यापैकी काही लोकं, संस्था या एखाद्या विचारसरणीला चिकटुन आहेत. त्यामुळे सक्षम असा नागरीकांचा मोठा दबाव गट कडोंमपा परिसरात तयारच झाला नाही.

त्यामुळेच सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. विरोधकांनी आधी बेटकुळ्या दाखवल्या ख-या पण यांमधील हवा ही काही महिन्यांतच निघून गेली. कोणी जाब विचारणारा वडीलधारी नसल्याने, दबाव गट नसल्याने गेल्या पाच वर्षांनंतरही कडोंमपा ही आहे तिथेच राहिली आहे. आता काहीच मुठभर लोकप्रतिनिधी,  प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यामुळे चांगुलपणा टिकून राहिला आहे.

सध्या सेना-भाजप पुन्हा पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर - मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहे. विरोधक म्हणून साफ अपयशी ठरलेले, कमजोर झालेल्या मनसे- कांग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांना संधी मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.

निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण जोपर्यन्त डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यन्त पसरलेल्या या कडोंमपामध्ये जाब विचारणारी नागरिकांची सक्षम यंत्रणा तयार होत नाही तोपर्यन्त निवडणुकांमध्ये या सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना गृहीतच धरले जाणार. कारण राजकीय पक्षांना पक्के माहीत आहे की लोकं जाणार कुठे, कोणाला मत देणार.....आम्हांलाच मत देणार.

तेव्हा नागरिकांनी उठा, जागे व्हा, संघटित व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.

Wednesday, September 23, 2015

सेलिब्रेशन मंगळयानाच्या यशाच्या वर्षपुर्तीचे..



स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे काही सुवर्णक्षण किंवा घटना आहेत की ज्यामुळे देशामध्ये निर्णायक बदल झाले, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यामुळे देशातील धोरणात्मक बदल झाले. मग यामध्ये आणिबाणी, दोन अणुचाचण्या, मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणा अशा काही घटनांचा उल्लेख जरुर करावा लागेल. यामध्ये मंगळयानमोहिमेचे नाव घ्यावे लागेल.

देशाची दळणवळण, संदेशात्मक, हवामान, संरक्षणात्मक बाबतींमधील गरज अवकाश संशोधनाच्या माध्यमातून भागवतांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वेगळ्या गोष्टिकड़े लक्ष द्यायला सुरुवात केली. ती म्हणजे चांद्रयान आणि मंगळयांसारख्या मोहिमा हाती घेतल्या, एवढेच नाही तर त्यात पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवले.

24 सप्टेंबरला 2014 ला भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाभोवती घिरटया घालू लागले. आत्तापर्यन्त एकूण 51 मोहिमा मंगळ ग्रहासाठी विविध राष्ट्रांनी खर्ची केल्या पण यापैकी फक्त 40 टक्के मोहिमा म्हणजे जेमतेम 20 मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. यापैकी पहिल्याच प्रयत्नात अमेरिका नाही, रशिया नाही, यूरोपीयन स्पेस एजेंसुद्धा यशस्वी झाल्या नाहीत. चीन आणि जपानची याने मंगळपर्यन्त पोहचलीच नाहीत. मात्र भारताने ते केले तेही अवघ्या 450 कोटी रुपयांत. हेच करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि यूरोपियन स्पेस एजेंसीला त्यांच्या मोहिमांकरता 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले होते.

या यशस्वी मंगळयानाच्या मोहिमेने काही गोष्टि साध्य झाल्या आहेत....


इस्रोच्या अवकाश तंत्रज्ञान आणि कौशल्याची जगाने दखल घेतली, वाहवा केली.

इस्रोला परग्रह मोहिमांचा मोलाचा अनुभव मिळाला जो पुढील मोहिमांमध्ये कामाला येणार आहे.

पृथ्वीपासून मंगळ मोहिमेसारख्या अतिदुरच्या मोहिमांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा तयार झाली.

यशामुळे सरकारचा इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला , प्रोत्साहन मिळाले, आता अधिक निधी सहज मिळू लागला आहे.
सर्वसामान्य जनतेचाही इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

यशामुळे इस्रोला हुरुप मिळाला, आत्मविश्वास वाढला, आता आणखी अशा मोहिमांच्या आखणीला सुरुवात झाली आहे.

मंगळयानाने एक वर्षात बराच माहितीचा खजिना गोळा केला आहे. त्याचा अभ्यास सुरु आहे. थोडक्यात अवकाश संशोधनाची एक वेगळी शाखा यामुळे विकसित होणार आहे , ज्यामध्ये भारत खुपच मागे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाश मोहिमा दिवसेंदिवस खार्चिक होत असतांना स्वस्तात आणि यशस्वीरित्या उपग्रह पाठवणारा देश म्हणून भारताची ओळख झाली आहे, तेवढा विश्वास भारताने जगात कमावला आहे. म्हणून फ्रांस , जर्मन, इंग्लण्डसारखे प्रगत देश आणि इंडोनेशिया, ब्राझील, मलेशियासारखे पुढे येणार देश भारताच्या मदतीने उपग्रह पाठवत आहेत.

म्हणूनच जगाच्या पटलावर भारताचे खणखणीत नाणे वाजवणा-या मंगळयान मोहिमेला एक वर्ष झाले आणि याकाळात असे महत्वपुर्ण बदल घडले असल्याने या यशाचे सेलिब्रेशन करायला हवे.

Friday, May 22, 2015

इस्त्रोची अवकाशातील पहिली दुर्बिण - Astrosat


भारताची अवकाश संस्था म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वाटचालीची 60 वर्षे पुर्ण केली आहेत. 19 एप्रिल 1975 ला भारताने आर्यभट्ट नावाचा 360 किलो वजनाचा उपग्रह सोव्हिएत रशियाच्या मदतीने सोडला होता. तेव्हा उपग्रह सोडण्याच्या काळालाही आता 40 वर्षे पुर्ण झाली आहेत.

गेल्या काही वर्षात देशाच्या संदेशवहन, दळवणळ, हवामान, संरक्षण या सर्वांसाठी आवश्यक गोष्टी आणि गरजा विविध उपग्रह अवकाशात पाठवत इस्त्रोने पुर्ण केल्या आहेत किंवा आता त्या पुर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणुनच इस्त्रो आता या गरजांच्या पलिकडच्या मोहिमांना हात घालत आहेत. याचे उदाहरण म्हणजे चांद्रयान -1 मोहिम आणि आत्ताची, जगाने कौतुक केलेली मंगळयान मोहिम. जगातील अवकाश तंत्रज्ञानाच्या घडामोडींमध्ये मागे राहू नये, तसा अनुभव मिळावा, भविष्यातील अवकाशातील तंत्रज्ञानाचे टप्पे इतर देशांच्या बरोबरीने गाठण्यासाठी इस्त्रोने या मोहिमा केल्या आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे.  

Astrosat मोहिम 

या घडोमोडींचाच एक भाग म्हणून इस्त्रो अवकाशात एक दुर्बिण पाठवत आहे. Astronomy  Satellite  म्हणजेच  Astrosat असे त्याचे नाव आहे. एकुण 1513 किलो वजनाच्या या दुर्बिणीमध्ये 750 किलो वजनाची 5 विविध प्रकारची उपकरणे असणार असून अवकाशाची विविध प्रकारची छायाचित्रे टिपणार आहे. साधारण 5 वर्षे या दुर्बिणीचा कार्यकाल असणार असून पृथ्वीपासून 650 किमी उंचीवरुन फिरतांना एका दिवसांत 14 प्रदक्षिण पुर्ण करणार आहे. या काळात दररोज तब्बल 420 गिगाबाईट्स एवढी छायाचित्रे वजा माहिती ही दुर्बिण बंगलोर इथल्या नियंत्रण कक्षाकडे पाठवेल. 

यामुळे एक वेगळे माहितीचे दालन खुले होणार आहे.
या दुर्बिण प्रकल्पामध्ये इस्त्रोबरोबर  Tata Institute of Fundamental Research, Mumbai, Indian Institute of Astrophysics, BangaloreRaman Research Institute, Bangalore,  आयुका म्हणजेच Inter-University Centre for Astronomy and Astrophysics, Pune, Bhabha Atomic Research Centre, Mumbai,  S.N. Bose National Centre for Basic Sciences, Kolkata, Canadian Space Agency, University of Leicester  अशा विविध संस्था सहभागी होत आहेत. यामुळे या दुर्बिणीने पाठवलेल्या माहितीचा अभ्यास कऱण्याची संधी या संस्थांमधील संशोधकांना, विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या दुर्बिण प्रकल्पातून मिळालेला अनुभव भविष्यातील आणखी विविध मोहिमांसाठी उपयोगी पडणार आहे.


अशी दुर्बिण पाठवत आपण काही वेगळे करत आहोत असे नाही. कारण अमेरिका, रशिया, युरोपियन स्पेस एजन्सीने अशा अनेक, विविध प्रकारच्या दुर्बिणी पाठवत अवकाशाचा अभ्यास केला आहे. मात्र त्यासाठी वेगवेगळ्या, विविध क्षमतेच्या दुर्बिणी पाठवल्या गेल्या होत्या. आपण हे सर्व एकाच दुर्बिंणमध्ये आजमावत आहोत अशी विविध तरंगलांबी पकड़णारी उपकरणे Astrosat मध्ये आहेत.

Astrosat मध्ये मात्र विविध तरंगलांबी टीपण्याची क्षमता असल्याने ज्या गोष्टी साध्या डोळ्यांनी दिसत नाहित, असे विविध प्रकारचे असंख्य तारे, आकाशगंगा, धूमकेतु, ढग, धुळ, कृष्णविवरे, ग्रह यांची माहिती आपण या दुर्बिणीद्वारे मिळवणार आहोत. आणि हे सर्व एकाच दुर्बिणीद्वारे करणार आहोत. कारण विविध तरंगलांबी पकड़ण्याची या दुर्बिणीची क्षमता असणार आहे.

हे अवकाश - विश्वच एवढे अनंत - अफाट आहे की कोण जाणे आपल्या इस्त्रोच्या दुर्बिणीतून काही नवीन शोध लागतील....

इस्त्रोच्या या नवीन उपक्रमाला शुभेच्छा.

Saturday, April 25, 2015

हबल दुर्बिणीची पंचवीशी..



एखादी वस्तु विकत घेतल्यावर किंवा तयार केल्यावर किती वर्षे वापरावी याला काही मर्यादा असतात. दुरुस्त करून ती वस्तु जास्त टिकवण्याचा प्रयत्न करतो पण त्या टिकण्यालाही काही मर्यादा असतात. काळाच्या ओघात वस्तुच्या कार्यक्षमतेवरही मर्यादा येते, परिणाम होतो. 

मात्र या सर्व मर्यादा हबल दुर्बिणीने पार केल्या आहेत. पृथ्वीभोवती सुमारे 550 किमी उंचीवरुन सुमारे 7 किमी प्रति सेकंद अशा प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फक्त 97 मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतांना, अनंत - अमर्याद अशा अवकाशाची छायाचित्रांद्वारे माहिती देत हे विश्व या हबल दुर्बीणीने नव्याने उलगड़वुन दाखवले आहे. 

11 टन वजनाच्या या महाकाय हबल दुर्बिणीला २४ एप्रिलला 25 वर्षे पूर्ण झाली.

अवकाशात दुर्बीण

गैलीलियोने गुरु - शनि ग्रहावर दुर्बिण रोखली आणि खगोलशास्त्राने एक क्रांतिकारक वळण घेतले. त्यानंतर विविध प्रकारच्या, विविध तरंगलांबी पकड़त निरीक्षण करणा-या दुर्बिणी तयार झाल्या आणि अवकाश समजण्यास सुरुवात झाली.  मात्र पृथ्वीवरुन दुर्बिणचा वापर करणे फक्त रात्री शक्य होते. तरीही त्यामध्ये मर्यादा होत्या कारण पृथ्वीच्या वातावरणामुळे निरीक्षण करण्यात अडचणी होत्या. तेव्हा 1923 च्या सुमारास पृथ्वीबाहेर जात अवकाश निरीक्षण करण्यासाठी दुर्बिण असावी अशी संकल्पना पुढे आली. अर्थात त्या काळात ही संकल्पनाच राहिली. 1957 ला कृत्रिम उपग्रहांचे युग सुरु झाल्यावर पुन्हा या कल्पनेने जोर धरला.

शीत युद्ध ऐन भरात होते. त्यामुळे अमेरिका - सोव्हीएत रशिया यांनी हेरगिरि करणारे - एकमेकांच्या प्रदेशांचे - त्यामध्ये सुरु असलेल्या प्रकल्पांचे फ़ोटो काढ़ण्यासाठी उपग्रह सोडण्याचा सपाटा सुरु केला.

1969 चंद्रावर मानव उतरल्यावर इतर अवकाश उद्योगांसाठी अमेरिकेला वेळ मिळाला. इतर देशांवर रोखलेले उपग्रहांचे कैमरे मग अवकाशाकडे वळवण्यात आले. आणि 1970 ला ख -या अर्थाने अवकाशातील नेहमीचे ग्रह वगळता अवकाशाचा छायाचित्रांच्या माध्यमातून अभ्यास सुरु झाला. 1970 ला नासाने अवकाशाचा " क्ष " किरण नकाशा तयार करण्यासाठी ( म्हणजे क्ष किरण कोठुन येतात  हे अभ्यासासाठी ) Uhuru नावाची अवकाश दुर्बिण सोडली.

यानंतर मग Gama, X Ray , Ultraviolet, Visible ( डोळ्यांना दिसू शकणारे ) , Infrared, Microwave, Radio wave अशा अवकाशातील विविध तरंगलांबी छायाचित्राद्वारे कैद करु शकणारे उपग्रह कम दुर्बिणी पाठवायला सुरुवात झाली. अमेरिकेपाठोपाठ रशिया आणि युरोपियन स्पेस एजन्सीने विविध दुर्बिणी पाठवल्या. यामुळे हे अवकाश - विश्व नक्की कशाने बनले आहे याचे चित्र स्पष्ट व्हायला लागले.

 हबल दुर्बीण

अमेरिकेने -नासाने1980च्या अखेरपर्यन्त विविध दुर्बिणी अवकाशात पाठवत अभ्यास करायला सुरुवात केली होती. या अनुभवावरून आणखी शक्तिशाली दुर्बिण पाठवायचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये विविध तरंगलांबी पकड़त छायाचित्र काढ़णा-या दुर्बिणी एकत्र करत मोठी दुर्बिण उभारायचे नक्की झाले. तेव्हा तब्बल 11 टन वजनाच्या, 13 बाय 4 मीटर आकाराच्या दुर्बिणीचा आराखडा नक्की झाला. 

विश्व प्रसरण पावत आहे असा शोध लावणा-या , अमेरिकेत खगोलशास्त्र विषयात अमूल्य योगदान देणा-या एडविन हबल या शास्रद्याचे नाव त्या दुर्बिणीला देण्यात आले. या हबल दुर्बिणीवर वर infrared camera/spectrometer, photometric optical camera, wide field optical camera, ultraviolet spectrograph, optical spectrometer/camera असे पाच विविध तरंगलांबी पकडू शकणारे, विश्वाची छायाचित्रे काढू शकणारे अत्यंत शक्तीशाली कैमरे लावण्यात आले. यापैकी साध्या डोळ्यांनी बघता येईल अशी विश्वातील छायचित्रे wide field optical camera टिपणार होता.  Space Telescope Science Institute या संस्थेने हबलचा आराखडा तयार केला होता, तीच संस्था हबल ऑपरेट करणार असे निश्चित झाले.

हबल दुर्बिंण - टेलिस्कोप 1984 मध्ये अवकाशात पाठवायचे नक्की झाले. मात्र ज्या स्पेस शटलमधून ही दुर्बिण अवकाशात न्यायची होती त्या स्पेस शटल प्रकारातील चैलेंजर स्पेस शटलला झालेल्या अपघातामुळे ही दुर्बिण तब्बल सहा वर्षे उशिरा म्हणजे 24 एप्रिल 1990 ला पृथ्वीभोवती सोडण्यात आली. तोपर्यंत या दुर्बिणीचे आरेखन, बांधणी, प्रक्षेपण वगैरे मिळून हा खर्च त्या काळी 2 अब्ज डॉलर्सच्या घरांत पोहचला होता.

विक्रमी दुरुस्त्या

हबल अवकाशात गेल्यावर, कार्यरत झाल्यावर लक्षात आले या दुर्बिणीतील मुख्य आरसा ( भिंग ) बनवण्यामध्ये आणि बसवण्यामध्ये  काही चुक झाली होती. त्यामुळे हबलपासून मिळणारे छायाचित्र हे काहीसे धुसर होते. या परिस्थीतीमुळे संपुर्ण प्रकल्पच धोक्यात आला होता. त्यामुळे स्पेस शटलद्वारे ही हवल दुरुस्त करण्याचे ठरले. अखेर डिसेंबर१९९३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. आणि जानेवारी १९९४ मध्ये हबल पुर्णपणे कार्यान्वित झाल्याचे जाहिर करण्यात आले. 

अशा एकुण आणखी चार दुरुस्त्या १९९७, १९९९, २००२ आणि २००९ मध्ये करण्यात येत यामध्ये आणखी आधुनिक आरसे ( भिंग ) बसवण्यात आले, जुनी काढण्यात आली , नवीन उपकरणे लावत हबलची कार्यक्षमता वाढण्यात आली. नासाने अवकाशातील विविध प्रकल्प लक्षात घेता चांद्र मोहिमेनंतर हबल प्रकल्पासारख्या तुलनेत छोट्या प्रकल्पावर सर्वाधिक खर्च केला आहे. 

हबलचा पराक्रम 

गुरु ग्रहावर १९९४ ला शुमेकर लेव्ही नावाचा धुमकेतू आदळला.  
त्याची अप्रितम छायाचित्रे मिळवून दिली.    

हबलने अमर्याद अशा विश्वातील अगणीत अशी लक्षवेधी रंगीत छायाचित्रे उपलब्ध करुन दिली. यामुळे अज्ञान विश्व नव्याने सजण्यास मदत झाली आहे. 

कित्येक प्रकाश वर्षे म्हणजेच कित्येक अब्जावधी किलोमीटर दूर असलेल्या आकाशगंगा, महाकाय तारे, कृष्ण विवरे, श्वेत बटू तारे, आकाशगंगा यांच्यातील महाकाय टकरी, ता-यांचा जन्म, ता-यांचा शेवट, अवकाशाच्या पोकळीतील रहस्यमय धूळ, प्रचंड असे ढग यांच्याबद्दलची तेवढीच महाकाय माहिती ही विविध छायाचित्रांद्वारे उपलब्ध झाली आहे. 

आपल्या ग्रहमालेतील विविध ग्रहांची असंख्य सुस्पष्ट छायाचित्रे मिळाली.  

यामुळे अवकाशाचे खरे स्वरूप समजण्यास मदत झाली आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करणा-यांसाठी एक मोठे दालनंच खुले झाले. 

हबलच्या छायाचित्रांवरून अवकाश प्रसरण पावत आहे यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. 

हबलने पाठवलेल्या माहितीवर आत्तापर्यंत तब्बल, विक्रमी ९,००० पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. म्हणजेच विश्वाबाबतची ९,००० पेक्षा जास्त शोध किंवा नव्याने माहिती प्रसिद्ध झाली आहे. 


अशी हबल दुर्बिण आता यापुढे दुरुस्त कऱणार नसल्याचे, यावर आणखी नवीन उपकरणे बसवणार नसल्याचे नासाने जाहिर केले आहे. ही दुर्बिण यापुढे आणखी काही वर्षे कार्यरत राहील. पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण शक्ती बघता २०३० नंतर दुर्बिण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल आणि नष्ट होईल. तोपर्यंत हबलचा वापर सुरु रहाणार आहे. २०१८ ला James Webb Space Telescope  ही आणखी शक्तीशाली दुर्बिण जागा घेणार आहे जी हबलपेक्षा आणखी दूरवर अवकाशात बघू शकणार आहे. 

असं असलं तरी खगोलशास्त्राचे विश्व व्यापक करण्यात, गुढ विश्व समजून घेण्यास हबलने मुलभूत अशी पायाभारणी केली आहे. पुढे मानव किती प्रगती आणि किती वेगाने करेल याचा अंदाज बांधणं कठिण आहे. कदाचित काही हजार वर्षांनी मानव सुर्यमालेबाहेर जाईल, दुस-या ता-यांच्या जवळ जाईल किंवा आपली देवयानी आकाशगंगाही पार करेल. तेव्हा हबलचे कार्य निश्चितच लक्षात राहील एवढी कामगिरी हबलने इतिहासात नोंदवली आहे. 

Thursday, April 9, 2015

निमित्त Scorpene पाणबुडीचे.....



तब्बल चार वर्षाच्या विलंबाने 6 एप्रिलला फ्रान्सचे तंत्रज्ञान असलेली scorpene वर्गातील पहिली पाणबुडी माझगावच्या गोदीतून बाहेर पडली. यासाठी संरक्षणमंत्री , नौदलप्रमुख, नौदल अधिकारी, माझगावचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या पाणबुडीचे जलावतरण सप्टेंबर महिन्यात होत चाचण्या सुरु होणार असून पुढील वर्षी ही पाणबुडी नौदलात दाखल होणार आहे. 

खरं तर गोदीतून एखादी युद्धनौका किंवा पाणबुडी बाहेर काढणे याचा कधीच सोहळा केला जात नाही. त्या क्षणाचे महत्व एवढेच असते की युद्धनौका किंवा पाणबुडी बांधण्याची जागा ही पुढच्या बांधकामासाठी उपलब्ध होते. मात्र मुद्दाम या कार्यक्रमाचा एक मोठा सोहळा करत एक संदेश देण्याचा प्रयत्न संरक्षण दलाने केला.

1..गेले अनेक दिवस पाणबुडीबद्दल विविध अपघातांच्या मालिकेमुळे एक नकारात्मक वातावरण तयार झाले होते ते निवळण्याचा प्रयत्न संरक्षण दलाने - नौदलाने केला.

2..Standard Operation Procedure म्हणजेच SOPकड़े झालेले दुर्लक्ष हेच नौदलातील अपघातांचे मुख्य कारण होते हे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. आता हे SOP अतिशय कटाक्षाने पाळण्यावर भर असेल हे ठासुन सांगितले.

3..सरकारी मालकीच्या युद्धनौकांची बांधणी करणा-या गोदींना पुढील 3 वर्षात उत्पादन दुप्पट करण्यास सांगितले. म्हणजेच आता भारतात युद्धनौका बांधणीचा कार्यक्रम वेगाने जाईल असा संदेश जगामध्ये दिला. 

4..हा वेग गाठण्यासाठी प्रशिक्षित कर्मचा-यांचा मोठा ताफा गोदीला लागणार आहे. या पाणबुडीच्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विद्यापीठात तसा सुसंगत कोर्स सुरु करण्याच्या सुचना केल्या.

5..या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय नौदलाची ताकद , क्षमता 2022 पर्यन्त पूर्ण वाढली असेल असेही जाहिर केले. Blue Water Navy म्हणजेच समुद्रात जास्तीत जास्त वेळ रहाण्याची, कुठेही मोहीम पार पाडण्याची क्षमता 2022 ला प्राप्त झाली असेल.

6..सर्वात महत्वाचे म्हणजे 1994 ला याच गोदीतून HWD वर्गातील शेवटची पाणबुडी तयार झाली. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी पहिली पाणबुडी ती सुद्धा याच गोदीत तयार झाली आहे. त्यामुळे माझगाव गोदीत काम करणा-या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासाठी ही एक अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे. म्हणूनच या सोहळ्याला गोदीत तर एका उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

भारतीय उपखंडाच्या तिन्ही बाजूला समुद्र आहे. बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, अरबी समुद्र. जगातील फार मोठी तेलाची आणि इतर मालवाहतुक याच भागातून होते. आणि याच तीन महासागरच्या किना-यावर चीनने आपले बस्तान बसावायला सुरुवात केली आहे.

या अतिप्रचंड महासागरात वर्चस्व रहावे म्हणून
भारताने विमानवाहु युद्धनौका बांधायला सुरुवात केली आहे, विविध युद्धनौकांची बांधणी वेगाने सुरु आहे, अणु पाणबुडीचे बांधकाम जोरात सुरु आहे. मात्र पारंपारिक ऊर्जेवर चालणा-या Scorpene सारख्या पाणबुड्या किमान 18 ते 22 या संख्येने आवश्यक आहेत. सध्या भारताकडे डिझेलवर चालणा-या पाणबुड्या 13 असून त्यापैकी जेमतेम 6 ते 8 प्रत्यक्ष कार्यरत आहेत. त्यामुळेच पहिली Scorpene पाणबुडी तयार होणे ही नौदलाला दिलासा देणारी गोष्ट आहे. त्यातच आणखी सहा पाणबुड्या बांधण्याची order लवकरच दिली जाणार आहे.

तेव्हा पाण्याखालील अमोघ अस्त्र - शस्त्र असलेल्या या पाणबुडीच्या बळकटीकरणाकडे उशीरा का होईना
आपण पाऊल पुढे टाकायला सुरुवात केली आहे हे नक्की. 

Friday, April 3, 2015

कडोंमपा, आहे तिथेच...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपत आले आहे. त्यानंतर सर्व राजकीय पक्ष आपला मोर्चा नवी मुंबई, औरंगाबाद, अंबरनाथ , बदलापुर वगैरे अशा ठिकाणी प्रचारासाठी वळवतील. 23 एप्रिलला निकाल लागतील. मग त्यांनतर चार महिन्यांत राज्यात त्यातल्या त्यात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची म्हणजेच कडोंमपाची निवडणूक असल्याने या महानगरपालिकेच्या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले असेल.

त्यामुळे एप्रिलनंतर कडोंमपातील विविध भागांची पायधुळ विविध पक्षांचे नेते, राज्याचे मंत्री झाड़तांना दिसायला लागतील. याची झलक मात्र दिसायला सुरुवात झालेली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कारणांनी का होईना तीन वेळा कडोंमपात येऊन गेले आहेत. राज्यात 27 महापालिकांपैकी काही प्रमुख पालिका वगळता मुख्यमंत्र्यांच्या कडोंमपाच्या फे-या सर्वात जास्त झाल्या आहेत. तसंच गेल्या काही दिवसांपासून कडोंमपाचे प्रश्नही जोराने पुढे येऊ लागले आहेत.

पण मुळात असे प्रश्न उद्भवण्याची वेळ का येते ?. त्यात उद्भवलेले प्रश्न पुन्हा तेच ते आहेत. कारण गेल्या 5 वर्षात कडोंमपा केवढी बदलली आहे असा प्रश्न विचारला तर आहे ती आहे तिथेच आहे, समस्या काही सुटल्या नाहीत असं म्हंटल तर ते चुकीचे होणार नाही.

त्यामुळे सत्ताधारी नगरसेवक आणि सत्ताधारींना धाकात ठेवण्याची क्षमता असणारे विरोधक नगरसेवक ( अशी किमान अपेक्षा विरोधकांकडून असते ) यांनी काय केले असा प्रश्न पडतो.

काही सन्माननीय नगरसेवक - लोकप्रतिनिधींनी त्यांच्या वॉर्डमध्ये खुप चांगली कामगिरी केली आहे. पण जेव्हा संपुर्ण कड़ोंमपाकड़े बघतांना काही प्रश्न जरूर पडतात ज्याची उत्तरे राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी द्यावीत.

1..श्रीनगर ते कन्याकुमारी असा मोठा चारपदरी रस्ता बांधायचा झाल्यास जसा वेळ लागेल तसा कडोंमपातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाला का वेळ लागला आणि लागत आहे ? एवढा वेळ लागूनही काँक्रीटीकरणाबद्दलच्या दर्जाबद्दल का तक्रारी आहेत ? इतर काही ठिकाणी रस्त्यांची अवस्थाही वाईटच आहे.

2..आजही सर्वसामन्यांना आरोग्य सेवेसाठी खाजगी सेवेवर किंवा मुंबई - ठाणेवर अवलंबून रहावे लागते. कड़ोंमपाची आरोग्य सेवा का सक्षम झाली नाही ?

3..आजही कडोंमपामध्ये रस्त्यावरील गर्दी टाळता यावी यासाठी चालण्याजोगे फुटपाथ का नाहीत ?

4.. कडोंमपातील वाहतुक कोंडीवर उपाय शोधण्यात लोकप्रतिनिधींना का अपयश आले ?

5..ठाकुर्लिजवळ पूर्व - पश्चिम भागाला जोड़णा-या उड्डाणपुलाचे काय झाले ?

6..रिक्शा चालकांच्या दादागिरीशी नगरसेवकांचे ( आणि प्रशासनाचेही ) काहीच देणंघेणं नाही का ? रिक्षाचालकांकडून होणारा त्रास कधी कमी होणार ?

7..भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जादाचे 140 mld पाणी कधी कडोंमपाला मिळणार ?

8..घरी पाहुणे आल्यावर किंवा संध्याकाळी फॅमिलीला फिरवण्यासाठी - निवांत वेळ घालवण्यासाठी कडोंमपात मनोरंजनाचे ठिकाण मग ते मोठी बाग - उद्यान, vidyaan केंद्र, एखादे माहिती केंद्र, ( एखाद्या शहराच्या तोडीस तोड़ असा ) सुशोभित घाट, ( राजकीय पक्षांना निवडणुकीत घोषणा करण्यासाठी आवडणारे) एखादे मोठे स्मारक का विकसित झाले नाही ?

9..कड़ोंमपाला लागून सर्वात प्रदूर्षण करणारी डोंबिवली MIDC यामधल्या प्रदूर्षणावर का अजूनही नियंत्रण ठेवता आलेले नाही ?

10..डंपिंग ग्राउंडचा प्रश्न आजही का सुटलेला नाही ?

11.. अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकणा-या वेशीवरच्या गावांत सोयीसुविधा पाच वर्षांनंतरही का झाल्या नाहीत ?

12.. आधीच कड़ोंमपात सोयीसुविधांचा अभाव असतांना 27 गावांना सामावून घेत त्यांचे असे कोणते भले पालिका करणार आहे ?

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राजकीय पक्षांनी द्यावीत. दर तीन महिन्यांनी येतो असे म्हणणारे राजकीय नेते खरेच किती वेळा आले हा संशोधनाचा विषय आहे.

राज्यातील सर्व अवैध बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेणा-या फडणवीस साहेबांनी आपण इतर पक्षांपेक्षा कमी नसल्याचे स्पष्टपणे दाखवत या पालिकेतील अवैध बांधकामांचा प्रश्न एका फटक्यात निकाली काढला आहे.

डोंबिवलीत नववर्षानिमित्त नववर्षाचे स्वागत करणारी शोभायात्रा पहिल्या वर्षापासून प्रसिद्ध आहे. असं असलं तरी गेल्या 5 वर्षात कड़ोंमपाची किती शोभा वाढवली असा प्रश्न सर्वसामान्यांनी आत्तापासूनच लोकप्रतिनिधींना आणि त्यांच्या राजकीय पक्षांना जरूर विचारला पाहिजे. कारण तेच पक्ष, तेच चेहरे घेत, पुन्हा तेच प्रश्न मांडत, त्याच प्रश्ननांवर, तीच आश्वासन देत मतांसाठी पुन्हा एकदा तुमच्या पुढे उभे रहाणार आहेत.

#KDMC

#kalyan

#dombivali

Thursday, April 2, 2015

मेट्रो - 3चा जांगडगुंता....


मेट्रो 3 वरुन सध्या जोरदार वाद त्यापेक्षा राजकारण सुरु झाले आहे. एका राजकीय पक्षाने आघाडी उघडली म्हणून आपण मागे राहु नये यासाठी दुस-याने यामध्ये उडी घेतली असल्याचं चित्र आहे.  गिरगाव - काळबादेवी इथल्या लोकांचे होणारे विस्थापन आणि आरे कॉलनी यावरून सध्या वादप्रतिवाद होत आहेत. नशीब अजुन आणखी नव्या वादाची भर पडली नाही. एखाद्या मुद्द्यावर वाद होणे, विरोध करणे एकवेळ मान्य, मात्र मेट्रो 3 नकोच अशी भूमिका घेणे किंवा असा विचार करणे म्हणजे कपाळकरंटेपणाचे लक्षण आहे.

मेट्रो 3 मुळे वर्षानुवर्षे एका जागी राहिलेल्यांचे विस्थापन होत असेल तर त्याच जागी त्यांचे पुनर्वसन व्हायलाच हवे याबाबत दुमत नाही. म्हणून आंदोलन करुन हव्या त्या मागण्या, पाहिजे ते आपल्या पदरात पा़डून घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे,. 

मेट्रोच्या कारशेडमुळे आरे कॉलनी धोक्यात आली म्हणून सर्व राजकीय पक्ष बोंब ठोकत आहेत. मात्र हेच सर्व राजकीय पक्ष जीवघेण्या लोकल  प्रवासाच्या विरोधात, मुंबईतील वाढत्या प्रदुर्षणाविरोधात, अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांच्या विरोधात कधी एकत्रिरित्या आवाज उठवतांना कधी दिसले नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भोवती बांधकामे वाढत असतांना, अतिक्रमण होत असतांना हे राजकीय पक्ष गप्प होते. मात्र आरे कॉलनी मध्ये झाडे तोडली जाणार म्हणून सर्वजण दंड थोपटून उभे आहेत. किमान आरे कॉलनीच्याबाबतीत तरी हा प्रकार हास्यास्पद आहे. 
  
म्हणूनच मेट्रो ३ ला विरोध न करता भविष्यातील मुंबईची वाहतुकीची वाढती गरज लक्षात घेता त्याचे स्वागतच करायला पाहिजे. त्यामुळेच कधी नव्हे ते MMRC किंवा MMRDA चे अधिकारी मोठ्या प्रमाणात लोकांशी थेट संवाद साधतांनाचे चित्र बघायला मिळत आहे.   

मेट्रो ३ का महत्त्वाची...

1..मुंबईतील लोकल ट्रेन, बेस्ट बस, रिक्षा -टॅक्सी यांसारख्या सार्वजनीक वाहतूक व्य़वस्था क्षमतेपलिकडे प्रवाशांचा भार झेलत आहेत. यामध्ये  आणखी वाढ करणे अशक्य झाले आहे. म्हणूनच मेट्रोसारख्या आणखी एका सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा पर्याय निवडणे त्यापेक्षा तो उभा करणे अत्यंत आवश्यक आहे. 

२.. मेट्रो ३ चा मार्ग भुयारी असल्याने काही निवासी आणि व्यावसायिक ठिकाणे सोडली तर बांधकाम करतांना रस्ते आणि लोकल वाहतूकीला कुठलाही अडथळा येणार नाही.

३.. कफ परेड, नरीमन पॉईंट, फोर्ट, काळबादेवी-गिरगांव, वरळी, प्रभादेवी, वांद्रे-कुर्ला कॉम्पेल्क्स, विद्यानगरी, दोन्ही विमानतळ, सीप्झ असे  भाग जे रेल्वेशी-लोकल ट्रेनशी जोडले गेलेले नाहीत ते भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.   

४.. मेट्रो ३ चा मार्ग मध्य रेल्वच्या सीएसटीला, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट, ग्रॅन्टरोड, मुंबई सेंट्रल, पहिल्या मेट्रोच्या मरोळ नाका,  प्रस्तावित मेट्रो २ च्या बीकेसीला आणि मोनोरेलच्या जेकब सर्कलला जोडणारा आहे. त्यामुळे  मुंबईच्या एका भागातून दुस-या भागातील प्रवास हा जलद होणार आहे. 

आधीच मोठ्या विलंबानंतर पहिल्या मेट्रो आणि मोनोचा मार्ग हे सुरु झाले, खरं तर मुंबईची गरज लक्षात घेता मेट्रोचे जाळे २००० पर्यंत प्रत्यक्ष वापरात येणे आवश्यक होते. मात्र जी चूक आधीच्या राजकीय पक्षांनी - नेत्यांनी, प्रशासन, शहररचनाकार यांनी केली ती आता करू नये किंवा आता तिच चुक होऊ नये असे वाटते. त्यामुळे मेट्रो -३ ला विरोध होत असला सर्वसामान्यांना विश्वासात घेऊन या प्रकल्पाचे काम सुरु करणे हे मुंबईकरांच्याच आणि मुंबईत पोटापाण्यासाठी येणा-या सर्वसामान्यांच्या हिताचे आहे. या मेट्रोचे काम सुरळित सुरु झाले तर पुढील मेट्रोचे आऱाखडे प्रत्यक्षात येतील, त्यांचा मार्ग मोकळा होईल.

#shivsena  
#mns  
#bjp  
#metro3 
#mmrda 
#mmrc
#mumbai


Friday, February 13, 2015

सर्वात मोठा हवाई शस्त्रास्त्रांचा बाजार...Aero India..




१८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान भारतात बेंगलोर इथे जगातील सर्वात मोठा असा संरक्षण क्षेत्रातील हवाई विभागाचा शस्त्रास्त्रांचा बाजार भरणार आहे. खरं तर हवाई दलांच्या कसरती म्हणजेच Air Show  असे त्याचे गोंडस नाव आहे. दर दोन वर्षांनी भऱणा-या या शस्त्रास्त्राच्या कुंभ मेळ्याचे  हे दहावे वर्ष. असे Air Show जगभरात गेली अनेक वर्षे भरत आहेत. कारण या निमित्ताने विविध देशातील संरक्षण क्षेत्रातील बलाढ्य कंपन्या आपापली उत्पादने या बाजारात ओतत असतांत आणि मोठ-मोठे करार होत असतात. गंमत म्हणजे भारताने हा Air Show सुरू केल्यापासून जगभरातील कंपन्या अक्षरशः धावत या Air Show मध्ये ताकदीने सहभागी होत आहेत. कारण संरक्षण क्षेत्रात खास करुन हवाई दला क्षेत्राच्या बाबतीत भारत मोठी बाजारपेठ ठरला आहे.

भारताचा संरक्षण क्षेत्राचा अर्थसंकत्प हा 37 अब्ज डॉलर्स म्हणजेच 2 लाख 29 हजार कोटी रुपये एवढा आहे. यापैकी 40 टक्के रक्कम ही शस्त्रास्त्रे खरेदीवर खर्च होते. यापेैकी एक चतुर्थांश वाटा हा वायू दलाला मिळतो. विशेष म्हणजे  60 टक्के शस्त्रास्त्रे  भारत आयात करतो.  त्यातच बदलती आतंरराष्ट्रीय समीकऱणे, शेजारील राष्ट्रांमध्ये असलेली अस्वस्थता लक्षात घेता गेली काही वर्ष भारत आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र संथ निर्णय़ घेण्याची प्रक्रिया, लाल फितीचा कारभार, नोकरशाही, भलत्याच गोष्टांना महत्व देणारी सरकारे यामुळे संरक्षण क्षेत्र कमालीचे पिछाडीवर पडले आहे. त्यातच भारतीय वायू दलाची पिछेहाट डोळ्यात भरणारी आहे.

वायू दलाकडे सध्या लढाऊ विमानांची कमतरता आहे. विविध प्रकारच्या क्षमतेच्या मालवाहू विमानांची आवश्यकता आहे. विविध प्रकारची हेलिकॉप्टर म्हणजे टेहेळणी करणारी हेलिकॉप्टर, जड वजन वाहून नेणारी विविध प्रकारची हेलिकॉप्टर, विविध वैमानिकरहित विमाने, जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे , विविध क्षमतेची रडार यांची कमतरता आहे.

तेव्हा भारताची गरज लक्षात घेता खऱं तर भारत म्हणून एवढा मोठा ग्राहक लक्षात घेता जगभरातील कंपन्यांचे प्रतिनिधी फक्त Air Show निमित्त नाही तर गेले काही दिवस भारतात ठाण मांडून बसल्या आहेत. हवाई दलाच्या वैमानिकांसाठी हेल्मेट, रात्री दिसू शकणारे कॅमेरे इथपासून लढाऊ विमानांपर्यंत या बँगलोरमधील बाजारात मांडले जाणार आहे. भारतातील कंपन्यांसह जगभरतील तब्बल 750 कंपन्या या पाच दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या निमित्ताने विविध शस्त्रास्त्रांच्या प्रतिकृती ठेवल्या जाणार आहेत. काही शस्त्रास्त्रे मग रडारपासून ते लढाऊ विमानांपर्यंत इथे प्रत्यक्ष बघायला मिळणार आहेत.  काही कंपन्यांची लढाऊ, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर हवाई कसरतींमध्ये भाग बेंगलोरच्या हवाई दलाच्या तळाचे आकाश दणाणून सोडणार आहेत. तर मोजक्या देशांकडे असलेली, हवेत करामती - कसरती करू शकणारी विमाने उपस्थितांना खिळवून ठेवणार आहेत.

या Air Show चा फक्त भारताला फायदा होणार असं नाही तर श्रीलंका, नेपाळ, सारख्या असंख्य छोट्या देशांना होणार आहे. कारण खेरदीसाठीच्या सर्व काही वस्तू - शस्त्रास्त्रे जगात बाजाररहाट न करता एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होणार आहे.

सुरुवातीपासून या Air Show मध्ये वस्तू बघायची आणि ती वाटाघाटी करत विकत घ्यायची अशी प्रथाच पडली होती. मात्र संरक्षण क्षेत्रात नव्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा लावला आहे. त्यामुळे यंदाचा अब्जावधी उलाढालींचा हा सोहळा काहीसा वेगळा ठरण्यासाठी शक्यता आहे. प्रत्यक्षिके होतील, चर्चा होतील, त्यानंतर बैठका होतील, वाटाघाटी होतील मात्र विकत घेणारी शस्त्रास्त्रे ही यापुढे भारतातच बनवली जातील असा निर्धार भारताने केला आहे.  त्यामुळे यावेळचा Aero India अनेक पद्धतीने वेगळा असणार आहे.

परदेशी कंपन्यांची मदत घेत सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे भारतातच बनवण्याचा प्रयत्न यापुढे यशस्वी झाला तर कदाचित पुढील काही वर्षानंतर अशा कार्यक्रमाची गरजच भासणार नाही. त्यासाठी भारतात सरकारी कंपन्यांबरोबर खाजगी कंपन्याही विविध शस्त्रास्त्रांचे उत्पादन कऱण्यासाठी तयार होणं गरजेचं आहे. तेव्हा पुढील काही वर्षांनी भारतीय कंपन्या परदेशातील अशा AIR SHOW मध्ये सहभागी व्हायला लागल्या तर आश्चर्य वाटायला नको, ते सर्व स्वप्नवतच असेल. भारत हवाई दलाच्या गरजेच्या बाबातीत स्वयंपूर्ण झाला असेल.



#MakeInIndia
#IAF
#AeroIndia
#FighterAirCraft
#UAV
#Helicopter


Sunday, January 18, 2015

तेजस..वायूदलाचे एक पाऊल पुढे




17 तारखेला स्वदेशी बनावटीचे आणि जगातील सर्वात लहान लढाऊ विमान अशी ओळख असलेले " तेजस " वायुदलाकडे अखेर सुपूर्त करण्यात आले. बंगलोर इथे झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राह यांच्याकडे तेजसची प्रतिकृती दिली. काही दिवसांत अधिकृतरित्या तेजसचा वायुदलात समावेश करण्यात येईल, ज्याला operational clearances असे म्हणतात. पुढील साधारण एक - दीड वर्षात तेजसचा पहिला ताफा - squadron - 18 ते 20 विमाने वायुदलात दाखल होतील. त्यानंतर वर्षाला साधारण 16 तेजस विमाने वायुदलाला मिळत जातील. 

1983 पासून HAL आणि ADA पासून संयुक्तरित्या या लढाऊ विमानावर काम करायला सुरुवात केली. भविष्यात मिग-२१ ची जागा घेण्यासाठी स्वदेशी लढाऊ विमान बनवावे अशी संकल्पना होती. मात्र कागदावर आराखडा नक्की व्हायला, त्याला अंतिम स्वरुप द्यायला, त्यानंतर प्रत्यक्ष विमानाची निर्मिती होत विमानाने अवकाशात झेप घ्यायला २००१ वर्ष उजाडले. आणि आता १३ वर्षानंतर तेजस वायूदलाकडे सुपुर्त करण्यात आले आहे. या विलंबामुळे मिग -२१ दुरुस्त करत त्याचे आयुष्य वाढवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. जेव्हा तेजस पूर्ण संख्येने दाखल होईपर्यंत जोपर्यंत मिग - २१ वापरावेच लागणार आहे.  



4 जानेवारी २००१ ला स्वदेशी बनावटीच्या या विमानाने पहिल्यांदा अवकाशात झेप घेतली. 4 मे २००३ ला तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी या जगातील सर्वात छोटेखानी लढाऊ विमानाचे " तेजस " असे नामकरण केले.  

१९६० च्या दशकांत मरूत नावाचे पहिले लढाऊ विमान विकसित केले होते. अर्थात यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. मात्र लढाऊ विमानासाठी आवश्यक असणा-या गोष्टी म्हणजे वेग, लढाऊ विमानासाठी आवश्यक असणारा मोठा पल्ला यांचा मरुतमध्ये अभाव होता. यामुळे हे विमान वायूदलाच्या अग्रस्थानी कधीच नव्हते.  

१९८३ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पावर आत्तापर्यंत सुमारे 8,000 कोटी रूपये खर्च झाले असून विविध प्रकारचे 15 तेजस - लढाऊ विमाने बनण्यात आली आहेत. यामध्ये 5 आदिरूप -Prototypes, 2 प्रशिक्षण देणारी विमाने, नौदलासाठी एक आणि 7 वायुदलासाठी तयार करण्यात आली आहेत.

म्हणायला स्वदेशी लढाऊ विमान असले तरी अजूनही यातील 40 टक्के यंत्रणा किंवा तंत्रज्ञान हे विदेशी आहे. कुठलेही विमान मग ते लढाऊ का असेना त्याची मुख्य ताकद हे इंजिन आणि रडार असते. तेजसमधील इंजिन हे अमेरिकेचे असून रडार हे इस्त्राईलचे तंत्रज्ञान असलेले आहे. सध्या सुरु असलेल्या संशोधनानुसार  हे लढाऊ विमान स्वदेशी होण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. या विमानाची आणखी एक प्रगत आवृत्ती आपण तयार करत आहोत त्याच्यामध्येही अमेरिकेने दिलेले इंजिन वापरले जाणार आहे. 

लढाऊ विमाने ही साधारण तीन प्रकारची असतात. हलक्या, मध्यम आणि 
वजनदार किंवा लांब पल्ल्याची. तेजस हे हलक्या प्रकारातील असून संपुर्णपणे सज्ज झाल्यास तेजसचे वजन १३ टनपर्यंत भरते. ध्वनीच्या वेगाच्या १.६ पट वेगाने तेजसचा वेग असून एका दमात २५०० किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकते. लढाऊ विमानांच्या भाषेत तेजसचा लढण्याचा पल्ला हा साधारण ३०० किमीपेक्षा काही जास्त आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानच्या सीमेजवळ तेजसला स्थान असेल. असं असलं तरी सध्या जगात तेजस एक उत्कृष्ठ प्रतिचे लढाऊ विमान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. 

अर्थात तेजसच्या समावेशाने वायुदलाची ताकद वाढणार आहे यात शंका नाही. असं असंल तरी भारतीय वायुदलात लढाऊ विमानाच्या squadron किंवा ताफ्याची संख्या आज आवश्यकतेपेक्षा कमी आहे. तेव्हा तेजससारखी आणखी लढाऊ विमाने दाखल होणे गरजेचे आहे. 

DRDO चा हा एक अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असून वेळापत्रकानुसार सर्वात रखडलेला प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो, ज्यामुळे DRDO ला सर्वात जास्त टीका झेलावी लागली आहे. 

यापुढे तेजसची आणखी एक आवुत्ती विकसित केली जाणार आहे जी आत्ताच्या तेजसपेक्षा अधिक वेगवान आणि शक्तिशाली असेल. तेजस बनवण्याचा अनुभव अर्थातच महत्त्वाचा ठरला असून विविध प्रकारची लढाऊ विमाने बवण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. तसंच क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर, विविध शस्त्रास्त्रे यांमध्ये वापरलेले स्वदेशी तंत्रज्ञान लक्षात घेता यापुढे आपण लढाऊ विमान पुर्णपणे स्वबळावर बनवू यात शंका नाही.

थोडक्यात लढाऊ विमानांच्या बाबतीत आपले परावलंबित्व पुढील अवघ्या काही वर्षात पुर्णपणे संपुष्टात येणार आहे....

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...