Monday, November 5, 2018

भारताकडे आता ' त्रिशूळ '



स्वदेशी बनावटीची अणू पाणबुडी INS Aihant ने पहिली सामरिक गस्ती मोहीम यशस्वी केली. याच अर्थ हा की देशाची - भारताची त्रिस्तरीय  अणू हल्लासाठीची सज्जता ( Nuclear Triad ) पूर्ण  झाली आहे.

आपल्या देशाचे no first use हे धोरण आहे. म्हणजेच पहिला अणू बॉम्बचा हल्ला न करण्याचे आपण पोखरण अणू चाचणी नंतर जाहीर केले आहे. असं असतांना समजा शत्रू पक्षाने अणू बॉम्बचा हल्ला केलाच तर त्याला आपण प्रत्युत्तर अणू बॉम्बचा हल्ला करत आपण देऊ शकतो. यासाठी विविध पल्ल्याच्या अणवस्त्रवाहू अग्नी क्षेपणास्त्रामार्फत आपली सज्जता याआधीच झाली आहे.

लढाऊ विमानांच्या मार्फत आपण अणू बॉम्ब हा शत्रूपक्षाच्या भागांत घुसत टाकू शकतो. आपल्याकडे मिराज - 2000 या लढाऊ विमानातील एका ताफ्यावर अशी जवाबदारी सोपवण्यात आली आहे. अत्याधुनिक सुखोई - 30 MKI या लांब पल्ल्याच्या लढाऊ विमानाकडे अशी क्षमता आहे.

समजा शत्रू पक्षाच्या हल्ल्यात या दोन्ही गोष्टी नष्ट झाल्या तर मग प्रतिहल्ला कसे करणार ??

यासाठी आपण पाण्याखालून पाणबुडीतून अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होतो. अणू पाणबुड्या या दीर्घ काळ आपलं अस्तित्व न दाखवता पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे अणू पाणबुडीकडे एक सामरिक शस्त्र म्हणून बघितलं जातं.

स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिहंत ही दोन वर्षांपूर्वी भारतीय नौदलात दाखल झाली होती. नुकतीच या अणू पाणबुडीने सामरिक गस्त यशस्वी पूर्ण केली. म्हणजेच दीर्घ काळ पाण्याखाली राहत, गस्ती मोहीम पार पडत अण्वस्त्र हल्ला करण्याचा सराव पाणबुडीने यशस्वी पूर्ण केला. तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी twitter वरून जाहीर केले. भारताचे Nuclear Triad पूर्ण झाल्याचे अधिकृत जाहीर करण्यात आले.

सध्या अरिहंत पाणबुडी K -15 ( कलाम यांच्या नावाचे अद्याक्षर K ) हे क्षेपणास्त्र पाण्याखालून डागू शकते, ज्याची ७५० ते १००० किमी अंतरा पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. तर  K - 4 हे आणखी क्षेपणास्त्र अरिहंतवर स्वार होण्याच्या प्रतिक्षेत आहे, ज्याची मारक क्षमता तब्बल ३,५०० किमी एवढी मोठी आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अरिहंतबाबतची घोषणा ही महत्त्वाची घडामोड आहे. 

जमीन, हवा आणि पाण्यातून अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेले जगात फक्त काही देश आहेत. अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, इंग्लंड या देशांकडे अशी त्रिस्तरीय अण्वस्त्र प्रतिकाराची रचना आहे. आता या देशांमध्ये भारताने स्थान मिळवले आहे.

अर्थात या देशांकडे मोठ्या संख्यने विविध अणू पाणबुड्या आहेत. भारताकडे अरिहंत आणि 10 वर्षाच्या भाड्याने रशियाकडून घेतलेली आयएनएस चक्र आहे. भारत अरिहंत वर्गातील आणखी दोन पाणबुड्या  बांधत आहोत. अरिहंत वर्गातील पाणबुड्या या सुमारे 6000 टन वजनाच्या आहेत. आपण अधिक मोठी मारक क्षमता असलेली, मोठी क्षेपणास्त्र सामावून घेणाऱ्या पाणबुड्या बांधायला सुरुवात केली आहे. थोडक्यात भारताकडे आणखी पाणबुड्या असणे आवश्यक आहे, भारत त्या दिशेने वाटचाल करत आहे.

भारताने अण्वस्त्र सज्जतेची त्रिस्तरीय रचनेची पहिली पायरी अरिहंत पाणबुडीच्याच्या रूपाने चढली आहे.

थोडक्यात काय तर आपल्या देशावर अणू बॉम्बचा हल्ला झाला तर जमिनीवरून क्षेपणास्त्र डागत, हवेतून लढाऊ विमानाद्वारे आणि त्यानंतरही आता समुद्राखालून अणू पाणबुडी द्वारे क्षेपणास्त्रद्वारे अण्वस्त्र हल्ला करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. 

अर्थात असा हल्ला करण्याची ही वेळ येऊच नये अशी आपण प्रार्थना करुया.


Saturday, October 13, 2018

भारतीय नौदलात एक महत्त्वाची घडामोड....DSRV

DSRV चा भारतीय नौदलात समावेश

भारतीय नौदलात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. नौदलाच्या ताफ्यात deep submergece rescue vehicle ( DSRV ) दाखल झाले आहे. यामुळे पाणबुडी अपघाताच्या वेळी पाण्यात खोलवर बुडालेल्या पाणबुडीपर्यंत पोहचत आतमध्ये अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करता येणे शक्य होणार आहे.
DSRV हे मोजक्या देशांकडे आहे.आता यामध्ये भारताचा समावेश झाला आहे हे विशेष.
अर्थात DSRV बनवण्याचे काम हे इंग्लंडच्या James Fisher & Son या कंपनीला दिले होते. असे vehicle बनवण्यात या कंपनीची खासियत आहे.
दाखल झालेली पहिली DSRV ही नौदलाच्या मुंबई तळावर काम करणार आहे. कारण मुंबईत पाणबुडीचा मोठा तळ आहे. तर दुसरी DSRV ही येत्या काही महिन्यात नौदलाच्या विशाखापट्टम तळावर कार्यरत होणार आहे.
DSRV चे तंत्रज्ञान काहीसे अवघड असल्याने परदेशी कंपनीची मदत घेण्यात आली आहे.
आपल्याला आठवत असेल की INS सिंधुरक्षक पाणबुडीला ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईच्यास तळावर अपघात झाला होता. यावेळी ही पाणबुडी काही मीटर खोल असलेल्या तळावरच बुडाली होती. या अपघातात एकूण 18 नौसैनिक ठार झाले, यापैकी पाणबुडीच्या आतमध्ये 14 नौसैनिक अडकले होते. तळावरच बुडालेल्या पाणबुडीतील नौसैनिकांना आपण वाचवू शकलो नाही. पाणबुडी पाण्याबाहेर काढायला तर आणखी 3 महिने लागले होते.
अशा अपघातामुळे DSRV चे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते.
तेव्हा खोल समुद्रात जर काही कारणाने अपघात झाला तर बुडालेल्या पाणबुडीपर्यंत पोहचण्याची क्षमता DSRV मध्ये आहे. साधारण 600 मीटर ते अगदी 1500 मीटर पर्यंत समुद्रात खोल DSRV जाऊ शकते. एकावेळी 5 ते 24 जणांची सुटका करण्याची क्षमता असलेले DSRV जगांत कार्यरत आहेत. तर DSRV हे रिमोटनेही operat करता येते.
DSRV च्या नौदल ताफ्यातील समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी भर पडली आहे हे निश्चित.

Wednesday, September 19, 2018

वर्तमान एक वर्तुळ पूर्ण करत आहे......


भारताच्या अवकाश संस्थेने - इस्रोने नुकतेच इंग्लडचे दोन उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात धाडले. नुसते धाडले नाहीत तर अत्यंत अचूकरित्या नियोजित कक्षेत पोहचवले. इस्रोचे प्रमुख डॉ के सिवन यांनी ' अत्यंत अचुक, अगदी ठरवल्याप्रमाणे  ' असं या मोहिमेचे वर्णन केलं. तर हे उपग्रह इंग्लंडच्या ज्या कंपनीने बनवले त्या ' सर्रे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी ' ने इस्रोचे तर तोंडभरून कौतुक केले. 

हे लिहायचं कारण की वर्तमान इतिहासातील हिशोब चुकते करत आहे. आपल्याला आठवत असेल प्रचंड विविधता असलेल्या अविकसित भारताला स्वातंत्र्य देऊनच नये अशी भुमिका विस्टन चर्चिल यांनी मांडली होती. संसदेतील एका भाषणात चर्चिल म्हणाले होते की भारताला स्वातंत्र्य मिळालं तर काही वर्षात या देशांत अराजकता माजेल अशी खोचक, द्वेषात्मक टीप्पणी चर्चिल यांनी केली होती.   

मात्र गेल्या काही वर्षांत मोठीच उलथापालथ झाली. अविकसित भारत विकसनशील देश म्हणून गणला गेला. आता तर विकसित अर्थव्यवस्था ( ? ) म्हणून भारत वाटचाल करत आहे. व्यापार - उद्योगधंदे, माहिती तंत्रज्ञान, विविध उत्पादने अशा अनेक गोष्टीत भारताने ब्रिटिशांना sorry आता इंग्लंडला केव्हाच मागे टाकले आहे. त्यापैकीच एक म्हणजे अवकाश तंत्रज्ञान. सदैव अमेरिकेच्या आस-याखाली असलेल्या इंग्लंडला अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मजल मारताच आली नाही. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मोठं नाव असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीचा सदस्य असुनही यामध्ये इंग्लंड महत्त्वाची भुमिका बजावू शकला नाही हे विशेष. युरोपियन स्पेस एजन्सी ही प्रामुख्याने फ्रान्स, जर्मनी आणि इटली हेच तीन देश चालवत आहेत. 

दूरदृष्टी असलेल्या डॉ विक्रम साराभाई यांनी इस्रोची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी रचलेल्या पायावर तितक्याच जोमाने विविध इस्रोच्या प्रमुखांनी इस्रोच्या घोडेदौडीमध्ये खंड पडू दिला नाही. चुकांमधून शिकत स्वबळावर इस्रोने यशस्वीरीत्या वाटचाल करत जगांत स्वतंत्रपणे नाव कमावले आहे. 


आज जगांत सर्वात स्वस्तात उपग्रह पाठवणारा देश म्हणून भारत, भारताची इस्रो संस्था ओळखली जाते. ( आता इस्रोपुढे  स्पेस एक्स या अमेरिकेतील खाजगी संस्थेने आव्हान उभे केले आहे हा भाग वेगळा ). इस्रोने इंग्लंडचे दोन्ही उपग्रह हे ऐकूण 220 कोटी रुपयांमध्ये अवकाशात धाडले. अमेरिका ( नासा ) , रशिया, चीन, जपान, युरोपियन स्पेस एजन्सी या संस्थेकडून हेच उपग्रह अवकाशात धाडण्यासाठी किमान तिप्पट पैसे मोजावे लागले असते. त्यामुळेच इंग्लंडच्या सर्रे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी या उपग्रह बनवणा-या कंपनीने इस्रोचा आणि त्यामध्ये इस्रोचा सर्वात भरवशाचा प्रक्षेपक PSLV चा पर्याय निवडला. 

हे दोन्ही उपग्रह इंग्लंडला सामरिक वापरासाठी, नगर विकास कामासाठी, नैसर्गिक स्रोत -ठिकाणांचा अभ्यास करण्यासाठी, आपत्कालीन घटनेत लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. तेव्हा एवढी महत्त्वाची कामगिरी असलेले उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी भारतालाच निवडले हे विशेष.

विशेष म्हणजे ही मोहीम पूर्णपणे व्यवसायिक होती, म्हणजेच फक्त इंग्लंड या ग्राहकांचे उपग्रह पाठवण्यासाठीच आखण्यात आली होती. याआधीही भारताने इंग्लंडचे तीन उपग्रह अवकाशात पाठवले होते.  

तेव्हा भारताकडे काहीशा उद्दामपणे बघणा-या हेटळणी करणाऱ्या चर्चिलचे यांचे भाषण आठवत रहाते, दिडशे वर्ष फोडत - झोडत राज्य करणारे ब्रिटीश आठवतात. 

तेव्हा सध्या वर्तमान हा भूतकाळाचा एकप्रकारे सूड उगवत एक वर्तुळ पूर्ण करत आहे असं वाटत राहतं. 

बरोबर ना....?

Tuesday, May 15, 2018

' इस्त्रो ' चे बिझी वेळापत्रक.....




शीत युद्धानंतर बहुदा पहिल्यांदाच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींनी गेल्या काही महिन्यांत वेग घेतला आहे. शीत युद्ध ऐन जोमात असल्याच्या काळांत १९५७ ला पहिला कृत्रिम उपग्रह सोव्हिएत रशियाने प्रक्षेपित केल्यापासून १९६९ ला चंद्रावर अमिरिकचे अंतराळवीर उरतेपर्यंत एक जबरदस्त अवकाश स्पर्धा अमेरिका आणि रशिया दरम्यान सुरु होती. प्रत्येक महिन्याला विविध प्रकारचे दोनपेक्षा जास्त उपग्रह दोन्ही देशांकडून अवकाशात धाडले जात होते. 

तसंच काहीसं गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. कारण विविध प्रकारचे - क्षमतेचे उपग्रह सोडण्याचा मानवी अवकाश मोहिम करण्याचाचंद्र - मंगळ - गुरु - लघुग्रह अशा विविध ठिकाणी अवकाश याने पाठवण्याचा सपाटा गेल्या काही महिन्यांत बघायला मिळाला आहे. सध्या कोणत्याही देशांमध्ये शीतयुद्ध अस्तित्वात नसले तरी अवकाश मोहिमांचा वेग निश्चितच वाढला आहे. स्पर्धात्मक नव्हे तर विशिष्ट हेतू असलेल्या गुणात्मक मोहिमांची भर पडत चालली आहे. 

कालपरवा म्हणजे अगदी ५ मे ला आणखी एक यान अमेरिकेच्या नासाने मंगळ ग्रहाच्या दिशेने धा़डले. तर या वर्षाच्या अखेरीस चीन त्यांचे दुसरे यान चंद्रावर उतरवणार आहे, तेही कधीही न दिसणा-या चंद्राच्या दुस-या बाजूला. त्यातच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकां विविध समानवी मोहिमा सातत्याने सुरु आहेत. युरोपयिन स्पेस एजन्सी दर महिन्याला एक पेक्षा जास्त उपग्रह प्रक्षेपित करणा-या मोहिमांमध्ये व्यस्त आहे. हे सर्व सांगायचे कारण भारताची अवकाश संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो येणा-या काळांत अशीच काहीशीव्यस्त असणार आहे.

साधारण २० वर्षापुर्वी वर्षातून एक - दोन उपग्रह प्रक्षेपित करणा-या मोहिम इस्त्रो करायची. आता या वर्षापासून हे प्रमाण वर्षाला १२ म्हणजेच महिन्याला एक मोहिम अशा स्थितीपर्यंत पोहचत आहे, अशी क्षमता इस्त्रोने गेल्या अनेक वर्षांच्या अथक तपश्चर्येने आता मिळवली आहे.

या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यांत इस्त्रो महत्वकांक्षी 

अशी चांद्रयान - २ मोहिम पार पाडणार आहे. खरं तर एप्रिल - मे महिन्यात ही मोहिम होणार होती पण चांद्रयानाच्या आणखी काही चाचण्या करणे आवश्यक असल्याचं लक्षात आल्यावर ही मोहिम पुढे म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पूढे ढकलण्यात आली आहे. असं असलं तरी यानिमित्ताने इस्त्रोच्या अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे नाणे जगाच्या पटलावर खणखणीत वाजणार आहे.  या मोहिमेत चंद्राभोवती एक यान फिरत ठेवत चंद्राचा अभ्यास केला जाणार आहे. तर कधीही स्पर्श न झालेल्या दक्षिण ध्रुवावरचांद्रयानचे Lander आणि Rover उतरवणार आहे. हे रोव्हर चांद्र भुमिवर फिरत चंद्रभुमिचा, चंद्रावरील मातीचा अभ्यास करणार आहे. २००८ च्या चांद्रयान - १ मोहिमेत चंद्रावर जमिनीखाली पाणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. तेव्हा चांद्रयान - २ मोहिमेच्या माध्यमातून अजुनही गुढ असलेल्या या चंद्राची आणखी वेगळी माहिती हाती लागेल अशी अपेक्षा आहे.  

एकीकडे चांद्रयान -२ मोहिमेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले असले तरी या वर्षाच्या अखेरीस मंगळयान - २ मोहिमेचा कागदावरचा आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम २०१९ च्या मध्यात पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तर २०१९ -२० ही पुढील दोन वर्षे मंगळयान - २ मोहिमतील आवश्यक यान - उपकरणे प्रत्यक्ष तयार करण्यात इस्त्रोचे शास्त्रज्ञ हे बिझी असणार आहेत. तर २०२१ मध्ये मंगळयान - २ मोहिम प्रत्यक्षात येणार आहे. चांद्रयान – २ मोहिमेप्रमाणे मंगळयान -२ मोहिमेत मंगळ ग्रहावर एक रोव्हर उतरवला जाणार आहे,मंगळ भुमिचा अभ्यास केला जाणार आहे.

या वर्षी शुक्र ग्रहावर पाठवण्याच्या यानाबाबत आराखडे बनवायला इस्त्रो सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या सुरुवातीला शुक्र ग्रहाचा कसा अभ्यास करता येईल याबाबत सुचना – कल्पना मागवण्यात आल्या होत्या. शुक्र ग्रहाभोवती १७५ किलो वजनाचा उपग्रह इस्त्रो पाठवणार आहे. हा उपग्रह शुक्र ग्रहाभोवती ५०० ते ६०,००० किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत शुक्र ग्रहाचा अभ्यास करणार आहे. २०२० नंतर ही मोहिम प्रत्यक्षात येणार आहे.  

येत्या काही महिन्यांत ‘ आदित्य़ ‘ मोहिमेवरच्या कामालाही सुरुवात होणार आहे. सुर्याच्या बाहेरील वातावरणाचा - ‘ कोरोना ‘ चा अभ्यास हा आदित्य नावाचा उपग्रह करणार आहे. हा सुमारे २५० किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. या अंतरावर पृथ्वीचे आणि सुर्याचे गुरुत्वाकर्षण बल हे समसमान असते. २०१९ मध्ये ही मोहिम प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

तर एकाच मोहिमेत शुक्र आणि गुरु ग्रहाचा वेध घेणा-या मोहिमेचा इस्त्रो विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रो जगात स्वस्त अशा अवकाश मोहिमांसाठी प्रसिद्ध आहे. आधी संबंधित उपग्रह हा शुक्र ग्रहाच्या जवळ पाठवायचा ज्यासाठी फक्त ३ महिन्याचा अवधी लागेल. तिथे काही महिने शुक्राचा अभ्यास केल्यावर शुक्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करत हा उपग्रह सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवायचा. तेव्हा एकाच मोहिमेत दोन ग्रहांचा वेध घेण्याचा इस्त्रोचा प्रयत्न असणार आहे. मात्र अशा या बहुउद्देशीय मोहिमेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा इस्त्रोने दिलेला नाहीये.

नासाप्रमाणे भारतीय स्पेस शटल बनवण्याचा इस्त्रो प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून १.७५ टन वजनाचे छोटे विमान रॉकेटच्या शेंड्यावर बसवून ६५ किमी उंचीपर्यंत नेण्याचा प्रयोग ऑगस्टम २०१६ मध्ये इस्त्रोने केला होता. अशा मोठ्या आकाराच्या स्पेस शटलच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर अवकाशात नेता येईल तसंच या स्पेस शटलच्या माध्यमातून अवकाशात जाऊन उपग्रह सोडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार आहे. तेव्हा या वर्षी अशा स्पेस शटलची दुसरी चाचणी होणार आहे. मात्र याबाबत इस्त्रो खुपच गुप्तता बाळगत आहे.

थोडक्यात नेहमीच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहिमांशिवाय इस्त्रो विविध मोहिमांच्या माध्यमातून यापुढच्या काळांत अतिशय व्यस्त असणार आहे. 

Wednesday, April 18, 2018

अंतराळातील इस्त्रोचा कचरा...

निमित्त चीनचे....

काही दिवसांपूर्वी चीनची अवकाशातील
पहिली प्रयोगशाळा ( spacelab ) टीयॉगोंग - 1 पृथ्वीवर कोसळली. अवकाशातून पृथ्वीवर धडकतांना वातावरणात जळून नष्ट झाली. एक प्रकारे वापरून झालेली, कार्यकाल समाप्त झालेली प्रयोगशाळा अवकाशातील एक प्रकारे कचराच ठरली होती. कारण अशी वस्तू अवकाशातील इतर उपग्रहांना धोकादायक ठरू शकते. इतर उपग्रहांच्या मार्गात आल्यास त्यावर धडकून दोन्ही वस्तूंचे आणखी अगणित तुकडे तयार होण्याची भीती असते. हे तुकडे, असा कचरा वेगाने पृथ्वीभोवती फिरत रहातो. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या वातावरणात असे तुकडे परतायला काही वर्षे लागू शकतात.

सध्या भारताच्या -इस्त्रोच्या दोन वस्तू खरं तर कचरा म्हणूया पृथ्वीभोवती भ्रमण करत आहेत. एक म्हणजे उष्णतारोधी कवचात अडकलेला IRNSS - 1H उपग्रह तर गेल्या महिन्यात प्रक्षेपित करून अवकाशात संपर्क तुटलेला GSAT - 6A उपग्रह.

रॉकेटच्या - प्रक्षेपकाच्या टोकावर उपग्रह असतो आणि त्याच्या भोवती उष्णतारोधी कवच असते. जेव्हा रॉकेटचा वरचा भाग पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पोहचतो ( 70 किमी उंचीच्या वर ) तेव्हा निर्वात पोकळी सुरू होते. अशा वेळी वजनदार ( एक टन ) असे उपग्रहाचे संरक्षण करणारे उष्णतारोधी कवच बाजूला होते. मग आणखी उंची गाठल्यावर उपग्रह वेगळा होतो. इस्रोच्या ऑगस्टमधील IRNSS - 1H उपग्रहाच्या मोहिमेत उष्णतारोधी कवच वेगळे झालेच नाही. त्यामुळे अपेक्षित उंची न गाठता उपग्रह हा या कवचातच अडकून पडला. असा उपग्रह आणि कवच असा भाग सध्या पृथ्वीभोवती फिरत आहे. त्यावर शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत, यापासून अजून तरी कोणाला ( दुसऱ्या उपग्रहांना ) धोका नाही. असं असलं तरी हा भाग अंतराळातील कच-याचाच एक भाग बनला आहे.

तर गेल्या महिन्यातील 29 मार्चच्या मोहिमेत GSAT - 6A हा उपग्रह यशस्वीरीत्या 170 किमी उंचीवर प्रक्षेपित केला गेला. दोन वेळा उपग्रहाचे इंजिन सुरू करत कक्षा साधारण 25,000 ते 35,000 किमी अशी लंबवर्तुळाकार वाढवण्यात आली. मात्र तिस-यांदा कक्षा वाढवण्याचा प्रयत्न केला असता उपग्रहाचा संपर्क तुटला आहे. सुरुवातीला उपग्रहाचे नेमके स्थान शास्त्रज्ञांना मिळत नव्हते. मात्र उपग्रहाचे नेमके स्थान समजले असून पुन्हा उपग्रहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर हे शक्य झाले नाही तर GSAT - 6A उपग्रह अंतराळात पुढील अनेक वर्षे असाच फिरत राहील आणि अंतराळ कच-याचा एक भाग बनेल.

2017 च्या सुरुवातीला इस्रोने एका दमात 104 उपग्रह ( यापैकी 103 हे नॅनो - मायक्रो सॅटेलाईट्स होते, ज्यांचे वजन एक किलोपासून ते 100 किलोपर्यंत होते. एवढे उपग्रह एका दमात सोडण्याचा विश्वविक्रम इस्रोच्या नावावर जमा झाला. एवढेच काय गेली काही वर्षे इस्रो स्वदेशातील असे नॅनो - मायक्रो विविध शैक्षणिक संस्थांचे उपग्रह अवकाशात धाडत आहे. 

हे सर्व उपग्रह छोटे असून कार्यकाल संपल्यावर पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करण्याची शक्यता नाही. कारण तशी सोय या उपग्रहांमध्ये नाहिये. काही उपग्रहांमध्ये शेवटपर्यंत इंधन ठेवले जाते, कार्यकाल संपल्यावर असे उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून नष्ट केले जातात. मात्र सर्वच उपग्रहांच्याबाबतीत अशी सोय केल्याचे कोण जाहीर करत नाही.

त्यामुळे पुढील कित्येक वर्षे असे हे मायक्रो, नॅनो तसंच मोठे उपग्रह पृथ्वीभोवती फिरत रहाणार आहेत. 

तेव्हा इस्रोने असा कचरा तयार करण्यात एकप्रकारे हातभार लावत आहे. थोडक्यात अंतराळ कच-यामध्ये इस्रो भर घालत आहे असं म्हंटले तर चुकीचे होणार नाही.

याच विषयावर 2012 मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये आणखी माहिती... http://amitjoshitrekker.blogspot.in/2011/07/space-debris.html?m=1


इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...