Wednesday, November 17, 2010

भारत-चीन लष्करी ताकद , कोण कुठे !

चीनचे सामर्थ्य - आंतरखंडीय क्षेपणास्त्र बाळगणारी अणु पाणबूडी

ओबामा दौ-यानंतर अनेक विषयांना फाटे फुटले असून चीनला शह देण्यासाठी अमेरिका भारताचा कसा वापर करत आहे याचीही चर्चा जोरात सुरु आहे. येत्या काही वर्षात महासत्ता बनू पहाणा-या चीनला रोखण्यासाठी भारताला  अमेरिका कशी मदत करत आहे, चीनला टक्कर देण्यासाठी भारताची ताकद कशी वाढवत आहे, याचे दूरगामी परिणाम कसे होतील, भारताला याचा भविष्यात फायदा होणार की तोटा याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहे. आर्थिक क्षमता, मनुष्यबळ, आयात-निर्यात, गुंतवणूक याबाबतीत चीन भारताच्या कितीततरी पुढे आहे. निदान दोन्ही देशांचे लष्करी सामर्थ्यांची तुलना केली तर भारताला अजून बरचा पल्ला गाढायचा आहे हे स्पष्ट होतं.

चीन-भारत देशांची लष्करी तुलना

लष्कर
                                   भारत               चीन

सशस्त्र सैन्यदल          13,25,000        22,85,000
राखीव सैन्य                9,60,000          8,00,000  
निमलष्करी दल         12,90,000          6,60,000
रणगाडे                           5,000             7,500
तोफखाना                       3,200            20,000
आंतरखंडीय क्षेपणास्त्रे        नाही               आहेत
(पल्ला 10,000 किमीपेक्षा जास्त)

एवढंच नाही तर 5,000 किमीचा पल्ला असलेलं अग्नी-5 क्षेपणास्त्र आपण आत्ता कुठे विकसित करत आहे. मात्र चीनकडे 5,000 पासून ते 15,000 असा विविध पल्ला असलेली क्षेपणास्त्र आहेत.  त्यामुळे जगाच्या कुठल्याही कोप-यातून वेळ पडल्यास चीन भारतावर हल्ला करु शकतो, अण्वस्त्र हल्ला करु शकतो. भारताला मात्र चीनवर हल्ला करण्यासाठी रेंजमध्ये रहाण्यासाठी स्वतःच्याच भूमीचा वापर करावा लागेल.

1980च्या दशकात बोफोर्स प्रकरण चांगलेच गाजले. मात्र यामुळे जगातील उत्तम दर्जाच्या फक्त 400 तोफा आपण विकत घेतल्या, खरं तर त्या आणखी जास्त आवश्यक होत्या,  तसंच भारतात परवान्यावर बोफोर्सचं उत्पन्न करण्याचा आपला मानस होता. मात्र दलाली प्रकरणामुळे हे प्रकरण तिथेच थांबलं एवढंच नाही त्याचे स्पेअर पार्ट, डागडूजी सर्व काही आपल्याला स्वबळावर करावं लागलं. थेट कारगील युद्धातील बोफोर्सच्या जोरदार कामगिरीमुळे बोफोर्सची आपल्याला पुन्हा आठवण झाली. आता पुन्हा बोफोर्स नको म्हणून आपण दुस-या देशाच्या लांब पल्ल्याच्या तोफा विकत घेण्याच्या मागे आहोत. लांब पल्ल्याच्या तोफखान्याची चांगली वानवा आपल्याकडे आहे. मात्र चीनकडे उत्कृष्ठ दर्जाच्या तोफा आहे आणि स्वतः विकसित केल्या आहेत.

स्वदेशी Main Battele Tank म्हणजे अर्जून रणगाडा आत्ता कुठे 35 वर्षानंतर विकसित केला, त्याचं उत्पादन सुरु केलं आहे. भविष्यात आणखी उत्तम दर्जाचा रणगाडा विकसित करण्याचा प्रयत्न सुरु असून हे रणगाडे T-72 रणगाड्यांना रिप्लेस करणार. चीन याबाबतीत भाराताच्या कितीतरी पुढे आहे.


नौदल
                                        भारत                     चीन
विमानवाहू युद्धनौका                1                         --
विनाशिका                              8                        26
फ्रिगेट                                  12                       49
कॉर्वेट                                  24                     200 +
( वेगवान क्षेपणास्त्र हल्ला करु शकणा-या नौका )
डिझेल पाणबूड्या                    15                       56
अणु पाणबुडी                          -                         8 +
Large Landing Ship              5                       27 

दोन्ही देशांच्या नौदलाच्या युद्धनौकांची तुलना केली तर आपण चीनच्या जवळपाससुद्धा नाही.

भारतात आयएनएस अरिहंत( 6,000 टन )  या अणु पाणबुडीच्या सध्या चाचण्या सुरु असून त्यानंतर अरिहंत वर्गातील आणखी दोन तर अरिहंतपेक्षा मोठी पाणबुडी बांधण्याचा विचार सुरु आहे. मात्र अणु पाणबुडी बांधणं, अडणींवर मात करत ती वापरणे ही सोपी गोष्ट नाहीये.  त्यामुळे 2020 पर्यंत भारताकडे 6 अणुपाणबुड्या असतील असा अंदाज आहे.

तर चीनकडे हल्ला करणा-या वेगवान अणु पाणबुड्या 5 आहेत. तर आंतखंडीय क्षेपणास्त्र सोडणा-या दोन पाणबुड्या असून आणखी चार चीन बांधत आहे.

विमानवाहू युद्धनौकांच्याबाबातीत आपण चीनच्या पुढे आहोत. भारताकडे एक विमानवाहू युद्धनौका आयएनएस विराट असून ती 2012 ला सेवेतून रजा घेणार आहे. तर एक रशियाकडून तर एक  स्वबळावर बांधली जात असून 2017 पर्यंत तीन विमानवाहू युद्धनौका भारताकडे असतील. तर चीन 2015 च्या सुमारास दोन विमानवाहू युद्धनौका दाखल करणार आहे.


वायू दल
                                     भारत                     चीन
लढाऊ विमाने                   387                     1300
बॉम्बफेकी विमाने              239                       600
AWACS                           2                            4
मालवाहू विमाने               229                       300 +
हवेतल्या हवेत                   6                          10
इंधन भरणारी विमाने

एवढंच नाही तर 5th Generation म्हणजे अमेरिकेचं F-22 सारखं जगातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान चीन बनवत असून २०१५ पर्यंत ते सेवेत दाखल होईल. आपण मात्र रशियाबरोबर संयुक्तरित्या हे बनवणार असून ते दाखल व्हायला 2018 साल उजाडणार आहे.  चीनने स्वदेशी बानवाटीचं पहिलं लढाऊ विमान १९७८ ला विकसित केलं, मात्र भारताचं स्वदेशी  " तेजस " विमान 2011 मध्ये सेवेत दाखल होणार आहे. यावरुन वायू दलबाबतीतही भारत चीनच्या खूप मागे आहे ह स्पष्ट होतं.


उपग्रहभेदी क्षेपणास्त्र प्रणाली
चीनने उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची म्हणजेच Anti Satellite Missile ची चाचणी 11 जानेवारी 2007 ला घेतली आणि भारताला धक्का दिला. पण खरे हादरले ते अमेरिका-रशिया.   टीव्ही, मोबाईल, इंटरनेटसाठीचे दळणवळण उपग्रह ,वातावरणाचे अभ्यास करणारे उपग्रह, टेहळणी उपग्रह  यामुळं आता कृत्रिम उपग्रहांचे जगावर राज्य सुरु झाले आहे.  जर एखादा उपग्रह त्यातच जर लष्करी किंवा टेहळणी उपग्रह नष्ट केला तर युद्धाचं पारड सहज फिरवता येऊ शकतं याची जाणीव बड्या देशांना आहे. . रशिया-अमेरिकेने असे उपग्रहभेदी क्षेपणास्त्र 1970च्या दशकांत विकसित केले. चीनच्या चाचणीने आता काहीच सुरक्षित नाही याची जाणीव बड्या देशांना झाली.  चीनकडे हे अस्त्र.....नव्हे तर ब्रमास्त्र तयार आहे. भारत अजून हे तंत्रज्ञान विकसित करत आहे.


क्षेपणास्त्र भेदी तंत्रज्ञान
शत्रू देशांने लांब पल्ल्याचं क्षेपणास्त्र  डागलं,  जर ते आपल्या शहरावर येऊन आदळणार  असेल तर ते शत्रू क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडवणारं क्षेपणास्त्र, प्रणाली आपण विकसित केली आहे.  यामध्ये 30 किलोमीटरपेक्षा कमी उंचीवर आणि 30 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवर कुठलंही क्षेपणास्त्र नष्ट करण्याची क्षमता आपल्याकडे असून 2012 नंतर हे क्षेपणास्त्र विरोधी तंत्रज्ञान आपण सेवेत दाखल करुन घेणार आहोत.  अमेरिका, रशिया, इस्त्राईलकडे असं तंत्रज्ञान आहे. चीन मात्र आपले पत्ते कधीच घड करत नाहीत. चीनकडे उपग्रह भेदी क्षेपणास्त्र असल्याने  क्षेपणास्त्र भेदी तंत्रज्ञान असेल असा अंदजा व्यक्त करण्यात येत आहे.

Indian Armed Force At 2020

आर्थिक महासत्ता बनू पहाणारा भारत लष्करी ताकद वाढवण्याकडे दमदार पावलं टाकत आहे. चीन एवढं लष्करी सामर्थ्य आपण कधीच मिळवू शकणार नाही. मात्र भारत भूमीचे , भारताची सागरी सीमा ( तीनही बाजूला पसरलेला समुद्र, पर्शियन आखातामधील होर्मुझचे आखात ते मलाक्काचे आखात - जगातील 60 टक्क्यापेक्षा जास्त तेलाची वाहतूक आणि मालवाहतूक या मार्गावरुन होते ) सुरक्षित करण्याची ताकद आपण 2020 पर्यंत मिळवणार आहोत.  2020 पर्यंत भारताकडे काय येणार त्याची यादी पाहूया....


अत्याधुनिक बनावटीचे स्वदेशी रणगाडे  
क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली
उपग्रहभेदी क्षेपणास्त्र, तंत्रज्ञान
हल्ला करणारे मानवविरहित यान
उत्कृष्ट लांब पल्ल्याच्या तोफा
लांब पल्ल्याचे रॉकेट लॉन्चर्स
जवानासाठी उत्कृष्ट दर्जाचा गणवेश ( नाईट व्हीजन गॉगल-कॅमेरा असलेले हेल्मेट,
संवाद साधण्यासाठी यंत्रणा, बुलेट प्रुफ जॅकेट, पाल्मटॉप- PalmTop  वगैरे.... )
600 पेक्षा जास्त अत्याधुनिक लढाऊ विमाने
संयुक्तरित्या बनवलेले मालवाहू विमान
जड मालवाहू विमाने
सशस्त्र - हल्ला करणारे हेलिकॉप्टर
पाचव्या श्रेणीतील विमान
3 विमानवाहू युद्धनौका
10 पेक्षा जास्त विनशिका
18 पेक्षा जास्त फ्रिगेट
अत्याधुनिक 12 पाणबूडी
6 अणू ऊर्जेवर चालणार-या पाणबूड्या
लेझरयुक्त शस्त्र प्रणाली
आंतरखंडीय क्षेपणास्त्रे ( 8,000 किमी पेक्षा जास्त पल्ला....  )
टेहळणी उपग्रह
तीनही दलांशी सूसंवाद साधणारी उपग्रहांची साखळी
15 पेक्षा लांब पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने
12 पेक्षा जास्त रडार असलेली विमाने ( AWACS - Airborn Early Warning and Control System  )

अब्जावधींचे लष्करी करार

2020 पर्यंत सुसज्ज होण्यसाठी भारताने 2004 पासून विविध देशांशी लष्करी करार करण्याचा धडाका लावला आहे.  सध्या भारताच्या संरक्षण दलाचा अर्थसंकल्प आहे  32 अब्ज डॉलर्स( 30 Billion Dollers ). मात्र येत्या 10 वर्षात म्हणजे 2020 पर्यंत 50 अब्ज डॉलर्स फक्त शस्त्रास्त्रांची खरेदी, गुंतवणूकीसाठी आपण वापरणार आहोत.  म्हणूनच भारताला शस्त्रास्त्र विकण्यासाठी अमेरिकेतील बलाढ्य शस्त्रास्त्र निर्मिती करणा-या कंपन्या गुडघ्याला बाशिंग बांधून भारतात खेपा घालत आहेत. ( ओबामा दौ-यातही कंपन्यांचे प्रतिनिधी होते) .  पुढील महिन्यात रशिया, फ्रान्स देशांचे राष्ट्रपती भारतात येत आहेत, त्यांचे महत्त्वाचं काम असणार आहे ते लष्करी करारांवर सह्या करण्याचं.

यामुळं भारत चीनच्या हद्दीत  लढण्यापेक्षा स्वतःच्या सीमा बळकट करण्याकडे लक्ष देत आहे.  दोन्ही देशांची 2020 ला संख्यात्मक तूलना केली तेव्हाही भारत चीनच्या मागेच असणार आहे. ( तोपर्यंत चीन अमेरिकेला टक्कर देण्यायोगा सज्ज झालेला असेल ).   मात्र सध्या भारत लष्कराची जी बांधणी करत आहे ते पहाता  भारत स्वतःची सीमा बळकट करेलच पण जगात आर्थिक महाशक्तीबरोबर सामर्थ्यान लष्करी देश म्हणूनही ओळखला जाईल.  म्हणूनच माजी नौदलप्रमुख अँडमिरल सुरीश मेहता एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते की  यापूढील काळात नौदलाची ताकद ही Quantity पेक्षा Qualities वर अवलंबून असेल, उत्कृष्ठ तंत्रज्ञान देशाची ताकद ठरणार आहे.   

Thursday, November 11, 2010

ठाणे जिल्ह्यातील " बेकार " लोकप्रतिनिधी


" बेकार " म्हणजे काय ?

या ठिकाणी बेकार शब्दाची व्याख्या काय ?...  नोकरी नसलेला - नाही...    ,  सुशिक्षित पण नोकरी नाही -  तसंही नाही. ..  ,   तर कामे भरपूर असलेला पण काम करायची इच्छाच नसलेला किंवा काहीही काम करायचे नाही असं ठरवलेला, अशी ' बेकार ' या शब्दाची व्याख्या या लेखासाठी मला करायची आहे.  ठाणे जिल्यातील लोकप्रतिनिधींना कामे करायची इच्छाच नाही, थोडंस काम केल्यासारखं दाखवतात, कुठेतरी थोडंसं आंदोलनं करतात, त्याची प्रसिद्धीही चांगली करतात.  मात्र नंतर नागरिकांच्या समस्यांकडे चक्क पाठ फिरवतांना दिसतात. समस्या मात्र काही सोडवल्या जात नाहीत. 


मुंबईनंतर सर्वात जास्त लोकप्रतिनिधी ठाणे जिल्ह्यात
2007 मध्ये राज्यातच नव्हे तर देशातील सर्व मतदारसंघांची लोकसंख्येच्या दृष्टीने पुर्नबांधणी करण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्याला तब्बल 24 आमदार आणि 4 खासदार लाभले. एवढया जास्त संख्येने लोकप्रतिनिधी असलेला ठाणे जिल्हा राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ठाणे, कल्याण-डोंबिवली, कुळगांव-बदलापूर-, अंबरनाथ, भिवंडी, वसई-विरार, उल्हासनगर, मीरा-भाईंदर काही भाग अशा मोठ्या  महानगरपालिका आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचं ठाणे जिल्ह्यावर बारीक लक्ष असून ठाणे जिल्हा राज्यात सत्ता स्थापनेत महत्त्वाची भुमिका बजावू शकतो याचं चांगलं भान राजकारण्यांना आहे.  महानगरपालिका आणि नगरपरिषदा ताब्यात ठेवण्यासाठीही सर्व राजकीय फक्ष प्रयत्नशील असतात.

लोकप्रतिनिधींचा उपयोग काय ? प्रश्न अजुनही प्रलंबित       
सध्याची ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 81 लाखांपेक्षा जास्त आहे.  मात्र ठाणे जिल्ह्यातील समस्यांकडे एकही लोकप्रतिनिधी गांभीर्याने बघतांना दिसत नाहीये. रेल्वे, रस्ते वाहतूक, बेकायदेशीर बांधकामे, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या, मोठ्या शैक्षणिक संस्थांचा अभाव आणि मुख्य म्हणजे लोडशेडिंग असे कुठलेकुठले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते आधी बघू.

1.....रस्ते वाहतूक -  ठाणे जिल्ह्यातील नागरीकांचं आयुष्य हे ऑक्सीजनपेक्षा रेल्वेवर त्यापेक्षा लोकल सेवेवर सर्वात जास्त अवलंबून आहे असं म्हंटलं तर चुकीचे ठरणार नाही.  ठाणे-कल्याण-आसनगावं-बदलापूर तसंच बोरिवली- वसई-विरार ते डहाणूपर्यंत  यामार्गावरील लोकलची जरा तब्येच बिघडली( ओव्हरहेड वायर तूटली वगैरे....) तर त्याच फटका लाखो नागरिकांना बसतो. कारण मुंबई गाठण्यासाठी लोकलशिवाय दुसरा पर्यायचं नागरिकांकडे नाहीये.  तेव्हा बदलापूर-कल्याण-डोंबिवली-ठाणे असा काहीसा समांतर आवश्यक आहे. तर  विरारपासून बोरिवलीपर्यंत रस्ता असला तरी चांगली वेगवान बसवाहतूक किंवा चांगली सार्वजनिक सेवा  उपलब्ध नाहीये.  एकंदरितच मुंबई गाठण्यासाठी वेगवान सार्वजनिक बस वाहतूक सेवा ( बीआरटीएस सारखा प्रकल्प ) अत्यंत आवश्यक आहे. तसंच अत्यंत भिकार अशा रस्त्यांच्या अवस्थेचा मोठा फटका वाहतूकीला बसत असून पावसाळ्यात वाहतूक कोंडीला सर्वच ठिकाणी समोरे जावे लागते.

2.....जीवघेणा लोकल प्रवास -  कारगीलच्या युद्धात 527 जवान, अधिकारी शहिद झाले तर 1300 पेक्षा जास्त जखमी झाले. हा आकडा मुद्दाम सांगत आहे कारण दरवर्षी मुंबई उपनगरीय लोकल प्रवासात 3000 पेक्षा जास्त जण ठार, मृत्युमखी पडत असतात, जखमी होत असतात.  एका माहितीच्या आधारे हा आकडा गेल्या 10 वर्षात तब्बल 20 हजार एवढा आहे.  ठाणे-कल्याण,  बोरीवली-विरार मार्गावर लोकलच्या गर्दीचा एकदा तरी अनुभव लोकप्रतिनिधींनी घेतला आहे  का ?

3.....पिण्याच्या पाण्याची समस्या -  मुंबईनंतर फक्त नवी मुंबईकडे स्वतःच्या मालकीचं धरण आहे. मात्र ठाणे जिल्ह्यात भरपूर महानगरपालिका, नगरपरिषदा असल्या तरी एकाकडेही स्वतंत्र पाणी पूरवठ्याची व्यवस्था नाही.  वेगाने लोकसंख्या वाढत असलेल्या या जिल्ह्यात भविष्यात पाण्याची समस्या किती भीषण असणार आहे याची कल्पना लोकप्रतिनिधींना आहे का ?.

4.....बेकायदेशीर बांधकामे - 5 लाखांपेक्षा जास्त बेकायदेशीर तसंच अतिक्रमण केलेली बांधकामे ठाणे जिल्ह्यात आहेत अशी माहिती स्वतः राज्य सरकारनेच उच्च न्यायालयात दिली आहे. शहर बांधणीचं कुठलंही नियोजन ( ठाणे शहर वगळता ) ठाणे जिल्ह्यात दिसत नाही.  त्यामुळं जिल्ह्यातील शहरांना बकालपणा आलेला आहे, नागरी समस्यांमध्ये अशा बांधकामांमुळे भर पडत चालली आहे.

5.....प्रदुषण -  डोंबिवली प्रदुषणात नंबर दोनवर आहे, तर कल्याण, भिवंडी, मिरा-भाईंदर अशा शहरांमध्ये वाहनांच्या प्रदुषणाने कहर केला आहे. जरा  गाडीची काच खाली करुन लोकप्रतिनिधीने गर्दीतून प्रवास केला आहे का ? ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसी क्षेत्रातील प्रदुषणाने भयानक पातळी ओलांडली आहे. शिवडीसारखी वायू गळती दुर्घटना या जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहज होऊ शकते याची तपासणी कोणी केली आहे का ?

6.....सार्वजनिक रुग्णालय   -  ठाणे जिल्ह्यात एकही मोठं सार्वजनिक रुग्णालय नाहीये. खाजगी रुग्णालये अमाप आहेत पण ती सर्वसामान्यांच्या खर्चाच्या पलिकडे आहेत. कुठल्याही मोठ्या उपचारासाठी मग तो भीषण अपघात असो किंवा ह्रदय रोगावरील उपचार असोत  मुंबईतली केईएम, सायन, जेजे सारखी सार्वजनिक रुग्णालये गाठावी लागतात.  कल्याण, वसई, भिवंडी, बदलापूर, पालघरसारख्या मध्यवर्ती शहर , गावांत मोठं सुसज्ज सार्वजनिक रुग्णालय उभारलं गेलं तर त्याचा मोठा फायदा ठाणे जिल्ह्यातील सर्व कानाकोप-यातील नागरिकांना होईल. याचा विचार कधी कोणी केला आहे का ?  

7.....मेट्रो-मोनो रेल्वे प्रकल्प -  मुंबईमध्ये वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर मेट्रो तर चेंबूर-वडाळा-जेकब सर्कलवर मोनो रेल्वे उभारण्याचं काम सुरु आहे. तसंच मुंबईला उभ्या आडव्या जोडणा-या मेट्रो-मोनोचे मार्ग प्रस्तावित आहेत. मुंबईला वाढायला जागा नसल्याने सर्व लोंढा ठाणे जिल्ह्यामध्ये सरकत आहे. तेव्हा भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेऊन आत्तापासून ठाणे जिल्ह्यात मेट्रो-मोनोचं काम का सुरु केलं जात नाही. लोकप्रतिनिधी यासाठी काय करत आहेत.


समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी कधी एकत्र आले आहेत का ?

प्रशासकीय यंत्रणेसमोर ( आएएस अधिकारी वगैरे...) , लोकसभा,विधानसभा-विधानपरिषदेत,  मंत्र्यांसमोर लोकप्रतिनिधी समस्या कशी मांडतात, दबाव गट कसा तयार करतात यावर समस्या सुटण्याचे यश अवलंबून असते. आता लोकसभेला दीड वर्ष तर विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं.  गेल्या दीड वर्षात ठाणे जिल्ह्यातील किती खासदारांनी, आमदारांनी लोकसभेत,विधानमंडळात समस्येसंदर्भात तोंड उघडलं, किती वेळा अधिका-यांबरोबर बैठका घेतल्या, ठाणे जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याची क्षमता असलेल्या एमएमआरडीएच्या किती बैठकांना हजेरी लावल्या? . ठाणे जिल्ह्यातील किंवा स्वतःच्या परिसरातील समस्या सोडवण्यासाठी किती आमदार पक्षभेद बाजूला सारुन एकत्र आले ?

असं सगळं प्रगतीपुस्तक बघितलं तर सन्माननीय एक दोन आमदार, खासदार  वगळता बाकी सर्वांची पाटी कोरी असल्याचं स्पष्ट होतं.  नको त्या प्रश्नांना, भलत्याचं गोष्टांनी मात्र हात घालण्याची वृत्ती लोकप्रतिनिधींची दिसून येते. कल्याणमध्ये विमानतळ व्हावं यासाठी ठाणे जिल्ह्यातील तीन खासदार कधी नव्हे तर एकत्र आले आणि  दिल्लीत मंत्र्यांची भेट घेतली. एवढ्या समस्या असतांना त्या बाजूला सारुन विमानतळाचा प्रश्न मांडणं महत्त्वाचा आहे का, त्याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे का?  


वर लिहिलेल्या सर्व समस्या काही भागापूरत्या किंवा काही मतदारसंघापूरत्य़ा मार्यादित नाहीयेत. तर त्या सगळीकडे आहेत.  निदान परिसरातील आमदार, खासदार एकत्र आले, दबाव गट तयार केला, चांगला पाठपूरवठा केला, वेळप्रसंगी पक्षभेद विसरुन आंदोलने केली तरीही या समस्या सुटू शकतात.


प्रश्न एवढाच आहे की हे सगळं कधी होणार, आपल्या समस्या कधी सुटणार?              

Sunday, August 22, 2010

देवांचे हरामखोर भक्त


असं वेडवाकडं हेडिंग बघून आणि त्यात साईबाबांचा फोटो बघुन तुम्हाला राग सुद्धा आला असेल. पण कोणा देवाबद्दल हे नाहीये. ( खरं तर देव मी मानत नाही ) आणि कोणा भक्तांच्या भावनेला धक्का लावायचा नाहीये.  पण शिर्डीला गेल्यावर, आंनदाच्या वारीची यात्रा केल्यावर असे काही वाईट अनुभव आल्यानं लिहायचे वाटले. म्हणून पुन्हा एकदा ब्लॉग लिहित,  कि-बोर्ड बडवायला सुरुवात केली आहे.

ठिकाण - शिर्डीचे साईबाबांचे मंदिर

 दोन वर्षांपूर्वी रामवनमी निमित्त झी 24 ताससाठी कव्हरेजसाठी गेलो होतो. आदल्या दिवशी रात्री 12 वाजता पोहचूनसुद्धा पहाटे सव्वा चार वाजता काकड आरतीला  कॅमे-याच्या चंबूगबाळ्यासह हजेरी लावली. आरती झाली सकाळी  दोन चार वेळा लाईव्ह ( थेट प्रक्षेपण ) झालं.  मंदिरातील वाढत्या गर्दीचा आढावा ( Walkthrough ) घेण्यासाठी मंदिरामध्ये झालेल्या गर्दीत मिसळलो. गर्दी कशी आहे, वाढत आहे, पालख्या कशा वाजत गाजत दाखल होत आहेत याबद्दल कव्हरेज करत होतो.

अचानक मला धक्काबुक्की करायला तिथे आलेल्या पालखीतल्या काही लोकांनी सुरुवात केली. मंदिरात पालखीसह येऊनसुद्धा साईंचं दर्शन लवकर मिळत नसल्यानं त्यांनी  राग असा  माझ्यावर  काढला. प्रकरण एवढंच थांबलं नाही तर गर्दीचा फायदा घेत काहींनी मला चिमटे काढायला सुरुवात केली.  काही लोकं चक्क दारुचा चांगला एक डोस घेऊनंच आली होती. माझा कव्हरेज होईपर्यंत मी काही मिनिटे संयम बाळगला. मग मात्र मला राहवेना, मी पटकन वळत एकाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, तो निसटला खरा पण आपण काही केलंच नाही अशा आविर्भावात सगळे चेहरे करुन मला बघत होते. म्हंटलं अरे मंदिरात तरी अशी गुंडगिरी करु नका. उलट माझ्य़ावर ते हसायला लागले.  मी एकटा होता आणि ते पाचपन्नास तरी होते. मुख्य म्हणजे मी कव्हरेजला होतो त्यामुळे काहीही करु शकलो नाही.  शेवटी पालखीला काही प्रवेश मिळाला नाहीच.
ठिकाण  - माळशिरस -  माऊलींच्या पालखीच्या मुक्कामाची जागा- वेळ रात्रीचे 10 वा.

अवघ्या चार  दिवसानंतर आषाढी एकादशी आली असतांना वारक-यांच्या " पुढा-यां " च्या बैठकीत जाहिर करण्यात आलं की मागण्या मान्य केल्याशिवाय एकही पालखी पंढरपूरात प्रवेश करणार नाही.  मागण्या काय तर संतांबद्दल आक्षेपार्ह लिहाणा-या मराठा समाजाच्या लेखकांबद्दल कारवाई करावी,  वारक-यांना न जुमानणा-या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे ट्रस्टी बदलावेत.  मी Interview  घेतांना प्रश्न विचारला की तुम्ही इतके महिने हे विषय माहिती नव्हते का, आजचं का तुम्हाला मागण्या सरकारकडे कराव्याशा वाटल्या. त्यांच्याकडे ह्याचं उत्तर नव्हतं, म्हणून त्यांनी कसं संताबद्दल कसं वाईट लिहिलं आहे ते सांगायला सुरुवात केली.

पुढचा प्रश्न विचारला की सर्वसामान्य  वारक-याला याबद्दल काहीही माहिती नाहीये,  तो फक्त पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने वारीत सहभागी होत असतो , तुम्ही त्यांची मतं तरी लक्षात घेतली का? .  याचंही त्यांच्याकडे उत्तर नव्हतं.  पण जोराने बोलणे, ( फालतू, निरर्थक ) मुद्दा तावातावाने मांडणे  हे चालुच होते. शेवटी एकही मागण्या मान्य झाल्या तर नाहीच  आणि  त्यामुळे प्रसारमाध्यमांसमोर मात्र जाण्याची हिंमत त्यांची काही झाली नाही.


ठिकाण महाबळेश्वर- मराठी साहित्य संमेलन

संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आनंद यादव ह्यांनी अध्यक्षपद भूषवू नये नाहीतर संमलेन उधळून लावू.  एखाद्या " लष्कर ए तोय्यबा "  संघटनेसारखी धमकी दिली होती वारक-यांच्या संघटनेनं.  आनंद यादवांनी त्यांच्या " संतसूर्य तुकाराम "  कादंबरीमध्य़े लिहिलेल्या लिखाणाबद्दल ( नाईलाजाने ) वारक-यांची माफी मागितली, तुकाराम मंदिरात ते पायाही पडले. एवढ्यानं वारक-यांचे समाधान काही झाले नव्हते. त्यांचा निषेधाचा जोर काही कमी होत नव्हता. शेवटी आनंद यादवांनी साहित्य संमेलनाला येणं टाळलंच. सर्वात कहर म्हणजे लिखाणाचं स्वातंत्र्याचं ज्यांचा आत्मा अशा साहित्यीकांनी                वारक-यांविरोधात निषेधाचा सूरही काढला नाही.     


ठिकाण- जेजुरीचा खंडोबा .

अष्टविनायक  सायकल मोहिमेत जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी तीन तास आम्ही काढले. मंदिराच्या गाभा-यात पोहचलो. नमस्कार करत होतो, खरं तर किती देवाच्या मुर्त्या, कोणकोणत्या आहेत,  कशा सजवल्या आहेत. ते बघत होतो. अचानक देवाचा पुजारीने माझा हात पकडला, डोकं ठेवा, पटापट काही श्लोक म्हणायला सुरुवात केली, भंडारा लावला  आणि सांगितले की दक्षिणा ठेवा.          मी सांगितलं की मला दक्षिणा द्यायची नाहीये.  त्यावर तो चक्क भडकला,  मीही त्याला उलट उत्तर दिले. सहज माझे लक्ष देवाच्या समोर ठेवलेल्या पैशांकडे गेले. तिथे चक्क 500 आणि 1000 रुपयांच्या कित्येक नोटा ठेवल्या होत्या.

प्रश्न असा की  किती नोटा (  दक्षिणा )  या पुजा-यांनी भोळ्या-भाबड्या लोकांकडुन घेतल्या असतील, किती खिशात, घातल्या असतील याची कल्पनाच करवत नाही.


असे अनेक चांगले-वाईट खरं तर वाईटच  अनुभन देवांच्या भाऊगर्दीत आले. त्यामुळं अनेक देवस्थानांना एकप्रकारे बाजारु स्वरुप आले आहे. म्हणूनच मी देव दर्शनाच्या उद्देशाने कधीच जात नाही, तिथले वैविध्यपण, नवेपणा अनुभवण्यासाठी बघण्यासाठी जातो.  निसर्ग, काहीतरी नवीन माहिती तिकडच्या ठिकाणाबद्दल मिळेल या उद्देशाने जातो. कारण देवांच्या या हरामखोर भक्तांनी तिर्थस्थळे विकृत केली आहेत, भक्तीचा बाजार केला आहे, भक्तांना लुटलं आहे.     

Wednesday, June 9, 2010

नक्षलग्रस्त भागातील सायकल मोहिमेचा अनुभव



चर्चेतील हालेवारा गांव

सध्या गडचिरोलीतील हालेवारा गाव चर्चेत आहे ते तिथं नक्षलवाद्यांनी केलेल्या 12 लोकांच्या  अपहराणांमुळे.  आठवडाभरात नलक्षलवाद्यांनी हे उद्योग केल्याने तिथले लोक चांगलेच धास्तावले आहेत.  खऱं तर तिथे विकास कामावरुन सुरु असलेला राजकीय वाद ह्या घटनांना कारणीभूत आहे  हा भाग वेगळा. पण या निमित्तानं 2002च्य़ा डिसेंबर महिन्यात गडचिरोली भागातल्या या हालेवारा गावांत केलेल्या सायकल मोहिमेची आठवण ताजी झाली.

पूर्व महाराष्ट्र सायकल मोहिम

2000 ला डोंबिवलीच्या आमच्या पेंढरकर महाविद्यालयाने दिल्ली  ते डोंबिवली सायकल मोहिमेचे आयोजन केलं.  मी तेव्हा एस. वाय.बीएस्ससी  ला होतो आणि मुख्य म्हणजे एनसीसीला होतो. कॉलेजमधील आम्ही 20 जणांनी मोहिम 16 दिवसांत फत्ते केली. त्यामुळं सायकलवरुन फिरण्याचं भूत डोक्यात शिरले. ( आजही आहे पण वेळेमुळे शक्य होत नाही ). लगेचच पुढच्या वर्षी 2001 ला  ( बीएस्ससीच्या शेवटच्या वर्षाला असतांना सुद्धा ) अष्टविनायक मोहिम सायकल वरुन 15 जणांसह पूर्ण केली.  त्या मोहिमेचं लिडिंग मी केलं असल्यानं सायकल भ्रमंतीने जणू वेड लावलं होतं.

तेव्हा या वर्षी ( 2002)  कुठे जायचं याचा विचार सुरु केला आणि वेगवेगळ्या सायकल मोहिमांचे प्लॅन सुरु झाले.  साथीला माझे ट्रेकमधील भटके संजय करंदीकर, प्रथमेश मेहेंदळे आणि अमेय आपटे होतेच.  कोकण मोहिम,  दक्षिण भारत, मुख्य किल्ल्यांना भेटी देण्याची मोहिम असे प्लॅनिगं करता करता संपुर्ण महाराष्ट्रच सायकलने का पालथा घालू नये असा विचार सर्वांनी केला. डोंबिवलीतील एका संस्थेच्या सहाय्याने 30 दिवसांत संपुर्ण महाराष्ट्र मोहिम निश्चित केली. पण एक महिन्याचा वेळ कोणाकडेच नव्हता, फार तर 10 दिवस काढता येणं शक्य होते. ( कारण सगळेच जण नोकरीच्या शोधात होते किंवा पुढचं शिक्षण घेत होते.)

मग आम्ही पाचचे मग 10- 15 झालो आणि मग चक्क  40 जणांची यामध्ये भर पडली, एवढ्या लोकांनी सायकल मोहिमांत उत्साह दाखवला.  मग असं ठरलं की प्रत्येकी सहा जणांचे सहा गट करायचे आणि प्रत्येक गटाने राज्यातील एक भाग पालथा घालत डोंबिवलीत एकाच वेळी पोहचाचयेच.  मग कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, नांदेड-परभणी-जालना-औरंगाबाद-नाशिक-डोंबिवली, नांदेड-उस्मानाबाद-सोलापूर-पूणे-डोंबिवली,  नागपूर- अमरावती-धूळे-नाशिक-डोंबिवली असे पाच गट आणि दिशा नक्की झाल्या. मात्र पूर्व महाराष्ट्र कोणी घेतला नसल्यानं ते आव्हान आम्ही स्वीकारायचे ठरवलं.  नागपूर-गोंदिया-गडचिरोली-चंद्रपूर-नागपूर असा आमचा मार्ग निश्चित झाला.


पूर्व महाराष्ट्राला सायकल मोहिमेला सुरुवात

मोहिमेची नक्की तारिख आठवत नाहीये पण डिसेंबरच्या भर थंडीत नागपूरहून आमच्या दोन सायकलल टीमला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून हिरवा झेंडा दाखवला. एक टीम अर्थात
नागपूर-अमरावती मार्गे निघाली आणि आम्ही पाच जण ( संजय करंदीकर, प्रथमेश मेहेंदळे, अमेय आपटे, मंगेश कोयंडे आणि मी ) गोंदियाच्या दिशेने निघालो. मुख्यालयातील प्रमुखानं आम्हाला पत्र दिलं होतं ते पत्र दाखवताच मुक्कामाच्या गावांत तिथल्या संघाच्या शाखेतर्फे आमची रहाण्याची सोय होणार होती.  नागपुर सोडल्यावर  सडक अर्जूनी,  गोंदिया, पुन्हा सडक अर्जुनी, गडचिरोली असे चार दिवसांत चार मुक्काम आमचे झाले.


हालेवाराच्या दिशेने.....

पाचव्या दिवशी गडचिरोली शहरातल्या वनवासी कल्याण आश्रममधील कार्यकर्त्याचं घरं सकाळी सोडलं आणि थेट 20 किलोमीटरवर असलेले चातगांव गाठलं. अभय बंग आणि राणी बंग ह्याचा सर्च प्रकल्पाचं मुख्य कार्यालय इथेच आहे. प्रकल्प बघितला, राणी बंग भेटल्या भरपूर गप्पा झाल्या, त्यांचे अनुभव मनात ठेवत चातगांव सोडलं. त्या दिवशी आम्हाला साधारण 100 किलोमीटरवर असलेला एटापल्ली गाठायचे होते. चातगांवमधून निघायला दुपारचे 12 वाजले होते. तेव्हा थोडसं अडमतडम खात सायकलवर टांग मारली आणि पैड्रीकडे कूच केले.  पैड्री-कसुर-हालेवारा-एटापल्ली असे अंतर कापायचे होते.


दुपारी साडेतीन वाजता पैड्री गावांत पोहचलो. जाम भूक
लागली होती, तेव्हा गावांत शिरल्यावर दिसेल त्या हॉटेलमध्ये ( खरं तर टपरीमध्ये )  शिरलो. गंमत म्हणजे जेवण असं काहीही नव्हते, फरसाण-मिठाई यांवर ताव मारला. जेवता जेवता हॉटेलवाल्याला विचारले की एटापल्ली किती आहे. त्याने दिलेल्या उत्तराने आमची भूक कुठल्या कुठे पळाली आणि फटाफट पोट भरत सायकल चालवण्यासाठी सज्ज झालो.


एटापल्ली अजून 64  किलोमीटर दूर होते. आत्तापर्यंतच प्रवासात  म्हणजे गडचिरोलीपर्यंत फारसं जंगल लागलं नव्हतं, वाहनांची वर्दळ होती आणि काही किलोमीटरवर वस्ती लागायचीच. मात्र पैड्रीपासूनच्या प्रवासात घनदाट जंगल आणि रस्त्यावरची वर्दळ बहुतेक नसणार असल्याची कल्पना आम्हाला गडचिरोलीतच मिळाली होती.  यापुढचा भाग हा नक्षलग्रस्त असल्याची माहितीही आम्हाला  सांगण्यात आली होती.

त्यामुळे आता सायकल दामटल्याशिवाय आमच्यापूढे पर्याय नव्हता. चार वाजता सायकलवर बसलो ते थेट साडेपाच वाजता हालेवारा गावात आल्यावरच उतरलो.  दीड तासात विश्वास बसणार नाही 46 किलोमीटर अंतर कापले होते. साधारण सायकल प्रवासात तासात सरासरी 16-18 कि.मी. अंतर कापले जाते.  सायकल जास्त हाणली तर फार-फार 22 कि.मी..   म्हणजे आम्ही चक्क 32-34 किलोमीटर अंतर एका तासांत आणि दीड तासापर्यंत 46 किलोमीटर हाणले होते.

ख-या अर्थाने हा पल्ला आम्ही चांगलाच एन्जॉय केला होता. एक तर सपाट किंवा गुळगुळीत म्हणा खड्डे नसलेला रस्ता, दोन्ही बाजूला दाट जंगल आणि संपुर्ण मार्गात पास झालेल्या जेमतेम दहा गाड्या. रस्त्याच्या मधोमध उभं राहूनसुद्धा आकाश क्वचितच दिसेल एवढी  झाडे उंच वाढली होती आणि पसरली होती. संपूर्ण मार्गात जेमतेम चार-पाच  वस्त्या लागल्या. चिटपाखरू नसणं हा शब्दप्रयोग आम्ही या पल्ल्यात चांगलात अनुभवला.  त्यामुळे वेगात सायकल टामटवणं सुरु होतं.

सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे डिसेंबर महिना असल्याने  सूर्य लवकर मावळत असल्याने हालेवारा गावात पोहचेपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. अजून एटापल्ली 18 किलोमीटर बाकी होते. हालेवारा गावात पोहचतांना आमची चांगलीच दमछाक झाली होती, तेव्हा कटींग मारुन निघु असा विचार केला आणि गावातील एका टपरीजवळ सायकली थांबवल्या.

कपडे मळलेले, घामाने आंघोळ झालेल्या पाच सायकलींवरचा आमचा अवतार बघून हळूहळू पन्नास एक लोकं आमच्या भोवती गोळा झाली.  अर्थात लगेचच विचारपूस करु लागली कुठुन आलात, कोठे चाललात. इथे एवढे थकलो होतो की चहा-बिस्कीट खायची की ह्यांना उत्तर द्यायची ?  असा प्रश्न पडला होता. आमचे  लिडर माननीय संजय लोकांच्या प्रश्नांना उत्रर देण्यात बिझी झाले आणि आम्ही चहा पोटात रिचूव लागलो.

10 मिनीटे हा ओळखपरेडीचा कार्यक्रम सुरु असतांना आमच्या लक्षात आलं की आम्हाला आणखी कोणीतरी घेरलं आहे.  लष्करी वेषातील लोकांना नीट बघितल्यावर लक्षात आलं की  सीआरपीएफच्या तुकडीनं आम्हाला घेरलं आहे.  कोण तुम्ही,इथे काय करत आहात, कोठे चालला आहात असं जरा वरच्या आवाजात त्यांनी आमची "विचारपूस "  केली.

ताबडतोब आम्ही संघाचं पत्र आणि सायकल मोहिमेची माहिती सांगायला सुरुवात केली. सुरुवातीच्या जबरी आवाजाची जागा आता हास्याने घेतली आणि सीआरपीएफ ती 15 जणांची तुकडी आमच्याबरोबर गप्पा मारू लागली.  मुंबईवरून आलात तेही इथे सायकल चालवण्याकरता ह्याचे त्यांना भारी आश्चर्य वाटंत होतं.


बोलता बोलता सहा वाजले, ठार अंधार पडला होता. आता काय करायचे? कारण गावांत रहाण्याची फारशी सोय नसल्याचं दिसत होतं. गरीब लोकं, रोजची पोटभर खायची मारामार ते आम्हाला कुठे वाढणार, मुक्काम करता येईल असं मंदिर नव्हतं. तेव्हा  एटापल्लीलाच जायचा निर्णय घेतला. पण अंधारात जायचं कसं? ( अंधारात किंवा रात्री उशीरापर्यंत सायकल चालवण्याचा अनुभव नवा नव्हता. कारण मोहिमेच पहिले चारही दिवस आम्ही रात्री उशीरापर्यत - 10 वाजेपर्यंत मुक्कामाच्या ठिकाणी पोहचलो होतो ) . भिती होती ती नक्क्षलवाद्यांची आणि चूकुन भेटले तर वन्य प्राण्यांची.

आमची भिती सीआरपीएफच्या मोरक्याने लगेचच  निकालात काढली. तो म्हणाला हा तुमचा मार्ग म्हणजे पैड्री ते थेट चंद्रपूरपर्यंतचा भाग नक्षलग्रस्त आहे हे खरं. विशेषतः एटापल्ली रात्री जाण्यात धोका आहे आहे हेही खरं. पण नक्षलवादी सर्वसामान्यांना कधीच हात लावत नाहीत  ते फक्त सरकारी लोकांना, पोलिसांना त्रास देतात,हल्ला करतात. तेव्हा तुम्ही बेधडक जावा असा सल्ला मोरक्याने दिला. तसंच जंगलातील वन्यप्राण्यांची संख्या आता कमी झालीये, तेव्हा रात्री ससा दिसला तरी आनंद माना असंही त्याने आवर्जून सांगितलं.

सीआरपीएफचा निरोप घेत आम्ही सायकलवर टांग मारली, बॅट-या सायकलच्या हॅन्डलच्या मधोमध बांधल्या आणि एटापल्लीच्या दिशेने निघालो.  दोन्ही बाजूला दाट अंधार म्हणजे ते जंगल आणि मध्ये अंधार नसलेली जागा म्हणजे रस्ता असं आमचं अंदाजपंजे सायकलींग सुरु होतं.  अंधारात एकमेकांच्या सायकलींचा अंदाज घेता यावा यासाठी पांढरा टी-शर्ट, टॉवेल अंगावर घेतले. अधुनमधून मागचा किंवा पुढचा आहे की नाही किंवा जवळ आहे ना! याची खात्री करण्याकरता हाका मारत होतो, एवढा दाट अंधार होता, बॅटरीच्या प्रकाशात काहीही दिसत नव्हतं तरी त्या उगाच चालू ठेवल्या होत्या. असं असलं तरी सायकलींग आम्ही जाम एन्जॉय करत होतो.


एटापल्लीचा दूत

साधारण तासभर झाला असेल एक प्रचंड झोत असलेली एक गाडी आमच्या पूढे गेली.  पूढे एक वस्ती पार करतांना ती गाडी बाजूला उभी असलेली दिसली. परत थोड्या वेळाने ती आमच्या पूढे गेली. आम्ही अंधारात रस्ता शोधत सायकल चालवत असल्याने आम्ही गाडीकडे दुर्लक्ष केलं. एटापल्ली पासून साधारण 8 किलोमीटरवर असतांना तीच गाडी समोरून आली आमच्या पूढे थांबली,  लाईट तर अप्पर ठेवले होते,  त्यामुळे त्या प्रखर प्रकाशात आम्हाला काहीही दिसत नव्हते.  पण यामुळे  आम्ही घाबरलो, खरं तर आमची फाटलीच. चला आता भेट नक्षलवाद्यांशी, गाडी बहूधा आमच्या हालचालीवर नजर ठेवत असावी, नक्षलवाद्यांचा खबरी असावा, दरोडेखोर आहेत की काय़ या गाडीतील लोकं, आम्हाला लुटायला आलेत,  असा अनेक प्रश्न त्या अर्ध्या मिनीटांत आमच्या मनात येऊन गेले.


ती गाडी म्हणजे एक ओम्नी गाडी होती. एक व्यक्ति खाली उतरली आणि पूढे येऊन आमची विचारपूस करु लागली. आमच्या टाळक्यात काही शिरेना हा काय प्रकार आहे. ती व्यक्ति म्हणजे एटापल्लीतील एक वकील होता. आमच्या सायकली बघुन तो वकील थांबला आणि मदतीसाठी पूढे आला होता.   गाडीच्या लाईटमध्ये चला म्हणजे लवकर पोहचाल, मी तिथेच रहात असल्याने शेवटपर्यंत येतो असे त्याने सांगितले.

एव्हाना आमचा जीव भांड्यात पडला होता.  आम्हाच्या डोक्यात तोपर्यंत काय-काय विचार आले ते त्याला सांगितल्यावर तो चांगलाच हसला. घाबरू नका इथे नागरीकांना त्रास होत नसल्याचे त्यांनेही सांगितलं. त्या वकीलाने एटापल्लीपर्यंत आमची साथ केली आणि मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला मार्गी लावून दिलं आणि जाता जाता दुस-या दिवशी नाश्त्याचं आमंत्रणंही दिलं. ( त्याचं नाव सुद्धा विचित्र आहे, आता काही  आठवत नाही. )

एटापल्ली नंतर आलापल्ली, अहेरी असा सायकलने तर ( प्रकाश आमटेंचं ) हेमलकसा, भामरागड  जीपने फिरलो, बघितलं. तिथून चंद्रपूरपर्यंतही असंच जंगलातून सायकल दामटवत पोहचलो. पूढे दोन दिवसानंतर आनंदवनला बाबा आमटेंना भेटलो, एवढ्या मोठ्या देव माणसाबरोबर अर्धा तास गप्पा मारल्या, भारावून गेलो होतो. साधनाताई तसंच   विकास आमटेंशी बोलायला मिळाले, आनंदवन बघितले आणि नागपूराला मोहिमेची यशस्वी सांगता केली. 

ही संपूर्ण म्हणजे नक्की सांगायची तर 799 किलोमीटरची मोहिम आजही चांगली कालपरवा केल्यासारखी मनात घर करुन आहे. पण त्यापेक्षा पैड्री-हालेवारा-एटापल्लीचा सायकल प्रवास अविस्मरणीय, अदभृत, काहीसा घाबरवून सोडणारा,जोरदार सायकल हाणण्याची झींग पुन्हा पुन्हा अनूभवावी असा वाटणार ठरला.  हालेवाराच्या अपहरण प्रकरणावरून या प्रवासाची आठवण पुन्हा ताजी झाली एवढेच.....म्हणुन हा लिहिण्याचा नसता खटाटोप.                         

Sunday, March 14, 2010

आशियातील अवकाश स्पर्धा

भारताचा प्रगत उपग्रह वाहक जीएसएलव्ही

भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये आर्थिक स्पर्धा सुरु आहे.  कोण आशियातील सत्ता केंद्र बनतं, कोणाकडे आर्थिक गुंतवणुक जास्त होते, कोणाची निर्यात वाढते,  लष्करी सामर्थ्यामध्ये कोण पुढे जाईल या दिशेने दोन्ही देश दमदार पावले टाकत आहेत. मात्र आणखी एका छुप्या स्पर्धेकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते फारसे कोणाला ( म्हणजे सर्वसामान्याच्या ) अजून लक्षात आलेले नाही,  ही स्पर्धा म्हणजे अवकाश स्पर्धा.  ही स्पर्धा फक्त भारत-चीन मध्ये नसुन आशियातील एकेकाळी आर्थिक सत्ताकेंद्र असलेला जपानही सर्वांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. ह्यालाच आशियातील अवकाश स्पर्धा म्हंटले जात आहे.  ही स्पर्धा कशासाठी, याचे दूरगामी परीणाम काय होणार, यामध्ये कोण जिंकेल, जगाच्या राजकारणात याचे परिणाम काय होतील यावर दृष्टीक्षेप टाकुया. पण त्याआधी  अमेरिका- सोव्हिएत रशिया यांच्यातील अवकाश स्पर्धा काय होती ते आधी पाहू.          


शीतयूद्ध काळातील अवकाश स्पर्धा

 4 ऑक्टोबर 1957 ला सोव्हिएत रशियाने जगातील पहिला कृत्रिम उपग्रह यशस्वीपणे सोडला आणि अमेरिकेची झोप उडाली. दुसरे महायुद्ध संपल्यावर  सुरु झालेल्या शीत युद्धात आधीच अणुस्फोट केलेल्या अमेरिकेने आघाडी घेतली होती. तेव्हा उपग्रह सोडत सोव्हिएत रशियाने अमेरिला मागे टाकले.  3 नोव्हेंबर 1957 ला दुस-या स्फुटनिक उपग्रहातून लायका नावाच्या श्वान (कुत्री) सोडत रशियाने अमेरिकेला पार आडवाच केला. तेव्हा जिद्दीने पेटलेल्या अमेरिकने पहिला दळणवळण उपग्रह, पहिला हवामानाचा वेध घेणारा उपग्रह,  पहिला हेरगिरी करणार उपग्रह सोडत अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.  तर 12 एप्रिल1961 ला युरि गागरीन या पहिल्या मानवाला अवकाशात पाठवत रशियाने पुन्हा आघाडी घेतली.

चंद्रावर कोण आधी पोहणार यासाठीही स्पर्धा सुरु झाली.  चंद्राभोवती परिक्रमा करत चंद्राचे फोटो काढण्यासाठी अमेरिकेला तब्बल 15 मोहिमांचे अपयश सहन करावे लागले. ( 1958-1964 ).                 तर रशियाला पाच मोहिम खर्ची घालाव्या लागल्या ( 1959).

चंद्रावर उपग्रह अलगद उतरवण्यासाठीही 1958 पासून प्रयत्न करणा-या  अमेरिका 1966 ला तर  रशियाला 1970 साली यश आले.

शेवटी पहिला मानव उतरवण्यात 16 जुलै 1969ला अमेरिकेला यश आले.  पहिला नंबर अमेरिकेचा आला म्हणुन रशिया त्या मार्गाला गेलाच नाही.  एवढंच नाही शुक्र, बुध आणि मंगळ ग्रहापर्यंत आपला उपग्रह पोहचावा यासाठीही  दोन्ही देशांमध्ये स्पर्धा सुरु होती ती वेगळीच.

पहिले अवकाश स्थानक स्थापन करण्याची स्पर्धा  रशियाने जिंकली. सॅलयुट-1 हे छोटेखानी अवकाश स्थानक  तीन अंतराळवीरांसह अवकाशात पाठवले. अमेरेकेला असे यश स्कायलॅबच्या रुपाने 1973 ला आले.     1958 ला स्फुटनिकच्या रुपाने सुरु झालेला दोन महाशक्तींदरम्यान सुरु झालेली अवकाश स्पर्धा 17 जुलै 1975 ला संपली.  रशियाचे सोयुझ आणि अमेरिकेचे अपोलो अवकाश स्थानक अवकाशात एकत्र जोडले गेले.  जमिनीवर स्पर्धा असेल पण अवकाशात स्पर्धा करणार नाही, अवकाशत मैत्री असेल असं अमेरिका -रशियाने जाहिर करत स्पर्धेला पूर्णविराम दिला.
( त्याबरोबर स्टार वॉरची म्हणजेच अवकाशातील युद्धाची, अवकाशातून   पाहिजे तेव्हा अणूबॉम्ब टाकण्याची भिती संपली. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. )
     

काय मिळाले अवकाश स्पर्धेतून ?

1958 ते 1975 या काळात अवकाश स्पर्धेच्या निमित्ताने  हेरगिरी उपग्रह, हवामानाचा अभ्यास कऱणारे उपग्रह, दळणवळण उपग्रह ( Communication Satellites ), चंद्रासाठी सोडले गेलेले उपग्रह, दुस-याग्रहासाठी पाठवलेले उपग्रह किती पाठवले गेले असतील याची गणतीच नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याला दोन्ही देशांमध्ये  किमान दोन विविध  प्रक्षेपणे होत होती,  दोन उपग्रह पाठवले जात होते.

एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सुरु झालेल्या स्पर्धेमुळे तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला. अंदाज  न लागणा-या हवामानाचा अभ्यास करणारे उत्कृष्ठ उपग्रह विकसित झाले. दळणवळण उपग्रहामुळे  टीव्ही, रेडिओ माध्यमांमध्ये क्रांती झाली. दूरसंवेदक उपग्रहांमुळे पृथ्वी आणि तिच्या वातावरणाचा अभ्यास करता आला. चांद्र मोहिमांमुळे चंदामामा अधिक समजण्यास मदत झाली. तर चांद्रबाह्य मोहिमांमुळे सूर्यासह इतर ग्रहांमालेतील इतर ग्रहांबद्दलही आश्चर्यजनक माहिती समोर आली. स्पेस शटल सारखे अद्यावत अवकाश यानही याच स्पर्धेमुळे विकसित झाले.


अवकाश स्पर्धा आशियातील

आशियातील स्पर्धा सुरू होण्याचे श्रेय चीनला दिले पाहिजे.
15 ऑक्टोबर 2003 ला चीनने शेनझहोयू- 5 या अवकाश यानातून यॅग लेवेईला अवकाशात यशस्वीरीत्या धाडला. तेव्हा चीनच्या या यशानं अस्वस्थ झालेल्या भारताने काही दिवसांतच पहिल्यांदाच दळणवळण, पृथ्वीचा अभ्यास करणा-या उपग्रहाव्यतिरिक्त मोहीम  करण्याचे जाहीर  केले. तत्कालीन  पंतप्रधान अटलबिहारी ह्यांनी चांद्रमोहीम हाती घेण्याचे जाहीर करत 2008 पर्यंत चंद्रावर अवकाश यान उतरवणार असल्याचेही घोषित करुन टाकले. आणि इथेच आशियातील अवकाश स्पर्धेला सुरुवात झाली.  चीननेही 2007 ला चंद्रावर अवकाश यान पाठवण्याचे जाहीर  करत कामाला सुरुवात केली.

1990 ला चंद्राभोवती आणि 2004 ला मंगळाभोवती उपग्रह धाडणारा जपान तोपर्यंत काहीसा स्वस्थ बसला होता. भारत-चीनबरोबर तोही शर्यतीत उतरला.  योगायोग म्हणा किंवा एकमेकांचा अंदाज घेतल्यावर म्हणा 2005 पर्यंत तिन्ही देशांनी अवकाशातील पुढील 25 वर्षांचे उद्दीष्ट जाहीर  करुन टाकले.

                                       भारत       चीन         जपान

चंद्रावर धावती                2013         2013        2013
गाडी-बग्गी /  रोबो
चंद्रावर मानव                 2030        2030         2030
अवकाशात मानव           2015        2003         2020
स्पेस शटल                  2011-11      2015 ?     1996 ( अर्धवट )नवीन उद्दीष्ट लवकरच
( अवकाश यान )
मंगळ मोहिम              2013-15       2011       1998 ( अर्धवट ) नवीन उद्दीष्ट लवकरच
सूर्य मोहीम                     2012        2015 ?     1976 ( अर्धवट ) नवीन उद्दीष्ट जाहिर                                                                                                     नाही


एवढंच नाही तर नेहमी अमेरिकेला खुपत असलेला इराणही स्पर्धेत उतरला आहे.   2 फेब्रुवारीला 2009 ला पहिला उपग्रह स्वबळावर पाठवणा-या  इराणनेही 2021 पर्यंत अवकाशात समानव मोहीम  आखणार असल्याचे जाहीर केले आहे.  एवढंच नव्हे भारत-चीनची प्रगती लक्षात घेऊन स्फुर्ती घेत ( खरं तर आपण मागे पडू नये या विचाराने )  इंडोनेशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, थायलंड या देशांनी आपणंही स्वतःचे उपग्रह पाठवणार असल्याचं जाहीर करत कामाला सुरुवात केली आहे.


स्पर्धेने काय होणार....?....

पुन्हा एकदा चांद्र विजय
1969-71 दरम्यान यशस्वी  चांद्र मोहिमेनंतर मंगळावर 2000 पर्यंत मानव उतरवणार असं अमेरिकेने जाहीर केले.  मंगळ तर नाहीच पण चंद्राकडे  अमेरिकबरोबर रशियाचेही दुर्लक्ष झाले. 1971 पर्यंत 100 पेक्षा जास्त मोहिमा झाल्या असतांना 1975 ते अगदी 2004 पर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या थोड्या मोहिमा पार पडल्या.  मात्र 2004 नंतर आशियातील चांद्रमोहिमांची घोषणा लक्षात घेतल्यावर अमेरिकेच्या मोहिमांनी जोर धरला आहे.  धाकटे जॉर्ज बुश आणि ओबामा ह्यांनी सत्तेत असतांना चांद्र वसाहतीसाच्या संशोधनासाठी विशेष निधीही मंजूर करुन घेतलाच पण त्याचा पाठपुरवठाही सुरु केलाय. त्यामुळे 2025 पर्यंत अमेरिकेची चांद्रवसाहत स्थापन झाली तर आश्चर्य वाटायला नको. या सर्वांमागे चंद्रावर असलेल्या खनिज संपत्तीकडेही अनेकांचा डोळा आहे हे विसरू  नये.


उपग्रह पाठवा आता स्वस्तात 

1990 पर्यंत स्वतःचा देशाचा उपग्रह असावा यासाठी आर्थिक स्थिती चांगला असलेला देश प्रयत्न करत होता. स्वतःचे उपग्रह स्वतः बांधत होता. पण उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी दोनच पर्याय होत  अमेरिका आणि रशिया. त्यात युरोपीयन स्पेस एजन्सीसुद्धा महागडी ठरत होती.

1990 नंतर मात्र जगात भारत हा एक सर्वात स्वस्त पर्याय म्हणुन पुढे आला. चीननंही आपला पोलादी पडदा काही प्रमाणात बाजूला करत या स्पर्धेत उतरला.  त्यामुळे जगातील गरीब देशसुद्धा स्वतःचे उपग्रह पाठवण्यासाठी भारत-चीन आणि जपानचीही मदत घेत आहेत. त्यामुळे हे तीन देश जेव्हा एखादं प्रक्षेपण करत असतात तेव्हा ते एका वेळी तीन पेक्षा जास्त ( दोनपेक्षा जास्त इतर देशांचे उपग्रह ) सोडत असतात. म्हणुनच भारतानं 2008 मध्ये एकाच वेळी 10 उपग्रह सोडत विश्वविक्रम केला होता.



अवकाश - उपग्रह तंत्रज्ञान सहज उपलब्ध होणार

शीतयुद्ध ओसरल्यानंतरही रशिया काय अमेरिका
काय अगदी बलाढ्य अशी युरोपियन स्पेस एजन्सी  उपग्रहाचं तंत्रज्ञान सहजासहजी कोणाला देत नव्हती. असे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रसंगी दुस-या देशाला काहीतरी तडजोड करणं भाग पडत असे.  मात्र आता भारत-चीन-जपानसारखे सशक्त पर्याय समोर आल्याने अनेक देश स्वबळावर तंत्रज्ञान विकसित करत आहेत. त्यामुळे अगदीच नवीन असलेल्या देशांना या त्रिकुटासह इतर देशांची सहज मदत होणार आहे.


नवीन अवकाश स्थानकांची निर्मिती  

सध्या International Space Station  बांधण्याचा कार्यक्रम जोरात सुरु असुन जमिनीपासून 200 किलोमीटर उंचीवर ते वेगाने भ्रमण करत आहे. यासाठी अमेरिका, रशिया, युरोपियन देशांसह जगातील 15 देश सहभागी झाले आहेत. असं काम अत्यंत महागडं असल्यानेच एवढे देश एकत्र आले आहेत.
 मात्र आशियातील अनेक देश अवकाश स्पर्धेत उतरले असल्याने अवकाश स्थानकांच्या निर्मितीचे आवाहन प्रत्येक देश स्वतंत्रपणे झेलु शकतील अशी शक्यता निर्माण लवकरच होईल. कारण स्पर्धेमुळे स्वतंत्र विचारांना, कार्यक्रमांना खरा वेग येणार आहे.

समारोप

शीतयुद्धातील अवकाश युद्ध हे एकमेकावर कुरघोडी कऱण्यासाठी होती.  ती स्पर्धा खरोखर जीवघेणी होतीच, पण त्यासाठी दोन्ही देशांनी प्रचंड पैसा पणाला लावला होता. त्यामुळे तंत्रज्ञान तर विकसित झाले, पण  ही स्पर्धा योग्य नसल्याचे दोघांच्या लवकरच लक्षात आले.

आशियातील स्पर्धा मात्र निकोप आहे. इथे कोणी कोणाविरुद्ध लढत नाहीये, कोणाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये.  त्यामुळे अवकाश तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होईल आणि सोपे होईल. सर्व सुरळित झाले तर 30 वर्षात भारत-चीन-जपान या त्रिकुटाच्या चांद्र वा-या सुरु होतील अशी भविष्यवाणी केली तर ती नक्की खोटी ठरणार नाही, एवढे नक्की.

Monday, March 8, 2010

तापोळा - महाराष्ट्राचे दल लेक

शिवसागर जलाशयाचे बॅकवॉटर
तापोळ्याला मिनी महाबळेश्वर म्हणतात,  माझ्या मते ते श्रीनगरच्या दल लेक च्या तोडीस तोड,  डोळ्याचे पारणे फिटवणारे आहे.  तापोळा  कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या शेवटच्या टोकावर वसलेले आहे.  एखाद्या महासागराएवढी व्याप्ती, निळं पाणी, प्रदुषण मुक्त वातावरण आणि काहीशी दमट तरीही आल्हाददायक हवा असे तापोळा परिसराचं वर्णन करता येईल.

तापोळ्याला जाणार रस्ता.....
महाबळेश्वरच्या बाजारपेठेतून पलिकडे जाणारा रस्ता पकडायचा. दिशादर्शक बोर्ड वगैरे बघण्याच्या भानगडीत पडायचे नाही कारण दुकाने आणि माणसांच्या गर्दीत तो दिसत नाही, सापडत नाही. महाबळेश्वरपासून 27 किलोमीटरवर तापोळा हे पर्यंटन ठिकाण आहे.  स्वतःची गाडी, त्यात बाईक असेल तर उत्तम, नाहीतर एस.टी. महामंडळाची सेवा आहेच,  कुठल्याही वाहनाने निघायचे.  गजबजलेले महाबळेश्वर मागे सोडले की दाट झाडीतून जाणा-या रस्ताने किलोमीटरचा दगड बघत जात पूढे जात रहायचे.
  
  
गर्द झाडीमुळे महाबळेश्वरच्या उंचीपासून खाली उतरत  असतांनाही थंडी वाजत रहाते. साधारण  सात किलोमीटरनंतर गर्द झाडी संपते आणि खोल    द-या-डोंगर ह्यांचे दर्शन होते. तिथं एक चहाची टपरी आहे. थंड  वातावरणात चहा पिण्यासाठी थांबायचे, हे मात्र निमित्त.  कारण तिथून दिसणा-या हिरव्या रंगाच्या छटा बघण्याची संधी सोडायची नाही.   फक्त महाबळेश्वरच नाही तर आजुबाजुचा परिसर कसा हिरवागार आहे याचा प्रत्यय इथे येतो. मनोसोक्त फोटो काढायचे आणि पुढे निघायचे.  एव्हाना गुळगुळीत असलेला रस्त्याची तब्येत बिघडलेली असते.  खाचखळग्यांमधुन कसरत करत, मध्येच स्ट्रॉबेरीची शेतं बघत पुढे जात असतांना कोयनेचे बॅकवॉटर -शिवसागर जलाशय दिसायला लागतो.  शिवसागर जलाशयाच्या सुंदर दृश्यामुळे पुन्हा एकदा गाडी थांबवत  फोटो काढण्याचा मोह टाळता येत नाही. वाटेत लागणारी छोटी गावे पार करत तापोळ्यात कधी पोहचतो ते कळतंही नाही.



अथांग जलाशयाच्या काठावरचे तापोळा


 1956 ला कोयना धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1962 ला धरणात पाणी भरायला लागले. त्यामुळे कोयना नदीच्या काठावरची अनेक गावे विस्थापित झाली. त्यातील अनेक गावांपैकी एक तापोळा गाव.  आत्ताच्या जलाशयाच्या खाली असलेली गावे पाण्याचा फुगवठा बघुन काठावर वसवण्यात आली.  महाबळेश्वरपासून इथे येण्यासाठी रस्ता ( काही वर्षापूर्वी डांबरी रस्ता करण्यात आला ) , तसंच  जलाशयाच्या काठावरचे गाव म्हणुन गेल्या 15 वर्षात तापोळा गाव पर्यटनासाठी विकसित व्हायला सुरुवात झाली.  इन-मीन पाच-पन्नास घरांचे हे गांव पर्यंटनाचा वाढता लोंढा झेलण्यासाठी सज्ज होत आहे.


अफाट जलाशय आणि पर्यंटन स्थळे

तापोळ्यात दोन बोट क्लब आहेत. दोन्ही क्लबकडे सारख्याच सुविधा असुन दरही सारखेच आहेत. कुठल्याही एका बोट क्लबकडे जायचे आणि जलाशयाच्या तीरावरचे पर्यंटन स्थळ ठरवून, आपल्या ग्रुपमधील सदस्य संख्या लक्षात घेत  आणि मुख्य म्हणजे  टूरचे दर बघत प्रवास निश्चित करायचा.  मोटर बोट  ( 12 जण प्रवास करु शकतात - वेग चांगला ),  स्पीड बोट (  चार प्रवासी - वेग अधिक ),  स्कुटर बोट( एक प्रवासी- वेग सर्वात जास्त ) .
  
शिवसागर दर्शन - कुठलीही बोट घेतली तरी ह्याची फेरी 45 मिनीटांत संपते. साधारण सहा किलोमीटरच्या फेरीमध्ये  तापोळ्यासह  काठाने जाता जाता जलाशयाच्या मध्यभागी नेत अथांग जलाशयाचे दर्शन घडवले जाते.


त्रिवेणी संगम   -  साधारण 12 किलोमीटरच्या फेरीसाठी दीड तास लागतो. कोयना, कंडकी, चोळशी अशा तीन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी जाऊन ही टूर संपते. संगमाच्या ठिकाणी नेल्यावर बोट थांबवल्यावर बोट चालक जे सांगतो त्यामुळे काही काळ धडकी भरते. संगमाच्या ठिकाणी काय किंवा जलाशयाच्या दोन्ही काठाच्या मधे पाण्याची खोली 400 ते 450 फुट असल्याचे बोट चालक सांगतो आणि या अफाट जलाशयाचे खरं रुप कळते.

दत्त मंदिर -  20 किलोमीटरची ही सफर अडीच तासांत संपते.  या ठिकाणी जातांना त्रिवेणी संगम पार करत काठावरच्या विनायक नगर नावाच्या एका गावाच्या ठिकाणी आपण पोहचतो.  या ठिकाणी कोण्या एका भक्ताने छोटेखानी दत्त मंदिराची स्थापना केलीये. भक्तांसाठी मठंही उभारला असल्याने  दत्त भक्तांची इथे गर्दी असते. मात्र हे मंदिर प्रत्यक्षात जलाशयाच्या काठापासून थोडे आत आहे.  या स्पॉटवर उतरल्यावर आधी दिसते ते शिवमंदिर.  थोडसे भूयारात असलेल्या मंदिराची वेगळीच अनोखी रचना आहे.  पोटपुजेसाठी वडापावची टपरीही आहे. शांत परिसर आणि अफाट जलाशयाचं दृश्य बघतांना  वेळ कसा जातो ते कळत नाही. सातारा- कास पठार- बामणोली ते विनायक नगर असा रस्ता आहे.  त्यामुळे इथुन साताराही गाठता येते.  विनायक नगर गावापासून धरणाच्या भिंतीपर्यंत कच्चा रस्ता जातो.  कोयना धरणाच्या निरिक्षणासाठी हा बांधण्यात आला आहे.  या मार्गावरही काही गावे आहेत. पावसाळ्यात कोयना धरणाच्या परिसरातील गावांचा संपर्क तुटतो तो याच गावांचा.    

वासोटा किल्ला -  जलाशय आणि कोकणातील खेड ह्यांच्या बरोबरमध्ये सह्याद्रीच्या डोंगरावर जंगलात लपलेल्या वासोटा किल्ल्याची सफर चार तासांत पूर्ण होते. साधारण तापोळ्यापासून 30 किलोमीटरवर असलेल्या काठावरुन वासोट्याकडे मार्ग जातो. खरं तर  दुरुन फक्त दर्शन घडवलं जातं. वासोटा किल्ला पालथा घालायला दोन दिवस तरी हवेत.  

कोयना अभयारण्य -  40  किलोमीटर वर असलेल्या कोयना अभयारण्याची सफर पाच तासांत पूर्ण होते. त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, वासोटा स्पॉट पार करत उजवीकडे असलेल्या सह्याद्रीच्या जंगलातील ही सफर म्हणजे एक अनोखा अनुभव आहे. हाच परिसर आता राज्यातील चौथा व्याघ्र प्रकल्प सह्याद्री व्याघ्य्र प्रकल्प या नावाने जाहिर झाला आहे.

कोयना धरण  -  तापोळ्यापासून कोयना धरणाची भिंत तब्बल 85 किलोमीटर आहे.   एवढ्या लांब पल्ल्यासाठी मोटर बोटंच योग्य. तिथे जाऊन परत येण्यासाठी तब्बल 10 तास लागतात.  अर्थात या फेरीचा  दर पाच  हजार रुपयांच्या घरात आहे.  तेव्हा  ग्रुप असेल आणि मुख्य म्हणजे वेळ असेल तर ही सफर करता येईल.  मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर खबरदारी म्हणुन धरणाच्या भिंतीजवळ जायला परवानगी नाही. तेव्हा भिंत जवळ आल्यावर जलाशयाच्या डावीकडच्या काठाने भिंतीपासून  फक्त काही किलोमीटर अंतरावर  थांबत  सफर पूर्ण केली जाते.  


कास पठार - तापोळ्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर जलाशयाच्या डावीकडे असलेला डोंगर म्हणजे महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर - प्रसिद्ध कास पठार. त्याच्या पायथ्याशी आणि जलाशयाच्या काठावर बामणोली गावातून त्या ठिकाणी जाता येईल. पण तिथे जाण्याचे दिवस  म्हणजे गौरी-गणपती आणि ऑक्टोबर हिट सुरु होण्याचा मधला काळ . कारण याच दिवसांत या पठारावर अप्रतिम असा फुलोरा फुलतो.  तसंच साता-याहून कास पठार पार करत बामणोलीमधून  लाँच करत वासोटा किल्ल्याकडे गिर्यारोहक जातात. 

मात्र यापैकी काहीही न बघणारेही महाभाग असतात. ते फक्त वेगवान स्कुटर बोटने जलाशयामध्ये मनोसोक्त चक्कर मारत बसतात. पोटातील कावळ्यांना शांत करण्यासाठीही इथे चांगली सोय असल्यानं फिरुन दमल्यावर मनोसोक्त जेवणाचा आनंद मिळतो. 


शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरावर अनेक गावं वसलेली आहेत. गावक-यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे प्रवासी बोट. या गावांतील लोकांसाठी ही सेवा नाममात्र  शुल्कामध्ये उपलब्ध आहे.  मात्र पर्यटकांकडुन चांगले पैसे वसुल केले जातात. विशेष म्हणजे पर्यटकांसाठीच्या बोटी आणि तिथल्या व्यवसायात  स्थानिक लोकांनीच पैसे गुंतवले आहेत. म्हणजे परक्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न स्थानिक लोकांनीच निकाली लावला आहे.  तापोळ्याचा सिझन म्हणजे उन्हाळा कारण खो-याने इथं पर्यंटक येतात आणि स्थानिकांचा चांगला व्यवसाय होतो. तरीही पावसाळा वगळता इतर महिन्यात शनिवार-रविवारी, सुटीच्या दिवशी चांगली गर्दी असते. इथे येण्याचा सर्वात उत्तम काळ म्हणजे जानेवारी-फेब्रुवारी.  असं दल लेकपेक्षा उत्कृष्ठ पर्यंटन स्थळ असलेले तापोळा मनात कायमची आठण करुन रहाते.

Monday, March 1, 2010

संरक्षण दलाच्या अर्थसंकल्पाचा लेखाजोखा

बोफोर्स

केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जीनी मुखर्जी यांनी सादर केलेल्या अर्थसंकंल्पामध्ये इंधनांच्या दरात भाववाढ झाल्यानं संपूर्ण अर्थसंकल्पाचा फोकस बदलला, कधी नव्हे ते विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकला.  मात्र, भारतासारख्या लोकशाही देशात अर्थसंकल्प हा कधीच सर्वांचे समाधान करणारा नसणार हे आधी लक्षात ठेवले पाहिजे. त्यात आर्थिक मंदीच्या तडाख्यातून आरामात तरुन निघालेल्या भारताला विकासदराची घोडेदौड कायम ठेवण्यासाठी  ( आपली स्पर्धा चीनशी आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे )  अर्थसंकल्पाची मांडणी करण्यात आली आहे.   मात्र  यामध्ये जमेची गोष्ट म्हणजे संरक्षण दलाला राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ( GDP ) 2.5 टक्के एवढा वाटा देण्यात आला आहे. 


अर्थसंकल्पात संरक्षण दलाचा वाटा....

गेल्या 10 वर्षात संरक्षण दालाचा वाटा सातत्यानं घटत असल्याचं चित्र होते.  गेल्या वर्षी तर एकूण  उत्पन्नाच्या 1.9 टक्के, असा गेल्या 30 वर्षांतील सर्वात कमी वाटा संरक्षण दलाच्या पदरात टाकण्यात आला होता. गेल्या वर्षी संरक्षण दलासाठी  १ लाख ४१  हजार ७०३  कोटी रुपये अर्थसंकल्पात मांडण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अर्थसंकल्पाच्या चर्चेनंतर हा आकडा आणखी खाली घसरत  1 लाख 36 हजार 264 कोटी रुपये एवढाच मंजूर झाला. 

मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण दलाचा वाटा वाढवून २.५ टक्के एवढा घसघशीत ( ? ) करण्यात आला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत  ११ हजार ०८० कोटी रुपये जास्त देण्यात येणार आहेत.  एकुण १ लाख ४७ हजार ३४४ कोटी रुपये ( १४, ७३, ४४, ००, ००, ०००,  रुपये )  ( 32 बिलियन डॉलर्स ) संरक्षण दलाला देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय.  प्रत्यक्ष अर्थसंकल्प चर्चेच्या वेळी हा आकडा कायम राहिला,  कमी होणार नाही एवढी आशा धरूया

नवीन शस्त्र सामुग्री खरेदीसाठी तब्बल 60 हजार कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आलीये.  गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी ५ हजार १७६  कोटी रुपये जास्त देण्यात आलेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी तब्बल ७ हजार कोटी रुपये संरक्षण दलाने खर्च न करता परत केले.  ( बाबुगिरीचा अडथळा,  लालफितीचा कारभार यामुळे काही संरक्षण विषयक करार पूर्णत्वास गेले नाहीत. )


संरक्षण दलाच्या अर्थसंकल्पात, १२ लाखांपेक्षा जास्त खडे सैन्य असलेल्या लष्करासाठी ५७ हजार ३२६  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. गेल्या वर्षाच्या तुलनेत १ हजार ३२२ कोटी रुपये कमी देण्यात आलेत.

नौदलासाठी 9 हजार ३२९ कोटी रुपये देण्यात आले असेल,  तरी गेल्या वर्षाच्या खर्चाच्या तुलनेत फक्त १७ कोटी रुपये जास्त देण्यात आलेत.

वायू दलासाठी १५ हजार २१०  कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. गेल्या वर्षाच्या वायू दलाचा एकूण खर्च बघता फक्त  ५२९  कोटी रुपये जादा देण्यात आलेत.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) साठी ८८१ कोटी रुपये जास्त म्हणजे  ५ हजार २६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये.
संरक्षण दलाच्या अर्थसंकल्पात अनियमितता
तहान लागल्यावर विहीर खोदण्याची' म्हण संरक्षण दलाला ( नव्हे भारतीय राजकारणाला ) पूरेपूर लागु पडते. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे १९६२ ची भारत-चीन लढाई.  स्वातंत्र्यानंतर उदारमतवादी धोरणामध्ये पंतप्रधान पंडित

जवाहरलाल नेहरू पूर्णपणे बुडून गेले होते. हिंदी-चीनी  भाई-भाई   अशा घोषणेमुळे भारताला फार सैन्य ठेवणण्याची गरज नाही या मतापर्यंत ते गेले होते. मात्र चीनने तीबेट गिळंकृत करत भारतावर आक्रमण केले आणि नेहरु तोंडघशी पडले. यानंतर खडबडून जागे झालेल्या भारतानं अलिप्तवादी धोरण फारसे न कुरवाळता सोव्हिएत रशियाशी हातमिळवणी केली. संरक्षण दलासाठी मोठी आर्थिक तरतूद करत रशियाकडून  विविध शस्त्रास्त्रे (विमाने, तोफा, पाणबुड्या, युद्धनौका) विकत घेण्याचा सपाटा लावला. यामुळे १९६५,, १९७१, च्या पाकिस्तानविरुधच्या  युद्धात आपण सहज विजय मिळवला.

त्यानंतर मात्र पुन्हा एकदा संरक्षण दलातील तर्तुदिने मान टाकली. १९९० च्या दशकांत म्हणजे १९८७-९७ च्या काळात एकही युद्धनौका ( अपवाद पाणबुडीचा )  दाखल झाली नाही. बोफोर्सच्या घोटाळ्यानंतर ( १९८६ ) लष्करात मोठा संरक्षण विषय करार झाला नाही. नवा करार व्हायला १९९६  साल उजाडलं.  ( रशियाशी T-90 टँक घेण्याचा करार ).

मात्र राजकारण्यांना खडबडुन जाग आली ती थेट कारगिल युद्धाच्या वेळी. पाक सैन्य आणि अतिरेक्यांनी द्रास, कारगील भागांत घुसखोरी केली आणि गुप्तचर खात्याचे पितळ उघडे पडले. त्यानंतर मग पुन्हा एकदा नवनवीन उपकरण खरेदी कऱण्याचे करार सुरू  झाले, म्हणून गेल्या १२ वर्षांत आपण कित्येक हजार कोटी रुपयांची उपकरणे खरेदी केलीत आणि खरेदी करण्याच्या मार्गावर आहोत, विकसित केली आहेत.. उदा....सुखोई विमाने, विमानवाहू युद्धनौका गोर्शकोव्ह, टेहळणी विमाने ( UAV )  , स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेची बांधणी, स्कॉर्पियन पाणबुड्यांची बांधणी, ब्राम्होस, शौर्य, अग्नी-3, आकाश, क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र ह्यांची निर्मिती आणि मुख्य म्हणजे अणु-पाणबुडीची बांधणी. एवढे मोठे शस्त्र भांडार आपण घेतले आहे, घेत आहोत.

मात्र एवढे सर्व व्यवहार होतांना संरक्षण दलाचा वाटा राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५  टक्क्यांच्यापूढे गेला नाही, नेमकी हीच भारतासाठी चिंतेची बाब आहे.


जगात संरक्षण दलावर खर्च 

२०२० पर्यंत जगात एक आर्थिक महासत्ता म्हणून
 भारत दमदार पावले टाकत असला तरी संरक्षण विषयक खर्चामध्ये भारत तब्बल दहाव्या स्थानावर आहे. 'बळी  तो कान पिळी' या युक्तिप्रमाणे प्रबळ लष्करी ताकद असलेला देश संधी मिळेल तेव्हा दुस-यांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा भारताची तुलना इतर देशांच्या खर्चाशी करुया.

देश                             संरक्षण खर्च                          एकुण (GDP) मधे
                             ( बिलियन डॉलर्स)                          टक्केवारी  

अमेरिका                    607.0                                             4.06
चीन                             84.9                                             1.7
फ्रान्स                          65.7                                             2.6
इंग्लंड                         65.3                                              2.4
रशिया                         58.6                                             3.9
जर्मनी                         46.8                                             1.5
जपान                          46.3                                             0.8
इटली                           40.6                                            1.8
सौदी अरेबिया             38.2                                         10.00
भारत                          32.0                                              2.5
पाकिस्तान                   7.8                                               3

प्रत्येक देशाचा संरक्षण खर्च लक्षात घेतला तर इंग्लड,  फ्रान्ससारखे महाराष्ट्राहून छोटे असलेले देश भारतापेक्षा दुप्पट खर्च संरक्षणावर खर्च करतात. तर अमेरिका भारताच्या २०० पट खर्च करते. चीन कधीच त्याची खरी आकडेवारी जहीर करत नसल्याचे संरक्षण तज्ञांचे म्हणणे आहे. तेव्हा भारताच्या दुपटीहून जास्त खर्च करणा-या चीनची खरी आकडेवारी किती मोठी असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो.


भारताची शस्त्रांची वाढती गरज 

अग्नी-3

तिन्ही दलांच्या आधुनिकतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक दलासाठी येत्या १० वर्षांत कुठली मोठी खरेदी, करार, निर्मिती अपेक्षित आहे ते पाहूया.

लष्कर -        आधुनिक T-90 टँक, अग्नी-3, अग्नी-5 क्षेपणास्त्रे, हलकी हेलिकॉप्टर, लढाऊ हलिकॉप्टर,
                     UAV
नौदल -       अणु पाणबुड्या, स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका, स्टेल्थ विनाशिका-फ्रिगेट,
                    डिझेलवर  चालणा-या पाणबुड्या, पाणबुडीविरोधी- टेहळणी विमाने, UAV, हलकी हेलिकॉप्टर
वायु दल - १२६ लढाऊ विमाने, २० टन वजन वाहून नेणारी मालवाहू विमाने, जड मालवाहू विमाने
                    हलकी हेलिकॉप्टर, जड हेलिकॉप्टर, लांब पल्ल्याची बॉम्बर विमाने, विमान विरोधी
                    क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र विरोधी क्षपणास्त्रे

एवढंच नव्हे तर भारत अमेरिकेसारखी जीपीएस व्यवस्था स्वबळावर विकसित करु पाहत आहे.  त्यासाठी २०११ पासून ११ भूस्थिर उपग्रह सोडणार आहे. लेझर शस्त्रप्रणालीवरही संशोधन जोरात सुरू आहे. अमेरिका, रशिया, चीनसारखी उपग्रहविरोधी क्षेपणास्त्र बनवण्याचे प्रयत्नही जोरात  सुरू आहेत.  

या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या भारत प्रबळ लष्करी सामर्थ्य असलेल्या देशांच्या बराच मागे असून फार मोठी झेप भारतीय लोकशाही व्यवस्था सांभाळतांना घ्यायची आहे. म्हणुनच १० टक्के विकास दराचे उद्दीष्ट्य समोर ठेवलेल्या भारताने संरक्षण दलातील आर्थिक तर्तुकडेही  विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...