Sunday, January 3, 2010

महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैलांचा बाजार - मुरबाडची म्हसेची जत्रा


 घरातील उपयोगी वस्तूंपर्यंत मग ते सुईपासून ते कपाटापर्यंत सर्व, शेतीच्या अवजारापासून ते  अगदी बैलापर्यंत  सर्वकाही मिळण्याचं ठिकाण म्हणजे जत्रा.  या माणसांच्या कोंडाळ्याला घाटावर जत्रा म्हणतात तर कोकणात हा उत्सव म्हणुन ओळखला जातो. अर्थात या जत्रेची किंवा उत्सवाची मुख्य ओळख,  केव्हाच मागे पडलीय. राज्यातील अनेक  जत्रा-उत्सवाला खरं तर 200 पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे.  पिढीगत जत्रा-उत्सवांमध्ये नवीन भर पडत चालली आहे विस्तारत चालले आहेत. कुठल्यातरी देवाच्या नावाच्या निमित्तानं सुरु झालेल्या या जत्रा-उत्सवाला आता मोठ्या बाजाराचं स्वरुप आलंय. जत्रा-उत्सवाला गेलेल्या व्यक्तिला बाजारातील खरेदी-विक्रीत जास्त रस असतो मात्र  जत्रा-उत्सवाचं मुळ विस्मृतीत चाललं आहे.


म्हसेची जत्रा

मुरबाडजवळ म्हसेची जत्रा  किंवा म्हसे गावांमध्ये भरणारी जत्रा मात्र आपलं मुख्य ओळख आजही टिकून आहे. म्हसे गावच्या जत्रेची ओळख आहे ती इथं भरणारा महाराष्ट्रातील सर्वोत मोठा बैलांचा बाजार म्हणुन. आजही ही ओळख म्हसेची जत्रा टिकवून आहे. पौष महिन्यात पौर्णिमेला (  यावेळी 31 डिसेंबर 2009 )  सुरु झालेली ही जत्रा सुमारे तीन-चार दिवस चालते.  दहा हजारांपेक्षा जास्त बैलांची खेरदी विक्री होतेच पण त्याबरोबर म्हसे गावाचं ग्रामदैवत आणि अठरापगड जातींचा देव असलेला म्हसोबाच्या दर्शनासाठी लोक दुरुन येतात.  तीन-चार दिवसांत ठाणे-कल्याण-कर्जत-नाशिकपासून ते अगदी डहाणू एवढ्या दूरून येऊन लोकं हजेरी लावतात. हा आकडा दहा लाखांपेक्षा जास्त आहे. ( गाववाल्यांनी सांगितलेला हा आकडा ).

राज्यातील सर्वात्कृष्ठ बैलांचा बाजार



पावसाळ्याच्या ( आषाढ महिना ) सहा महिने आधी हा बाजार भरत असल्यानं शेतकरी बैलांच्या खरेदीसाठी इथं येतात. यामुळं सहा महिन्यात बैलांना त्यांच्या नवीन घरात माणसावळलं जातं आणि शेतीच्या कामासाठी तयार केलं जातं.  साधारण तीन प्रकारच्या बैलांच्या जाती इथं विकल्या जातात. लांब-उभे  कान, उंच धिप्पाड,  मोठं वशिंड ( खांदा ) ( पाठीवरचा उंचवटा ) असं वैशिष्ट्य असलेल्या  खिल्लार जातीच्या बैलांना मोठी मागणी आहे.  शेतीच्या कामासाठी ही जात उत्कृष्ठ समजली जाते. त्यामुळं बैलांच्या बाजारात मुख्य खरेदी-विक्री होते ती खिल्लार जातीचीच. गेल्या वर्षी इथं एका जोडीला एक लाख 20 हजार असा आत्तापर्यंतचा सर्वोत्तम भाव मिळाला होता.  तर खिल्लार जातीची सर्वसाधारण बैलाची जोडी ही 35 ते 40 हजारांच्या घरात विकली जाते. बैल साधारण पाच वर्षाचा झाल्यावर त्याला इथं विकायला आणतात कारण तोपर्यंत त्यानं तारूण्यात प्रवेश केला असतो.( त्यापेक्षा शेतीच्या कामाच्या योग्यतेचा झालेला असतो ). चांगली जमीन किंवा मोठं शेत असलेले  ( चांगली आर्थिक परिस्थीती असलेले ) शेतकरी  या बैलांची खरेदी करतात.



 गावठी बैल हा दुसरा प्रकार. शेतीच्या नाही तर इतर कामासाठी म्हणजे बैलगाडी किंवा इतर सामान वहाण्यासाठी या बैलाची जात उत्कृष्ठ समजली जाते. उंचीने बुटके, साधरण गावंढळ चेहरा ( म्हणजे रुबाबदारपणा कमी ), पाठीवरचं वशिंड आपलं अस्तित्व दाखवण्यापुरते उंच,  एकुणंच रुपडं काटक असं गावठी बैलाचं वर्णन करता येईल.  साधारण 15 ते 20 हजारांच्या घरात या बैलांची किंमत असते. कोकणात बैलांचा वापर शेती कमी पण बैलगाडी किंवा  इतर कामांसाठी जास्त होतो.  त्यामुळं कोकणातले शेतकरी हा बैल घेणं पसंद करतात. अर्थात बेताची परिस्थीतीही यासाठी कारणीभूत आहे.

तिसरी जात म्हणजे जर्सी.  याचं वर्णन करणं काही मला जमत नाहीये कारण हा बैल कसा ओळखावा हेच माझ्या डोक्यात शिरलं नाही. जत्रेत जर्सी जातीचा बैल कुठला असं विचारला असता अनेक बैलामधल्या एका बैलाकडे मालक बोट दाखवायचा. मालक सांगतो ( आणि मला काहीच कळत नाही ) म्हणुन तो जर्सी बैल हे मान्य करत मीही मान डोलवायचो.
  

विकणारा काही बैलांची पैदास वगैरे करण्याच्या
भानगडीत कधीच पडत नाही. तर तो इकडून- तिकडून बैलांची खरेदी करून 40-50 बैलांच्या ताफ्यासह जत्रेत चार दिवस ठाण मांडून बसतो.  त्याचा सर्व माल मात्र नक्की खपला जातो, एवढी उलाढाल होत रहाते. विकणा-या सर्व बैल विकल्यानं समाधानी तर चांगला बैल गावल्यानं शेतकरी समाधानी अशामध्ये जत्रा संपुन जाते.  बैलाबरोबर काही प्रमाणात रेडकू आणि म्हशींचीही खरेदी केली जाते. अर्थात बैलाच्या खरेदी-विक्रीच्या प्रमाणात याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. मुरबाड-म्हसे मार्गावर म्हसे गावाच्या पुढे एका पडीक जमिनीवर हा बैलांचा बाजार भरतो.  तीन-चार दिवस बैल आणि माणसांच्या वर्दळीनं वातावरण भरलेलं असतं.


म्हसोबा देव


बैलांचा बाजार हा साधारण 200 वर्षापूर्वी सुरु झाला असं स्थानिक सांगतात. मात्र या बैलांच्या बाजाराचं निमित्त ठरलं ते गावात असलेल्या जागृत देवस्थान म्हसोबामुळे. ह्याच्या दोन कहाण्या गाववाल्यांकडून ऐकल्या. सध्या मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी म्हशींचा गोठा होता. त्यात स्वयंभू शंकराची पिंड सापडली. त्यामुळं गावाला आणि देवाला म्हसे हे नाव मिळालं .


तर काहींचं म्हणणं आहे की देवळाच्या जागी आधी तलाव होता आणि तलावात स्वयंभू शंकराची पिंड आणि एक धातूचा खांब मिळाले. शंकराचा अवतार म्हसोबा म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आणि काही फूट अंतरावर खांब विराजमान झाला.  तलावाच्या  ठिकाणी छोटेखानी देऊळ उभारण्यात आले


असुन एक जागृत देवस्थान म्हणून इथं दर्शनासाठी लोकं येतात.  बाजुला असलेल्या खांब आता तांब्याच्या पत्र्यानं मढवण्यात आलाय. म्हसोबानंतर लोकं त्यांचही दर्शन घेतात.  यामुळं या जत्रेला " खांबलिंगेश्वराची जत्रा " असंही नाव आहे. मात्र  या खांबाचं प्रयोजन किंवा त्याच्याबद्दल ठोस माहिती मात्र काही मिळू शकली नाही.



खरेदीसाठी जत्रेला गर्दी        



बैलांचा बाजार म्हणून म्हसेच्या जत्रेची ओळख अजुनही कायम असली तरी आता गर्दी होते इतर गृहपयोगी खरेदीसाठी. बैलाबरोबर शेतीच्या अवजारातील सर्व वस्तू इथं मिळतात. सर्व प्रकारची धातूंची भांडी, प्लॅस्टिकची बहूविध वस्तू, तिखट मीठपासून कांदे-बटाटेंपर्यंत सर्व काही मिळते.  म्हसे गावापासून सुरु झालेल्या जत्रेमध्ये  सुरुवातीला वर सांगितलेली सर्व दुकाने लागतात आणि त्यानंतर शेवटी बैलांचा बाजार लागतो.  या जत्रेत सर्व काही मिळत असल्यानं एक दिवसात देव-दर्शन कम खरेदी अशी टूर होऊन जाते. त्यामुळं मुरबाडहून एस.टी.च्या गाड्या


 म्हसे गावात धडकत असतात.  खाजगी गाड्या, दूचाकी  ह्यांची तर एवढी गर्दी असते  ते सांगायची आणि इथं लिहायची सोय नाही. एवढी गर्दी होत असल्यानं खाद्य पदार्थांची तर रेलचेल असते. इथं येणारी जनता गरीब किंवा सर्वसामान्य असल्यानं फार चटकदार नाही पण खिशाल परवडतील असे शाकाहारी-मांसाहारी पदार्थांचे भाव असतात. मुख्य म्हणजे सिनेमापासून ( तंबूतील सिनेमा )  ते मेरी-गो-राऊंड सारखे अनेक करमणुकीची  साधने असतात. पुरुषी गरज भागवण्यासाठी वेश्या व्यवसायही रात्री जोरात असतो.


जायचं कसं....
कल्याणपासून अहमदनगरमार्गावर 33 किलोमीटरवर मुरबाड हे तालुक्याचं ठिकाण आहे.  मुरबाड एसटी स्टॅडच्या जरा पुढे उजवीकडे फाटा फुटतो. तिथून 11 किलोमीटरवर म्हसे गाव आहे. हा रस्ता पुढे पुन्हा नगर मार्गाला मिळतो. मात्र या मार्गावरून गोरखगड,मच्छिंद्रगड, सिद्धगडचा ट्रेक करता येतो तसंच स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा झालेल्या भाई कोतवाल ह्याचं स्मारक बघता येतं. म्हसेगावातून एक रस्ता जातो ते थेट कर्जतला. कर्जतवरुन साधारण 42 किलोमीटर पार करत म्हसे गावात पोहचता येते.       

डावीकडील डावा सुळका मच्छिंद्रगड,बाजूचा गोरखगड, उजवीकडचा डोंगर सिद्धगड किल्ला.

एक सांगायचं,  खरं तर लिहायचं राहून गेलं. संपूर्ण म्हसेच्या जत्रेमध्ये धुळीनं नखशिखान्त आंघोळ होते. जत्रेत शिरल्यापासून तुम्ही धुळीतून समोरचं बघता, धूळीसह श्वास घेता आणि परतात ते  धुळ अंगावर घेऊनच.  अर्थात घरी आल्यावर दुस-या दिवशी तुम्ही आजारी पडला नाहीत तर शहराल्या नासलेल्या, प्रदुषण झालेल्या हवेत तुम्ही सहज तरुन जाणार असं समजा. आणि जर तुम्ही आजारी पडला तर समजा दाल में कुछ काला है.  ते काहीही असो म्हसेची जत्रा मात्र जरुर करा आणि        दुस-याला करायला सांगा.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...