जबाबदारी विसरलेले "कडोंमपा"चे सुसंस्कृत नागरिक
दर वेळी शहरांतील बकालपणा, अस्वच्छता, पायाभूत सोयीसुविधा नसणे, वाहतूक समस्या, यासाठी पालिका क्षेत्रातील राजकीय पक्ष, सत्ताधारी पक्ष आणि ( नेहमीच स्वत: ची कातडी वाचवणारे ) प्रशासन यांनाच जबाबदार धरले जाते. मात्र कडोमपातील सध्याच्या अधोगतीला स्वत: ला सुशिक्षित, सुसंस्कृत , मध्यमवर्गीय ( आता काही प्रमाणात उच्च मध्यमवर्ग ) समजले जाणारे नागरीकच जबाबदार आहेत असे म्हंटले तर चुकीचे होणार नाही. कारण धाक ठेवू शकणारा नागरीकांचा दबाव गट नावाचा प्रकारच सध्या कडोमपामध्ये अस्तित्वात नाहीत. किमान वडीलधा-यांनी डोळे वटारावेत आणि धाकामुळे सत्ताधा-यांनी ऐकावे अशीही आता परिस्थिती नाहीये.
मुंबई-पुणे, नाशिक किंवा काही मोजक्या ठिकाणी त्या भागांमध्ये सत्ताधारी आणि प्रशासन यांना धारेवर धरणारे नागरिकांचे गट - संस्था अस्तित्वात आहेत. अशा ठिकाणी एखादा मुद्दा नागरिकच रेटून थेट अंमलात आणायला लावतात. प्रशासन, सत्ताधारी यांनी काही चुका केल्या तर त्यावर रान उठवत निर्णय बदलायला किंवा निर्णय मागे घ्यायला भाग पाडतात. या सर्वांचा पूर्णपणे अभाव कडोमपामध्ये दिसत आहे.. नव्हे तो आहे.
युवा गट, माहिती अधिकाराचा वापर करणार गट ( ब्लैकमेलिंग वाला नाही ), ThinkTank चा गट, बैंकिंग -उद्योग- शिक्षण यामधील विचारवंत - अभ्यासु लोकं, वरिष्ठ नागरिकांचा गट, महिलांचे विविध गट..... असे गट पाहिजेत जे सत्ताधारी, प्रशासन यांच्या संपर्कात राहून पालिकेच्या भागातील निर्णयांमध्ये आपला सहभाग नोंदवतील, चुका सांगतील, चांगल्या निर्णयांचे खुल्या मनाने स्वागतही करतील. असे लोक, अशा संस्था कडोंमपा जरूर आहेत, पण पालिकेला हलवतील, कामाची दखल घ्यायला भाग पाड़तील अशी त्यांची मजल अजिबात नाही. किंबहुना यापैकी काही लोकं, संस्था या एखाद्या विचारसरणीला चिकटुन आहेत. त्यामुळे सक्षम असा नागरीकांचा मोठा दबाव गट कडोंमपा परिसरात तयारच झाला नाही.
त्यामुळेच सत्ताधारी आणि प्रशासन यांचे फावले आहे. विरोधकांनी आधी बेटकुळ्या दाखवल्या ख-या पण यांमधील हवा ही काही महिन्यांतच निघून गेली. कोणी जाब विचारणारा वडीलधारी नसल्याने, दबाव गट नसल्याने गेल्या पाच वर्षांनंतरही कडोंमपा ही आहे तिथेच राहिली आहे. आता काहीच मुठभर लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यामुळे चांगुलपणा टिकून राहिला आहे.
सध्या सेना-भाजप पुन्हा पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांवर - मुद्द्यांवर निवडणुका लढवत आहे. विरोधक म्हणून साफ अपयशी ठरलेले, कमजोर झालेल्या मनसे- कांग्रेस - राष्ट्रवादी या पक्षांना संधी मिळण्याची शक्यता अजिबात दिसत नाही.
निवडणुकीचा निकाल काहीही लागो पण जोपर्यन्त डोंबिवलीपासून टिटवाळ्यापर्यन्त पसरलेल्या या कडोंमपामध्ये जाब विचारणारी नागरिकांची सक्षम यंत्रणा तयार होत नाही तोपर्यन्त निवडणुकांमध्ये या सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना गृहीतच धरले जाणार. कारण राजकीय पक्षांना पक्के माहीत आहे की लोकं जाणार कुठे, कोणाला मत देणार.....आम्हांलाच मत देणार.
तेव्हा नागरिकांनी उठा, जागे व्हा, संघटित व्हा अशी म्हणायची वेळ आली आहे.
Agdi khare aahe....pan ya sathi pudhakar kon ghenar....
ReplyDeleteAgdi khare aahe.....pan pudhakar kon ghenar...
ReplyDelete