स्वतंत्र भारताच्या इतिहासात असे काही सुवर्णक्षण किंवा घटना आहेत की ज्यामुळे देशामध्ये निर्णायक बदल झाले, जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यामुळे देशातील धोरणात्मक बदल झाले. मग यामध्ये आणिबाणी, दोन अणुचाचण्या, मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सुधारणा अशा काही घटनांचा उल्लेख जरुर करावा लागेल. यामध्ये मंगळयानमोहिमेचे नाव घ्यावे लागेल.
देशाची दळणवळण, संदेशात्मक, हवामान, संरक्षणात्मक बाबतींमधील गरज अवकाश संशोधनाच्या माध्यमातून भागवतांना भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोने वेगळ्या गोष्टिकड़े लक्ष द्यायला सुरुवात केली. ती म्हणजे चांद्रयान आणि मंगळयांसारख्या मोहिमा हाती घेतल्या, एवढेच नाही तर त्यात पहिल्याच प्रयत्नात यशही मिळवले.
24 सप्टेंबरला 2014 ला भारताचे मंगळयान मंगळ ग्रहाभोवती घिरटया घालू लागले. आत्तापर्यन्त एकूण 51 मोहिमा मंगळ ग्रहासाठी विविध राष्ट्रांनी खर्ची केल्या पण यापैकी फक्त 40 टक्के मोहिमा म्हणजे जेमतेम 20 मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. यापैकी पहिल्याच प्रयत्नात अमेरिका नाही, रशिया नाही, यूरोपीयन स्पेस एजेंसुद्धा यशस्वी झाल्या नाहीत. चीन आणि जपानची याने मंगळपर्यन्त पोहचलीच नाहीत. मात्र भारताने ते केले तेही अवघ्या 450 कोटी रुपयांत. हेच करण्यासाठी अमेरिका, रशिया आणि यूरोपियन स्पेस एजेंसीला त्यांच्या मोहिमांकरता 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले होते.
या यशस्वी मंगळयानाच्या मोहिमेने काही गोष्टि साध्य झाल्या आहेत....
इस्रोच्या अवकाश तंत्रज्ञान आणि कौशल्याची जगाने दखल घेतली, वाहवा केली.
इस्रोला परग्रह मोहिमांचा मोलाचा अनुभव मिळाला जो पुढील मोहिमांमध्ये कामाला येणार आहे.
पृथ्वीपासून मंगळ मोहिमेसारख्या अतिदुरच्या मोहिमांसाठी आवश्यक असलेली यंत्रणा तयार झाली.
यशामुळे सरकारचा इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला , प्रोत्साहन मिळाले, आता अधिक निधी सहज मिळू लागला आहे.
सर्वसामान्य जनतेचाही इस्रोकड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
यशामुळे इस्रोला हुरुप मिळाला, आत्मविश्वास वाढला, आता आणखी अशा मोहिमांच्या आखणीला सुरुवात झाली आहे.
मंगळयानाने एक वर्षात बराच माहितीचा खजिना गोळा केला आहे. त्याचा अभ्यास सुरु आहे. थोडक्यात अवकाश संशोधनाची एक वेगळी शाखा यामुळे विकसित होणार आहे , ज्यामध्ये भारत खुपच मागे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवकाश मोहिमा दिवसेंदिवस खार्चिक होत असतांना स्वस्तात आणि यशस्वीरित्या उपग्रह पाठवणारा देश म्हणून भारताची ओळख झाली आहे, तेवढा विश्वास भारताने जगात कमावला आहे. म्हणून फ्रांस , जर्मन, इंग्लण्डसारखे प्रगत देश आणि इंडोनेशिया, ब्राझील, मलेशियासारखे पुढे येणार देश भारताच्या मदतीने उपग्रह पाठवत आहेत.
म्हणूनच जगाच्या पटलावर भारताचे खणखणीत नाणे वाजवणा-या मंगळयान मोहिमेला एक वर्ष झाले आणि याकाळात असे महत्वपुर्ण बदल घडले असल्याने या यशाचे सेलिब्रेशन करायला हवे.
खुपच छान विश्लेषण अमितजी
ReplyDeleteप्रकाश वाळवेकर