Sunday, May 31, 2020

'स्पेस एक्स' च्या हनुमान उडीचे महत्व........


अंतराळ क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी 30 मे शनिवार हा एक ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी अमेरिकेच्या 'स्पेस एक्स' या खाजगी कंपनीने दोन अंतराळवीरांना अवकाशात यशस्विरित्या धाडले.

आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? कारण अंतराळवीरांच्या अवकाश वाऱ्या तर गेली अनेक वर्षे नित्यनियमाने सुरु आहेत की....

मात्र 'स्पेस एक्स' या खाजगी कंपनीच्या समानवी अवकाश उड्डाणाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.  

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अवकाश वारी मग ती कृत्रिम उपग्रहाची असो, दुसऱ्या ग्रहाच्या दिशेने पाठवलेल्या यानाची असो वा मानवाची....अवकाश वारी ही काही सोपी गोष्ट नाही. अत्यंत खार्चिक, तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत क्लिष्ट अशा या मोहिमा असतात. 

खार्चिक या अर्थाने की एक किलो वजानाची गोष्ट जर अवकाशात पाठवायची असेल तर किमान 20 हजार डॉलर्स पेक्षा कितीतरी जास्त एवढा खर्च येतो. तर तंत्रज्ञान अत्यंत अवघड - गुंतागुंतीचे असल्याने प्रशिक्षित मनुष्यबळाची अक्षरशः फौज लागते, मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे या भानगडीत खाजगी कंपनीने पडण्याचा प्रश्न येत नाही.

म्हणूनच आत्तापर्यंत जगात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या काही मोहिमा सुरु आहेत त्या सरकारी आशिर्वादानेच. म्हणजेच बघा ना...अमेरिकेची नासा, भारताची इस्त्रो, रशियाची Roscosmos, जपानची Japan Aerospace Exploration Agency, चीनची China National Space Administration (CNSA), 22 देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेली युरोपियन स्पेस एजन्सी  European Space Agency, कॅनडा स्पेस एजन्सी या प्रमुख अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था....या सर्व संस्था सरकारी मालकीच्या आहेत. म्हणजेच सरकारने निश्चित केलेली सामरिक गरज लक्षात घेऊन या संस्था काम करतात, संस्थेच्या खर्चाचा भार संबधित सरकार उचलते. 

मात्र अमेरिकेत गेल्या काही वर्षात वेगळी पावले उचलली गेली. नासाचा व्याप वाढत असल्याने उपग्रह बनवणे, रॉकेट तयार करणे, अवकाश तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांची निर्मिती करणे अशी कामे खाजगी कंपन्यांवर सोपवायला सुरुवात केली. यामुळेच अमेरिकेत बलाढ्य बोईंग, नॉर्थन ग्रुमॅन, लॉकहिड मार्टिन, स्पेस एक्स, ब्लु ऑरिजिन, वर्जिन गॅलॅक्टिक अशा काही खाजगी कंपन्या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात उभ्या राहू लागल्या. यापैकी काही कंपन्यांनी विविध उपग्रह, याने तयार केली, रॉकेट तयार केले, मात्र समानवी मोहिम कोणी करु शकलं नव्हतं, ते स्पेस एक्सने करुन दाखवलं. 

याचे महत्व काय ?....यासाठी आपल्या देशातील काही उदाहरणे पाहू. 1991 पर्यंत देशात दोनच दूरसंचार कंपन्या होत्या.....बीएसएनएल, एमटीएनएल...सरकारी कंपन्या. या क्षेत्रात खाजगी कंपन्यांना सरकारनेच वाट करुन दिली. या क्षेत्रातील स्पर्धेने सर्वसामान्याला किती फायदा झाला आहे हे मुद्दामून लिहायची गरज नाही. तेच दुचाकी-चारचाकी गाड्यांना लागू पडते. आज विविध कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमुळे दुचाकी-चारचाकी गाड्या या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. चार चाकी गाडी, दुचाकी गाडी या काही आता चैन राहिली नसून गरजेची गोष्ट झाली आहे. पुर्वी सरकारचे दुरदर्शन हेच दृकश्राव्य माध्यम होते, आता चित्र किती आमुलाग्र बदललं आहे हे आपण बघतोच.

असाच बदल भविष्यात स्पेस एक्स च्या 30 मे च्या मोहिमेच्या नांदीमुळे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात होणार आहे.

स्पेस एक्सने ड्रॅगन - 2 या अवकाश कुपीतून डग्लस हुर्लेय, रॉबर्ट बेहकेन हे दोन अंतराळवीर अवकाशात यशस्वीरित्या पोहचवले. ही अवकाश कुपी 31 मे ला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला यशस्वीरित्या जोडली गेली. आता हे दोन अंतराळवीर या अवकाश स्थानकात असलेल्या 3 अवकाश अंतराळवीरांबरोबर 3 महिने रहातील. 3 महिन्यानंतर याच ड्रॅगन -2 मधून हे दोन अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील असे नियोजन आहे. 

समानवी अवकाश मोहिमेत स्पेस एक्सच्या प्रवेशाने या क्षेत्रात आमुलाग्र बदल होणार आहेत. जे जपान, युरोपियन स्पेस एजन्सी, कॅनडा, भारत या बलाढ्य देशांच्या अवकाश संस्थांना जमले नाही ते अमेरिकेतील एका खाजगी कंपनीने करुन दाखवले. लवकरच या रांगेत बोईंग कंपनी जाऊन बसणार आहे. यामुळे भविष्यात अवकाश सफर ही नाविण्यपुर्ण गोष्ट रहाणार नाही. 

जसं कृत्रिम उपग्रहांमुळे मोबाईल, इंटरनेट, दुरचित्रवाणी सेवा यामध्ये काहीही नाविण्य असं राहिलं नाहीये, उलट याचा वारेमाप फायदा आपण रोजच नकळत उपभोगत आहोत, तसंच भविष्यात अवकाश वारीचे होणार आहे.

जसं थोडेसे पैस साठवून आपण जशी युरोप, लडाखची टूर सहज करतो तसं भविष्यात अवकाश वारीचे होणार आहे. स्पेस एक्स सारख्या खाजगी कंपन्यांमुळे भविष्यात अवकाश वारीही शक्य होणार आहे. जरा जास्त पैसे भरुन तुम्हाला पृथ्वीच्या दोन -चार फेऱ्या मारुन पृथ्वीवर परत आणण्याची सोय स्पेस एक्स किंवा या क्षेत्रात भविष्यात उतरणाऱ्या खाजगी कंपन्या करु शकतात. अर्थात ही परिस्थिती तयार व्हायला आणखी काही वर्षे जावी लागतील, पण हे सहज शक्य आहे. स्पेस एक्सने याचा पाया रचला आहे. 

काही वर्षांनी समानवी अवकाश मोहिमेत जेव्हा भारतासारखे इतर देश उतरतील तेव्हा स्पेस एक्स सारख्या कंपनीने आपले बस्तान याआधीच बसवलेलं असेल. 

उपग्रह सोडणाऱ्या, अवकाश स्थानकात आवश्यक सामान वाहून नेणाऱ्या स्पेस एक्स कंपनीकडे आता समानवी मोहिम आखण्याची क्षमता आल्याने ही स्पेस एक्स कंपनी भविष्यात चीन, रशिया सारख्या देशांनाही टक्कर देऊ शकणार आहे. 

आता स्पेस एक्स बद्दल थोडंसं. स्पेस एक्स कंपनीच्या या वाटचालीमागे आहेत कंपनीचे सर्वेसर्वा - संस्थापक, अब्जाधीश उद्योगपती 48 वर्षाचे एलॉन मस्क. नुसता पैसा असुन चालत नाही, तर वेगगेवळ्या संकल्पना राबवण्याची धमक, मोकळेपणा, दुरदृष्टी पण त्यापेक्षा तंत्रज्ञानावर अचाट प्रेम या गोष्टी  एलॉन मस्कमध्ये असल्यानेच स्पेस एक्सची वाटचाल जोरात सुरु आहे. आत्तापासूनच नासाला समांतर चांद्र - मंगळ ग्रहावरच्या अवकाश मोहिमेबाबत स्वतंत्रपणे काम करायला स्पेस एक्स कंपनीने सुरुवातही केली आहे. 

रॉकेटचा पुर्नवापर ही संकल्पना प्रत्यक्षात आणत अवकाश मोहिमांचा खर्च कमी करण्याचे श्रेय स्पेस एक्स कंपनीला जाते. म्हणजे काय तर जेव्हा रॉकेट अवकाशात झेप घेतो तेव्हा विविध टप्प्यांवर त्याचे भाग वेगळे होतात आणि पृथ्वीवर येऊन किंवा पृथ्वीच्या वातावरणात घर्षणाने जळून नष्ट होतात. तेव्हा या रॉकेटच्या पहिल्या टप्प्यातील भाग पृथ्वीवर सुरक्षित परत आणून त्याचा पुर्नवापर करण्याचा चमत्कार हा स्पेस एक्सने प्रत्यक्षात केला आहे. या साठी हि लिंक जरुर बघावी... https://www.youtube.com/watch?v=sSF81yjVbJE  

ध्येयवेडेपणा असलेल्या 'एलॉन मस्क'चे आणखी काही उद्योग पुढीलप्रमाणे....

Tesla कंपनी - वीजेवर चालणाऱ्या कारचे जगात सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी.
सोलरसिटी - घरगुती आणि व्यापारी क्षेत्रात सोलर पॅनलद्वारे वीज निर्मिती करणारी जगातील एक अग्रगण्य कंपनी.
हायपरलूप - या संकल्पनेचे जनकच एलॉन मस्क हे आहेत. प्रायोगिक तत्तावर विविध ठिकाणी प्रयोग सुरु.
The Boring Company - भुमिगत बोगद्यांचे नेटवर्क तयार करत शहराखाली रस्ते वाहतुक अबाधित ठेवण्याची संकल्पना मस्क यांनी मांडली असून या कंपनीद्वारे वॉशिग्टन, शिकागो, लास वेगास इथे प्रकल्पांनाही सुरुवात. 
Starlink - सुमारे 250 किलो वजनाच्या उपग्रहांचे एक जाळे पृथ्वीभोवती तयार करण्याची संकल्पना आहे, यामध्ये तब्बल 12,000 उपग्रह असतील. उपग्रहांचे हे जाळं अशा पद्धतीने असेल की यामुळे पृथ्वीवरचा सर्वचा सर्व भाग हा इंटरनेट आणि उपग्रह फोनने व्यापता येणार आहे.   

अशा विविध संकल्पना राबवत एलॉन मस्क यांनी जगात दबदबा निर्माण केला आहे. एवढंच नाही कृत्रिम बुद्धीमत्तेवरही मोठं काम हाती घेतलं आहे. 

याआधी सुद्धा जगात विविध क्षेत्रातील प्रगतीमध्ये एखाद्या उद्योगपती किंवा त्यांच्या कंपनीने मोठी कामगिरी बजावल्याचं अनेकदा दिसून आलं आहे. तेव्हा अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या बदलाची - प्रगतीच्या आणखी एका धक्क्याची सुरुवात स्पेस एक्सने केली आहे असं म्हंटलं तर जराही अतिशयोक्ती ठरणार नाही. 




इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...