" जे न देखे रवी ते देखे कवि " असे म्हणतात, यामध्ये थोडीशी सुधारणा करत एक पत्रकार म्हणून म्हणावे लागेल " जे न देखे जनी ते देखे आम्ही ". खरं तर सर्वसामान्यांना जेथे शिरकाव करता येणार नाही, जाता येणार नाही, कल्पनाही करता येणार नाही तेथे जाण्याची, अनुभव घेण्याची संधी पत्रकारांना मिळते. कारण हे क्षेत्रच असे आहे की बातमीच्या निमित्ताने असा विनासाय प्रवेश सहज पदरांत पडतो. त्यातच न्यूज़ चैनलमध्ये काम करत असल्याने फील्ड वर्क हे अनिवार्य ठरते. कारण कैमेरामनसह घटनेच्या ठिकाणी पोहचणे, घडलेल्या घडामोडींचा वृत्तांत दृश्यांसह चैनेलच्या माध्यमातून लोकांपर्यन्त पोहचवणे किंवा विशेष कार्यक्रम करत ती घटना, बातमीचा गर्भितार्थ दाखवणे हे आलंच. न्यूज़ चैनेल हे दृकश्राव्य माध्यम आसल्याने त्याची ताकद, प्रभाव अर्थात मोठा आहे. त्यामुळे वृत्तपत्र, मासिक या माध्यमांपेक्षा न्यूज़ चैनलमधून पत्रकारीता करतांना “ भ्रमंती “ ही काहीशी जास्तच ठरलेली आहे, मग पत्रकारांच्या भाषेत कोणतेही बीट ( विषय ) का असेना.
संरक्षण हा विषय आधीपासून आवडता असल्याने आणि वरिष्ठांनी विश्वास टाकल्याने संरक्षण विषयक बातम्या कव्हर करायची संधी पत्रकारीता सुरु केल्यापासूनच मिळाली. संरक्षण क्षेत्रातील घडामोडी कव्हर करण्यासाठी खरं तर दिल्ली हे सर्वात उत्तम ठिकाण. पण मुंबईमध्ये काम करत असल्याने पश्चिम नौदलाचे मुख्यालय असलेल्या मुंबई आणि परिसरातील नौदलाच्या घडामोडी अनेकदा कव्हर करण्याची संधी मिळाली.
या निमित्ताने 2007 च्या जानेवारीमधील INS Viraat मध्ये रहाण्याची आणि प्रवास करण्याची मिळालेली संधी स्वप्नवत् अशीच होती.
प्रणव मुखर्जी यांच्याकडून ए के ऍंथोनी यांनी संरक्षण मंत्रीपदाचा भार स्वीकारुन काही आठवडे झाले होते. जानेवारी 2007मध्ये ऍंथोनी नौदल सामर्थ्याचा आढावा घेणार होते. आम्ही पत्रकार गोव्यात पोहचलो. दुस-या दिवशी कारवारच्या भव्य नौदल तळावर पोहचलो. ( भविष्यात आशियातील सर्वात मोठा नौदल तळ ). या ठिकाणी पोटात काही रणगाडे आणि सैनिक वाहून नेण्याची क्षमता असलेल्या INS Shardul या landing warship ( किना-यावर सैन्य उतरवण्याची क्षमता असलेली युद्धनौका ) चा नौदलात दाखल करण्याचा कार्यक्रम संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला.
त्यानंतरचा प्रवास , घड़ामोडी या स्वप्नवत अशाच होत्या. या नौदलाच्या तळावरच्या " सी किंग " या नौदलाच्या हेलीकॉप्टमध्ये बसलो आणि तब्बल 40 मिनिटे प्रवास करत भर समुद्रात INS Viraat वर उतरलो. तेव्हा गोव्यासमोरच्या खोल समुद्रात कोठेतरी होतो. दुपार झाली होती.
जमिनीवर हेलिकॉप्टरने उतरणे आणि समुद्रात युद्धनौकेवर उतरणे यात जमीन आस्मानचा फरक आहे. कारण काहीसा वेग पकडलेली युद्धनौका समुद्रात काही प्रमाणात का होईना हेलकावे खात असते. म्हणजेच जिथे हेलिकॉप्टरला उतरावयाचे आहे तो प्लेटफॉर्म अस्थिर असतो. त्यातच वारा हा हेलिकॉप्टरचे गणित चुकवु शकतो. तेव्हा हेलिकॉप्टर पायलटची चांगलीच कसोटी लागत असते.
आणि काहीसे तसेच झाले. जेव्हा हेलिकॉप्टर विराटवर उतरणार होते तेव्हा वा-याची दिशा आणि वेग बदलला आणि त्यामुळे पायलटने काही मीटर उंचीवरुन उतरण्याची जागा बदलवत सुरक्षित लैंडिंग केले. हा सर्व थरार प्रत्यक्ष अनुभवत देशाच्या सर्वात शक्तिशाली युद्धनौका विराटमध्ये दाखल झालो. या ठिकाणी आमची चक्क रहाण्याची व्यवस्था केली होती. अगदी प्रत्येकाला वेगळी रुम, रुममध्ये गरजेच्या सर्व सुविधा. फ्रेश झालो सकाळपासूनच्या कार्यक्रमांमुळे काहीसा थकवा आला होता. अर्धा तास झोपही काढली आणि त्यानंतर जेवण झाल्यावर 4च्या सुमारास डेकवर आलो.
ऍंथोनी यांना नौदलाच्या सामर्थ्याची झलक दाखवण्यात आली. नौदलाची महत्त्वाच्या युद्धनौका, विमाने, हेलिकॉप्टर हे संरक्षण मंत्र्यांना सलामी देत ‘ विराट ‘ च्या जवळने गेल्या. नौदलाच्या या महत्त्वाच्या हा शस्त्रसांभाराचे याची देही याची डोळा अगदी मनोसोक्त दर्शन झाले.
त्यानंतर संध्याकाळ झाली असतांना पुन्हा विराटच्या पोटात गेलो, नौदल अधिकारी यांच्यांशी मनोसोक्त गप्पा मारल्या. रात्री जेवण झाल्यावर १० च्या सुमारास पुन्हा डेकवर आलो आणि वातावरणाने थक्क झालो.
भर समुद्रात जोरदार थंड वारा, साक्षीला पौर्णिमेचा चंद्र आणि आम्ही विराटच्या डेकवर. काय वातावरण असेल तुम्हीच कल्पना करा. अशा वातावरणात शत्रुपक्षच्या क्षेपणास्त्राला हवेतच भेदता येईल अशा " बराक " क्षेपणास्त्राची चाचणी, यशस्वी चाचणी आम्ही बघितली.
असा स्वप्नवत प्रवास सुरु असतांना रात्रीची झोपही छान लागली आणि दुस-या दिवशी सकाळी थेट १० वाजता डेकवर य़ेत सुर्यनारायणाचे दर्शन घेतले. तोपर्यंत आम्ही उरणच्या समोर भर समुद्रात पोहचलो होतो. पुन्हा सी किंग हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि कुलाबा इथल्या नौदलाच्या हेलीकॉप्टर तळावर उतरलो. जवळच ऑफिसला पोहचलो बातमी फ़ाइल केली.
तर असा हा स्वप्नवत असा प्रवास होता. मात्र या निमित्ताने १५०० अधिकारी-नौसेनिक कार्यरत असलेल्या विराटला खूप जवळुन बघता आले, तिची कार्यपद्धती माहिती झाली. नौदलाचे बलस्थान विराटला का म्हणतात ते समजले.
अशीच भटकंती २००६ ला “ Defense Correspondent Course “ करण्याच्या निमित्ताने झाली. संरक्षण बीट कव्हर कऱणा-यांसाठी हा कोर्स म्हणजे संरक्षण दलाबदद्लचा दृष्टीकोन अधिक डोळस कऱणारा असतो. कोर्सची सुरुवात नौदलाचे दक्षिण मुख्यालय कोची पासून झाली. त्यानंतर देशाच्या पुर्वोत्तर राज्यांच्या वाटेवर असलेला भारतीय वायू दलाचा महत्त्वाचा हवाई तळ “ बागडोग्रा ” आणि लष्कराचे एक मुख्य ठिकाण जम्मु या ठिकाणी आमच्या कोर्समधील शिकवण्या पार पडल्यावर शेवटचे चार दिवस Forward Areas मध्ये घालवण्यासाठी आम्ही पुंछ-राजौरी या ठिकाणी निघालो.
२००६ चा काळ हा काश्मिरमधील दहशतवादाला ओहोटी
लागण्यास सुरुवात होण्याचा होता. असं असलं तरी आम्हा कोर्सच्या पत्रकारांसाठी असलेल्या सुरक्षेमध्ये तसुभरही फरक पडला नव्हता. या संरक्षणातच भारत पाक सीमेवरचे पुंछ बघितले आणि गावांत फेरफटका मारत अनुभवले. त्यानंतर राजौरीच्या छोट्या वायू दलाच्या तळावर पोहचलो. रामा राघोबा राणे असे त्या छोट्या विमानतळाचे नाव. १९४७ च्या भारत पाक युद्धात राजौरी पाकच्या ताब्यात गेले होते. राजौरीपर्यंतचा भुसुरुंगाच्या अडथळ्याचा बनलेला रस्ता खुला कऱण्यात आणि राजौरी पुन्हा जिंकण्यात राणे यांनी अद्वीतीय कामगिरी बजावली होती. या कामगिरीमुळे त्यांना परमवीरचक्र हा सर्वोच्च लष्करी सम्नानाने गौरविण्यात आले. तर हा सर्व इतिहास माहित झाला, या परिसराला जाण्याची संधी मिळाली.
या प्रवासातला थरारक अनुभव पुढे आला. PoK म्हणेजच पाक व्याप्त काश्मिरच्या सीमेवर असलेल्या वीर भद्रेश्वर या लष्करी ठाण्याला जाण्याची संधी मिळाली. हे सुद्धा ठिकाण १९४७ भारत पाक युद्धात पाकिस्तानने जिंकले होते जे आपण परत मिळवले. या ठिकाणी जातांना आम्हाला आमचे मोबाईल फोन, कॅमेरे सुरक्षेच्या कारणांमुळे जमा कऱण्यात आले. त्यानंतर एक टेकाड चढत प्रत्यक्ष लष्करी बंदोबस्ताच्या ठिकाणी पोहचलो आणि समोर बघताच थक्क झालो. खाली, टेकाडपासून काही किमी अंतरावर पाकव्याप्त काश्मिरमधील गाव वसलेले होते. समोरच्या टेकाडावर PoK मध्ये पाकिस्तानी लष्कराचे अस्तित्व स्पष्टपणे दिसत होते. तेथे चक्क मोबाईल टॉवर होते. म्हटले पाक लष्करातील जवान थेट घरच्यांशी मोबाईलवर बोलत असतील. तर एक जवान म्हणाला ते आहेच पण भारतात घुसलेल्या दहशतवाद्यांशी संपर्कातही रहाता येते. आता बोला.....
दोन टेकाड्यांच्या मध्ये साधारण 5 किमीचे अंतर होते. या मधून भारत पाकची LoC गेली होती. तर जवानांना विचारले नक्की कोठुन.... तर जवानाने खाली एका मोठ्या झाडाकडे बोट दाखवले, ती आहे आपली LoC. त्या झाडाच्या अलीकडे म्हणजे काही बांधकाम दिसत आहे का असे एका जवानाने आम्हाला विचारले तेव्हा बराच वेळ निरखून बघितल्यावर जमिनीवर बांधकाम दिसले. जवान म्हणाला ते आपले बंकर. तर झाडाच्या पलिकडे म्हणजेच PoK च्या हद्दीत जमिनीवर पुन्हा नीट निरखल्यावर बांधकाम दिसले, तो पाकिस्तानचा बंकर. दोन बंकरमधील अतंर जेमतेम २०० मीटर . म्हणजे प्रत्यक्ष गोळीबाराच्या वेळी काय अवस्था होत असेल याची कल्पना केलेली बरी. जवान म्हणाले आत्ता तुम्ही डोके वर काढून या भागांत किमान फिरु शकतात मात्र आधी शक्य नव्हते. कारण रोज गोळीबार, मोर्टरचा हल्ला होत दिवाळी साजरी व्हायची. या ठिकाणी. २००३ पासून शस्त्रबंदी लागू केल्यावर अर्थात या घटना घडत नाहीत. तर असे हे पाकव्याप्त काश्मिरचे, सीमावर्ती भागाचे, दहशतवादाची भिती घेत जगणा-या नागरीकांचे, सतत दडपणाखाली राहत आपले कर्तव्य चोख बजावणा-या जवानांचे दर्शन या कोर्सच्या दरम्यान झाले.
विज्ञान हा एक माझा आवडता विषय. यानिमित्ताने कितीतरी वेळा भाभा अणु संशोधन केंद्रात जाण्याचा योग आला. तिथेही विविध विभागांत बातम्यांच्या निमित्ताने भ्रमंती झाली. या केंद्रात काम कारणा-या लोकांनाही आपला विभाग सोडून दुस-या विभागात किंवा जागेत जायची परवानगी नाही. मात्र पत्रकार असल्याच्या निमित्ताने या सवलतीचा मी फायदा घेत बहुतेक सर्व भागांत मनोसोक्त बातमीनिमित्त फेरफटका मारला.
भाभा अणु संशोधन केंद्र म्हंटल्यावर डोम आकाराची एक वास्तू पटकन आठवते. भारत-कॅनडा यांनी संयुक्तरित्या उभारलेला हीच ती CIRUS नावाची अणु भट्टी. १९७४ आणि ९८ च्या अणु चाचण्यासाठी आवश्यक ते संशोधन याच ठिकाणी करण्यात आलं , काही प्रमाणत अणुइंधन येथुनच मिळवण्यात आलं. तर ही अतिभव्य अशी ही CIRUS अणु भट्टी आतमधून बाहेरुन बघता आली.
मंगळयान मोहिमेच्या कव्हरेजच्या निमित्ताने श्रीहरीकोटाला जाण्याचा योग आला. इस्त्रो ज्या ठिकाणाहून उपग्रह अवकाशात धाडते ती जागा,ते ठिकाण बघता आले. श्रीहरीकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये असले तरी चैन्नईहून जाणे सोईस्कर पडते. चैन्न्ईपासुन १२० किमी अंतर. रस्ता चांगला असल्याने प्रवासही चांगला होतो. श्रीहरीकोटा हे एक बेट असुन त्यावरुन उपग्रह प्रक्षेपणाचा कार्यक्रम पार पडला जातो. भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली ही ठिकाणे बघता आली, अनुभवता आली.
तेव्हा बातीमदारी करतांना अनेक ठिकाणी फिरण्याची संधी मिळाली.
पंढरीची वारी चक्क दोनदा कव्हर करण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. 26 जुलैच्या पावसानंतर रायगडमधील पुर परिस्थिति आणि पावसाने केलेला आघात कव्हर करता आला. भारताने २००७ ला २०-२० वर्ल्ड कप जिंकल्यावर विमानतळ ते वानखेडे मैदान असा धोनी ब्रिगेडची जल्लोष यात्रा अगदी जवळून कव्हर करायाचा अनुभव मिळाला. सर्वसामान्यांनी न बघितलेली कोकण रेल्वेचे सिद्ध तंत्रज्ञान असलेली स्काय बसची सफऱ कऱण्याची संधी मिळाली.
माझ्यासारखे अनेक पत्रकार त्यांच्या विविध विषयांमुळे, एखाद्या विषयावरील प्रभुत्वामुळे, वेेगवेगळ्या भागात भ्रमंती करुन आले आहेत आणि करत आहेत. कोणी कोयना धरण आतून बघितले, कोणी नक्षलवाद्यांची मुलाखत घेतली, कोणी मुख्यमंत्र्यांबरोबर दिवसभर दौरा केला, कोणी कोकण रेल्वेचा अभ्यास केला, कोणी केदारनाथवर आलेले निसर्ग संकट कव्हर केले, कोणी बोईंगच्या विमाननिर्मितीच्या अवाढव्य कारखान्याला भेट दिली तर कोणी दुष्काळी भागांचे वृत्तांकन दुष्काळ खरा अनुभवला.
अर्थात बातमीदारीनिमित्त आपसुक झालेली ही भ्रमंती ज्ञानात भर टाकणारी ठरलीच पण समाजातील वास्तव समजण्यास, वास्तवाचे भान आणण्यास, शहाणे होण्यात आणि अर्थात पत्रकारिता डोळस करण्यात मदतीची ठरली.
सुंदर माहितीपूर्ण आणि रंजक लेख.
ReplyDeleteRealistic...
ReplyDeleteखुप छान अमितजी
ReplyDeleteAmit sir , INS Virat anubhav ....... Live ..... Awesome
ReplyDelete