Sunday, March 1, 2020

ट्रम्प तात्यांच्या भेटीचे 'लष्करी' महत्व....

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा फायदा कोणाला राजकीय झाला/होणार, किती शो गिरी झाली, किती खर्च झाला वगैरे मुद्यांची चर्चा सुरू आहे. मात्र या दरम्यान काही महत्त्वाचे संरक्षणात्मक करार झाले ज्याचा फायदा मोठा आहे. 

१..नौदलासाठी हेलिकॉप्टर करार 

नौदलाच्या वापरासाठी तयार करण्यात आलेली MH - 60R नावाची २४ हेलिकॉप्टर आता अमेरिकेकडून भारतीय नौदलाला मिळणार आहे. ही हेलिकॉप्टर का महत्त्वाची आहेत ? 

सध्या आपण म्हणजे भारतीय नौदल 'सी किंग' ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर वापरतो. या हेलिकॉप्टरचा वापर शोध, सुटका मोहिमांसाठी, गस्त घालण्यासाठी, कमांडो कारवाई साठी, आवश्यक मालवाहतुकीसाठी, पाणबुडीविरोधी कारवाई.....अशा विविध कारणांसाठी केला जातो. हेलिकॉप्टर शिवाय युद्धनौकेची कल्पनाही करता येणार नाही, हेलिकॉप्टर हे युद्धनौकेचं अविभाज्य अंग आहे. 

सध्याची नौदलाची क्षमता, व्याप्ती, भविष्यातील गरज लक्षात घेता अशा किमान १०० एक हेलिकॉप्टरची आवश्यकता आहे.  १९९० च्या दशकापासून दाखल झालेली सध्या जेमतेम ३० एक 'सी किंग' हेलिकॉप्टर नौदलकडे आहेत, जी अगदी पुरवून पुरवून वापरली जात आहोत.

म्हणूनच अमेरिकेशी MH-६० R चा झालेला करार अत्यंत महत्वपुर्ण आहे. आपण थेट तयार स्वरूपातील २४ हेलिकॉप्टर विकत घेणार असून २०२१ पासून नौदलाच्या ताफ्यात दाखल व्हायला सुरुवात होणार असून २०२३ पर्यंत ही सर्व हेलिकॉप्टर नौदलाच्या सेवेत दाखल होतील अशी अपेक्षा आहे.

Sirkoski / सिर्कोस्की या कंपनीने हेलिकॉप्टरची निर्मिती ही १९७९ पासून केली आहे. अर्थात वेळोवेळी या हेलिकॉप्टरमध्ये सुधारणा करण्यात आली असून सध्या १४ देशांतील नौदल ही हेलिकॉप्टर वापरातात. एका दमात जास्तीत जास्त ८०० किमी अंतर कापण्याची या हेलिकॉप्टरची क्षमता असून ३ टन वजन वाहून नेऊ शकते. Night vision क्षमतेमुळे रात्रीही सहज संचार करणं या हेलिकॉप्टरला शक्य आहे. पाणबुडी विरोधी कारवाईसाठी, समुद्रात गस्त घालण्यासाठी, शोध-सुटकेच्या महिमांसाठी, कुठल्याही वातावरणात संचारासाठी MH-६०R हेलिकॉप्टर ही सध्या जगात सर्वोत्कृष्ट समजली जातात. 

अर्थात भारतीय नौदलकडे सुपूर्त करतांना भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्यामध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत, भारतीय यंत्रणा बसवल्या जाणार आहेत.

एवढंच नाही तर हा करार करतांना आणखी दुपटीपेक्षा जास्त हेलिकॉप्टर विकत घेण्याची तरतूद करून ठेवली आहे. त्यामुळे भविष्यात आणखी MH - ६० R हेलिकॉप्टर दाखल होतील यात शंका नाही.  

या करारामुळे भारतीय नौदलाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. कारण येत्या काळांत नवे तंत्रज्ञान असलेल्या अत्याधुनिक विविध युद्धनौका या भारतीय नौदलात दाखल होण्यासाठी रांग लावून उभ्या आहेत. मात्र हेलिकॉप्टरची कमी होणारी संख्या ही नौदलाची मोठी डोकेदुखी ठरत होती. मात्र या नव्या हेलिकॉप्टरच्या कराराने नौदलाची सामरिक क्षमता भविष्यात निश्चित वाढणार आहे यात शंका नाही.


२ .. लष्करासाठी लढाऊ हेलिकॉप्टरचा करार

दुसरा जो करार झाला आहे तो एका अर्थाने संरक्षण दलाबद्दल काहीसा रंजक करार ठरला आहे. दुसऱ्या करारानुसार भारतीय लष्कराला ६ 'अपाची' ही जगातील सर्वोत्कृष्ट लढाऊ हेलिकॉप्टर मिळणार आहेत. आता यामध्ये रंजक गोष्ट काय ती? तेव्हा आधी रंजक गोष्ट मग हेलिकॉप्टरच्या क्षमतेबद्दलची माहिती...

भारतीय वायू दलाकडे कालपर्यंत फक्त Mi -२४ ही रशियन बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर होती, आजही आहेत. तर गेल्या वर्षभरापासून 'अपाची' ही अमेरिकन बनावटीची लढाऊ हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत.

गेली अनेक वर्षे लढाऊ हेलिकॉप्टरच्या वापराबाबत भारतीय वायू दल आणि लष्कर यांच्यामध्ये एक वाद आहे तो म्हणजे लढाऊ हेलिकॉप्टर ' Operate ' कोण करणार ? प्रत्यक्ष युद्धात लष्कराकडे विविध उपकरणे असतात ज्याचा वापर करत जमिनीवरील सैनिक हे आगेकूच करू शकतात. उदा.. रणगाडा, तोफा, चिलखती वाहने,  multi barrel rocket launcher, drone, लहान पल्ल्यांचे रडार..... यांमुळे लष्कराला जमिनीवर पाय रोवणे शक्य होते. आता यामध्ये लढाऊ हेलिकॉप्टची भूमिका आणखी महत्त्वाची ठरते. आता भारतीय लष्कराकडे वर उल्लेख केलेल्या सर्व उपकरणांचे नियंत्रण असते, थोडक्यात 'मालकी' असते, फक्त लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी नाहीये. 

तर लढाऊ हेलिकॉप्टर हे भारतीय वायू दल हाताळते, याचे संपुर्ण नियंत्रण हे वायू दलाकडे असते. लष्कराचे गेल्या काही वर्षांपासून म्हणणे आहे की लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी स्वतःकडे - लष्कराकडे असावी म्हणजे प्रत्यक्ष युद्धात लष्कराला परिणामकारकरित्या कामगिरी ही आणखी चांगल्या प्रकारे साधता येईल. मात्र आत्तापर्यंत भारतीय वायू दलाने लढाऊ हेलिकॉप्टरची मालकी लष्कराकडे देण्यास साफ नकार दिला होता. मग आता लष्कराने काय केलं वायू दलाकडे हेलिकॉप्टर मागत बसण्यापेक्षा ६ अपाची नवी हेलिकॉप्टर थेट ताफ्यात दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यात हा करार करण्यात आला. 

अर्थात लढाऊ हेलिकॉप्टरच्या मालकी हक्कावरून भारतीय लष्कर आणि वायू दल यांच्यामध्ये असलेला वाद हा एक तांत्रिक मुद्दा आहे. अशा वादामुळे कोणीही एकमेकांना कुठल्याही पातळीवर कोणतेही सहकार्य करण्याचे कधीच नाकारलं नाही ही सर्वात जमेची बाजू आहे. 

अपाची ही लढाऊ हेलिकॉप्टर जगात सर्वात्कृष्ठ लढाऊ हेलिकॉप्टर समजली जातात. त्याला 'उडता रणगाडा' म्हणूनही ओळखलं जातं. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र, जमिनीवर मारा करणारी अत्याधुनिक गन, रात्रीच काय प्रतिकूल वातावरणात उड्डाण करण्याची क्षमता....अशी विविध वैशिष्ट्ये या अपाची हेलिकॉप्टरची आहेत. अर्थात ६ हेलिकॉप्टर लष्कराला काही पुरेशी नाहीत. म्हणनूच लष्कराने सुमारे १०० पेक्षा जास्त लढाऊ हेलिकॉप्टरची मागणी हिंदुस्थान एरोनॉटिक्स कडे नोंदवली आहे, जी स्वदेशी बनावाटीचे लढाऊ हेलिकॉप्टर तयार करत असून सध्या चाचण्या सुरु आहेत.   

तेव्हा 'अपाची' या लढाऊ हेलिकॉप्टरमुळे लष्कराला लढण्यासाठी एक नवं परिमाण मिळणार आहे. 

तेव्हा भारतीय दौऱ्याचा डोनाल्ड तात्यांना किंवा मोदींना किती राजकीय फायदा होईल ते काळ ठरवेल. मात्र तात्यांच्या भारत भेटीमुळे ( जाहिर झालेले ) दोन महत्त्वाचे लष्करी करार मार्गी लागले हे नक्की. ( जाहिर न केलेल्या संरक्षणात्मक चर्चा अजून उघड व्हायच्या आहेत. ).

मात्र या दोन करारांमुळे भविष्यात लष्कर आणि खास करुन नौदलाची ताकद निश्चित वाढणार आहे हे नक्की. 

  

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...