17 तारखेला स्वदेशी बनावटीचे आणि जगातील सर्वात लहान लढाऊ विमान अशी ओळख असलेले " तेजस " वायुदलाकडे अखेर सुपूर्त करण्यात आले. बंगलोर इथे झालेल्या कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राह यांच्याकडे तेजसची प्रतिकृती दिली. काही दिवसांत अधिकृतरित्या तेजसचा वायुदलात समावेश करण्यात येईल, ज्याला operational clearances असे म्हणतात. पुढील साधारण एक - दीड वर्षात तेजसचा पहिला ताफा - squadron - 18 ते 20 विमाने वायुदलात दाखल होतील. त्यानंतर वर्षाला साधारण 16 तेजस विमाने वायुदलाला मिळत जातील.
1983 पासून HAL आणि ADA पासून संयुक्तरित्या या लढाऊ विमानावर काम करायला सुरुवात केली. भविष्यात मिग-२१ ची जागा घेण्यासाठी स्वदेशी लढाऊ विमान बनवावे अशी संकल्पना होती. मात्र कागदावर आराखडा नक्की व्हायला, त्याला अंतिम स्वरुप द्यायला, त्यानंतर प्रत्यक्ष विमानाची निर्मिती होत विमानाने अवकाशात झेप घ्यायला २००१ वर्ष उजाडले. आणि आता १३ वर्षानंतर तेजस वायूदलाकडे सुपुर्त करण्यात आले आहे. या विलंबामुळे मिग -२१ दुरुस्त करत त्याचे आयुष्य वाढवण्याची वेळ आपल्यावर आली आहे. जेव्हा तेजस पूर्ण संख्येने दाखल होईपर्यंत जोपर्यंत मिग - २१ वापरावेच लागणार आहे.
4 जानेवारी २००१ ला स्वदेशी बनावटीच्या या विमानाने पहिल्यांदा अवकाशात झेप घेतली. 4 मे २००३ ला तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी या जगातील सर्वात छोटेखानी लढाऊ विमानाचे " तेजस " असे नामकरण केले.
१९६० च्या दशकांत मरूत नावाचे पहिले लढाऊ विमान विकसित केले होते. अर्थात यासाठी मोठ्या प्रमाणात विदेशी तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. मात्र लढाऊ विमानासाठी आवश्यक असणा-या गोष्टी म्हणजे वेग, लढाऊ विमानासाठी आवश्यक असणारा मोठा पल्ला यांचा मरुतमध्ये अभाव होता. यामुळे हे विमान वायूदलाच्या अग्रस्थानी कधीच नव्हते.
१९८३ पासून सुरु झालेल्या या प्रकल्पावर आत्तापर्यंत सुमारे 8,000 कोटी रूपये खर्च झाले असून विविध प्रकारचे 15 तेजस - लढाऊ विमाने बनण्यात आली आहेत. यामध्ये 5 आदिरूप -Prototypes, 2 प्रशिक्षण देणारी विमाने, नौदलासाठी एक आणि 7 वायुदलासाठी तयार करण्यात आली आहेत.
म्हणायला स्वदेशी लढाऊ विमान असले तरी अजूनही यातील 40 टक्के यंत्रणा किंवा तंत्रज्ञान हे विदेशी आहे. कुठलेही विमान मग ते लढाऊ का असेना त्याची मुख्य ताकद हे इंजिन आणि रडार असते. तेजसमधील इंजिन हे अमेरिकेचे असून रडार हे इस्त्राईलचे तंत्रज्ञान असलेले आहे. सध्या सुरु असलेल्या संशोधनानुसार हे लढाऊ विमान स्वदेशी होण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. या विमानाची आणखी एक प्रगत आवृत्ती आपण तयार करत आहोत त्याच्यामध्येही अमेरिकेने दिलेले इंजिन वापरले जाणार आहे.
लढाऊ विमाने ही साधारण तीन प्रकारची असतात. हलक्या, मध्यम आणि
वजनदार किंवा लांब पल्ल्याची. तेजस हे हलक्या प्रकारातील असून संपुर्णपणे सज्ज झाल्यास तेजसचे वजन १३ टनपर्यंत भरते. ध्वनीच्या वेगाच्या १.६ पट वेगाने तेजसचा वेग असून एका दमात २५०० किमीपेक्षा जास्त अंतर कापू शकते. लढाऊ विमानांच्या भाषेत तेजसचा लढण्याचा पल्ला हा साधारण ३०० किमीपेक्षा काही जास्त आहे. त्यामुळे भविष्यात पाकिस्तानच्या सीमेजवळ तेजसला स्थान असेल. असं असलं तरी सध्या जगात तेजस एक उत्कृष्ठ प्रतिचे लढाऊ विमान म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
अर्थात तेजसच्या समावेशाने वायुदलाची ताकद वाढणार आहे यात शंका नाही. असं असंल तरी भारतीय वायुदलात लढाऊ विमानाच्या squadron किंवा ताफ्याची संख्या आज आवश्यकतेपेक्षा कमी आहे. तेव्हा तेजससारखी आणखी लढाऊ विमाने दाखल होणे गरजेचे आहे.
DRDO चा हा एक अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प असून वेळापत्रकानुसार सर्वात रखडलेला प्रकल्प म्हणूनही ओळखला जातो, ज्यामुळे DRDO ला सर्वात जास्त टीका झेलावी लागली आहे.
यापुढे तेजसची आणखी एक आवुत्ती विकसित केली जाणार आहे जी आत्ताच्या तेजसपेक्षा अधिक वेगवान आणि शक्तिशाली असेल. तेजस बनवण्याचा अनुभव अर्थातच महत्त्वाचा ठरला असून विविध प्रकारची लढाऊ विमाने बवण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. तसंच क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर, विविध शस्त्रास्त्रे यांमध्ये वापरलेले स्वदेशी तंत्रज्ञान लक्षात घेता यापुढे आपण लढाऊ विमान पुर्णपणे स्वबळावर बनवू यात शंका नाही.
थोडक्यात लढाऊ विमानांच्या बाबतीत आपले परावलंबित्व पुढील अवघ्या काही वर्षात पुर्णपणे संपुष्टात येणार आहे....
No comments:
Post a Comment