Sunday, February 7, 2010

भारतासाठी अणुऊर्जेपासून वीज निर्मिती महत्वाची........

अणुभट्टी

जैतापूर इथं अणु ऊर्जा प्रकल्पाला होत असलेल्या विरोधामुळं अणु ऊर्जा प्रकल्पसारख्या अतिभव्य प्रकल्पामुळे होणारे  हजारो लोकांचे विस्थापन, विस्थापनाचा प्रश्न,  प्रकल्पामुळे  होणारी पर्यावरणाची हानी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चेला तोंड फुटले आहे.  खरं तर 10  हजार मेगावॅट पेक्षा जास्त वीज निर्मितीचा हा प्रकल्प व्हायला पाहिजे यात शंका नाही.  मात्र  राज्य शासनाची पुर्नवसनाच्या प्रश्नावर असलेली वादग्रस्त भुमिका यामुळे हा प्रकल्प होणार का असा प्रश्न उपस्थित झालाय.  म्हणुनच जैतापूर, माडबन गावांसह परिसरातील लोकांच्या अस्तितत्वाचा प्रश्नही तेवढाच महत्वपूर्ण बनला आहे.


अणू ऊर्जेपासून वीज निर्मितीचा अट्टहास का  ?
कुठल्याही देशाच्या प्रगतीला त्या देशातील पूरक वीज निर्मिती आवश्यक असते.  वीज निर्मितीसाठी आजही प्रामुख्याने भूगर्भातील कोळसा, वायू ह्यांवर भर दिला जातो. मात्र हे स्त्रोत फक्त काही वर्षांचे सोबती आहेत. सौरऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत, संशोधन केले जात आहे. मात्र या प्रकियेत मिळणा-या वीजेचे प्रमाण हे अत्यंत कमी आणि खार्चिक आहे. तेव्हा भविष्यातील वाढती वीजेची गरज लक्षात घेतांना  अणु उर्जेपासून वीज निर्मितीचा पर्याय अनेक देश अवलंबतांना दिसत आहेत आणि त्यासाठी पावलं उचलली जात आहेत.

निरंतर किंवा कित्येक वर्ष ऊर्जा देणारे स्त्रोत म्हणुन निसर्गातील किरणोत्सर करणारी अनेक  मुलद्रव्ये आहेत.  पण त्यापैकी फक्त काही मुलद्रव्यांचा वापर हा  व्यवहारातील वापरण्यायोगी वीज प्राप्त करण्यासाठी होऊ शकतो. उदा...थोरियम, युरेनियम, प्लुटोनियम. या मुलद्रव्यांचा अणू भट्टीत वापर करत वीज निर्मिती करता येणं शक्य झालं आहे.  

आपल्याला आठवत असेल दोन वर्षापूर्वी अमेरिकेची अणु ऊर्जेवर चालणारी युएसएस निमिट्झ ही एक लाख टन वजनाची विमाननाहू युद्धनौका चैन्नईत नौदल युद्ध अभ्यासासाठी आली होती. युद्धनौका कार्यरत होतांना युद्धनौकेच्या अणु
भट्टीत एकदाच  इंधन भरले होतं. यामुळे  पुढील 20 वर्ष दररोज पुरेल इतकी वीज निर्मिती करता येणे शक्य झालंय. सतत इंधन भरण्याची गरजच पडणार नाही एवढी क्षमता या अणु ऊर्जेत आहे.

शेवटी युरेनियम, थोरियम हेही मुलद्रव्ये कधी ना कधी वापरुन संपणार आहेत, म्हणुन एक पाऊल पुढे जात ब्रिडर रिएक्टरची संकल्पना पुढे आलीये.  यामध्ये इंधन जळल्यावर पुन्हा इंधन मिळते  तेही वीज निर्मिती होत.  भारतात याबातीत थोरियमची अणु भट्टी उभारण्याचं प्राथमिक काम सुरु आहे. या
अणुभट्टीत थोरियमच्या साथीनं प्लुल्टोनियम  Pu-233 वापरल्यावर पुन्हा Pu-233 हे इंधन मिळणार आहे.  म्हणजेच एक इंधन वापरल्यावर त्यामधुन पुन्हा तेच इंधन मिळणार. यामुळं निरंतर काळ वीज  मिळणं शक्य होणार आहे. 

सूर्यावर हेलियम- हायड्रोजचे अणू एकत्र येत महाप्रचंड अशी ऊर्जा मुक्त होत असते, ह्याला फ्युजन प्रक्रिया म्हणतात.  नेमका हाच प्रयोग अणु भट्टीमध्ये नियंत्रित स्वरुपात करत वीज निर्मिती करता येईल का यासाठीही शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. जर हे साध्य झालं तर पृथ्वीवरील ऊर्जेची कटकट कायमची मिटेल.  एकंदरितच वेगवेगळ्या प्रकारे अणु  ऊर्जापासून वीज निर्मितीसाठी प्रयत्न सुरु असून, अनेक देशांत अणू ऊर्जा प्रकल्पांची जोरात बांधणी सुरु आहेत.  



जगात अणू ऊर्जा प्रकल्प......

जगातील 31 देशांमध्ये 439 अणु भट्ट्या वीज निर्मिती  करत आहेत. यामध्ये अमेरिकेचा नंबर पहिला आहे.  तब्बल 104 अणु भट्ट्यांच्या सहाय्यानं अमेरिका 1 लाख 01 हजार 119 मेगावॅट वीज निर्मिती करते.  अमेरिकेच्या वीज निर्मितीमध्ये ह्याचं प्रमाण 19 टक्के एवढं आहे.  टक्केवारीत फ्रान्सचा नंबर पहिला लागतो. देशाच्या गरजेच्या तब्बल 76 टक्के वीज फ्रान्स ( अणु भट्टया 59 आणि 63,473 मेगावॅट वीज )  अणू ऊर्जेपासून तयार करतो. जगातील काही महत्त्वाच्या देशांची एकूण वीज निर्मितीच्या तुलनेत टक्केवारी पाहू...


देश         अणुभट्ट्या   वीज निर्मिती         टक्केवारी
                                      (  मेगावॅट )     
फ्रान्स          59                    63,473                 76.2% 
अमेरिका    104                 1,01,119                19.7%
जपान          53                    46,236                 24.9% 
रशिया         31                    21,743                 16.9%
जर्मनी         17                    20,339                 28.3%
द.कोरिया    20                    17,716                 35.6% 
इंग्लड         19                    11,035                 13.5% 
चीन            11                      8,587                  4.0% 
भारत          17                     4,560                   3.0% 


ही आकडेवारी लक्षात घेतली तर जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणुन पुढे येणारा भारत  अणु ऊर्जेपासून वीज निर्मितीमध्ये सर्वात मागे आहे. भारतात  सध्या वीज निर्मिती सुमारे 1 लाख 49 हजार मेगावॅट  होत असून अजुनही 10 हजार मेगावॅटपेक्षा जास्त वीजेची कमतरता आहे.  2020 पर्यंत वीजेची मागणी अडीच लाख मेगावॅटच्या घरात जाणार आहे.  असं असतांना भारत एकुण वीज निर्मितीच्या फक्त 3  टक्के वीज अणु ऊर्जेपासून तयार करत आहोत.  

औष्णिक          93,392 मेगावॅट
जलविद्युत       36,647 मेगावॅट
अणू ऊर्जा         4,560 मेगावॅट
सौर ऊर्जा       13,242  मेगावॅट


अस्पृश्यता संपली.......

1974 साली अणु स्फोट केल्यावर अवघ्या जगानं भारताला वाळीत टाकलं. अशा देशांना ( भारत किंवा अणु तंत्रज्ञान विकसित करु पहाणा-या देशांना ) वाळीत टाकण्यासाठी अणु इंधन पूरवठा गट ( न्युक्लिएर सप्लायर ग्रुप ) तयार करण्यात आला.  जो या गटाचं मांडलिकत्व स्विकारेल त्यांनाच अणु इंधन देण्यात येईल अशी व्युहात्मक रचना करण्यात आली.  सर्वकष अणु चाचणी बंदी करार ( सीटीबीटी ) आणि अणु तंत्रज्ञान प्रसार
बंदी ( एनपीटी ) असे करार भारतानं झुगारले. यामुळं गेली 30 वर्ष ( 1974 ते 2006 पर्यंत ) भारताला जगातील अणु तंत्रज्ञानापासून दुर ठेवण्यात आलं.  कोणीही भारताला नवीन अणु तंत्रज्ञान, अणु इंधन देण्यास तयार नव्हता.  



मात्र ही कोंडी अखेर 2006 ला भारत- अमेरिका दरम्यान झालेल्या अणु कराराने  ( 123  Agreement  )
फुटली. अणु इंधन पुरवठा गटांनेही सदस्यत्व न घेताही इंधन देण्याचं मान्य केलं. अमेरिकेने करार केल्यावर फ्रान्स, रशियानेही आपल्याबरोबर करार केले आहेत. यामुळं 2020 पर्यंत 15 नवीन अणु भट्ट्यांसह 20 हजार पेक्षा जास्त वीज निर्मिती करण्याचं शिवधनुष्य भारतानं उचलंल आहे.  तोपर्यंत ब्रीडर अणु भट्टीचं तंत्रज्ञान पुर्ण विकसित होणार आहे. तेव्हा ख-या अर्थानं भारतात अणु ऊर्जेपासून वीज निर्मितीला वेग येईल. म्हणुनच 2030 पर्यंत 50 हजार पेक्षा जास्त अणु ऊर्जेपासून वीज निर्मितीचं लक्ष्य निश्चित केले जात आहे.

भारतात नव्हे तर जगामध्य़े कोळसा, भूगर्भातील वायूंचे अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे.  येत्या 50 वर्षात हे साठे संपून जातील.  तेव्हा सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीचा पर्याय विकसित होईपर्यंत भारताला अणु ऊर्जेपासून वीज निर्मितीशिवाय पर्याय नाही.

चीन मात्र आपल्या पुढे असुन येत्या 2020 वर्षात 64 हजार मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे त्याकडे दमदार वाटचालही सुरु झालीये.



अणू-वीजेचा पर्याय धोकादायक ?

नाण्याच्या दोन बाजू असतात त्या प्रमाणे अणु ऊर्जेपासून  काही धोके संभवातात. एक तर अणु ऊर्जेपासून विध्वंसक अशा अणुबॉम्बची निर्मिती
 केली जाऊ शकते. ( इराण सध्या अणु बॉम्बच्या बनवण्याच्या मार्गावर असल्यानं  अमेरिकेची झोप उडालीये.). अणु कच-यामुळं  निसर्गाला, मानवी वस्तींना धोका पोहचू शकतो. तर अणू कच-याचा वापर दहशतवादी करु शकतात.   तर ह्याच अणु ऊर्जेपासुन वीज निर्मितीसारखी अनेक विधायक काम केली जाऊ शकतात. तरीही अनेकांचा अणु ऊर्जेपासून वीज निर्मितीला विरोध आहे.

रशियात चेर्नोबिल इथं झालेली दुर्घटना सर्वांना माहितीच आहे. चुकांवर चुका होत अणु भट्टीमधील अणु इंधनाचा अणुस्फोट होता होता राहिला होता, पण प्रचंड ऊर्जेमुळे झालेल्या  स्फोटामुळे कित्येक टन किरणोत्सारी कचरा,धुळ हवेत
फेकली  गेली. त्याचा  फटका हजार किलोमीटरवर असलेल्या फ्रान्सलाही बसला.

थ्री मिल आयलँड या अमेरिकेच्या अणु वीज निर्मिती केंद्रामध्ये अणु भट्टीचा गाभाच  वितळला आणि कित्येक लाख लिटर किरणोत्सारी बाधित पाणी आजुबबाजुच्या भागात पसरलं, कित्येक टन विषारी गॅस हवेत पसरला.

अशा काही मोठ्या अपघाताबरोबर अनेक छोटे अपघातही जगभरातील अणु भट्ट्यांमध्ये झाले.  मात्र यासाठी मानवी चुकांच कारणीभूत होत्या. म्हणुन काही वीज निर्मिती थांबवायची का ?.

फ्रान्सचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. देशाच्या वीजेच्या गरजेच्या एकुण 76 टक्के वीज ( 63,473 मेगावॅट ) अणु ऊर्जेपासून तयार केली जाते. 59 अणु भट्ट्यांमध्ये उत्कृष्ठ तंत्रज्ञान आणि डोळ्यात तेल घालुन पाळले जाणारे नियम यामुळं आत्तापर्यंत एकही मोठ्या दुर्घटनेला फ्रान्स सामोरं गेला नाही.  तसंच आण्विक कच-याची सुरक्षित विल्हेवाटही लावली जात असल्यानं फ्रान्समधील पर्य़ावरणवाद्यांना तक्रारीला जागा राहिली नाहीये.

म्हणुनच  वीज निर्मितीसाठी सौरउर्जा किंवा अपारंपारिक ऊर्जेचा सशक्त पर्याय जो पर्यंत उभा राहत नाही तो पर्यंत भारतच कशाला जगाला अणु उर्जेशिवाय पर्याय नाही. म्हणुनच भारतात सर्व अडथळे पार करत अणु ऊर्जेपासुन वीज निर्मितीला वेग देणे आवश्यक आहे.



इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...