Saturday, January 1, 2022

भारत लवकरच 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र निर्यात करणार...

#BrahMos
#cruisemissile
#indianarmedforces
#Philippines
#indonesia

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारताची आणखी एक ओळख म्हणजे शस्त्रास्त्रांची आयात करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वसंरक्षणासाठी भारताने सुरुवातीपासून बहुतांश शस्त्रास्त्रे ही आयात करण्यावर भर दिला आहे. लढाऊ विमाने, मालवाहु विमाने, हेलिकॉप्टर, तोफा, रणगाडे, युद्धनौका अशी प्रमुख शस्त्रास्त्रे आपण मोठ्या प्रमाणावर आयात केली. विशेषतः शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आयात करण्यावर भारताने भर दिला. मात्र गेल्या काही वर्षात आपण संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत हळुहळु स्वावलंबी होत असून काही प्रमाणात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर स्वबळावर बनवत आहोत. आता तर क्षेपणास्त्रे, युद्धनौका बनवण्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो आहोत.

यामधील ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र आता लवकरच निर्यात करण्याबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. याबाबत फिलिपिन्स देशाशी चर्चा अंतिम टप्प्यात असून कोणत्याही क्षणी, कधीही या कराराबाबत घोषणा होऊ शकते. फिलिपिन्स देशाशी गेल्या काही वर्षात मैत्रीचे संबंध प्रस्तापित झाले असून व्यापार क्षेत्रात सहकार्याची भूमिका आधीपासून घेतली जात आहे, आता त्यात संरक्षण क्षेत्राची भर पडली आहे. विशेषतः चीनच्या दक्षिण समुद्रात चीनचा वाढता हस्तक्षेप लक्षात घेता फिलिपिन्सने भारताशी संरक्षण क्षेत्राबाबत संबंधआणखी बळकट करण्यावर भर दिला आहे. याआधीच भारताच्या युद्धनौका फिलिपिन्स देशाला नियमित भेट देत असून यानिमित्ताने भारत चीनला शह देण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्यास चीनला शह देण्याची एक मोठी संधी फिलिपिन्सला मिळणार आहे.

‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र का प्रभावशाली आहे ?

जगात विविध प्रकारची क्रूझ क्षेपणास्त्र कार्यरत आहेत. यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे इतरांपेक्षा वेगळे ठरते. ब्रह्मोस हे जगातील सर्वात वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे, ध्वनीच्या तीनपट वेगाने हे प्रवास करु शकते, तर २९० किलोमीटरपर्यंत अचुक मारा करु शकते. यामुळे हे क्षेपणास्त्र रडारवर शोधणे आणि त्याला भेदणे हे अत्यंत अवघड आहे. भारताच्या लष्कर, नौदल, वायुदलामध्ये विविध ठिकाणी हे क्षेपणास्त्र याआधीच कार्यरत आहे. आता तर ब्रह्मोस क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती विकसित केली जात आहे. ध्वनीच्या चारपट एवढ्या प्रचंड वेगाने आणि ४०० किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अधिक अंतरावर मारा करण्याची क्षमता नव्या ब्रह्मोसमध्ये असेल. भारत आणि रशिया यांनी संयुक्तरित्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

ब्रह्मोसच्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच एखादे मोठे शस्त्र निर्यात करणार आहे. फक्त फिलिपिन्स नाही तर इंडोनेशिया देशाने सुद्धा ब्रह्मोस क्षेपणास्त्र घेण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे.

Sunday, December 26, 2021

जगातील सर्वात शक्तिशाली अवकाश दुर्बिण ' James Webb Space Telescope '


#JamesWebbSpaceTelescope 
#spacetelescope 
#JamesWebb 

जेम्स वेब टेलिस्कोप

जगातली शक्तीशाली अवकाश दुर्बिण 'जेम्स वेब टेलिस्कोप' काल अखेर प्रक्षेपित करण्यात आली. अमेरिका , युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनडा स्पेस एजन्सी या तीन अवकाश संस्थांनी आणि त्यांच्याशी संबंधित इतर अवकाश संशोधन संस्थांनी या दुर्बिणीची निर्मिती केली आहे. 

नासाचे १९६१ - १९६८ या काळातील प्रशासक ( प्रमुख ) असलेल्या जेम्स वेब  ( James Wbb ) यांचे नाव या दुर्बिणीला दिले आहे. अमेरिकेचा चांद्र विजय प्रत्यक्षात आणण्याची पायभरणी जेम्स वेब यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. 

ही दुर्बिण नेमकी कशी आहे ? 

दुर्बिणीच्या निर्मितीच्या हालचालीला २००५ ला सुरुवात झाली पण विविध कारणांनी या दुर्बिणीच्या निर्मितीला उशीर होत गेला. करोना काळामुळे काही महिने या दुर्बिणीचे काम तर ठप्प झाले होते. या दुर्बिणीच्या निर्मितीला १० अब्ज डॉलर्सपर्यंत खर्च आलेला आहे. 

एका टेनिस कोर्टच्या पसाऱ्याएवढा या दुर्बिणीता विस्तार असून १८ छोट्या षटकोनी आरशांपासून बनवलेली ६.५ मीटर व्यासाची, सोन्याचा मुलामा असलेली बेरेलियम धातुने तयार केलेली भव्य लेन्स या दुर्बिणीत असणार आहे. मुख्यतः विविध इन्फ्रोरेड तरंगलांबीच्या माध्यमातून ही अवकाश दुर्बिण विश्वाचा वेध घेणार आहे. याचबरोबर व्हीजीबल ( दृश्य प्रकाश ) आणि अल्ट्राव्हालेट अशा तरंग लांबीच्या माध्यमातून अवकाश न्याहाळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उष्णतेपासून संरक्षण करणारे - उष्णतेला थोपवून धरणारे विशिष्ट धातूंचे पाच पातळ पडदे हे या दुर्बिणीच्या खाली असणार आहेत. यामुळे या दुर्बीणचा पसारा वाढलेला आहे. 

शास्त्रीय भाषेत Lagrange points L 2 च्या ठिकाणी ही अवकाश दुर्बिण अवकाशात पृथ्वीसोबत भ्रमण करणार आहे. म्हणजेच सूर्य - पृथ्वी यांच्या सरळ रेषेत पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर हे दुर्बिण असणार आहे. 

ही दुर्बिण शक्तिशाली का आहे ? 

हे सांगण्यात आधी काही माहिती. अभ्यासानुसार सूर्याचा प्रकाश हा सूर्यापासून निघून सुमारे १५ कोटी किलोमीटर प्रवास करत ८ मिनिटात पृथ्वीवर पोहचतो. म्हणजेच सूर्य हा आपल्याला प्रत्यक्षात ८ मिनिटांनंतर दिसतो, जाणवतो. सूर्य हा आपल्यासाठी ८ मिनिटे जुना असतो. आकाशातील ताऱ्यांचे हे असंच आहे. हे तारे काही प्रकाशवर्ष ( अवकाशातील अंतर मोजण्याचे एकक ) अंतरावर असतात. म्हणजेच अवकाशातील एखादा तारा, ताऱ्याचे अवशेष, आकाशगंगा ह्या प्रत्यक्षात आपल्याला अनेक वर्षांनी दिसत असतात, जेव्हा ते दिसतात तेव्हा ते प्रत्यक्षात तिथे अस्तित्वात असतीलच असं नाही. 

जेम्स वेब टेलिस्कोप ही अवकाशात आणखी दूरवर बघू शकणार आहे. म्हणजेच जेवढी दूरवर बघेल तेवढा तो प्रकाश तो जुना असेल. म्हणजेच ती भूतकाळात डोकवणार आहे. भूतकाळात केवढी ? तर हे अवकाश दुर्बिण ही १३. ४ अब्ज प्रकाशवर्षं अंतरावरचे बघु शकणार आहे. असं समजलं जातं की विश्वाची निर्मिती ही १३.८ अब्ज वर्षांपूर्वी झाली. थोडक्यात विश्वनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात विश्वाची जी अवस्था होती ती समजण्यास जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमुळे मदत होणार आहे. 

ही टेलिस्कोप एवढी संवेदनशील आहे की चंद्राएवढ्या अंतरावरून ती मधमाशीच्या उष्णतेचा मागोवाही ( heat signature ) नोंदवू शकते. 

ही अवकाश दुर्बिण 'हबल' दुर्बिणीने केलेलं काम आणखी पुढे नेणार आहे. फक्त हबलची जशी अवकाशातच स्पेस शटलच्या सहाय्याने अनेकदा दुरुस्ती करण्यात आली होती, तिच्यामधील लेन्स - यंत्रणा या बदलण्यात आल्या होत्या तशी दुरुस्ती 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप' दुर्बिणीच्या बाबतीत शक्य नाहीये.

या सर्वांवरून दुर्बिणीची ताकद लक्षात येईल. तेव्हा ही दुर्बिण अवकाशाचे कोणते नवे रहस्य उलगडवून दाखवणार याची आता उत्सुकता आहे.

याबद्दलची अधिक आणि लक्षवेधी माहिती NASA च्या पुढील लिंकमधूनही मिळेल

https://youtu.be/6VqG3Jazrfs 

https://youtu.be/v6ihVeEoUdo

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...