Wednesday, December 9, 2009

सुखोई-३० एमकेआय भारताचे ब्रम्हास्त्र

तारीख - ३० एप्रिल २००९. ठिकाण पोखरण-राजस्थान. भारतीय वायूदलाच्या सुखोईला अपघात. एक पायलट ठार तर एक जखमी.
३० नोव्हेंबर २००९ आणखी एक सुखोई जैसलमेरजवळ कोसळलं. दोन्ही पायलट सुरक्षित.

एखाद्याला वाटेल या बातम्या काय नेहमीसारख्या आहेत, वायू दलातील विमानांना अपघात होतच असतात, त्यात नवीन काय ते.
मात्र वायूदलाचं ब्रम्हास्त्र असेलल्या आणि जगातील आघाडीच्या लढाऊ विमानांपैकी एक म्हणुन गणल्या जाणा-या सुखोईला झालेला हा अपघात होता. 1996 ला वायू दलात दाखल झालेलं आणि आत्तापर्यंत एकही अपघाताला सामोरं न गेल्यानं सुखोई हे वायू दलातील सर्वात सुरक्षित मुख्य म्हणजे सर्वोत्तम लढाऊ विमान समजले जात होते. मात्र या दोन अपघातांनी वायूदल अक्षरक्षः हादरलं. दोन्ही अपघातानंतर वायू दलानं अपघाताचं कारण शोधण्यासाठी एक स्वतंत्र चौकशी समिती बसवली आहे. अर्थात अपघाताची नक्की कारणं समजली असून पुन्हा सुखोईची हवाई भरारी सुरुही झाली आहे।


1996 ला वायू दलात दाखल झालेलं सुखोई ध्वनीच्या वेगाच्या सुमारे अडीचपट वेगानं जात मिरवत आकाश दणाणुन ठेवत आलं आहे. चीनला शह देणारे आणि फक्त एका जातीच्या विमानांच्या आधारे पाकिस्तानच्या वायू दलाला झोपवण्याची क्षमता अशी या सुखोईची खरी ओळख आहे.

फक्त आपल्या देशातच नव्हे तर शत्रूपक्षाच्या हवाई क्षेत्रात संचार करत तिथे निर्विवाद वर्चस्व ठेवण्याची क्षमता सुखोई-30 एमकेआय या लढाऊ विमानात आहे. जर अणु हल्ला करायचा झाल्यास तर एका दमात अधिक इंधन टाक्यांसह किंवा हवेतल्या हवेत इंधन भरत तब्बल आठ हजार किलोमीटरचा टप्पा गाठत शत्रूप्रदेशात अणु बॉम्ब टाकून सुखोई परत येऊ शकते.
सुखोईत असलेल्या क्लिष्ट संगणक प्रणाली आणि हल्ला कऱण्याची क्षमता व्यापक असल्यानं सुखोई-30 एमकेआय विमानाच्या कॉकपीटमध्ये दोन पायलटला जागा देण्यात आलीये. पुढे बसलेला पायलट विमानाचं सारथ्य करतो आणि रडारावर येणा-या माहितीचं विश्लेषण करुन निर्णय घेतो. तर मागे बसलेला पायलट विविध क्षेपणास्त्र आणि बॉम्ब डागण्याचं आणि संदेशवहनाचं काम करतो.


बहुरंगी-बहूआयामी रडार

एकाच वेळी 16 विविध ठिकाणी किंवा 16 टार्गेटवर नजर ठेवून प्रतिहल्ला चढवण्याची, शत्रूला उत्तर देण्याची क्षमता सुखोईत आहे. हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर अचुक मारा करण्याची क्षमता सुखोईत आहे. हे शक्य झालंय ते NIIP N011M Bars (Panther) या सुखोईच्या नाकावर- पुढच्या भागात बसवलेल्या रडारमुळे.


याची संगणक प्रणाली म्हणजे एक मिनी सुपर कॉप्म्युटरसारखी काम करते. हे रडार चोहोबाजुनी काम करत आकाशातील आणि जमिनीवरील प्रत्येक गोष्टीची नोंद करत त्याचे विश्लेषण पायलटपर्यंत पोहचवतो. यामुळे पायलटला चटकन आपले लक्ष्य काय आहे हे अचुक ओळखता येते आणि आपली पुढची व्ह्युहात्मक दिशा लगेच ठरवता येते. कारण युद्धात प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.
एकाच वेळी आकाशात 200 किलोमीटरपर्यंत आणि जमिनीवर 60 किलोमीटरपर्यंत बारीक नजर ठेवण्याची क्षमता सुखोईची आहे. कुठलाही सुक्ष्म सिग्नल, इलेक्ट्रोमॅग्निटक व्हेव्ज सुखोई पकडु शकतो. म्हणुनच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस.रेड्डी ह्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्यावर ब्लॅक बॉक्समधुन येणारा संदेश मिळावा यासाठी खराब हवामानात असतांना सुखोईला पाचारण करण्यात आले होते.



फ्लाय बाय वायर / Fly By Wire

सुखोई लढाऊ विमानातील सर्वात अत्याधुनिक प्रणाली म्हणजे Fly By Wire / फ्लाय बाय वायर ही व्यवस्था. फक्त एक बटन दाबत सेंसरर्सद्वारे संदेश वहन करत एखादं काम करण्याची रचना म्हणजे Fly By Wire.
उदा.एक हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र डागायचे आहे. तेव्हा पायलट आपल्या रडारवर शुत्रपक्षाचं विमान शोधतो. मग विमान शत्रुपक्षाच्या दिशेत वळवतो, विशिष्ठ उंची गाठतो आणि मग क्षेपणास्त्र डागतो. यासाठी पायलटला प्रत्येक प्रकार करतांना डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवायला लागायचं. पूर्वी हे सर्व सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक बटानांच्यादरम्यान संदेशवहनासाठी विविध वायरींच क्लिष्ट जाळं विमानात असायचं. यामुळं विमानाचं वजन आकार मर्यादीत ठेवता येणं कठीण व्हायचं. मुख्य म्हणजे एखाद्या वायरचं काही नुकसान झालं तर ते शोधणं डोकेखाऊ काम असायचं.

मात्र Fly By Wire मध्ये या वायरींचं काम दोन टोकांवर बसवलेले सेंसर संदेशवहनाचं काम करतात. विशिष्ट उंची गाठायचे निर्देश देण्यासाठी बटन दाबल्यावर विमान आपोआप उंची गाठते. या काळाता वैमानिकाला पुढची व्युहात्मक रचना करायला वेळ मिळतो आणि वैमानिक उंची गाठल्यावर क्षेपणास्त्र डागतो आणि पुढचं लक्ष्य शोधायला सुरुवात करतो.



सुखोईची कोब्रा फाईट

सुखोईला हवेतल्या हवेत दुस-या लढाऊ विमानाशी लढतांना ‘ दादा ’ समजलं जातं. याचं कारण वेगानं जात असतांना हवेतल्या हवेत काही सेकंद सरळ उभं रहाण्याची सुखोई असलेली क्षमता.
या लढण्याच्या पद्धतीला “ Pugachev's Cobra “ असं म्हणतात. नागाच्या फण्यासारखं काही काळ सुखोई उभं राहत शुत्र पक्षाच्या विमानाला चकवू शकतं किंवा होणारा हल्ला टाळु शकते. सुखोई विमानाच्या ही कसरती शक्य झालीये ती Al-31FP turbofans या जगातील शक्तीशाली इंजिनामुळे.
काही संकेदात वेग शुन्य करण्याची आणि क्षणभरात ध्वनीचा वेग पकडण्याची सुखोईची क्षमता या इंजिनामुळं शक्य झालीये.


सध्या भारतीय वायू दलाच्या ताफ्यात 120 सुखोई-30 MKI आहेत. काही सुखोई-30 चं रुपांतर सुखोई-30 एमकेआय मध्ये करण्यात येत आहे. 2014-15 पर्यंत अशी एकुण 280 सुखोई ताफ्यात दाखल करुन घेण्यात येणार आहेत. सध्या ‘ हिंदूस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड ‘ ( HAL) दरवर्षी 18-20 सुखोई बनवत आहे.
चीनकडे अशा दर्जाची एकुण 100 पेक्षा सुखोई कार्यरत आहेत. तर सुखोई-30 एमकेआय पेक्षा कमी क्षमतेची सुखोई-27 लढाऊ विमानं 100 पेक्षा जास्त कार्यरत आहेत. दोन्ही प्रकारच्या सुखोईंची जास्तीत जास्त भर घालण्याचा प्रयत्न चीन युद्ध पातळीवर करत आहे. म्हणुनच भारतानं सुखोईच्या निर्मितीला वेग देण्याची गरज आहे.
जगातील सगळ्यात कठीण लढाऊ विमानांचा हवाई युद्ध-अभ्यास समजल्या जाणा-या अमेरिकेच्या ‘ रेड फ्लॅग ‘ युद्ध-अभ्यासात सुखोईची कामगिरी उत्कृष्ठ श्रेणीमध्ये गणली गेली. अशा तंत्रज्ञानात आणि लढाऊ क्षमतेत जगात उत्कृष्ट गणल्या गेलेल्या सुखोई-30 एमकेआय मधुन भरारी घेण्याचा मोह टेक्नोसॅव्ही असलेल्या राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ह्यांनाही आवरता आला नाही.

सुखोईला झालेला दोन अपघाताची निश्चितच गंभीर दखल घेतली गेलीये. काही चुका पायलटकडुन झाल्या असतील किंवा तंत्रज्ञानात काही उणीवा लक्षात आल्या असतील. मात्र या सर्वांवर मात करत सुखोईच्या भरा-या पुन्हा सुरु झाल्या आहेत. सुखोईच्या या सर्व गुणगोष्टींमुळे सुखोई भारतीय वायू दलाचं ब्रम्हास्त्र ठरले आहे. म्हणनुच एअर फोर्समध्ये सुखोईला “ A Special Baby “ म्हणुन एक मानाचं स्थान आहे.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...