Sunday, March 14, 2010

आशियातील अवकाश स्पर्धा

भारताचा प्रगत उपग्रह वाहक जीएसएलव्ही

भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये आर्थिक स्पर्धा सुरु आहे.  कोण आशियातील सत्ता केंद्र बनतं, कोणाकडे आर्थिक गुंतवणुक जास्त होते, कोणाची निर्यात वाढते,  लष्करी सामर्थ्यामध्ये कोण पुढे जाईल या दिशेने दोन्ही देश दमदार पावले टाकत आहेत. मात्र आणखी एका छुप्या स्पर्धेकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे किंवा ते फारसे कोणाला ( म्हणजे सर्वसामान्याच्या ) अजून लक्षात आलेले नाही,  ही स्पर्धा म्हणजे अवकाश स्पर्धा.  ही स्पर्धा फक्त भारत-चीन मध्ये नसुन आशियातील एकेकाळी आर्थिक सत्ताकेंद्र असलेला जपानही सर्वांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहे. ह्यालाच आशियातील अवकाश स्पर्धा म्हंटले जात आहे.  ही स्पर्धा कशासाठी, याचे दूरगामी परीणाम काय होणार, यामध्ये कोण जिंकेल, जगाच्या राजकारणात याचे परिणाम काय होतील यावर दृष्टीक्षेप टाकुया. पण त्याआधी  अमेरिका- सोव्हिएत रशिया यांच्यातील अवकाश स्पर्धा काय होती ते आधी पाहू.          


शीतयूद्ध काळातील अवकाश स्पर्धा

 4 ऑक्टोबर 1957 ला सोव्हिएत रशियाने जगातील पहिला कृत्रिम उपग्रह यशस्वीपणे सोडला आणि अमेरिकेची झोप उडाली. दुसरे महायुद्ध संपल्यावर  सुरु झालेल्या शीत युद्धात आधीच अणुस्फोट केलेल्या अमेरिकेने आघाडी घेतली होती. तेव्हा उपग्रह सोडत सोव्हिएत रशियाने अमेरिला मागे टाकले.  3 नोव्हेंबर 1957 ला दुस-या स्फुटनिक उपग्रहातून लायका नावाच्या श्वान (कुत्री) सोडत रशियाने अमेरिकेला पार आडवाच केला. तेव्हा जिद्दीने पेटलेल्या अमेरिकने पहिला दळणवळण उपग्रह, पहिला हवामानाचा वेध घेणारा उपग्रह,  पहिला हेरगिरी करणार उपग्रह सोडत अमेरिकेने रशियावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.  तर 12 एप्रिल1961 ला युरि गागरीन या पहिल्या मानवाला अवकाशात पाठवत रशियाने पुन्हा आघाडी घेतली.

चंद्रावर कोण आधी पोहणार यासाठीही स्पर्धा सुरु झाली.  चंद्राभोवती परिक्रमा करत चंद्राचे फोटो काढण्यासाठी अमेरिकेला तब्बल 15 मोहिमांचे अपयश सहन करावे लागले. ( 1958-1964 ).                 तर रशियाला पाच मोहिम खर्ची घालाव्या लागल्या ( 1959).

चंद्रावर उपग्रह अलगद उतरवण्यासाठीही 1958 पासून प्रयत्न करणा-या  अमेरिका 1966 ला तर  रशियाला 1970 साली यश आले.

शेवटी पहिला मानव उतरवण्यात 16 जुलै 1969ला अमेरिकेला यश आले.  पहिला नंबर अमेरिकेचा आला म्हणुन रशिया त्या मार्गाला गेलाच नाही.  एवढंच नाही शुक्र, बुध आणि मंगळ ग्रहापर्यंत आपला उपग्रह पोहचावा यासाठीही  दोन्ही देशांमध्ये स्पर्धा सुरु होती ती वेगळीच.

पहिले अवकाश स्थानक स्थापन करण्याची स्पर्धा  रशियाने जिंकली. सॅलयुट-1 हे छोटेखानी अवकाश स्थानक  तीन अंतराळवीरांसह अवकाशात पाठवले. अमेरेकेला असे यश स्कायलॅबच्या रुपाने 1973 ला आले.     1958 ला स्फुटनिकच्या रुपाने सुरु झालेला दोन महाशक्तींदरम्यान सुरु झालेली अवकाश स्पर्धा 17 जुलै 1975 ला संपली.  रशियाचे सोयुझ आणि अमेरिकेचे अपोलो अवकाश स्थानक अवकाशात एकत्र जोडले गेले.  जमिनीवर स्पर्धा असेल पण अवकाशात स्पर्धा करणार नाही, अवकाशत मैत्री असेल असं अमेरिका -रशियाने जाहिर करत स्पर्धेला पूर्णविराम दिला.
( त्याबरोबर स्टार वॉरची म्हणजेच अवकाशातील युद्धाची, अवकाशातून   पाहिजे तेव्हा अणूबॉम्ब टाकण्याची भिती संपली. सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. )
     

काय मिळाले अवकाश स्पर्धेतून ?

1958 ते 1975 या काळात अवकाश स्पर्धेच्या निमित्ताने  हेरगिरी उपग्रह, हवामानाचा अभ्यास कऱणारे उपग्रह, दळणवळण उपग्रह ( Communication Satellites ), चंद्रासाठी सोडले गेलेले उपग्रह, दुस-याग्रहासाठी पाठवलेले उपग्रह किती पाठवले गेले असतील याची गणतीच नाही. म्हणजे प्रत्येक महिन्याला दोन्ही देशांमध्ये  किमान दोन विविध  प्रक्षेपणे होत होती,  दोन उपग्रह पाठवले जात होते.

एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सुरु झालेल्या स्पर्धेमुळे तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाला. अंदाज  न लागणा-या हवामानाचा अभ्यास करणारे उत्कृष्ठ उपग्रह विकसित झाले. दळणवळण उपग्रहामुळे  टीव्ही, रेडिओ माध्यमांमध्ये क्रांती झाली. दूरसंवेदक उपग्रहांमुळे पृथ्वी आणि तिच्या वातावरणाचा अभ्यास करता आला. चांद्र मोहिमांमुळे चंदामामा अधिक समजण्यास मदत झाली. तर चांद्रबाह्य मोहिमांमुळे सूर्यासह इतर ग्रहांमालेतील इतर ग्रहांबद्दलही आश्चर्यजनक माहिती समोर आली. स्पेस शटल सारखे अद्यावत अवकाश यानही याच स्पर्धेमुळे विकसित झाले.


अवकाश स्पर्धा आशियातील

आशियातील स्पर्धा सुरू होण्याचे श्रेय चीनला दिले पाहिजे.
15 ऑक्टोबर 2003 ला चीनने शेनझहोयू- 5 या अवकाश यानातून यॅग लेवेईला अवकाशात यशस्वीरीत्या धाडला. तेव्हा चीनच्या या यशानं अस्वस्थ झालेल्या भारताने काही दिवसांतच पहिल्यांदाच दळणवळण, पृथ्वीचा अभ्यास करणा-या उपग्रहाव्यतिरिक्त मोहीम  करण्याचे जाहीर  केले. तत्कालीन  पंतप्रधान अटलबिहारी ह्यांनी चांद्रमोहीम हाती घेण्याचे जाहीर करत 2008 पर्यंत चंद्रावर अवकाश यान उतरवणार असल्याचेही घोषित करुन टाकले. आणि इथेच आशियातील अवकाश स्पर्धेला सुरुवात झाली.  चीननेही 2007 ला चंद्रावर अवकाश यान पाठवण्याचे जाहीर  करत कामाला सुरुवात केली.

1990 ला चंद्राभोवती आणि 2004 ला मंगळाभोवती उपग्रह धाडणारा जपान तोपर्यंत काहीसा स्वस्थ बसला होता. भारत-चीनबरोबर तोही शर्यतीत उतरला.  योगायोग म्हणा किंवा एकमेकांचा अंदाज घेतल्यावर म्हणा 2005 पर्यंत तिन्ही देशांनी अवकाशातील पुढील 25 वर्षांचे उद्दीष्ट जाहीर  करुन टाकले.

                                       भारत       चीन         जपान

चंद्रावर धावती                2013         2013        2013
गाडी-बग्गी /  रोबो
चंद्रावर मानव                 2030        2030         2030
अवकाशात मानव           2015        2003         2020
स्पेस शटल                  2011-11      2015 ?     1996 ( अर्धवट )नवीन उद्दीष्ट लवकरच
( अवकाश यान )
मंगळ मोहिम              2013-15       2011       1998 ( अर्धवट ) नवीन उद्दीष्ट लवकरच
सूर्य मोहीम                     2012        2015 ?     1976 ( अर्धवट ) नवीन उद्दीष्ट जाहिर                                                                                                     नाही


एवढंच नाही तर नेहमी अमेरिकेला खुपत असलेला इराणही स्पर्धेत उतरला आहे.   2 फेब्रुवारीला 2009 ला पहिला उपग्रह स्वबळावर पाठवणा-या  इराणनेही 2021 पर्यंत अवकाशात समानव मोहीम  आखणार असल्याचे जाहीर केले आहे.  एवढंच नव्हे भारत-चीनची प्रगती लक्षात घेऊन स्फुर्ती घेत ( खरं तर आपण मागे पडू नये या विचाराने )  इंडोनेशिया, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, थायलंड या देशांनी आपणंही स्वतःचे उपग्रह पाठवणार असल्याचं जाहीर करत कामाला सुरुवात केली आहे.


स्पर्धेने काय होणार....?....

पुन्हा एकदा चांद्र विजय
1969-71 दरम्यान यशस्वी  चांद्र मोहिमेनंतर मंगळावर 2000 पर्यंत मानव उतरवणार असं अमेरिकेने जाहीर केले.  मंगळ तर नाहीच पण चंद्राकडे  अमेरिकबरोबर रशियाचेही दुर्लक्ष झाले. 1971 पर्यंत 100 पेक्षा जास्त मोहिमा झाल्या असतांना 1975 ते अगदी 2004 पर्यंत हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या थोड्या मोहिमा पार पडल्या.  मात्र 2004 नंतर आशियातील चांद्रमोहिमांची घोषणा लक्षात घेतल्यावर अमेरिकेच्या मोहिमांनी जोर धरला आहे.  धाकटे जॉर्ज बुश आणि ओबामा ह्यांनी सत्तेत असतांना चांद्र वसाहतीसाच्या संशोधनासाठी विशेष निधीही मंजूर करुन घेतलाच पण त्याचा पाठपुरवठाही सुरु केलाय. त्यामुळे 2025 पर्यंत अमेरिकेची चांद्रवसाहत स्थापन झाली तर आश्चर्य वाटायला नको. या सर्वांमागे चंद्रावर असलेल्या खनिज संपत्तीकडेही अनेकांचा डोळा आहे हे विसरू  नये.


उपग्रह पाठवा आता स्वस्तात 

1990 पर्यंत स्वतःचा देशाचा उपग्रह असावा यासाठी आर्थिक स्थिती चांगला असलेला देश प्रयत्न करत होता. स्वतःचे उपग्रह स्वतः बांधत होता. पण उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी दोनच पर्याय होत  अमेरिका आणि रशिया. त्यात युरोपीयन स्पेस एजन्सीसुद्धा महागडी ठरत होती.

1990 नंतर मात्र जगात भारत हा एक सर्वात स्वस्त पर्याय म्हणुन पुढे आला. चीननंही आपला पोलादी पडदा काही प्रमाणात बाजूला करत या स्पर्धेत उतरला.  त्यामुळे जगातील गरीब देशसुद्धा स्वतःचे उपग्रह पाठवण्यासाठी भारत-चीन आणि जपानचीही मदत घेत आहेत. त्यामुळे हे तीन देश जेव्हा एखादं प्रक्षेपण करत असतात तेव्हा ते एका वेळी तीन पेक्षा जास्त ( दोनपेक्षा जास्त इतर देशांचे उपग्रह ) सोडत असतात. म्हणुनच भारतानं 2008 मध्ये एकाच वेळी 10 उपग्रह सोडत विश्वविक्रम केला होता.



अवकाश - उपग्रह तंत्रज्ञान सहज उपलब्ध होणार

शीतयुद्ध ओसरल्यानंतरही रशिया काय अमेरिका
काय अगदी बलाढ्य अशी युरोपियन स्पेस एजन्सी  उपग्रहाचं तंत्रज्ञान सहजासहजी कोणाला देत नव्हती. असे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी प्रसंगी दुस-या देशाला काहीतरी तडजोड करणं भाग पडत असे.  मात्र आता भारत-चीन-जपानसारखे सशक्त पर्याय समोर आल्याने अनेक देश स्वबळावर तंत्रज्ञान विकसित करत आहेत. त्यामुळे अगदीच नवीन असलेल्या देशांना या त्रिकुटासह इतर देशांची सहज मदत होणार आहे.


नवीन अवकाश स्थानकांची निर्मिती  

सध्या International Space Station  बांधण्याचा कार्यक्रम जोरात सुरु असुन जमिनीपासून 200 किलोमीटर उंचीवर ते वेगाने भ्रमण करत आहे. यासाठी अमेरिका, रशिया, युरोपियन देशांसह जगातील 15 देश सहभागी झाले आहेत. असं काम अत्यंत महागडं असल्यानेच एवढे देश एकत्र आले आहेत.
 मात्र आशियातील अनेक देश अवकाश स्पर्धेत उतरले असल्याने अवकाश स्थानकांच्या निर्मितीचे आवाहन प्रत्येक देश स्वतंत्रपणे झेलु शकतील अशी शक्यता निर्माण लवकरच होईल. कारण स्पर्धेमुळे स्वतंत्र विचारांना, कार्यक्रमांना खरा वेग येणार आहे.

समारोप

शीतयुद्धातील अवकाश युद्ध हे एकमेकावर कुरघोडी कऱण्यासाठी होती.  ती स्पर्धा खरोखर जीवघेणी होतीच, पण त्यासाठी दोन्ही देशांनी प्रचंड पैसा पणाला लावला होता. त्यामुळे तंत्रज्ञान तर विकसित झाले, पण  ही स्पर्धा योग्य नसल्याचे दोघांच्या लवकरच लक्षात आले.

आशियातील स्पर्धा मात्र निकोप आहे. इथे कोणी कोणाविरुद्ध लढत नाहीये, कोणाच्या अस्तित्वाची लढाई नाहीये.  त्यामुळे अवकाश तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसित होईल आणि सोपे होईल. सर्व सुरळित झाले तर 30 वर्षात भारत-चीन-जपान या त्रिकुटाच्या चांद्र वा-या सुरु होतील अशी भविष्यवाणी केली तर ती नक्की खोटी ठरणार नाही, एवढे नक्की.

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...