Tuesday, May 15, 2018

' इस्त्रो ' चे बिझी वेळापत्रक.....




शीत युद्धानंतर बहुदा पहिल्यांदाच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींनी गेल्या काही महिन्यांत वेग घेतला आहे. शीत युद्ध ऐन जोमात असल्याच्या काळांत १९५७ ला पहिला कृत्रिम उपग्रह सोव्हिएत रशियाने प्रक्षेपित केल्यापासून १९६९ ला चंद्रावर अमिरिकचे अंतराळवीर उरतेपर्यंत एक जबरदस्त अवकाश स्पर्धा अमेरिका आणि रशिया दरम्यान सुरु होती. प्रत्येक महिन्याला विविध प्रकारचे दोनपेक्षा जास्त उपग्रह दोन्ही देशांकडून अवकाशात धाडले जात होते. 

तसंच काहीसं गेल्या काही महिन्यांपासून सुरु आहे. कारण विविध प्रकारचे - क्षमतेचे उपग्रह सोडण्याचा मानवी अवकाश मोहिम करण्याचाचंद्र - मंगळ - गुरु - लघुग्रह अशा विविध ठिकाणी अवकाश याने पाठवण्याचा सपाटा गेल्या काही महिन्यांत बघायला मिळाला आहे. सध्या कोणत्याही देशांमध्ये शीतयुद्ध अस्तित्वात नसले तरी अवकाश मोहिमांचा वेग निश्चितच वाढला आहे. स्पर्धात्मक नव्हे तर विशिष्ट हेतू असलेल्या गुणात्मक मोहिमांची भर पडत चालली आहे. 

कालपरवा म्हणजे अगदी ५ मे ला आणखी एक यान अमेरिकेच्या नासाने मंगळ ग्रहाच्या दिशेने धा़डले. तर या वर्षाच्या अखेरीस चीन त्यांचे दुसरे यान चंद्रावर उतरवणार आहे, तेही कधीही न दिसणा-या चंद्राच्या दुस-या बाजूला. त्यातच आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकां विविध समानवी मोहिमा सातत्याने सुरु आहेत. युरोपयिन स्पेस एजन्सी दर महिन्याला एक पेक्षा जास्त उपग्रह प्रक्षेपित करणा-या मोहिमांमध्ये व्यस्त आहे. हे सर्व सांगायचे कारण भारताची अवकाश संस्थाभारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो येणा-या काळांत अशीच काहीशीव्यस्त असणार आहे.

साधारण २० वर्षापुर्वी वर्षातून एक - दोन उपग्रह प्रक्षेपित करणा-या मोहिम इस्त्रो करायची. आता या वर्षापासून हे प्रमाण वर्षाला १२ म्हणजेच महिन्याला एक मोहिम अशा स्थितीपर्यंत पोहचत आहे, अशी क्षमता इस्त्रोने गेल्या अनेक वर्षांच्या अथक तपश्चर्येने आता मिळवली आहे.

या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यांत इस्त्रो महत्वकांक्षी 

अशी चांद्रयान - २ मोहिम पार पाडणार आहे. खरं तर एप्रिल - मे महिन्यात ही मोहिम होणार होती पण चांद्रयानाच्या आणखी काही चाचण्या करणे आवश्यक असल्याचं लक्षात आल्यावर ही मोहिम पुढे म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पूढे ढकलण्यात आली आहे. असं असलं तरी यानिमित्ताने इस्त्रोच्या अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे नाणे जगाच्या पटलावर खणखणीत वाजणार आहे.  या मोहिमेत चंद्राभोवती एक यान फिरत ठेवत चंद्राचा अभ्यास केला जाणार आहे. तर कधीही स्पर्श न झालेल्या दक्षिण ध्रुवावरचांद्रयानचे Lander आणि Rover उतरवणार आहे. हे रोव्हर चांद्र भुमिवर फिरत चंद्रभुमिचा, चंद्रावरील मातीचा अभ्यास करणार आहे. २००८ च्या चांद्रयान - १ मोहिमेत चंद्रावर जमिनीखाली पाणी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. तेव्हा चांद्रयान - २ मोहिमेच्या माध्यमातून अजुनही गुढ असलेल्या या चंद्राची आणखी वेगळी माहिती हाती लागेल अशी अपेक्षा आहे.  

एकीकडे चांद्रयान -२ मोहिमेवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले असले तरी या वर्षाच्या अखेरीस मंगळयान - २ मोहिमेचा कागदावरचा आराखडा तयार करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. हे काम २०१९ च्या मध्यात पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. तर २०१९ -२० ही पुढील दोन वर्षे मंगळयान - २ मोहिमतील आवश्यक यान - उपकरणे प्रत्यक्ष तयार करण्यात इस्त्रोचे शास्त्रज्ञ हे बिझी असणार आहेत. तर २०२१ मध्ये मंगळयान - २ मोहिम प्रत्यक्षात येणार आहे. चांद्रयान – २ मोहिमेप्रमाणे मंगळयान -२ मोहिमेत मंगळ ग्रहावर एक रोव्हर उतरवला जाणार आहे,मंगळ भुमिचा अभ्यास केला जाणार आहे.

या वर्षी शुक्र ग्रहावर पाठवण्याच्या यानाबाबत आराखडे बनवायला इस्त्रो सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या सुरुवातीला शुक्र ग्रहाचा कसा अभ्यास करता येईल याबाबत सुचना – कल्पना मागवण्यात आल्या होत्या. शुक्र ग्रहाभोवती १७५ किलो वजनाचा उपग्रह इस्त्रो पाठवणार आहे. हा उपग्रह शुक्र ग्रहाभोवती ५०० ते ६०,००० किमी अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत शुक्र ग्रहाचा अभ्यास करणार आहे. २०२० नंतर ही मोहिम प्रत्यक्षात येणार आहे.  

येत्या काही महिन्यांत ‘ आदित्य़ ‘ मोहिमेवरच्या कामालाही सुरुवात होणार आहे. सुर्याच्या बाहेरील वातावरणाचा - ‘ कोरोना ‘ चा अभ्यास हा आदित्य नावाचा उपग्रह करणार आहे. हा सुमारे २५० किलो वजनाचा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे. या अंतरावर पृथ्वीचे आणि सुर्याचे गुरुत्वाकर्षण बल हे समसमान असते. २०१९ मध्ये ही मोहिम प्रत्यक्षात येईल अशी अपेक्षा आहे.

तर एकाच मोहिमेत शुक्र आणि गुरु ग्रहाचा वेध घेणा-या मोहिमेचा इस्त्रो विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. इस्त्रो जगात स्वस्त अशा अवकाश मोहिमांसाठी प्रसिद्ध आहे. आधी संबंधित उपग्रह हा शुक्र ग्रहाच्या जवळ पाठवायचा ज्यासाठी फक्त ३ महिन्याचा अवधी लागेल. तिथे काही महिने शुक्राचा अभ्यास केल्यावर शुक्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचा वापर करत हा उपग्रह सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह गुरु ग्रहाच्या दिशेने पाठवायचा. तेव्हा एकाच मोहिमेत दोन ग्रहांचा वेध घेण्याचा इस्त्रोचा प्रयत्न असणार आहे. मात्र अशा या बहुउद्देशीय मोहिमेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा इस्त्रोने दिलेला नाहीये.

नासाप्रमाणे भारतीय स्पेस शटल बनवण्याचा इस्त्रो प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून १.७५ टन वजनाचे छोटे विमान रॉकेटच्या शेंड्यावर बसवून ६५ किमी उंचीपर्यंत नेण्याचा प्रयोग ऑगस्टम २०१६ मध्ये इस्त्रोने केला होता. अशा मोठ्या आकाराच्या स्पेस शटलच्या माध्यमातून भारतीय अंतराळवीर अवकाशात नेता येईल तसंच या स्पेस शटलच्या माध्यमातून अवकाशात जाऊन उपग्रह सोडता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा खर्च कमी होणार आहे. तेव्हा या वर्षी अशा स्पेस शटलची दुसरी चाचणी होणार आहे. मात्र याबाबत इस्त्रो खुपच गुप्तता बाळगत आहे.

थोडक्यात नेहमीच्या उपग्रह प्रक्षेपणाच्या मोहिमांशिवाय इस्त्रो विविध मोहिमांच्या माध्यमातून यापुढच्या काळांत अतिशय व्यस्त असणार आहे. 

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...