Thursday, July 23, 2020

मंगळ मोहिमा जोरात


अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या मंगळ ग्रह चर्चेत आहे. कारण विविध तीन देशांच्या तीन मंगळ मोहीमा सुरू आहेत.  

1...UAE 


दोन दिवसांपूर्वी संयुक्त अरब अमिरात - UAE ने ' होप मार्स मिशन ' अंर्तगत 1350 किलो वजनाचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने धाडला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचण्याचे नियोजन असून या उपग्रहाद्वारे मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. खरं तर विज्ञान क्षेत्रात ( खरं तर कुठल्याच बाबतीत ) जात - धर्म याचा उल्लेख करणे चुकीचे आहे. तरी पण अरबी देशात ( एका मुस्लिम राष्ट्राने ) असे पाऊल उचलणे कौतुकास्पद आहे. जपानच्या रॉकेटच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशात धाडला गेला आहे.

2...चीन


असं असतांना काही तासांपूर्वी चीनने Tianwen - 1 नावाचा 5 हजार किलो वजनाचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने धाडला. चीनची ही दुसरी मंगळ मोहीम आहे. 2011 मध्ये एक उपग्रह मंगळ ग्रहाच्या दिशेने पाठवण्याचा चीनने प्रयन्त केला होता. मात्र ज्या रशियाच्या रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण केले जात होते ते रॉकेट तांत्रिक बिघाडाद्वारे हवेत नष्ट झाले होते. 

यावेळी स्वतःच्या शक्तिशाली लॉंग मार्च - 5 या बलाढ्य - शक्तिशाली रॉकेटद्वारे उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण चीनने केले आहे. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे मंगळ ग्रहाभोवती पोहचतांना पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर रोव्हर उतरवण्याचे चीनने नियोजन केले आहे. साधारण फ्रेब्रुवारी 2021 मध्ये या रोव्हरला घेऊन चीनचा उपग्रह मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहचण्याचे नियोजन आहे. तर 23 एप्रिल 2021 च्या सुमारास मंगळ ग्रहावर रोव्हर उतरवण्याचा चीनचा प्रयत्न असेल. हे सर्व जर यशस्वी झालं तर पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहावर पोहचत रोव्हर उतरवणारा पहिला देश म्हणून चीनच्या नावावर विक्रम जमा होणार आहे. 

3...नासा


तर येत्या 30 जुलै ला नासा ही ' MARS 2020 ' नावाचा आत्तापर्यंतचा सर्वात अत्याधुनिक रोव्हर ज्याचे वजन सुमारे एक हजार किलो आहे, हा मंगळ ग्रहाच्या दिशेने पाठवणार आहे. 18 फेब्रुवारी 2021 ला मंगळ ग्रहावर उतरण्याचे नियोजन आहे. आत्तापर्यंत नासाने मंगळ ग्रहावर एकूण 4 रोव्हर यशस्वीरित्या उतरवले आहेत. यापैकी Mars 2020 हा सर्वात अत्याधुनिक रोव्हर असणार आहे. या रोव्हरमध्ये विविध प्रकारचे कॅमेरे, माती - हवा यांचे विश्लेषण करणारी उपकरणे आहेत. विशेष म्हणजे फक्त 1.8 किलो वजनाचे छोटेखानी हेलिकॉप्टर या रोव्हर सोबत असणार आहे. हे उडवल्याने मंगळ ग्रहावर जमिनीलगत असलेल्या हवेचा दाब - घनता याचा अभ्यास करता येणार आहे.

थोडक्यात जुलै महिन्यात 3 मंगळ ग्रहावरील मोहिमा मार्गी लागत आहेत. पण हाच का कालावधी ? कारण पुढील काही महिन्यात म्हणजेच 2021 फेब्रुवारीपर्यन्त मंगळ ग्रहाच्या कक्षेत सर्वात कमी अंतर पार करून पोहचता येणार आहे. तेव्हा जुलै महिना मंगळ ग्रहावरील मोहीम आखण्यासाठी lauch window ठरला आहे. 

तेव्हा 2021 चा फेब्रुवारी महिना अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात रुची असणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. 

https://twitter.com/globaltimesnews/status/1285465704934694912?s=19

https://twitter.com/NASAJPL/status/1255501030906834948?s=19

https://twitter.com/EvanKirstel/status/1198712898102673408?s=19

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...