Wednesday, July 21, 2021

अवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा….


अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या १० दिवसांत दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. 

Virgin Galactic कंपनीचे रिचर्ड ब्रॅनसोन यांनी ११ जुलैला अवकाश सफर केली. या मोहिमेत अवकाशात घेऊन गेलेल्या छोटेखानी Unity 22 या विमानात रिचर्ड ब्रॅनसोनसह तीन प्रवासी होते, तर विमानाचे सारथ्य करणारे २ पायलट होते. या विमानाने ८६.१८२ किलोमीटर एवढी उंची गाठली. जगाने ठरवलेल्या मापदंडानुसार समुद्र पातळीपासून १०० किमीच्या वर अवकाश चालू होते. तर नेहमीच स्वतःची टीमकी वाजवणाऱ्या अमेरिकेच्या दृष्टीने ८० किलोेमीटर या उंचीपासून अवकाश सुरु होते. तेव्हा या वादात जास्त चर्चा न करता पुढे जाऊया. तर Unity 22 चे हे उड्डाण एकुण ३६ मिनीटांचे होते. साधारण दोन मिनीटे या चार प्रवाशांनी - अंतराळवीरांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा पुरेपुर अनुभव घेतला. 

तर Blue Origin कंपनीचे जेफ बेझोस यांनी ३ सह प्रवाशांसह New Shepard या रॉकेटच्या सहाय्याने २० जुलैला अवकाश कुपीतून अंतराळ प्रवास केला. या अवकाश कुपीने १०७ किलोमीटर एवढी उंची गाठली. प्रत्यक्ष प्रवास हा १० मिनीटात संपला, तर शुन्य गुरुत्वाकर्षणचा अनुभव या चार प्रवाशांना साधारण ३ मिनीटे घेता आला. जेफ बेझोस यांच्याबरोबर तीन सह प्रवासी होते....एक म्हणजे जेफ यांचे बंधू मार्क बेझोस, तर १८ वर्षाचा Olive Daeman तर ८२ वर्षाच्या Wally Funk. म्हणजेच जागतिक मापदंडानुसार या अवकाश कुपीने अवकाशात प्रवेश केलाच पण त्याचबरोबर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर प्रवाशांना ( आता अंतराळवीरांना ) अवकाशात नेण्याचा विक्रमही केला. 

तेव्हा एलॉन मस्क यांच्या 'SpaceX' या खाजगी कंपनीनंतर अवकाशात अंतराळवीर नेण्याचे काम रिचर्ड ब्रॅनसोन यांच्या Virgin Galactic आणि जेफ बेझोस यांच्या Blue Origin या खाजगी कंपनीने केलं आहे. हे तर काहीच नाही  Blue Origin कंपनीने आगामी अवकाश सफरीच्या मोहिमांसाठी बुकिंगही सुरु केलं आहे. 

थोडक्यात Virgin Galactic आणि Blue Origin या खाजगी कंपन्यांनी अवकाश सफरीचा आनंद लुटण्यासाठी दरवाजे खऱ्या अर्थाने खुले केले आहेत. अर्थात यासाठी बक्कळ पैसा मोजावा लागणार आहे. असं असलं तरी भविष्यात आणखी खाजगी कंपन्या, देशही या अवकाश पर्यंटन व्यवसायात उतरतील आणि अवकाश सफर ही bucket list सारखी सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल, शक्य होईल. 

बघुया तुम्ही आम्ही कधी ही अवकाश सफर करतो ते...

#VirginGalactic
#Unity22
#RichardBranson
#BlueOrigin
#NewShepard
#jeffbezosMonday, June 14, 2021

पुढील काही वर्षांत सर्वसामान्यांना अवकाश सफर सहज शक्य....


#कुतूहल
#curiosity 
#BlueOrigin 
#NewShepard 

विमान प्रवासाचं नाविण्य हे केव्हाच संपलं आहे. तुम्ही आम्ही किमान एकदा तरी विमान प्रवास हा केला असेलच यात शंका नाही. असंच काहीसं पुढील काही वर्षांत अवकाश सफरीबद्दल होणार आहे. पुढील काही वर्षे म्हणजे किती तर अगदी ५०-६० वर्षात ???  किंवा त्याआधीही अवकाश सफर शक्य आहे.

हे शक्य होणार आहे कारण अवकाश क्षेत्र हे देशापुरतं मर्यादीत राहिलं नसून आता खाजगी कपंन्यांनी अवकाश मोहिमांमध्ये पाऊल टाकलं आहे. 

हे सर्व लिहिण्याचं निमित्त झालं आहे ते अवकाश प्रवासासाठी असलेल्या अवकाश कुपीतील एका सीटच्या झालेल्या लिलावाचे. 

 'ब्लू ओरीजीन' या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने अवकाश प्रवासासाठी तयार केलेल्या अवकाश कुपीतील एका जागेचा - सीटचा लीलाव करत ती जागा २८ मिलीयन डॉलर्सला ( म्हणजेच २०५ कोटी रुपयांना ) विकली. ब्लु ओरिजीन कंपनीची स्थापना केली ती ध्येयवेड्या जेफ बेझोस या अब्जाधीशाने. हेच ते ज्यांनी 'अमेझॉन' कंपनी स्थापन करत किरकोळ विक्रेता, ई कॉमर्स क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या जेफ बेझोसने नासातील तंत्रज्ञ - शास्त्रज्ञ तसंच विविध अभियंता यांना हाताशी धरून 'ब्लु ओरिजन' कंपनी स्थापन केली. उत्तम व्यवस्थापनाद्वारे ही कंपनीने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आव्हान झेलण्यास सज्ज झाली आहे. 

या ब्लु ओरिजिन कंपनीने गेल्या काही वर्षात चाचण्या करत ' New Shepard ' हे रॉकेट अवकाश मोहिमांसाठी सज्ज केलं आहे. हे रॉकेट अवकाश कुपीला पृथ्वीच्या वातावरणाबाहेर नेऊन पोहचवेल. आता वातावरणाबाहेर म्हणजे किती उंचीवर तर जमिनीपासून १०० किलोमीटरच्या वर म्हणजे साधारण ३ लाख ३० हजार फुट उंचीवर. साधारण या उंचीवर वातावरणातील विविध थर - स्तर संपलेले असतात आणि निर्वात पोकळीला सुरुवात झालेली असते. या १०० किलोमीटरच्या उंचीला Karman line म्हणतात. जगात सर्वसाधारणपणे मान्य करण्यात आलं आहे की Karman line च्या वर किंवा या उंचीपासून अवकाश सुरु होते.

तेव्हा ब्लु ओरिजिनचे  New Shepard हे रॉकेट अवकाश कुपीला या उंचीच्या वर अवकाश कुपीला सोडेल. अवकाश कुपी काही मिनीटे १०० किमीच्या वर प्रवास करेल. याच काळांत अवकाश कुपीतील प्रवाशांना  गुरुत्वाकर्षणविरहित अवस्थेचा स्वप्नवत असा अनुभव घेता येईल. या उंचीवरुन पृथ्वीची वक्रता, निळा रंग, समुद्र......एकुणच पृथ्वीचे विलोभनीय दृश्य अनुभवता येईल. त्यानंतर गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या अवकाश कुपीचा जमिनीच्या दिशेने प्रवास सुरु होईल. तीन पॅराशुटच्या सहाय्याने मग ही अवकाश कुपी जमिनीवर सुखरुप उतरेल....असं या सर्व अवकाश प्रवासाचे - वारीचे - सफरीचे नियोजन असणार आहे. हा सर्व प्रवास म्हणजे उड्डाणपासून ते जमिनीवर येईपर्यंतचा फक्त १० ते १२ मिनीटांचा असेल. तसंच उड्डाण झालेल्या ठिकाणासून ते जमिनीवर उतरण्याचं अंतर हे सुद्धा फक्त काही किलोमीटरचे असणार आहे. 

हे उड्डाण suborbital प्रकारातील असणार आहे. म्हणजे अवकाश कुपी हे संपुर्ण पृथ्वीला प्रदक्षणा घालणार नाही, तर पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन लगेच वातावरणात प्रवेश करेल, जमिनीवर पोहचेल. 

तर असं 'ब्लु ओरिजन' कंपनीचे समानव पहिलं उड्डाण येत्या २० जुलैला होणार आहे. या अवकाश कुपीमधून एकुण चार जण अवकाश प्रवास करणार आहेत. एक स्वतः जेफ बेझोस, त्यांचे बंधू मार्क तर तिसऱ्या जागेचा - सीटचा लिलाव करण्यात आला. या लिलावात १५९ देशातील ७,६०० पेक्षा जास्त लोकांनी ( ऑनलाईन ) सहभाग नोंदवला हे विशेष. ही जागा सुमारे २०५ कोटी रुपयांना विकण्यात आली असून लिलावातील त्या विजेत्याचे नाव अजुन जाहिर करण्यात आलेले नाही . तर चौथ्या जागेवर कोण असेल हे सुद्धा लवकरच 'ब्लु ओरिजन' तर्फे जाहिर केलं जाणार आहे. 

यापुढच्या काळांत अशा मोहिमा राबवल्या जाणार असून आणखी शक्तीशाली रॉकेट बनवण्याचा 'ब्लु ओरिजन' मानस आहे. एवढंच नव्हे तर नासाच्या २०२४ पासुनच्या समानवी चांद्र मोहिमेत चंद्रावर कार्गो - सामान पोहचण्याचे कंत्राट हे याच  'ब्लु ओरिजन' ला मिळाले आहे हे विशेष. 

तर अमेरिकेत एलॉन मस्क यांची 'स्पेस एक्स', जेफ बेझोस यांची 'ब्लु ओरिजन', रिचर्ड ब्रॅंनसोन यांची Virgin Galactic यासारख्या खाजगी कंपन्या या अवकाश मोहिमा करत आहेत, भविष्यात करणार आहेत. भले यांना सुरुवातीला नासाने मदत केली असली तरी या कंपन्या स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. अमेरिकेत काय जगात काय विविध खाजगी कंपन्या या कृत्रिम उपग्रह, रॉकेटचे भाग बनवण्यावर आधीपासून काम करत होत्या, आहेत. आता यापैकी काही कंपन्यानी अवकाश समानवी मोहिमा करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले आहे, टाकायला सुरुवात केली आहे.

एकतर अवकाश मोहिमा या अत्यंत खार्चिक असतात. तेव्हा अवकाश सफरीच्या माध्यमातून बक्कळ पैसाही अशा कंपन्यांना मिळवता येणार आहे. म्हणूनच अशा खाजगी कंपन्यांच्या प्रवेशामुळे, त्यांच्यातील स्पर्धेमुळे अवकाश प्रवास ही काही वर्षांनी सहजसाध्य गोष्ट झालेली असेल यात शंका नाही. त्यामुळेच भविष्यात गर्भश्रीमंत नाही तर उच्च मध्यमवर्ग त्यानंतर अगदी सर्वसामान्यही थोडी पैशाची साठवणूक करुन अवकाश वारी सहज करु शकेल. 

तेव्हा 'ब्लु ओरिजिन' ने केलेला अवकाश कुपीतील जागेचा - सीटचा लिलाव हे भविष्यातील अवकाश सफरीच्या मार्गातले एक छोटे पाऊल ठरलं आहे. 

अवकाश पर्यटनाची ही सुरुवात आहे. 

बघूया, सर्वसामान्यांना या सफरीसाठी किती काळ वाट पहावी लागते ते....

Saturday, June 5, 2021

पाणबुडीच्या बातमीच्या निमित्ताने......


संरक्षण विभागाच्या Defence Aquasition Council - संरक्षण अधिग्रहण परिषदेने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेत देशांत सहा पाणबुड्या बांधण्याचा मार्ग मोकळा केला. या परिषदेने देशात पाणबुड्यांची निर्मिती करु शकणाऱ्या दोन कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. माझगांव डॉक लिमिटेड आणि लार्सन अन्ड टौब्रो या दोन कंपन्यांची निवड परिषदेने केली आहे. यापुर्वीच पाणबुडीचे तंत्रज्ञान हस्तांतरीत करत भारतात पाणबुडी बांधू पहाणाऱ्या जगातील पाच कंपन्यांची निवड भारत सरकारने केली होती. या पाच कंपन्या म्हणजे रशिया, दक्षिण कोरीया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशांतील आहेत. 

आता दोन भारतीय कंपन्या आणि पाच परदेशातील कंपन्या यापैकी एक कंपनी असा करार अंतिम होणार आहे.

सुरुवातीला  परदेशातील कंपनी ही देशातल्या दोन्ही कंपन्यांशी करार करणार का एकाच कंपनीशी ? का देशातील दोन्ही कपंन्या या परदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांशी करार करणार ? यामध्ये अजुन स्पष्टता नाही किंवा किमान तसं जाहिर केललं नाही. असं असलं तरी यामधील सर्वोत्तम करार हा केंद्र सरकार नक्की करेल आणि देशात नव्या 6 पाणबुड्या बांधणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. अर्थात यासाठी 2-3 वर्ष सहज जाणार आहेत. अशी अपेक्षा आहे 2030 मध्ये पहिली पाणबुडी ही नौदलात दाखल झालेली असेल. 

या ताज्या दमाच्या पाणबुडी निर्मितीच्या प्रकल्पाला P-75I ( पी -75 आय ) असं सांकेतीक नाव देण्यात आलं आहे. हा सुमारे 43 हजार कोटी रुपयांचा करार असणार आहे. Make In India कार्यक्रमा अंतर्गत ही एक मोठा संरक्षण करार ठरणार आहे. परदेशातील पाणबुडीचे तंंत्रज्ञान हस्तांतरीत करत देशात पाणबुडी बांधण्याचा हा कार्यक्रम 'सामरिक भागीदारी' प्रकारातील असल्याचं केंद्र सरकारने जाहिर केलं आहे.


नव्या पाणबुडीत काय असणार आहे ?  

या नव्या पाणबुड्या AIP तंत्रज्ञानावर चालणार आहे. यामुळे सध्या आपल्याकडे असलेल्या सिंधुघोष आणि शिशुमार श्रेणीतील डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या पाणबुडीपेक्षा या नव्या पाणबुड्या दिर्घकाळ पाण्याखाली संचार करु शकणार आहेत. पाण्याखालून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक पाणतीर ( torpedoes ), सोनार यंत्रणा या पाणबुडीत असणार आहेत. या नव्या पाणबुडीचे तंत्रज्ञान, युद्धसज्जता तेव्हा ( 2030 ) जगात सर्वोत्तम असेल यात शंका नाही. यामुळे नौदलाच्या ताकदीत मोलाची भर पडणार आहे. 


६ नव्या पाणबुड्या पुरेशा आहेत ?

याचे उत्तर अर्थात नाही. भारताच्या तीन्ही बाजुला असलेला समुद्राचा पसारा, या भागातून असलेली जलवाहतूकचीनची वाढती ताकद लक्षात घेता भारताकडे 'किमान' - 'किमान' 24 पाणबुड्या असणे आवश्यक आहे. अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या आणि इतर तंत्रज्ञान असलेल्या...अशा मिळून 24 पाणबुड्या असं निश्चित करण्यात आलं आहे. 

सध्या भारतीय नौदलाकडे 8 सिंधुघोष वर्गातील पाणबुड्याशिशुमार वर्गातील 4, कलवरी वर्गातील ताज्या दमाच्या 3 अशा डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारीत एकुण 15 आणि एक अणु पाणबुडी आयएनएस अरिहंत अशा एकुण 16 पाणबुड्या आहेत. यापैकी सिंधुघोष आणि शिशुमार वर्गातील 8 पाणबुड्या या 30 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आहेत. 

म्हणजे 2030 पर्यंत या 15 पैकी निम्म्यापेक्षा जास्त पाणबुड्या या निवृत्त झालेल्या असतील, ज्या काही उरलेल्या असतील त्यांचे आयुष्य संपण्याच्या मार्गावर असेल. किंवा त्या पाणबुड्यांना नौसैनिकांना प्रशिक्षण आणि खोल नसलेल्या समुद्रात डेहळणी करण्यापुरते काम ठवेलेलं असेल. सर्व काही सुरळित सुरु झालं तर P-75 I प्रकारातील 6 नव्या पाणबुड्या या 2030 पासून दाखल व्हायला सुरुवात होईल. असं धरुया की 2035-36 पर्यंत नव्या 6 पाणबुड्या दाखल झालेल्या असतील. तोपर्यंत कलवरी वर्गातील आणखी 3 पाणबुड्या ( एकुण 6 ) दाखल झालेल्या असतील. तर अरिहंत वर्गातील एकूण 3 अणु पाणबुड्याआंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मारा करणाऱ्या 3-4 पाणबुड्या दाखल होतील अशी आशा धरुया. अणु पाणबुड्या बांधणे हे अत्यंत क्लिष्ट, वेळखाऊ काम असून भारताला अणु पाणबुडी बांधून, चाचण्यांचे सोपस्कार पार पाडून नौदलात दाखल होण्यासाठी सध्या 10 वर्षे सहज लागत आहेत.

तेव्हा 2035-36 पर्यंत सर्व पाणबुड्या मिळून 24 संख्याही गाठली जाणार नाहीये. 

तोपर्यंत चीनची ताकद आणखी वाढलेल असेल. असा अंदाज आहे की तोपर्यंत चीनकडे 20 पेक्षा जास्त अणु पाणबुड्या आणि किमान 40 इतर पाणबुड्या असतील. एवढंच नाही तर ज्या वेगाने चीनचा युद्धनौका बांधणीचा कार्यक्रम सुरु आहे ते बघता युद्धनौका आणि विमानवाहु युद्धनौका यांची फार मोठी भर पडलेली असेल. 2040 पर्यंत तर अमेरिकेच्या डोळ्याला डोळे भिडवता येईल एवढी चीनचे नौदल प्रबळ झालेले असेल. 

थोडक्यात 2035-36 पर्यंत नव्या P-75I पाणबुड्या दाखल होतांना, पाकिस्तान आणि चीन अशा दोन शत्रुंना दोन दिशेला अंगावर घेतांना, पाणबुड्यांच्या बाबतीत शस्त्रसज्ज होतांना भारताने गरजेपेक्षा कमीच मजल मारलेली असेल. असं असलं तरी पाणबुडी विरोधी स्टेल्थ युद्धनौका ( कमोर्टा श्रेणी ) दाखल होत आहेत, पाणबुडीचा सामना करण्यासाठी आवश्यक टेहळणी विमाने, हेलिकॉप्टर नौदलात दाखल होत आहेत, एवढंच नाही तर काही नव्या युद्धनौकाही लवकरच बांधल्या जाणार आहेत. एक प्रकारे पाणबुड्यांच्या कमी संख्येचं अवकाश आपण पाणबुडी विरोधी युद्धनौकांनी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. 

तेव्हा देशात पाणबुड्या बांधण्याचा वेग आणि संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. तेव्हा 6 पाणबुड्यांच्या बातमीने भविष्यात फार उणीव भरुन काढत दिलासा मिळेल अशी स्थिती अजिबात नाही हे वास्तव आहे.  

Friday, May 7, 2021

चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताची 35 वर्षे

एखाद्या अपघातामुळे जगामध्ये उलथापालथ होते का ? मानवी चुकीचे सर्वोच्च - टोकाचे उदाहरण कोणते असू शकते ? एखाद्या अपघातामुळे मुळ सिद्धांतावर आधारीत उद्योग हा ढवळून निघतो का ? एखादा अपघात हा विविध देशांमधील परस्पर सहकार्याची भावना जागृत करतो का ? 

याचे उत्तर चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात हे आहे. 

26 एप्रिल 1986 ला पहाटे 1 वाजून 23 मिनिटाच्या सुमारास वीज निर्मिती करणाऱ्या चेर्नोबिल अणुभटटी क्रमांक 4 मध्ये अपघात झाला. चेर्नोबिल हे ( तेव्हा ) सोव्हिएत रशियामध्ये होते आणि ( आता ) युक्रेन देशामध्ये उत्तर टोकाला बेलारुस देशाच्या सीमेजवळ प्रिपयाट ( Pripyat ) नदीच्या बाजूला आहे. या नदीच्या बाजुला 1977 ते 1983 या काळांत 3,200 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या एकुण चार अणुभट्ट्या उभारण्यात आल्या - चेर्नोबिल अणु ऊर्जा प्रकल्प. 

या सर्व अणुभट्ट्या या ग्राफाईट नियंत्रित अणुभट्टी तंत्रज्ञानावर आधारीत होत्या. यापैकी अणुभट्टी क्रमांक 4 ही 1983 ला कार्यान्वित झाली होती. यामध्ये काही चाचण्या सुरु असतांना हा अपघात झाला. चाचण्या करतांना नियमांकडे झालेले अक्षम्य असं दुर्लक्ष आणि सदोष अणुभट्टीची रचना यामुळे या अणुभट्टीमध्ये स्फोट झाला. यामुळे अणुभट्टीचा गाभा हा पुर्णपणे नष्ट झाला. या अणुभट्टीत असलेले किरणोत्सारी मुलदव्य हे खुले झाले,बाहेर पडले. अर्थात बहुतांश हे अपघाताच्या ठिकाणी जरी राहीले तरी मोठ्या प्रमाणात हे बाहेर फेकले गेले, हवेमुळे इतरत्र पसरले. 

हिरोशीमा अणु बॉम्ब हल्ल्याशी चेर्नोबिलची तुलना केली तर हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बमध्ये सुमारे 64 किलो समृद्ध युरेनियम वापरले गेले तर चेर्नोबिलमध्ये 180 टन विविध किरणोत्सारी मुलद्रव्य होते. हिरोशीमा अणु बॉम्ब हल्ल्यापेक्षा 400 पट किरणोत्सार हा चेर्नोबिल अपघातामध्ये बाहेर पडला. 

या अपघाताची तीव्रता लक्षात यायला तेव्हाच्या सोव्हिएत रशियाला काही तास गेले. मात्र त्यानंतर प्रशासनाने वेगाने पावले उचलली. त्यानंतर अवघ्या 24 तासांत चेर्नोबिलच्या परिघाताील सुमारे दिड लाखापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर टप्प्याटप्पाने 30 किमीचा परिसर मानव विरहित केला गेला. किरणोत्सार आणखी पसरु नये यासाठी या भागांत पिकलेले धान्य, फळे नष्ट करण्यात आली. पाळीव प्राणी, वन्य प्राणी यांना मारण्यात आले. 

सोव्हिएत रशियाच्या पोलादी पडद्यामुळे या अपघाताची माहिती देशाबाहेर जाऊ दिली गेली नाही हे खरे. मात्र तेव्हा हवेतून पसरलेल्या किरणोत्साराचे अंश हे जेव्हा इतर देशांमध्ये आढळले तेव्हा कुठे असा अणुभट्टीचा अपघात झाल्याचं सोेव्हिएत रशियाने मान्य केलं. 

मिखाईल गोबर्चेव्ह हे तेव्हाचे सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष होते. जगात सुरु असलेले, अमेरिकेशी भिडणारे रशियाचे शीत युद्ध उतरणीला लागले ते याच अध्यक्षांमुळे. खुला दृष्टीकोन ( glasnost ) आणि पुर्नरचना (  perestroika ) या दोन गोष्टी गोबर्चेव्ह यांनी सोव्हिएत रशियाला दिल्या आणि तेव्हाच्या दबलेल्या सोव्हिएतमध्ये क्रांतीचे वारे वाहू लागले आणि 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 

या सर्व घटनेला कारणीभूत ठरला चेर्नोबिल अणुभट्टीचा अपघात. या अपघातामुळेच तत्कालिन प्रशासन आणि राजकीय व्यवस्थेवर बोट ठेवायला अणु शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. सदोष अणुभट्टीची रचना, अपघाताची माहिती पसरु नये यासाठी सुरु असलेली दमनशाही, नियमांचा बागुलबुवा अशा अनेक गोष्टींवर शास्त्रज्ञांनी आवाज उठवला आणि अणुभट्टीबद्दल पुर्नविचार करण्यास सरकारला भाग पाडले. याचा परिणाम - प्रभाव अर्थात रशियाच्या सर्व घटकांमध्ये झिरपला, सोव्हिएत रशियात ठिकठिकाणी उठाव झाले आणि अखेर 1991 ला सोव्हिएत रशियाचे विघटन झाले. 

चेर्नोबिल अपघातामुळे किती लोक ठार झाले ?
अपघाताच्या ठिकाणी लगेच पोहचलेले अग्निशमन दलातील कर्मचारी, अणुभट्टीत काम करणारे कर्मचारी यापैकी 50 पेक्षा जास्त जणांचा एका महिन्यात किरणोत्सारामुळे मृत्यु झाला. तर अणुभट्टीपासून किरणोत्सार पसरु नये यासाठी जवळपास 6 लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या चेर्नोबिल आणि परिसरांत कामाला अहोरात्र जुंपण्यात आले. या सर्व लोकांना किरणोत्साराचा कमी अधिक प्रमाणात डोस मिळाला. अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरी यापैकी सुमारे एक लाखापर्यंत लोकांचा आत्तापर्यंत किरणोत्सारामुळे उद्भवलेल्या विविध आजारामुळे ( विविध कर्करोग ) मृत्यु झाला असावा असा अंदाज आहे. ( याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही ). 

तर किरणोत्सार हा आजुबाजुच्या देशांत काही प्रमाणात पसरला. यामुळे कमी अधिक प्रमाणात कर्करोगाने मृत्यु झाल्याचा अभ्यास सांगतो. हा आकडा किती तर तो 4 हजार ते 40 हजार इतका असावा असा अंदाज आहे. 

अपघातानंतर चेर्नोबिलच्या उर्वरित 3 अणु भट्टया या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या आहेत. 2 इतर दोन अणुभट्ट्यांचे काम हे अणुभट्टी क्रमांक 4 च्या अपघातानंतर थांबवण्यात आले. 

अपघातग्रस्त अणुभट्टी 4 मधून किरणोत्सार हा पुढील कित्येक वर्षे ( 20 हजार वर्षे ?? ) सुरुच रहाणार आहे. म्हणजे या अपघाताच्या जागेतून किरणोत्सार हा बाहेर पडतच रहाणार. तो इतरत्र पसरु नये यासाठी अपघातग्रस्त अणुभट्टीच्या भोवती सुरुवातीला क्रांक्रीटची भरभक्कम इमारत उभारण्यात आली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सहकार्य घेत अर्धवर्तुळाकार मिश्र धातूंचा भरभक्कम डोम उभारण्यात आला आहे. हा डोम पुढील काही वर्षे टिकेल. मग त्यानंतर आणखी सुरक्षात्मक उपाययोजना कराव्या लागतील. या डोमसाठीच निव्वळ 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झाला आहे. 

चेर्नोबिल अणु भट्टीचा परिसर कसा आहे ? 

2011 नंतर युक्रेन देशाने पर्यटनासाठी हा परिसर खुला केलेला आहे. अनेक निर्बंध यामध्ये आहेतच. अर्थात प्रत्यक्ष अपघात स्थळाजवळ जाण्याचा प्रश्नच येत नसला तरी दुरुन हा भाग बघता येतो. काही किलोमीटर परिसरात मानवी वस्ती अजुनही नाही. मात्र मानवाच्या अनुपस्थितीत या भागांत जीवसृष्टी मात्र चांगलीच बहरली आहे. झाडे -पशू पक्षी यांनी आपले पुर्ववत जीवन सुरु केले आहे.

अपघातामुळे काय फरक पडला ? 
 
आंतरराष्ट्रीय पातळीवर अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाबाबात देवाणघेवणा वाढली, विशेषतः अणुभट्ट्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबात खुली चर्चा व्हायला लागली. अणुभट्टी तंत्रज्ञान हे आणखी सुरक्षित केले गेले. अणुभट्टीचा अपघात झालाच तर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याबद्द्लच्या माहितीची देवाणघेणाण होऊ लागली, मदत घेतली जाऊ लागली. उदा..जपानच्या फुकुशिमा अपघाताच्या वेळी हे सहजपणे दिसुन आले.  

वर उल्लेख केल्याप्रमाणे या अपघातानंतर सोव्हिएत रशियाच्या विघटनासाठी पहिले पाऊल पडले, मग उठाव -मोर्चे - आंदोलने होत रशियाचे विघटन झाले, जगातील शीत युद्द समाप्त झाले. 
 
अर्थात या अपघातानंतर अणुभट्ट्यांना विरोधही विविध देशांमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. किरणोत्सारी कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे ऐरणीवर आला. फुकुशीमा अपघातानंतर तर जर्मनीने त्यांच्याकडे असलेल्या सर्व अणुभट्ट्या कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. 

अणु ऊर्जा अपघातामध्ये तीव्रतेसाठी विविध श्रेणी या निश्चित केल्या गेल्या आहेत. यामध्ये चेर्नोबिल अपघाताची गणना ही सर्वोच्च पातळीवर ( श्रेणी - 7 )  केली जाते. म्हणजेच हा आत्तापर्यंतचा सर्वात भीषण असा अणुभट्टीचा अपघात होता. फुकुशिमा अपघातही याच श्रेणीतला आहे. 

या चेर्नोबिल अणुभट्टी अपघातावर वर आत्तापर्यंत असंख्य गोष्टी लिहून आल्या आहेत, अभ्यास झाला आहे, प्रबंध सादर झाले आहेत, माहितीपट उपलब्ध आहेत. दोन वर्षापूर्वी हॉटस्टारवर आलेली चेर्नोबिल ही पाच भागांची सिरीज तर अप्रितमच आहे. 
 
चेर्नोबिल अणुभट्टीच्या अपघाताला 35 वर्ष झाल्याच्या निमित्ताने याबद्दल माहिती लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न होता. 

चेर्नोबिल अणुभट्टी अपघाताबद्दल काही माहितीपटाची लिंक शेयर करत आहे. जरुर बघावी......  

https://www.youtube.com/watch?v=pOzJQJ1yAaM ( 12.5 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=HIziLarTcss ( 46.41 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=UrbTTrgLB5A ( 3.28 मिनीटे ) 

https://www.youtube.com/watch?v=JgQ8fjr1i5M ( 1 तास 30 मिनीटे )

Saturday, May 1, 2021

इंडोनेशियाच्या पाणबुडी अपघाताच्या निमित्ताने.........


सध्याच्या कोरोना संकट काळांत आजूबाजूला, जगात सगळीकडे मृत्युचे थैमान सुरु आहे, मन सुन्न झालं आहे. 

असं असतांना एका अपघातामधील मृत्यु मनाला आणखी चटका लावून गेले. अपघात होता इंडोनेशिया नौदलाच्या पाणबुडीचा अपघात. यामध्ये KRA Nanggala नावाच्या सुमारे १३०० टन वजनाच्या पाणबुडीला पाणतीर डागण्याचा ( torpedo firing ) सराव करतांना जलसमाधी मिळाली. ही पाणबुडी सुमारे १५०० मीटर खोल समुद्रात बु़डाली. वीज पुरवठ्यात तांत्रित बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात पाणबुडीतील सर्वच्या सर्व ५३ नौसैनिक - अधिकारी यांचा मृत्यु झाला. 

जगातील संरक्षण क्षेत्रात विशेषतः पाणबुडी विभागांत अशा अपघातांकडे जरा जास्तच संवेदनशीलपणे बघितले जाते, मग ती पाणबुडी दोस्त राष्ट्राची असो, शुत्रपक्षाची किंवा तटस्थ संबंध असलेल्या देशाच्या नौदलाची. जेव्हा अशा पाणबुडीच्या अपघातांमध्ये नेमके कारण तेव्हा समोर येते त्याचा अभ्यास, त्याची दखल, त्याची नोंद हे पाणबुडी बाळगणारे देश घेतात. पाणबुडीमध्ये काम करणे हे नेहमीच एक आव्हानात्मक राहीले आहे. त्यामुळे पाणबुडी आणि त्यामध्ये काम करणाऱ्या, अत्यंत प्रशिक्षित मनुष्यबळाला संबंधित नौदल प्राणपणाने जपत असते. त्यामुळे इंडोनेशियाच्या पाणबुडीच्या अपघाताची दखल ही जगभरातील नौदलाने विशेषतः पाणबुडी बाळगणाऱ्या नौदलांनी घेतली आहे. 

पाणबुडी आणि प्रशिक्षित मुनष्यबळ - मुळात पाणबुडी ही युद्धसामग्रीमधील एक अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असलेलं शस्त्र आहे. डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणारी पाणबुडी असो किंवा अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी...यांची बांधणी मुळातच एक आव्हानात्मक काम राहिलं आहे. त्यामुळे सर्वच देशांना पाणबुडी बांधणे शक्य होत नाही. दुसरं महायुद्ध किंवा त्यानंतरचा शीत युद्धाचा काळाच्या तुलनेच सध्याच्या पाणबुड्या या दीर्घकाळ, शांतपणे, स्वतंःच्या अस्तित्वाचा ठावठिकाणा न लागू देता समुद्रात, समुद्राच्या पृष्ठभागाखाली मुक्तपणे संचार करु शकतात. विविध प्रकारच्या शस्त्रांमुळे -- पाणतिर ( Torpedo ), पाण्याखालून जमिनीवर - समुद्राच्या पृष्ठभागावरील युद्दनौकेवर मारा करता येतील अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे यांमुळे पाणबुडी हे नौदलाचे सर्वात घातक शस्त्र ठरते. त्यातच जर अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी असेल तर पाणबुडीची संचार-मारक क्षमता शतपटीने वाढलेली असते. विविध प्रकारची सोनार यंत्रणा यामुळे पाण्याखालून संचार करतांना आजुबाजुला काय आहे, समुद्राच्या पृष्ठभागावर कोण आहे याचा अचुक थांगपत्ता पाणपुडीला लागत असतो. अशा अत्यंत क्लिष्ट तंत्रज्ञान असलेल्या पाणबुड्या चालवणे हे सुद्धा तेवढेच आव्हानात्मक असते. इथे कोणतीही चूक ही जीवघेणीच ठरू शकते. स्वतः केलेली चूक ही अख्खी पाणबुडीला बुडवू शकते. 

तेव्हा अशा पाणबुड्यांमध्ये काम करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत आवश्यक असते. ते तयार करणे हे एक मोठं जिकरीचे काम असते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणबुडीमध्ये काम करणे हे संपुर्णपणे ऐच्छिक असते. पाणबुडीमध्ये काम करण्यासाठी सक्ती केली जात नाही. तर नौदलात विविध पदावर नियुक्त झालेली कोणतीही व्यक्ती - अधिकारी  - नौसैनिक पाणबुडीसाठी काम करण्यासाठी इच्छा व्यक्त करु शकते. पाणबुडीत काम करणे हे आव्हानात्मक असते कारण एका बंदिस्त आणि अत्यंत मर्यादीत जागेत दिर्घकाळ काम करावे लागते. काम करतांना डोकं शांत ठेवणे, आपल्या वागणुकीचा - स्वभावाचा त्रास - अडचण कोणाला होऊ न देणे, संकटाच्या वेळी इतरांना सहकार्य करणे, स्वतःला नेमून दिलेल्या कामा व्यतिरिक्त गरज पडल्यास विविध विभागात काम करण्याची हातोटी असणे असे अनेक पैलू हे काटेकोरपणे तपासले जातात. त्यानंतर पाणबुडीमध्ये काम करण्याची जबावदारी सोपवली जाते. 

पाणबुडीत काम करतांना विशेषतः अणु पाणबुडीसारख्या तुलनेत मोठ्या पाणबुडीत काम करतांना काही दिवस - आठवडे बाहेरचे जग बघता येत नाही, अगदी साधा सुर्यप्रकाश अंगावर घेता येत नाही.  तेव्हा सर्व परिस्थितीमध्ये तावून सुलाखून निघालेल्या नौसैनिक - अधिकाऱ्यांनाच पाणबुडीत काम करण्याचा मान मिळतो. 

थोडक्यात विविध कौशल्य असलेल्या, मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम, कणखर अशा नौदलातील मोजक्याच लोकांनाच पाणबुडीमध्ये स्वार होण्याचे भाग्य लाभते. पाणबुडीत काम करणारे नौसैनिक यांना नौदलात एक वेगळाच मान असतो. म्हणूनच पाणबुडी आणि त्यामधील नौसौनिक हे एक संरक्षण दलाचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच इंडोनेशियाच्या पाणबुडीला झालेला अपघात हा नौदलाच्या पाणबुडी जगतात काहीसा गंभीर विषय ठरला आहे. 

यानिमित्ताने पाणबुडीच्या काही मोठ्या अपघातांची माहिती देत आहे. यावरुन पाणबुडीचे जग आणि तिथे काम करणारे नौसैनिक याबद्दलची कल्पना तुम्हाला येईल....

USS Thresher, सुमारे ३७०० टन वजनाची अणु ऊर्जेवर चालणारी पाणबुडी १० एप्रिल १९६३ ला अमिरिकेच्या पुर्व किनाऱ्यापासून सुमारे ३५० किमी अंतरावर २६०० मीटर ( ८,४०० फुट ) खोल समुद्रात बुडाली. या पाणबु़डीतील १२९ नौसैनिक मारले गेले. 

K- 141 Kursk या ऑस्कर २ वर्गातील रशियाच्या पाणुबडीला युद्धसराव करत असतांना १२ ऑगस्ट २००० ला जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत ११८ जणांचा मृत्यु झाला. या पाणबुडीबाबत दोन अप्रतिम माहितीपट आहेत. त्याचीही लिंक देत आहे....जरूर बघा. https://www.youtube.com/watch?v=syf3VxfGw8E https://www.youtube.com/watch?v=uQJ6IMREvz8&t=190s 

USS Scorpion या अमेरिकेच्या अणु ऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीला २२ मे १९६८ ला अपघात झाला, ज्यामध्ये पाणबु़डीला जलसमाधी मिळाली आणि ९९ जणांचा मृत्यु झाला. 

INS Dakar डिझेल इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर चालणाऱ्या इस्त्राईलच्या पाणबुडीला २५ जानेवारी १९६८ ला अपघात होत बुडाली, ज्यामध्ये ६० पेक्षा जास्त नौसैनिकांचा मृत्यु झाला. 

फ्रान्स नौदलाची पाणबुडी Minerve ला २७ जानेवारी १९६८ ला अपघातात ७७०० फुट खोल समुद्रात बुडाली ज्यामध्ये ५२ जणांचा मृत्यु झाला. 

सोव्हित रशियाच्या K-129 या अणु पाणबुडीला मार्च १९६८ ला अपघात झाला, पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली, ज्यात १०० नौसैनिकांचा मृत्यु झाला. 

तर १४ ऑगस्ट २०१३ ला भारतीय नौदलाची आयएनएस सिंधुरक्षक पाणबुडी मुंबईच्या नौदल तळावर झालेल्या अपघातात तळावरच बुडाली ज्यात १८ नौसैैनिकांचा मृत्यु झाला.

Saturday, April 24, 2021

खोल समुद्रातील कचऱ्याचे प्रमाण हे किती मोठे आहे ?

समुद्रातील कचरा ही काही नवीन गोष्ट नाही. कोणत्याही समुद्राच्या किनाऱ्यावर आसपास लोकवस्ती असेल तर हमखास किनाऱ्यावर कचऱ्याचे साम्राज्य आढळेल. या कचऱ्यात प्लास्टिक, रबर आणि अन्य विघटन न झालेल्या कोणत्याही गोष्टी आढळतील. समुद्र हा कचरा आपल्याला परत करतो हे खरंच आहे. भरतीच्या वेळी लाटा हा कचरा परत किनाऱ्यावर आणून सोडतात. असा हा किनाऱ्यावरील कचरा ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे ज्याकडे सर्वांनीच गांभीर्याने बघितले पाहिजे यात शंका नाही. अर्थात हा कचरा काढणे - वेचणे हे मोठ्या प्रमाणात शक्यही आहे. अर्थात समुद्रातील सर्वच कचरा किनाऱ्यावर परत जात नाही तर तो खोल समुद्राकडे जातो. तर दुसरीकडे थेट भर समुद्रात कचरा हा विविध जलवाहतुकीच्या - मासेमारीच्या निमित्ताने टाकला जातो. असा हा भर समुद्रातील कचरा किनारा कधीच बघत नाही. समुद्रातील अंतर्गत प्रवाह, वाऱ्याची दिशा, नैसर्गिक घटना या सर्वांमुळे भर समुद्रातील कचरा हा तिथेच भर समुद्रातच फिरत रहातो. यामुळे जगात या कचऱ्याचे काही पट्टे भर - भाग हे खोल समुद्रात तयार झाले आहेत. महासागरात अशा कचऱ्यांचे साधारण 5 प्रमुख पट्टे / भाग ( Sea Garbage Patch ) समजले जातात. ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅच, साऊथ पॅसिफिक गार्बेज पॅच, भारतीय महासागर, नॉर्थ अटलांटिक, साऊथ अटलांटिक. विविध अभ्यास ,निरीक्षणे यापासून असा एक अंदाज आहे की ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचमध्ये 80 हजार टन कचरा आहे. अर्थात हा एक अंदाज आहे. यापेक्षा कितीतरी जास्त पट कचरा पसरला असावा असा अंदाज आहे. तर उर्वरित पट्ट्यात ग्रेट पॅसिफिक गार्बेज पॅचच्या एक चतुर्थांश पेक्षा कमी कचरा आहे. या सर्व पाचही कचऱ्याच्या पट्ट्याची लांबी काही हजार किलोमीटरपर्यंत आहे. अर्थात या सर्व खोल समुद्रात कचरा हा काही सलग आढळणार नाही. तर बहुतांश कचरा हा विखुरलेला आहे. तर फक्त काही ठिकाणी कचरा हा सलग मोठ्या स्वरूपात एकत्र पहायला मिळतो. हा कचरा म्हणजे मासेमारी करतांना फेकून दिलेली जाळी, मासेमारी करतांना - जलवाहतूक करताना वापरलेले रबर - थर्माकोलचे तुकडे, प्लास्टिकच्या बाटल्या, पत्र्याचे टिन, प्लास्टिकशी संबंधित अनेक गोष्टी अशा विविध स्वरूपात आहे. काही कचरा हा हाताने वेचता येईल या स्वरूपात आहे, तर मोठ्या प्रमाणात कचरा हा सूक्ष्म स्वरूपात - बारीक तुकड्यांच्या स्वरूपात आहे. मघाशी म्हंटल्याप्रमाणे किनाऱ्यावरील कचरा हा किमान गोळा तरी करता येईल पण भर खोल समुद्रातील हा कचरा गोळा करणे निव्वळ अशक्य आहे. प्लास्टिक, रबर यांचा विघटन काळ लक्षात घेता पुढील कित्येक वर्षे हा कचरा तसाच राहणार आहे, उलट मोठ्या प्रमाणात कचरा हा  छोट्या तुकड्यामध्ये विभागला जाणार आहे. सर्वच कचरा हा काही समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगतांना बघायला मिळणार नाही, तर कित्येक टन कचरा हा समुद्राच्या तळाशी किंवा माशाच्या पोटातही पोहचला असणार यात शंका नाही. अर्थात हा कचरा माशांसाठी घातक आहे. खाऱ्या पाण्यातील माशांमध्ये प्लास्टीक, घातक मूलद्रव्ये यांचे अंश सापडत असल्याचं शास्त्रज्ञ - संशोधक सांगत आहेत. या कचऱ्यामुळे पाण्यातील जलसृष्टीवरही परिणाम होत आहे. खोल समुद्रात पसरलेला हा महाकाय कचरा डोळ्यांनी सहज दिसण्याचा प्रश्नच नाही, त्याचे अस्तित्व लक्षात येणेही अशक्य आहे, त्यामुळे त्याचे गांभीर्य लक्षात येणे अवघड आहे. अशा या खोल समुद्रात कचऱ्याची वेगाने भर पडत आहे. अर्थात हा कचरा अजिबात उचलला जात नसल्याने, त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रश्नच नसल्याने भर समुद्रातील हे Sea Garbage Patch हे भविष्यात मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाही. याबद्दल काही माहिती वजा व्हिडियोची लिंक शेयर करत आहे. हे बघितल्यावर या विषयाचे गांभीर्य आणखी अधोरेखित होईल. https://www.youtube.com/watch?v=6HBtl4sHTqU https://www.youtube.com/watch?v=vrPBYS5zzF8 https://www.youtube.com/watch?v=soi6HywFSC4 https://www.youtube.com/watch?v=mMG1SdeYLFE

Thursday, February 4, 2021

कृत्रिम सूर्य ( Fusion Reactor )

#कुतूहल #curiosity

#artificialsun
#fusionreactor
#sun

काही दिवसांपूर्वी खरं तर डिसेंबरमध्ये एक बातमी आली होती की चीनने कृत्रिम सूर्य बनवला आहे. चीनच्या आकाशात आता स्वतःचा सूर्य झळकणार, चीनची ताकद शतपटीने वाढणार वगैरे अशा बातम्या - माहिती पुढे आल्या होत्या. कृत्रिम सूर्य म्हणजे काय ? याने नेमकं काय साध्य होणार आहे ? आकाशात एक सूर्य असतांना दुसरा सूर्य बनवण्याचा खटाटोप कशासाठी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे.

सगळ्यात आधी आपला सूर्य म्हणजे काय ते समजून घेऊया. सूर्याचा परिघ हा सुमारे १३ लाख ९० हजार किमी एवढा आहे. १३ लाख पृथ्वी मावतील एवढा सूर्य मोठा आहे. सूर्यावर ७३ टक्के हायड्रोजन, २५ टक्के हेलियम आणि २ टक्के ऑक्सीजन, कार्बन, नियॉन, लोह अशी मुलद्रव्ये आहेत. 

सुर्य का झळकतो - उष्णता फेकतो ? सूर्याच्या गर्भामध्ये ( गाभा - सूर्याच्या आकाराच्या २५ टक्के ) चार हायड्रोजनचे अणु हे एकत्र येत हेलियमचा एक अणू हा एका विशिष्ट वातावरणात तयार होतो. हे होत असतांना मोठ्या प्रमाणात उर्जा फेकली जाते. ही ऊर्जा सौर कण, सौर ज्वाला, प्रकाश, उ्ष्णता, किरणोत्सार अशा विविध स्वरुपात सर्व बाजूंनी फेकली जाते. यापैकी काही ऊर्जा ही आपल्या पृथ्वीवर पोहचते. सूर्यावरील या उलाढालीमुळे प्रचंड प्रभाव असलेले चुंबकीय क्षेत्रही तयार होते. या सर्वांचा एकत्रित प्रभाव हा सूर्यापासून कित्येक अब्ज किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत जाणवतो. ही प्रक्रिया सूर्यावर होतांना कोट्यावधी टन हायड्रोजनवर प्रत्येक सेकंदाला प्रक्रिया होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा अगदी तपशीलात न जाता सूर्य कसा असतो ते तुम्हाला सांगितलं. 

सुर्याच्या गाभ्यात चार हायड्रोजन अणु एकत्र येत हेलियमचा अणु तयार होणे ही प्रक्रिया खुप क्लिष्ट आहे. या प्रक्रियेला Fusion reaction म्हणतात. वर उल्लेख केला होता की ही प्रक्रिया विशिष्ट वातावरणात होते. तर विशिष्ट वातावरण म्हणजे काय तर अतिशय जास्त तापमान आणि प्लाझ्माची उपस्थिती, अत्यंत ताकदवान असं चुंबकीय प्रभाव क्षेत्र. 

सूर्यावर ही प्रक्रिया होते ती एकप्रकारे अनियंत्रित प्रक्रियाच आहे. हायड्रोजन अणु बॉम्ब किंवा Fusion Bomb हा याच तत्वावर आधारीत असतो. दोन अणु एकत्र येत एक मोठा ( जड ) अणु तयार होत असतांना मोठ्या प्रमाणात उर्जा तयार होणं.  

आता या Fusion reaction प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत ही प्रक्रिया अणु भट्टीत - Fusion Reactor मध्ये केली तर ? तर यामधून मोठी ऊर्जा मिळेल ज्याद्वारे वीज निर्मिती करणे शक्य होईल. सर्वात महत्ताचे म्हणजे अणु भट्टीसाठी आवश्यक असणारे 'युरेनियम' हे मुलभूत किरणोत्सारी मुलद्रव्य पृथ्वीवर अत्यंत मर्यादीत प्रमाणात उपलब्ध आहे. Fusion reaction साठी आवश्यक असणारे हायड्रोजन हे मुलद्रव्य विपुल प्रमाणात उपलब्ध आहे किंवा मोठ्या प्रमाणात सहज तयार करता येतो. थोडक्यात जर  Fusion reaction मुळे - Fusion Reactor द्वारे तयार होणारी ऊर्जा उपलब्ध झाली तर सर्व पृथ्वीला पुरुन उरेल एवढी वीजनिर्मिती करता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे सध्याच्या अणुभट्ट्याांच्या तुलनेत Fusion Reactor मध्ये तयार होणारा किरणोत्सार किंवा किरणोत्सारी पदार्थ हा अत्यंत कमी आहे. त्यामुळे अणु भट्टी वापरतांना किरणोत्सारी पदार्थांची विल्हेवाट ही प्रमुख समस्याच हद्दपार होणार आहे. 

मग एवढं सगळं असतांना Fusion Reactor का तयार केले जात नाहीत ? तर Fusion reaction - ही प्रक्रिया नियंत्रित करणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. 

त्यातच ही प्रक्रिया होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती तयार करणे हे अत्यंत आव्हानात्मक आहे. उच्च तापमान - प्लाझ्माचे वातावरण - अतिशय शक्तिशाली चुंबकीय परिस्थिती ही एका अणु भट्टी एवढ्या कमी जागेत निर्माण करणे हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड आणि खार्चिक आहे. 

अशा प्रकारच्या अणुभट्टीवर एका देशाने काम करणे हे खर्चिक दृष्ट्या कठीण आहे. म्हणनूच अमेरिका, युरोपियन युनियन, चीन, भारत, रशिया, जपान, दक्षिण कोरीया हे देश आर्थिक सहाय्य करत International Thermonuclear Exprimental Reactor - ITER हा ( नमुना ) प्रकल्प राबवत आहे. यामध्ये आणखी ३५ देश तांत्रिक सहाय्य करत आहेत. या प्रकल्पाच्या उभारणीची सुरुवात दक्षिण फ्रान्समध्ये झाली असून या प्रकल्पाचा खर्च ६५ अब्ज डॉलर्स ( म्हणजे सध्याच्या चलनानुसार ४ लाख ७५ हजार कोटी रुपयांच्या ) घरात आहे. थोडक्यात जगातील सर्व प्रमुख देश एकत्र येत या तंत्रावर काम करत आहेत आणि एक प्रायोगिक अणु भट्टी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरुन समजा हे तंत्रज्ञान केवढं कठिण आहे ते.    

अर्थात अमेरिका, चीन हे आर्थिकदृष्ट्या दादा देश त्यांच्या देशांत स्वतंत्ररित्याही काम करत आहेत.     

Fusion Reactor संकल्पनेवर १९२० पासून आत्तापर्यंत चर्चा, आराखडे, प्रत्यक्ष काम केले जात असलं तरी पुर्णपणे नियंत्रित - दिर्घकाळ चालणारी - सातत्याने ऊर्जा देणारी यशस्वी अशी अणु भट्टी - Fusion Reactor अजुनही कोणीही बनवू शकलेलं नाही. जर हे शक्य झालं तर जगातील वीजेचा प्रश्न सुटेल. खरंच ? कारण अनेक चांगल्या गोष्टी या जगांत असतात मात्र त्याचा दुरउपयोग किंवा दुसऱ्यावर प्रभाव टाकण्यासाठी वापर होतो. तेव्हा माहिती नाही पुढे काय होईल ते.   

डिसेंबरमध्ये ( म्हणे ) चीनने नेमके हेच करुन दाखवलं आहे. हाच तो चीनचा कृत्रिम सूर्य. ५०० मेगावॅट वीज निर्मितीची Fusion Reactor तंत्रज्ञान असलेली अणु भट्टी चीनने कार्यान्वित केली आहे. चीनच्या पोलादी पडद्यामुळे अर्थात याबद्दल खरं खोटं माहिती नाही. अर्थात चीनही अशा breakthrough गोष्टीबद्दल जगाला लगेच ओरडून थोडीच सांगेल का ?

अर्थात या तंत्रज्ञानावर होणारा खर्च लक्षात घेता मिळणारी वीज किती महाग असेल हाही एक मोठा चर्चेचा विषय आहे. असं खर्चिक तंत्रज्ञान बाळगणं हे सर्वांना परवडणारे आहे का ? अशा खर्चित प्रकल्पांच्या तुलनेत सौर ऊर्जेवर वगैरे का काम करु नये......असे काही प्रश्न विचारले जात आहेत.

Fusion Reactor - कृत्रिम सूर्य ( नियंत्रित सूर्य ) ही संकल्पना सोप्या शब्दात सांगण्याचा हा एक प्रयत्न होता. 
 
Fusion Reactor वर विपुल माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध आहे. विविध माहितीपटसुद्धा आहेत. या विषयाबद्दल अधिक माहिती व्हावी यासाठी काही लिंक शेयर करत आहे......        

https://www.youtube.com/watch?v=Cb8NX3HiS4U 

https://www.youtube.com/watch?v=LJZvFlo0iNs

https://www.youtube.com/watch?v=mZsaaturR6E

https://www.youtube.com/watch?v=JCpWPJrH7TA

अवकाश पर्यटनाचा मार्ग मोकळा….

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात गेल्या १० दिवसांत दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.  Virgin Galactic कंपनीचे रिचर्ड ब्रॅनसोन यांनी ११ जुलैला अ...