Wednesday, July 29, 2020

'राफेल' ने किती फरक पडेल ?





सध्या राफेलचा गाजावजा सुरु आहे. 'राफेल' ने किती फरक पडेल ? याबाबतील लिहिण्यापूर्वी काही गोष्टींवर मत व्यक्त करतो. मग मुळ मुद्द्याकडे जाऊ.

1997 ला सुखोई -30 हे लढाऊ विमान भारतीय वायु दलांत दाखल झाले. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनतर राफेल च्या रुपाने परदेशातील तंत्रज्ञान असलेले नवे लढाऊ विमान दाखल झाले हे विशेष. खरं तर 2006 पासून देशाची गरज लक्षात घेता 126 लढाऊ विमानांची आवश्यकता होती. मात्र निविदा - चाचण्या - निवड करण्यात गेलेला वेळ यामुळे खर्च वाढला आणि शेवटी 126 नाही तर 36 लढाऊ विमानांवर प्रकरण थांबलं तेही राफेलची निवड केल्यावर. अखेर 2016ला करार झाला आणि पहिली पाच लढाऊ विमाने वायू दलाला मिळाली, 2021 च्या अखेरीपर्यंत सर्व 36 लढाऊ विमाने मिळणर आहेत. 

या राफेलबाबत तंत्रज्ञान हस्तांतराचा करार करत बसलो असतो तर प्रचंड वेळ लागला असता. कारण देशांत सध्या HAL या सरकारी कंपनीकडेच लढाऊ विमाने बनण्याचा अनुभव आहे, पण याचा वेगाने उत्पादन करण्याचा रेकॉर्ड खराब आहे. तेव्हा नव्या कंपनीला पायावर उभं रहायला मोठा वेळ लागला असता. म्हणुन ही लढाऊ विमाने तयार करुन भारताला सोपवली जाणार आहेत, यामुळे ही लढाऊ विमाने लगेच वापरायला मिळणार आहेत हे विशेष. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असं तंत्रज्ञान एवढ्या सहजासहजी कोणताही देश दुसऱ्या देशाला ( कितीही मित्रत्वाचे संबंध असले तरी ) द्यायला तयार होत नाही.   

2014 पर्यंत विमानांचा करार करण्याच धाडस युपीए सरकारने केलं नाही ते पंतप्रधान मोदी यांनी केलं. पण त्यापेक्षा एवढे आरोप होऊनही करार रद्द केला नाही हे अधोरेखित करण्यासारखे आहे. यामध्ये कोण खरं, कोण खोटं वगैरे हे स्वतंत्र विषय आहेत, प्रत्येकाची मते वेगळी असू शकतात, त्याबद्दल आदर आहे. पण असेच आरोप जर 2014च्या आधी झाले असते तर करार अर्धवटच राहिला असता कारण अंगावर डाग लागू न देण्याची तशी मनोवृत्ती होती. 

हे सर्व लिहायचे कारण देशाची संरक्षण निकड लक्षात घेता अनेकदा संरक्षण करार होणे अत्यंत आवश्यक असतात, मात्र वादामुळे - आरोपांमुळे, भ्रष्टाचारामुळे अनेक करार मागे पडले आहेत, हे अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे आपलं संरक्षण दल काही बाबतीत शत्रु पक्षाच्या तुलनेत काहीसं कमकूवत असलेलं दिसून येतं. 

आता या 'राफेल' ने किती फरक पडेल ? या बाबतीत दोन पातळीवर विचार करावा असं माझं मत आहे. पहिली गुणवत्ता पातळी तर दुसरी संख्यात्मक.

गुणवत्ता - राफेल हे सध्या भारतीय वायू दलातील सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमान आहे यात शंकाच नाही.  याच्या तोडीस तोड लढाऊ विमान पाकिस्तानकडे नाही. तर चीनकडे Chengdu J -20 हे 5th Generation वर्गातील ( जगातील लढाऊ विमानांची सध्याची सर्वोत्तम श्रेणी ) स्टेल्थ लढाऊ विमान आहे जे राफेलच्या कितीतरी पावले पुढे आहे. 

राफेल हे एक multi-role combat aircraft आहे. म्हणजे हवाई क्षेत्रात वर्चस्व गाजवण्याची, दुसऱ्या लढाऊ विमानाशी लढण्याची, जमिनीवर हल्ला करण्याची, टेहळणी करण्याची, इतर विमानांना संरक्षण देण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. थोडक्यात राफेल हे सुखोई -30 एमकेआय प्रमाणे विविध भुमिका बजावू शकते. तुलनेत काहीशा मोठ्या आकाराच्या सुखोईला राफेलच्या रुपाने नवा साथीदार मिळाला आहे. 

संख्या -  आता राफेल समावेशामुळे संख्यात्मक पातळीवर किती फरक पडणार आहे तर त्याचे उत्तर आहे ' काहीच नाही '. कारण देशाची लढाऊ विमाने निवृत्त होण्याचा - बाद होण्याचा वेग हा नव्याने दाखल होणाऱ्या लढाऊ विमानांपेक्षा कितीतरी जास्त आहे. 

देशाची सामरिक गरज लक्षात घेता भारतीय वायु दलाकडे किमान 42 लढाऊ विमानांचे ताफे - Squadron असणे आवश्यक आहे, असं संरक्षण तज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तानने एकाच वेळी आगळीक केली, त्यांच्याशी एकाच वेळी युद्ध करण्याची वेळ आली तर त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी - दोन्ही बाजूंवर  लढण्यासाठी तेवढा लढाऊ विमानांचा ताफा असणे आवश्यक आहे. 

पण वस्तुस्थिती ही आहे की वायु दलाकडे तेवढा ताफा उपलब्ध नाहीये. मग सध्या किती लढाऊ विमानांचे ताफे उपलब्ध आहेत तर हा आकडा 30 ते 32 असावा असा अंदाज आहे. 36 राफेल विमाने दाखल झाल्यावर राफेलचे एकुण 2 Squadron तयार होतील. 

एका Squadron मध्ये साधारण 16 - 20 लढाऊ विमाने असतात. लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेनुसार ही संख्या कमी जास्त  असते.      

सध्या भारतीय वायु दलाकडे 272 सुखोई 30 ( एम के आय), 100 पेक्षा जास्त जग्वार, 60 पेक्षा जास्त मिग -29, 50 पेक्ष जास्त मिग -21 ( Bison ) , 40 पेक्षा जास्त मिराज -2000 , अंदाजे 16 तेजस अशी एकुण 550 च्या घरांत लढाऊ विमाने आहेत. ( खरा आकडा कधीच सांगितला जात नाही ).

यापैकी पुढील 6 एक वर्षात मिग-21 तर पुढील 10-12 वर्षात जग्वार ही लढाऊ विमाने टप्प्या टप्प्याने सेवेतून निवृत्त केली जाणार आहेत. म्हणजेच तब्बल 150 लढाऊ विमाने ही 2032-34 पर्यंत कमी होणार हे नक्की.  

सध्या स्वदेशी बनावटीचं तेजस लढाऊ विमानाचे उत्पादन जोरात सुरु आहे. त्याच्या नव्या आवृत्तीचे उत्पादनही लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अशी एकुण 120 तेजस भारतीय वायु दलाला हवी आहेत. Hindustan Aeronautics Limited हे तेजसचे उत्पादन करते. वर्षाला 12 पेक्षा जास्त तेजस लढाऊ विमाने तयार करण्याची HAL ची क्षमता आहे. उत्पादनाचा वेग जरी HAL ने वाढवला तरी HAL चा आत्तापर्यंत इतिहास लक्षात घेता तेजसची मागणी पुर्ण करायला 8 ते 10 वर्षे सहज लागू शकतात.  

संरक्षण विभागाने नुकतंच 12 सुखोई - 30 MKI आणि 21 मिग -29 विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष करार होत हे पुर्णत्वास जाण्यास  4 ते 6 वर्षे सहज लागतील असा अंदाज आहे. 

5th Generation ची दोन लढाऊ विमाने बनवण्याचे भारताचे प्रयत्न सध्या कागदावर आहेत. म्हणजेच HAL मार्फत स्वबळावर Advanced Medium Combat Aircraft चा आराखडा बनण्याचे काम सध्या सुरु आहे. तर रशियाच्या मदतीने Fifth Generation Fighter Aircraft बनवण्याबाबत कागदावर चर्चा सुरु आहे. आता या दोन विमानांचा आराखडा नक्की होणं, त्याला मान्यता मिळणं, याबाबात करार होणं, प्रत्यक्ष लढाऊ विमान तयार होणं आणि मग चाचण्यांचे सोपस्कार पुर्ण होत उत्पादन व्हायला सुरुवात होणं यामध्ये कितीही वेग घेतला तरी 10 वर्षे सहज निघून जाणार आहेत. आणि त्यापुढे अशा विमानांची मागणी पुर्ण करेपर्यंत आणखी 8 वर्ष लागतील, 10 लागतील 15 लागतील का नेमकी किती लागतील हे आत्ता सांगणे मुर्खपणाचे ठरेल. 

थोडक्यात वरील सर्व बेरीज - वजाबाकी लक्षात घेतली तर पुढील 10 -15 वर्षात भारतीय वायु दलांच्या लढाऊ विमानांच्या संख्येत फारसा फरक पडणार नाहीये. 

त्यामुळे राफेलच्या तातडीच्या समावेशाने भारतीय वायु दलाची सामरिक गरज पुर्णत्वास जात नाहीये हे नक्की. 

ताज्या दमाचे, जगातील एक अत्याधुनिक लढाऊ विमान 'राफेल' दाखल झाल्यानं वायु दलाला एक उभारी मिळाली आहे एवढंच समाधान सध्या मानायला पाहिजे असं मला वाटतं. 

जाता जाता शेवटचं. लढाऊ विमान कोणतंही असो पायलट हा संबंधित लढाऊ विमान हाताळण्यास किती सक्षम आहे त्यावर लढाऊ विमानाचे यश अवलंबून असते. बघा ना तंत्रज्ञानाच्या बाबातीत कितीतरी वरचढ असलेल्या पाकिस्तानच्या एफ-16 ला तुलनेत काहीसे जुने तंत्रज्ञान असलेल्या आपल्या मिग-21 ने धडा शिकवलाचा ना. 

तेव्हा आपले राफेल हे चीनवर भारी पडू शकते, आपले पायलट तेवढे सक्षम आहेत यात शंका नाही. 





















  

1 comment:

  1. अतिशय समयोचित व बहूव्यासंगी लेख. वाद किंवा चर्चेला योग्य दिशा देणारे मार्गदर्शन.
    धन्यवाद अमितजी.
    प्रकाश वाळवेकर.

    ReplyDelete

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...