Sunday, July 26, 2020

26 जुलै 2005 च्या पावसाच्या आठवणी......


26 जुलै म्हटलं की सर्वांना मुंबईतील ढगफुटी, मुंबई उपनगर ते पालघर - डहाणू - कसारा -कर्जत -पनवेल पट्ट्यात ढगफुटीने झालेला मुसळधार पाऊस हे सर्व आठवतं. पण त्याच्या दोन दिवस आधी कोकणात बक्कळ पाऊस झाला होता. 24-25 जुलैला. यामुळे कोकणात विशेषतः रायगड -रत्नागिरीमध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, पूराचा फटका बसला होता. तेव्हा मुंबई आणि परिसराएवढे कोकणाचेही नुकसान झाले होते.

2005 ला मी ई टीव्ही मध्ये होतो. 26 जुलैला तेव्हा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी एका टर्मिनलचे उद्धाटन होणार होते , साधारण दुपारी एक किंवा दोन चा कार्यक्रम होता. मी दहा वाजता डोंबिवली रेल्वे स्टेशन वर आलो. अर्थात पाऊस बऱ्यापैकी त्यावेळी पडत होता. जवळपास पाऊण तासानंतर दादर सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्मवर आली. मात्र पावसाचे स्वरूप बघता अनेकांनी परत घरी जाणे पसंत केलं, त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी फारशी नव्हती.

लोकल कशीबशी तब्बल पाऊण तासाने ठाण्याला पोचली आणि तेथे ऐकलेली अनाउन्समेंट ऐकून धक्काच बसला. ठाण्याच्या पुढे एकही लोकल कल्याणच्या दिशेने जाणार नसल्याचं रेल्वेने जाहीर केलं म्हणजेच ठाण्याला पोचता पोचता मागे केवढा पाऊस झाला असावा याची आपण कल्पना करू शकता.

तोपर्यंत आमच्या लोकलने वेग घेतला होता आणि मी मी साधारण तासाभरात दादरला पोचलो. माझी टीम ही भेट मला अंधेरीला भेटणार होती म्हणून मी पश्चिम रेल्वेची लोकल पकडली अंधेरीच्या दिशेने रवाना झालो. तोपर्यंत पाऊस दणादण कोसळत होता, भर दुपारी दाट अंधार झाला होता. तेवढ्यात आमचे बॉस सर राजेंद्र साठे सरांचा फोन आला " अमित कुठे आहेस  ? ", म्हटलं बांद्राला पोहोचत आहे,  ते म्हणाले की बांद्र्याला थांब, तुला फोन करतो. 

मी ताबडतोब बांद्राला उतरलो आणि सरांच्या फोनची वाट बघत होतो. 

तेवढ्यात सरांचा फोन आला, सर म्हणाले ताबडतोब ऑफिसला परत ये, तुला कोकणात जायचे आहे. ई टीव्हीचे ऑफिस नरिमन पॉइंटला होते. तेव्हा ताबडतोब मी चर्चगेट कडे जाणारी जलद लोकल पकडली.

माहिमची खाडी पार करताना आजूबाजूला असलेले पाण्याचे रौद्र रूप बघता रेल्वे सेवा कधीही बंद पडणार अशी परिस्थिती होती. आणि चर्चगेटला उतरतांना लोकल सेवा बंद करत असल्याची घोषणा झालीच.

साधारण अडीच पर्यंत मी ऑफिसला पोहोचलो , तोपर्यंत माझा सहकारी श्रीरंग खरे तिथे हजर होता. आम्हाला साठे सरांनी बोलावलं आणि स्पष्ट सूचना दिल्या की दोन दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याने तिकडे जाऊन कवरेज करायचे आहे, लगेच निघा, लवकरात लवकर पोहचा. वाटेतल्या मुंबईतल्या कव्हरेजमध्ये वेळ दवडू नका, बाकीच्या टीम आहेत.

तेव्हाचे आमचे ऑफिस ॲडमिन शंकरन जे आता टीव्ही नाईन ला आहेत त्यांनी प्रत्येकी पाच पाच हजार रुपये दिले आणि आम्ही दोघे जण टीम घेते दोन ओम्नी गाडीने दादर मार्गे निघालो.

मग माटुंगा सर्कलच्या इथे येऊन नाईलाजाने थांबावं लागलं कारण माटुंगा सायन दरम्यान प्रचंड पाणी रस्त्यावर भरलं होतं. खरंतर रस्त्यावरून पाण्याचे वेगवान असे अक्षरशः लोट वाहत होते. अवघ्या काही मिनिटात सायन दिशेला ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेल्या अनेक गाड्या पाण्याखाली जात असताना स्पष्टपणे आम्ही बघत होतो. अर्थात हा नेहमी सारखा पाऊस नाही जरा जास्तच पाऊस पडतोय याची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती. तेव्हा ढगफुटी हा शब्द ऐकला सुद्धा नव्हता किंवा असं काही असेल याचा काहीच अंदाज आला नाही. मग आम्ही वडाळा मार्गे जाण्याचा निर्णय घेतला तिकडे आम्ही गाड्या वळवल्या तिथेही पुढे कमरेभर पाणी होतं. मग आम्ही पुन्हा आमच्या गाड्या फिरवल्या आणि पुन्हा आम्ही माटुंगासर्कलपाशी आलो. 

संध्याकाळी साधारण सहा ते रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही तिकडेच होतो. पावसाचा जोर हा 6 नंतर खूप कमी झाला होता. हजारो लोक चालत आपल्या घरी निघाले होते. मोजके व्हिज्युअल्स घेतले कारण कॅमेरा बॅटरी पण वाचवायच्या होत्या.

आता पुढे काय करायचं असा आम्हाला प्रश्न पडला होता. मोबाईल नेटवर्क तर दुपारनंतर ठप्प झालं होतं. लँडलाईन फोन च्या ठिकाणी तोबा गर्दी होती. शेवटी रात्री माटुंगा - सायन परिसरात साचलेलं पाणी बऱ्यापैकी कमी झाल्याचं जाणवल्यावर आम्ही गुडघाभर पाण्यातून गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

अर्थात तेव्हा आत्ताचा माटुंगा फ्लायओव्हर , सायन हॉस्पिटल समोरील फ्लायओव्हर काही झाले नव्हते. या सर्व मार्गावरून गाडी रेटत आम्ही कसेबसे सायन फ्लायओव्हरवर पोहचलो आणि आमची गाडी ट्राफिक जाम मध्ये अडकली. ब्रीजच्या खाली सुद्धा ट्रॅफिक जॅम होते, रस्त्यावर भरपूर पाणी होते.

एव्हाना रात्रीचे दोन वाजले होते, आजूबाजूला अंधार होता, आम्ही तशाच ओल्याचिंब अंगाने रात्र ही गाडीमध्ये काढली आणि सकाळी सहाच्या सुमारास उजाडल्यावर आम्ही गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. ड्रायव्हरला पाच पन्नास रुपये दिले आणि सांगितले की जेव्हा मार्ग मोकळा होईल तेव्हा तुम्ही ऑफिसला जावा. आता फोनही लागायला सुरुवात झाली होती.आम्ही कॅमेरा युनिट घेऊन पुढे निघालो आणि सायनचा ब्रीज असा उतरायला सुरुवात केली आणि समोरचे दृश्य बघून धक्काच बसला.

समोर अथांग समुद्र पसरला होता. 

सायन ब्रिज उतरल्यावर दोन्ही बाजू असलेला मैदानी परिसर पाण्याने भरला होता गाड्या - रिक्षा तरंगत होत्या. रस्त्याच्या मध्ये डिव्हायडर वरून हजारो लोक ये-जा करत होती, तीसुद्धा कमरेपेक्षा जास्त पाण्यातून. कित्येक ट्रक या रस्त्यावर उभे होते आणि या ट्रकवर हजारो लोकांनी रात्र कशीबशी काढली होती. आम्ही तिथून चालायला सुरुवात केली ते थेट गोवंडी पर्यंत. रात्रभर झोप नाही, पाय तुटायची वेळ आली होती. आम्ही चालत आमचा सहकारी कॅमेरामन मणी पिल्ले यांच्या घरी साधारण 11 च्या सुमारास पोहचलो. त्याच्या घरी गरमागरम पोहे - चहा नाश्ता केला. अर्थात आम्हाला अचानक कोकण दौऱ्यावर पाठवलं असल्याने आम्ही एक्स्ट्रॉ कपडेसुद्धा बरोबर घेतले नव्हते. मणिने त्याच्या घरी असलेले टी शर्ट आणि हाफ पॅन्ट आमच्यासमोर टाकले, ज्याला जसं होतं तसे त्याने ते कपडे पटापट घातले आणि आम्ही श्रीरंग वगैरे सर्वजण नवी गाडी शोधायला बाहेर पडलो, कारण कोकणात पोहचायचे होते. 

पावसाच्या दणक्यामुळे बहुतेक सर्व दुकाने बंद होती, अखेर आम्हाला एक कॉलिस चालक भेटला, आमच्या बरोबर यायला तयार झाला. हे सर्व सोपस्कार करता करता तीन वाजले होते.

चारच्या सुमारास आम्ही पनवेल पार करत होतो आणि पावसाच्या धुमाकूळ मुळे उध्वस्त झालेला परिसर बघून आम्ही अक्षरशः हादरून गेलो होतो.

पनवेल पार केल्यावर वाटेत नदीवर असलेल्या ब्रिजच्या कठड्यांवर तर अक्षरशः हजारो झाडे अडकून पडली होती. असं वाटत होतं की आम्ही जंगलातून प्रवास करत आहोत.

पळस्पे फाट्याला पोहोचलो, तेथे असलेल्या वाहतुक चौकीतल्या पोलिसाला विचारले की कोकणातला रस्ता मोकळा आहे का ? तो म्हणाला रस्ता मोकळा आहे, काही अडचण नाही. पळस्पे फाट्याच्या परिसरात पाणी ओसरल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. आम्ही पोलिसाला विचारले की किती पाणी होते ? तर तो आम्हाला पोलिस चौकीत घेऊन गेला आणि लोखंडी कपाटाच्या वर त्याने पाण्याची रेषा दाखवली. तेवढं पाणी होतं आणि तो म्हणाला मी त्या कपाटावर बसून रात्र काढली.

पळस्पे फाटा सोडला आणि आम्ही महाडच्या दिशेने वेगाने निघालो. महामार्गावर फारशी अडचण आली नाही, कुठेही क्षणभर देखील थांबलो नाही. साधारण सातच्या सुमारास दासगाव गावाजवळ आलो. तीथे रस्त्याच्या उजव्या हाताला अनेक लोक काहीतरी जाळत असल्याचं आम्हाला दिसलं. जवळ जाऊन बघतो तर काय चक्क रस्त्याच्या बाजूला अंत्यसंस्कार सुरू होते आणि मागे वळून गावाकडे बघितलं तर हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या दासगावावर दरड कोसळली होती. हिरव्यागार डोंगराचा एक भाग खरवडून खाली आला होता आणि गावातील काही घरांना कवेत घेऊनच थांबला होता.

अंत्यसंस्कार सुरू असलेल्या ठिकाणी कॅमेरा काढण्याचे धाडस झाले नाही, लोकांचा आक्रोश - दुःख बघून पुढे पाऊल टाकता आले नाही. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल तर गावात काय असेल ? त्यामुळे दासगावचे दृश्य दुरूनच कॅमेऱ्यात टिपत पुढे महाडच्या दिशेने रवाना झालो. 

आम्ही महाड गावात संध्याकाळी साधारण साडेसात आठच्या सुमारास पोचलो. महाड गांव जवळपास तीन दिवस पाण्याखाली होते. आम्ही पोचलो ( 27 जुलै ) तेव्हा काही तास आधी पुराचे पाणी ओसरले होते, गावातील लोक घरातून - दुकानातून चिखलगाळ बाहेर काढत होते. 

अख्खा गाव अंधारात होता. मग आम्ही महामार्गालगत असलेल्या हॉटेलमध्ये राहिलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जुलैला श्रीरंग खरे ने महाड गाव आणि परिसरात कव्हरेज करायचे ठेवले, तर मी दरड कोसळलेल्या जुई गावाकडे जायचे ठरवले.

छोटेखानी जुई गाव हे अर्धेअधिक दरडीखाली गेले होते. एव्हाना दरड कोसळून चार दिवस झाले होते,  एक पोकलँड मशीन गावात दरड दूर करण्याकरता पोहचलं होतं. 

गावाच्या सुरुवातीला एक शाळा होती. तिथे गावकऱ्यांनी आश्रय घेतला होता. शाळेतून हंबरडा फोडण्याचा आवाज येत होते. माझी शाळेत पाऊल टाकण्याची हिम्मतच झाली नाही. कॅमेरामनला म्हणालो तूच जा आणि शक्य तेवढे दुरून व्हिज्युअल्स घे.

त्यानंतर आम्ही गावात पोहोचलो. खरं तर गाव असं काही दिसतच नव्हतं. दगड - माती - चिखल याचे ढिगारे सगळीकडे दिसत होते. प्रचंड दुर्गंधी सगळीकडे पसरली होती. 

रिमझिम पावसात शक्य होईल तसा आमचं कव्हरेज सुरू होतं. गावकऱ्यांकडून माहिती घेत होतो. पोकलँड मशीन एक ढिगारा अलगदपणे बाजूला काढत होतं, तेव्हा मृतदेहाचा अर्धा भाग या ढिगार्‍यातून बाहेर मशीनच्या त्या फावड्याबरोबर आला आणि ते दृश्य बघून आम्ही अक्षरशः तिथून धूम ठोकली.

तिथे उभे राहून आणखी कवरेज करणे निव्वळ अशक्य झालं होतं, तरीही कामाचा भाग म्हणून शक्य होईल तेवढ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया - शासकीय कर्मचारी किंवा पोलीस यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि पुन्हा वेगाने महाडला पोचलो. 

आमच्याकडे फीड अपलिंक करण्यासाठी कोणतेही साधन अर्थात नव्हते. मोबाईल तर अर्थात प्राथमिक अवस्थेत ला होता ज्यात फोटो काढण्याची पण सोय नव्हती.

तेव्हा आम्ही कव्हरेजची टेप घेऊन भोरला पोहचलो. तिथून टेप ही भोर हून पुण्याला जाणाऱ्या एसटीच्या ड्रायव्हर कडे दिली आणि कंट्रोल रूम मध्ये त्याला द्यायला सांगितली. तिथून टेप मग पुणे ऑफिसला नेली जाणार होती.

अशा रीतीने पुढील तीन दिवस कव्हरेजची टेप पुण्याला पाठवत होतो. महाड, पोलादपूर आणि त्या परिसरातील पुराचं पावसाने केलेल्या नुकसानीचा कव्हरेज करत होतो. दरम्यान श्रीरंग खरे रत्नागिरीला रवाना झाला होता. तर पुण्याहून अभिजित कांबळे, तर कोल्हापूरहून दीपक शिंदे हे सहकारी महाडमध्ये भेटले.

अखेर महाड - पोलादपूर मधील काही कपड्यांची दुकाने सुरू झाल्यावर आम्ही आमच्या मापाचे टी शर्ट आणि हाफ पॅन्ट विकत घेतल्या आणि उरलेले दोन दिवस तेथे काढले.

साधारण सहाव्या दिवशी मी , माझी टीम आणि श्रीरंग खरे आम्ही मुंबईला परतलो. येताना श्रीरंगने पनवेलला थांबून तिथली दुर्दशा कव्हर केली. 

या सर्व ठिकाणी फिरतांना पहिल्यापासून घरच्यांना वेळोवेळी कुठे जात असल्याची कल्पना देत होतो.  त्यामुळे घरच्यांचा जीव टांगणीला लावला नाही.

तोपर्यंत मुंबई कशी तीन दिवस पाण्यात बुडालेली होती , वाहतूक सर्व ठप्प होती हे सर्व टीव्हीवरून बघत होतो. मुंबई आणि परिसराला मदत करणे आवश्यक असले तरी ग्रामीण भागाकडे त्यातही कोकणातील गावांकडे खूपच दुर्लक्ष झाल्याचे स्पष्टपणे अनुभवायला मिळाले होते.

अर्थात मुंबईत ठिकठिकाणी भरलेलं पाणी, यामधून लोकांची होणारी पळापळ, सायन ते कुर्ला पाण्याखाली गेलेले रस्ता, परिसराला आलेले समुद्राचे स्वरूप, सायन पुलावर काढलेली रात्र, दरड कोसळलेल्या जुई गावाची अवस्था, लोकांचे भेदरलेले चेहरे, शाळांमधला अक्रोश, रस्त्याच्या बाजूला पाहिलेले अंत्यसंस्कार...... ही सगळी दृश्य याच काय पण पुढील जन्मीदेखील आठवतील एवढी मनावर कोरली गेली आहेत.

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...