Sunday, May 10, 2020

एक आचरट ट्रेक.....


आचरट ट्रेक...मुलुंड ते कान्हेरी लेणी व्हाया भूत बंगला-तुळशी तलाव



वर्ष नेमके आठवत नाही, बहुदा 2006 असावे, दिवस मात्र बुद्धपौर्णिमेचाच होता एवढं नक्की.

सलग तिसऱ्या वर्षी बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या प्राणीगणनेसाठी मी मचाणावर जाणार होतो. यावेळी बातमीसाठी नाही तर स्वतःसाठी, निसर्गात रहाण्याची आवड जपण्यासाठी जाणार होतो.

आम्ही तिघे जण होतो, मी, वामन कदम काका ( बीएआरसीमधून रिटायर्ड झाल्यावर किल्ले भ्रमंती करत नव्या आयुष्याला सुरुवात करणारे ) आणि आणखी एक सहकारी होता, नेमकं कोण होतं ते आठवत नाही.

एक वन कर्मचारी मुलुंडपासून कान्हेरी लेणीपर्यंतच्या ट्रेकला तयार झाला, या छोट्या ट्रेकनंतर तो स्वतः प्राणी गणने मोहिमेच्या ड्युटीवर जाणार होता. एव्हाना बातम्या करता करता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सर्व प्रमुख अधिकारी - कर्मचारी यांच्याशी ओळख झाली होती. तेव्हा या ट्रेकसाठी रितसर परनावगीचे सोपस्कार सहज पार पाडले गेले होते. मचाणावर रात्र काढायची असल्याने मी आधीच्या अनुभवाच्या आधारे तयारी केली होती. थोडक्यात मोहिमेसाठी सज्ज झालो होतो.

बुद्धपौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुलुंडच्या श्रीनगर भागातून योगी हिलला आम्ही तीघे पोहचलो. मात्र सुरुवातीलाच अडचण आली. संबंधित वन कर्मचारी काही कारणामुळे येऊ शकणार नसल्याचा त्याचा फोन आला, तो थेट ड्युटीवर हजर होणार होता. तेव्हा आता जायचं कसं असा प्रश्न पडला. तेव्हा योगी हिलपासून जंगलात उतरणारी पायवाट पकडून चाला, तुम्ही सहज पोहचाल अशी माहितीही त्याने दिली. अर्थात डोंगर किंवा किल्ला डोळ्यासमोर ठेवून नेणारी चांगली मळलेली पायवाट आणि जंगलातील पायवाट यामध्ये जमिन अस्मानच फरक असणार होता. 

सकाळी साधारण 7.30 ला ट्रेकला सुरुवात केली. योगी हिलमधून जंगलात शिरणारी चांगली पायवाट पकडली. सुदैवाने ही पायवाट मस्त मळलेली असल्यानं आमचा प्रश्न सुटला. डोंगर उतरातच झाडाखाली कुठलं तरी छोटेखानी देऊळ लागलं. नमस्कार-चमत्कार करत देव नेमका कोणता आहे हे ओळखण्याचा प्रयय्न केला, पण नंतर तो प्रयत्न सोडून दिला. घनदाट जंगलातून आमची तंगडतोड सुरु केली. लगेचच उद्धवस्त केलेली हातभट्टी लागली. काही दिवसांपुर्वीच वन कर्मचाऱ्यांनी हातभट्टी उद्ध्वस्त केली असल्याचं स्पष्टपणे समजत होतं. असो.....

सुर्य आणि दिशेचा अंदाज घेत आमची वाटचाल बरोबर आहे ना याची मी अधुनमधून खात्री करत होतो. सुदैवाने पायवाट एकच असल्यानं म्हणजेच फाटे न फुटल्यानं आमची चाल निर्धास्त झाली होती. 

वाटेत बिबट्या दर्शन देईल का, भेटेल का याची भिती म्हणण्यापेक्षा उत्सुकता जास्त होती. आपल्याला आठवत असेल 2004-2006 या काळात बिबट्यांच्या हल्ल्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान देशभर पर्यावरणप्रेमींमध्ये चर्चचा विषय होते. तेव्हा बिबट्य़ा भेट बाबा असं सारखं मनात येत होतं.

साधरण 9.30 च्या सुमारास आमची मळलेली पायवाट एक टेकाड चढायला लागली. मनांत म्हटलं की च्यायला चुकलो की काय ? तर नंतर पटकन लक्षात आलं अरे ही पायवाट भूत बंगल्याकडे चालली आहे. भूत बंगला हे नाव लोकांसाठी. आपल्यासाठी थोडा वेळ बुड टेकवायचं ठिकाण. दम लागत शेवटी टेकाडावर पोहचलो आणि जो काही थोडा थकवा आला होता, तो कुठच्याकुठे गायब झाला, टुणकण उडीच मारली म्हणा. भूत बंगल्याच्या समोर खाली तुळशी तलाव, त्याच्यापुढे विहार, त्याच्यापुढे पवई तलाव आणि त्याच्यापुढे इमारतींचे जंगल. हे सर्व एका मागोमाग एक स्प्ष्ट दिसत होतो. मुंबई मायानगरीतील, देशाच्या आर्थिक राजधानीमधील, या जागतिक (?) शहरामधील माझ्या मते सर्वोत्तम दृश्य असावं. बराच वेळ हे दृश्य मनात साठवत होतो. इथली एक भयाण पण मन सुखावणारी शांतता यालाही तोड नव्हती.

भुत बंगला खरं तर इंग्रजांच्या काळांत विश्रांतीकरता उभा केला होता. आता सर्व ढासळत्या अवस्थेत होतं. बाथटबही बघायला मिळालं. मनोसोक्त आतुनबाहेरुन भूत बंगला बघितला. 

एवढा वेळ जपून ठेवलेलं पाणी घशाखाली ओतलं आणि शांत डोळे मिटून पडून राहिलो. थोडी पेटपुजा करत तुळशी तलावाच्या दिशेने आम्ही उतरायला सुरुवात केली, अर्थात हे करतांना पायवाटेचा मार्ग पक्का लक्षात ठेवला होता. मनांत धाकधुक होती की तुळशी तलावाच्या काठावर कोणातरी दर्शन देईल. पण छे...कसलं काय...आमच्या अत्यंत शांतपणे सुरु असलेल्या चालीची चाहूल बहुदा आसपास परसली असावी. साधं माकडंही तलावाच्या जवळ दिसलं नाही.

म्हटलं जाऊ दे....एवढं भटकायला मिळतंय हेही काही कमी नाही. तलावातील पाणी तोंडावर मारलं आणि पुन्हा पायवाटेला येऊन मिळालो, म्हंटलं घेऊन चला आम्हांला लेण्यांकडे.

ऊन चांगलंच जाणवायला लागलं होतं. जंगलातून जरी फिरत असलो तरी उन्हाळा असल्यानं बहुतांश झाडांनी पानं खाली ठेवली होती, त्यामुळे सलग अशी मोठी सावली क्वचितच अनुभवायला मिळत होती. मात्र जंगलातून चालण्याचा मनोसोक्त आनंद लुटत होतो. 

मध्येच कुठल्या तरी प्राण्याच्या स्पष्ट आवाज ऐकल्यासारखं झालं, आम्ही सावध झालो. नेमका आवाज कुठुन आला याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. म्हटलं कोणता प्राणी असावा ? पाच दहा मिनीटं नजरेला येईल त्या दिशेने जंगलाकडे डोळे ताणून बघत होतो, कोणता प्राणी नजरेला पडत आहे का ? कदाचित camouflage झाला असावा. कसलं काय...घंटा...काय पण दिसलं नाही...मात्र सुरुवातीला आवाज आला हे मात्र नक्की. शेवटी आम्ही प्रयत्न सोडून दिला, कारण अजून पल्ला गाठायचा होता.

आमची मातीची पायवाट दगडी झाली तेव्हाच लक्षात आले की आपण लेण्यांच्या परिसरांत आलो आहोत. एव्हांना 12.30 झाले होते. कातळावर अर्थात झाडं नसल्यानं उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. लेणी जवळ आल्या असं म्हणता म्हणता दोन चार मोठ्या चढ उताराची टेकाडं कधी पार केली समजलंच नाही. मात्र लेणी काही जवळ यायचं नाव घेईनात. शेवटी एका पाडलेल्या मंदिराजवळ पोहचलो. म्हटलं चला आलो तर अखेरचं. कारण एकदा लेणींच्या मागे असलेल्या या मंदिरापर्यंत येऊन गेलो होतो. कोण्या एका बाबाने मंदिराच्या मार्फत प्रस्थ निर्माण केलं होतं. अर्थात बरीच आरडाओरड झाल्यावर ते मंदिर जमिनदोस्त करण्यात आलं, बाबाला हाकलून लावण्यात आलं.

तरीही 15 एक मिनीटांची तंगडतोड झालीच, शेवटी घाम पुसत लेण्यांच्या इथे पोहचलो एकदाचे. ऐरवी पर्यटकांच्या वर्दळीने गजबजलेला हा लेण्यांचा परिसर निर्मनुष्य होता. त्यामुळे लेणी भयंकर भीतीदायक वाटत होती. अख्ख्या लेण्यांच्या परिसरांत आम्ही तिघेच. तेव्हा थोडं घाबरायला नक्की झालं. पण मुलुंड ते कान्हेरी लेणी हा पल्ला गाठल्याचा खुप आनंद झाला होता. 

भुका लागल्या होत्या, बांधून आणलेला शिधा आम्ही तिघांनी सोडला आणि ताव मारायला सुरुवात केली. म्हंटलं माकडं नक्की त्रास द्यायला येतील. मात्र सकाळपासून हा परिसर निर्मनुष्य असल्याने बहुदा माकडांनीही इथून जाणे पसंद केले असावे. इथल्या टाक्यातील मनोसोक्त थंड पाणी प्यायलो. आलेला थकवा आणि भरलेलं पोट यामुळे आम्ही तिघांनी चक्क अर्धा तास या शांत लेण्यांच्या ठिकाणी झोप काढली. 

पण पुढे मात्र काही वेगळंच घडले.

मी मचाणावर जाणार होतो आणि सोबतचे दोघे सहकारी बोरीवलीमार्गे घरी जाणार होते. ठरल्याप्रमाणे गाडी कान्हेरी लेणींपर्यन्त यावी यासाठी फोनाफोनी करायला सुरुवात करणार होतो तेवढ्यात घरून फोन आला. काही घरगुती कारणामुळे मला घरी परतावं लागणार होतं, तेव्हा मचाणाचा बेत लगेच रद्द केला. आता घरीच जायचं आहे तेव्हा गाडीने कशाला ? परत आल्या त्याच मार्गाने जाऊया की असा विचार आला.....आणि ठरले की परत मुलुंडला जंगलातूनच जायचे. 

लगेच लेण्यातील पाण्याच्या टाकीतील पाणी भरून बाटल्या फुल्ल केल्या. निघण्याची तयारी करतांना 4 वाजले होते. साडे सात पर्यन्त अंधार पडणार असल्याने हाताशी 3.30 तास होते. तरीही परतीचा प्रवास कुठेही न लांबवता, कुठेही न रमता तडक योगी हिल गाठायचा निर्णय घेतला. 

आता पायवाट पक्की लक्षात असल्याने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. भूत बंगल्याला वळसा घालत, तुळशी तलावाजवळ न फिरकता वाटचाल जोरात सुरू होती, आम्ही चांगला वेग पकडला होता. आजूबाजूच्या जंगल सौंदर्याचा आनंद घेत आम्ही जात असलो तरी एक भीती मनात होती. सकाळी ऊन वाढल्यावर सहजा प्राणी बाहेर पडत नाहीत, आता संध्याकाळ झाली होती, हवेतील उकाडा चांगलाच कमी झाला होता, जंगल असल्याने अर्थात हे सहज जाणवत होते, तेव्हा प्राणी बाहेर पडणे सहाजिक होते, आमची किमान दुरून भेट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तेव्हा सकाळ पेक्षा आमची नजर चालतांना आजूबाजूला जरा जास्तच वेगाने भिरभिरत होती.

पण प्राणी दर्शन वगैरे काही झाले नाही. 6.30 वाजता आम्ही तिघे सुखरूप योगी हिलला पोहचलो. एक वेगळा ट्रेक केल्याचे नक्कीच समाधान मिळाले होते, मुंबईतल्या या जंगलातून मस्त पायपीटही झाली होती. हे जंगल वेगळ्या नजरेतून बघता आले होते. भूत बंगला, तुळशी आणि इतर तलावही बघता आले होते. आत्मा सुखावला होता. 

अर्थात सलग तिसऱ्यांदा मचाणावर बसण्याची संधी मात्र हुकली होती याची रुखरुख होतीच.

No comments:

Post a Comment

इस्त्रोच्या ताफ्यात नवा प्रक्षेपक/रॉकेट SSLV, पहिले उड्डाण सात ऑगस्टला

#ISRO #SSLV भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (ISRO) च्या ताफ्यात आता नवीन रॉकेट-प्रक्षेपक दाखल होणार आहे. Small Satellite Laun...